वावर

प्रवास

काल ट्रेननी घरी जाण्याचा योग आला. सकाळची ९ ची ट्रेन पकडली. खरं तर उशीरच झाला होता पण गुरमीतनी (माझी रूममेट) बिचारीनी धावपळ करून मला स्थानकावर सोडलं एकदाचं. शनिवारी ती १२ च्या आत कधीही उठत नाही पण काल माझ्यासाठी उठली.
ट्रेनमधे सुट्ट्या वगैरे नसल्याने गर्दी बेताचीच होती. १२ तासांचा प्रवास असल्या कारणाने मी ही ३ पुस्तकं बरोबर ठेवली होती पण खूपसा वेळ सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात आणि एका आज्जीबाईंबरोबर गप्पांतच गेला. ते पुढे येइलच. गर्दी बेताचीच असली तरी काही प्रवासी होते ज्यांनी माझं काही काळाकरता मनोरंजन केलं. त्यांच्यावरचा हा लेख.
मी आत जऊन स्थानापान्न होते ना होते तोच एका सधारण ३६/४० वर्षाच्या आत्मविश्वास चेहेर्‍यावरून ओसंडून वहात असणार्‍या "लॅटीनो" स्त्री नी माझं लक्ष वेधलं. मोठ्ठ्या सोनेरी कानातल्या रिंगा घातलेली, मस्त काळ्या (म्हणजे माझा आवडीचा रंग) पेहेरावातली बांधेसूद नक्की म्हणता येइल अशी आणि उंच. मी पहता क्षणी तिचं नामकरण करून टाकलं "मिस सेल्फ्-अशुअर्ड". मला असे मोठ्ठे कानतले वगैरे घातलेल्या बायका म्हणजे बोल्ड स्टेटमेंटस करणार्‍या भरपूर आवडतात. जग काय म्हणेल , आपल्याला शोभेल का हे फाट्यवर मरून मस्त नटवं कसं हे यां च्याकडून शिकावं. मी मधेमधे क्षीण प्रयत्न करत असते पण तस २ तसापेक्षा तसे मोठ्ठे कानातले ठेववत नाहीत. मधे केसही "हायलाइट्"वगैरे केले होते. नवर्‍याने प्रचंड खरमरीत शब्दात टीका केली होती.मी देखील "गरजेल तो पडेल काय" या न्यायाने त्या टीकीकडे पूर्ण डोळेझाक केली होती. असो. पण ३५ शी नंतरची ही साहसी फेज मोठी लोभस असते खरी.
माझ्या शेजारच्या सीटवर एक ७० च्या बाई येऊन बसल्या.यांनी माफक मेकअप , अगदी सौम्या रंगसंगती असलेले कपडे परीधान केले होते. हातातही भारंभार अंगठ्या नाहीत जे की इथे सर्रास पहावयास मिळतं. तर एकच ती ही मंद मोत्याची नाजूक अंगठी. वयानी मोठ्या बायकांशी माझं कसं तबडतोब पटतं. आम्ही एकमेकीशी गपा मारू लागलो.तिला न्यू जर्सीला म्हणजे माझ्याही आधी उतरायचं होतं. ती तिच्या मुलीकडे चालली होती. आजीबाई होतीही मोठी गप्पीष्ट आणि चौकस. आमचं बर्‍यापैकी सूत जमलं.
गाडीत पुरुष्वर्गही होता. एका पुरुषानीच या आजीबाईंना पेटी वर ठेवायला मदत केली. एक आफ्रीकन अमेरीकन पूर्ण प्रवासभर कानाला हेड्फोन लावून, गाणी ऐकत बसला होता. नक्की रॅप असणार मी मनाशी म्हटलं. ३० चा गोरा देखणा तरुण कोणततरी पुस्तक वाचण्यात मष्गूल झाला होता. खरच देखणा होता.माझ्या पुढच्या सीटवर बसला होता.जेव्हा कोणी स्त्री २ सीटांच्या रांगांमधून मागे कॅफेकार मधे जायची तेव्हा त्याच्याकडे २ क्षण नजर टाकूनच जात असे.माझ्या मागे २ महाविद्यालयीन तरुण-तरुणी बसले होते.मधे मधे आज्जीबाईंना डुलकी लागली की त्यांच्या गप्पा ओझरत्या कानी पडत होत्या.
खूप बालीश गप्पा चालल्या होत्या. अभ्यास, मित्र-मैत्रीणी आदि विषयांवर्.समान वयोगटात वावरूनच मुलं-मुली एकमेकांबद्दल शिकतात, जाणून घेतात त्या पातळीवारचाच एकंदर प्रकार चालला होता.
थोड्या वेळानी न्यू यॉर्क आल्यावर माइकवर बारीक आवाजात गाडी बराच वेळ उभी रहाण्याची घोषणासुरु झाली. आज्जीबाई अगोदरच चौकस त्यात बारीक घोषणेनी त्यांचा जीव खालीवर होऊ लागला. त्या मला विचारू लागल्या, मी म्हटलं आधीच तोंडातल्या तोंडातलं इंग्रजी त्यात बारीक आवाजात मला काही कळत नाहीये. मग मिस सेल्फ अशुअर्ड मदतीला आली आणि तिने आजीबाईंना घोषणा थोडक्यात सांगीतली. मध्यंतरात दुसरर्‍या डब्यात लहानशी उलथा-पालथ झाली. एका बाईचं सामान हरवलं आणि चिंताग्रस्त मुद्रेनी ती बाई एकदा आणि तिकीटचेकर एकदाअसे इकडून तिकडे फेर्‍या मारू लागले.सगळ्यांच्या सीटखाली, वरच्या काप्प्यात बघून जाऊ लागले. शेवटी एकदाचं सामान सापडलं.
मग एकेक करत लोक उतरत गेले, तो गोरा न्यू योर्क ला, अजीबाई आणि मिस सेल्फ अशुअर्ड न्यू जर्सी ला, काळा फिलाडेल्फिआला. आज्जीबाई उतरताना "बाय हनी" म्हणाल्या : ) .... मी खूश.
नवे लोक येत गेले, मी देखील जुने सोबती हरवल्याने , पुस्तक जवळ केलं. एकंदर प्रवास छान झाला.

अर्ध्या तासाचा फरक

साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती! आणि जरा उसंत मिळाली की बरोबरच्या मुली आमच्या वर्गमित्रांना बरोबर घेऊन करोलबाग नाहीतर पालिकाबझारवर धाडी घालत. सायंकाळी हॉस्टेलावर दिवसभरात केलेल्या शॉपिंगचा प्रदर्शनाचा कार्यक्रम असे.

मला दोन दिवस फीर फीर फिरून जाम कंटाळा आला होता. पाय तर काय दुखत होते विचारू नका. कोठेतरी शांतपणे, आरामात, ए‌‌. सी. च्या थंडगार झुळका खात अतिशीतपेयांचा आस्वाद घ्यावा, सोबत मंद संगीत असावे, निवांत गप्पांचा फड जमवावा अशा दिवास्वप्नांत मी गर्क होते.
हीच अवस्था माझ्या अन्य दोन अमराठी मैत्रिणींची होती. बाकी कळपातील शिस्त व अनुशासनाला (? ) न जुमानता कामचुकार म्हशींप्रमाणे आम्ही कधी आमच्या ग्रुपला चकवा देऊन ह्या 'स्थल-दर्शनातून' निसटतो असे आम्हाला झालेले!

अखेर ती घटिका आली! एकामागून एक स्थळांचे डोळे भिरभिरवणारे दर्शन घेतल्यावर आमचे प्राध्यापक आम्हाला प्रगती मैदानावर घेऊन आले. तिथे कोणतातरी मेळा भरला होता. त्यांची अपेक्षा होती की आम्ही दुखऱ्या पायांनी ते मैदान पालथे घालत त्या मेळ्याचा आनंद घ्यावा! ह्यॅ!!!!
बाकी सर्व ग्रुप मैदानात शिरल्यावर आम्ही तिघी मैत्रिणींनी सर्वांची नजर चुकवून तिथून कल्टी मारली. आदल्या दिवशी कॅनॉट प्लेस मध्ये ''निरुलाज''च्या जवळचे ''द होस्ट'' नावाचे एक मस्त तारांकित हॉटेल आम्ही हेरून ठेवले होते. आदल्या दिवशी तिथे थोडा अल्पोपाहारही केला होता. जुन्या युरोपियन धाटणीचे वातावरण, आल्हाददायक ए. सी. आणि चकाट्या पिटायला अतिशय उत्तम! आता तिथेच जायचे, मस्त हाणम्या जेवायचे आणि तेथील ए. सी. चा मनोरम आनंद घेत फुल्ल्टू टाईमपास करायचा.... मग सायंकाळी बाकी ग्रुपला थेट हॉस्टेलावर गाठायचे... वाट चुकलो वगैरे सांगून वेळ मारून न्यायची, असा प्लॅन ठरला.

एका रिक्षात आम्ही तिघींनी स्वतःचे देह कोंबले व कॅनॉट प्लेसच्या दिशेने प्रवास सुरू केला.
आमचा आनंद एव्हाना 'कशी हूल दिली' ह्या कल्पनेने व दोन-तीन दिवसांनी धड आरामात बसून जेवायला मिळण्याच्या संधीप्राप्तीने गगनात मावत नव्हता. चाणक्यपुरीत विदेशी वकिलाती व यांच्या टोलेजंग इमारती, कचेऱ्या, बंगले, हॉटेल्स, रस्ते, चौक सगळेच चकचकीत होते... पण हॉटेल्स पंच-सप्त तारांकित त्यामुळे आमच्या खिशाच्या बाहेर! हॉस्टेलाचे अन्न सुमार होते आणि त्यात तिथे एक पंजाब - हरियाणाची हॉकी टीम राहायला आलेली.... त्यांच्या अफाट खाण्यामुळे हॉस्टेल कॅन्टिनमधले बहुतेक पदार्थ संपलेले असत. त्यामुळे गेले तीन दिवस आम्ही कोणत्यातरी चायनीजच्या गाडीसमोर उभे राहून, नाहीतर हॉस्टेलाजवळच्या रस्त्यावरच्या धाब्यावर अक्षरशः खाली पदपथावर फतकल मारून जेवत होतो.

आज मात्र आमचे खाद्य भाग्य उजाडले होते!

हॉटेलपाशी पोहोचेपर्यंत दुपारचे अडीच झालेले. बाहेर टळटळीत ऊन असताना आपण कसा ए. सी. हॉटेलात बसून यथेच्छ जेवण चापायचा निर्णय घेतला ह्याबद्दल स्वतःच्या अक्कलहुशारीचे कौतुक करतच आम्ही हॉटेलबाहेर दाखल झालो. तिथे आम्हाला आमच्यासारखीच दोन चुकार मांजरे उर्फ आमचे वर्गमित्र दिसले. म्हणजे काल ह्यांनीदेखील हे हॉटेल हेरून ठेवले होते म्हणायचे!! एकमेकांना 'कसे इतरांना गंडवले'च्या टाळ्या देऊन झाल्यावर आम्ही सुहास्यवदनाने हॉटेलात प्रवेश केला. एका छानशा टेबलला मोकळे पाहून तिथेच बसायचे ठरवले. 'लंच क्राऊड' ओसरत आल्यामुळे जागा मिळायला काहीच प्रॉब्लेम आला नाही.
मग सुरू झाला आमचा टाईमपास. स्टार्टर्स, मॉकटेल्स, गप्पांचा राऊंड - मग वेटर दोन-तीनदा सूचकपणे ऑर्डर घ्यायला आल्यावर पुढची ऑर्डर असा कार्यक्रम सुरू झाला. तसे आम्ही सगळे पुण्यातही फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, डेक्कन, कॅंप इत्यादी ठिकाणच्या विविध रेस्टॉरंटसमध्ये चकाट्या पिटण्यात माहिर असल्यामुळे येथेही तेच काम कुशलतेने पार पाडण्यात आम्हाला कसलीच अडचण येत नव्हती. बरं, स्टाफदेखील कसलीही खळखळ न करता चुपचाप आमचे हास्यविनोद, लांबवलेल्या ऑर्डरी, आमच्या दोस्तांची कॉमेडीगिरी वगैरे सहन करत होता. शेजारच्या दोन-तीन टेबल्सना काही परदेशी प्रवासी बसले होते, त्यात दोन-चार रुपसुंदऱ्या असल्यामुळे आमच्या मित्रांचे निम्मे लक्ष गप्पांमध्ये, निम्मे 'त्यांच्या'कडे लागले होते. अर्थातच आम्ही त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन दोघांनाही भरपूर छळून घेतले.

अचानक मित्राची नजर मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. ''ओह, शि* यार! वुई आर ब्ल* लेट फॉर अवर कर्फ्यू टाईम! ''
पाहिले तर सायंकाळचे सात वाजत आलेले. अरेच्या! वेळ कसा आणि कुठे गेला हे कळलेच नव्हते! आणि दिल्लीत पाऊल टाकल्या टाकल्या आमच्या प्राध्यापकांनी समस्त विद्यार्थ्यांना तंबी दिली होती : सर्वांनी सायंकाळी सहाच्या आत हॉस्टेलावर हजर पाहिजे! मुलींना तर साडेपाचापर्यंतच हजर राहण्याच्या सूचना होत्या. कारण अर्थात चाणक्यपुरी भागातील अतिकडक सुरक्षा, चेकपोस्ट्स, निर्जन रस्ते, गुन्हेगारी आणि घातपाताची भीती ह्याशिवाय आमचे त्या शहरात असलेले नवखेपण हे होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेतलेली ही दक्षता होती.
अर्थात आमच्या टाईमपासमध्ये आम्ही ही बाब साफ विसरलो होतो! मग काय! घाईघाईत बिल दिले, टॅक्सी पकडली आणि हॉस्टेलाचा मार्ग धरला. अंधार पडल्यावर एरवी उजेडात ओळखीची वाटणारी दिल्ली परकी परकी, असुरक्षित वाटू लागली होती. रस्त्यावरच्या वाहनांचे वेग वाढले होते. चाणक्यपुरीच्या जवळ तर रस्त्यात माणसेच नव्हती. होत्या त्या फक्त भन्नाट, सुसाट वेगाने धावणाऱ्या परदेशी बनावटीच्या, काळ्या काचांच्या अशक्य चकचकीत गाड्या!! रस्त्यावर दोन-तीनदा आम्हाला सुरक्षारक्षकांनी, पोलिसांनी थांबवले, आमची ओळखपत्रे पाहिली आणि मगच पुढे सोडले. वॉकीटॉकी काय, हेल्मेटस काय... हे सुरक्षा प्रकरण आम्हाला झेपणारे नव्हते!

हॉस्टेलमध्ये पोचलो तेव्हा जवळपास पावणेआठ होत आलेले.
आमच्या उरलेल्या दोन रूममेट्स आम्ही लपत-छपत रूममध्ये प्रवेश केल्यावर अक्षरशः चिडचिडाट करत आमच्या अंगावर धावूनच यायच्या शिल्लक होत्या. ''कहां गये थे रे तुम लोग? पता है क्या, सर दो-दो बार चक्कर लगाके गए सब रूम्सकी । हमने कैसे उन्हे रोका है हमेही पता है... क्या क्या बहाने बनाने पडे तुम लोगके लिए.... अब सरको यदी मालूम पडा और उन्होंने इंटर्नल्स और व्हायवाके मार्क्समेंसे कुछ मार्क्स काटे तुम लोगके, तो हमे मत बताना, हां ।'' अरे बापरे! हा तर विचार आमच्या डोक्यातच शिरला नव्हता. आम्ही आवरून घेईपर्यंत सर पुन्हा एकदा 'चेक' करायला आलेच होते. मग हसत हसत, 'हॅलो सर, गुड इव्हिनिंग सर.... ' वगैरे मोघम गप्पा मारून झाल्यावर ते एकदाचे अंतर्धान पावले. हुश्श! इंटर्नल्स आणि व्हायवाचे मार्क्स बचावले!!
त्या रात्री आम्ही तिघी उशीरापर्यंत 'आपण कशी धमाल केली' म्हणून खिदळत होतो. पण का कोण जाणे, कुठेतरी काहीतरी चुकतंय असेच मनात खोलवर वाटत होते.

ते असं का वाटत होते त्याचे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उलगडले.
मी आमच्या रूममध्ये तयार होत होते तेवढ्यात कालच्या आमच्या हॉटेल-स्वारीतील एक मैत्रीण रूममध्ये आली आणि फुसफुसली, ''जल्दी नीचे आ, बाकी सब इंतजार कर रहे है ।'' मला तर काही कळेना! तर माझा हात धरून ती जवळपास मला ओढतच खाली घेऊन गेली. ''अरे, तू बताएगी क्या यह सब क्या चल रहा है? '' इति मी. ''तू देख'' करत तिने मला स्वागतकक्षात नेले. तिथे तिपाईवर दोनचार इंग्रजी वृत्तपत्रे पडली होती. तिने त्यातले एक उचलले व माझ्या हातात कोंबले, ''ले, पढ! '' मी मथळ्यावर नजर फिरवली आणि पायाखालची जमीनच जणू सरकत आहे असे वाटले.
आदल्या सायंकाळी ठीक साडे-सातच्या दरम्यान कॅनॉट प्लेसमधील हॉटेल दिल्ली दरबारजवळ झालेल्या शक्तीशाली बॉंब स्फोटात दोन नागरिक ठार, बावीस जखमी.... माझ्या हातातून वर्तमानपत्र गळून पडायचेच ते काय शिल्लक राहिले! आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ते दिल्ली दरबारपासून थोड्याच म्हणजे तीन-चार मिनिटांच्या रस्त्यावर होते. आदल्या दिवशी ह्याच दिल्ली दरबारच्या बाहेर आम्ही परतीसाठी टॅक्सी शोधत होतो! आणि त्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात तिथे बॉंब ब्लास्ट झाला होता! आपल्याला तिथे अजून उशीर झाला असता तर???!!! कल्पनाही करवत नव्हती.
आपल्या बरोबर, हॉटेलात आजूबाजूला असणार्‍यांपैकी तर कोणी त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सापडले नसतील? नोव्हेंबरच्या सकाळच्या धुकंभरल्या थंडीतही मला घाम फुटला होता. काही सुचत नव्हते!
आमचे ते दोन मित्र व आम्ही तिघीजणी यांची सायलेंट कॉंफरन्स झाली. ''पेपर देखा क्या? '' ''हां यार, बाल बाल बचे।'' ''चूप! कोई कुछ नही बोलेगा ।'' ''हां, यह भी सही है, यदी औरोंको पता लगा तो....स्पेशली सर को....।'' ''देखो, अपना चेहरा जरा ठीक करके जाना औरोंके सामने.... नही तो पूछेंगे ।'' ''हां रे.... '' आमची धेडगुजरी कॉन्फ़रन्स संपली. दिल्लीच्या घटनेमुळे बाकी स्थलदर्शनाला गुंडाळून पुढच्या टप्प्याला, म्हणजेच आग्रा - मथुरेला जाण्याचे ठरले. जाताना आमची बस कॅनॉट प्लेसवरून गेली. खिडक्यांच्या काचांतून मुंड्या बाहेर काढायचेच ते काय शिल्लक ठेवून समस्त सहाध्यायींनी बॉंब ब्लास्टच्या जागेचे दर्शन घेतले. ''ए तूने देखा क्या, वह दूकान कितनी जली हुई दिखायी दे रही थी ना? '' एक वर्गमैत्रीण दुसरीला मोठ्यानं विचारत होती. मी मात्र मनातल्या मनात ''देवा, वाचवलंस रे बाबा! आता पुन्हा अशी चूक करणार नाही!! '' हेच पुटपुटत बसले होते!

-- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/

विजापुरचा अजब किस्सा

हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे व्यवसायाच्या कामाअंतर्गत तिथल्या एका शेतकर्‍याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू.

ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्‍यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली. कधी पायी, कधी सायकल-रीक्षा (की रीक्षा?) यांनी तेथील प्रेक्षणीय स्थळे पालथी घालायला सुरुवात केली. सोबत आईसक्रीम डायट! अहाहा!!

तर असेच फिरत फिरत आम्ही गोल घुमटापाशी आलो. तेथील आवाज घुमण्याची अद्भुतता अनुभवून झाली. मग तेथील थडगी पाहून झाली. मला तर कधी एकदा तिथून निघतोय असे झाले होते!
त्यानंतर जोड घुमट पाहिला. तिथून निघत होतो.... दुपारचे ऊन चांगलेच होरपळत होते. घशाला कोरड जाणवत होती. आता रीक्षात बसायचे आणि थेट लॉज गाठायचे असा प्लॅन चाललेला असतानाच एक खणखणीत आवाजातील हाक ऐकू आली, ''कुलकर्णी साब, ओ कुलकर्णी साब.....''

वडीलांनी लक्ष दिले नाही. थोड्या अंतरावर इतरही प्रवासी रेंगाळत उभे होते. त्यांना वाटले, त्यापैकीच कोणाला तरी हाळी दिली असेल.

ह्या खेपेस हाक स्पष्ट व खणखणीत होती....'' ओ कुलकर्णी साब....थोडा रुकिये |'' नकळत वडीलांची व त्यासोबत आमची पावलेही थबकली. आमच्यासमोर एक उंचापुरा, हिरवी कफनी घातलेला, हातात मोरपीसाचा झाडू घेतलेला, डोक्याला हिरव्या रंगाचे फडके गुंडाळलेला फकीर उभा होता. सुरमा घातलेले त्याचे डोळे भेदक होते. वडीलांना वाटले, ह्याला काही पैसे वगैरे हवे असतील, म्हणून त्यांनी खिशात हात घातला. त्याबरोबर त्या फकीराने त्यांना थांबायची खूण केली. ''हमें आपसे कुछ नही चाहिए|'' (मग कशाला थांबवलं?)
जणू आमच्या मनातला प्रश्न ओळखून तो फकीरबाबा वडीलांना म्हणाला, '' आपका पूरा नाम फलाना फलाना है, आप पूनासे आये है |'' (बरोबर आहे बाबा तुझं, आता मुद्द्यावर येशील का? आणि तुला ही माहिती कोणी दिली?)
आमच्या चेहर्‍यावर जणू प्रश्नचिन्हे कोरली गेली होती. आपले बोलणे तसेच पुढे चालू ठेवून तो बाबा उद्गारला, '' लेकिन आप असल में पूनाके नही है | आपका मूल ग्राम फलाना फलाना है | आपके पिताजीका पूरा नाम फलाना फलाना था, दादाजीका नाम फलाना फलाना था |'' आता आम्ही केवळ भोवळ येऊन खाली पडायचेच शिल्लक राहिलो होतो. ह्या बाब्याला आपलं नाव, गाव, व्यवसाय, पूर्वजांची नावं हे सगळं कोठून समजलं? कोणी सांगितलं? ही असली कसली थट्टा?
पण खरी भोवंडायची वेळ नंतरच येणार होती!!
आमच्या गोंधळलेल्या चेहर्‍यांकडे बघत त्या फकिराने एकदम वडीलांच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाला, ''हम यह सब जानते है क्योंकि बहुत साल पहले आपके दादा-परदादाजीसे पहले, आपके पुरखोंमेंसे एक बडे नेक और पाक इन्सान अपने संगीत- गुरुके खातिर, मरनेसे पहले अपने पूरे परिवारके साथ मुस्सलमान धरमको अपनाए थे | उन सबकी कबरें यहां है, आए, उन्हे मिले |'' त्याने आपल्या हाताने आम्हाला त्याच्याबरोबर चलायची खूण केली.
आता थरथरायची आमची पाळी होती. कोण कुठला फकीर, अचानक उगवतो काय, काहीच्याबाही बरळतो काय, आणि आता तर आम्हाला कोठेतरी चलण्याची जवळपास आज्ञाच करतो!!
त्याने नेलेल्या ठिकाणी बाहेर स्पष्ट शब्दांत स्त्रियांनी प्रवेश करायला मनाई आहे असे लिहिले होते. आई व आम्ही दोघी बहिणी तिथेच घुटमळलो. तसे तो फकीर आमच्याकडे वळून म्हणाला, ''आप भी आईए, यह सब तो आपकेही लोग है | झिझकना मत, बेखौफ आना |'' अरे बाबा, तू असं काय म्हणून राहिला? तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते? इति आम्ही, अर्थात मनातल्या मनात.
जोड घुमटाच्या जवळच असलेला हा भाग जवळपास निर्जन होता. समोर तंबूवजा कनात दिसत होती. हिरव्यागार रंगाची. नक्षीदार वेलबुट्टी, भरजरी काम केलेले पडदे आजूबाजूला सोडलेले. आत शिरल्यावर ऊद, धूपाचा दर्ग्याजवळ येणारा सुवास चारी अंगांनी वेढत होता. भर उन्हातही इथे एक प्रकारचा गारवा भरून राहिला होता. मोरपीसाच्या चवर्‍या की पंखे घेऊन अजून दोन -तीन फकिरासारखी दिसणारी माणसे तेथील काही कबरी (की पीर)वर चवर्‍या ढाळत होती. आम्हाला पाहून कोणीही आश्चर्य दाखवले नाही, की खास स्वागतही केले नाही. आपापल्या जागाही सोडल्या नाहीत. हुश्श!
आम्हाला भेटलेला फकिरबाबा तोवर कोपर्‍यात असलेल्या एका कबरींच्या समूहाकडे आम्हाला घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर थबकून त्या कबरींकडे अंगुलीनिर्देश करून त्याने सांगितले की हेच आहेत तुमचे पूर्वज.
त्याही पुढे जाऊन प्रत्येक कबरीपाशी जाऊन त्याने ती कबर कोणाची आहे हे सांगितले. त्यांचे आधीचे नाव व धर्म बदलल्यावर घेतलेले नावही सांगितले. सर्वात शेवटी त्या परिवारातील कुटुंबप्रमुखाच्या थडग्यापाशी येऊन तो थांबला आणि नाट्यमय सुरात म्हणाला, ''यह आपका कबसे इंतजार कर रहे है |''
हे राम!!!!!! एव्हाना आम्हाला अगदी पिक्चरच्या सेटवर गेल्यासारखं वाटायला लागलेलं! भांबावून जाणं का काय असतं म्हणतात ना, ते अगदी सहीच्या सही अनुभवलं तिथं.
वडीलांनी समयसूचकता दाखवून त्या कबरीला प्रणाम केला, चक्क साष्टांग प्रणिपातच घातला म्हणेनात! त्यांच्या वागण्याचा अर्थ ओळखून आम्हीही वाकलो व यथोचित नमस्कार केले. नंतर त्या फकीरबाबालाही दंडवत घातला. त्याने मोठ्या तोंडाने आशीर्वाद दिले. आम्हाला सोडायला परत कनातीच्या दारापर्यंत आला.
वडीलांनी पुन्हा एकदा त्याला काहीतरी पैसे द्यावेत म्हणून खिशात हात घातल्यावर त्याने पुन्हा एकदा ठाम नकार दिला. ''फिरसे आना |'' आम्ही हात हालवून निरोप घेत असताना तो जोरात उद्गारला.
जवळपास पळत पळतच आम्ही रीक्षा स्टँड गाठला. तिथून थेट लॉज! घडलेल्या प्रकाराविषयी कोणीच बोलत नव्हते. आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने! ह्या अकल्पित माहितीला खरे-खोटे पडताळायला कोणी जुन्या पिढीची माणसेही उरली नव्हती, ना कागदपत्रे! गांधीजींच्या खुनानंतर आमच्या मूळ गावी उडालेल्या दंगलींत सर्व ब्राह्मणवस्ती पेटवून देण्यात आली होती, त्यात ती कागदपत्रेही नष्ट झाली होती.

अजूनही आम्हाला जे घडले, जी माहिती मिळाली ती सत्य की असत्य की आभास की अजून काही, ह्याबद्दल खात्री नाही. पण मिळालेला अनुभव मात्र जाम थरारक होता, जो या जन्मात विसरणे शक्य नाही!!

(वरील संवाद मी माझ्या तुटपुंज्या हिंदीच्या तोकड्या आधाराने लिहायचा प्रयत्न केलाय. तेव्हा चु.भू.दे.घे.)

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

वीजेची गायब-जादू!

लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी....
त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे.

आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फक्त लहानपणीच्या कथांमधील जादूने गोष्टी गायब करणार्‍या जादूगाराची जागा आश्वासनं देणारे मंत्री, सरकार, प्रशासन यांनी घेतली आहे. लोक काहीही म्हणोत! मात्र मी त्यांच्यावर आणि त्यांनी गायब केलेल्या वस्तूंवर विश्वास ठेवायचं सोडलं नाही हां!

आमच्याकडे बाजारात बर्‍याच गोष्टी गायब होत असतात. पण आम्ही स्वतःला सवय लावली आहे. एखादी गोष्ट गायब झाली म्हणून स्वतःचे फारसे अडू द्यायचे नाही. त्या वस्तूशिवाय जगायला शिकायचे. मग पुन्हा ती वस्तू बाजारात नव्या किमतीने अवतीर्ण होते तेव्हा ठरवायचे की त्या वस्तूला पुन्हा घ्यावे की नाही? न जाणो, उद्या पुन्हा गायब झाली तर अडायला नको हो! असं आपलं आमचं साधं सोपं मानसशास्त्र!

गेली दोन-तीन वर्षे आमच्याकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की वीज आणि पाणी हुतुतू, खो खो, लपंडाव सुरू करतात. आधी वीज गायब, मग पाणी गायब!! आह्हे ना ज्जादू?!! पाऊस पडो अगर न पडो, जलाशय - धरणे भरोत अगर न भरोत... गरजेपेक्षा पाण्याचा साठा कायम कमीच भरतो. पण तरीही आमचे सर्व मंत्री आश्वासने द्यायचं सोडत नाहीत बरं का!! कसले खेळकर आहेत ना आपले सर्व मंत्री?!! Tongue

वर्षभर भारनियमनमुक्तीच्या चर्चा, आश्वासने आम्ही श्रद्धेने ऐकतो. ह्याही वर्षी ऐकली. भक्तिभावाने इतरांनाही ऐकवली. पण सगळे थोडेच आमच्यासारखे सश्रद्ध! आमच्या भोळ्या भाबड्या चर्येकडे तुच्छ कटाक्ष टाकून, नाकपुड्या फेंदारून ते आमच्या भारनियमनमुक्तीच्या भावस्वप्नांना वास्तववादाची डूब देऊन भंग करण्यास आसुसलेले असतात. आमचे दादा, ताई निवडणुकांपूर्वी आणि नंतरही, आम्हाला ठासून सांगतात की ह्या वर्षापासून ते आमच्या भागाला भारनियमनमुक्त करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच!!! आम्हीपण लग्गेच वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणून कौतुकाचे पेढे सर्वांना भरवतो. हो, उगाच कुणाचं तोंड गोड करायचं राहिलं म्हणून त्यांनी नंतर कडूजहर मनाने आमच्या तोंडाचे पाणी (शब्दशः) पळवलं असं नको व्हायला! ह्या वर्षीचा उन्हाळा गारगार बरं का.... डोक्यावर फॅन गरगरणार, नळाला पाणी येणार, फ्रीज चालू राहणार, ए. सी. ची हवा झुळूझुळू वाहणार.... अहो, कसलं ते थंड हवेच्या ठिकाणांचं कौतुक करून राहिलात!! आमचं घर हेच आमचं थंड हवेचं ठिकाण होणार, बरं का!

उन्हाळ्याची सुरुवात तर चांगली होते. आश्वासनांच्या सुखस्वप्नांत आम्ही नेहमीप्रमाणेच गाफील असतो. वर्तमानपत्रांत कलिंगड, काकड्या, लिंबू सरबत, ऊसाच्या रसाची विक्री करणार्‍यांचे फोटो 'उन्हाळ्याची चाहूल' देत छापून यायला लागले की आम्हालाही उन्हाळ्याची चाहूल लागते. सालाबादप्रमाणे घरात ए. सी. घ्यावा की नाही ह्यावर चर्चा झडते. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे सर्व ए. सी. कांक्षी गृहसदस्यांच्या योजनांना अडसर बनण्याचे सोडून आम्हीही उत्साहाने ए. सी. घ्यायलाच पाहिजे इत्यादी इत्यादी चर्चेत समरसून भाग घेतो.

दुसर्‍याच दिवशी घरात सकाळपासूनच विजेने पोबारा केलेला असतो. पण आम्ही मनाची समजूत घालतो.... केबलमध्ये बिघाड असेल.... ट्रान्स्फॉर्मर उडाला असेल..... दुरुस्ती चालली असेल.... नाहीतर अशी पूर्वसूचना न देता ऐन परीक्षेच्या मोसमात वीजकपात मायबाप सरकार नक्कीच करणार नाही!

दुपारी घराजवळच्या भव्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनाकडे आमची पदकमले वळतात. बघतो तो काय, सारे दुकान अंधारात, दुकानातले नोकर हवा खात दुकानाच्या पायर्‍यांवर चकाट्या पिटत बसलेले आणि दुकानात मालक इमर्जन्सी दिव्याच्या प्रकाशात लुकलुकताना दिसतात.
"अहो, काय हो हे? " अस्मादिकांचा मूर्ख प्रश्न!
दुकानाचा एक आगाऊ नोकर दात विचकतो, "ह्यँ ह्यँ ह्यँ.... तुम्हाला माहीत न्हाय का ताई..... पावरकट हाय आजपासून.... आता रोज दुप्पारच्याला आसंच बसायचं.... " अस्मादिकांच्या फुग्यातली हवाच फुस्स गुल होते! अस्मादिक दाणकन भूतलावर आपटतात!
हाय रे माझ्या ए. सी. विरोधी दैवा! असा कसा तू अवसानघात केलास!! आता मी गारव्याच्या आशेने कोणाकडे पाहू? भर दुपारच्या उकाड्यात जर ए. सी. नाही चालला तर मग त्याला विकत घेऊन काय करणार कप्पाळ??!!

निराशेने घेरलेल्या मनाने मी दुसर्‍या दुकानी जाते. तिथेही तीच तर्‍हा!!! एवढ्या सुंदर, भव्य दालनात कितीतरी कंपन्यांचे ए. सी. मांडलेले असताना सर्व दुकान व दुकानमालक मात्र उकाडा व अंधाराच्या खाईत! काय हा विरोधाभास!! हा हन्त.... हा हन्त.... तेथून वीजमंडळाच्या कार्यालयात धडक मोर्चा..... तिथे तर कर्मचारी जांभया देत, हातातल्या वर्तमानपत्राने स्वतःला वारा घालत आणि आजूबाजूच्या माशा उडवत समस्त जगताकडे तुच्छ कटाक्ष टाकत बसून असतात. "वीज कधी येणार? भारनियमनाचे टाईमटेबल तरी द्या... " अशा सवालांना टेबलवर बसलेल्या माशीच्या सहजतेने उडविले जाते. मम पदरी/ ओढणीत घोर निराशा.....

वृत्तपत्राच्या कार्यालयात तरी आपल्या दु:खाला कोणीतरी वाचा फोडेल ह्या अंधुक आशेने आम्ही एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये डोकावतो. संपादकांसकट सर्व वार्ताहर, कर्मचारी...कोणालाच आमच्या दु:खाची कदर वाटत नाही.
"अहो ताई, तुमच्याकडे दुपारचे चार-पाच तास वीज जाते म्हणून तुम्ही डोकं धरून बसलात, मग ग्रामीण भागातील शेतकर्‍यानं काय करायचं? तिथे तर बारा - बारा तास वीज जाते.... सगळं शेतीचं काम खोळंबतं....किती नुकसान होतं माहीत आहे?" वर्तमानपत्राच्या ग्रामीण पुरवणीचे संपादक गरजतात. अस्मादिकांना उगीचच अपराधी वाटू लागतं. आम्ही वीजबिल नियमित भरतो, खाडे करत नाही, वीजचोरी करत नाही....याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनांना आपला हक्क समजावा....

घरचे लोक ह्याही वर्षी ए.सी. खरेदीचे बेत कॅन्सल करतात. शेवटी ए.सी. चालायला वीज तर हवी ना!

पण अजूनही मी आस सोडलेली नाही.... घरच्या, दारच्या अंधाराला व उकाड्याला कंटाळून जनरेटर बॅक-अप असलेल्या वातानुकूलित मॉल्स व मल्टिप्लेक्सची वाट धरलेली नाही! रोज वर्तमानपत्रांत 'आज तरी भारनियमनाची बातमी देणार का' असे पुटपुटत सर्व निवेदने, जाहिराती, श्रद्धांजल्या नीट कसून वाचणे सोडलेले नाही. न जाणो, कोठे ती बातमी छोट्या प्रिंटमध्ये छापली असली तर......!!!! मन्त्रीबोवांनी कोणत्या तरी भाषणात भारनियमनमुक्तीच्या नव्या आश्वासनांची हवा आमच्या जनतेच्या मनांत भरली असली तर?

तर अशा ह्या वीजलपंडावामुळे हैराण झालेल्या जीवांनो, असे गप्प बसू नका. खेळकर बना! आजच थंड हवेच्या स्थळांच्या सहलीचे बुकिंग करून (बे)जबाबदार अधिकार्‍यांना खो द्या. [मोर्चे, घेराव, धरणी, आंदोलने करून काहीही साध्य होत नाही... म्हणून! ] किंवा माझ्यासारखे लेखनाचे माध्यम स्वीकारून आपल्या घोर आशावादाला साजरे करा! Wink

-- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

शब्दबंध २०१०

२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग

मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली. मी पोलिसांकडे या अन्यायाविरुद्ध तक्रार केली तर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

माझ्या मागील अर्जावर हि प्रतिक्रिया दिली ---

पण मला वाटत कि काही माणस विशेषत: आपले पोलिस अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत.

"वाहतुकीचे नियम पाळणे हा इथला कायदा आहे"

असे बजावण्यात आले.

अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..

हि यांची भाषा !!

हीच भाषा यापुढेही राहील!

मला क्षमा असावी पण पोलिसांनी माझी माफी मागितल्या खेरीज

शहराचे पोलिस/नगरसेवक/मंत्री कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत!

मी या पुढे सायकल चालवण्याशिवाय कुठचेही वाहन या शहरात चालवणार नाही.

इथे काय चालवायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!

व माझ्यावरचा अन्याय मोठ्ठ्याने कर्ण्यावर ओरडून जनतेला सांगेन.

पोलिस/नगरसेवक/मंत्री यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया योग्य मार्गाने मांडावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!

जर अजून दंगामस्ती करून लोकांना आवाज करून उपद्रव केलात तर, आवश्यक वाटल्यास तुमचे लायसन्स जप्त होईल अगर तुम्हाला तुरुंगात टाकले जाईल याची नोंद घ्यावी..
फौजदार

»

असो
अशा कुटनीती व अरेरावीच्या अशा असभ्य भाषेला मी यत्किंचित ही भीक घालीत नाही आणि घालणार ही नाही.
हा देश म्हणजे माझी आई आहे, आणि तो देश, त्यातील शहरं व रस्ते यावर जसा त्यांचा तसाच माझा हि हक्क आहे.
तुम्ही माझे लायसन्स जप्त केले तर मी काय गाडी चालवणे सोडून देईन का?................................................ मी दुस-या शहरात जाऊन बेदरकारपणे गाड्या हाकेन.
हे यांचे माझ्या बरोबरचे वर्तन मी लोकांच्या समोर आणणे हेच मी या वेळी करीत आहे. या साठी माझे लायसन रद्द करीत असतील तर करावे, खुशाल करावे.
तरीही माननीय श्री मनमोहन सिंग साहेब यांनी मला पुन्हा मायेने मार्गदर्शन करावे अशी विनंती मी त्यांचा वयाला मान देऊन करीत आहे. मी माझ्या मोठ्यान बरोबर सल्लामसलत करण्यास व यांची मर्जी संपाद्ण्यास सदैव तयार आहे. मी वाट पहात आहे ती तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियेची
........
तुम्ही उद्धट ठरवलेला
ड्रंकेश गाडीचालनकर

बीटी पोर!

आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय.

आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले.
त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद!

"तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? "

"का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!"

"अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?"

"म्हणजे? मी नाही समजलो... "

"अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय... त्येला दवा-औषध काय लागत न्हाय असं आमचे दादा म्हनून राह्यले...म्हंजे त्ये आसं त्यांच्या भाषनात म्हनाले आसं तुमीच सांगितलं! "

"बरं... मग? "

"तर आता आमची 'ही' म्हनतिया की फुडचं प्वार बीटी प्वारच पायजेल! "

"आँ? "

"आरं भाऊ, तिचं म्हननं जर बीटी वांग्याला कीड, रोग लागत नसंल, दवापानी कराया लागत नसंल तर तसंच मानसाच्या पोराला का नको? मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! "

"अरे बाबा, पण त्याला कायद्यानं मान्यता हवी ना! आणि तेवढं तंत्रज्ञानही विकसित व्हायला हवं! "

" पर कायदा का म्हनून नाकारेल अशी बात? जर त्यानं समद्यांचा फायदा होत आसंल, भलं होत आसंल तर मग कायदा त्या बाजूनंच हवा की हो राव! आन तुमी ते तंत्रज्ञानाचं काय पन सांगू नकासा! फारीनला ते गोरे लोक जर डुप्लिक्येट मानूस बनवून राह्यले तर ह्ये तर येकदम सोप्पं काम हाय! मस्त चार-पाच पोरं झाली की कारभारनी माझं टकुरं खानं बंद करंल!"

"अरे, पण एवढ्या पोरांना तू खायला काय घालणार? त्यांचा कसा सांभाळ करणार? "

"आवं आसं काय बोल्तासा, हायेत की मंग आपली बीटी वांगी, बीटी धान्य आमच्या बीटी पोरास्नी पोसाया....जास्त पोरं म्हंजे शेतात कामास्नी येत्याल, आन आजारी पन पडणार न्हाय.... "

आता आमच्या ह्या शेतकरी भाऊना काय बरे उत्तर द्यावे?

त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?

अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

मिसळपाव बंद होणार----

Crying मिसळपाव बंद होणार----

मग काय करणार ?
स्वयंपाक वेळीच होणार,
मुलांचा अभ्यास होणार
वेळेवर सारे झोपणार,
अन् वेळेवर उठणार,
रिकामे रिकामे वाटणार,
वेळच वेळ उरणार,
आता बाजारात जाणार,
भाजीपाला आणणार,
पिसीची सात सुटणार,
अभ्यास चांगला होणार,
सुयश पुन्हा मिळणार,
आई नाही बोलणार,
कुणी नाही टोकणार,

हे सारे खरे पण ----

नवे मित्र नाही मिळणार,
कविता कुठे टाकणार ?
व्यासपीटाला मुकणार,
दिवस मोठा वाटणार,
रात्र खायला उठणार,
मन रिते रिते होणार,
आनंदाला मुकणार,
कुठे कुठेसे जाणार !
गादया किती तुडविणार !
मग ठाण्याला गर्दी होणार,
तिथे ही रांग लागणार,
मग डाकटर संप करणार,
मोर्चे ते काढणार,
गुगल गुडघे टेकणार,

नि मिसळपाव सुरू होणार .

(आधार ======ओर्कुट )

माझे संत्रापुराण

परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते.

काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते! ना त्या संत्र्याला तो चिरपरिचित सुवास, ना साल काढताना अंगावर - डोळ्यांत हमखास उडणारा व चुरचुरणारा रस....आणि एरवी पटकन सोलून होणारे संत्रे सालीला अंगाभोवती घट्टमुट्ट लपेटून बसलेले. एका झटक्यात साहेबजादे सोलले जाण्याचे नावच घेत नव्हते!

कशीबशी दात ओठ खाऊन ती संत्री सोलण्यात मी यशस्वी झाले मात्र, पण खरी कसोटी तर आता पुढेच होती. एरवी संत्रे सोलले की त्याच्या पाकळ्या आपोआप विलग होत. इथेही त्यांनी असहकार धोरण स्वीकारलेले. पुन्हा एकदा शक्ती देवतेला पाचारण करून मी त्या पाकळ्यांची फारकत केली.
एका बशीत त्या ओढाताणीत रुसलेल्या संत्र्याच्या पाकळ्या रचल्या....एक पाकळी अलगद तोंडात टाकली....आणि माझा चेहरा खरेच प्रेक्षणीय झाला.....
कोणीतरी माझी घोर म्हणजे घोर चेष्टा केली होती. मी जे संत्रे म्हणून खात होते ते संत्रे नव्हतेच मुळी! त्याला ना धड संत्र्याची चव होती, ना मोसंब्याची! ना ते माधुर्य, तजेला, आंबटगोड स्वाद, ना तोंडात रेंगाळणारा ताजेपणा.... हे कसले तरी संत्र्याच्या नावाखाली खपवलेले बेचव फळ होते.
म्हणायला बिया कमी म्हणजे अगदीच क्षुल्लक होत्या आणि आंबटपणा नावालाही नव्हता. प्रत्येक फळाची खास अशी चव ठरलेली असते. संत्रे म्हटले की ते आंबटगोड हे ठरलेले! पण अहो, त्याचा आंबटपणा अपेक्षितच असतो हो! ही तर संत्रे नावाखाली केलेली शुद्ध बेचव फसवणूक होती.

आज सकाळी बाजारात मला नेहमीचा फळ विक्रेता दिसल्यावर मी मुद्दाम मोर्चा तिकडेच वळवला.
"ही स्टिकर्स वाली संत्री म्हणजे काय भानगड आहे रे भाऊ?" माझा सवाल.
समोर हारीने रंग, रूपाने गोमटी दिसणारी स्टिकर्सवाली संत्री मांडून ठेवली होती.
"घ्या ना, ताई, एकदम मस्त, नवा माल आहे. जरा महाग आहे, पण चवीची ग्यारंटी! एकपण संत्रं आंबट निघालं तर पैसे परत!"
अर्थात कालच्या अनुभवाने शहाणी झालेली मी त्याच्या भुरळथापांना बळी पडणारी नव्हते.
"काय रे, खूप खपत असेल नै हा माल?" माझा निरागस प्रश्न.
"कसचं काय ताई, तुमच्यासारखी लोकं घेऊन जात्याती ह्ये असलं फळ. बाकी लोक आपला देशी, गावरान मालच पसंत करतात. परवडत न्हाय ना त्यास्नी! "
" आमच्यासारखी??"
"म्हन्जे गाड्यांमधून फिरनारी हो ताई! तेच लोक अशी स्टिकरवाली फळं नेतात. गरीबांना परवडत न्हाय असला माल. त्यांना देशी फळपण बघा, गोड लागतंय!"
"बरं बरं, मला त्या देशी संत्र्यातली अर्धा डझन चांगली संत्री दे निवडून लवकर! बघ, आंबट निघता कामा नयेत," माझी दमदाटी.
एव्हाना फळ विक्रेता माझ्याकडे "ह्या बाईला काय येड बिड लागलंय की काय" अशा मुद्रेने पाहत असलेला. एवढा वेळ त्याने स्टिकरयुक्त फळांची केलेली भलावण फुकट जाताना बघून त्यालाही कष्ट होणारच की हो! पण 'ग्राहक देवो भव' उक्तीला जागून त्याने मुंडी हालवत, फारसे सवाल न करता मी निवडून दिलेली संत्री एका कागदी पिशवीत कोंबली आणि पैसे खिशात घालून तो इतर ग्राहकांकडे लक्ष देऊ लागला.

मीही हातातल्या पिशव्या सांभाळत, समाधानी मनाने घराचा मार्ग धरला.
कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!

अरुंधती

--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

अहो जरा पेन देता का...

काय करावे .
पेन मागायला काहिना काहिच वाट्त नाहि.
शिक्षिताला पेनाचे मह्त्त्त्व आहे.एक तर माझे पेन ह्ररवतो. त्या चा मला इतक काहि वाट्त नाहि. जितक कोनाला पेन
दिल्यानन्तर परत नाहि मिळाल्ञावर् होतो.मि कितेक वेळा असे पाहिले आहे, महागडे सुट्बुट , टाय घातलेले
माणसे मऴके कपडे असणार्याना पेन मागतात , गरज नसति तर बोलणे देखिल त्याना आवडत नाहि.तो पेन मागताना
' साहेब जरा पेन देता का ' असे म्हणतो . पेन देणार्‍याला आश्चर्य वाट्ते साहेब सारखा दिसणारा मला साहेब म्हणतो.
तो लगेच पेन देतो
(आणी पेन गमावुन बसतो.)
आपन बैंक, बीमा किवा ऑफ़िस गेल्यावर असे कधी तरी होते कि कोणी आपल्याला पेन मागितला नाहि.
कितेकदा असे होते कि माझ्या कडुन पेन घेवुन काम झाल्या नतर तो पेन घेउन जात असतो आंणी आपण कामात
असल्याने आपण पेन गमावतो.