टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
सद्भावना
लहानपण देगा देवा
प्रेषक सर्वसाक्षी ( बुध, ०५/१४/२००८ - ०१:४३) .जे नसत त्याचा हव्यास हा तर खास मानवी स्वभाव!
आज मी 'लहानपण' हा शब्द शब्दशः बालपण या अर्थाने वापरतो आहे. लहान असताना कधी एकदा मोठे होऊ, कधी कर्ते होऊ, आपण आपले निर्णय घेऊ असे वाटत असते. एकदा मोठे झालो की राहुन राहुन वाटते की लहान होतो तेच बरे होतो. पण तसे होणे शक्य नसते. मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!
आपले दप्तर शाळेतुन आल्यावर भिरकावायचो तसेच कधीतरी मोठेपणीही आपले कामाचे कागद 'बाबा, जरा हे उचलुन ठेवा, लागले की घेईन' असे म्हणत तिर्थरुपांकडे सोपवुन मोकळे होण्यात एक वेगळाच आनंद असतो. कधी लहर आली तर रात्री आईच्या हातात तेलाची बाटली कोंबुन मान खाली घालुन पुढे उभे राहुन आणि फर्माइशीनुसार डोक्याला आईच्या हाताने तेल लावुन घेण्यात जे सुख आहे ते केवळ अवर्णनियच! तसा कुठलाच पदार्थ खाण्यात अपूर्वाई राहिली नाही, पण अशाच एखाद्या रविवारी सकाळची फेरी मारून आल्यावर बाबा पिशवीतुन मस्त कुरकुरीत पालकाची भजी काढुन पुडा हाती देत म्हणतात 'तुला आवडतात ना?' बस्स्! त्या भज्यांची लज्जत काही आगळीच. कचेरीत कधी कुणी चुक काढली वा विरोध केला तर अहंकाराने फणकारणारे आपण घरी आई एखाददा ओरडते आणि म्हणते 'अरे वाजले किती? रात्र झाल्ये, पहाट नाही; तु जागत राहतोस उगाच संगणकापुढे अपरात्री मग मुलाला काय बोलणार तुझ्या? मोठा झालास तरी अजुन समजत नाही?' तेव्हा मात्र विलक्षण सुखावतो. कुणीतरी ओरडाणार तरी हक्काच असायला हव ना?
आपल्या कामाच्या बाबतीत कुणी आठवण करुन दिलेली आपल्याला आवडत नाही, 'मला माझे काम सांगायची गरज नाही मला ते समजते' हे उत्तर मनात असते. मात्र 'अरे पतपत्राची देयके येउन पडली आहेत, वेळीच चुकती कर नाही तर उगाच दंड भरावा लागेल' या बाबांच्या नित्याच्या बोलण्याचा राग येणे दूरच राहो, पण इतकी सवय होते की आपण खुशाल काही विसारले तरी चालते, करतील बाबा आठवण या बेफिकीरीत राहतो. 'सकाळी बाहेर पडताना कण्हेरी घेत जा, उन्हाळा सुरू झालाय' हे शब्द ऐकल्याशिवाय उन्हाळा सुरू झाला आहे हे समजतच नाही.
आता कुणी याला 'बाळुगिरी' म्हणेल. म्हणे ना! मला तर अशी बाळुगिरी भयंकर आवडते. आणि अशी बाळुगीरी करायला मिळणे हे मी तर महद्भाग्य समजतो! टोणगा कामानिमित्त बाहेर जायला निघाला तर पंचाहत्तरीची आई बेसनाचे लाडु करून देते आणि ऐंशी वर्षाचे बाबा 'अरे नुसते घरी फालतु कार्यक्रम बघत बसायचे ते तुला सोडायला विमानतळावर येतो' असे म्हणत उत्साहाने निघतात याहुन वेगळे भाग्याचे लक्षण ते कोणते? आपण अजूनही लहान आहोत कारण मुले कितीही मोठी झाली तरी आई वडीलांना ती लहानच असतात या भावनेने मी मनोमन सुखावतो.
मंडळी, आज हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आज माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे! ज्यांनी आपल्याला सर्वस्व दिले त्यांना आपण काय देणार? मात्र मोठ्यांचा वाढदिवस म्हणजे लहानांची चंगळ; ते आपल्याला काय देणार याची उत्सुकता अर्थातच मनात आहे. आणि म्हणुनच आज देवापुढे हात जोडुन मागणे मागतो आहे, 'लहानपण देगा देवा'


मदर्स डे अर्थात मात्रुदिन
प्रेषक ईश्वरी ( रवी, ०५/११/२००८ - १३:२७) .आज ११ मे २००८ ..मदर्स डे अर्थात मात्रुदिन. अमेरिकामध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जातो.
आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाहि मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. पाश्चांत्यांचे अन्धानुअकरण नको पण मदर्स डे मागचा उद्देश अतिशय चान्गला असल्याने आपणही तो साजरा करायला काही हरकत नाही.
सकाळी आईच्या आधी उठून आपण तिच्यासाठी तिच्या आवडीची न्याहरी बनवू शकतो. तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ तिला भेट देऊ शकतो. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून थोडासा वेळ काढुन तिच्याशी मस्त गप्पा मारु शकतो. तिला आवड असेल तर नाटकाला वा सिनेमाला नेऊ श़कतो. तिच्यापासून लाम्ब असलो तर तिला छानसे पत्र लिहू शकतो.
काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी.
ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या ,धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. हे सर्व टाळून तिला स्पेशल फील व्हाव यासाठी आजच्या मात्रुदिनाचा उद्देश.
माझी आई माझ्यापासून हजारो मैल लाम्ब असल्याने मी तिला फोनवरूनच शुभेच्छा देणार आहे. तुम्ही काय करणार आहात किन्वा काय केले हे वाचायला जरूर आवडेल.
मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मात्रुदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !!!
-- ईश्वरी
अथर्व थिएटर्स चा विक्रम स्थापित होणार....
प्रेषक कलंत्री ( शुक्र, ०५/०९/२००८ - १२:५०) .अथर्व थिएटर्स ही संस्था पुणेकरांना बर्यापैकी परिचीत आहेच. या संस्थेतर्फे ११ मेला रामकृष्ण सभागृह, पिंप्री येथे एकाच दिवसात ४ नाटके सादर करण्याचा विक्रम घडणार आहे.
रुपरेखा खालील प्रमाणे,
०९.०० सकाळी शांतेचं कार्ट.
१२.३० ला मोरुची मावशी
०४.०० वाजता औपचारिक समारंभ
०५.०० वा तो मी नव्हेच
०९.३० वा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क
एकाच दिवशी एकाच संस्थेकडून आणि एकाच नाट्य कलाकारातर्फे ४ प्रयोग असा विक्रम घडणार आहे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्या सत्रात,
तर चला भेटु या ११ तारखेला रामकृष्ण सभागृहात.
गटवार तात्काळ चर्चा अर्थातच चॅटींग.
प्रेषक कलंत्री ( सोम, ०५/०५/२००८ - १८:२५) .मिसळपाव या संकेतस्थळाने अनेक विषयात आघाडी घेतली आहे. तात्काळ आणि तात्काळीक चर्चा म्हणजेच चॅटींग असे एक शिरपेच मिसळपाव वर असावा असे मला वाटते.
खरडवही मध्ये एकास एक अशी चर्चा होते आणि ती इतरांना पाहता / वाचता येते.
व्यक्तिगत निरोप ( पोस्टहापिस) हे दोघातील संवादाचे चांगले रुप आहे.
काथ्याकूट, जनातलं, मनातलं हे संकेतस्थळावरचं दिर्घवेळ आणि स्थायी असणारे रुप आहे.
प्रस्तावित चॅटींग मध्ये एखाद्या वर्तमानपत्राचा दुवा, राजकिय बातम्या, काही शिफारसी इत्यादी चर्चीले जाऊ शकतात आणि दुसर्यादिवशी लगेच पुसलेही जाऊ शकतात.
बाकी माझ्या मांडणीत काही त्रुटी आहेत त्या विश्वकर्म्याशी अथवा सरंपचसाहेबाशी बोलतोच बोलतो.
या शब्दाला मिसळपाववाले काही झणझणीत शब्द सुचवतील अशी अपेक्षा आहे.
(किंमत)
प्रेषक चेतन ( सोम, ०५/०५/२००८ - १४:०६) .कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं)
कारणे होतीचं तशी लिहायला
प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागला तो काहीतरीच कारणे द्यायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे)
काळजी त्यांची नका करू एव्हढिही
की काळजी लागेल ही खटकायला
बंद कधीही नाही केले मी उमलायचे
आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला
कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे
लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला
भाव नाही तुला थोडासाही दिला
काजवे लागले दिवसाचं चमकायला
माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी
जेव्हा भूक ही लागेल बोलायला
दुरावा!
प्रेषक पिवळा डांबिस ( शनी, ०४/१९/२००८ - ०८:०५) .
विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. इतक्यात आजोबांचा चेहरा फुलला,
"ती बघ, सुमा आलीय", ते आजींना म्हणाले.
आजींनी मान वर करून नजर स्थिर करेपर्यंत गर्दीतून वाट काढत सुमा त्यांच्यापर्यंत पोचलीच. हसतमुखाने तिने दोघांनाही मिठी मारली.
"दमलात ना! इथे बसा पाच मिनीटं, पाणी प्या."
पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर सुमाने सामानाची ढकलगाडी आपल्या ताब्यात घेतली.
"चला जाऊया! थोडं चालावं लागेल, गाडी समोरच्या पार्किंग लॉटमध्ये लावलीय", सुमा.
"अगं पण हे काय? जावई कुठायत?"
"तोच येणार होता तुम्हाला घ्यायला. पण त्याला ऐनवेळी महत्त्वाची मिटिंग लागली म्हणून मी आले."
पार्किंग लॉटमध्ये गाडीजवळ आल्यावर सुमाने बॅगा ट्रंकमध्ये टाकल्या, आजी-आजोबांना मागच्या सीटवर बसवलं आणि सराईतपणे ती ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली.
सायंकाळची वेळ होती. एअरपोर्ट मागे टाकून गाडी हायवेला लागली तशी सुमाच्या गप्पा सुरु झाल्या. आजीआजोबांच्या तब्येतीची चवकशी, इंडियातील इतर नातेवाईकांची चवकशी, मुंबईचं हवापाणी वगैरे वगैरे! आजीच प्रामुख्याने गप्पांत भाग घेत होत्या, आजोबा गप्प होते. विचारलेल्या प्रश्नांना एक-दोन शब्दांतच उत्तरं देत होते. त्यांची नजर गाडीतून बाहेर भिरभिरत होती. हायवे वरच्या बंदुकीच्या गोळ्यांसारख्या प्रचंड वेगाने जाण्यार्या वाहनांनी धास्तावत होती.
"काय हरामखोर जावई आहे आमचा! स्वतः यायचं सोडून हिला एकटीला या भयंकर रहदारीतून पाठवली. मला लग्नाआधीच याचं लक्षण कळलं होतं. मी सुमाला तसं म्हणालोही होतो पण कार्टी ऐकेल तर शपथ! ही प्रेमात पडली होती ना त्याच्या! आता भोगतेय आपल्या कर्माची फळं!" आजोबांच्या डोक्यात विचार गर्दी करत होते. त्यांनी एक-दोन वेळा सुमाला गाडीचा वेग कमी कर म्हणून सांगितलंही होतं. तिने अर्थातच त्याकडे काही न बोलता दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्यांचा संताप अजून वाढला होता. शेवटी ते चिडून काहितरी बोलणार इतक्यात सुमाने एक्झिट घेतला, गाडीचा वेग मंदावला.
"आता जवळ आलं आपलं घर", सुमा म्हणाली. आजोबांनी राग गिळला.
डौलदार वळण घेऊन गाडी एका बंगल्याच्या ड्राईव्हवे वर उभी राहिली. आजी-आजोबांनी पाहिलं, जावई दरवाजात उभे होते. आता जरा वयस्कर वाटत होते, केस जरा विरळ, कानशिलाशी किंचित पिकलेले, पोट जरासं सुटलेलं. त्यांच्या पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. कुतुहलाने या दोघा म्हातार्यांकडे पहात होता.
"या, या! प्रवासाचा खूप त्रास नाही ना झाला?" जावयांनी स्वागत केलं. गाडीतल्या बॅगा घरात आणून टाकल्या. सगळे आत घरात आले.
तो लोकरीचा गुंडा अजुनही या म्हातार्यांकडेच बघत होता.
"समीर, आजीआजोबांना नमस्कार कर!" सुमा म्हणाली. समीर तसाच उभा राहिला.
"अरे, दे आर युअर ग्रँडमा ऍन्ड ग्रँडपा!" जावई म्हणाले. त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
"असू दे!", आजीने त्याला जवळ घेतलं, "अरे किती मोठा झालास रे समीर! गेल्यावेळेला तुला मुंबईत पाहिला तेंव्हा दहा महिन्याचा होतास."
समीरला काही कळलं नाही पण आपलं कौतुक चाललंय हे समजलं. तो आजीच्या मांडीवर बसला.
"मी तुझी आजी आणि हे तुझे आजोबा! हे बघ आजोबांनी तुझ्यासाठी काय आणलंय!" आजीने एका बॅगेतून एक वस्तू काढली. आजोबांना आठवलं, जवळ जवळ वर्षभरापूर्वी पूर्वी ते आणि आजी एकदा अष्ट्विनायकाच्या यात्रेला गेले होते तेंव्हा त्यांनी एक लहानशी संगमरवरी गणपतीची मूर्ती विकत घेतली होती, समीरसाठी! छोट्या मुलासाठी अशी भेटवस्तू घेतल्याबद्दल आजींनी त्यांची थट्टाही केली होती. पण त्यांनी त्याकडे तेंव्हा दुर्लक्ष केलं होतं.
मूर्ती पाहिल्यावर समीरचा चेहरा फुलला. आजोबा आपल्या साडेचार वर्षांच्या नातवाकडे पहात होते.
"से थँक्यु, समीर!" जावई आपला ठेवणीतला आवाज काढत म्हणाले. आवाजातला फरक समीरने ओळखला.
थँक......यू..." एक एक अक्षर ओढत तो म्हणाला.
"नाऊ टेल देम युअर नेम"
"मनेम इज शमीऽऽऽऽऽ"
"डू यू नो हू वुई आर?" आजोबांनी प्रथमच त्याच्याच भाषेत संवाद करायचा प्रयत्न केला.
"युर ग्रँमा ऍन ग्रँफा" समीर म्हणाला आणि मूर्ती हातात घेऊन आत कुठेतरी पळून गेला.
थोडं पिठलंभात खाऊन झाल्यानंतर सुमाने आजीआजोबांना घर दाखवायला सुरवात केली. जावई जेवून त्यांच्या अभ्यासिकेत गेले होते. समीरही कुठे दिसत नव्हता. पुढलं अंगण, मागलं परसू आणि तळमजला बघूनच आजींचे पाय भरून आले.
"वरचा मजला उद्या बघू", सुमा समजूतदारपणे म्हणाली, "तुम्ही आता विश्रांती घ्या, दमला असाल इतक्या लांबच्या प्रवासाने. आईला संधिवात आहे, वर चढउतर सारखी करायला नको म्हणून तुमची व्यवस्था इथे तळमजल्यावरच्याच गेस्टरूममध्ये केली आहे, चालेल ना? शेजारीच बाथरूमही आहे आणि किचनही इथेच आहे. आमची बेडरूम वरती आहे. काही रात्री लागलं तर हे बटण दाबून हाक मारा, आम्हाला वर ऐकू येईल." सुमाने इंटरकॉमचं बटण दाखवलं.
"घरातल्या घरात फोन, काय एकेक थेरं आहेत", आजोबांचं विचारचक्र परत चालू झालं.
"अगं पण समीर कुठेय?" आजीने विचारलं
"तो झोपला त्याच्या खोलीत"
"इतक्या लहान मुलाला एकटा झोपवतां?" आजोबांचा प्रश्न
"इथे अशीच पद्धत आहे. हा तर साडेचार वर्षांचा आहे, इतर मुलांना तर एक वर्षापासून स्वतंत्र झोपवतात", सुमा
"अतिशहाणे आहांत", आजोबांचा राग, मनात.
गादीवर पडल्यावर आजोबांना झोप येईना. आजी पाच मिनिटातच झोपी गेल्या होत्या. आजोबा बिछान्यावर तळमळत विचार करत पडले होते. दिवसभरातले प्रसंग आठवत होते. कुठंतरी काहीतरी खटकत होतं. 'जावयांनी एअरपोर्टवर न येणं, सुमाचं भन्नाट ड्रायव्हिंग, इनमिन तीन माणसांसाठी असलेला तो बंगला. बंगला कसला प्रासाद! आजवर कुणाचं घर बघतांना कधी दमायला झालं नव्हतं!! ज्या नातवाला बघायला आलो त्याचं तुटक बोलणं. समीरने आपल्या पाया पडावं अशी त्यांची जुनाट अपेक्षा नव्हती पण आजोबांच्या जवळ येऊन पापा द्यायला काय हरकत होती? आता त्याला वेगळ्या खोलीत झोपवतात म्हणे. काय त्याची भाषा आणि काय त्याचे उच्चार! त्याच्यात भारतीय काहीच नाही, पूर्ण अमेरिकन झाला आहे. हेच बघायला आलो का आपण! छे, झक मारली आणि आपण बायकोचं ऐकलं. इथे आलो हेच चुकलं!!'
विचारांच्या चक्रात कधीतरी त्यांना झोप लागली. जाग आली तेंव्हा पहाट झाली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर नुकतच उजाडत होतं. भिंतीवरच्या घड्याळात सहा वाजत होते. त्यांनी आजींकडे नजर टाकली. त्या गाढ झोपेत होत्या.
"झोपू दे, दमली असेल" असा विचार करून ते हळूच बाथरूमकडे गेले. दिवा लावल्यावर तिथला झगझगाट पाहून एकदम अवघडले.
"गरज काय इतका उजेड करायची? वीज किती खर्च होते? आम्हाला काय आमचे अवयव कुठे आहेत ते माहित नाही?" रात्रीचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले. कसेबसे प्रातर्विधी आटोपून ते दिवाणखान्यात आले. घरात सगळीकडे सामसूम होती. भलीमोठी खिडकी समोर असलेल्या एका सोफ्यावर जाऊन बसले. बाहेर सकाळ होत होती. रात्री थोडा पाऊस पडून गेला असावा. बाहेर एक काळशार रस्ता दूरवर जात होता. रस्त्याच्या दोन्ही कडांना झाडं होती, त्यामागे ओळीत मांडल्यासारखी घरं! पण एक गोष्ट विचित्र होती. उजाडलं तरी त्या रस्त्यावर एकही चिटपाखरूही नव्हतं. काही तासांपूर्वीच मुंबईच्या कोलाहलातून आलेल्या आजोबांना ती शांतता सहन होईना. बातम्या तरी बघाव्यात म्हणून ते टीव्हीकडे वळले पण तो अजस्त्र साठ इंची टिव्ही पाहिल्यावर त्याचे तंत्र आपल्याला जमणारे नाही याची खात्री पटून ते अजूनच वैतागले. शेवटी परत जाऊन ते सोफ्यावर बसले आणि डोळे मिटून आपले प्रातःस्तोत्र पुट्पुटू लागले.
असा किती वेळ गेला कोण जाणे. अचानक धड धड धड असा आवाज ऐकू आल्याने आजोबा भानावर आले. डोळे उघडून त्यांनी पाठीमागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. समीर त्याच्या खोलीतून धावत कुठेतरी निघून गेला. आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्तोत्राकडे मन केन्द्रित केलं. पुन्हा काही वेळाने धडधड आवाज आला. समीर कुठुनतरी परत आला होता. त्याच्या ओंजळीत काहीतरी होतं.
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. भारतात असते तर त्यांनी ते केलंही असतं. पण इथे अमेरिकेत त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
यावेळी समीर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत न जाता देवघरात घुसला होता. हा तिथे काय गोंधळ घालतोय हे न कळून आजोबा थोड्याशा अनिच्छेनेच त्याच्या मागोमाग गेले. आणि त्यांनी पाहिले....
देवघरातल्या चौरंगावर त्यांनी कालच दिलेली गजाननाची संगमरवरी मूर्ती ठेवेलेली होती. त्यावर समीरने नुकतीच बॅकयार्डमधून तोडून आणलेली फुले वाहीलेली होती. समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले...
तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं...
"प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला,
अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला,
चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
आजोबा विस्फारलेल्या डोळ्यांनी तल्लीन झालेल्या त्या एव्हढीशी चड्डी घातलेल्या, गबदुल, पिटुकल्या ध्यानाकडे पहात राहिले.....
आणि पुढच्याच क्षणी त्यांनी गहिवरून धावत जाऊन नातवाला पोटाशी घेतले......
तो सुद्धा त्यांच्या कुशीत तोंड खुपसून त्यांना बिलगला......
कसला एव्हढा मोठा आवाज झाला म्हणून सुमा व जावई देवघराच्या दारात जमा झाले होते. पण आजोबांना त्याची पर्वा नव्हती....
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या..........
स्पष्टीकरण : ही कथा यापूर्वी प्रस्तुत लेखकाच्या वैयक्तिक संकेतस्थळावर (ब्लॉग) प्रसिद्ध केली आहे. अर्थात मिपा सोडून आम्ही इतरत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळावर लिहीत नाही. त्यामुळे ती प्रथम सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचा मान मिपाचाच!!
काही चुका असतील त गोड मानून घ्या!!
आपला,
पिवळा डांबिस
आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, ०४/१६/२००८ - १४:४८) .हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत!
राम राम मंडळी,
नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली! 
तर ते असो...!
मंडळी, आता वास्तविक पाहता 'वैराग्य', 'आध्यात्म', 'आत्म्याचे अमरत्व', 'आत्मज्ञान', 'आत्मानंद' यासारखे शब्ददेखील आम्हाला फारसे कळत नाहीत, शिवाय या शब्दांनी चढणारी आध्यात्मिक नशा ही इतर कुठल्याही नशेपेक्षा भयंकर आहे, तेव्हा त्या वाटेला कधीही जाऊ नकोस अशी शिकवण आम्हाला आमचे गुरू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांजकडून मिळाली आहे!
तर ते असो...
झालं असं, की मध्यंतरी आमचे दोन शिष्य धमाल मुलगा आणि मदनबाण हे आत्मानंदाच्या शोधात भटकत भटकत आम्हाला भेटण्याकरता ठाण्याला आले होते. वास्तविक धमाल मुलगा आणि मदनबाण हे थोर पुरुष ऑलरेडी आत्मानंदीच आहेत, तेव्हा त्यांना कुठल्या गुरूबिरुची तशी गरज नाही, तसेच गुरू या नात्याने काही विद्या त्यांना दान करावी असेही आमच्यापाशी काही नाही, तरीही ते आम्हाला गुरू मानतात हा त्यांचा मोठेपणा! 
तर त्या छानश्या संध्याकाळी आम्हा गुरुशिष्यांची ठाण्याच्या एका मालवणी हाटेलात भेट झाली. धमाल मुलगा आणि मदनबाण या आमच्या प्रिय शिष्यांना आम्ही काही मोलाचे मार्गदर्शन केले. आमचा प्रियशिष्य धमाल मुलगा आम्हाला म्हणाला,
"गुरुवर्य संत तात्याबा, बर्याच दिवसांपासून आपल्या तोंडून सिंगल माल्ट आणि सिंगल माल्ट परिवाराची ख्याती ऐकतो आहे, तेव्हा आज मला सिंगलमाल्टबद्दल काही अनुग्रह करून मार्गदर्शन करा आणि सिंगलमल्टची दीक्षा द्या!" 
आम्ही अर्थातच तथास्तु म्हटलं आणि धमालमुलाला सिंगलमाल्ट बद्दल योग्य ते मार्गदर्शन केलं! सिंगलमाल्टच्या तीर्थाचा पहिला घोट घशात जाताच मुळातच आत्मानंदी असलेला धमालमुलगा थोडं अधिक आत्मसंतुष्ट होत आम्हाला म्हणाला,
"वा गुरुवर्य! यापुढे जेव्हा कधी आम्ही सुराप्राश्नन करू तेव्हा सिंगलमाल्टच पिऊ! सिंगलमाल्टमुळे आमचा सैरभैर आत्मा आता स्थिर झाला आहे आणि आम्ही आत्मानंदी झालो आहोत!"
हे ऐकून गुरू म्हणून आम्हालाही खूप समाधान वाटले आणि आम्हालाही नव्यानेच आत्म्याचा शोध लागल्याचे जाणवले! 
आमचे दुसरे प्रितशिष्य मदनबाण गेले काही दिवस विजूभाऊंकरता निरनिराळ्या कैर्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. त्यांनाही आम्ही दोन घोट सिंगलमाल्ट पाजून त्यांचाही आत्मा तृप्त केला. सिंगलमाल्टमुळे झालेल्या आत्मानंदाच्या भरातच मदनबाण आम्हाला म्हणाला,
"बाकी तुम्ही काही म्हणा गुरुवर्य संत तात्याबा, आंब्यांच्या जोडीचे, कैर्यांच्या जोडीचे फोटो घ्यायची आणि पाहायची मजाच वेगळी, त्यांचा आस्वादच वेगळा!"
असं म्हणून मदनबाणने आम्हाला डोळा मारला तेव्हा सिंगलमाल्टमुळे मदनबाणला आता पुरेसा आत्मानंद झालेला आहे हे आम्ही समजलो!
तर अशी ही आम्हा गुरुशिष्यांची आत्मानंदी भेट आम्हाला खूप सुखावून गेली, आत्मानंद देऊन गेली!
आता आम्हा काही गुरुशिष्यपरंपरेतल्या मंडळींचे फोटू पाहा! मंडळी, यातल्या प्रत्येकाच्या चेहेर्यावर आपल्याला आत्मानंद दिसेल! अहो आत्म्याचा शोध लागलेलीच ही सगळी मंडळी आहेत! 
१) सर्वप्रथम जगत् गुरू भाईकाकाजी देशपांडे!

२) काकाजी देशपांडेंचे शिष्य आणि मराठी आंतरजालावर संतपदाला पोहोचलेले एक आत्मानंदी, संत तात्याबा महाराज! 'हा संतरुपातला गोसावडा संतबिंत कुणी नसून एक नंबरचा बाईलवेडा आहे!' असं त्यांचे काही हितचिंतक म्हणत असतात. म्हणोत बापडे! अजून त्यांना आत्म्याचा शोध लागला नाही असं आपण म्हणू! 

आता परवाच्या ठाण्याच्या हाटेलातले काही फोटू. संत तात्याबा धमाल मुलाला आणि मदनबाणला आत्मज्ञान आणि आत्म्याचा शोध कसा लावायचा, हे शिकवत आहेत! 
१) आत्मज्ञानी संत तात्याबा महाराज. दुसरा पेग संपत आल्यामुळे चेहेर्यावर आत्मज्ञान जाणवू लागलं आहे! 

२) संत तात्याबा, धमाल मुलगा, मदनबाण - गुरुशिष्य आत्मरंगी रंगले आहेत! 

३) 'यापुढे प्राशन करीन तर सिंगलमल्टच प्राशन करीन!' अशी आत्मानंदी ग्वाही देत धमाल मुलगा गुरूच्या शेजारी बसला आहे! 

असो...
धन्यवाद,
श्रीसंत तात्याबा महाराज प्रतिष्ठान,
मराठी आंतरजाल.
महात्म्याला आदरांजली.
प्रेषक नीलकांत ( शुक्र, ०४/११/२००८ - २३:००) .
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन.
महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली.
त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले. त्या सर्व समाजसुधारणेचा पाया भक्कम करणे आणि आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत आपली भूमिका कणखरपणे मांडणे हे काम त्यांनी अखंड केलं.
११ एप्रिल १८२८ ला ज्योतीबांचा जन्म झाला व १८९१ ला त्यांचे निधन झाले.
त्यांच्या बद्दल अधिक माहिती ठळक मुद्द्यांच्या आधारे खाली देत आहे. हे लेखन या आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेले आहे.
१८२८ - जन्म कटगूण सातारा
१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हाय स्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ - थॉमस पेन यांच्या ‘राइट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला
१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
७ सप्टेंबर १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरवात.
१८५२ - पुना लायब्ररीची स्थापना.
१५ मार्च १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१६ नोहेंबर १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकार तर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
१८५३ - ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स’
१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली
१८५५ - रात्र शाळेची सुरवात केली
१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० - विधवा विवाहास साहाय्य केले.
१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ - विधवा केशवपणा विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ - गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.
१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणा विरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८२ - ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली
१८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते जनते तर्फे सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.
ज्योतीरावांची ग्रंथसंपदा
नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३) ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकऱ्यांचा आसूड १८८३
६)सत्सार१ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशीत )
९)अखंड काव्य रचना
‘गुलामगिरी‘ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला.
‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
मूळ गाव - कटगुण (सातारा)
गोऱ्हे हे मूळ आडनाव.
ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
सावित्रीबाईंना प्रशिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८८० - नारायण मेधाजी लोखंडे यांना ‘मिल हॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
ज्यांना ज्योतीबांबद्दल अधिक वाचायचे आहे त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मधील मराठी पर्व मध्ये ११ एप्रिलचे पान वाचावे. त्यापैकी खाली दोन दुवे देत आहे हे दोन लेख तर नक्की वाचाच.
1)महात्मा फुलेः एक निरीक्षण - दुर्गा भागवत
2)जोतीरावांची सत्यशोधक चळवळ - य. दि. फडके
नीलकांत
कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख
प्रेषक मानस ( बुध, ०४/०९/२००८ - ०२:१२) .स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८
कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...
कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळी वेगळी होती.
हा लेख पूर्ण स्वरूपात इथे वाचा.
चैत्रामधले मैत्र!
प्रेषक अशोक गोडबोले ( रवी, ०४/०६/२००८ - १९:३९) .सर्व मिसळपाव सभासदांना चैत्रपाडव्याच्या शुभेच्छा! आज चैत्रपाडव्याच्या निमित्ताने काही ओळी सुचल्या.
चैत्रपाडवा नववर्षाचे आला उधळित रंग
मोहरलेले तरुवर झुलती गाती गीत विहंग
सांजसकाळी मत्त कोकिळा करिती मधुकूजन
प्रितीचे बांधून पदिपैंजण मोर करी नर्तन
कविताशाखेवरी बैसला वाल्मिकी कोकिळ
रामनामजप करिता रचिले रामायण सकळ
वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली
वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली
नवीन पर्वासाठी फुंकू आता नवी तुतारी
नवीन आव्हाने पेलाया वंदू नवगिरिधारी
नवी झडू दे मानवतेच्या विजयाची नौबत
नव्या भारता लिहावयाला नवा पार्वतीसुत
गुढी उभारू आनंदाची, अभिमानाची आज
सख्यत्वाची चंपकमाला सत्यशिवाचा साज
सुराज्य संकल्पना दाखवी रामराज्य भूवरी
उठा, चला संकल्प करुया शुभमंगल वासरी
नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित
नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत
विश्वमंगलाच्या सूर्याला करू नमस्कार
चैत्रामधले मैत्र मनांचे स्वर्गसुखालंकार
जनगणमानसमंदिरावरी झळके विजयपताका
सघोष संचलनात गाजतो विमलयशाचा डंका
किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे
ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे
-- अशोक गोडबोले, पनवेल.
