टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पाकक्रिया
शाकाहार :- काही नवीन पैलु
प्रेषक मन ( शनी, ०५/१०/२००८ - ०५:२५) .मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.
माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-
१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्या दातात "रगडले" जाते.
नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.
४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.
५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.
आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.
ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.
मग ह्या सगळ्या गोष्टी बर्याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?
रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?
प्रेषक ईश्वरी ( शनी, ०५/१०/२००८ - ०२:५०) .परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.
खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.

ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.
ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी
प्रॉन्स ग्रीन पुलाव
प्रेषक प्रभाकर पेठकर ( मंगळ, ०५/०६/२००८ - २१:५६) .
साहित्यः
मध्यम आकाराची कोलंबी - ५०० ग्रॅम्स (थोडी मोठी चालेल पण फार लहान नको.)
नारळ - अर्धा
पुदीना -अर्धी मूठ
कोथिंबीर - एक मुठ
हिरव्या मिरच्या - ३ किंवा ४
लसूण - ८-१० पाकळ्या
आलं १"
लिंबू - १
मीठ चवीनुसार.
मोहरी - २ टेबलस्पून.
केळीची कोवळी पाने ४ (शक्यतो कर्दळीच्या पानाच्या आकारा एवढी)
सुवासिक बासमती तांदूळ - २ वाट्या (अंदाजे ४०० ग्रॅम)
वनस्पती तूप - ४-५ टेबलस्पून
काळी मिरी - १०- १२ नग
तेल फोडणीसाठी. (दोन चमचे)
तयारी:
कोलंबी सोलून साफ करून घ्यावी.
नारळ खवून घ्यावा.
पुदीना पाने निवडून, धूवून घ्यावीत.
हिरव्या मिरच्या, कोथिंबीर धूवून, चिरुन घ्यावी.
लसूण सोलून आणि आलं धूवून चिरुन घ्यावे.
बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात ठेवून, निथळवून घ्यावा.
कृती:
नारळ, पुदीना, कोथिंबीर, मिरच्या, आलं - लसूण, लिंबू , मीठ आणि मोहरी मिक्सरमध्ये वाटून (कमीत कमी पाण्यात) मुलायम चटणी बनवावी.
ह्या चटणीत प्रॉन्स अर्धा तास मुरण्यास ठेवावे.
किंचीत तेलावर काळीमिरी फोडणीस टाकून फुटू द्यावी. त्यावर तांदूळ परतून, मापाने जेवढ्यास तेवढे पाणी घालून, घट्ट झाकण लावून, मंद आंचेवर भात मोकळा शिजवून घ्यावा.
दुसर्या एखाद्या पसरट पातेल्यात केळीची पाने अशी लावावीत की अर्धे पान पातेल्याच्या तळाला अंथरले जाईल आणि पानाचा बाकी अर्धा भाग पातेल्या बाहेर येईल. नंतर त्या पानांवर तळाला चार ठीकाणी आणि मध्यभागी असे ५ चमचे वनस्पती तूप सोडावे. त्यावर नारळाच्या चटणीत मुरवलेली कोलंबी नीट पसरून ठेवावी. कोलंबीवर मोकळा शिजवलेला भात पसरावा. आता, पातेल्याच्य बाहेर आलेला केळीच्या पानाचा भाग भातावर झाकणासारखा पसरवून वरून पातेल्याचे झाकण घट्ट लावावे आणि हा पुलावर मंद आंचेवर अर्धा तास शिजवावा.
अर्ध्या तासाने गॅस बंद करून १० मिनीटे पुलावर मुरू द्यावा.
जेवताना झाकण उघडून (पाहा काय मस्त वास आला नं!) केळीची पाने अलगद काढून टाकावी. हलक्या हाताने प्रॉन्स आणि भात वरखाली करून घ्यावा. आणि गरम गरम वाढावा. खाताना त्यावर शुद्ध साजूक तुपाची मस्त धार सोडावी आणि तुडुंब जेवावे.
खास सुचना: कोलंबी आणि मोहरी दोन्ही उष्ण असल्यामुळे दोन दिवस लागोपाठ खाऊ नये. त्रास होऊ शकतो.
शुभेच्छा....!
पाककृती : बटर चिकन आनि व्हेज बिर्याणी!
प्रेषक भाग्यश्री ( मंगळ, ०५/०६/२००८ - ००:१३) .ह्म्म.. मिपावर प्रथमच लेख लिहीत आहे.. आणि त्यातून रेसीपी! दोन्ही स्वातीताई आणि पेठकर काकांच्या अंगणात न विचारता घुसखोरी केल्यासारखं वाटतय! 
असो.. तर ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्याला चिकन खायचंच होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..) त्यातून प्राजूचा अस्सल कोल्हापूरी थाळीचा फोटो पाहील्यावर राहवेच ना त्याला.. म्हणून हा बेत..
बटर चिकन
ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे. अस्सल नॉन्-व्हेज नसेल. कारण त्या पण नॉन्-व्हेज करत नव्हत्या. पण निनादसाठी करायला लागल्या. तर त्यांची ही रेसीपी. पण अर्थात 'आम्ही' करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप आवडली!)
असो.. मला जमेल तशी देतीय रेसीपी. अगदी अचूक प्रमाण नाही देता येणार कारण मी अंदाजेच घालते सगळे मसाले..
जिन्नस :
१) ५०० ते ७०० ग्रॅम हलाल चिकन.
२) एक मोठा कांदा चिरून. ( अमेरीकेतला असेल तर अर्धाच. आमचा कॉस्कोचा होता. तो जरा अतीच जास्त आहे..)
३)एक टोमॅटो.
४) खोबरं
५) आलं, लसूण.
६) ३ मिरच्या
७) थोडी कोथिंबीर.
८)चिकन मसाला..
९) थोडासा काळा मसाला..
१०) आवश्यक वाटला तर फूड कलर्.(अर्थात लाल.)
११) दही.
१२) हळद्,तिखट,तेल वगैरे.
कृती :
१. प्रथम चिकन साफ करून त्याचे तुकडे करून ठेवणे. मग दही, हळद्,आणि थोडा चिकन मसाला घालून मॅरीनेट करावे.
२. मग कुकर मधे शिजवून घ्यावे.
३. मसाल्यासाठी : चिरलेला कांदा बटर मधे किंचित परतून घ्यावा. खोबरं परतून घ्यावं(बटर शिवाय
)
४. आलं , लसूण, मिरची,कोथिंबीर्,टोमॅटो आणि परतलेला कांदा आणि खोबरं हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेणे. पेस्ट करावी..(हवा असल्यास फूड कलर घालणे.)
५. एका मोठया कढईत किंवा पॅन मधे बटर गरम करत ठेवावे. थोडीशी हळद घालून, ही वर केलेली पेस्ट घालावी. थोडं परतलं की त्याला तेल सुटते. (वाटल्यास त्यात परत चिकन मसाला ,काळा मसाला घालावा.)
६. तेल सुटले की शिजवलेले चिकन घालून सगळं एकजिव करणे. ग्रेव्ही जरा घट्ट झाली की वरून बटर घालणे.. की झालं बटर चिकन तैयार!! 
व्हेज. बिर्याणी :
ही हमखास सुंदर होणारी, आणि लवकर होणारी रेसीपी.. अर्थात हैद्राबादच्या बिर्याणीशी तुलना करू नये. पण चव सुंदर लागते.. !
जिन्नस :
१) १.५ वाटी तांदूळ.(बासमती )
२) अर्धा फ्लॉवर ,२ मोठी गाजरं आणि मटार(फ्रोझन शक्यतो).
३)परंपरा मसाला
४) कांदा
५) काजू
कृती :
१) १.५ वाटी तांदूळ धुवून राईस कुकर मधे लावून ठेवणे. साधा कुकर सुद्धा चालेल. पण भात मोकळा आणि फडफडीत व्हायला हवा.
२) भात तयार झाला की एका परातीत काढून त्याला तूप लावून मोकळा करून घेणे. भात मोकळा पण होतो. आणि तुपाचा वास मस्त येतो.. नंतर भाताला थोडं मिठ लावून ठेवणे.
३) फ्लॉवर चे छोटे तुरे निवडून घेणे. आणि गाजराचे गोल किंवा त्रिकोणी तुकडे करून घेणे. मोठे गाजर असेल तर त्रिकोणी. आणि छोटं असेल तर साधे गोल.
४) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गाजर आणि फ्लॉवर चे तुकडे वाफवून घेणे. (फार नाही, १०-१५ मिनीट्स बास होईल..)
५) एका कढईमधे अगदी थोडंसं तेल घेऊन त्यात ह्या भाज्या व फ्रोझन मटार परतून घेणे. व लगेच परंपरा मसाला त्यात घालणे. (परंपरा चा मसाला आधी हाताने कुस्करून घेणे. त्याची ढेकळं राहीली तर भाताला नीट लागत नाही..)
६) मसाला घातल्यावर जरावेळाने तेल सुटू लागते. त्यात भात घालणे. सगळं नीट मिक्स करून घेणे.
७) १० मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ देणे.
८) व्हेज. बिर्याणी तयार!! फक्त यात तुपात तळलेले काजू अवश्य घालणे!! अतिशय सुंदर लागतात. शिवाय कांद्याच्या रिंग्स सुद्धा तळून घालता येतील. पण त्यासाठी कांदा चिरून २ दिवस उन्हात वाळवत ठेवावा. व मग तुपात परतावा. असा कुरकुरीत तळलेला कांदा , आणि तळलेले काजू या बिर्याणीवर घालून दिले तर कधी विसरणार नाही चव! 
अशी ही बिर्याणी, बटर चिकन, गरमगरम मऊसूत पोळ्या आणि सॅलड एका छान डिश मधे सजवून द्या, आणि विकेंड एन्जॉय करा !!
प्राजूचा धिक्कार असो...:)
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, ०५/०२/२००८ - ०१:२६) .मिपाची एक सन्माननीय सदस्या प्राजू, हिचा आम्ही धिक्कार करत आहोत...!
आज कोल्हापुरात प्राजूच्या घरी 'कोल्हापुरी तांबडा रस्सा-पांढरा रस्सा आणि चवदार कोंबडी' असा मोठा न्यारा बेत होता. प्राजूने समस्त नॉनव्हेजखाऊ मिपाकरांना ही मेजवानी झोडण्याकरता स्वत:च्या घरी प्रेमाने, आग्रहाने बोलवणं तर सोडाच, परंतु सदर पाकृचा तेवढा फक्त फोटूच मिपाच्या मुखपृष्ठाकरता पाठवून मिपाकरांची रीतसर आणि कोल्डब्लडेडली बोळवण केली आहे!
एवढंच नव्हे, तर आज या संदर्भात तिच्याशी फोनवर माझं प्रत्यक्ष बोलणंही झालं तेव्हादेखील तिने केवळ 'मुखपृष्ठाकरता फोटू पाठवत आहे' एवढंच सांगितलं! एवढंच नव्हे, तर वर जखमेवर मीठ म्हणून समस्त मिपाकरांना तिने टुकटुकही केलं!
याबद्दल मी प्राजूचा तीव्र निषेध व धिक्कार करतो व प्रायश्चित्त म्हणून तिने पुन्हा असा न्यारा बेत करून आम्हा मिपाकरांना तिच्या कोल्हापुरच्या घरी (माहेरी) जेवायला बोलवावं, अशी शिक्षा सुनावतो..! 
मंडळी, कृपया खालील सुरेख फोटू पाहा, आणि हा फोटू दाखवत आपल्याला कुणी 'टुकटुक' केलं की कसं वाटेल हे तुम्हीच सांगा! 
ठीक आहे प्राजू, बघून घेईन तुला! 
तात्या.

मार्बल केक
प्रेषक स्वाती दिनेश ( शनी, ०४/२६/२००८ - १२:२७) .
साहित्य-
२५० ग्राम मैदा,२५० ग्राम तूप/लोणी/मार्गारिन,२५० ग्राम साखर
२ चहाचे चमचे भरून बेकिंग पावडर,१चिमूट मीठ,५ अंडी,१/४कप दूध
१.५ चमचा वॅनिला अर्क, २ ते २.५ मोठे चमचे कोको पावडर
कृती-
तूप चांगले फेसून घेणे,साखर घालून फेसणे. अंडी घालून फेसणे.नंतर वॅनिला अर्क घालून फेसणे.
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे आणि वरील मिश्रणात हळूहळू मिसळणे.नंतर थोडे दूध घालणे व मिश्रण एकजीव करणे.
आता मिश्रणाचे २ भाग करून वेगवेगळ्या वाडग्यात काढून घ्या,एका भागात कोको पावडर घाला व दुसरा भाग तसाच ठेवा.
केकच्या साच्याला तूप लावून घ्या.दोन चमचे कोकोयुक्त मिश्रण आणि २ चमचे वॅनिलाचे साधे मिश्रण असे दोन्ही मिश्रणे संपेपर्यंत घाला. साचा तिरपा करून मिश्रण सगळीकडे सारखे पसरवून घ्या.
अवन प्रीहिट करून घ्या. १८० ते २०० अंश से. ला ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
वि. सू-
१. केक नेहमी थंड झाल्यावर कापावा म्हणजे स्लाइस तुटत नाहीत.
२.केक कापल्यावर स्लाईस उघड्यावर ठेवायच्या नाहीत,त्या कोरड्या पडतात.
मेक्सिकन गंबो
प्रेषक चित्रा ( मंगळ, ०४/२२/२००८ - ००:४१) .इथे एका मेक्सिकन उपहारगृहात एकदा मेक्सिकन गंबो खाण्याचा योग आला. अचानक समोर आलेला हा पदार्थ आवडला, त्यामुळे जरा घरगुती पद्धतीने मूळ कृतीच्या थोडीफार जवळ जाईल इतकी पाककृती तयार केली आहे. तीच इथे देते. खरे तर गंबो म्हणजे काही वेगळे नाही, उसळ, भात आणि भाज्या एकत्र करून जे काही बनेल ते म्हणजे ही पाककृती. भाज्यांच्या प्रमाणात उपलब्धतेप्रमाणे थोडेफार बदल केले तरी हरकत नसावी. भेंडी हा यातील एक पारंपारिक घटक आहे. जे उगाचच भेंडी आवडत नाही , आवडत नाही असे म्हणतात त्यांना अजिबात न कळता भेंडी खायला घालायची असेल तर ही पा.कृ. जरूर करा!
साहित्य -
१. २ वाट्या कुठचेही पिठुळ कडधान्य - जसे पिंटो बीन्स, गुलाबी (पिंक) बीन्स, राजमा, किंवा यापैकी काहीच नसल्यास सुके हिरवे /काळे वाटाणे भिजवून
२. १ वाटी मध्यम दाण्याचा, पण शिजल्यावर भात खूप चिकट होणार नाही अशा पद्धतीचा तांदूळ (अमेरिकेत यासाठी बॉइल इन बॅग म्हणून एक बुटक्या दाण्यांचा अर्धवट शिजवलेला भात मिळतो, तोही वापरता येईल (पाणी उकळत ठेऊन त्यात ह्या अर्धवट शिजलेल्या भाताच्या पिशव्या सोडायच्या असतात आणि ५-७ मिनिटे शिजवून बंद करायचे, पिशव्यातील पाणी निथळून भात काढून घ्यायचा ).
३. मेक्सिकन साल्सा - बाजारात मिळतो तसा तिखट सालसा / तिखट चालत नसल्यास निदान मध्यम तिखट
४. भाज्या -
२ वाट्या चिरलेली भेंडी
२ मोठ्या भोपळी मिरच्या
२ मोठे लाल टोमॅटो
२ मोठे लाल कांदे
५-६ हिरव्या मिरच्या
२ चिपॉट्ले मिरच्या. बाजारात चिपॉट्ले मिरच्यांचा अडोबो (टोमॅटो) सॉसमधील डबा मिळतो तो घ्यावा. (हे नसल्यास ८-१० सुक्या लाल मिरच्या गॅसवर तशाच भाजून, व्हिनेगर, मीठ, थोडे ऑलिव्ह तेल आणि टोमॅटो केचप यांच्या मिश्रणात ७-८ तास बुडवून ठेवल्या आणि नंतर वापरल्या तरी चालेल असे वाटते).
१-२ सेलरीच्या काड्या ( ऐच्छिक, नसल्या तरी चालू शकतील, असल्या तर जरूर घालाव्यात)
१ कप मक्याच्या कोवळ्या कणसांचे (किंवा बेबी कॉर्न) चे तुकडे (ऐच्छिक)
५. २ मोठे चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
६. पातळ टॉर्टिया चिप्स ( जास्त मसाले न लावलेल्या रेस्तराँ स्टाईल) किंवा टॉर्टियाचे लांब, बारीक तुकडे करून कडक होईपर्यंत तेलात तळणे. मी जास्त उद्योग न करता बाजारात मिळणार्या चिप्सच वापरल्या आहेत.
७. व्हेजि. स्टॉक (ऐच्छिक, आणि बाजारात मिळतो तो).
८. १ चमचा बिटर-स्वीट चॉकलेट ( किंवा थोडी साखर)
९. तेल, मीठ, वरून घालायला थोडे चीज किसून (ऐच्छिक), एक छोटा डबा सावर क्रीम किंवा सायीचे दही (ऐच्छिक )
कृती -
१. बाजारात पिंटो बीन्स/गुलाबी बीन्स मिळतात ते २ वाट्या घेऊन पाण्यात पूर्ण बुडतील असे भिजवून ठेवावे आणि ८-१० तासांनंतर अगदी किंचित मीठ घालून कुकरमधून नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावे (मात्र शिजल्यावर दाणा मोकळा राहिला पाहिजे, एकदम गिरगिट करायचे नाही). झटपट करायचे असले तर शिजलेल्या पिंटो बीनचे डबेही मिळतात. भारतात हल्ली हे उपलब्ध असतात का ते माहिती नाही, पण नसल्यास याच प्रकारे शिजवलेला राजमा किंवा वाटाणे वापरता येऊ शकतात.
२. चिकट न शिजणारा तांदूळ घेऊन भात शिजवून घ्यावा. असा भात मी कुकरमध्ये न शिजवता बाहेर शिजवते. एक वाटी तांदळास साधारण दोन वाट्या पाणी असे प्रमाण घेते. तांदूळ शिजत आला की पाणी आटून भातात खोलगट खळगे दिसू लागतात, तेव्हा गॅस मंद करून झाकण ठेवले की आहे त्या वाफेवर भात नीट मऊ पण मोकळा शिजतो. झाकण काढून शिजलेला भात वाफ गेली की हलक्या हाताने मोकळा करून ताटात ठेवावा, थंड होऊ द्यावा.
३. थोड्या तेलावर प्रथम लसूण, मग कांदा थोडे परतून घ्यावेत. मग भेंडी, व्हिनेगर/ लिंबाचा रस, बारीक चिरलेले टोमॅटो, भोपळी मिरच्या,सेलरीच्या काड्या, मक्याच्या कणसांचे तुकडे, हिरव्या मिरच्या, असे सर्व घालून थोडे परतावे आणि मग सर्व भाज्या बुडतील एवढे पाणी (किंवा व्हेजि. स्टॉक) घालून शिजवून घ्यावे. मात्र घट्टसरच झाले पाहिजे, पाणचट करायचे नाही. भेंडी शिजल्यानंतर १ -१.५ चमचा (किंवा चवीप्रमाणे) मीठ आणि शिजलेले कडधान्य (पिंटो बीन्स), चिपॉट्ले मिरच्यांचे तुकडे थोड्या अडोबो सॉससकट घालून, शेवटी थोडे चॉकलेट किंवा साखर घालून अजून उकळावे. ह्या मिरच्यांना धुरकट वास असतो, त्यामुळे त्या आपल्या आवडीप्रमाणे बेतानेच घालाव्यात.
४. एक खोलगट बशी घेऊन त्यात आधी दोन-तीन टे. स्पून शिजलेला मोकळा केलेला भात घालावा. त्यावर १-१.५ वाटी गरम गरम कडधान्ययुक्त भाज्यांचे मिश्रण घालावे. त्यावर १-१.५ चमचा तिखट साल्सा पसरून त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर किंवा सिलांत्रो घालून, थोडे मेक्सिकन चीज भुरभुरून, १ च. च. सावर क्रीम घालून, त्याच्या बाजूला नॅचो चिप्स लावून ठेवाव्या किंवा चुरडून घालाव्या. गरम असतानाच खायला द्यावे.
पाककृतीचे छायाचित्र तात्यांना पाठवले आहे, ते योग्य वेळेस प्रसिद्ध करतीलच. येथे मुद्दाम वेगळे लावत नाही.
पापड
प्रेषक विजुभाऊ ( सोम, ०४/२१/२००८ - १५:४८) .पापड ही एक साईड डीश.
भाजका तळका आणि मसाला हे तीन प्रकार आपल्याला माहीत असतात
हे आणखी दोन नवे प्रकार पापड खाण्याचे
१) कच्चा पापड त्याला दोन्ही बाजुनी किंचीत तुपाचा हात लावुन घ्यावा. पोळी भाजतो त्याच गरम तव्यावर पापड ठेउन त्यावरुन वाटीची उलटी बाजु फिरवावी..पापड हवा तेव्हढा भाजुन घ्यावा. हा पापड एकदम सपाट भाजला जातो.
२)पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा . त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकावा.तिखटपूड आणि हवा असल्यास कांदा लसूण मसाला पेरावा. यावर आता दुसरी पोळी लाटुन ठेवावी. व पोळ्यांच्या कडा थोडे लाटणे फिरवुन बन्द करुन घ्याव्यात.
नेहमी भाजतो तशी पोळी भाजावी ( रोल हवा असल्यास गरम असतानाच करावा) होऊ शकतो.. ही डीश मी स्वतः डीझाईन केली असल्याने मला याचे नाव सुचले नाही
संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)
प्रेषक स्वाती राजेश ( रवी, ०४/२०/२००८ - १८:२४) .सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय.
१.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्यः
४ टे.स्पून बटर
३पातीचे कांदे स्लाईस करून
४५० ग्रॅम गाजर
१ टे.स्पून धने पावडर
५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक
१/२ कप गोड घट्ट दही
चवीनुसार मीठ, मिरपूड
२-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर
एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि. शिजवावे.
थोडे थंड झाल्यावर मिक्सरमधून प्युरी बनवून घ्या. ही प्युरी पुन्हा पातेल्यात घालून वरून दही घाला व हलकेच गरम करा.पुन्हा उकळी येऊ देऊ नका. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
२.क्रीम ऑफ स्पिनच सूप
साहित्यः
२ टे.स्पून बटर
१ छोटा कांदा बारीक कापून
६७५ ग्रॅम ताजा पालक कापून
५ कप व्हेजिटेबल स्टॉक
१ टे.स्पून कॉर्नफ्लोअर पाव कप पाण्यात मिसळून
चिमूटभर जायफळ पूड
१/४ कप क्रीम
चवीनुसार मीठ, मिरपूड
पातेल्यात बटर गरम करा. त्यात कांदा घालून मऊ होऊ द्या. पालक घालून झाकण ठेवा व १० मि.शिजवा.
थोडा स्टॉक घालून हे मिश्रण मिक्सरमधून काढा व प्युरी बनवा. ही प्यूरी कॉर्नफ्लोअरचे पाणी, मीठ, जायफळची पुड वमिरपूड घालून १५ मि.मंद आचेवर ठेवा. वरून क्रिम घालून लगेच उतरवा. गरमागरम सर्व्ह करा.
३.क्रीम ऑफ मशरूम सूप
साहित्यः
१०० ग्रॅम बटण मशरूम
३० ग्रॅम ऑयस्टर मशरूम
१/२ लिटर व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी
१ कांदा बारीक चिरुन
१ च. बारीक कापलेला लसूण
६० मि.लि.फ्रेश क्रीम
५० ग्रॅम लोणी
१ च.ऑलिव्ह ऑईल
१/२ च. बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ, मिरीपूड
पातेल्यात कांदा व लसूण, ऑलिव्ह ऑईल व लोण्यामधे परतवा. मशरुम घालून ५ मि.परतवा.मशरूम नरम व्हायला पाहिजेत.
या मिश्रणाची मिक्सरमधे पेस्ट बनवा. एका भांड्यात या पेस्टला उकळी आणा.आच मंद करून क्रीम,मीठ,मिरीपुड घाला.
कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
४.मिंनस्ट्रोन सूप
साहित्यः
३ मोठे टोमॅटो
२ मोठे कांदे
२ मोठी गाजरे
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
१ वाटी मटाराचे दाणे
१ वाटी मॅकरोनी तुकडे
२५ ग्रॅम चिज
१ टे.स्पून कॉर्नफ्लोअर
२ लसूण पाकळ्या
१ टे.स्पून लोणी
१ टे.स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ च.साजुक तूप
६कप पाणी
चवीनुसार मीठ, मिरीपूड
सर्व भाज्या अत्यंत बारीक चिरा. कारण हे सूप गाळायचे नसते. टोमॅटो उकळ्त्या पाण्यात ठेऊन,नंतर गार पाण्यात ठेवा व त्याची साल काढून बारीक चिरा.
तुपावर कांदा,लसूण, गाजर परतवून घ्या.नंतर त्यात टोमॅटो,कोबी, मटारचे दाणे घाला. पाणी घालून भाज्या शिजवून घ्यावा.
दुसर्या पातेल्यात ३ते ४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे.त्यात १ च. तेल घालावे.मीठ घालावे व पाण्याला उकळी आली की त्यात मॅकरोनी चे तुकडे घालावेत. मॅकरोनी शिजली कि ती सुपामधे घाला.
मीठ व मिरपूड घाला. लोण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून घावे व त्यात घालावे. आयत्यावेळी चीज व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
५.मलगटानी सूप
साहित्यः
३ टे.स्पून शिजवलेला भात
अर्धा नारळ
१स्पून.बडीशेप, २ दालचिनी तुकडे, २टी.स्पून. धने,२ टी.स्पून जिरे, १/४ टी.स्पून मेथी दाणे
२ टे.स्पून रिफाइंड तेल
१/४ किलो गाजर बारीक चिरून
१ कांदा बारीक चिरून
१ सलगम सोलून, बारीक चिरून
४ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
१/२ इंच आले सोलून बारीक चिरुन
३/४ वाटी(पाऊण) मसूर डाळ
१/२ किलो टोमॅटो ,उकडून, सोलून बारीक चिरुन
चिमूट्भर हळद
२ टे.स्पून लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
६ कप व्हेजिटेबल स्टॉक
तांदळाचा भात शिजवून घ्यावा किंवा शिळा चालेल.
नारळ वाटून त्याचे दुध काढून ठेवावे.
बडीशेप्,धने, जिरे, मेथी , दालचिनी तव्यावर थोडे भाजून बारीक पूड करावी.
पातेल्यात तेल गरम करावे.त्यात आले,लसूण, कांदा, सलगम व गाजर घालून ३ मि. परतावे. त्यात मसाला पावडर, मीठ, व्हेजिटेबल स्टॉक, टोमॅटो व मसुराची डाळ धुवून घालून भाज्या मऊ शिजेपर्यंत शिजवावे. भाज्या व डाळ शिजल्यावर खाली उतरावे.
गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करावे.
वाढायच्यावेळी परत उकळून त्यात नारळाचे दुध, लिंबाचा रस व शिजवलेला भात घालून गरमागरम सर्व्ह करावे.
बार्बेक्यू रेसिपिज
प्रेषक वरदा ( शुक्र, ०४/१८/२००८ - २०:२९) .नमस्कार मंडळी
इथे आता मस्त लाल पिवळ्या फुलांनी झाडं भरुन गेल्येत आणि सगळ्यांना वेध लागलेत समरचे. समर मधली सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे बार्बेक्यू. मस्त पैकी बागेत किंवा घराच्या अंगणात कोळसे पेटवून शेगडी करायची आणि भाजलेले वेगळे वेगळे पदार्थ खायचे. कोळशावर भाजलेल्या पदार्थाना येणारा तो खरपूस वास एकदम झकास असतो आणि त्यांची चव काही औरच! कुठल्याही ग्रिल वर करु शकू अशा पदार्थाची रेसिपी शेअर कराल का इथे?
पहिली रेसिपी आहे भाजलेल्या मक्याच्या कणसाची मस्त खरपूस भाजलेलं कणीस त्याला लिंबू, अमूल बटर, तिखट, मीठ लावून गरम गरम खायला सॉलिड मजा येते.
रगडा पॅटीस मधली पॅटी जर ग्रिल वर भाजली तर रगडा पॅटीस मस्तच लागतं.
(अजून खूप रेसिपीजच्या प्रतिक्षेत असलेली) वरदा





