जे न देखे रवी...

सुखी's picture
सुखी in जे न देखे रवी...
22 Oct 2025 - 08:20

कळलं च नाई

इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
21 Oct 2025 - 10:01

बघ

बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ

वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ

म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ

साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Oct 2025 - 16:45

सणासुदीची सफाई

"नास्तिकांनी खायला कोंडा,
उशाला धोंडाचं गाणं!"
कितीही म्हटलं, तरी
आपल्या देशाची पक्की जमीन
धर्माच्या खाटेचीच सोय!

पंथाच्या गादीची उब,
सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप —
आपलेसेपणा देणारी ही सोय
बहुतेकांना हवीच असते, नाही का?

सणांच्या आधी, माळ्यावरची
समृद्ध अडगळ खाली उतरते,
तेव्हा माळ्याचीही सफाई होते.

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
10 Oct 2025 - 14:47

दहा अंगुळे उरला

अभंगाची मूळाक्षरे
ध्यानी मनी घोटताना
"वि"ठ्ठलाच्या "वेलांटीत"
"का"न्हा रेखाटतो "काना"

वेचुनिया मूळाक्षरे
घडवितो शब्द तुका
गहनाचा अंतर्नाद
झंकारतो त्यात, ऐका

शब्द चोखट, रोकडे
जोडे तुका, रचे ओळ
ओळी ओळीत गर्जती
वीणा, मृदंग नि टाळ

एका एका अभंगाचा
शब्द शब्द जो जगला
तुका आभाळ व्यापून
दहा अंगुळे उरला

पारुबाई's picture
पारुबाई in जे न देखे रवी...
4 Oct 2025 - 08:56

समुद्रच आहे एक विशाल जाळं

ही एक दीर्घ कविता आहे.
एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट.

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Sep 2025 - 11:18

सागर तळाशी

सागर तळाशी | तुटल्या केबल
त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ ||

बाह्य जगताशी | संबंध तुटला
येरू डोकावला | आत तेव्हा || २ ||

अनाहत नाद | आला समेवर
कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ ||

स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात
ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
18 Sep 2025 - 22:18

मुसळधार पावसाने....

या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र......

नाही दिली उसंत
सावराया जिर्ण पाले
मुसळधार पावसाने
गर्विष्ठ ......
हवेल्यानां शांत केले

हिरव्या माळरानी
ना ही कळ्या उमलल्या
मुसळधार पावसात,
व्यथा.....
खडकात जिरून गेल्या

अंडी फुटून गेली
आळ्या मरून गेल्या
मुसळधार पावसाने
फुल.....
पाखरांचा काळ केला

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
14 Sep 2025 - 14:06

चमकणारे आभास निळे

जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत
देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ.
'मी विचार करतो, म्हणून मी आहे'?
पण हे विचार कुणाचे?
एका ॲपच्या नोटिफिकेशनचे?

अस्सल आरसा असूनही
पडझडलेल्या प्रतिमेचा भुगा
रात्री बेरात्री चिवडत बसणे
जसा नित्शेच्या 'माणसाच्या'
अशक्यप्राय स्वप्नाचा उपहास.

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
8 Sep 2025 - 12:10

कल्पका:

नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:।
अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥

--राजीव उपाध्ये

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Sep 2025 - 13:07

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

कविता-रतीचे | विभ्रम अनंत
तयांचे गणित | कैसे करू?

तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये :)
~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास

कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना त्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 Sep 2025 - 20:43

(π)वाट

स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरवी तत्त्वता

वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा
व्यास बनुनी राहते

(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या-जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
3 Sep 2025 - 09:26

होडी

वाण्याचे सांगतो कुळ,
विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली
बेतुक्या शोधतो मुळ

स्वर टाळ चिपळ्यांचा
विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा
बेतुक्या थकून गेला

भोवती गर्द पाचोळा
काही हिरवा काही पिवळा
काही वार्‍याने उडून गेला
काही तीथेच निजला

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
1 Sep 2025 - 18:26

उंदीर

घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Aug 2025 - 17:56

स्ट्रिंग थिअरीचा पाया

(FunU)वादी लेखनाची
होता उर्मी अनावर
ब्रह्मलीन असूनही
प्रकटू का मिपावर?

बादरायणी संबंध
येतील का माझ्या कामी?
(एन्ट्रॉपीचे ॐकाराशी
करू कलम कसे मी?)

"जानव्याचा दोरा हाच
स्ट्रिंग थिअरीचा पाया"
हीच थीम ठेवूनिया
लेख घ्यावा का पाडाया?

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Aug 2025 - 07:21

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)

केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा

केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो

केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो

केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
22 Aug 2025 - 11:04

असं कुठं लिहिलंय?

पेरणा

मागे वळून बघू नये,
म्हातार्‍याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?

अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
20 Aug 2025 - 18:21

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
19 Aug 2025 - 23:21

पाउली पैंजणांचा मला भार आहे

पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..

शेजावरी स्वप्नकळ्यांचा
मूक शृंगार आहे
कुंकवाचा चंद्रमा
त्यालाही डाग आहे...

नजरेत भावनांचा
भरला बाजार आहे..
आरसा मनाचा
त्यालाही भेग आहे..

अंतरात श्वासांचा
खोल वार आहे..
सावल्यांच्या मिठीत
माझा संसार आहे...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Jul 2025 - 20:49

बखरीच्या पानाआड

बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर

प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून

जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी

बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
कसे सरावे गारूड?

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Jul 2025 - 18:58

सहा कोवळे पाय

नादमय सरसर
कोवळ्याशा वाटेवर
कोवळ्या सहा पायांची
चाल होई भरभर

एकामागे दुजा चाले
पुढचे न पाहताना
पुढच्याचे ध्यान नाही
पुढे पुढे चालताना

कधीतरी भांबावून
पुढचा जागी थिजतो
हरवल्या मागच्याला
चार दिशांत शोधतो

मागलाही नकळत
गेलेला पुढे जरासा
थबकून तोही टाके
पुढच्यासाठी उसासा