आस्वाद
प्रेम
"प्रेमाची व्याख्या कशी करशील?" मी मैत्रिणीला विचारलं
एक जण आत्मविश्वासानी म्हणाली - "सोप्प आहे प्रेम अथांग समुद्रासारखं असतं. सर्व चूका पदरात घेणारं. परमेश्वराच्या कृपेसारखं"
दुसरी जरा अवखळ होती, म्हणाली "शुचि प्रेम मला झर्यासारखं वाटतं ग. येणार्या वाटसरूला निर्मळता बहाल करणारं, सदोदीत खळखळून वहाणारं."
ह्म्म .... माझं काही या उत्तरांनी समाधान झालं नाही.
पुढे काही मैत्रिणींनी देखील अशीच उत्तरं दिली - कडक उन्हात सावली देणार्या वृक्षासारखं परोपकारी तर कुणी म्हटलं शीतल चांदण्यासारखं.
मी ठरवलं व्यक्ती तितक्या प्रेमाच्या व्याख्या.
पण मग माझी प्रकृती कशी? माझं का समाधान होत नव्हतं कोणत्याच व्याख्येनी? मला जी तीव्रता, अनिवार आकर्षण, इच्छा , प्रेमाची स्वतःमधे सर्वस्व विलीन करून टाकण्याची ताकद हे प्रेमाचे पैलू कळत होते त्यावर कोणाच कवीनी काही लिहीलं नव्हतं की माझं वाचन कमी पडत होतं? नक्कीच माझं वाचन कमी पडत होतं.
मधे काही काळ .... खूप काळ गेला ज्यात मला प्रेमाला उपमा मला रुचेल अशी उपमा माहीत नव्हती.
समुद्र, झरा, झाड, चांदणं या उपमा मला रुचत नव्हत्या.
पण एक गंमत झाली - कारमधून फिरायला जात असताना माझ्या मुलीनी तिला आवडणारं एक "कन्ट्री सॉन्ग" लावलं. जे मी ऐकलं आणि परत लावलं, परत लावलं, परत परत परत लावत राहीले इतक्या वेळा की नवरा म्हणाला "काय हे कितीदा ऐकणारेस? काहीतरी आपलं चळ लागल्यासारखं!"
हा हा .... मला चळच लागला होता. कारण मला प्रेमाची चपखल व्याख्या सापडली होती.
जॉनी कॅश चं हे ते गाणं "रिंग ऑफ फायर"-
Love is a burning thing
And it makes a fiery ring
Bound by wild desire
I fell into a ring of fire .....
I Fell Into A Burning Ring Of Fire
I Went Down, Down, Down
And The Flames Went Higher
The Taste Of Love Is Sweet
When Hearts Like Ours Meet
I Fell For You Like A Child
Oh,But The Fire Went Wild
अतिशय इन्टेन्स आणि सु-रे-ख गायलेलं हे गाणं आहे एकेकाळी टॉप वर असलेलं. जरूर ऐका.
सखा राजगड : भाग -२
------------------------------------------------
कशा ना कशावर बसून संक्रांत येते,रथसप्तमीपासून सुर्यनारायण आपल्या घोड्यांचा वेग कमी करतात,दिवस लांबडा होत जातो आणि रात्र आकसत जाते. गडावरचं गवत आता पिवळं पडायला लागतं,सगळ्या पायवाटा अगदी लख्ख दिसायला लागतात. उन्हं कळाकळा तापायला लागतातं,मधूनच एखादी वावटळ येते,गवत्,काडी-कचरा आपल्याभोवती भोवर्यासारखी गरागरा फिरवते.दिवसभर अंगाची अगदी काहीली होते,संध्याकाळमात्र थंडगार वार्याच्या झुळका घेउन येते.
यावेळी आपण बालेकिल्ल्यावर असावं,तोरण्यामागं बुडणारा सुर्यनारायण इथंनं बघावा,संधीप्रकाशात घटकाभर तिथंच बसून रहावं आणि मग मुक्कामावर यावं. अगदी पहाटे उठून बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापाशी यावं,समोर सुवेळीच्या मागं उगवणारा सुर्य बघावा आणि अगदी हरखून जावं.

सुर्योदयाच्या वेळी सुवेळामाची

सुर्योदय
वैशाख सरत येतो,परत पावसाची चाहूल लागते,तसा तो अधून मधून आपले चौघडे ताशे वाजवत असतोच.मृगाच्या आसपास संध्याकाळी बालेकिल्ल्यावर यावं, तोरणा आणि राजगडाच्या मधल्या डोंगराच्या धारेवरून ढ्गांची लाट हळुवार फुटत असते. धुपाचा धूर संथपणे पसरावा तसे ढग फुटत असतात्,पसरत असतात. तोरणा ढगांचच मुंडास डोक्याला बांधून असतो. त्यातूनसुद्धा त्याची बुधलामाची अधनंमधनं डोकावत रहाते.एकाएकी तोरण्यावरचे ढग पांगतात आणि सुर्यनारायण बुडताना दर्शन देतो.

ढगांच मुंडासं बांधलेला तोरणा

ढगांच्या फुटणार्या लाटा आणि तोरण्यामागे बुडणारा सुर्य
पुन्हा एक ऋतूचक्र सुरू होतं,या सगळ्या ऋतूत राजगड पुन्हा-पुन्हा बघायचा आणि अनुभवायचा. राजगड म्हणजे एका दिवसात उरकणारी गोष्टच नाही. इथं यायचं ते २-३ दिवस मोकळे काढूनच आणि जाताना हृदयात भरून न्यायचा राजगडाचा सहवास !
असा माझा सखा, राजगड !

'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा
भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्या आणि शिकवणार्यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्या परभाषिकांनाही ती मदत करतील. अगदी मराठी मातृभाषा असणार्या, पण चार वाक्यं लिहायला सायास पडणार्या कुणालाही ही पुस्तकं म्हणजे वरदानच वाटावीत.
मुलांसाठी स्वाध्याय-पाठ असं म्हटल्यावर जे नीरस, कंटाळवाणं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं असेल, तशी मात्र ही पुस्तकं अजिबात नाहीत. पुस्तक वापरताना मुलांना मजा यावी म्हणून सर्वत्र दृश्यघटकांचा सढळ वापर केलेला आहे. सरावासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या वाक्यांच्या आणि उतार्यांच्या अनुषंगानं चित्रं, छायाचित्रं यांची सर्वत्र रेलचेल आहे. उदा: लिहिताना होणार्या चुका दाखवताना 'मातृ-कृपा' शब्द चुकीच्या पध्दतीनं लिहिलेल्या खर्या पाटीचं छायाचित्र दिसतं. ज्यांनी यापूर्वी माधुरी पुरंदर्यांची 'वाचू आनंदे', 'आमची शाळा', 'राधाचं घर' वगैरे पुस्तकं पाहिली असतील त्यांना याचा अंदाज येऊ शकेल. संपूर्ण रंगीत असलेला 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंच सुरेख चित्रं आणि सजावट यांनी पानोपानी भरलेला आहे. चित्रं स्वतः माधुरी पुरंदरे यांनीच काढलेली आहेत. बरीचशी छायाचित्रं संदेश भंडारे या ('तमाशा', 'वारी' अशा कामांसाठी गाजलेल्या) गुणी छायाचित्रकाराची आहेत. भाषेच्या स्वाध्यायपाठांमध्ये छायाचित्रं? आणि संपूर्ण रंगीत, देखणी वगैरे पुस्तकं? हे (नसते थेर) कशासाठी? असा (खास मराठी) प्रश्न पडला असेल तर तो या पुस्तकांच्या जवळजवळ क्रांतिकारक म्हणता येईल अशा स्वरुपाशी संबंधित आहे.
पुस्तकांच्या मुखपॄष्ठापासूनच त्यांचं वेगळेपण जाणवू लागतं. निरनिराळ्या पध्दतीचं लिखाण दाखवणारी छायाचित्रं त्यावर दिसतात. त्यात मातीत अक्षरं गिरवणारी लहान मुलं दिसतात, वस्तूंचे भाव लिहिलेला फलक दिसतो, संगणकावर टंकलेली अक्षरं दिसतात आणि ब्रेलमध्ये टोचलेला मजकूरही दिसतो. मोबाईलवरचा एस्.एम्.एस., भांड्यांवर नावं लिहिणं, हातांवर गोंदवून घेणं अशा लिखाणाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं मुखपृष्ठावर दर्शन होतं. त्यावरून पुस्तकाच्या आवाक्याचा अंदाज येतो. पहिलं पान उलगडताच शब्दकोशातल्या 'भाषे'च्या व्याख्या दिसतात आणि विविध विशेषणं वापरून केलेलं भाषेचं (खरंतर भाषाविश्वाचंच) वर्णन दिसतं. मासल्यादाखल हे पाहा - लडिवाळ भाषा, चावट भाषा, क्लिष्ट भाषा, टपोरी भाषा, निर्वाणीची भाषा, गुद्द्यांची भाषा. भाषेच्या सर्वव्यापीपणाचं आणि विविधतेचं दर्शन यातून होतं.
भाषेच्या वेगवेगळ्या अंगांना अनुसरून पुस्तकातल्या धड्यांची रचना केलेली आहे. यामध्ये कालानुरुप भाषेच्या स्वरुपामध्ये झालेल्या बदलांची दखल घेतलेली दिसते. उदा: वर्णमालेच्या प्रकरणात जुन्या बाराखडीऐवजी 'अॅ', 'ऑ'सकटची 'चौदा'खडी वापरलेली आहे. निव्वळ घोकण्यापेक्षा समजून-उमजून शिकण्यावर सर्वत्र भर आहे. उदा: वर्णमाला लक्षात का ठेवायची? तर शब्दकोश, नावांची यादी, संदर्भसूची अशा अनेक ठिकाणी शब्द अकारविल्हे लावलेले असतात; वर्णमाला पाठ नसली तर त्यात हवी ती गोष्ट सापडणार नाही, हे इथं सांगितलं जातं.
मुलांच्या शब्दसंग्रहात आपोआप वाढ होईल अशीही योजना यात आहे. उदा. 'क्रियापदापासून बनलेली नामं' याविषयीच्या मजकुरात बोलणे, लिहिणे यांपासून बनलेल्या परिचित नामांशिवाय बोलवा, लिखाई, लिहिणावळ, लिखावट असे अनवट शब्दही आहेत. कांडप, गाळप, सांगावा अशा शब्दांचा इथे परिचय होतो आणि देयक, आवक-जावक अशा सरकारी शब्दांचाही परिचय होतो. मुलांच्या सहज आकलनासाठी कालानुरुप रुळलेले इंग्रजी शब्द स्वाध्यायांमध्ये वापरलेले आहेत. जसे - सॉस, मोबाईल, इंटरनेट. याबरोबरच नवीन घडलेल्या मराठी शब्दांची ओळख मुलांना होईल अशा पध्दतीनं तेही वापरलेले आहेत. उदा: ‘संकेतस्थळ’.
याशिवाय जाताजाता मुलांचा अनेक गोष्टींशी परिचय होईल अशी रीत पुस्तकाची व्याप्ती आणि उपयुक्तता अधिकच वाढवते. उदा: शब्द अकारविल्हे लावण्याच्या स्वाध्यायामध्ये पुस्तकं नेताना घसरून पडलेल्या मुलाचा प्रसंग आहे. घसरलेल्या मुलाच्या हातातली इतस्ततः विखुरलेली पुस्तकं एका चित्रात दाखवली आहेत. तर स्वाध्याय सोडवण्यासाठी उभी करून नीट ठेवलेल्या पुस्तकांचं चित्र आहे. त्यावरच दिलेल्या जागेत पुस्तकांची नावं लिहायची आहेत. विखुरलेल्या पुस्तकांत 'झेंडूची फुले', 'ऋतुचक्र', 'व्यक्ती आणि वल्ली', 'तराळ-अंतराळ' अशी सगळी खर्या पुस्तकांची नावं आहेत. स्वाध्याय सोडवताना या शब्दांशी आणि पुस्तकांशी मुलांची आपोआपच तोंडओळख होते.
‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेचा पुस्तकनिर्मितीत सहभाग आहे. पुस्तकांचा वापर ग्रामीण, शहरी आणि अगदी परदेशस्थ मराठी मंडळींनाही करता यावा याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्यात वाडा संस्कृती दिसते तसंच मॅक्डोनाल्ड, शॉपिंग मॉलही दिसतात. यात पैठणीचा पारंपरिक माग दिसतो तशा सरपण डोक्यावर वाहून नेणार्या कष्टकरी बायका, पाण्याचे हंडे डोक्यावर ठेवून पाणी भरायला चाललेल्या बायकाही भेटतात. आजच्या तरुणाईच्या सवयीचे 'सही', 'डेंजर' असे शब्द इथे येतात; तसेच चैत्रगौरीचं हळदीकुंकू, दिवेलागण, अंगण सारवणे, पु.लं., बिनाका गीतमाला अशा जुन्या गोष्टीही येतात. मुलं पुस्तकं वापरत असताना एक व्यापक मराठी संस्कृतीविश्व त्यांना त्यामुळे खुलं होईल. अपरिचित गोष्टींविषयी मुलांच्या शंकांना वाव देऊन आणि न्याय देऊन त्यांचं विश्व समृध्द करण्याची थोडी जबाबदारी मात्र शिक्षक-पालकांना त्यासाठी उचलावी लागेल.
पुस्तकांत निव्वळ व्याकरण नाही तर भाषेच्या स्वरुपांचं आणि वापरांचं वैविध्यही उलगडून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थः वृत्तपत्रात मथळे लिहायची भाषा वेगळी असते आणि वृत्तांकनाचा मजकूर लिहायची भाषा वेगळी असते. गोष्टीतल्या वर्णनाची भाषा त्याहून वेगळी असते आणि दोन व्यक्तींमधला संवाद लिहिताना वेगळी भाषा वापरावी लागते. लेखी-बोली अशा अनेक प्रकारच्या भाषांमधला फरक मुलांना जाणवून देणारे पाठ आणि सरावासाठीचे स्वाध्याय पुस्तकात आहेत. इतकंच काय, पोलिसांच्या नोंदीची भाषा आणि तरुणाईची ‘व्रात्य’भाषा असे भाषेचे अनेक नमुने यात पाहायला मिळतात.
भाषेच्या वापरात आजकाल अतिशय विसविशीतपणा आलेला आहे. त्यामुळे होणार्या अनेक गफलती आता आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत, की नक्की बरोबर काय आणि चूक काय हेच अनेकदा कळेनासं होतं. अशा गफलती आणि त्या होण्यामागची कारणं जाणून घेऊन त्या अनुषंगानंही पाठांची रचना केलेली आहे.
अशा सर्व मराठीविषयक मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जाणवणारा पुस्तकांचा एक विशेष गुणधर्म म्हणजे त्यांतून मुलांना खुलं केलेलं मराठीपलीकडचं समृध्द अनुभवविश्व. अमिताभ बच्चन, राज कपूरपासून एम. एस. सुब्बलक्ष्मी, अकिरा कुरोसावा अशा अनेकांचा जाताजाता परिचय होईल अशी सरावपाठांची आणि स्वाध्यायांची मांडणी आहे. एस्किमोचं इग्लू, आफ्रिकन पोषाख, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे मासे अशा जगभरातल्या अनेक गोष्टींचा खजिनाच इथे मांडलेला आहे. हे सर्व भाषेच्या अभ्यासात बेमालूम मिसळलेलं आहे. अपरिचित संस्कृती, निसर्गसृष्टी यांतलं वैविध्य हे अशा रीतीनं आपोआप मुलांच्या समोर येतं; त्यामुळे सरावपाठही सुरस आणि रोचक होतात.
भाषेच्या माध्यमातून नकळत संस्कारही होतील याची काळजी घेतलेली दिसते. उदा: भूकंपाबद्दलच्या उतार्यात बायकांची जिद्द दिसते आणि बरोबर कष्टकरी बायकांची छायाचित्रं दिसतात. भूतकाळाविषयी सांगताना ग्रीक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांपासून कोट-टोपी-धोतरातल्या पुण्यातल्या क्रिकेट संघाच्या फोटोपर्यंत अनेक गोष्टी दाखवत, त्यांच्याविषयी सांगत, जाताजाता हेही सांगितलेलं आहे की आज आपण आणि आपलं जग कशामुळे असं आहे हे कळण्यासाठी भूतकाळाकडे जावं लागतं.
पुस्तकाची मांडणीही मुलांना आवडेल आणि पटकन समजेल अशी आहे. उदा: एखादा स्वाध्याय जर थोडा कठीण असेल तर तिथे एक चिमणी दाखवलेली आहे, तर त्याहून अधिक कठीण स्वाध्यायापाशी एक बेडूक उभा असतो. पुष्कळसे स्वाध्यायसुध्दा कोडी, खेळ अशा प्रकारचे आहेत. उदा. प्रश्न-उत्तरं बनवण्याचा स्वाध्याय म्हणजे भोंडल्याची खिरापत ओळखण्याचा खेळ आहे. यामुळे अभ्यास करायला लागत असूनही तो अजिबातच कंटाळवाणा होत नाही.
पुस्तक रंजक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी दिसणारा मिश्किलपणा. उदा. आज्ञार्थी रचना सांगताना ‘हमखास यशस्वी’ कवितेची पाककृती दिली आहे. तिची मजा कळायला ती मुळातूनच वाचायला हवी. विशेषणांच्या प्रकरणात 'असडीक' तांदूळ यांसारख्या अनवट विशेषणांची ओळख होतेच, पण त्यासाठी वापरलेल्या उतार्यातल्या व्यक्तीला हा शब्द माहीत नसल्यामुळे तिनं त्याऐवजी वापरलेली 'कव्हर न काढलेला' तांदूळ ही रचना वाचून गंमतही वाटते.
स्वाध्याय सोडवण्यासाठी, इतर टिपणं वगैरे नोंदवण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. ‘नोंदी शक्यतो पेन्सिलनंच कर; म्हणजे नंतर त्या खोडून टाकता येतील आणि मित्रमैत्रिणींना किंवा भावंडांना देखील तुझं पुस्तक वापरता येईल’, अशी प्रेमळ सूचनासुध्दा आहे.
लहान मुलांच्या देखण्या पुस्तकांसाठी प्रसिध्द असलेल्या 'ज्योत्स्ना प्रकाशन' या संस्थेनं ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. प्रत्यक्ष सरावपाठांचे दोन भाग आणि एक उत्तरपुस्तिका असा हा संच आहे. पानांवर पुरेशी मोकळी जागा सोडण्यासाठी आणि मोठ्या अक्षरांचा मजकूर मावण्यासाठी पुस्तकांचा आकार नेहमीपेक्षा किंचित मोठा आहे. तरीही पुस्तकसंचाची ४०० रुपये ही किंमत अगदीच वाजवी वाटते. त्यासाठी 'सर रतन टाटा ट्रस्ट'चं आर्थिक पाठबळ प्रकल्पाला लाभलेलं आहे.
एकंदरीत, मराठीविषयी अभिमान आणि आस्था असणार्या कुणीही संग्रही ठेवावीत अशीच ही पुस्तकं आहेत. मराठीच्या नावानं गळे काढणार्या किंवा आपल्या राजकारणासाठी तिला वापरणार्या कुणाहीपेक्षा या पुस्तकांमुळे मराठीचा अधिक लाभ झाला आहे आणि मराठीची मान अधिक उंचावली गेली आहे.
पुस्तकांविषयी लेखिकेचं मनोगत इथे वाचता येईल.
शुभदा चौकर यांनी 'लोकसत्ता'त लिहिलेला पुस्तक-परिचय इथे वाचता येईल.
आपणाला दुसर्याचा नवरा आवडतो का?
सध्या मिपावर खूप विनोदी चर्चा चालू आहेत. त्यात गंभीर म्हणा विचारप्रवर्तक म्हणा. एक वेगळा विषय.
बर्याच दिवसांनी आमचे बायकोबरोबर (नेहमीप्रमाणे) परत एकदा भांडण झाले. आज सकाळी मिपावर आलो आणि हा विषय सुचला
विषयाचे नाव आहे.
आमचा रिकामटेकडा धंदा एक छिद्रान्वेष.
भांडण मिटल्यानंतर,(आता हेसुद्धा नेहेमीचंच) बायकोने(आमच्या) काही दुसरया बायकांच्या (आमच्या नव्हे ,दुसरया माणसांच्या), आमच्या वतीने मुलाखती घेतल्या.
आम्ही स्वत: अशा प्रकरच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला असता तर या धाग्याचा प्रसव असंभव झाला नसता का?
मात्र दुसर्या बायकांशी झालेल्या चर्चेतून काही निष्कर्ष निघू शकला नाही. कारण प्रत्येक बाईचं मत, दर दुसरया मिनिटाला बदलत होतं. जणू काही मतपेटीतून बाहेर पडणार्या आणि कल सेकंदासेकंदाला बिघडवणार्या मतपत्रिकाच .
पण आमचं मत बुडापासून हलवणार्या काही गोष्टी या मुलाखतीतून समोर आल्या
तर
जी ज्या संसारात आहे तिथे ती काही सुखात नाही.आणि बायकांना दुसर्याच्या व्यवसायासारखा, शेजारणीचा नवरा अधिक चांगला वाटतो . अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. थोड्या ओव्या,थोड्या शिव्या मिळवणारं.
आपणही विचार मांडा आपण ज्या नवर्याबरोबर संसार करतात त्याच्यावर खुश आहात का आपणाला दुसरीचा नवरा आवडतो.
पॅराडाइज नाऊ
नॅब्लूस हे पॆलेस्टाईनमधील एक शहर. सैद आणि खालेद हे त्या शहरात एकत्र वाढलेले जिवाभावाचे मित्र. सुहा ही सैदची मैत्रीण. तिचे वडील इस्रायलविरुद्धच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले. परंतु पॅलेस्टाईनबाहेर वाढलेली सुहा आहे मध्यममार्गी!
मूळात मोटर मेकॅनिक असलेल्या सैद आणि खालेद यांची तेल अवीववर आत्मघातकी हल्ला करण्याच्या मोहिमेवर निवड होते. मोहिमेला निघण्यापूर्वीचा शेवटचा दिवस ते आपल्या कुटुंबियांसमवेत घालवतात, त्यांना ह्या मोहिमेबद्दल कसलीही चाहूल लागू न देता! सैदला सुहाच्या शांतताप्रिय, मध्यमार्गी विचारांचा अंदाज येतो. त्याच्या मनात किंचित चलबिचल होते पण तो तसे दाखवून देत नाही.
सरहद्द ओलांडून ते पलीकडे जातात. परंतु, इस्त्रायली सुरक्षादलांना सुगावा लागल्यामुळे त्यांची पहिली मोहिम फ़सते आणि त्यांना परत यावे लागते.
खालेद आपल्या अड्ड्यावर परततो पण सैदचा पत्ता लागत नाही. त्यामुळे त्यांच्या म्होरक्यांचा गैरसमज होतो की, सैद पळपुटा आहे. पण खालेदला सैदबद्दल विश्वास आहे. तो सैदला शोधायला निघतो. आणि त्यात त्याची भेट होतो सुहाशी. सुहा त्यालादेखिल हिंसाचार हाच एकमेव मार्ग आहे काय असा प्रश्न विचारते.
दुसया दिवशी ते पुन्हा जातात. पण आता सैदचा हल्ला करण्याचा विचार पक्का आहे तर खालेदला सुहाचे म्हणणे पटले आहे!
आपल्यावरील अन्यायाची तड लावण्यासाठी आत्मघातकी हल्ला हे उत्तर नाही, हे त्याला कळते. तो सैदला समजावण्याचा प्रयत करतो. परंतु, सैद ऐकत नाही. अर्ध्या मोहिमेवरून खालेद परत येतो आणि सैद तसाच पुहे जातो. अंगावर, कपड्याखाली स्फ़ोटके भरलेली. त्यांचा रिमोट कंट्रोल हातात घेऊन सैद तेल अवीवमधील बसमध्ये चढतो.
चित्रपटाचा शेवट मोठा आगळा!
सैद बसमध्ये बसला आहे. बसमध्ये आजूबाजूला सर्वत्र इस्रायली नागरीक आणि सैनीक आहेत. त्याच्या अंगावर स्फ़ोटके आहेत. हातात रिमोट कंट्रोल आहे. कॅमेरा हळू हळू त्याच्या नजरेवर स्थिर होतो. तसाच काही काळ जातो आणि चित्र हळू हळू धूसर होत होत चित्रपट संपतो.
सैद ती बस उडवतो की पकडला जातो, याचे उत्तर चित्रपट देत नाही. उत्तर शोधण्याची जबाबदारी दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर सोडली आहे!
***
चित्रपट पाहून झाल्यावर लक्षात येते की, अजूनही बर्याच प्रश्नांचा भुंगा डोक्यात फ़िरतो आहे. अन्यायाची तड लावण्यासाठी कोणते मार्ग अधिक श्रेयस्कर आहेत? हिंसेचा अवलंब हाच एकमेव मार्ग आहे का? चित्रपट संपतो पण हे प्रश्न संपत नाहीत.
चित्रपटाचे सहनिर्माते अमिर हरेल हे इस्रायली ज्यू. त्यांच्याच शब्दात -
"First and foremost the movie is a good work of art," Harel said. "But if the movie raises awareness or presents a different side of reality, this is an important thing."
अनेक अनुत्तरीत प्रश्न डोक्यात भरवून घ्यायचे असतील तर, हा २००६ चा गोल्डन ग्लोब विजेता चित्रपट जरूर पहा.
आपणाला दुसर्याचा व्यवसाय आवडतो का?
नमस्कार मंडळी,
सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय.
बर्याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्याच्या बायकोसारखा दुसर्याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा.
आपणही विचार मांडा. आपण जो काही व्यवसाय करतात त्यात खुष आहात का आपणाला दुसर्याचा व्यवसाय आवडतो.
मेंदूतला माणूस - पुस्तकपरिचय
नुकतेच 'मेंदूतला माणूस' हे पुस्तक वाचले. मला ते फारच आवडले.
लेखकांनी म्हटल्याप्रमाणे मेंदूचे कार्य कसे चालते हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले नाही. पण माणसाचा विचार करण्याची पध्दत, वर्तणुकीमागचा कार्यकारणभाव समजावून घेण्यासाठी ते लिहिले आहे. लेखन विज्ञानानिष्ठ असले तरी लेखकांनी रोजच्या व्यवहारातली हलकी फुलकी उदाहरणे देऊन विषय अतिशय सोपा व आकर्षक केला आहे. यांत उल्लेख केलेले काही संशोधन हे अगदी अलिकडचे असून ते मेडिकलच्या पाठ्यपुस्तकातही नाही असा लेखकद्वयींचा दावा आहे.
झोपेत पडणार्या स्वप्नांचे मेंदूतले केंद्र, भावनांचे उगमस्थान, तर्कबुध्दी व भावना यातील रस्सीखेच, निजदेहभान वगैरे मेंदूतल्या घडामोडींबद्दल आश्चर्यकारक माहिती यातील प्रकरणांमधे आहे.
नवीन व जुन्या भावना, आभासी अंग (फँटम लिंब्ज) अशा प्रकारची सामान्य माणसाला नवीन असलेली माहितीही त्यात आहे. मुख्य म्हणजे कुठलेही प्रकरण काढून वाचले तरी चालेल अशी पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक वाचून आपण समोरच्या व्यक्तिला जास्त समजावून घेऊ शकतो, मानवी मनोव्यापारांची जवळून माहिती झाल्यामुळे परस्परांमधले समज-गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल हे लेखकांचे म्हणणे मनापासून पटते.
पुस्तकातल्या माहितीबद्दल इथे विस्ताराने लिहिणे ही पुनरावृत्ती होईल, म्हणून ते टाळून, एक अवश्य वाचण्यासारखे विज्ञाननिष्ठ पुस्तक, अशी मिपावरील सर्व नव्या जुन्या मित्रमंडळींना ही पुस्तकाची तोंडओळख.
लेखक : डॉ. आनंद जोशी/सुबोध जावडेकर
राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती : मार्च २०१०
छापील किंमत : रु. २२५/









