गुमोसोस आणि अफ़सोस
आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.