संस्कृती
एक जुनी कविता
प्रेम धर्म वाढवावा
मैत्री धर्म वाढवावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
गोमट्यास शिरि घ्यावे,
अभद्रास पायी तुडवावे
निर्भय प्रतिसाद द्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
नवीन विचार आणावेत,
जुने विचार तपासावे,
विज्ञानाचा ध्यास घ्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
कला दालने समृद्ध असावीत
कवितेंचि रेलचेल असावि
काथ्या कुट कुट कुटावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
मस्तवालावर चालुन जावे,
सताधुंदांना जेरीस आणावे,
लेखणीची समशेर करावि,
उत्तमाचा ध्यास घ्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
अविनाश
म्हणी..
- भाई लोकांच्या सडक छाप म्हणी....
- ................................................
- लेट जावे पण थेट जावे.
- कुटाने केल्याशिवाय फुटाने मिळत नाही.
- जजमेंट फेल तर येरवडा जेल.
- एक फाईट, ससून साईट.
- ज्याला व्हायचंय भाई, त्याला वर जायची घाई.
- जय महाराष्ट्र, बोला स्पष्ट, करा नष्ट
- नडला कि तोडला, आजपर्यंत कुणालाच नाही सोडला.
- दोन पंच आणि एक लंच झाले की भरला दिवस
- मजबूरी का नाम महात्मा गांधी.
- फुकटच घावाल आणि बाप लेक धावलं
- भिकारीकी शादी...लंडनमे खरेदी.
- समझता नहीं बात को, चिल्लाता आधी रात को...!"
- जे जे फुकट ते ते पौष्टिक
- मारवाडी पटांव..गरिबी हटांव
- शेख..तेरी तू देख...!
- अचानक उठला...भिंतीला जाऊन धड़कला...!
- घाल झड़प...कर गड़प...!
- हाती घ्याल...ते घरी न्याल..
- फुलवला पिसारा...मागुन दिसला पसारा...!
- कोण नाय कोनचा.. डाल भात लोनचा
- भेळ वर खेळ
- घेतली सुपारी...भेट दुपारी...!!!
- फोकट का चंदन.. घीस मेरे नंदन
- अटक मटक चवळी चटक.. दिसला धोका सटक ...
- लाख शिवाय बात नाय आन वडापाव शिवाय खात नाय
- हातभर गजरा अन गावभर नजरा
- सुकट घ्यायची नाही ऐपत आणि पापलेट बसलाय दाबत
- संग्राहक.......अविनाश.....
द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे माऊली..
"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली,
"श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!"
"माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्यावर उमटले.
"आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको."
"आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. सतत परोपकारासाठी झटत राहिलास. असा कसा रे तू निर्लोभी? सांग, तुझी एखादी इच्छा सांग पुत्रा."
"जीवनातलं सारं सुख तुझ्या कृपेने मला लाभलंय माऊली. मला आणखी काही नको. पण आज वर मागतोच. आज माझी माऊली माझ्यावर प्रसन्न झालीच आहे तर आज मागूनच घेतो! माते, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तुझी जात्रा भरते आहे. होतील पाचपन्नास डोकी गोळा. दोन तीन दिवस येतील एकत्र आणि जातील पुन्हा आपापल्या मार्गी परत! पोटापाण्यासाठी दूरदेशी गेलेली तुझीलेकरं अजूनही तुला विसरलेली नाहीत आणि मनोभावे एकत्र येऊन तुझी सेवा करीत आहेत हे पाहून ऊर दाटून येतो. पण पूर्वीसारखी जात्रा रंगत मात्र नाही. कुठेतरी काहीतरी उरतंय खरं. आजही पटांगणात माटव उभा राहतो पण तो उभारायला तिसरेच कामगार असतात. एखादा बाबलो गावकार वगैरे तंबाकू मळत लक्ष ठेवून असतो त्यांच्यावर. पण या माझ्या गावची पोरं पुन्हा एकदा या समोरच्या पटांगणात साफसफाई करत अंग धुळीने माखून घेताना पाह्यचं आहे गं मला. माझी ही लाल माती त्यांना बिलगू पाहतेय! तिला आहे अगं ओढ माणसांची. पण मोजक्याच काही पायांचा स्पर्श होतो हल्ली तिला. माझ्या पोरांनीच, सर्व गावकर्यांनीच एकत्र येऊन तुझ्या पटांगणात माटव उभारलेला पाह्यचाय मला आणि त्या माटवाला श्रीफळ बांधून सर्वांसाठी गार्हाणं करून आशीर्वाद मागताना, सर्वांच्या "व्हय म्हाराजा"च्या गजरात मलाही हळूच माझा आवाज मिसळायचाय. द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे गं आई..
माऊली, आज तू या महागड्या साड्यांनी दागिन्यांनी नटतेस, बघून फार बरं वाटतं मनाला. पण या चार महागड्या साड्या नि दागिन्यांपेक्षा, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार दिलेल्या साडीखणांनी तुला नटवायचा आनंद कैकपटीने श्रेष्ठ होता. देवळातली ही दानपेटी आज व्यवस्थित भरते खरी पण या पैशाच्या राशीपेक्षा तुझ्यासमोर पडणार्या त्या खणानारळातांदळाची रासच अधिक जवळची वाटायची. गावातल्या प्रत्येक घरातल्या लेकीसुना येऊन तुझी ओटी भरताना पाहून तुला 'माऊली' का म्हटलं जातं याचा प्रत्यय येत असे. गजरे, फळे, उदबत्त्या यांचा तर खच पडलेला असे पण हल्ली का कोण जाणे निस्तेच त्या पेटीत पैसे टाकून जातात गं लोक आणि पदरी दानाचं पुण्य पाडून घेतल्याचं मनाचं समाधान करून घेतात. पूर्वी दिवसभर लोक येत नि तुझं दर्शन घेऊन जात. तेही कसं सहकुटुंब सहपरिवार. त्या सगळ्या लोकांचे नवस सांगता सांगता मानकरी थकून जात असत दिवसभर. पण दिवसभराचा तो थकवा त्यांचा उत्साह तसूभरदेखील कमी करत नसे! सगळे रात्री दशावताराची वेळ झाली परत त्याच उत्साहाने गोळा होत अंगणात! या उत्साहाला सांप्रत ओहोटी लागली आहे गं. आधीसारखे जात्रा म्हणजे घरातलंच एखादं कार्य असल्यासारखे हल्ली लोक गोळा होत नाहीत. पाचपन्नास डोकी येतात, रीतीप्रमाणे तुझी पूजा करतात आणि प्रसाद घेऊन निघून जातात. त्या पूजेला आता केवळ रिवाजाचा चेहरा उरलाय असं सारखं वाटत राहतं. पण या गावातल्या प्रत्येकाने स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं येऊन उत्साहाने जात्रेत सामील झालेलं पाहायचंय. गावातल्या प्रत्येक सौभाग्यवतीने आपणहून येऊन तुझी खणानारळाने ओटी भरलेली पाहायचीय गं! असा एखादा वर देशील का गं माते?
अजूनही प्रथेप्रमाणे पालखी निघते पण चार गल्ल्यांतून फिरून सावकाश, शांतपणे परत येते. न्हावण घेऊन सगळे आपापल्या कामी जायला होतात रवाना पण त्या ताम्हनातला तो शाळिग्रामसुद्धा निरुत्साही भासतो अगं हल्ली. पुन्हा पूर्वीसारखाच गाजावाजा करत, आरोळ्या ठोकत तुझी पालखी तासनतास गावात मिरवायचीय आणि न्हावणासाठी पुढे पुढे करणार्या पोराटोरांना दामटवायचंय! भजनीमेळेसुद्धा हल्ली असेच अधूनमधून दिसतात कधीतरी. बाजापेटी आणि टाळमृदुंगाच्या तालावर आमचे कदमबुवा नि मिराशीबुवा रंगवायचे तशा भजनांच्या डब्बलबारी रंगत नाहीत हल्ली! रात्ररात्र भजनांत न्हाऊन निघायची. हल्ली लोक ऐकतात भजनं पण ते घरात शीडी नि क्यासेटी लावून. अन देवळाकडेही माटवात ते 'पीकर' मात्र हमखास लागतात. ते लागले जाल्या कळतं गावात जात्रा भरली आहे म्हणून. देवळाकडून थेट खालच्या आळीतल्या घरांकडे ऐकू येणारे भजनांचे स्वर पुन्हा एकदा कानांत भरून घ्यायचे आहेत माते. आमच्या कदम, मिराशी, जोशीबुवांच्या बाजापेटीतलं अन् त्यांच्या त्या टाळमृदुंगाच्या गजरातलं माधुर्य या 'पीकरा'वर वाजणार्या क्यासेटीतल्या न शीडीतल्या गाण्यांत शोधून सापडत नाही अगं. पुन्हा त्या मधुर भजनांच्या माध्यमातून तुझी स्तवनं गायची आहेत, पुन्हा रात्रभर भजनं गात या सभामंडपात सार्या गावकर्यांसोबत जागरणं करायची आहेत. असा एखादा वर देशील का गं माऊली?
नाही म्हणायला दशावतार तेवढे होतात अजूनही जोमाने! पण जमलेली डोकी खेळ संपल्यावर मुकाटपणे निघून जातात. खेळाला मनमुराद दाद देतात, टाळ्या पिटतात, मनसोक्त हसतातही पण पूर्वीसारखा गोंधळ मात्र होत नाही. खरंच तो गोंधळच जास्त प्रिय होता. संकासुराला टाळ्या शिट्ट्यांनी डोक्यावर घेणार्या त्या जनसागरात, राजा यायचा झाला की सुन्न शांतता पसरत असे! तिकडे नाटकात देवांचं नि राक्षसांचं युद्ध झालं की इकडे प्रेक्षकांतही पोरंटोरं आपल्या खेळण्यातल्या तलवारी घेऊन युद्ध सुरू करीत! मग त्यांच्या आईबापाची त्यांना आवरताना होणारी धांदल, त्यांची ती कसरत पाहून आणखी टाळ्या, आणखी हशा! या सगळ्याने दशावताराची रंगत आणखी वाढायची! या दशावतारांतल्या हनुमानास पाहूनसुद्धा आदराने वंदन करणारा आणि पार्वतीला मंचाच्या मागं विडी ओढताना पाहून अचंबित होऊन आरडाओरडा करणारा तो लहानगा श्रीपाद आता तुझ्याकडे त्या दिवसांतली तीच जात्रा मागतोय गं माऊली. हे सगळं हल्ली कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय! जात्रा भरते, पण एखाद्या न रंगवलेल्या चित्राप्रमाणे अपुरी भासते! तीत तेच पूर्वीचे जुने हसरे, उत्साहाचे, मौजमजेचे रंग भरून देशील का गं? द्यायचाच असला तर असा एखादा वर दे माऊली!
पूर्वीच्या जात्रेला केवळ आनंदाचा उत्सव इतकंच स्वरूप होतं. आज या जात्रेचा बाजार केलाय गं. कुणीतरी सरपंच किंवा इतर कुणी राजकारणी वगैरे येतो. तुझ्यासमोर उभा राहून पूजा करतो. नतमस्तक होऊन तुझ्याकडे काय मागतो ते तूच जाणसी. मग तो जमलेल्या गावकर्यांसमोर भाषणं करतो, त्यांना आपल्या मधाळ वाणीने, आश्वासनांनी भुलवतो. आपल्या वाटेला लागतो. निवडणुकांत भरभरून मतं घेतो! आणि गायब होतो. असे कित्येक सरपंच आले आणि गेले पण गावातला रस्ता दर पावसाळ्यात खचतोच. या माझ्या भाबड्या गावकर्यांची तुझ्याएवढीच त्या राजकारण्यांवरदेखील श्रद्धा आहे आणि अजूनही ती अढळ आहे. एकोप्याच्या या आनंदोत्सवाचं बाजारात कधी परिवर्तन झालं ते आठवत नाही. जात्रेला या विदुषकांनी असं बाजाराचं स्वरूप दिलेलं पाहवत नाही गं आई. यांच्या ढोल ताशांच्या कर्णकर्कश गदारोळापेक्षा आमच्या पिपाणीचे नि पळसाच्या शिट्ट्यांचे स्वर किती गोड होते! ते ऐकायला कान आतुर झालेत. द्यायचा तर असा एखादा वर दे गं माऊली! द्यायचा तर असा एखादा वर दे!"
श्रीपादपंतांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. सदर्याच्या बाहीने डोळे टिपून त्यांनी वर पाहिलं तो उजाडू लागलं होतं. सुभद्राकाकू, श्रीपादरावांच्या सौभाग्यवती, दाराकडे उभ्या होत्या नि कुणाला तरी निरोप देत होत्या. आत येऊन त्या म्हणाल्या,
"चला आता, आटपा भराभर. बाबी आला होता सरपंचांचा निरोप घेऊन. आज जात्रेचा माटव उभा करायचा मुहूर्त काढून हवाय त्यांना, कामगारांना काण्ट्रॅक द्यायचंय म्हणे नि देवळात आज सरपंचांची पूजाही आहे. आवरा बघू भराभर.."
"हो. आवरतो गं माऊली" म्हणत त्यांनी सुभद्राकाकूंनाच एक नमस्कार केला. आणि न्हाणीकडे निघाले. सुभद्राकाकू अचंबित होऊन स्वतःशीच पुटपुटल्या "काय हे सुचतंय यांना भल्या पहाटे? बायकोला नमस्कार करताहेत. लेकराला सांभाळून घे गं माऊली!" म्हणत त्यांनी श्री देवी माऊलीस नमस्कार केला!
***** हे लिखाण प्रातिनिधिक नसून संपूर्ण काल्पनिक लिखाण आहे. आजही कोकणातल्या बर्याच गावांतील जात्रांमध्ये पूर्वीसारखंच अखंड उत्साहाचं वातावरण असतं. मात्र काही ठिकाणी वर नमूद केल्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तेव्हा सगळ्याच गावच्या जात्रांचे आनंदोत्सवाचे स्वरूप टिकान उरो दे रे म्हाराजा! (म्हणा - व्हंय म्हाराजा!) *****
भाद्रपदात येती गौरी-गणपती..
हरितालिका:
सखी पार्वतीने शंकरासाठी खुप मोठी तपश्चर्या केली. कितीतरी वर्षे झाडाची पाने खाऊन होती. शेवटी तिच्या ह्या उग्र तपश्चर्येला फळ येऊन शंकर तिला प्रसन्न झाले.यासाठी भाद्रपदेच्या तृतीयेला हरितालिकेचे व्रत असते.
कुमारिका आणि सुवासिनी या दिवशी उपवास करतात. एका चौरंगावर वाळुचे शिवलिंग स्थापले जाते. आजुबाजुला सूर्य चंद्र आणि सखी पार्वतीची प्रतिक्रुती बनवली जाते.चौरंगाच्या आजुबाजुला रांगोळी काढून जागा सुशोभित करतात. पार्वतीला गळ्सरी, कापसाची वस्त्रे वाह्तात.
पूजेसाठी बेल,क्ण्हेर्,केवडा,कमळ धोतरा, अशोक,शमी इ.वेगवेगळ्या प्रकारची पत्री गोळा करुन ती महादेवाला वाह्तात.
पुर्वीच्या स्त्रियांना सहजासहजी घराबाहेर पडता येत नसे; तेव्हा या कारणाने निदान त्यांना निसर्गाशी संवाद साधता येत असे.
पूजा झाल्यानंतर कहाणी वाचली जाते. नंतर आरती होते.रात्री जागरण करतात्.पुन्हा आरती केली जाते.दुसर्या दिवशी दुध पोहे/दही भात /दुध भाताचा नैवेद्य दाखवुन व्रताची सांगता होते.
गणेश चतुर्थी
भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला गणपती बाप्पांचं वाजत गाजत, डामडौलात आगमन होतं. दारात बाप्पांचं औक्षण होतं. केवढं केवढं कौतुक अन् प्रेम त्या बाप्पावर! घरातल्या छोटुल्यापासून ते वयोव्रुध्द आजी आजोबांपर्यत सगळे बाप्पांच्या स्वागतासाठी उत्सुक असतात. आपोआपच सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं.
कितीतरी दिवस खपुन तयार केलेल्या मखरात गणपती बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान होतात.
'गणपती बाप्पा मोरया ' च्या जयघोषात घर दुमदुमुन जातं.
मग वेळ असते बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची.. धीरगंभीर तरीही मुग्ध अशा सूरात पूजा सुरु होते. शंख, कलश , घंटा यांच्या पूजेनंतर बाप्पांची विधीपुर्वक भक्तिभावे प्रतिष्ठापना होते.अथर्वशीर्षाचे पठण होते.दूर्वा, जास्वंदीच्या हारांनी बाप्पांची मोहक मूर्ती अधिकच खूलते. पंचाम्रुत ,पंचखाद्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर नंबर येतो गणेशाच्या आवडत्या मोदकांचा.
आरतीच्या वेळी सगळयात मोठ्ठा सुर कुणाचा लागतो याची चढाओढ सुरु होते. तालासुरात बाप्पांची आरती होते.
रोज खिरापत्,मोदक यांची रेलचेल असते. बाप्पांबरोबर आपल्या सगळ्यांचीही फारच चंगळ असते.
१६ गणांचा नायक, सर्वप्रथम पूजेचा मानकरी, असा तो गणनायक आपल्या सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.!!!
क्रमशः
'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा
भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्या आणि शिकवणार्यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्या परभाषिकांनाही ती मदत करतील. अगदी मराठी मातृभाषा असणार्या, पण चार वाक्यं लिहायला सायास पडणार्या कुणालाही ही पुस्तकं म्हणजे वरदानच वाटावीत.
मुलांसाठी स्वाध्याय-पाठ असं म्हटल्यावर जे नीरस, कंटाळवाणं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं असेल, तशी मात्र ही पुस्तकं अजिबात नाहीत. पुस्तक वापरताना मुलांना मजा यावी म्हणून सर्वत्र दृश्यघटकांचा सढळ वापर केलेला आहे. सरावासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या वाक्यांच्या आणि उतार्यांच्या अनुषंगानं चित्रं, छायाचित्रं यांची सर्वत्र रेलचेल आहे. उदा: लिहिताना होणार्या चुका दाखवताना 'मातृ-कृपा' शब्द चुकीच्या पध्दतीनं लिहिलेल्या खर्या पाटीचं छायाचित्र दिसतं. ज्यांनी यापूर्वी माधुरी पुरंदर्यांची 'वाचू आनंदे', 'आमची शाळा', 'राधाचं घर' वगैरे पुस्तकं पाहिली असतील त्यांना याचा अंदाज येऊ शकेल. संपूर्ण रंगीत असलेला 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंच सुरेख चित्रं आणि सजावट यांनी पानोपानी भरलेला आहे. चित्रं स्वतः माधुरी पुरंदरे यांनीच काढलेली आहेत. बरीचशी छायाचित्रं संदेश भंडारे या ('तमाशा', 'वारी' अशा कामांसाठी गाजलेल्या) गुणी छायाचित्रकाराची आहेत. भाषेच्या स्वाध्यायपाठांमध्ये छायाचित्रं? आणि संपूर्ण रंगीत, देखणी वगैरे पुस्तकं? हे (नसते थेर) कशासाठी? असा (खास मराठी) प्रश्न पडला असेल तर तो या पुस्तकांच्या जवळजवळ क्रांतिकारक म्हणता येईल अशा स्वरुपाशी संबंधित आहे.
पुस्तकांच्या मुखपॄष्ठापासूनच त्यांचं वेगळेपण जाणवू लागतं. निरनिराळ्या पध्दतीचं लिखाण दाखवणारी छायाचित्रं त्यावर दिसतात. त्यात मातीत अक्षरं गिरवणारी लहान मुलं दिसतात, वस्तूंचे भाव लिहिलेला फलक दिसतो, संगणकावर टंकलेली अक्षरं दिसतात आणि ब्रेलमध्ये टोचलेला मजकूरही दिसतो. मोबाईलवरचा एस्.एम्.एस., भांड्यांवर नावं लिहिणं, हातांवर गोंदवून घेणं अशा लिखाणाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं मुखपृष्ठावर दर्शन होतं. त्यावरून पुस्तकाच्या आवाक्याचा अंदाज येतो. पहिलं पान उलगडताच शब्दकोशातल्या 'भाषे'च्या व्याख्या दिसतात आणि विविध विशेषणं वापरून केलेलं भाषेचं (खरंतर भाषाविश्वाचंच) वर्णन दिसतं. मासल्यादाखल हे पाहा - लडिवाळ भाषा, चावट भाषा, क्लिष्ट भाषा, टपोरी भाषा, निर्वाणीची भाषा, गुद्द्यांची भाषा. भाषेच्या सर्वव्यापीपणाचं आणि विविधतेचं दर्शन यातून होतं.
भाषेच्या वेगवेगळ्या अंगांना अनुसरून पुस्तकातल्या धड्यांची रचना केलेली आहे. यामध्ये कालानुरुप भाषेच्या स्वरुपामध्ये झालेल्या बदलांची दखल घेतलेली दिसते. उदा: वर्णमालेच्या प्रकरणात जुन्या बाराखडीऐवजी 'अॅ', 'ऑ'सकटची 'चौदा'खडी वापरलेली आहे. निव्वळ घोकण्यापेक्षा समजून-उमजून शिकण्यावर सर्वत्र भर आहे. उदा: वर्णमाला लक्षात का ठेवायची? तर शब्दकोश, नावांची यादी, संदर्भसूची अशा अनेक ठिकाणी शब्द अकारविल्हे लावलेले असतात; वर्णमाला पाठ नसली तर त्यात हवी ती गोष्ट सापडणार नाही, हे इथं सांगितलं जातं.
मुलांच्या शब्दसंग्रहात आपोआप वाढ होईल अशीही योजना यात आहे. उदा. 'क्रियापदापासून बनलेली नामं' याविषयीच्या मजकुरात बोलणे, लिहिणे यांपासून बनलेल्या परिचित नामांशिवाय बोलवा, लिखाई, लिहिणावळ, लिखावट असे अनवट शब्दही आहेत. कांडप, गाळप, सांगावा अशा शब्दांचा इथे परिचय होतो आणि देयक, आवक-जावक अशा सरकारी शब्दांचाही परिचय होतो. मुलांच्या सहज आकलनासाठी कालानुरुप रुळलेले इंग्रजी शब्द स्वाध्यायांमध्ये वापरलेले आहेत. जसे - सॉस, मोबाईल, इंटरनेट. याबरोबरच नवीन घडलेल्या मराठी शब्दांची ओळख मुलांना होईल अशा पध्दतीनं तेही वापरलेले आहेत. उदा: ‘संकेतस्थळ’.
याशिवाय जाताजाता मुलांचा अनेक गोष्टींशी परिचय होईल अशी रीत पुस्तकाची व्याप्ती आणि उपयुक्तता अधिकच वाढवते. उदा: शब्द अकारविल्हे लावण्याच्या स्वाध्यायामध्ये पुस्तकं नेताना घसरून पडलेल्या मुलाचा प्रसंग आहे. घसरलेल्या मुलाच्या हातातली इतस्ततः विखुरलेली पुस्तकं एका चित्रात दाखवली आहेत. तर स्वाध्याय सोडवण्यासाठी उभी करून नीट ठेवलेल्या पुस्तकांचं चित्र आहे. त्यावरच दिलेल्या जागेत पुस्तकांची नावं लिहायची आहेत. विखुरलेल्या पुस्तकांत 'झेंडूची फुले', 'ऋतुचक्र', 'व्यक्ती आणि वल्ली', 'तराळ-अंतराळ' अशी सगळी खर्या पुस्तकांची नावं आहेत. स्वाध्याय सोडवताना या शब्दांशी आणि पुस्तकांशी मुलांची आपोआपच तोंडओळख होते.
‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेचा पुस्तकनिर्मितीत सहभाग आहे. पुस्तकांचा वापर ग्रामीण, शहरी आणि अगदी परदेशस्थ मराठी मंडळींनाही करता यावा याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्यात वाडा संस्कृती दिसते तसंच मॅक्डोनाल्ड, शॉपिंग मॉलही दिसतात. यात पैठणीचा पारंपरिक माग दिसतो तशा सरपण डोक्यावर वाहून नेणार्या कष्टकरी बायका, पाण्याचे हंडे डोक्यावर ठेवून पाणी भरायला चाललेल्या बायकाही भेटतात. आजच्या तरुणाईच्या सवयीचे 'सही', 'डेंजर' असे शब्द इथे येतात; तसेच चैत्रगौरीचं हळदीकुंकू, दिवेलागण, अंगण सारवणे, पु.लं., बिनाका गीतमाला अशा जुन्या गोष्टीही येतात. मुलं पुस्तकं वापरत असताना एक व्यापक मराठी संस्कृतीविश्व त्यांना त्यामुळे खुलं होईल. अपरिचित गोष्टींविषयी मुलांच्या शंकांना वाव देऊन आणि न्याय देऊन त्यांचं विश्व समृध्द करण्याची थोडी जबाबदारी मात्र शिक्षक-पालकांना त्यासाठी उचलावी लागेल.
पुस्तकांत निव्वळ व्याकरण नाही तर भाषेच्या स्वरुपांचं आणि वापरांचं वैविध्यही उलगडून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थः वृत्तपत्रात मथळे लिहायची भाषा वेगळी असते आणि वृत्तांकनाचा मजकूर लिहायची भाषा वेगळी असते. गोष्टीतल्या वर्णनाची भाषा त्याहून वेगळी असते आणि दोन व्यक्तींमधला संवाद लिहिताना वेगळी भाषा वापरावी लागते. लेखी-बोली अशा अनेक प्रकारच्या भाषांमधला फरक मुलांना जाणवून देणारे पाठ आणि सरावासाठीचे स्वाध्याय पुस्तकात आहेत. इतकंच काय, पोलिसांच्या नोंदीची भाषा आणि तरुणाईची ‘व्रात्य’भाषा असे भाषेचे अनेक नमुने यात पाहायला मिळतात.
भाषेच्या वापरात आजकाल अतिशय विसविशीतपणा आलेला आहे. त्यामुळे होणार्या अनेक गफलती आता आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत, की नक्की बरोबर काय आणि चूक काय हेच अनेकदा कळेनासं होतं. अशा गफलती आणि त्या होण्यामागची कारणं जाणून घेऊन त्या अनुषंगानंही पाठांची रचना केलेली आहे.
अशा सर्व मराठीविषयक मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जाणवणारा पुस्तकांचा एक विशेष गुणधर्म म्हणजे त्यांतून मुलांना खुलं केलेलं मराठीपलीकडचं समृध्द अनुभवविश्व. अमिताभ बच्चन, राज कपूरपासून एम. एस. सुब्बलक्ष्मी, अकिरा कुरोसावा अशा अनेकांचा जाताजाता परिचय होईल अशी सरावपाठांची आणि स्वाध्यायांची मांडणी आहे. एस्किमोचं इग्लू, आफ्रिकन पोषाख, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे मासे अशा जगभरातल्या अनेक गोष्टींचा खजिनाच इथे मांडलेला आहे. हे सर्व भाषेच्या अभ्यासात बेमालूम मिसळलेलं आहे. अपरिचित संस्कृती, निसर्गसृष्टी यांतलं वैविध्य हे अशा रीतीनं आपोआप मुलांच्या समोर येतं; त्यामुळे सरावपाठही सुरस आणि रोचक होतात.
भाषेच्या माध्यमातून नकळत संस्कारही होतील याची काळजी घेतलेली दिसते. उदा: भूकंपाबद्दलच्या उतार्यात बायकांची जिद्द दिसते आणि बरोबर कष्टकरी बायकांची छायाचित्रं दिसतात. भूतकाळाविषयी सांगताना ग्रीक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांपासून कोट-टोपी-धोतरातल्या पुण्यातल्या क्रिकेट संघाच्या फोटोपर्यंत अनेक गोष्टी दाखवत, त्यांच्याविषयी सांगत, जाताजाता हेही सांगितलेलं आहे की आज आपण आणि आपलं जग कशामुळे असं आहे हे कळण्यासाठी भूतकाळाकडे जावं लागतं.
पुस्तकाची मांडणीही मुलांना आवडेल आणि पटकन समजेल अशी आहे. उदा: एखादा स्वाध्याय जर थोडा कठीण असेल तर तिथे एक चिमणी दाखवलेली आहे, तर त्याहून अधिक कठीण स्वाध्यायापाशी एक बेडूक उभा असतो. पुष्कळसे स्वाध्यायसुध्दा कोडी, खेळ अशा प्रकारचे आहेत. उदा. प्रश्न-उत्तरं बनवण्याचा स्वाध्याय म्हणजे भोंडल्याची खिरापत ओळखण्याचा खेळ आहे. यामुळे अभ्यास करायला लागत असूनही तो अजिबातच कंटाळवाणा होत नाही.
पुस्तक रंजक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी दिसणारा मिश्किलपणा. उदा. आज्ञार्थी रचना सांगताना ‘हमखास यशस्वी’ कवितेची पाककृती दिली आहे. तिची मजा कळायला ती मुळातूनच वाचायला हवी. विशेषणांच्या प्रकरणात 'असडीक' तांदूळ यांसारख्या अनवट विशेषणांची ओळख होतेच, पण त्यासाठी वापरलेल्या उतार्यातल्या व्यक्तीला हा शब्द माहीत नसल्यामुळे तिनं त्याऐवजी वापरलेली 'कव्हर न काढलेला' तांदूळ ही रचना वाचून गंमतही वाटते.
स्वाध्याय सोडवण्यासाठी, इतर टिपणं वगैरे नोंदवण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. ‘नोंदी शक्यतो पेन्सिलनंच कर; म्हणजे नंतर त्या खोडून टाकता येतील आणि मित्रमैत्रिणींना किंवा भावंडांना देखील तुझं पुस्तक वापरता येईल’, अशी प्रेमळ सूचनासुध्दा आहे.
लहान मुलांच्या देखण्या पुस्तकांसाठी प्रसिध्द असलेल्या 'ज्योत्स्ना प्रकाशन' या संस्थेनं ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. प्रत्यक्ष सरावपाठांचे दोन भाग आणि एक उत्तरपुस्तिका असा हा संच आहे. पानांवर पुरेशी मोकळी जागा सोडण्यासाठी आणि मोठ्या अक्षरांचा मजकूर मावण्यासाठी पुस्तकांचा आकार नेहमीपेक्षा किंचित मोठा आहे. तरीही पुस्तकसंचाची ४०० रुपये ही किंमत अगदीच वाजवी वाटते. त्यासाठी 'सर रतन टाटा ट्रस्ट'चं आर्थिक पाठबळ प्रकल्पाला लाभलेलं आहे.
एकंदरीत, मराठीविषयी अभिमान आणि आस्था असणार्या कुणीही संग्रही ठेवावीत अशीच ही पुस्तकं आहेत. मराठीच्या नावानं गळे काढणार्या किंवा आपल्या राजकारणासाठी तिला वापरणार्या कुणाहीपेक्षा या पुस्तकांमुळे मराठीचा अधिक लाभ झाला आहे आणि मराठीची मान अधिक उंचावली गेली आहे.
पुस्तकांविषयी लेखिकेचं मनोगत इथे वाचता येईल.
शुभदा चौकर यांनी 'लोकसत्ता'त लिहिलेला पुस्तक-परिचय इथे वाचता येईल.
दूर देशातली जन्माष्टमी
चित्र क्र. १- दही हंडी कशी फोडायची याचा विचार-विनिमय सुरू आहे
चित्र क्र. २-पाया उभारणी
चित्र क्र.३-जवळ-जवळ मिळालीच हातात!
चित्र क्र. ४-फत्ते झाली!
आमच्या कॉलनीशेजारी जी कॉलनी आहे तिथे जवळ-जवळ १२० भारतीय कुटुंबे रहातात (आमच्या कॉलनीत ४०)! त्यातल्या तरुण आणि उत्साही मंडळींनी गेल्या वर्षीपासून दही-हंडीचा कार्यक्रम करण्याचा प्रघात पाडला आहे. शेजारच्या सर्व भारतीयांना निमंत्रण असते. त्यावेळची कांहीं क्षणचित्रे!
बुद्ध व बौद्ध धर्म ..एक टिपणी
बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी
(१) बुद्ध आणि चातुर्वर्ण
(अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो.
(आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई. बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.
(२)बौद्ध धर्म प्रसार
बुद्धाच्या हयातीत फक्त १०५ भिक्षू संघांत सामिल झाले होते. त्यातले ब्राह्मण ३९, क्षत्रिय २८, (बरेचसे त्याच्याच शाक्य कुळातले), उच्चकुलीन २१, व फक्त ८ शूद्र जातीतले. ब्राह्मणातले सुखवस्तूच जास्त, पुरोहित वगैरे नगण्य. बुद्धाच्या हयातीत अस्पृष्यांनी त्याकडे फार लक्ष दिलेले दिसत नाही. ( क्र. ३ पहा.)
(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.
(४) तात्विक फरक
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही. याचे साधे कारण हिन्दू विचारसारणीतली विविधता. तुम्ही कोणताही तत्वज्ञानातला विचार मांडावयाचा ठरवला तर येथील कोणत्या तरी दर्शनात त्याची पुसट का होईना छाया तुम्हाला आढळून येईलच. बुद्ध धर्मातील किती तरी विचार उपनिषदांत दिसतात. डॉ. र्हिस डेव्हिड्स (पाश्चात्यांना बौद्ध धर्माची ओळख करून देणारा, "बुद्धिझम" या ग्रंथाचा लेखक) म्हणतो "" गौतम बुद्ध हा अतिशय शहाणा,विद्वान, थोर पुरुष होता. तो सर्वोत्कृष्ठ हिन्दू होता." दुसर्या बाजूने जगत्गुरू शंकराचार्यांना "प्रच्छन्यबुद्ध" म्हणतात. दोघेही सरळ किंवा आडवळणाने वेदप्रामाण्य नाकारतातच. दोघांनाही पुनर्जन्म मान्य आहे. वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.
(५) डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्म
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला. पण या धर्मांतरात तांत्रिक गोंधळ झालाच. डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
शरद
माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..
माझी कामाठीपुर्यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १
बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी!
समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. 'आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं' असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन!
"आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!"
न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये!
ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! 'सगळं झुगारून निघून जावं का इथून?' हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्या त्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता..
'देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..' या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..!
साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?! 
त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात!
सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला..
मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. 'हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.' एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..!
तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?!
कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्यात शिरलो..
"तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!"
त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं..
सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?!
"प्रारंभी विनती करू गणपती.."
दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती!
'प्रणम्य शिरसा देवं', 'शांताकारं भुजगशयनं.', गणपती अथर्वशीर्ष...' च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या -
महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि
स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा:
अथावाच्य..
आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की! 
ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो... सहीसही ती भूमिका वठवत होतो.. 'काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!' असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?!
'गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..' असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं..
"अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!"
फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..!
गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"? 
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..! 
"धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.." दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?!
सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते..
'अब मुझे जाना होगा..देर हो गई है..' असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला..
अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? 'यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे' - हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..!
निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा...!
तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली?
'आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..' अल्लाजानने माहिती पुरवली..
मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं..
'अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?' मी अलाजानला विचारलं..
"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!"
अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी... सार्या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. !
मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..!
-- तात्या अभ्यंकर.


