गझल
ती स्वप्नसुंदरी
ती स्वप्नसुंदरी
सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी
जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
गंगाधर मुटे
………………………………….……
जुनी
ओठातील छळी मला, अधूरी कहाणी जुनी
गालातील खळी काढी, खोडी दिवाणी जुनी
नीरव डोही काळाच्या, शब्द कुठूनी आले?
आठवांच्या लाटा म्हणती मुकी गाणी जुनी
सर्वस्व देऊनीही, ऋणमुक्त ना जाहलो
विकूनीयाही आत्म्याला, उरली नाणी जुनी
बेगड्या दुनियेमध्ये बेगडी किमयाच दिसे
शहनाई भासे जरी, आहे पिंगाणी जुनी
भग्न वा्स्तूखंडरात धुंडाळशी काय आज?
भरभरुनी लुटल्यावरी, उरली विराणी जुनी
मनोहर शेर लिखीत, रातराणी गायी गझल
का टोचूनी पुन्हा देशी, जखम ही राणी जुनी
आज अचानक तुझी आठवण का यावी
आज अचानक तुझी आठवण का यावी
आज पापणी ओली माझी का व्हावी
फार काळ या गोष्टीला झाला नाही
युगे लोटली असतील पण का वाटावी
जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने
अकस्मात वार्याने येउन उघडावी
बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुला कहाणी कुठून आता सांगावी
शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?
तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी
हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी
पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा
पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी
पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी
मनात आहे काय काय दडले माझ्या
आज उडी डोहात मनाच्या मारावी
किती सुखाचे असेल
नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे
गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?
तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!
असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे
घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!
स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!
एक फार्सी गज़ल.....मिर्झा महम्मद हसन ( कातिल )
मित्रहो,
आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर ही गज़ल पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या.
सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक ! मन हलके करा जरा आणि आपल्या प्रेयसीला/हिला वाचून दाखवा ही गज़ल !:-)
मा रा ब-घम्ज़ा् कुश्त्-ओ-कज़ा रा बहान साख़्त्
खुद सू-ए-मा ना दीद्-ओ-हया रा बहान साख्त्
तिने आमच्यावर स्वत:च्या अदाने नजरेचे खंजीर चालवले आणि मी मरायला टेकल्यावर गरीब बिचार्या म्रृत्यूवर आळ घेतला.
माझ्याकडे बघितलेही नाही पण आव तर असा आणला की “मी लाजून बघितले नाही तुझ्याकडे”
रफ्तम् ब मस्जिदे के ब-बीनम् ज़माल-ए-दोस्त्
द्स्ते ब-रूख् कशीद-ओ-दुआ रा बहान साख़्त्
आता हिचा चेहेरा ज्याने आम्हाला वेड लावले आहे त्याचे दर्शन घ्यायचे कसे? मग आम्ही एक क्लुप्ती लढवली.
आमच्या या प्रेयसीच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला मशिदी सारखी जागा कुठे असणार ? ती प्रार्थना करेल आणि आम्ही तिच्या मुखाचं दर्शन घेत राहू. पण एवढे कुठले आमचे नशिब ? हाय ! तिने तर आपले मुखकमल आपल्या हाताच्या ओंजळीत झाकून घेतले आणि दुआ मागण्याचा बहाणा केला.
द्स्ते ब दोश्-ए-गैर निहाद अ़ज् सर्-ए-करम्
मा रा चूं दिद् ओ लघ्ज़िश्-ए-पा रा बहान साख़्त्
आता मात्र कमाल झाली. बघा कसा तिने माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या खांद्यावर हात ठेवलाय. माझ्याकडे नजरही न टाकणारी ती, त्याच्यावर एवढी कृपादृष्टी कशी काय बुवा ?
तेवढ्यात आमची नजरानजर झाली आणि बघा आता - तिचा तोल गेल्यामुळे कोणाचातरी आधार घेतल्याचा बहाणा.
जाहद् न दाश्त् ताब्-ए-जमाल्-ए-परी रूखान्
कुन्जे गिरफ्त्-ओ-याद-ए-ख़ुदा रा बहान साख़्त्
या आमच्या धर्मगुरूंबद्दल माझा आदर हे पाहून अधिकच वाढला की या एवढ्या सुंदरी इथे हजर असताना हे आपल्या मनावर कसा काय ताबा ठेऊ शकतात ? अरेरे! अरे देवा काय बघतोय मी हे ? त्यांनी आपली जागा सोडून मशिदीचा कोपरा गाठला आणि प्रार्थनेचा बहाणा केला.
पण डोळे किलकिले करून ते तिच्याकडेच पहात होते.
ख़ून-ए-कातील-ए-बे सर्-ओ-पा रा बहा-ए-खीश
मलेदान-ए-निगार-हिना रा बहाना साख़्त्
खरंतर मला रक्तबंबाळ करून तिने ते तिच्या पुस्तकातल्या पानांना फासलंय,
पण बहाणा मात्र सगळ्यांच्या समोर असा करते आहे की त्या पानांना ती प्रेमाने हिना लावत आहे.
हाही बहाणा !
शायर : मिर्झा महम्मद हसन ( कातिल )
१७५७ ते १८१८.
आणि ही गज़ल इथे ऐका.
जयंत कुलकर्णी.
वस्ती..!
मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित..
वस्ती पाखरांची झळाललेली होती
मस्ती कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते
भूक विश्वामित्राची चाळवलेली होती!
गेलो कराया सांत्वन पाखरांचे
गात्रे तयांची जळालेली होती!
दिले धडे मी शुचिर्भूततेचे
यौवंने पाखरांची पोळलेली होती!
आला थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली होती!
--तात्या अभ्यंकर.
देखावे..
ओळखीचे होते सारे तिथे
देखावेच होते न्यारे तिथे!
गाईन गीत आता खुशीने
वाहतील मोकळे वारे तिथे!
लाभेल शांती तिच्या जिवाला
आनंदे वाहीन भारे तिथे!
फेसाळेल मद्य प्याल्यात आता
कोंडाळतील हावरे सारे तिथे!
मी आस्तिक, मी नास्तिक
उघडीन सारी दारे तिथे!
-- तात्या अभ्यंकर.
मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्भूत स्वप्न !

मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२)
२८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७.
अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया.
हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”. देवाने याच्या जन्मासाठी गाव सुध्दा कसे निवडले ते बघा. हे गाव सम्राट अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांपैकी एक, ज्याचे नाव अब्दूल रहीम खान-ई-खान, त्याने वसवले होते. हा स्वत: मुसलमान असून कृष्णभक्त होता आणि त्याने कृष्णावर बरीच पद्ये रचली होती. या माणसावर परत केव्हातरी मी लिहीनच. याची एक हकीकत सांगतात. हा दानधर्मासाठी बराच प्रसिध्द होता. पण त्याची दानधर्म करायची पध्दत विचित्र/वेगळी होती. तो दानधर्म करताना याचकाच्या नजरेस कधी नजर द्यायचा नाही. याची त्या वेळी नजर नेहमीच खाली झुकलेली असे. हे कळल्यावर कबीराने एक दोहा त्याच्यावरही लिहीला तो असा –
देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन.
सदासर्वकाळ देणारा खरा दुसराच कोणीतरी ( दिन रैन)
मी देतो असे वाटू नये म्हणून माझी नजर ही नेहमी झुकलेली असते. ( तासो निचे नैन).
असो. हे विषय निघाला म्हणून सांगितले.
ब्रिटीश राजवाटीत हे गाव लाकडावरील हस्तिदंताच्या कोरीव कामासाठी प्रसिध्द होते. याच गावात मदनचे आजोबा रामसींग यांनी आसरा घेतला. १९२८ साली त्या गावात त्यांनी एक छोटेसे घर बांधले त्याचे नाव त्यांनी ठेवले “मोहन निवास”. त्या गावातले बुजुर्गांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात त्या गावाच्या पंचक्रोशीतले अनेक कलाकार हजेरी लावत आणी मग मैफिली रंगत. हे काही दिवसाने बंद पडले कारण मदनच्या वडिलांनी म्हणजे सरदार अमरसिंग यांनी ते गाव सोडले आणि ते सिमल्याला स्थायीक झाले. त्यांना सिमल्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली आणि त्या कुटूंबाचा आपल्या गावाशी संपर्क तुटल्यातच जमा झाला. अमरसिंग हे स्वत: संगीताचे उत्तम जाणकार होते आणि पेटी आणि तबला उत्कृष्ट वाजवायचे. त्यांची पत्नी म्हणजे मदनची आई श्रीमती पुरणदेवी, या एक अत्यंत धार्मिक बाई होत्या आणि मदनवर झालेल्या धार्मिक संस्काराचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मदनला एक मोठा भाऊही होता त्याचे नाव मोहनसिंग. या दोघात जवळ जवळ १३ वर्षाचे अंतर होते. हाही स्वत: व्हायोलीन उत्तम वाजवायचा आणि उत्तम गायचा देखील. मदनला एक मोठी बहीण होती तिचे नाव होते शांतीदेवी. ही एक उत्तम गायिका होती आणि तिनेच मदनला त्याच्या दुसर्या वर्षापासून गाणे शिकवायला सुरवात केली. मदनला गळ्याची आणि गाणे समजण्याची दैवी देणगी असल्यामुळे त्याने गाण्यातील बारकावे लवकरच आत्मसात केले. त्यानंतर त्याची गाणे शिकण्यासाठी पंडीत अमरनाथ यांच्याकडे रवानगी करण्यात आली. भावाबरोबर गाण्याचा रियाज़ आणि शाळेतले शिक्षण चालूच होते. जरी शाळेत तो एक हुषार मुलगा म्हणून ओळखला जायचा तरी मदन हा काहीसा अबोल, कोणात न मिसळणारा मुलगा होता. त्याचा वेष चांगला असायचा आणि अंगावर क्वचित त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दागदागीने आणि डोक्यावर चमकणारी पगडीही असायची.
याच काळात प्रसिध्द गायक सैगल हे ही सिमल्यात रेमींग्ट्न टाईपराईटर कंपनीमधे नोकरीला होते आणि ते आपली पेटी घेऊन मोहनच्या घरी बर्याच वेळा भेट द्यायचे आणि मदनबरोबर ते दोघे मस्त मैफिल जमवायचे. अर्थात मदन त्यावेळी फक्त ऐकायचेच काम करायचा कारण त्याचे त्या वेळेस वय होते फक्त दोन. सैगलचे या घराशी स्नेहबंध चांगलेच जुळले होते. शांतीदेवींनी त्याच्या एका काल्का ते कलकत्ता या प्रवासाची आठवण सांगितली आहे, या प्रवासभर ते गातच होते आणि सहप्रवासी त्याचा आनंद लुटत होते. सैगल यांना लहानग्या मदनबद्दल ममत्व होते आणि त्यांना त्याच्या या गाण्याच्या दैवी देणगीचे फार कौतूक होते. सैगल यांनी न्यू-थिएटर्समधे कलकत्याला नोकरी पकडली तरी पण जेव्हा जेव्हा मास्टर मदन किंवा त्यांचे कुटुंबीय कलकत्याला येत, तेव्हा त्यांची काळजी सैगलच घेत.
रेडिओ आणि चित्रपटगृहांचा नुकताच जन्म झाला होता. जाहीर कार्यक्रम हाच जनसामान्यांसाठी संगीत ऐकण्याचा मार्ग होता. त्यामुळे अशा संभांना अलोट गर्दी होत असे. खाजगी मैफिलीही होत असत पण त्या संस्थानिकांकडे. त्यातल्या त्यात उत्तरेला पतियाळा संस्थान तर दक्षिणेला म्हैसूर संस्थान हे कलाकारांचे उदार आश्रयदाते होते.
मास्टर मदनचा पहिला जाहीर कार्यक्रम १९३० सालच्या जून महिन्यात धरमपूर सॅनेटोरियम मधे झाला. त्यावेळी त्याचे वय होते अवघे साडेतीन वर्षे. जे हजर होते ते त्याच्या गायनाने अवाक् झाले. त्या वेळी त्याने ध्रूपदमधे “हे शारदा नमन करू.....” हे म्हटले होते. टाळ्यांच्या कडकडाटात हजर असलेल्या इतर कलाकारांनी या आवाजाचा आणि या जगाचा काही संबंध नाही असे जाहीर केले आणि असे काही आत्तापर्यंत ऐकले नव्हते असे नमूदही केले. या कार्यक्रमाची बातमी एखाद्या वणव्यासारखी भारतात पसरली आणि या कार्यक्रमाला त्या वेळेच्या सर्व वर्तमानपत्रातही जोरदार प्रसिध्दी मिळाली. दुरवरच्या मद्रासच्या हिंदूमधे देखील त्याचे छायाचित्र छापून आले. एका रात्रीत मास्टर मदन किर्तीच्या शिखरावर पोहोचला आणि त्याला सगळीकडून कार्यक्रमासाठी बोलावणे येऊ लागले. सिमला तर त्याचे गावच होते आणि तिथल्या संस्थानिकाचा तो लाडका गायक झाला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो एका महिन्यात सरासरी वीस कार्यक्रम करु लागला. त्या काळात त्याच्या भावाला व्हायोलीनच्या साथीसाठी ऐंशी रुपये तर त्याला २५० रुपये मिळायचे. पण मास्टर मदन हा पैशासाठी गात होता असे ना त्याचे टिकाकार म्हणत ना त्याचे मित्र म्हणत. तो गात असे कारण गाणे ही त्याची आता मानसीक गरज बनली होती. त्यातच त्याला खरा आनंद मिळायचा.
भारतातल्या घरादारात मास्टर मदनचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. जगातले आश्चर्य म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मैथिली शरण गुप्तांनी त्यांच्या भारत भारती मधेही त्याचा उल्लेखही केलेला आपल्याला आढळेल. मास्टर मदनची त्याच्या गुरूंवर (संत नंदसिंगजी महाराज) आतोनात श्रध्दा होती. या गुरूंनी म्हणे त्याच्या अकाली मृत्यूचे भाकित करुन ठेवले होते. खर खोटे माहीत नाही, एकदा या गुरुंच्या उपस्थितीत त्याने जोनपूरी राग इतका भक्तिभावाने आळवला होता की श्रोत्यांना त्या सभेत परमेश्वर हजर असल्याचा भास होऊ लागला. तो भास किंवा आभास म्हणा मास्टर मदनने भैरवी आळवल्यावरच दूर झाला. या लहान वयात त्याची धार्मिक वृत्ती इतकी वाढली की तो आता सतत गुरु नानक यांची प्रतीमा जवळ बाळगायला लागला. एवढेच नाही तर कधी कधी झोपायच्या ऐवजी तो समाधीत जायला लागला.
रेडिओवर आता त्याचे नियमित कार्यक्रम होऊ लागले. त्याची किर्ती ऐकून मुंबईहून त्याला सिनेमाता काम करण्याची विनंती करण्यासाठी माणसे येऊ लागली. पण त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यावेळेस सिनेमात काम करणे सभ्यपणाचे समजत नसत. याचा त्यांना पुढे फारच पश्चत्ताप झाला. कारण जर त्यांनी यासाठी परवानगी दिली असती तर त्याची चित्रफित असती आणि त्यात त्याची प्रतिमा अजरामर झाली असती.
१९४० साली महात्मा गांधी सिमल्याला गेले होते सभेसाठी. ती सभा ओस पडली कारण आख्खे सिमला मास्टर मदनच्या गाण्याला गेले होते.
मास्टर मदनचे शेवटचे गाणे कलकत्यात झाले. त्या कार्यक्रमात त्याने जवळ जवळ दीड तास राग बागेश्वरी आळवला. एका श्रोत्याने बक्षीस म्हणून लगेचच ५०० रुपये दिले- त्या काळात ही रक्कम फारच मोठी होती. परत येताना मदन दिल्लीला त्याच्या बहिणीकडे उतरला. तेथेदेखील दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवर त्याला जावे लागायचेच. या छोट्याला त्याचा मेहूणा सायकलवर घेऊन अलिपोर रोडवर जायचा.
याच मुक्कामात मदनला ताप चढला. पण त्याने रेडिओ स्टेशनवर जायचे चालूच ठेवले होते. वैद्यकीय उपचारांनी ताप काही उतरायची लक्षणे दिसेनात तेव्हा त्याने सिमल्याला प्रस्थान ठेवले. या हवा बदलाचाही काही फायदा झाला नाही. काही दिवसांनी एक चमत्कारिक घटना घडली. त्याचे कपाळ आणि सांधे चमकायला लागले. तेव्हा त्याच्यावर पार्याचा विषप्रयोग झाल्याची शंका बर्याच जणांनी प्रदर्शित केली. किंवा त्याच्या नातेवाईकांच्या अती हव्यासाचाही हा परिणाम असावा. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच गेली.
या जगाचा जुन ६ रोजी त्याने निरोप घेतला. त्यावेळी साल होते १९४२.
आपल्या चुकीची दुरुस्ती “त्याने” बरोबर १४ वर्षाने केली आणी या गंधर्वाला परत बोलावून घेतले.
मास्टर मदन गेल्याला आता ७० वर्षे होऊन गेली पण त्याच्या ताकदीचा आणि संगीताची जाण असलेला गायक अजून या क्षेत्रात जन्मायाचा आहे. सागर निझामीच्या दोन गज़ला आणि काही गाणी एवढीच त्याची संपत्ती आपल्याकडे आहे. एवढी रेडिओ रेकॉर्डींग असताना त्यातले काहीही आपले सरकार मिळवू शकले नाही ही अत्यंत बेजबाबदारपणाची आणि दुर्दैवाची बाब आहे.या थोर स्वर्गिय बालगंधर्वाच्या दोन गज़ला आपण ऐकणार आहोत आणि त्याचा अर्थही समजून घेणार आहोत. सागर निझामीची ही गज़ल -
यूँ न रह रह कर हमें तरसाईये
आइये आ जाईये आ जाईये...
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर मेरी आग़ोश में गिर जाईये
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
जी में आता है यहीं मर जाये
-सागर निझामी.
दोन प्रेमी जिवांच्या मनात काय काय काय चाललेले असते हे त्यांना जन्म देणार्या परमेश्वरालासुध्दा कळणे मुष्कील.
कधी त्याची ओढ तर कधी त्याचा तिरस्कार. कधी अबोला तर कधी प्रेम. कधी क्षमा तर कधी नाही.
सागर काय म्हणतोय ते बघूया.
मला का सारखा तडपवतो आहेस?
ये ना ! एकदाचा ये !
मला सोडतोस, परत परत बाहेर ठोकरा खातोस, काही हरकत नाही,
माझ्या बाहूत तुझा हक्काचा आसरा आहे.
माझ्या जगात तुझी केव्हा पासून प्रतिक्षा आहे.
तुझे जग सोडून ये, माझ्या जगात ये.
नाहीतर ---
ही मदमस्त हवा, हे चांदणे,
तू नाहीस तर मला वाटते की
इथेच मरून जावे.
ही गज़ल इथे ऐका.
आता दुसरी ऐकवतो.
हैरत से तक रहा जहान\-ए\-वफ़ा मुझे
तुम ने बना दिया है मुहब्बत में क्या मुझे
हर मंज़िल\-ए\-हयात से गुम कर गया मुझे
मुड़ मुड़ के राह में वो तेरा देखना मुझे
कैफ़ ख़ुदी ने मौज को कश्ती बना दिया
होश\-ए\-ख़ुदा है अब न ग़म\-ए\-नख़ुदा मुझे
साक़ी बने हुए हैं वो `साग़र’ शब\-ए\-विसाल
इस वक़्त कोई मेरी क़सम देखता मुझे
-सागर निझामी.
माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने हे जग अवाक झाले आहे,
बघ माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने माझे काय काय झाले आहे.
माझ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या मंज़ील मधेच मी हरवलो,
या प्रवासात तुझे माझ्याकडे वळून वळून बघणे.....
किंवा - माझ्या या तुझ्यावरच्या प्रेमाने मला माझ्या अंतीम ध्येयापासून वंचित ठेवले आहे
बघ माझ्या अहंकाराने, बुध्दीने मी या लाटांचीच नाव केली होती...
पण मला आता शुध्द आली आहे आणि हे नाखव्या मला आता कसलेही दु:ख नाही.
किंवा मला आता नावाड्याला जो असतो तसला कसलाही ताण तणाव नाहीत.
सागर म्हणतो, या मिलनाच्या रात्री, ती “ते” आता साकी झाले आहेत,
यावेळी शपत, या अवस्थेत, मला कोणीतरी बघायला पाहिजे....
ही गज़ल इथे ऐका.
मास्टर मदन... एक आपल्या जगाला पडलेले स्वप्न...
संजीवनी
रंग होते राग होते गंध होते सोबती
या जीवणिचे हास्य तरीही स्पंदने माझे मागती
चन्द्र होता, होत्या तारका माझ्या संगती
हस्ताचे नक्षत्र तरीही त्रुषार्त ओठ माझे मागती
एकाचवेळी प्राजक्त आणि रातऱाणी माझ्या सभोवती
या मिठीचा एक क्षण हीच मात्र माझी संजीवनी
कोवळेसे उन होते आज माझ्या अंगणी
मागतो मी मात्र त्या निष्पर्ण तरुची सावली
वाहून गेली कित्येक युगे डोळ्यासमोरूनि
उरल्या मागे केवळ काही क्षणांच्या आठवणी
नको तेच झाले
पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही
जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही

