प्रतिक्रिया

इलाहींचा आशीर्वाद...

जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

मंडळी, या ओळी आहेत सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या!

मिपाचे एक सन्माननीय सभासद धोंडोपंत हे त्यांचे अगदी जवळचे स्नेही आहेत. पंतांमुळेच आमचाही जमादारसाहेबांशी परिचय झाला, बातचित झाली. आम्ही आमच्या बोलण्यातून त्यांना आपल्या मिसळपाव या संकेतस्थळाविषयी सर्व माहिती पुरवली. हे ऐकून त्यांना मनापासून आनंद वाटला व त्यांनी मिपाला अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या!

त्यांच्यासारखी असामान्य प्रतिभा लाभलेल्या कलाकारचा आशीर्वाद हा मिसळपावकरता मोलाचा वाटतो!

असो,

आपला,
तात्या.

स्वेच्छानिवॄती

आदरणिय गुरु केशवसुमारांची निवॄती हे प्रकटन वाचले. ते वाचल्यावर म्हणलं चला आपणही प्रयत्न करावा

हा एक प्रयत्न...

टाळले मी ज्या सर्व कवितांना स्मरतो आहे
विडंबकाचे आज मी विडंबन करतो आहे

खर्‍या कवित्वाच्या त्या खोट्या वेटोळ्यातं
आत कुठेतरी विडंबक गुदमरतो आहे

अट्टाहास प्रतिमेतून सुटण्याचा का कळेना
खरच का मी विडंबनाला विटलो आहे

विडंबनातली ती मजाच् सारी निराळि
आठवुन हे सारे कवितेत कुढतो आहे

वॄत्तानुसार गझल विडंबकही करु शकतो
विडंबनाला मात्र मी का डावलतो आहे

मात्रेत कोलांट्याउडया पुर्वी मी ही मारल्या
विडंबनाचा मात्र आज उपहास करतो आहे

प्रतिमेचा पिंजरानव्हे ही खरीखुरी प्रतिभा
नको ते मागणे, नको ती भलावणी का करतो आहे

साद घालते मला खुले आभाळ कवींचे
आज सोनेरी पिंजर्‍यात मी अडकतो आहे

(खिन्नसुमार) चेतन

अवांतरः ह. न. घ्या.

आपल्याला तर बुवा नाही पटत....तुम्हाला काय वाटतं?

काय पटत नाही विचारताय?? साहाजिकच आहे तुमचा प्रश्न! अहो मी बोलतोय आपल्या माय-मराठीवरच्या आक्रमणाबद्दल. हे आक्रमणकर्ते कोण? अहो बघा आजूबाजूला.. दिसले का? हे आक्रमणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. नाही पटत? चला तर प्रत्यक्ष उदाहरणंच पाहू...

दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून.

दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्‍या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते. इतक्या वाईट शिव्या इंग्रजीतून देते, की इंग्रजी कळत असतं तर वाहकानं तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असता.

दृश्य ३ - स्थळ - पाचगणी. दोन लहान मुलांना घेऊन एक जोडपं येतं. मराठी पालक आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती इंग्रजीतून देतात. सांगतात, "दीज आर दि फूटप्रिन्ट्स ऑफ दि पाण्डवाज्...." मुलगा - "हू पाण्डवाज्????"

आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याच मुलांना इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून द्यावी लागावी, हे खरंच दुर्दैवी आहे. हे लहान मुलांशी इंग्रजीतून बोलायचं काय प्रकरण आहे ते नाही बुवा समजलं.

मान्य आहे की इंग्रजी जागतिक भाषा आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर चांगलं भवितव्य आहे वगैरे. पण आपली मराठी जपत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही का??? मी देखील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. मला दिवसभर इंग्रजीतच संवाद साधावा लगतो. पण मी ती इंग्रजी ऑफिसपुरतीच मर्यादित ठेवतो.

मला इतकंच म्हणायचं आहे, की मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं?

(मोरपिशी साडी)

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
उगीच का अत्तर लावतोस?

तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"अत्तर शिंपडलंय या देखाव्यात''
निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं...
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सुगंधाचा कळस!

आहा... !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

बर आहे..., तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम...
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं कोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
न विस्कटता , न कोमेजता!

प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

बदल तर घडतोय...

टीक-टॉक
टीक-टॉक
टीक-टॉक
ठांग!

लोलक,
जागच्या जागी फिरतोय!

लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
ठक्काक!

मानव,
जागच्या जागीच चालतोय!

ठांग!.
ठांग!!..
ठांग!!!...
तरी ..बदल तर घडतोय...

मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं!
अखंड,
अविरत...
अथक!!
बदल तर घडतोच आहे...

क्षणा क्षणाला..कणा कणाने,
वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे!
क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने,
वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे!

एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे,
दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे!
एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे...

पुढे..
मागे..
जिथल्या तिथे!
जिथल्या तिथे..
मागे..
पुढे!!!
काळ कधीचा चालतोय!

पुढे.
पुढे..
पुढे...
इथे असा, तिथे तसा!!
बदल तर घडतोय..

एकाच वेळी..
मागे-पुढे..करत-सरत,
कधी थांबल्या सारखा वाटतोय!
तरी..बदल तर घडतोय...

उच्चतम उधाण बिंदूला स्पर्शून,
समुद्र पुन्हा पुन्हा आहोटतोय!
तरी रेषे रेषेने जलधी वाढतोय!!
बदल तर घडतोय...

डंपर डंपर गारबेज खाली,
सागर तळ झाकला जातोय!
पर्यावरण वादाचा आवाजही गुंजतोय!!
बदल तर घडतोय...

कधी मखरात,
कधी मक्त्यात!
आई
बाई
ताई
सई
म्हणत
रुपा रूपाला बघतोय...

दोन हात
दोन पाय
एक डोकं असलेला..
माणसा सारखा प्राणी,
कधी माणूसही वाटतोय!

बदल तर घडतोय...
बदल तर घडतोय...

======================
स्वाती फडणीस .............. १६-०६-२००८

नटवर

नटवर
.

लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्‍याच जणांना परिचित असेल.
सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्‍हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, Big Grin या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!.

ट्रेन मध्ये शिरल्यावर एक दोन मिनटांतच माझी भूमिका सुरू होते. मी त्या चालत्या बोलत्या रंगमंच्याचा अविभाज्य घटक बनून जाते.
भूमिका रंगमंच हे जरा वेगळं वाटतंय ना?
पण तुम्ही ते माझ्या भूमिकेतून पाहिलंत तर मग तुम्हाला तसं वाटणार नाही. कारण ट्रेन मध्ये माझी भूमिका बर्‍याचदा प्रेक्षकाचीच असते. Rolling Eyes
कधी कधी एखाद्या भूमिकेला दिलेली दाद तिही प्रेक्षक म्हणून... हे लिहीत असताना कितीतरी चेहरे माझ्या नजरे समोरून सरकून जात आहेत. त्यांचे हावभाव अगदी आत्ता घडत असल्यासारखे मला स्पष्टपणे दिसतायत.....मी नुकताच पाहिलेला एक एकपात्री प्रयोग... तो महान अभिनेता विसरणे अगदी अशक्य! Smile

तो एक पाच-सहा वर्षांचा लहान मुलगा असेल ... असेल असे एव्हड्यासाठी की तो मुलगा आहे याची मला बराच वेळ खात्री नव्हती. त्याचा पोशाख मुलांसारखा होता... सैलसर शर्ट, त्याच्या खाली कळपट मळकी पॅन्ट, मोठ्ठे-मोठ्ठे डोळे, धार-धार नाक पातळ नाजूल ओठ, नितळ मुलायम गाल, डोक्यावर तेलानं चापून चप्प बसवलेले लांब केस ..... एकूण चेहरा नाजक होता... तरी आपण त्याला मुलगाच म्हणूया . नाव काय असेल बरं त्याच?
... अं अं...!! हा!!
आपण त्याला नटवर म्हणूया. त्याला इतर कोणतं नाव छे!!![ Not Talking मुळिच नको]

आता कसं तो मुलगा करून बोलण्या पेक्षा नटवर म्हणायला जरा बरं वाटत नाही!!! Smile
तर हा नटवर त्याच्या वया पेक्षा जरा जास्तच धीट... मी ट्रेन मध्येचढल्या नंतर लगेचच्याच स्टेशन वर तो ट्रेन मध्ये चढला. माझ्या समोरच्या सिटवर एक प्रौढ बाई खिडकी शेजारी बसल्या होत्या , तो सरळ त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला "आंटी मुझे खिडकी में बैठना है, थोडा खिसक के बैठो|" Surprise
त्याच्या बोलण्यात जरा सुद्धा भीती किंवा बुजरेपणा नव्हता, त्या बाईंना देखील अशीच नातवंड असवितं! त्यांनी लगेच नटवरला खिडकीतली जागा देऊ केली, तसं ही... लोकल ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहण्यासारखं असतच काय Yawn ? हां! थोडा वारा मिळतो कोण कोणत्या वासांच्या भपकार्‍या बरोबर... नटवरला मात्र खिडकी हवी होती.

त्या बाई, त्यांना आपण सुमन काकी म्हणू ... सुमन काकी जरा बाजूला होताच नटवर लगेच खिडकी शेजारी बसून बाहेर डोकावू लागला. खरं तर ... इथं पासून त्याच्या भूमिकेची सुरुवात झाली. Waiting
तो अभिनय मी अगदी पहिल्या रांगेत बसून पाहतं होते. डब्यात नेहमी प्रमाणे काही फेरीवाले फिरत होते. त्यातली एक फेरीवाली तिच्या टोपलीत चिक्की राजगिर्‍याच्या वड्या, वेगवेगळ्या आकारांचे फ्रयंम, वेफर्स, चिवडे वगैरे वगैरे खाऊ घेऊन आली. नटवर बराच वेळ तिच्या कडे बघून चुळबूळ करत होता.ती फेरी वाली आमच्या सिट जवळ आली तसे त्याने जोरात आपल्या आईला हाक मारली... "मम्मी'' हाक मारताना त्याच्या चेहर्‍यावर एखादी अद्भुत!! नावीन्यपूर्ण!! गोष्ट पाहिल्या सारखे Hypnotized भाव होते.. मग क्षण भर तो अगदी स्थब्द उभा राहिला.....काहीच हालचाल नकरता स्थब्द. कोरा करकरीत Plain Face चेहरा ना आशा ना निराशा ना चिक्की वेफर्ससाठिची इच्छा त्या लगोलग घोर निराशा झाल्याचे भाव त्याच्या चेहर्‍यावर पसरत गेले अधिक अधिक खचत जाणारा नटवरचा चेहरा म्हणजे...जणू केविलवाणेपणाची परिसीमा!! तो इतका दीन बनला... की काय विचारता तोंडाने कळवळल्यासारखे विभ्रम करीत त्याने अर्धवट उघडलेल्या हातांनी याचना करू लागला... तो भिकार्‍याच्या भूमिकेत शिरला होता. हा नटवर आणि त्याची मम्मी, यांच्या मधला दूरून केलेला साभिनय शब्दहीन संवाद... त्याला आजू बाजूच्या बघ्यांशी काही देणे-घेणे नव्हते... किंवा असे म्हणू का?... की त्याच्यासाठी त्याच्या अवती भवति कोणी नव्हतेच,फक्त तो आणि त्याची मम्मी... बस्स! दोघेच स्टेजवर... बाकी सगळी अंधारात दिसतील न दिसतील असे बसलेले प्रेक्षक. त्यांनी फक्त बघत राहाव थक्क होवून किंवा फार फार तर टाळ्या वाजवाव्यात. =D>

नटवर भिकार्‍याच्या भूमिकेत इतका समरस झाला होता की त्याला आधी न पाहिलेला कोणी ही त्याच्या हातावर पैसे टेकवल्या शिवाय पुढे गेलाच नसता इतकं दैन्य अशी याचना आणि भोळा भाबडा चेहरा... त्याला त्या अवस्थेत बघून मी ही बुचकळ्यांत पडले. मगाशी पाहिलेला मुलगा तो हाच की भिकारी , का तो मगाशी धिटाईने इथे येऊन बसलेला भिकारीच होता At Wits End ? तेव्हड्यात त्याच्या मम्मीचा आवाज ऐकू आला ....''आभी चूप बैठं नही तो एक झापड लगाऊंगी'' तो भिकारी नव्हता तो भीक मागण्यासाठी डब्यात चढला नव्हता तो ही आमच्या सारखाच एक प्रवासी होता. Whew!

त्याच्या मम्मीच्या आवाजासरशी त्याने आपला भिकार्‍याचा अवतार तिथेच आटोपता घेतला. हा मुलगा शांत राहणारा नाही! हे आतापर्यंत आम्हाला जाणवले होते. आणि अजून तरी तो शांतच बसला होता. तसं मगाशी खाऊ साठी अगदी भिकार्‍याच्या भूमिकेत ही शिरणारा नटवर भलताच हट्टी ही वाटला होता. पण त्याने हट्ट तरी कुठे धरला... तरी तो आता काय करेल याची Nail Biting धास्ती आम्हाला लागून राहिली होती. मी तर त्याच्या अगदी समोर बसलेले, नाही म्हटलं तरी नजर त्याकडे वळतच होती. आणि मला जाणवलं अरे हा तर आमच्या सिट खाली काहीतरी बघतोय. Surprise त्याच्या चेहर्‍यावर कुतूहल ओसंडून जात होते.... आणि ''माझ्या भिती '' आता त्याचे टार्गेट माझ्या खाली [का Confused मिच ] होते!! नटवर मान वळवून वळवून माझ्या सिट खाली पाहतं होता... त्याला तिथे काहीतरी खास दिसत होते नक्की!! मी माझ्या पायांकडे बघून घेतले, जरा पायांच्या अवती भावती नजर फिरवली पण छे!.. मला तिथे काहीच वेगळे दिसेना, कागदाचे चीटोरे काही शेंगांची टरफले पतर्‍यावरचे मळकट डाग एकूण सगळे काही नेहमीचेच त्यात इतके टक लावून बघण्यासारखे काय असावे?....

नटवर आता अगदी एकाग्र झाला होता. एखाद्या तिरंदाजाने शिकारीच वेध घ्यावा तसा... किंवा अगदी अर्जुना सारखा ... अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसं आता नटवरला माझ्या सिट खाली काहीतरी दिसत होत. तेव्हाची नटवरची तल्लीनता अगदी पाहण्यासारखी होती , जणू तो नजरेनेच ति वस्तू ओढून घेत होता....तेव्हड्यात आणखीनं एका फेरीवालीची रंगमंचावर एंट्री झाली, आणि तिच्या मुळे नटवरची तंद्री भंग पावली. नटवर आता तिच्या दिशेने पाहतं होता त्याला दुसरे टार्गेट मिळाले होते.मनातल्या मनात मी नटवरनी दिला असता तस्सा सुटकेचा सुस्कारा सोडला.... [ Whew! सुटले ] आता आलेली ही फेरी वाली जवाहर खाना घेऊन आली होती. खरंतर नटवरला त्यात काय रस असावा? हे आपल मला वाटल त्याला मात्र त्यात ही स्वारस्य होते त्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीत स्वारस्य होते... खिडकीतून दिसणार्‍या आकाशाच्या तुकड्यात , रुळां पलीकडे वसलेल्या झोपड्यांमध्ये, मागे मागे पळत जाणार्‍या झाडाझुडपात, डब्यात पसरलेल्या कचर्‍यात तस्साच या चमकत्या अंगठ्या कर्ण फुलात . त्याला प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट बघायची होती, पारखायची होती...

माझ्या शेजारी बसलेली एक चिमुरडी या विक्रेतीकडच्या रिंगा बघू लागली, समोरची सुंदरी ही तिला येऊन मिळाली, दोघी जणी मिळून अंगठ्यांच्या बॉक्स मध्ये उचक पचक करत होत्या... चिमुरडीला एक रिंग आवडली '' ये अंगुठी काइसे दी?'' चिमुरडीने विचारले. ''हर अंगुठी का पाच रुपैया..एक ही भाव'' हा संवाद होई पर्यंत नटवर तिथे पोहचला होता. सोनेरी, चंदेरी, ऑक्सिडाईझ खड्यांच्या बीन खड्यांच्या अंगठ्यांची बरीच मोठी रेंज त्या बॉक्स मध्ये होती . नटवर त्यातली एक एक अंगठी उचलून एखाद्या कुशल पारख्या प्रमाणे निरखू लागला... या वेळी तो पारखीच नाही तर त्या मुलींसाठी सल्लागार बनला होता, चिमुरडी किंवा सुंदरीने एखादी अंगठी उचलली रे उचलली की याची प्रतिक्रिया बघावी काय काय तोंड करून तो आपली पसंती नापसंती त्या दोघीनं पर्यंत पोहचवत होता जणू त्या दोघी याच्या सल्ल्यानेच खरेदी करणार होत्या. [ Cool काही पण] सुंदरीला अखेर एक अंगठी पसंत पडली .ऑक्सीडाईझ रिंगवर बारीक उभारदार डिझाइन होते , नटवरला काही ती अंगठी आवडली नाही त्याने नाक मुरडून त्याची नापसंती झटक्यात दर्शवली पण सुंदरीची निवड करून झाली होती ... आता पुठचे काम बर्गीनींग ते ही तेवढेच महत्त्वाचे नाही का! पण आता नटवरला त्यात काही उत्सुकता उरली नाही सुंदरीने त्याचे मार्ग दर्शन न घेतल्यामुळे तो बराच निराश झाला आणि त्या दोन नाठाळ मुलींना सोडून काहीतरी पुटपुटत तो आपल्या खिडकीतल्या जागेवर जाऊअन बसला. तिकडे नटवरचा अभिनय आणि इकडे बार्गिनींग रंगत होतं .

नटवर चा मोर्चा परत आमच्या सिट कडे वळला ...मगाशी तो काही तरी ओढत होता आता ती वस्तू त्याला ओढून घेत होती....कोणी ओढावे आणि आपण प्रतिकार करावा अस काही तरी तो करू लागला हळू-हळू त्याचा प्रतीकार क्षिण पडू लागला आणि अनुराग सिट खाली ओढला जाउ लागला त्याला काही तरी जबरदस्तीने खेचून नेत होते तेव्हाची त्याची असहाता अगतिकता बघण्या सारखी होती आत्ता पर्यंत घडलेल्या गोष्टीं मुळे नटवर काय चीज आहे आम्हाला कळून चुकले होते नाहीतर त्याच्या या अभिर्भावाने आमची नक्कि दाणादाण उडली असती ...
आता नटवर त्या अनामीक शक्तीच्या पुरता आहारी गेला होता त्याचे पाय आमच्या सिटखाली चाले होते आणि मग पुन्हा एकदा नटवर आणी ती अदृश्या शक्ती यांच्यात झटापट सुरू झाली , नटवर स्वत:ला वाचवू पहात होता... आणि त्याच वेळी आणखिन काही तरी ओढत ही होता.....
त्याचे हे चाळे इतके सहज आणि वस्तव वाटत होते की त्याला थांबवाव ओरडाव, रागवाव अस कुणाला सुचलच नाही. आता नटवर बर्‍यापैकी संकटातून बाहेर आला होता आणि त्याने आणखीन काहीतरी आपल्या बरोबर आणले होते. मग सर्व ताकद एकवटून त्याने खाली उडी घेतली....झप्पकन ती वस्तू हातात घेतली आणि तस्साच चपळतेने त्याच्या जागेवर जाउन बसला. तो सर्वांपासून काही तरी लपवत होता, काहीतरी खुप मोल्यावन...ते जर कुणाला दिसल तर आखा जग त्याच्या पाठी लागणार होत त्याच्यावर खुप मोठ्गी जवबदारी होती जगाला Angel वचवाची जवाबदारी! एवढ्या मोठ्या जवाबदारीचा ताण त्या छोट्या जीवावर... कय दृष्या होतते मी काय सांगू अशी दृश्या पहावीच लागतात. खुप वेळ चाललेल्या या संघ्र्शा मुळे नटवर थकून गेला होता थोडावेळ तसाच निपचीत पडल्यावर तो हळू हळू हालचाल करू लागला. त्याचे बंद डोळे उघडले गेले आजू बाजूला पाहून त्याने पुन्हा एकदा त्याच्या सुर्क्षीततेची खात्री करुन घेतली, आणि हलकेच मागे लपवलेले हात पुढे आणले त्याच्या हातात जनू स्वर्ग आला होता .

काय आहे त्याच्या हातात, काय आहे! Waiting
समोर बसलेल्या प्रत्येकाच्या मनानात हे नक्की आल असणार, आता नटवर चे जुळलेले हात पुढे आले होते.
त्याचा चेहरा कमळासारखा खुलला होता.. त्याची नजर हातांच्या बंद शिंपलीवर खिळली होती!
ती शिंपली आणि शिंपलीतला अद्भुत खजाना!
ती शिंपली हलकेच उघडत गेली..... अन त्या शिंपलीच्या उघडण्या बरोबर नटवर चा चेहरा आणखीन आणखीन तेजाळत गेला त्याचे आधीच मोठ्ठे असलेले डोळे आणखीनं विस्फारत गेले!
काय? काय आहे ? त्या शिंपल्यात
माझी उत्सुकता आता भलतीच ताणली गेली होती, डोळे नटवरच्या हातावर खिळले होते. इतकी अधीर मी! नाटवर केव्हा हात पूर्णं उघडतोय आणि मी केव्हा ती वस्तू पहातिये...माझी उत्सुकता ताणत ताणत एकदाची नटवर ची ओंजळ उघडली आणि........... D Oh फूस त्याच्या हातातला एका तुटक्या हिरव्या रंगाच्या बांगडीचा तुकडा मला दिसला. छे!... काय हे !. हा तुकडा बघण्यासाठी का मी एतकी अधीर होते. मला माझेच हसू आले Smile) , आणि नटवर, त्यावर हसू की चिडू काही कळतच नव्हते. तेव्हडी उसंतच कधी दिली त्याने, तो त्याच्या उद्योगात मशगुल होता. त्याने कधी मला सांगितले ये बघ माझ्या हातात काय आहे. मी स्वत: हूनच तर बघत गेले. मग त्या वर का रागावावे?
पण नटवरसाठी तो तुकडा खरंच खूप मौल्यवान होता. खजिन्या इतका मौल्यवान!
तो आता ही मघाच इतकाच खूश होता. त्याच्या चेहर्‍या वरचा आनंद मघाच सारखाच ओसंडून वाहतं होता. आता मी त्याचा चेहरा पाहतं होते त्याचे ते डोळे त्यातली खजिना सापडल्याची चमक अद्भुत... Batting Eyelashes
केवल अद्भुत!!!
किती निरागस आहे हा!!
मी ही कधी अशीच होते नाही का...
माझ्या जवळ ही असाच खजिना होता!!!
नटवर मला माझ्याही नकळत त्या दिवसांमध्ये घेऊन गेला. आता मी मलाच पाहतं होते, काचपाणी खेळण्यासाठी काचांचे तुकडे जमा करणारी मी ,तेव्हा त्या काचा मला खजिन्या इतक्याच प्रिय होत्या नाही का!
आणि काय! काय... होत माझ्या खजिन्यात! चिंचोक्यांचासाठा, गुंजा, पिंपळाची जाळीदार पान, मोरपीस, नदीच्या पत्रातील वेगवेगळे स्फटिक गारगोट्या, गोट्या, फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या आणि काय काय ही तर अलीबाबाची गुहा आहे .
मी अलीबाबाच्या गुहेत हरवणारच होते तेव्हड्यात नटवरने मला खेचून बाहेर काडल.
कुठे आहे मी?
माझा खजिना !
काही क्षण खरंच कळेला त्या सुंदर विश्वातून मी ही एकदम कुठे आले....
समोर नटवर तो मला अस सहजासहजी हरवू देणार नव्हता. अरे आता काय करतोय हा?
थोडा वेळ कौतुकाने न्याहाळून अंजारून गोंजारून नटवर त्या काळजाच्या तुकड्याशी संवाद साधत होता. त्याच्या चेहर्‍यावर नक्की कोणते भाव होते त्यात कौतुक होत, वेदना होती, एक अनिवार्य व्यथा होती, काळजी, असहायता, एक तुटलेपण त्याचे हसरे ओठ आणि पाणावलेले डोळे पाहिले असतेत तर तुम्हाला ही एक अविस्मरणीय अनुभव आला असता आता तो कोणत्या भूमिकेत आहे सांगू शकाल!...............
मला तर माझी आईच आठवली....माझी पाठवणी करतानाची आई !
अरे अरे ... अरे थांब का का टाकतोयस ती काच?
किती चिकाटीने मिळवलेलीस तू तेव्हाचा तो आनंद मी ही न्हाऊन निघाले त्या हसर्‍या क्षणात तू तर अखंड बुडला होतास ना आनंद डोहात मग आता हे का !
हे सगळा मनातल्या मनात.
प्रेक्षकांना स्टेजवरच्या पात्रांशी असाच संवाद साधावा लागतो ना? त्याने तो काचेचा तुकडा खिडकीतून बाहेर काडला होता ..... पण का?
तो ती फुटकी बांगडी फेकून देत होता.... Surprise
'एव्हड्यातच कंटाळा आला का खेळण्याचा ' पण नाही हा कंटाळा नव्हता कदाचित खेळ, जीव घेणं खेळ.... नटवर ही कासावीस झाला होता त्याच्या चेहर्‍यावर ओढाताण स्पष्ट दिसून येत होती .... पिळवटलेल्या अंतःकरणाने त्याने तो काचेचा तुकडा खिडकी बाहेर काडला होता, त्याच अंग एकदम आक्रसून गेलं होत, डोळे गच्चमिटलेले स्स्स...... आता काही तरी भयानक घडणार होतं.
आSSS...............
त्यानं ती काच खिडकीतून खाली सोडून दिली. आ आ अरे!... का? Surprise
आऽऽऽऽ
जणू त्या काचेचीच किंकाळी माझ्या कानात घुमू लागली... आणि ती काच अशी निर्दयीपणे सोडून देणारा नाटक्या माझ्या समोर बसला होता... आता काही क्षणां पूर्वी ती काच त्याचा ध्यास होती, मग साधना, साध्य किती आत्मीयतेने बघत होता तू त्या तुकड्या कडे!
त्या नंतरची ती जीवाची घालमेल .... आणि आणि आताचा हा सुटकारा कोणते भाव खरे?
हे माझ्या डोक्यातले किडे केव्हा आणि कुठे ही वळवळणारे त्याच नटवरला काय तो त्याच्याच मस्तीत मशगुल.....
काचेचा तुकडा खिडकीतून बाहेर टाकतानाचे गच्च मिटलेले डोळे उघडून त्याने दीर्घ सुटकारा सोडला.''चला एक काम झाले.'' चा आविर्भाव
हा बहुतेक एकपात्री प्रयोग होता त्यातला हिरो नटवर व्हीलन नटवर, बाकी सारी पात्र ही तोच...त्यानंतर ही त्याचे काही ना काही चाळे चालूच होते आणि माझं विचार चक्रही! तो काही ना काही करत राहावं आणि मी त्याच्या त्या हालचालींतलं नाट्य अनुभवत राहावं.....
''मम्मी'' त्यानं परत एकदा त्याच्या आईला हाक मारली... दोन्ही हात नमस्कार केल्यासारखे एकमेकांना जोडले आणि कानाच्या दिशेला नेले त्या जोडलेल्या हातांवर मान तिरकी करून अलगद टेकवली आपल्या पापण्या मिटून घेतल्या, तो त्याच्या आईला आपण झोपत आहोत असे सांगत होता! पालीकडून ''सोजा.''.. अस तुटक उत्तर आलं. ती परवांगी घेऊन नटवर त्याच्या जागेवर झोपी गेला. Sleepy

तो खरंच झोपलाय की.... हा ही त्याच्या कोणत्या भूमिकेचाच भाग असणार आहे हे पाहायला आता मी थांबू शकत न्हवते, माझं स्टेशन जवळ येत होत.
मघाचच्या माझ्या आजूबाजूला बसलेल्या बायका, मुली केव्हाच उठून गेल्या होत्या. त्या जागेवर एक टवटवीत मुलगी येऊन बसली! बाकीचे आम्ही सगळे जण शिणवटलेले सैलावलेले दिसत होतो, एक ती सोडून!. ती आताच उठून आवरून आल्यासारखी ताजी तवानी पावडरच्या जाहिरातीतल्या मॉडेल सारखी एव्हर फ्रेश, उत्साहाने सळसळणारी ब्युटी क्वीन माझ्या शेजारी येऊन बसली. नेव्ही ब्लियू कलरचा स्कर्ट त्यावर त्याच रंगाचा कोट, त्या मधून डोकावणारी फिकट निळ्या गुलाबी रंगाची कॉलर हा तर एअर इंडियाचा युनिफॅर्म .. तिची बहुतेक नाइट शिफ्ट असावी, त्या नंतर तिला तसाच पोशाक केलेली आणखीन एक ब्यूटीक्विन येऊन मिळाली!...
डब्यातलं नाट्य असच रंगणार होत... नवे कलाकार स्टेज वर येत होते नवे प्रेक्षक आसनस्थ होत होते मला आता उतरायचं होत मी उठले माझी जागा क्षणार्धात भरली गेली. उतरण्या आधी नटवरच्या मम्मी ला शोधण्याचा प्रयत्न केला.. आता पर्यंत मी तिचा फक्त आवाजच एकला होता तोही अगदी जेव्हड्यास तेवढा, आणि बुरख्यांची ही गर्दी त्यातला कोणता बुरखा नटवरची मम्मी हे काही मला कळू शकले नाही. त्या बुरख्यांकडे आणि नटवर कडे एकदा बघून मी कौतुकाची पावती फाडली..ऽ Kiss अणि उतरले.
नटवरला बरोबर घेऊन! तो माझ्या डोक्यातून कधीच उतरणार नव्हता अगदी आता या कागदावर उतरवे पर्यंत तो माझ्या बरोबरच होता आणी आता हि असेल माझ्याच काय तुमच्या ही बरोबर....
काय होईल त्याच पुढं!... काय बनेल तो? नटवर एक नटसम्राट की नटवर नाटक्या.....गुड बाय आणि गुड लक माझ्या सह प्रवाश्यांनो!..... Wave

..............................................समाप्त
स्वाती फडणीस ............................ २००२

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??

नमस्कार मंडळी,
आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत?

- प्राजु

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)

आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.

मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.

मग आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.

तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.

जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

सस्नेह निमंत्रण (ऋचा)

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय,

सप्रेम नमस्कार,

येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलीच,
ऋचा उपाख्य क्षितिजा

विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा
प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८,
गरवारे कॉलेज समोर
पुणे-४

मुहुर्तः १२ जुलै-२००८
वेळः स. १० वा. १८ मि.

सस्नेह निमंत्रण

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय,

सप्रेम नमस्कार,

येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलाच,
ऋचा उपाख्य क्षितिजा

विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा
प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८,
गरवारे कॉलेज समोर
पुणे-४

मुहुर्तः १२ जुलै-२००८
वेळः स. १० वा. १८ मि.

(आवांतर : मला पत्रिका डकवता येत नाहीये.)