मुक्त कविता

कळले तुजला?

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
28 Dec 2021 - 8:23 am

कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...

विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?

मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??

मुक्त कविताकवितामुक्तक

चिंब

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Dec 2021 - 3:08 pm

वृक्ष जसा -
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो

बाण जसा-
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो

मंत्र जसा -
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो

अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो

ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो

मुक्त कविताकविता

मालाडचा म्हातारा...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 9:40 pm

म्हातार्‍याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा

म्हातार्‍याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती

म्हातार्‍याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग

म्हातार्‍याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती

मुक्त कविताकविता

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 10:23 am

वेड असो वा प्रिती
वसंतात मने जुळती
पण, प्रणय उचंबळून येता
हा दोष कुणाचा साथी?

हरखुन सळसळणारे
हास्य आपुल्या गाली
अलवार सांगते तेव्हा
संगित नाचते ताली

नवनीत क्षण सरण्यापूर्वी
पाकळी पाकळी मखमली
रूतलेल्या हुंकारांना
अंधारात सुलगव खुशाली

खुलती सुगंध कायेचे
कोवळी फुले सु'मनाची
स्वप्नांचे पंख पांखरुनी
सजणूक दे फुलोर्‍याची

* येथून सु'डंबण प्रेर्ना

गुलमोहर मोहरतो तेव्हाप्रेम कविताफुलपाखरूभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितालाल कानशीलविडम्बनशृंगारस्पर्शशांतरसप्रेमकाव्य

तुझे गाणे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
12 Dec 2021 - 11:51 am

मी पाऊस झालो सखे
तू माती होशील का?
स्पर्शाने माझ्या अलगद
तू सुगंध होशील ना?

मी दरीत येऊन पडलो
तू वारा होशील का?
शीर्षासन करून मग मी
जग पायाखाली घेईल ना.

तू रात्र अबोली हो ना
मी चंद्र सखा तुज भेटेल.
तू पहाट होशील तेव्हा
मी तुझ्याच कुशीत झोपेन.

सुख बिंदू झेलायला
तू गवताचे पाते हो ना.
आयुष्याच्या धक्क्यांना मग
मी अलगद सोशीत जाईल.

जरी विस्कटली घडी जीवनाची
तू अशीच हसरी राहशील?
मी वचनाने मज बांधून घेतो
हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

प्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

ऐसे ऐकिले आकाशी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Dec 2021 - 11:06 pm

(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"

(२) पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"

मुक्त कविताकविता

B.1.1.529

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
29 Nov 2021 - 9:10 pm

मश्गूल मानवा
थेट डिवचून
हताश करून
पुरे मास्कवून
ज्ञानविज्ञानाला
कुंठित करून
जुन्या गृहितांना
निष्प्रभ करून
चाकोर्‍या आडाखे
मोडून तोडून
कल्पने पल्याड
पायंडे पाडून
वाटले गेला तो
कायम निघून...

गनिमी काव्याने
माघार घेऊन,
अस्पष्ट, दुरून,
कोण हे बोलते?
"पुन्हा मी येईन"
"पुन्हा मी येईन"

मुक्त कवितामुक्तक

किनखापी आभाळाने

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Nov 2021 - 4:30 pm

किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र

मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र

थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र

रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र

जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?

मुक्त कविताकविता

गाथा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Nov 2021 - 12:10 pm

तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला

भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ

त्याची बहीण मुक्ताई
सार्‍या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ उल्लंघून जाय

"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे

गाथा रक्तात भिनते
गाथा वज्रलेप होते
शब्द रोकडे बोलत
पुन्हा पुन्हा पछाडते

मुक्त कविताकविता

वाडा

मार्कस ऑरेलियस's picture
मार्कस ऑरेलियस in जे न देखे रवी...
25 Oct 2021 - 1:38 am

जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती
शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती ||

इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे
वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे ||

कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली
कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली ||

सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली
संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली ||

फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी
एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी ||

मुक्त कवितासमाज