समुद्रच आहे एक विशाल जाळं
ही एक दीर्घ कविता आहे.
एका समुद्रात राहणाऱ्या निळ्या पोटाच्या काळ्या मासोळीची ही गोष्ट आहे. या मासोळीचे मनोविश्व मोठे विलक्षण आहे. वाचायला लागल्यावर एकसलग वाचत रमून जावे अशी ही गोष्ट.
या मासोळीला सारखे वाटत असते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तिच्या मते प्रत्येकजण जरी आपापल्या जागी वेगळा असला तरी मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचे दिसणे वेगळे असते, चाकोरीतले जगणे वेगळे असते. या मासोळीचे मात्र आजूबाजूच्या विश्वात मन रमत नाही. तिला चाकोरी नकोशी झाली आहे. तिचे ठाम मत आहे की आपण चाकोरीत अडकून पडायलाच पुनः पुनः जन्म घेत असतो. तिला या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे.