user

म्हणी

सावध ऐका (मागल्या) हाका!

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.

आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.

एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.

आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.

नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्‍या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.

समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्‍या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्‍हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्‍या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.

आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.

दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.

आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.

हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.

आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणूनच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.

आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.

आगितुन फुफाट्यात

आगीतून फुफाट्यात

अडला हरी ....

'अडला नारायण' किंवा 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. अत्यंत बिकट अवस्था आली तर मानापमान किंवा सदसद्विचार थोडा बाजूला ठेऊन कोणाचेही पाय धरायची वेळ येते असा या म्हणीचा अर्थ आहे असे मी आतापर्यंत समजत आलो आहे. या म्हणीचा एक वेगळाच अर्थ लावून त्यावरून एक अजब तर्कट काढल्याचे एका लेखात वाचले, त्यामुळे या म्हणीची थोडी चिरफाड या लेखात करावी असे वाटले.

हरी आणि गाढव या दोन व्यक्ती आणि अडणे व पाय धरणे या क्रिया धरल्या तर त्यापासून अनेक शक्यता संभवतात.
१. हा हरी नेहमीच अडलेला असतो आणि गाढवाचे पाय धरून बसलेला असतो.
२. जेंव्हा जेंव्हा हरी अडतो तेंव्हा थेट गाढवाकडे जाऊन त्याचे पाय धरतो.
३. ज्या कोणाचे पाय हरी धरेल तो गाढवच असतो.
४. अडल्यानंतर हरी कोणाचेही पाय धरतो, कधी कधी ते पाय गाढवाचे असतात.
५. तातडीच्या मदतीची गरज असते आणि त्या वेळी इतर कोणाचीही मदत मिळत नाही, तेंव्हाच हरी खर्‍या अर्थाने 'अडतो' आणि निरुपाय झाल्यामुळे गाढवाचे पाय धरायला तयार होतो किंवा ते धरतो.
अशा प्रकारच्या अधिक शक्यता सांगता येतील. पण माझ्या मते यातली फक्त ५ क्रमांकाची शक्यता या म्हणीशी सुसंगत आहे. इतर सर्व शक्यतांचा या म्हणीच्या संबंधात विचार करण्याचे कारण नाही.

प्रामुख्याने माणसांच्या जगात हरीच्या सोबतीला नारायणही असेल ,तसेच अनेक गाढवेही असतील हे लक्षात घेतले तर इतर असंख्य शक्यता निर्माण होतात. उदाहरणार्थ:
१. हरी नारायणाचे पाय धरेल.
२. एक गाढव दुसर्‍या गाढवाचे किंवा माणसाचे किंवा हरीचे पाय धरेल.
३. भाविक माणूस अडलेला नसतांनासुध्दा नेहमीच हरी- नारायण यांचे पाय धरेल आणि "सुखमे सुमिरन ज्यों करे तो दुख काहे होय?" या कबीराच्या वाणीनुसार दुःखमुक्त होईल.
४. "मी एक वेळ गाढवाचे पाय धरेन, पण नारायणाचे नांवसुध्दा घेणार नाही." असे पक्का नास्तिक म्हणेल.
५. कोणीच कोणाचेच पाय धरणार नाही.
अशा प्रकारच्या शक्यता अपरंपार आहेत, पण त्यासुध्दा या म्हणीच्या कक्षेच्या बाहेर आहेत. कुंपणावर बसलेली माणसे अडचणीचा काळ आल्यावर देवाचे स्मरण करून त्याचा धांवा करतात, पण त्यांना देवावर भरोसा नसतो. त्यामुळे ते एकादा तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिशी, बुवा, बाबा, फकीर, हस्तसामुद्रिक, न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरॉटरीडर, क्रिस्टलगेझर, नाडीवाला, पोपटवाला अशा 'सिध्दीप्राप्त' किंवा 'चमत्कारी' माणसाकडे धांव घेतात. त्यांच्या बाबतीत "अडला माणूस लबाड कोल्ह्याचे पाय धरी" अशी नवी म्हण काढायला हरकत नाही!

"अडला हरी गाढवाचे पाय धरी... पण याचा अर्थ असा नाही ही, शंभर टक्के प्रसंगांत अडलेला, अडचणीतला माणूस फक्त मुर्ख व्यक्तीचेच पाय फक्त धरेल? खरोखर चांगला माणुससुद्धा त्याला मदत करू शकतोच की!" असे एक अफलातून विधान या लेखात केले आहे. कठीण प्रसंगी सज्जन माणसे नेहमीच मदतीला येतात, हा त्यांचा धर्मच आहे, त्यासाठी त्यांचे पाय धरावे लागत नाहीत. ऐनवेळी एकादा माणूस न बोलावतासुध्दा देवासारखा धांवत येऊन मदत करतो असे दिसते. हे चांगले लोक वरील म्हणीला अपवाद आहेत असे म्हणता येणार नाही. 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' याचा अर्थ तो नेहमी गाढवाचे आणि फक्त गाढवाचेच पाय धरतो असा मुळीच होत नाही. गाढवाचे पाय धरल्यामुळे त्याच्या मार्गातला अडसर दूर होतो असे आश्वासनसुध्दा या म्हणीत नाही. उलट गाढवाकडून लत्ताप्रहार होण्याची शक्यताच दांडगी असते. त्यामुळे गाढवाचे पाय धरणे ही नित्याच्या जीवनातली बाब नाही.

एकाद्या बिकट प्रसंगी इतर सर्व उपाय संपलेले असतात, दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, अशा वेळी अपाय होण्याचा धोका पत्करूनसुध्दा मदतीची किंचित आशा बाळगून एकादा माणूस अपात्र माणसाला शरण जातो अशा अपवादास्पद प्रसंगाचे उदाहरण या म्हणीद्वारे दिले आहे. हरी किंवा नारायण हे देव आहेत, त्यामुळे ते माणसापेक्षा श्रेष्ठ समजले जातात, तर गाढव हे एक निर्बुध्द, निष्क्रिय आणि निकृष्ट जनावर गणले जाते. त्यामुळे सर्वात उच्च पातळीवरील हरी सर्वात खालच्या पातळीवरील गाढवाच्या पायाशी लोळण घेतो ही त्याच्या अगतिकतेची परमावधी असते. अशा प्रकारच्या टोकाच्या अगतिकतेचे उदाहरण या म्हणीद्वारे दिलेले आहे. त्याचा उपयोग बारीक सारीक अडचणींसाठी सर्रास केला जात असल्यामुळे त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रहसनांमध्ये ज्याला गाढव म्हणायचे असेल त्याचे पाय धरले जातात. या म्हणीच्या अशा वापरामुळे ती थोडी गुळगुळीत झाली आहे एवढेच.

भगवान हरीने अडल्याप्रसंगी कोणा गाढवाचे पाय धरल्याचे सुरस आख्यान एकाद्या गर्दभपुराणात किंवा खरोपनिषदात कदाचित असलेच तरी ते कधी माझ्या ऐकण्यात आलेले नाही. त्यामुळे या म्हणीचा उद्भव कसा झाला हे मला माहीत नाही. आपल्या भाषातज्ज्ञ मित्रांनी यावर प्रकाश पाडावा अशी त्यांना विनंती आहे.

आफलातुन म्हणीं

काही नव्या, आफलातुन म्हणींवर आज शुक्रवार दि. २७.०२.०९ केलेला प्रयास्....तुम्ही सुध्दा सुरु ठेवावा. ही. न. वी.

''नाव प्रकाश,हाती विझलेला दिवा''

मराठी ..सुभाषिते....

कालपरवा "कल॑त्री ""त्रास"च्या "माझे प्रेरणावाक्य" ह्या धाग्यात मराठी सुभाषिता॑चा विषय निघाला.

म्हणुन हा धागा.......

मराठी बरोबर स॑स्कॄत ही चालतील,अर्थ दिला तर उत्तम.

माझे हे दोन..

१)कराग्रे वसते लक्ष्मी,करमधे सरस्वती,
करमुले गोवि॑दम्,प्रभाते करदर्शनम.

२)करौती स्वमुखेनेव ,बहुधान्यस ख॑डनम
नमःह पतन शीलाय ,मुसलाय खलायच.

अर्थ:१:बहुस॑ख्येने धान्याच ख॑डण करण्यार्‍या खळ-मुसळाला नमन"

अर्थः२:स्वत:च्या मुखातुन(बोलण्याने) अने॑काच मानहरण करण्यार्‍या व्यक्तीस नमन

दुरून डोंगर साजिरे

"बडा घर पोकळ वासा ", "नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा ", "वरून कीर्तन आंतून तमाशा " अशा "दिसतं तसं नसतं " या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं
यातला विरोधाभास दाखवणार्‍या अनेक म्हणी प्रचारात आहेत. "दुरून डोंगर साजिरे " ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा "जवळ जाता दर्‍या खोरी " हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल दर्‍या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खोर्‍यांबरोबर कां घालावी? खोर्‍यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात. अशी रम्य जागा जवळ जाऊन पाहतांना साजरी वाटत नसते कां? मला तर डोंगरसुध्दा जवळून पहातांना छानच वाटतात. त्यांवर चढउतार करण्याचा कष्टाचा भाग सोसला तर तिथले निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते. म्हणून तर सारी हिल स्टेशन्स इतकी लोकप्रिय असतात. कित्येक लोक मुद्दाम डोंगराळ भागात गिरीसंचाराला (ट्रेकिंगला) जातात. हे सारे लोक या पर्यटनांत घेतलेल्या सुखद अनुभवांचे चर्वण वर्षानुवर्षे करतांना आपल्याला दिसतात. त्यामुळे डोंगर दुरून तर साजिरे दिसतातच, जवळ गेल्यावर अनेकदा ते मनोहारी वाटतात.

असे असले तरी "दुरून डोंगर साजिरे " या म्हणीचा एक अनपेक्षित असा वेगळाच अर्थ मागच्या आठवड्यात अचानकपणे माझ्या समोर आला. अमेरिकेच्या उत्तर भागातल्या रानावनांमधून आमची बस जात असतांना बाजूला दूरवर नजर पोचेपर्यंत फॉल कलर्सने रंगवलेल्या वृक्षराई दिसत होत्या. कांही ठिकाणी लाल, पिवळा, सोनेरी, केशरी आणि हिरवा या रंगांच्या विविध छटांनी सुशोभित झालेले अप्रतिम डोंगरमाथे क्षितिजापर्यंत पसरलेले दिसत होते. पण जेंव्हा मी कांही रंगीबेरंगी झाडे जवळ जाऊन पाहिली तेंव्हा मला धक्काच बसला. दुरून इतक्या सुंदर दिसणार्‍या या झाडांची पाने जवळून पहातांना मलूल दिसत होती. सूर्यप्रकाशात लाल, शेंदरी, सोनेरी रंगांत चमकणारी ही पाने जवळून निस्तेज, गरीब बिचारी अशी वाटत होती. त्यांची परिस्थिती दयनीय वाटावी अशीच झालेली होती, कारण आतां त्यांचे दिवस भरत आले होते. झाडांना जीव असतो हे तर आपल्या सर जगदीशचंद्र बसूंनी सिध्द करून दाखवले आहेच. त्यातल्या पानांना स्वतंत्र बुध्दी असेल तर त्यांनी आपल्या भाऊबंदांना गळून पडतांना पाहिले असणार आणि आपली गतसुध्दा आता तशीच होणार या विचाराने ती भयभीत होऊन किंवा निराशेने फिकट पडलेली असतील. ही सारी इतकी रंगीबेरंगी पाने गळून पडून या झाडांचे बुंधे आणि फांद्या यांचे फक्त काळवंलेले सांगाडे आता शिल्लक राहणार आहेत ही कल्पना माझ्याने करवत नव्हती.

(सुंदर डोंगर आणि मरगळ आलेली पाने यांचे एक चित्र टाकण्याचा प्रयत्न मी केला होता तो सफल झाला नाही)

खाना खजाना

खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)

टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही. बीबीला सल्ला देण्यासाठी बाबा, बेबी सारेच पुढे सरसावतात. आणि मग काय विचारता राव! पार्लमेन्टरी गोंधळ बरा! हे करा, ते करा. ओरडाओरडी. शेवटी करायचे काहीच नाही. चूल आणि सर्वांची पोटे थंडच रहातात. आम्ही सगळे मात्र गरम होतो.

हे असे रोज चालते. एक दिवस विचार केला... नाहीतरी रोज बोलता बोलता आपण कल्पनेतच सारे पदार्थ खात असतो. तर मग बाकायदा बोलीभाषेतील पाककृतींचे धडेच का करू नये? मायबोली मराठी आणि हिन्दी पण एक समृद्ध भाषा आहे. म्हणींचा मोठा साठाच हिंदी मराठीत आहे. हा साठा वापरून मग मी एक खाना खजानाच तयार केला. माझा हा खजाना जर तुम्ही वापरलात, तर मूग गीळून गप्प बसण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही. दाने दानेपे लिखा है खानेवाले का नाम ह्या न्यायाने तुमची सारी पोटपूजा यथासांग होईल. चला तर लुटू हा खाना खजाना.

काय आहे, की कुठलेही काम एकट्याने कधी करू नाही. खाना बनवण्याच्या कामात देखील एक चांगली, तरतरीत असीस्टंट हवीच. आता एक तरतरीत चवळीची शेंग अशी असीस्टंट निवडा. रेसीपी चांगली होण्यासाठी तिला आधी हरभर्‍याच्या झाडावर चढवा. जर जास्त उंचावर गेली, तर Too many cooks spoil the dinner म्हणून काहीतरी निमीत्य काढून तिला कटवा. सांगा, "जा, पी हळद आणि हो गोरी." आता ती परत येण्या आधी आपण काही रेसिपी पाहू या.

आधी मेन डीश. आपण बनवणार आहोत बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. धुतल्या तांदळासारखे चरीत्र असलेले तांदूळ घ्या. पाणी सगळ्यात चांगले म्हणजे इश्वराची करणी आणि नारळात पाणी. एका नारळातील करणी.. ओह.. पाणी काढून तांदळात टाका व खदखदा शिजवा. फ्रीज मधील शिळ्या कढीला ऊत येईपर्यंत उकळा. भाताचे छोटे छोटे गोळे करून हा बोलाचाच भात आणि मोठ्या वाडग्यात बोलाचीच कढी वाढा.

हा भात कमी पडेल असे वाटले तर भरीला करा बिरबलाची खिचडी. बाजारात तुरी आल्या असतील तर भट भटीणीला मारायच्या आधीच त्या घेऊन या. पाव किलो ये मूंग और मसूर की दाल त्यात टाका. दालमे कुछ काला असेल तर फारच छान. बिरबलाची खिचडी रंगी बेरंगी दिसेल आणि रंगाचा बेरंग होणार नाही. खिचडीला फोडणी साठी तेल कमीच लागते. म्हणून प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे पैकी दोन चमचे तेलाची बिनबुडाचे भांडे घेऊन तांदूळ, डाळ वगैरे मिश्रणाला फोडणी करा. काल खालेल्या मिठाला जागून चवीनुसार तेही घाला. शिजत असतांना उथळ पाण्याला खळखळाट फार होतो. तेव्हा अधून मधून जमीनीवर लाथ मारेन तेथून पाणी काढून पाणी घालून वाढवावे. बिरबलाची खिचडी सुर्यचुलीवर आभाळ अभ्राच्छादित असतांना शिजवली तर अप्रतीम बनते. लोक सहसा आवडीने खातात. पण कोणी खळखळ केलीच तर त्याची डाळ शिजू देऊ नका.

आता भाजी करू. एक मधम आकाराचा भ्रमाचा भोपळा घ्या. विळ्या भोपळ्याचे सख्य असल्याने, तो कापण्याच्या भानगडीत न पडता, सरळ तो भ्रमाचा भोपळा फोडा. नंतर तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा करा. बायकोचे रोजचे सासुच्या डोक्यावर मिरे वाटणे झाले असेल तर ती पेस्ट बाजूला काढून ठेवा. तळण्या करता टेढी उंगलीसे घी निकालकर कढाइत टाका. एक कडू कारले साखरेत घोळा, तुपात तळा, व काप करून ठेवा. मात्र तळतांना सांभाळून! चुकून चारो उंगलीयां घीमे और सर कढाइमे टाकू नका. उगाच कारल्याची चव जाऊन भेजा खायची पाळी येईल. दोन लवंगी मिरची कोल्हापूरची घ्या. त्या चिरतांना आपले नाक वर ठेवा. नाहीतर नाकाला मिरची झोंबेल.

दोन अकलेचे कांदे घ्या. मात्र ते कादे नाकाने सोलायचे बर का! हे काम बायकांनाच चांगले जमते म्हणे. तेव्हा चवळीची शेंग असीस्टंट असली तर उत्तम, नाहीतर तुम्हालाच करावे लागेल. कांद्याचे काप करून ठेवा. सध्या जालावर खसखशीचे पीक फार आले आहे. त्याचीच फोडणी करा. फोडणी साठी थोडे वड्याचे तेल वांग्यावर टाकून घ्या. चवदार लागते. ही भाजी रटारटा शिजल्यावर चवीनुसार नावडतीचे मीठ अळणी टाका. ही झाली भ्रमाच्या भोपळ्याची भाजी तय्यार.

आता बनवू आंधळी कोशींबीर. हा पदार्थ करण्याच्या आदल्या रात्री रात्रभर जागून टीव्ही सिरीयल पाहून झोपेचे खोबरे करा व एका वाटीत काढून ठेवा. दोन मोठी गाजरे घ्या. त्यांची गाजराची पुंगी करा. ती वाजवण्याच्या भानगडीत न पडता, नुसती हाताने मोडा. नंतर लॅरी कींग स्टाईलने त्यांचा पूर्ण कीस काढा. रात्रीचे झोपेचे खोबरे त्यात मिसळा. एक कच्चे लिंबू घेऊन त्याचा रस डोळे बंद करून ह्या मिश्रणात टाकला की झाली आंधळी कोशींबीर.

आता एक नॉन व्हेज पदार्थ करून पाहूया. घरचीच सोने की अंडे देनेवाली मुर्गी घ्या. तिची सारी अंडी पिल्ली बाहेर पडण्याच्या आतच तिला सोडून द्या. कारण घरची मुर्गी दाल बराबर. म्हणून "जादा आवाज किया तर डाल दुंगा" म्हणणार्‍या भाईकडे जाऊन डाल घेऊन या. पण जपून. नाहीतर तो तुमचेच नॉन व्हेज बनवेल.

तसे तर आणखीन बरेच पदार्थ आहेत. पुणेकर करतात ती स्पेशालीटी, म्हणजे पचका वडा. झालेच तर मारक्या आयांच्या आवडीचे पाठीचे धिरडे. ते राहूच दे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.

जाता जाता एक सल्ला देतो. तापल्या तव्यावर पोळ्या भाजून घ्या. भाजतांना, बॉस साठी राखून ठेवलेले लोणी लावायचे. म्हणजे तुमची पोळी पिकेल.

डिझर्ट करायचे असेल तर, शिंक्यातली फळे खाली पाडा. मग पडत्या फळांची आज्ञा घेऊन त्यांचे छोटे तुकडे कापून एका बाऊल मधे ठेवा. थोडि कोल्ह्याची द्राक्षे आंबट त्यात टाका. ह्या सगळ्या अजब पाककृती पाहून मंडळी अवाक झाली असतीलच. तेव्हा खूप बडबड करून Ice break करा आणि फळांवर पसरा. फळे जरी नाही झाली थंड तरी मंडळी नक्कीच थंड होतील.

असे हे जेवण तर मस्तच झाले. आता हे सर्व ताटात पडले काय अन वाटीत पडले काय, काहीच फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा. हे सारे खातांना pinch of salt बरोबर खायचे. हो, आणि दाखवायचे वेगळे दात न वापरता, खायचे वेगळे दात वापरा. नाही तर खाई त्याला खवखवे. जेवणा नंतर मुखशुद्धीसाठी भाई कडची सुपारी वापरू नका. उगाच दुधात मिठाचा खडा पडायचा.

खवय्यांनो, हा खाना खजाना खाऊन तुमचे पोट भरले नसेल दात कोरून पोट भरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ह्याची खात्री आहे. मिसळपाव वर चमचमीत भंडार उघडले आहे. तिथे जा. भरपेट आस्वाद घ्या!

पुर्वप्रकाशीत, पण नंतर संपादीत.
**********************

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे. त्यांच्या आराखड्याप्रमाणे राज्याच्या विविध भागातील भाषातज्ञांची एक बैठकही झाली आहे. आता दुस-या टप्प्यात अभ्यासक, वाचक, तज्ञ, मुद्रितशोधक, यांच्याकडून सूचना मागविण्यात येत आहेत. -हस्व,दीर्घ, शब्दांसाठी कोणते नियम असावेत.लेखन उच्चारानुसार असावे का ? दंतमूलीय व्यंजनांसाठी एकच चिन्हे वापरावे का ? कोणत्या उच्चारासाठी कोणती चिन्ह असावीत; तसेच देवनागरी लिपीत काही बदल करावे का, याबद्दल सूचना अपेक्षित आहेत. त्यावर महामंडळाच्या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा होईल. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मराठी शिक्षकांसाठी कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर नियमावली अंतिम करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तेव्हा शुद्धलेखनाबद्दल काही उत्तम चर्चा झाली तर सदरील चर्चेची प्रिन्ट काढून अध्यक्षापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

सध्याचे शुद्धलेखनाचे नियम इथे पाहावेत.

सूचना:- वरील लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्यास हरकत नाही, चुका व्य.नि. ने किंवा खरडीत लिहावे, म्हणजे आपल्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.

हस्ताक्षरावरुन स्वभाव

तात्या रोशनी -४ आले

आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय?

आपला
एक साधारण सदस्य!

रोशनी ४

तात्या रोशनी ४ भाग प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!

Syndicate content
Scroll to Top