टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
शब्दक्रीडा
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन- पार्ट २
प्रेषक पुष्कर ( रवी, ०७/१३/२००८ - १९:३८) .(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.)
पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण
(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन)
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.
पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.
पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.
पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.
पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.
पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
- (पटकथा - पुष्कर)
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन
प्रेषक पुष्कर ( शुक्र, ०७/११/२००८ - १८:३४) .परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.
पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.
पंतांना परमेश्वरच पावला!
-( पटकथा - पुष्कर)
जालावरील संक्षिप्त शब्द
प्रेषक विद्याधर३१ ( बुध, ०६/२५/२००८ - २२:४५) .सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो.
जसे
१) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप.
२) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट
३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा.
यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही.
तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे.
प्र क टा आ म्हणजे काय?
थोडक्यात, न विचारलेली गम्मत
प्रेषक श्रीकृष्ण सामंत ( बुध, ०६/२५/२००८ - २२:४४) .“सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे”
यालाच,
”जीवन ऐसे नांव ” असं म्हणतात.
जीवनात,
”कधी खुषी कधी गम”
असतं,
बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं.
वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार.
“नाचरे मोरा आंब्याच्या वनांत “
असं म्हणता,म्हणता
“कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते”
असं म्हणे पर्यंत,
”मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार”
असं म्हणताना
“जीवनात ही घडी अशीच राहूदे”
असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही.
आणि,नंतर
“थकले रे नंदलाला”
असं म्हणायला काहिही वाटत नाही.
”जन पळभर म्हणतील हाय,हाय “
म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपली हे ही कळे पर्यंत
“आम्ही जातो अमुच्या गांवा”
म्हणावं लागतं,
थोडक्यांत काय
”फिरून जन्मेन मी”
असं धडधडीत म्हणावं असं शेवटी शेवटी वाटतं.
असं जाणकार म्हणतात.
श्रीकृष्ण सामंत
खाना खजाना
प्रेषक अरुण मनोहर ( मंगळ, ०६/१०/२००८ - ०३:४९) .खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)
टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही. बीबीला सल्ला देण्यासाठी बाबा, बेबी सारेच पुढे सरसावतात. आणि मग काय विचारता राव! पार्लमेन्टरी गोंधळ बरा! हे करा, ते करा. ओरडाओरडी. शेवटी करायचे काहीच नाही. चूल आणि सर्वांची पोटे थंडच रहातात. आम्ही सगळे मात्र गरम होतो.
हे असे रोज चालते. एक दिवस विचार केला... नाहीतरी रोज बोलता बोलता आपण कल्पनेतच सारे पदार्थ खात असतो. तर मग बाकायदा बोलीभाषेतील पाककृतींचे धडेच का करू नये? मायबोली मराठी आणि हिन्दी पण एक समृद्ध भाषा आहे. म्हणींचा मोठा साठाच हिंदी मराठीत आहे. हा साठा वापरून मग मी एक खाना खजानाच तयार केला. माझा हा खजाना जर तुम्ही वापरलात, तर मूग गीळून गप्प बसण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही. दाने दानेपे लिखा है खानेवाले का नाम ह्या न्यायाने तुमची सारी पोटपूजा यथासांग होईल. चला तर लुटू हा खाना खजाना.
काय आहे, की कुठलेही काम एकट्याने कधी करू नाही. खाना बनवण्याच्या कामात देखील एक चांगली, तरतरीत असीस्टंट हवीच. आता एक तरतरीत चवळीची शेंग अशी असीस्टंट निवडा. रेसीपी चांगली होण्यासाठी तिला आधी हरभर्याच्या झाडावर चढवा. जर जास्त उंचावर गेली, तर Too many cooks spoil the dinner म्हणून काहीतरी निमीत्य काढून तिला कटवा. सांगा, "जा, पी हळद आणि हो गोरी." आता ती परत येण्या आधी आपण काही रेसिपी पाहू या.
आधी मेन डीश. आपण बनवणार आहोत बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. धुतल्या तांदळासारखे चरीत्र असलेले तांदूळ घ्या. पाणी सगळ्यात चांगले म्हणजे इश्वराची करणी आणि नारळात पाणी. एका नारळातील करणी.. ओह.. पाणी काढून तांदळात टाका व खदखदा शिजवा. फ्रीज मधील शिळ्या कढीला ऊत येईपर्यंत उकळा. भाताचे छोटे छोटे गोळे करून हा बोलाचाच भात आणि मोठ्या वाडग्यात बोलाचीच कढी वाढा.
हा भात कमी पडेल असे वाटले तर भरीला करा बिरबलाची खिचडी. बाजारात तुरी आल्या असतील तर भट भटीणीला मारायच्या आधीच त्या घेऊन या. पाव किलो ये मूंग और मसूर की दाल त्यात टाका. दालमे कुछ काला असेल तर फारच छान. बिरबलाची खिचडी रंगी बेरंगी दिसेल आणि रंगाचा बेरंग होणार नाही. खिचडीला फोडणी साठी तेल कमीच लागते. म्हणून प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे पैकी दोन चमचे तेलाची बिनबुडाचे भांडे घेऊन तांदूळ, डाळ वगैरे मिश्रणाला फोडणी करा. काल खालेल्या मिठाला जागून चवीनुसार तेही घाला. शिजत असतांना उथळ पाण्याला खळखळाट फार होतो. तेव्हा अधून मधून जमीनीवर लाथ मारेन तेथून पाणी काढून पाणी घालून वाढवावे. बिरबलाची खिचडी सुर्यचुलीवर आभाळ अभ्राच्छादित असतांना शिजवली तर अप्रतीम बनते. लोक सहसा आवडीने खातात. पण कोणी खळखळ केलीच तर त्याची डाळ शिजू देऊ नका.
आता भाजी करू. एक मधम आकाराचा भ्रमाचा भोपळा घ्या. विळ्या भोपळ्याचे सख्य असल्याने, तो कापण्याच्या भानगडीत न पडता, सरळ तो भ्रमाचा भोपळा फोडा. नंतर तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा करा. बायकोचे रोजचे सासुच्या डोक्यावर मिरे वाटणे झाले असेल तर ती पेस्ट बाजूला काढून ठेवा. तळण्या करता टेढी उंगलीसे घी निकालकर कढाइत टाका. एक कडू कारले साखरेत घोळा, तुपात तळा, व काप करून ठेवा. मात्र तळतांना सांभाळून! चुकून चारो उंगलीयां घीमे और सर कढाइमे टाकू नका. उगाच कारल्याची चव जाऊन भेजा खायची पाळी येईल. दोन लवंगी मिरची कोल्हापूरची घ्या. त्या चिरतांना आपले नाक वर ठेवा. नाहीतर नाकाला मिरची झोंबेल.
दोन अकलेचे कांदे घ्या. मात्र ते कादे नाकाने सोलायचे बर का! हे काम बायकांनाच चांगले जमते म्हणे. तेव्हा चवळीची शेंग असीस्टंट असली तर उत्तम, नाहीतर तुम्हालाच करावे लागेल. कांद्याचे काप करून ठेवा. सध्या जालावर खसखशीचे पीक फार आले आहे. त्याचीच फोडणी करा. फोडणी साठी थोडे वड्याचे तेल वांग्यावर टाकून घ्या. चवदार लागते. ही भाजी रटारटा शिजल्यावर चवीनुसार नावडतीचे मीठ अळणी टाका. ही झाली भ्रमाच्या भोपळ्याची भाजी तय्यार.
आता बनवू आंधळी कोशींबीर. हा पदार्थ करण्याच्या आदल्या रात्री रात्रभर जागून टीव्ही सिरीयल पाहून झोपेचे खोबरे करा व एका वाटीत काढून ठेवा. दोन मोठी गाजरे घ्या. त्यांची गाजराची पुंगी करा. ती वाजवण्याच्या भानगडीत न पडता, नुसती हाताने मोडा. नंतर लॅरी कींग स्टाईलने त्यांचा पूर्ण कीस काढा. रात्रीचे झोपेचे खोबरे त्यात मिसळा. एक कच्चे लिंबू घेऊन त्याचा रस डोळे बंद करून ह्या मिश्रणात टाकला की झाली आंधळी कोशींबीर.
आता एक नॉन व्हेज पदार्थ करून पाहूया. घरचीच सोने की अंडे देनेवाली मुर्गी घ्या. तिची सारी अंडी पिल्ली बाहेर पडण्याच्या आतच तिला सोडून द्या. कारण घरची मुर्गी दाल बराबर. म्हणून "जादा आवाज किया तर डाल दुंगा" म्हणणार्या भाईकडे जाऊन डाल घेऊन या. पण जपून. नाहीतर तो तुमचेच नॉन व्हेज बनवेल.
तसे तर आणखीन बरेच पदार्थ आहेत. पुणेकर करतात ती स्पेशालीटी, म्हणजे पचका वडा. झालेच तर मारक्या आयांच्या आवडीचे पाठीचे धिरडे. ते राहूच दे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.
जाता जाता एक सल्ला देतो. तापल्या तव्यावर पोळ्या भाजून घ्या. भाजतांना, बॉस साठी राखून ठेवलेले लोणी लावायचे. म्हणजे तुमची पोळी पिकेल.
डिझर्ट करायचे असेल तर, शिंक्यातली फळे खाली पाडा. मग पडत्या फळांची आज्ञा घेऊन त्यांचे छोटे तुकडे कापून एका बाऊल मधे ठेवा. थोडि कोल्ह्याची द्राक्षे आंबट त्यात टाका. ह्या सगळ्या अजब पाककृती पाहून मंडळी अवाक झाली असतीलच. तेव्हा खूप बडबड करून Ice break करा आणि फळांवर पसरा. फळे जरी नाही झाली थंड तरी मंडळी नक्कीच थंड होतील.
असे हे जेवण तर मस्तच झाले. आता हे सर्व ताटात पडले काय अन वाटीत पडले काय, काहीच फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा. हे सारे खातांना pinch of salt बरोबर खायचे. हो, आणि दाखवायचे वेगळे दात न वापरता, खायचे वेगळे दात वापरा. नाही तर खाई त्याला खवखवे. जेवणा नंतर मुखशुद्धीसाठी भाई कडची सुपारी वापरू नका. उगाच दुधात मिठाचा खडा पडायचा.
खवय्यांनो, हा खाना खजाना खाऊन तुमचे पोट भरले नसेल दात कोरून पोट भरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ह्याची खात्री आहे. मिसळपाव वर चमचमीत भंडार उघडले आहे. तिथे जा. भरपेट आस्वाद घ्या!
पुर्वप्रकाशीत, पण नंतर संपादीत.
**********************
भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
प्रेषक ॐकार ( बुध, ०५/२८/२००८ - १४:३७) .शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'
उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - ३
प्रेषक देवदत्त ( सोम, ०४/०७/२००८ - ००:०६) .ह्या आधीचे लेख इथे वाचावेत.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २
खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है.
हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे.
दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम
जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हापासून हे वाक्य लक्षात राहिले आहे. (खरे तर तेव्हा एकदाच पाहिला आहे हा चित्रपट. बाकी २ वर्षापूर्वी चालू होता कुठल्याशा वाहिनीवर, पण नाही पहायला मिळाला.)
मै तुम्हे भुल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भुल जाओ यह मैं होने नही दूंगा
सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला म्हणतो, धडकन सिनेमात. ह्याच्या गाण्यांची कॅसेट ऐकताना त्यात गाण्यांच्या आधीची वाक्येही ठेवली होती. (हा प्रकार जुन्या सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट मध्ये पहायला मिळायचा. आता मध्ये पुन्हा वापरला गेला होता.) त्यानंतर सिनेमा पहाताना कळले की ह्यात सुनील शेट्टीची ऍक्टींग एकदम तीव्र आहे.
ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?
कुछ कुछ होता है सिनेमात राणी मुखर्जी शाहरूख खानला म्हणते. सिनेमात तो प्रसंग दाखविला नाही आहे पण सुरूवातीला शाहरूख खानला हे वाक्य आठवते असे दाखविले आहे. तसे म्हणायला गेले तर ह्या सिनेमातील एकूण एक वाक्ये त्यावेळी पाठ होती. (अगदी पार्श्वसंगितासोबत, त्याबद्दल नंतर कधीतरी). हे वाक्य वेगळ्या कारणाने लक्षात आहे अजून.वसतीगृहात असताना एका मुलाला, राहूल नाव त्याचे, सहज विचारले, फिल्मी स्टाईल मध्ये. "ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?". तो बहुधा आधीच कसल्या तरी रागात होता, रागात ’नाही’ म्हणून निघून गेला.
"नौकरी मिली?" "नही.. आपको?"
स्टाईल सिनेमात प्रिंसिपल दाखविलेला नट, स्वत:ची नोकरी गेल्यावर चंटू बंटू कडे मदत मागायला जातो. रात्री घरी आल्यावर जेवताना तो आपल्या मुलाला विचारतो की नोकरी मिळाली का? तेव्हा त्याचा मुलगा 'नाही' म्हणतो आणि त्याला विचारतो की 'तुम्हाला मिळाली का?' पूर्ण सिनेमा विनोदी असूनही हे ह्या एका वाक्याने इथे आणखी धमाल वाटते.
गाय ने दिवार पे चढके गोबर कैसे किया?
तकदीरवाला सिनेमात असरानीने चित्रगुप्त चे काम केलेले आहे. एका घरासमोर राहून तो काहीतरी न्याहाळत असतो तेव्हा त्या घरातील मुलगी पोलिसांना बोलाविते. तेव्हा असरानी पोलिसाला (बहुधा अनुपम खेरला) हे विचारतो.
T O to, D O do तो फिर G O गू क्यू नही होता.
चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्र चे ओम प्रकाशला हे विचारणे सर्वांनाच लक्षात असेल.
"काहे मारा उसको?" "आप से मिलना था." "यह कोई तरीका हुआ मिलने का?"
नाना पाटेकर च्या माणसाला मारले म्हणून तो अजय देवगणला जाब विचारतो. तेव्हा अजय देवगण सांगतो की नाना पाटेकरला भेटायचे होते. त्यावर नाना पाटेकरचा प्रश्न. ही काय पद्धत आहे का भेटण्याची? सिनेमा तसा थोडाफार गंभीर होता. त्यात हे वाक्य विनोदी मजा देउन गेले.
सिनेमा: अपहरण
हेच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचायला मिळतील.
गाण्यांच्या शोधात
प्रेषक ॐकार ( सोम, ०३/३१/२००८ - ०२:३०) .कधी कधी बर्याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं.
उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ ?
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ ?
ह्या दोन ओळींआधी जी सुरावट आहे ती मला अगदी वास्तवातल्या बेभान वार्याचा अनुभव देते. ती सुरावट आणि ह्या दोन ओळी ऐकताना मी स्वतःच ती स्त्री आहे असं वाटू लागतं. वार्यावर सैरभैर झालेला पदर आणि केस. हिंदकळणारी नाव. हातातं असहाय पडलेलं वल्हं. प्रत्येक क्षण नाव उलटवेल की काय असं भासवणारा.... अनं मनात एकच प्रश्न, कशी येऊ....
जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचे पूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?
हे प्रत्ययकारी वर्णन एकतर अनुभवावे किंवा त्या गाण्याशी एकरूप व्हावे. अनुभवणे सगळ्यांनाच शक्य नाही. म्हणूनच हे शब्द, सूर ताल एकत्र येतात आणि मग तंद्री लागते. ती तंद्रीदेखील त्या अनुभवाजवळ घेऊन जाते. भिडे काळोख प्राणांना मधला लांबवलेला 'प्राणांना' डोळे बंद करून ऐकताना आपले प्राण एकाद्या काळेख्या पोकळीत तर नाहीत ना असं वाटतं. दिशांचे भोवरे अनेकवेळा होतात. त्यांना शब्दांत इतक्या सहजतेने पकडता येईल असं वाटलं होतं? इतक्या प्रलयकारी वर्णनानंतर अखेरच्या ओळीतला समर्पित भाव आपोआप येतो. आपोआप शब्दांत येतो. आपोआप स्वरांत येतो. हा भाव लिहिणार्या, संगीत देणार्या आणि गाणार्यांना गवसला आणि तो तितक्याच उत्कटतेने त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे. आपल्या रसिकतेबाबत गाणं चोखंदळ असतं. अशी गाणी असतील तर आपण गाण्याबाबतील चोखंदळ असण्याची गरज उरत नाही.
कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नावही मागे
दिले, हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ ?
ह्या कडव्यातला स्वरांचा बदल ऐका. तोडिले धागे ऐकेपर्यंत स्वरांची चढती कमान लागते. अन बुडाले नावही मागे म्हणे पर्यंत तेच स्वर पुन्हा शब्दांना मिंधे होऊन पायाशी येतात. दैवाचे दान शब्द आणि स्वरांच्या अगतिकतेतून येते. दान आणि दैवाने हे शब्द ऐकताना तर गातानाही आवंढा गिळावा इतकं दु:ख झाल्याचं भासतं. ह्याक्षणी मी परत स्वतःला त्या स्त्रीच्या रूपात पाहतो. मला तिची ओळख नाही. अन मी तिच्यात एकरूप झाल्याने मी स्वतःलाही ओळखू शकत नाही. कूळ, इभ्रत, गाव, नाव काहीच आठवत नाही. मूळ कवीचा अनुभव वेगळा असावा. त्याला समाजातील, रूढींच्या बंधनावर टीका करायची असावी. असेलही. पण ती भावना महत्त्वाची. तो अनुभव देण्याची ताकद हे शब्द आणि स्वर पेलतात.
जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ?
ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्यासहित!
"रजनीकांत" आणि काही "मुक्ताफळे ".............
प्रेषक छोटा डॉन ( बुध, ०२/१३/२००८ - २३:३५) .* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो ....
* तुम्ही 'रिसायकल बिन ' मधल्या फाईल डिलिट करू शकत असाल पण तो खुद्द 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो ........
* तो तुम्हाला 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो ........
* तो पीयानो वाजवून त्यामधून 'व्हायोलीन' ची सुरावट काढू शकतो .........
* तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही , त्याऐवजी तो अंधार बंद करतो .......
* त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता , तेव्हापासून त्याचे हृदय बेपत्ता आहे .......
* जेव्हा तो आरश्यात पाहतो तेव्हा आरशाचे तुकडे तुकडे होतात कारण २ रजनीकांतांच्या मध्ये उभी राहण्याची आरश्याची हिंमत होत नाही ......
* जर 'ब्रेट ली' ताशी १५० किमी वेगाने चेंडू फेकत असला तरी रजनीकांत 'ब्रेट ली' ला त्यापेक्षा जास्त वेगाने फेकून देउ शकतो ........
* गणिती व्याख्येमध्या 'पाय' चा शेवटाचा अंक रजनीकांत आहे की ज्याला कधीच अंत नाही .....
* रजनिकांतला त्याचा शत्रू कुठे राहतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही पण तो कुठे मरणार आहे हे स्वता 'रजनीकांत' ठरवतो ..........
* कुठल्याही बंदूकीची गोळी त्याचे शरीर भेदण्यास समर्थ नाही पण तो आरामात गोळीचे २ तुकडे करू शकतो .....
* 'अंपगांसाठी असलेल्य पार्कींगच्या जागेचा' खरा अर्थ 'हा रजनीकांत चा एरिया आहे तेव्हा येथे पार्कींग केल्यास तुम्ही अपंग होण्याची शक्यता आहे' असा आहे........
* रजनीकांतच्या दिनदर्शीकेत १ एप्रील ही तारीख नाही , कारण त्याला कोणीच मुर्ख बनवू शकत नाही .........
* जर तुम्ही 'गूगल सर्च' मध्ये रजनीकांतचे 'स्पेलींग' चूकीचे लिहले तर 'तुम्हाला रजनीकांत म्हणायचे आहे का ?' ह्या संदेशा एवजी 'पळा , तुमच्याकडे अजून संधी आहे' असा सल्लावजक संदेश येतो ........
* एकदा 'किंग कोब्र्याने' रजनीकांत ला दंश केला , ५ दिवसांच्या मरणयातना भोगल्यानंतर 'किंग कोब्रा ' मरण पावला .......
* तुम्ही एका दगडात २ पक्षी मारत असाल तर तो एका पक्ष्याने २ दगड खतम करू शकतो .......
* आजचे सर्वोत्तम किटकनाशक ९९.९९% किटकांचा सफाया करण्याचा दावा करते, पण रजनीकांत ला जर कुणाला मारायचे असेल तर तो मरण्याची शक्यता केवळ १०० % च असते .......
* 'जागतीक तापमान वाढ ' ही संकल्पना खोटी आहे, एकदा रजनीकांतला थंडी वाजत असल्याने त्यानेच 'सुर्याचे' तापमान वाढवले होते ते आता तसेच राहिले आहे .....
* तो 'भिंगाच्या' साह्याने 'रात्री ' सुध्धा आग लाउ शकतो ........
* त्याला मानवी जीवनाबद्दल प्रचंड आदर आहे जोवर त्या त्याच्या मार्गाआड येत नाहीत .........
* त्याने एकदा जोराने आरोळी ठोकून 'अमेरिकन फायटर प्लेन' पाडले होते .........
* एका सर्वसाधरण बैठकीच्या खोलीत असणाऱ्या १२०० वस्तूंपैकी तो कुठल्याही एकाने तुम्हाला मारू शकतो , यात त्या खोलीचाही समावेश होतो .........
* असे म्हणतात की 'प्रत्येक यशामागे एक स्त्री असते" , तर "प्रत्येक मारल्या गेलेल्या माणसामागे एक आणि एकच रजनीकांत असतो" .........
* त्याला चालकाचा परवाना वयाच्या '१६ व्या सेकंदाला ' मिळाला , ज्यासाठी तुम्हाला आज १६ वर्षे वाट पहावी लागते ..........
* दुख्खाचे वर्गमूळ रजनीकांत आहे पण जर तुम्ही त्याचा वर्ग करायला गेलात तर त्याचा परिणाम फक्त आणि फक्त मृत्युच आहे .......
* जर तुम्ही त्याला " नो बडी इज परफेक्ट " हे वचन ऐकवले तर तो हा त्याचा वैयक्तीक अपमान मानून तुमच्यावर पुढील योग्य कारवाई करेल, त्याला तशी परवानगी आहे ........
* देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांत बर पृथ्वीवर राहणे परवडणार नाही.....
* जेव्हा तो व्यायामासाठी 'पुश-अप्स' काढतो तेव्हा तो स्वताला वर उचलत नसून जमीनीला खाली ढकलतो .....
* त्याच्या पळण्याचा वेग प्रचंड आहे, तो कुठल्याही वस्तू भोवती जोरात गोल पळून स्वताच्या 'पाठीला धप्पा ' देउ शकतो ....
* तो घड्याळ घालत नाही , कारण तो स्वता वेळ ठरवतो .....
* 'मोनालीसा' च्या चेहऱ्यावरचे जगप्रसिध्ध हास्य तीने जेव्हा 'रजनीला' पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटले ........
* त्याच्या घराला दारे/खिडक्या नाहीत , तो जाण्या-येण्यासाठी भिंतींचा वापर करतो ...........
* कॉफी करताना तो कॉफीची पूड दाताने बारीक करून ती स्वताच्या अंगातल्या गरमीने गरम केलेल्या पाण्यात टाकतो .........
* गूगल-सर्च मध्ये 'रजनीकांत मार खाताना ' ह्याशोधाचे "०" परिणाम येतात .....
* ईराकमध्ये कुठलेही अतिसंहारक शस्त्रे सापडली नाहीत कारण रजनीकांत चेन्नई मध्ये राहतो व ते भारतात आहे .........
* एकदा त्याने झोपेच्या गोळ्याची अख्खी बाटली खाल्ली होती , त्यामुळे त्याला थोडी पेंग आली ..........
* त्याच्या पेक्षा जोराने व लांबपर्यंत धावणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याचे 'सिनेमे '.........
* त्याच्या प्रत्येक पावलामुळे एक नवे वादळ निर्माण होते , अमेरिकत आलेली वादळे " कतरीना , रिटा " हा त्याच्या सकाळच्या "जॉगिंग" चा परिणाम मानला जातो .......
संग्राहीत ..... [ छोटा डॉन ]
शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( शनी, १२/२९/२००७ - २०:४३) .मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.
सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.
सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.

