मराठी भाषा दिन २०१७: अनुक्रमणिका

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 8:36 pm

1

अनुक्रमणिका

१) भाषा आणि बोली लेखक: अमोल४५७२
(भाषा व बोली परस्पर संबंध याबद्दल लेख)

पूर्वी आदिमानव अप्रगत होता, त्या काळात हातवारे, खुणा करून त्याचं मनोगत व्यक्त करत असे. नंतरच्या काळात तो जसजसा प्रगत होत गेला, शेती करू लागला, गटागटाने राहू लागला, तसतसा हातवारे व खाणाखुणा यापेक्षाही जास्त तोंडाने विविध आवाज काढून व्यक्त होऊ लागला. समान आवाज व चेहऱ्यावरील हावभाव यातूनच पुढे भाषेचा उगम होत गेला.

भाषा ही परस्पर संवादाचं, अभिव्यक्तीचं माध्यम आहे. 'जी बोलली जाते ती भाषा' अन् खरं तर हीच भाषेची मूळ व्याख्या आहे. भाषा ही भूगोल-, समाज-, कालसापेक्ष असते.

२) राजीनामा लेखकः सोन्याबापु
(प्रेमचंद यांच्या कथेचा वर्‍हाडी अनुवाद)


---------------------------------------------------------------------------------
कोन्या बी हापिसातला बाबु हा मुक्या ढोरावानी रायते. तुम्ही कोन्या मजुराले डोये झन्नाऊन दाखवसान तर थो बी थुमचा जांगडबुत्ता कराच्या हिशोबानं हुबा राहिन. एखांद्या कुली ले राग दाखवा, थो बी सरका डोक्श्यावरून वजन फेकून चालू लागन. एखाद भिकाऱ्याले हाडहूड करा, थो बी थुमच्याइकडं एकदम बेक्कार नजर मारून सोताची सडक पकडन. इतलच काय बावा, यखादा चिल्लर लंबे कान अन चार टांगावाला एखादा गधा बी, त्याले शिल्लक परेशान केलं कवा फालतूचा काव आनला त एखाद झम्मन डबल तंगड्याइची लात तुमाले बातच मारून जाईन; पर बिचाऱ्या हापिसातल्या बाबुले थूमी डोये मोठे करून पहा का राग भरा का हाडहूड करा नाईतर ढोरकोंबे हाना, थेच्या माथ्यावर आठी बी पडन नाही. तेचा त्येच्या विकारावर जीतला ताबा राह्यते तीतला त एखाद्या साधू ले बी नसन राजेहो.

३) वोवळां सर लेखिका: पिशी अबोली
(पद्ये बोलीतील हायकू)

१.
माड्यां-सुपार्‍यांनी खेळटे धन,
माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां,
त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण

४) हरनी कवी: ऊध्दव गावंडे
(वर्‍हाडी कविता)

नख्खी नख्खीतुन बोंड
कापसाचं फुललं
पराटीच्या वावरातं
जसं चांदनं सांडलं

५) प्राकृत लेखकः जयंत कुलकर्णी
(प्राकृत भाषांसंबंधी माहिती)

कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही पुढारलेल्या (?) जगातील माणसे पोहोचली नाहीत, तेथील भाषांचा उगम कसा झाला किंवा भाषा ही संवादाचे साधन म्हणून कशी विकसित झाली, याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. उदा. डॅनियल एव्हरेट याने एका जमातीच्या भाषेचा अभ्यास केला. त्याचे ‘डोन्ट स्लीप देअर आर स्नेक्स’ हे पुस्तक वाचण्याजोगे आहे. असो. ज्या भाषा माहीत आहेत, त्यांचे वर्गीकरण चार खंडांमध्ये करता येते. एक - आफ्रिका खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, दोन - युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, तीन - प्रशांत महासागर खंडात बोलल्या जाणाऱ्या व चार - अमेरिकन खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा.

६) पुणेरी कसे बनाल लेखिका: सपे-पुणे-३०
(पुणेरी मराठीत लेख)

पुणेरी मराठी भाषा, पुणेरी माणसांचे स्वभाव, पुण्याचे रस्ते, पुण्याची रहदारी, पुण्यातील दुचाकी आणि दुचाकी चालक, पुणेरी दुकानदार आणि गिर्‍हाइक अशा अनेक विषयांवर मिटक्या मारत, कुत्सितपणे चर्चा केली जाते. पुण्याला, पुणेरी माणसांना आणि तत्सम पुणेरी गोष्टींना नावं ठेवायचं काम पुण्याबाहेरील मंडळीच करतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे - न्यूनगंड! स्वतःला 'पुणेरी' बनता न आल्याने निर्माण झालेली कमीपणाची भावना! म्हणतात ना - कोल्ह्याला द्राक्षं आंबट, तसंच काहीसं. अर्थात यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा. 'पुणेरी' कसं व्हायचं, याविषयी ना कसला मार्गदर्शन वर्ग, ना कसले पुस्तक. गुरुवर्य पु.ल.नी पन्नास वर्षांपूर्वी ह्या विषयावर मार्गदर्शनपर काही लिखाण केलं. पण कालौघात ते सगळे नियम तंतोतंत लागू होत नाहीत. म्हणूनच आम्ही हे बनवायचं काम मनावर घेऊन एक नवीन पुस्तक लिहिलं आहे- 'पुणेरी कसे बनाल?'

७) जिता असल्याचा दाखला लेखक: मित्रहो
(वर्‍हाडी कथा)

लय जुनी नाही, आता आताचीच गोष्ट हाय, २०४७ सालातली. देशाले स्वातंत्र भेटून शंभर वर्षे झाले. या शंभर वर्षात जमाना बदलला. आजकाल जेथ तेथ अंगूठा लावा लागते. बँकेतून पैसे काढाचे हाय - लावा अंगूठा, मत टाकाच हाय - लावा अंगूठा, कंट्रोलच सामान उचलाच हाय - लावा अंगूठा. मोठाला साहेब असू द्या नाहीतर गावातला पोट्टाबाट्टा असू द्या, अंगूठा लावण्यापासून कोणी सुटला नाही. बंदे अंगूठाछाप झालेत. माणसाहून अंगूठ्याचच महत्त्व वाढलं, म्हणूनच तर अंगूठ्याले लय जपा लागते. जमानाच तसा खराब हाय. रस्त्यान जाता जाता कोण कोठ कसा अंगूठा लावून घेइन सांगता येत नाही. शाम्याबी अंगूठ्याले लइ जपत होता. बारावी पास होतवरी अंगूठा तोंडातच ठेवत होता. मंग त्यान अंगूठ्याले मोजा शिवून घेतला. ते चांगल दिसत नव्हतं,

८) वोवळां लेखिका: प्रीत-मोहर
(कोंकणी लेख)

आमकां गोंयकारांक फुलांचे-झाडांचें- परमळाचें खूब पिशें. आमी जगांत खंयय वचून रावूं, आंगणात चार तरी परमाळिक फुलांकंद, तुळस बी रोयतातच. आनिक एक म्हळ्यार वास नासलेली पिशी आनी रतन आबोलेचेय ४ तरी रोपे जायच. हाका हांव कशें फंट थारायतलें? म्हाकांय सुगंधाचें खूब्ब पिशें. ह्या पिश्याचे मूळ म्हजे गांव, घर आनी घरची मनशां.

९) जागृत लेखकः सूड
(बाणकोटी कथा)

तं झाला काय, सगलीकडना काय बायशा बातम्या येईत. आज ह्या गावातला पोर पलवून बाटवलीन, उद्या त्या गावातल्या ल्येकीबालीला उचलून न्हेलीन. सगल्या गावात निस्ता भय, कंदी काय व्हयल त्याजा पत्त्या नाय. येका येलं त्या घुआगरातनं का कायशी बातमी आली, का म्हनं समुंद्रावरना लोका येईत आनि रोज नंदर ठेवीत, यकांदी बरी दिसनारी पोर न्हेईत आनि लांब दर्यात फेकून देईत. वान्या-बामनाच्या पोरी दिसाय कशा आप्सरंसार्‍या!! सगल्या भितीन् गारटून गेलंल्या. येकदोगीनी होरंत उडी मारलंनी. तिकडनं आमचा गाव काय तसा लांब नाय हो, काय समाजलांव!!

१०) चड्डाळलेला हैदोस लेखक: अ‍ॅस्ट्रॉनाट विनय
(बुलढाणा घाटी बोलीत कथा)

राऊतवाडीतली राऊत बाई आज भलतीच खुशीत होती. बऱ्याच दिवसाच्या मेहनतीचं फळ आज तिच्या समोर चमकत होतं. गेला मह्यनाभर उठता बसता, चालता बोलता, दिवसा रात्री, हे करतांना अन ते करतांना तिनं नवऱ्याचं जिणं हराम केलं, तव्हा कुठं त्यानं तिले चपलाहार घेऊन देला. कधी एकदा हार घालून बायायसमोर मिरवते आसं तिले झालं होतं. ती रात्र तिनं कशीबशी तळमळत काढली. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. सकाळचे सगळे कामं तिनं भरभर आटपले. नंतर पावभर पेंडखजूर, दुधात भिजवलेले बदाम अन साताठ अंजिरं आसा किरकोळ फराळ करून स्कूटी वर टांग टाकली अन महादेवाच्या मंदिरात पळाली.

११) हरसाल कवी: स्वामी संकेतानंद
(झाडीबोली कविता)

मंग असी गरमी वाहाडत जाते
मंग असा संध्याकाडी पाऊस पडते
मंग असे बत्तर बायेर पडतेत
मंग असे कावरल्यावानी करतेत

१२) इमान (विमान) लेखक: चुकलामाकला
(मालवणी कथा)

"रे मायझया, हय इमान उतारला बघ." कानातली काडी भायर काढत पांडगो बोललो. "खय ता?" म्हणून बाबल्यान वळान बगल्यान आणि बगीतच रवलो. "इमान नाय हवाइसुंद्री म्हण." मसूरकरांचा शुभला पार्लरातसून भायर पडत होता. केसांची बट बोटात खेळवत खेळवत, पांडगो आणि बाबल्याकडे न बगता, ता निघान गेला. नेहमी उलटा होय. गावातल्या समस्त भगिनी वर्गाकडे कावळ्यासारखे वळून वळून बगणारी ती दोगा शुभल्याकडे कधी ढुंकूनही बगत नसत. तसा त्येच्याकडे कोणच बगी नाय .

१३) दुरपदा लेखकः जयंत बा शिम्पी
(अहिराणी कथा)

मना मामाना गावमा एक डाव असं घडनं. मी तवयं धाकला व्हतू.पन मना मामा , मना दोस्त व्हता. रातले, मी मामाना जोडे जपाले जाये. तवय मना मामा माले रोज गावमा काय काय घडनं, ते सम्दं सांगे. मामाले चावयानी भलती गोडी व्हती. मामीले आयकाना भलता कटाया व्हता. म्हनिसन माले गावमा काय काय भानगडी चालु शेतस त्या बठ्ठा समजे.

१४) फोनाफोनी लेखकः चिनार
(वर्‍हाडी कथा)

"हालो ... बापूसायब बोलून ऱ्हायले का जी?"
"हा मंग... कोन बोलून ऱ्हायलं?"
"आहो मी.... मी पद्मा बोलून ऱ्हायली."
"पद्मा?" बापूसायबाले कायबी टोटल लागेना.
"वळखलं नाय का?"

१५) तांबडी माती लेखकः समीर१२३४५६
(मालवणी कथा)

संध्याकाळच्या टायमाक दाजी एकटोच आपलो शाळेत जाणार्‍या पोरांकडे बगीत व्हतो, तितक्यात थय जोश्यांकचो दामोदर इलो, आणि तेनी दाजीक हटकल्यातन. “अरे दाजी हय काय करतयं, थडे आवसं वाट बगता, जा जा बेगीन जा, नायतर परत भडाकतली.” तसो दाजी उठलो, आणि घराकडे परातलो. घराकडे आवस वाट बघतच व्हेती.

१६) हा सब झाला त कसा झाला? लेखकः स्वामी संकेतानंद
(झाडीबोली लेख)

"जा रे पोट्ट्याइवा, गवऱ्यायसाटी सेन जमा करून आन्जान."
माय असी बोलावसीन अना आमि घमेले, गंज्या घेऊनसन्यारि धावत निंगावसीन. मोहल्ल्यातले बाकिचे पोट्टे बी संगासंग चलत. आमी दुसऱ्या गावी रायत होतून. येति काइ आमच्या गाइभसी नोहोत्या. त्या सब आमच्या वस्तीवाल्या गावी. अना त्या जमान्यात गॅस बी पोवचला नोहोता. तं चुलीवर सब रांधा लागे. मंग गोवऱ्या बी लागत.

१७) आठोन कवी: संदीप डांगे
(वर्‍हाडी कविता)

जवा जवा मायी आठोन यीन तुले
तवा या अक्शराईत पायजो मले
उलसाक आठोलो तं भूलजो मले

१८) आमुशा लेखक: सचिन७३८
(हुबळी, शिकारपूर मैसूर बोलीत कथा)

‘ना नीन्न बिडलारे’ फिलम बगासाटी तना सुरेश टाकीजमंदी जारलता. सैतानचे फिलम बगुवा मसून लई रोजने तचे मनात होते. जारले टायमात गरचे “भिशील बे” मसून मसून धांदला करून सोडले व्हते. बगिटले तर तना सा वाजताचेनाच टाकीजला जाऊन सोडनार ओता. गरचे तला मस्कीरीमदी “रात्रीचे १२ वाजताचे बरूबर ओते शो” मसून मटलेसनीच तंना हायकी मनाला लागून घून सोडून १२ ला निगाला ओता.

.
१९) येवां, कोंकण आपलांच आसां! लेखिका: सुरन्गी
(कोंकण रेल्वेतील दर स्टेशनात बदलती कोकणातील भाषा)

'काही नवे करताना' बऱ्याच वेळा कोकण रेल्वेने प्रवास करावा लागला. अगदी सुरुवातीला पॅसेंजरनेच येणे-जाणे व्हायचे. अगोदर दादर-रत्नागिरी पॅसेंजरने आणि नंतर दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने. प्रत्येक स्टेशनमध्ये चढणारे आणि उतरणारे लोक असत, त्याच्या बोलीभाषेत फरक होत जाई. त्यातच कामानिमित्त आलेले महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकही असत. त्यांच्या भाषेत ते मराठी मिसळून बोलत किंवा त्याच्या भाषेतील शब्दसाधर्म्यामुळे पण अर्थातील फरकामुळेही गमती होत. बारा मैलांवर भाषा बदले, त्यामुळे बोलीभाषेचे बरेच नमुने प्रत्येक वेळी पाहायला, ऐकायला मिळाले. त्यातले काही मराठी भाषादिनाच्या निमित्ताने इथे देत आहे.

.
२०) मई लेखकः ऊध्दव गावंडे
(वर्‍हाडी कविता)

नाल्या काठचं साजरं
असं वावरं मईचं
वानं म्हनूनं पीकाची
नाई पळतं कईचं

.
२१) मुंबईचा बस्ता लेखकः बबन ताम्बे
(पुणे जिल्ह्यातील ग्रामीण बोली)

मारुतराव आज लय कावला होता. आलटुनपालटुन कधी तो पंजावर मुठ आपटत ओसरीवर अस्वथपणे येरझार्‍या घालत होता, तर कधी उंबर्‍यावर बसुन तांबारलेल्या डोळ्यानी आढयाकडे पहात होता. शिरपतरावानी आज त्याच्या शेपटावर पाय दिला होता. छबुरावनी रस्त्यावरुन जाताना डोकवलं आणि नेहमीप्रमाणे मारुतरावला रामराम केला. मारुतराव फक्त तोंडातल्यातोंडात पुटपुटला. छबुरावने ओळखलं की काही तरी बिनसलंय. छबुराव डायरेक्ट घरात घुसला.

.
२२) सोरो लेखकः राजेन्द्र बर्वे
(चित्पावनी बोलीतील कथा)
.
२३) मगेल्या मोगाचो गांव लेखिका: यशोधरा
(कारवारी कोंकणीत लेख)

आमी लहान भुरगी आशिल्ली, तेंन्नाच्यान गोयंच्यो गजाली ऐकतालीं. घरात गजाली सुरु जाल्यार कित्येंय एक निमतांन गोयांबद्दल उलवणी जातालीच. गोयां याद आयली ना, अशे जाले नां! तशे कारणानं गोयां वचूचेपैलीच मगेल्या मनां(त) गोयंचे अशे एक सुंsssदर अशे चित्र उभें राविल्ले. गोयंचो निसर्ग, गोयंची मनशा, तांगेले मायेस्तपण, समुद्र, माड, फुलां, फडफडीत नुस्तें हे तर जालेंच, पुणि ह्या सगळ्या गजालींत शांतादुर्गेली याद काडली ना, अशी गजालीसुद्धा माका याद ना!

.
२४) सौदा लेखिका: स्नेहांकिता
(कोल्हापुरी कथा)

वडगाव (बुद्रुक), कारखानावालं, आसलं जंक्शन नाव वडगावला कुणी दिलं, कुणाला ठावं. यष्टीच्या बोर्डावर काय ते मावत नव्हतं. तालुक्याला जाणाऱ्या शेवटच्या यष्टीनं गावकुसाबाहेर पडताना झाम्मदिशी यू टरन घेतल्याबरुबर यष्टीच्या लायटीचा उजेड नदीकडच्या उतारावरच्या देशी बारच्या दरवाजातून आत शिरला आन भिताडापशी वळीनं मांडल्याल्या बाटल्या हिरकणीसारक्या झागमाग करून गेल्या. यष्टीनं जणु धक्का दिल्यागत लगोलग मावळतीकडनं साकर कारकान्याचा भोंगा भ्यां करून आरडाय लागला.

.
२५) ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखणं लेखकः मित्रहो
(वर्‍हाडी चित्रपट परीक्षण्/लेख)

माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर व्हाचं होतं? आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास.

.
२६) सुतंत्रम् लेखकः श्री. नागलिङ्गम् सोक्कनाथन्
(तंजावर मराठीत कथा)

काल चिम्मी कोंतकी एक पुस्तक वांचत बसलोती. मध्ये मजंकडे, “बाप्पा, ब्रिटीश लोकं अत्तापणीं हायेंत का?” मणूँ विचारली.
“ऑफकोर्स, हायेंत की. अस्का विचारलीस?”
“नाई, १९४७मध्ये अमाला सुतंत्रम् मिळ्लं, तम्माच अमी तेनास अग्गिदनांसींइनं मारूँ टाकलं असंल की मणूँ मला वाटलं...”

.
२७) इचारं लेखकः सचिन७३८
(हुबळी, शिकारपूर, मैसूर बोलीभाषा)

‘अप्पण्णम्मा, टप्पण्णम्मा’ धाकटा इशालं तंचे आतीसोबत खेळरलते. आतीबी इशालबरूबर खेळतानी धाकटी व्हलरती. बाजूकडे थोरला दर्शनं भोरा-दोरी घिउनं फिरूवाचेले कोसिस करलेयताय. जरागडी कोसिसं करूनं तंला हायकी भोरा फिरवालाचं ईनसारके हून बसले. मागूटने तंना की मोट्याने हाका माराला सुरू करूनगून सोडला. ‘ए आती, भोरा फिरचना गा’ मसून. आती तला मटली, ‘खेळाला आले नई तर ठून येजा, जरागडी उगीच बसा आता’.

.
२८) चव नै न ढंव नै सोंगाडी लेखिका: आर्या१२३
(अहिराणी कथा)

शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.

1

वाङ्मयभाषासाहित्यिकलेखसंदर्भप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Feb 2017 - 7:41 pm | यशोधरा

हे बेष्ट झालं.
अशीच शशकचीही टॅब करा प्लीज. बर्‍याचश्या वाचल्या पण नाहीयेत अजून.

कवितानागेश's picture

27 Feb 2017 - 1:12 am | कवितानागेश

आता शेअर करता येईल लिंक.

वाल्मिकी's picture

27 Feb 2017 - 3:41 am | वाल्मिकी

निषेध
नगरी कथा ?

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 9:30 am | संदीप डांगे

कं झालं रं बाला?

मित्रहो's picture

28 Feb 2017 - 7:50 am | मित्रहो

पैसाताइ, अजयाताइ या लेखमालेशी संबंधित सर्व व्यक्तींचे आभिनंदन आणि आभार. मराठीतील सर्व बोलीभाषांचे एकत्रित असे डाकुंमेंटशन याआधी खचितच झाले असेल. मिपासारख्या संस्थळामुळेच आज हे शक्य झाले. तेंव्हा हा उपक्रम असाच सुरु असू द्या.

वर्धा नागपूर भागातली वऱ्हाडी, वऱ्हाड प्रांतातली बशेल हाय, करेल हाय वाली वऱ्हाडी, जळगाव भुसावळची अहीराणी, पुणे ग्रामीण (नगरी ग्रामीण), कोल्हापुरी, झाडीबोली, कोकणातली बदलनारी भाषा, कारवार कोकणी, गोय कोकणी, पद्दे, चितपावनी, बाणकोटी, मालवणी, मेैसूर बोलीभाषा, तंजावरची मराठी साऱ्या भागातली भाषा आली.

काही राहीले ते म्हणजे सातारा सांगली ग्रामीण, नाशिकच्या भागातली भाषा. तसेच मिपावर मातब्बर असूनही 'मायची कटकट त्याले का लागते बे आता रपारप कथा आणि कविता हाणीतो ' असे म्हणनारा भेटला नाही.

प्रमोद कोनकर's picture

14 Mar 2017 - 2:58 pm | प्रमोद कोनकर

या प्रतिक्रियेत लिहिलेला खचितच हा शब्द योग्य नाही. क्वचितच असा शब्द तेथे हवा. (मराठीशी संबंधित संकेतस्थळ आहे, म्हणून ही प्रतिक्रिया लिहिली आहे.)

या उपक्रमाने खूप खूप आनंद दिला. मिसळपावचे आभार !

खफ वर लिहुन आले ते वाहून जाईल म्हणून इथे ही लिहिते. या लेखांच्या लिंक्स माझ्या मराठीच्या प्राध्यापकांना आणि शाळेत अतिशय सुंदर शिकवणार्‍या मराठी च्या शिक्षकांना पाठवल्या. त्यांच्याकडून कौतुकाची थाप आली. हे मुद्दाम इथे सांगावं वाटतय.

लेखमाला नेहमीप्रमाणेच छान रंगली आहे. या वर्षी लेखांची संख्यादेखील वाढली आहे. तसेच नवनवीन लेखक लिहिते झाले आहेत ही चांगली गोष्ट आहे. संयोजकांचे, लेखकांचे आणि सर्व संबंधितांचे कौतुक आणि आभार.

संजय पाटिल's picture

28 Feb 2017 - 10:42 am | संजय पाटिल

अतिशय स्तुत्य उपक्रम!!!

१९२० च्या आसपास ग्रिअरसन नामक ब्रिटिश अधिकारी भारतभर फिरला, आणि जागोजागच्या स्थानिक बोलीभाषांचे रेकॉर्डिंग करून त्याने ते सेव्ह केले. तत्कालीन अनेक भाषांचे सँपल आयतेच ऐकता येईल, मस्त प्रकार आहे. मराठीचेही खूप प्रकार आहेत, ते सर्वही ऐकायला तितकेच भारी वाटतात.

टीपः त्यातली पुणेरी मराठी अगदी स्टिरिओटिपिकल नाकातली आहे. वर्‍हाडी, मद्रासकडली, इ. सर्व बोलीही अगदी तश्शा विशिष्ट प्रकारच्या आहेत. बोलीभाषांच्या लेखात हे अ‍ॅडवावे हे लक्षातच आले नव्हते, असो. आता देर आये दुरुस्त आये.

http://dsal.uchicago.edu/lsi/Language/Indo-Aryan-southern-group

प्रमोद कोनकर's picture

14 Mar 2017 - 2:59 pm | प्रमोद कोनकर

मिपाच्या संकेतस्थळाला नुकतीच भेट दिली. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं लिहिलेले लेख वाचले. कथा चांगल्या वाटल्या. त्यामध्ये बाणकोटी बोलीतील कथा आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेत बोलल्या जाणाऱ्या या बोलीचं दक्षिण भागातील संगमेश्वरी बोलीशी साम्य आहे.

बोलीभाषेतून लिहिणार्‍यांसाठी सुवर्णसंधी

1

सूड's picture

20 Jul 2017 - 7:58 pm | सूड

मंडळ आभारी आहे.