समीक्षा
पारध
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले. मला एकदम पुलंच्या 'नाथा कामत' मधला क्रूड ऑईल पिणारा शित्या सरमळकर आठवला. "दीड दमडीच्या पिना घेता आणि धाच्या नोटा काय नाचवता?" असे काहीसे तो मनातल्या मनात (आता जमाना बदललाय म्हणून) म्हटला असेल असे वाटून गेले.
बाकी "भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या पाटीने आमची खूप करमणूक केली. यांच्या तर्कानुसार भिंतीवर थुंकणारा जर माणसाची औलाद नसेल तर त्याला ही पाटी कशी काय वाचता येईल असा फालतू प्रश्न मनात डोकावून गेला. जाऊ द्या...
आत आलो आणि विको वज्रदंतीच्या आणि विको टरमरीकच्या तरुणपणीच्या मॄणाल कुळकर्णीच्या हास्याने फुललेल्या प्राचीन जाहिराती बघून बरे वाटले. "कील मुहासों को जड से मिटायें, हल्दी चंदन के गुण इसमें समायें..." अशी परिचित ओळ ऐकल्यावर एकदम ऐंशी-नव्वदीतल्या काळात मन जाऊन पोहोचले. यथावकाश 'पारध' सुरु झाला.
सुरुवातच पवनचक्यांनी सजलेल्या डोंगराखालच्या रस्त्याने जाणार्या अलिशान गाड्यांमधून ऐकू येणार्या संवादांनी होते. एक शासकीय समिती पवनचक्क्यांमुळे पर्जन्यमानावर होणार्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एका गावात येत असते आणि येता-येता कोंबडीच्या पार्टीचे बेत आखत असते. खेड्यातली माणसे, शेतकर्यांच्या आत्महत्या, खेड्यातल्या लोकांच्या समस्या याविषयी त्यांची 'अभ्यासपूर्ण' मते ऐकून वैतागलेला एक तरूण त्याच्या विचारांमधून त्याचे खेड्यातले आयुष्य आणि त्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत याविषयी प्रेक्षकांना सांगतो आणि फ्लॅशबॅक पद्धतीने चित्रपट उलगडतो.
तीन भाऊ, एक विवाहित, तिघांचे वृद्ध वडिल, एक बहीण असे मोठे कुटुंब. मोठा भाऊ काबाडकष्ट करून शेती पिकवतो. कुटुंब वारकरी संप्रदायातले. सगळ्यात धाकटा शिकतोय आणि मधला एका स्थानिक पुढार्याच्या नादी लागून स्वतःला वाघ-बिघ समजतोय. बहीण लग्नाशिवाय घरात बसून आहे. मोठ्या भावाच्या मनावर वाढत्या वयाच्या बहीणीच्या लग्नाचं, धाकट्या भावाच्या शिक्षणाचं , आपल्या पिल्लांच्या शिक्षणाचं आणि मधल्या भावाच्या भविष्याचं असं सारं एकत्रित ओझं आहे. वहिनी नेटाने घर चालवते आहे. चित्रपट इथून पुढे सरकत जातो. अमरभाऊ नावाचा एक कुटील राजकारणी मधल्या भावाला (यशवंत) हाताशी धरून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करतो. यशवंतचं महत्व वाढत जातं. घरात पैसा येतो पण मोठा भाऊ (विठू) या अचानक आलेल्या पैशाने सैरभैर होतो. असा आलेला पैसा, बहीणीला सुटलेली पैशाची हाव, त्या मार्गाने घरात शिरलेलं व्यसन आणि यशवंताची अरेरावी यामुळे विठू हतबुद्ध होतो. नंतर बहीणीने अमरभाऊच्या खास माणसासोबत वाढवलेली 'मैत्री ' कुटुंबाच्या संस्कारांवर एक मोठा आघात करते. विठू हताशपणे हे सगळं बघत असतांना राजकारण टिपेला पोहोचतं आणि मग पुढे काय होतं याचं प्रभावी चित्रण म्हणजे 'पारध'.
'पारध'ची पहिली दमदार बाजू म्हणजे प्रभावी आणि पुरेशी वेगवान पटकथा. कथा तशी ढोबळ आहे आणि आधी बर्याचदा पडद्यावर येऊन गेलेली आहे. 'अर्जून', 'भ्रष्टाचार' अशा हिंदी आणि 'सरकारनामा' सारख्या मराठी चित्रपटांमधून अशा पद्धतीची कथा येऊन गेलेली आहे. पण 'पारध'चं वैशिष्ट्य म्हणजे त्याची सशक्त पटकथा आणि दिग्दर्शकाने सादरीकरणाला दिलेला वेगळा चेहरा. गजेन्द्र अहिरेंनी चित्रपट कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. पुरेसा वेग ठेवून त्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. मुख्य भूमिकांचे कंगोरे अधोरेखित करण्यात ते बर्यापैकी यशस्वी होतात. मारुतीबाबा (विनय आपटे) हे पात्र मात्र अतिशय प्रभावहीन आणि अनावश्यक वाटतं. एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे वावरणारे हे पात्र प्रत्यक्षात कुठलीच राजकीय खेळी खेळत नाही. कुठल्याच पकड घेणार्या प्रसंगात या पात्राचं अस्तित्व नसतं. यशवंताची तरुणपणातली 'वाघ' होण्याची खुमखुमी, त्याची अरेरावी, अमरभाऊसमोर गळणारी त्याची लाचारी हे सगळे पैलू अतिशय प्रभावीपणे बाहेर येतात. अमरभाऊचा उजवा हात बाबा देखील अगदी चपखल बसलेला आहे. त्याच्यातला बेरकीपणा आणि परिस्थितीनुरुप रंग बदलण्याची वृत्ती खुबीने दाखवली आहे. इंदू (बहीण) गरीब शेतकरी घरातल्या असहाय आणि वाढलेल्या वयाच्या विवाहोत्सुक आणि सुखलोलूप तरुणीचं परिणामकारक प्रतिनिधित्व करते. या भावंडांचे वृद्ध वडिल मात्र तितकेसे रंगलेले नाहीत. धक्कादायक प्रसंगातही ते गप्प-गप्प राहतात आणि अगदी परक्या व्यक्तीसारखे फक्त मान हलवतात. कुठलाच बाप आपल्या घरात घडणार्या अनपेक्षित घटनांना इतका थंड प्रतिसाद देईल असे वाटत नाही. दिग्दर्शन मनाची पकड घेते. पटकथेला न्याय देणारे दिग्दर्शन आहे असे वाटते.
तांत्रिक पातळीवर 'पारध' ठीक-ठाक आहे. चित्रीकरण तितकंसं खास नाही (की प्रभातचा पडदा काळपट होता कुणास ठाऊक). अंधारलेलं चित्रीकरण चित्रपट बघतांना त्रासदायक वाटतं आणि त्यामुळे रसभंग होतो तो वेगळाच. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' किंवा 'लालबाग परळ' या चित्रपटांच चित्रीकरण अगदी स्वच्छ आणि चकचकीत वाटतं. 'पारध' त्या बाबतीत थोडा कमी पडतो. पार्श्वसंगीत पुरेसं परिणामकारक आहे. चित्रपटात दुसर्या भागात जाणवणारी उत्सुकता, गडदपणा पार्श्वसंगीताने व्यवस्थित पकडला आहे.
थोडा ताण हलका करण्यासाठी इंदूचं पात्र थोडं भोळसट दाखवलेलं आहे. अमरभाऊच्या खास माणसाच्या (बाबाच्या) मदतीने ती कर्ज घेऊन गायी घेते. त्यांची नावे काय ठेवायची या विचारात असतांना यशवंता 'ऐश्वर्या' आणि 'कतरिना' अशी नावे सुचवतो. त्याला थोडा चावट प्रतिसाद म्हणून इंदू यशवंताला 'चावट' ठरवते आणि 'ही नावं ठेवली तर ऐश्वर्याचं दूध काढलं का? कतरिनाचं दूध काढलं का? असं विचारावं लागेल" असं म्हणून प्रेक्षकांचा ताण हलका करते. 'पारध्'चे संवाद देखील परिणामकारक वाटले. एका प्रसंगात बाबा विनाकारण एका स्त्रीला त्रास देतो म्हणून यशवंता त्याला झापतो. "आपण अमरभाऊचे कार्यकर्ते आहोत; पारावरचे गुंड नाहीत" असे म्हणून तो त्या बाईची मनापासून माफी मागतो.
अभिनयाच्या बाबतीत मला व्यक्तीशः आवडला सिद्धार्थ जाधव! यशवंताची भूमिका अक्षरशः जगलाय हा माणूस! चेहर्यावरचे हावभाव, देहबोलीतून अभिनय, डोळ्यांमधून भावनाविष्कार... सगळंच अप्रतिम. अमरभाऊने टाकलेला विश्वास, अमरभाऊचं घरी येणं, अमरभाऊने आपल्याला आपण 'वाघ' आहोत असं सांगण्यातली नशा हे सगळे कंगोरे सिद्धार्थने अतिशय समर्थपणे रंगवले आहेत. एका प्रसंगात यशवंता अमरभाऊची एक कामगिरी फत्ते केल्यावर आधाश्यासारखा चिकनची तंगडी हादडत असतो. मागून अमरभाऊ येतात आणि यशवंता अगदी लाचारीने त्याच्याकडे बघून हसतो. अमरभाऊ त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला नीट जेवायला सांगतो. या प्रसंगात सिद्धार्थने लाचारी, भूक, अमरभाऊचे खास माणूस असल्याचा उन्माद, तोच आपला अन्नदाता असल्याची भावना या सगळ्या छटा इतक्या छान दाखवल्या आहेत की खरचं जवाब नाही. नंतर 'वाघ' असल्याची गुर्मी, अमरभाऊ मागे असल्यावर आपलं कोण काय बिघडवेल हा माज, कुटुंबाविषयीची काळजी, बहिणीचा वापर झाल्याचा राग, जीवाच्या आकांताने पळणारा यशवंता, हे सगळं सिद्धार्थ ताकदीने उभे करतो.
मिलिंद शिंदे मूर्तिमंत हरामखोरपणा जिवंतपणे उभा करतात. यशवंताच्या बहीणीला गेस्टहाऊसवर बोलावून तिला साळसूदपणे 'आपल्याला बलात्कार नाही करायचा' असे सांगणारा आणि नंतर निर्लज्जपणे तिला 'ऑफर' देणारा, शेवटी यशवंताच्या जीवावर उठलेला, अमरभाऊला देखील अप्रत्यक्षरीत्या आपली नखे दाखवणारा बाबा मिलिंद शिंदेंनी अतिशय छान साकारलाय. अभिनयातला आक्रस्ताळेपणा जर त्यांनी कमी केला तर त्यांचा अभिनय अधिक जमून येईल.
यशवंताची बहीण (अभिनेत्रीचं नाव माहित नाही) मस्त झालीय. टीव्हीवर बघून छानछोकीचे आयुष्य जगायला मिळावे म्हणून धडपडणारी, भावाच्या रक्षणासाठी झटणारी, क्षणिक सुखासाठी बाबाच्या आहारी जाणारी आणि उघडपणे तिच्या या कृत्याचं समर्थन करणारी इंदू अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवते.
विठूच्या भूमिकेत रवी काळे छाप पाडतो. असहाय गरीब शेतकरी त्याने चांगला उभा केला आहे. अमरभाऊच्या भूमिकेत मकरंद अनासपुरेने गहिरे रंग भरले आहेत. खलनायकाची भूमिका असणारा त्यांचा हा कदाचित पहिलाच चित्रपट असावा. नाकपुड्या फुगवून, डोळे विस्फारून बेरकीपणा दाखवण्याची त्यांची लकब वाखाणण्याजोगी आहे. त्यांना नेहमीच्या साचेबद्ध विनोदी भूमिकांमधून बाहेर पडून वेगळं काही करण्याची संधी मिळाली आहे त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. त्यांच्या संवादातलं वाक्याच्या शेवटी त्यांनी बोललेलं 'हाव्व...' मात्र तितकसं नैसर्गिक वाटत नाही.
वडिलांच्या भूमिकेत शाहीर विठ्ठल उमप, मारुतीबाबाच्या भूमिकेत विनय आपटे ठीक आहेत. धाकट्या भावाची भूमिका करणारा अभिनेता देखील यथायोग्य.
असा हा 'पारध' मनाला भिडतो हे खरं. आवर्जून पहावा असा चित्रपट!
चित्रपट संपल्यावर बाहेर आलो. पाटीचा फोटो काढायचा होता. मोबाईलमध्ये काढला. इथे डकविण्याची इच्छा होती पण तो मोबाईलवरून काँप्युटरवर कसा घ्यावा ही समस्या असल्याने तूर्तास ती योजना विचाराधीन आहे. शिवाय तुम्ही मंडळी प्रभातला जालचं की 'पारध' बघायला. तेव्हा बघून घ्या ती पाटी! काय?
पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम
पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १
एकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.
(टीप : मागील भागात कादंबरीच्या नायकाचे नाव लिहायचे राहिले होते. ते विन्स्टन स्मिथ असे आहे. अजून एक सांगायची राहिलेली गोष्ट म्हणजे समाजरचना बिग ब्रदर > इनर पार्टी > आउटर पार्टी > सामान्य जनता अशा उतरंडीची आहे. आपला कथा नायक आउटर पार्टीचा घटक आहे).
असा हा विन्स्टन स्मिथ ज्या खात्यात काम करत असतो त्या खात्याचे नाव मिनिस्ट्री ऑफ ट्रुथ असे असते. या खात्याचे काम सत्य फॅब्रिकेट करणे असे असते.
विन्स्टन स्मिथला एकदा एक सूचना मिळते. "अमुक दिवशीच्या बिगब्रदरच्या भाषणाचा वृत्तांतात अतिशय ढिसाळपणे (डबलप्लसअनगुड) दिलेला आहे. त्यात काही अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींविषयी (अनपर्सन्स्) उल्लेख आहेत." स्मिथ ते भाषण काढून वाचतो. त्या भाषणात बिग ब्रदरने कुणा एका कॉम्रेडच्या त्यागाबद्दल आणि निष्ठेबद्दल कौतुक केलेले असते आणि त्याला एक क्रॉस बक्षिस दिलेला असतो. सूचनेतील अनपर्सन या उल्लेखावरून स्मिथला कळते की हा कॉम्रेड बिग ब्रदरच्या मर्जीतून उतरला आणि त्याला ठार करण्यात आले आहे. आता स्मिथचे काम हे आहे की त्या कॉम्रेडचे नामोनिशान सर्व रेकॉर्डमधून पुसणे. तो कॉम्रेड जणू कधी अस्तित्वातच नव्हता.
असेच एकदा योगायोगाने त्याची गाठ एका मुलीशी पडते. ही मुलगी ऍण्टी सेक्स लीगची कार्यकर्ती असते. ऍण्टी सेक्स लीग ही पौगंडावस्थेतील मुलांची संघटना असते. लैंगिक व्यवहार हे राष्ट्रासाठी (पक्षी=पार्टीला कार्यकर्ते मिळावेत म्हणून) करायचे असतात त्याखेरीजच्या लैंगिक व्यवहारांचा निषेध करण्याचे काम ही संघटना करीत असते. त्या मुलीच्यामार्फत तो ओब्रायन नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात येतो.
हा ओब्रायन ब्रदरहूड नावाच्या भूमिगत संघटनेचा सदस्य असतो. ही संघटना बिग ब्रदरची आणि पार्टीची सत्ता उलथून टाकण्यासाठी कार्यरत असते. अशी संघटना अस्तित्वात आहे आणि गोल्डस्टाईन नावाची व्यक्ती तिचे नेतृत्व करते ही माहीती स्मिथला कुजबुज म्हणून माहिती असते. पार्टीच्या वर्तुळात या संघटनेच्या कुकर्मांची चर्चा होत असते. अनेकदा स्मिथला वाटत असते की अशी काही संघटना अस्तित्वात नाही आणि ती मिनिस्ट्री ऑफ ट्रुथचीच काल्पनिक निर्मिती आहे. पण ओब्रायनला भेटल्यावर अशी संघटना आहे अशी त्याची खात्री पटते.
ओब्रायन स्मिथला गोल्डस्टाईनने लिहिलेले पुस्तक वाचायला देतो. पार्टी कशाप्रकारे सर्व लोकांना कंट्रोल करून राज्य करते त्याची तत्त्वे त्या पुस्तकात लिहिलेली असतात. पार्टीच्या "फ्रीडम इज स्लेव्हरी", "इग्नरन्स इज स्ट्रेन्ग्थ" आणि "वॉर इज पीस" या घोषणांमागची विचार प्रेरणा काय याचे स्पष्टीकरण त्यात असते.
त्या पुस्तकातील एका प्रकरणाची थोडक्यात ओळख
वॉर ईज पीस
औद्योगिक क्रांतीच्या काळात यंत्रांचा शोध लागल्यापासूनच मानवी कष्ट, हालअपेष्टा यांपासून मुक्ती मिळण्याची स्वप्ने समाजातल्या विचारवंतांना पडू लागली. जसजसे उत्पादन वाढू लागले तसतसे सर्व जनतेला कष्टरहित आणि मुबलक जीवन देणे शक्य असल्याची जाणीव त्यांना झाली. काही दशकातच असा समाज निर्माण होईल की ज्यात लोक कमी तास काम करतील, त्यांना मुबलक प्रमाणात सर्व उपभोग्य वस्तू उपलब्ध होतील आणि त्यांना कलांचा आणि जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेणे शक्य होईल अशी चित्रे रंगवली जाऊ लागली.
परंतु असा समाज निर्माण होणे हे मुळातूनच धोकादायक असल्याचे समाजव्यवहाराचे नियंत्रण करणार्या लोकांना जाणवू लागले. ज्या समाजात सर्व लोक भरभराटीचे आयुष्य जगतात आणि सर्वांना सर्व सुखसोयी सहज उपलब्ध असतात अशा समाजात विषमतेची उघड चिह्ने शिल्लक रहात नाहीत. अशा भरपूर मोकळा वेळ असणार्या लोकांना स्वतःचा विचार करता येईल आणि केव्हा ना केव्हा तरी नियंत्रक सत्ताधार्यांचे इथे काय काम? असा प्रश्न त्यांना पडून ते त्या सत्ताधार्यांना बाजूस सारतील. म्हणून उतरंडीची समाजरचना दारिद्र्य आणि अज्ञानाच्या वातावरणातच शक्य आहे.
यावर उपाय म्हणून काहींनी शेतकीप्रधान भूतकाळाकडे परतावे असा प्रचार करायचा प्रयत्न केला पण औद्योगीकरणाची ओढ फार प्रबळ झालेली होती. शिवाय त्यातून लष्करीदृष्ट्या कमकुवत होण्याचा आणि त्यामुळे पराभूत होण्याचा धोका होता.
काहींनी उत्पादन कमी करण्याचा उपाय करून पाहिला. १९२०-४० च्या दरम्यान अनेक अर्थव्यवस्था कुजवण्यात आल्या, लोकांना बेकार करून त्यांना सरकारी मदतीवर जगवले गेले. परंतु यातूनही लष्करी कमकुवतपणाचा धोका टळत नव्हताच. पुन्हा टंचाई कृत्रिम असल्याचे लोकांना उघड दिसत होते. प्रश्न होता लोकांचा खरा फायदा करून न देता यंत्रयुगाची चाके फिरती कशी ठेवायची? वस्तू निर्माण करायच्या पण त्यांचे समाजात वाटप करायचे नाही. (किंवा वाटप करण्यायोग्य वस्तू निर्माणच करायच्या नाहीत).
हा दुहेरी हेतू सततच्या युद्धांनी साध्य होतो. लोकांना सुखसोयी पुरवण्यासाठी वापरता येण्याजोग्या वस्तूंचा नाश करण्याचा युद्ध हा मार्ग आहे. जरी युद्धात प्रत्यक्ष वस्तू नष्ट झाल्या नाहीत तरी त्यांचे उत्पादन चालू ठेवता येते; जेणे करून मनुष्यबळाचा वापर कुठल्याही प्रकारे उपयुक्त नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी करता येतो. प्रचंड खर्च करून आपण तरंगता किल्ला बांधत आहोत. थोड्या वर्षांनी हा तरंगता किल्ला कालबाह्य म्हणून टाकून दिला जाईल आणि नवा तरंगता किल्ला बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल.
अशा रीतीने युद्ध हे संपत्तीचा आवश्यक नाश घडवून तर आणतेच पण त्याच बरोबर हे कार्य मानसिकदृष्ट्या स्वीकारार्ह रीतीने घडवून आणते. सततची युद्धमान परिस्थिती लोकांना (इथे आऊटर पार्टी) कायम त्यागासाठी तयार ठेवते. भविष्यात मिळणार्या काल्पनिक विजयाच्या आशेने सत्ताधार्यांना संपूर्ण अधिकार द्यायला लोक तयार होतात. मुळात युद्ध निर्णायक व्हायची शक्यता नसल्याने प्रत्यक्ष परिस्थितीत काही फरक पडण्याची शक्यता नसते. म्हणुन युद्ध हीच समाजात शांतता राखणारी गोष्ट आहे.
पुढे स्मिथ त्या चळवळीत ओढला जातो. काही काळ चळवळीचे काम केल्यावर त्याला एक दिवशी कळते की ओब्रायन...................
अतिशय सिनिकल वर्णनाची कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते ती त्यात सांगितलेल्या राजकीय तत्त्वज्ञानाने. तेही संपूर्ण निराशावादी वाटू शकते. पण त्या तत्त्वज्ञानात आपल्याला आपल्या आजूबाजूच्या समाजात पहायला / ऐकायला मिळणारी इतकी साम्यस्थळे दिसतात की चकित व्हायला होते. [याची संभावना कोणी आशावादी मनुष्य कदाचित - एखाद्या रोगाची लक्षणे वाचल्यावर आपल्याला तो रोग झाल्याचे वाटते अशी करेल]
न्यूस्पीक
वर दोन विचित्र भासतील असे शब्द वेगळ्या रंगात लिहिले आहेत. ते या राज्यातील नव्या भाषेतले आहेत. नव्या भाषेला न्यूस्पीक असे म्हतले जाते. ही इंग्लिशची मोडतोद करून मुद्दाम घडवण्यात आलेली भाषा आहे. या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्यात कमीत कमी शब्द आहेत. आणि जास्तीचे शब्द अनावश्यक म्हणून रद्द केले जात आहेत. उदा गुड आणि बॅड असे दोन शब्द न ठेवता गुड हा एकच शब्द आहे. बॅड ऐवजी अनगुड एक्स्ट्रीमली बॅड च्या ऐवजी डबलप्लस अनगुड वगैरे. दुसरा शब्द अनपर्सन. म्हणजे नसलेलि व्यक्ती.
असे अनेक शब्द आणि वाक्यरचना ऑरवेलने सांगितल्या आहेत. मला स्वत:ला या भाषेच्या खटाटोपाने लोकांची मने नियंत्रित करण्यात सत्ताधार्यांना काय फायदा होऊ शकेल हे कळलेले नाही. कुणाला कळले तर प्रतिसादातून प्रकाश टाकावा.
पुस्तक समाजव्यवहारावर भाष्य करणारे म्हणून वाचनीय आहे.
समाप्त.
सौदागर
ये बहुत लंबी कहानी है! सनातनपुर आणि पालीनगर अशा भरदार नावाच्या गावातील तेवढ्याच भरदार नावांचे राजेश्वर (राजकुमार) आणि दादावीर (दिलीप कुमार) यांची. त्या डोंगरदर्यांत इकडे तिकडे फिरणारा एक माणूस यांच्या कहाण्या सांगेल...
कारण तेथे बहुधा तोच एक शिल्लक राहिला असावा, बाकी गावकर्यांपैकी अर्धे यांची दुश्मनी झाली तेव्हा तर उरलेले अर्धे पुन्हा दोस्ती झाली आहे हे माहीत नसल्यामुळे एकमेकांना मारून मेले असावेत. एक मात्र जाणवते: तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते. आताचे गावकरी, "तुमचे दोस्ती का दुश्मनी काय ते एकदा नक्की ठरवा, आम्हाला आमची कामं आहेत" म्हणून मोकळे झाले असते.
तर ह्या दोघांची फारच मैत्री, "इमली का बूटा बेरी का पेड" टाइपची (म्हणजे काय कोणास ठाऊक). एवढी लंबी कहाणी आहे की यांचे डबल लहानपण दाखवले आहे. म्हणजे खरे लहानपण व तरूणपण सुद्धा. कोण राजकुमार व कोण दिलीपकुमार कळावे म्हणून ते तरूणपण वाले अभिनेते मिमिक्री केल्यासारखे यांची स्टाईल मारत संवाद म्हणतात. लहानपणी एकाच्या पायाला लागते म्हणून दुसरा काही दिवस आपलाही एक पाय गुढघ्यात दुमडून बांधून फिरतो (बाकी ती दोरी सारखी निसटत कशी नाही हे एक आश्चर्यच आहे). गुलशन ग्रोवर राजकुमारच्या बहिणीची छेड काढतो तेव्हा दिलीपकुमार आणि त्याच्यात मारामारी होते, जेव्हा राजकुमार ते पाहतो तेव्हा त्याला पहिला राग त्याने आपल्या मित्राला मारल्याचा येतो. बहीण वगैरे सगळे नंतर.
असेच ते वयाने आणखी मोठे होऊन नकली च्या ऐवजी खरे राजकुमार व दिलीपकुमार होतात. साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे. तेव्हा दोघांचे लग्न ठरते. पण तेवढ्यात दिलीप कुमार तिकडे एका गावी लग्नाला जातो, तेथे हुंड्यासाठी नवरा मुलगा अडून बसतो. लग्न मोडायची वेळ येते तेव्हा दिलीपकुमार स्वत:च त्या मुलीच्या गळ्यात हार घालतो. वास्तविक तेव्हा दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो". कारण त्या मुलीच्या डोळ्यात मुर्तीमंत भीती उभी दिसते ती लग्न मोडण्याची नव्हे तर अवघे पाउणशे वयमान असलेल्या या दादावीरची.
पण राजकुमारच्या बहिणीचे काय? होणार्या नवर्याने कोणालातरी वाचविण्यासाठी तिच्याशी लग्न केले हा हिच्यावर फार मोठा कलंक असल्याने आता ती Poison असे लिहिलेल्या बाटलीतून विष घेते, त्यात तिला वाचवायचे प्रयत्न करण्याचे सोडून सगळे राजकुमार ला तुझ्या मित्राने हिला कसे फसवले वगैरे डॉयलॉग मारत बसतात. पुन्हा एवढ्या वर्षांच्या दोस्तीत तू एखादी गोष्ट का केलीस विचारायची पद्धत नसल्याने डायरेक्ट जानी दुश्मनी चालू होते.
मग सगळे आणखी मोठे होतात (वयाने). यांचे लग्न वगैरे व्हायच्या आधीच हे म्हातार्या रूपात दिसतात आणि मग यांची मुलेच काय नातवंडे सुद्धा मोठी होऊन इलु इलु म्हणायला लागेपर्यंत आणि त्यानंतरही तसेच राहतात.
पहिली काही वर्षे ही दुश्मनी राज कुमारच्या साईडने असते (पुन्हा खुलासे वगैरे भानगड नाही. "मगर मेरी बात तो सुनो", "मुझे कुछ नही सुनना" च्या ऐवजी थेट कारण लोकांनी सांगितले असते तर अनेक चित्रपट १५-२० मिनिटातच संपले असते
). पण दिलीपकुमार चा मुलगा राजकुमारच्या लोकांकडून मारला जातो (असे दिलीपकुमारला वाटते) त्यामुळे आता दोन्ही कडून चालू होते. मग नंतर एकदा राजकुमारलाही अडकवण्यात येते. चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही. त्यामुळे लगेच राजकुमार रंगे हाथ पकडला जातो.
त्यात बाकी दुनियेला यांच्या दुश्मनीत भलताच इंटरेस्ट! त्यामुळे एकवेळ भारत पाक सीमेवर नसेल एवढी यांची स्वत:ची फौज अगदी गणवेष वगैरे घालून बियास नदीच्या दोन्ही तीरावर कायम उभी असते. दोन कुटुंबातील वैर कंट्रोल करणे का कोणास ठाऊक पोलिसांना अशक्य असल्याने मग सरकार थेट मिलिटरीलाच बोलावते त्यामुळे ते ही येतात. मग यांचे कोण, त्यांचे कोण आणि मिलिटरीवाले कोण हे आपल्याला कधीच नीट कळत नाही.
एकदा फारच होते तेव्हा तो मिलिटरी ऑफिसर त्यांना काय जबरदस्त धमकी देतो "तुम्ही गोळीबार थांबवला नाहीत तर मी सरकारकडे तुमचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यासाठी अपील करीन". That should do it! . इकडे हे दोन्ही तीरांवर बंदुका घेऊन एखादी मुलगी जरी एका बाजूने पाण्यात शिरली तरी गोळीबार करतायत आणि तिकडे तो मिलिटरी ऑफिसर विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे करत सर्कारी कार्यालयात खेटे घालतोय असे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले 
विवेक मुश्रन आणि तेव्हाची मनिषा कोइराला यांत कोण जास्त गोंडस दिसतो ते सांगणे अवघड आहे. एवढ्या टाईट बंदोबस्तात हे दोघे मात्र पाहिजे तेव्हा एकमेकांना भेटत असतात. त्या आधी याला लहान असतानाच दुश्मनीतून वाचविण्यासाठी एका गुहेत राहणार्या बाबाकडे "शस्त्रविद्या" शिकायला पाठवलेला असतो. हा तोपर्यंत गुहेत राहिलेला आणि मनिषा शहरातून आलेली. पण हा तिला इंग्रजीतील शॉर्टफॉर्म चा कन्सेप्ट समजावतो... म्हणजे " T " म्हणजे " tea ", " C " म्हणजे " See " (आधी मला वाटले कॉफी) इत्यादी. मग तो I L U म्हणतो. आता मुळात प्रेमात पडण्याच्या वयात असलेल्या शहरी मुलीला एवढी क्लियर हिंट दिल्यावरही I L U म्हणजे काय हे कळायला ते पन्नास वेळा म्हणावे लागते, ते ही लहान मुलांना गाणे शिकवतात तशा हालचाली करत, तेव्हा कळते.
पण दुश्मनी वाढतच असते. "मै ज़मीन पे रहके भी आसमान मे उडता हू" वगैरे संवाद इकडून तिकडून एकमेकांवर सोडले जातात. आणखी एक कारण होते म्हणजे राजकुमारचा नातू दिलीपकुमारच्या गावातील मुलीला फसवतो. पण त्यांना ते एकदम तिला बाळ झाल्यावरच कळते. मधे ८-९ महिने पत्ताच नाही.
अशा बर्याच गोंधळानंतर अचानक परत दोस्ती का व कशी झाली ते कळतच नाही. विवेक मुश्रन व मनिषा कोइराला यांचे प्रेम जाहीर होते व ते होळी भोवती फेरे वगैरे मारतात (त्या वेळी असे आई वडलांकडे रागाने बघत दिसेल त्या आगी भोवती फेरे मारायचे बरेच फॅड आले होते. पाहा: दिल वगैरे). पण एवढ्या वर्षांतील गोष्टींचे खुलासे फारसे कोणी करताना दिसत नाही. एकदम राजकुमारला दिलीपकुमार काहीतरी गुन्हा करण्यापसून वाचवतो, सांगतो की यांनी (व्हिलन्स) हे सर्व केले आहे, तो होळीला याच्यावर रंग फेकतो की दुश्मनी खलास! मग एवढे प्रेम उतू जाते की एकमेकांच्या गालांवर चापट्या मारणे, सॉफ्ट टॉईज घेऊन गाणे म्हणणे, पलंगावर उशा एकमेकांना मारणे ( pillow fight ) वगैरे "मर्दाना हरकती" करतात.
पण नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार्या व्हाव्यात तसे यांचे लोक मारत आणि मरत राहतात. उरलेल्यांना अमरीश पुरी आणि इतर व्हिलन्स तसेच देशी कमी पडले म्हणून कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) वगैरे मारतात. त्यात मुकेश खन्ना दलीप ताहिल बरोबर कड्याजवळ मारामारी करत असताना राजकुमार मधेच ओरडतो की आता हे आपले दोस्त आहेत. लगेच कड्याला लटकणार्या एकाला दुसर्याचे "आजा मेरे भाई" वगैरे चालू. तेवढ्यात अमरीश पुरीने गोळी घातल्याने दोघेही खाली पडतात व आपण त्या सिमेंटच्या जाहिरातीसारख्या संवादांतून वाचतो ("ये दीवार टूटती क्यूं नही?").
यात सौदागर नावाचा काय संबंध आला? मला कळाले नाही, तुम्हाला कळाले तर सांगा
मैसूर
२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले
वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.
वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:
वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.
वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे 
लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच
हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर
मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम
बाकी उटी भाग -२ मध्ये.
ढिसाळ, ढोबळ 'पीपली लाईव्ह'
'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला.
चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच चिघळतो आणि अधिकच गंभीर आणि करुण बनतो. एक विचार म्हणून हा पटण्यासारखाच आहे. त्यामुळे चित्रपटाद्वारे मांडलेल्या विचारसरणीशी माझे मतभेद नाहीत.
चित्रपटाची मांडणी उपहासात्मक आहे. यातले शेतकरी-गावकरी सालस, निरागस वगैरे नाहीत. द.मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांच्या कथांमधून दिसणार्या गावकर्यांसारखे इरसाल आहेत. ते खोटं बोलतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, मर्त्य, स्खलनशील, विकारी अशा सर्वसामान्य माणसांची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसतात. अशा माणसांचं चित्रणही त्यांच्याविषयी जिव्हाळा/कणव उत्पन्न होईल अशा प्रकारे करता येतं. त्यामुळे असं दाखवण्यात काही गैर आहे असं वाटत नाही.
चित्रपटात अनेक गुणी अभिनेते आहेत. रघुवीर यादवसारख्या ओळखीच्या चेहेर्यांपासून ते हबीब तन्वीर यांच्या 'नया थिएटर'मधे घडलेल्या पण आपल्याला परिचित नसलेल्या कलाकारांपर्यंत अनेक कसलेले नट, उत्तर भारतीय गावात शोभतील असे रोचक चेहेरे चित्रपटात दिसतात. ते आपापल्या जागी शोभतात आणि अभिनयही चित्रपटाच्या शैलीला अनुसरून करतात.
तरीही चित्रपट पाहून फारच अपेक्षाभंग झाला. त्यामागची कारणं अशी सांगता येतील:
तपशिलांमध्ये रंग भरण्यात चित्रपट कमी पडतो असं वाटतं. उदा: 'लगान'मध्ये ज्याप्रमाणे विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गाव उभा राहतो, तसं इथे होत नाही. आत्महत्या करु इच्छिणारा नत्था, त्याचा भाऊ, पत्नी, आई यांच्या व्यक्तिरेखा सुरुवातीला थोड्या दिसू लागतात तोच माध्यमं, राजकारणी यांच्या गदारोळात पटकथेला त्यांचा विसर पडतो. या गदारोळात ही माणसं हरवून जातात किंवा त्यांचं माणूसपण बेदखल होतं असं खरं तर दाखवायचं आहे. पण ते प्रेक्षकाला जाणवण्यासाठी मुळात त्यांचा या गदारोळातला वावर हवा तेवढा ठळक, करुण होत नाही. हीच बाब पत्रकार, राजकारणी वगैरेंच्या बाबतीत घडते. या व्यक्तिरेखा केवळ एकरंगी, ढोबळ अशा उभ्या राहतात.
थोड्या काळात पुष्कळ गोष्टी दाखवण्याचा हव्यास चित्रपटाच्या आशयाला मारक ठरतो. प्रसंग रंगण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो, तेवढा दिलाच जात नाही. हे कसं करावं याचं अशाच उपहासात्मक शैलीतलं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलाल शुक्ल यांच्या 'राग दरबारी' या कादंबरीकडे निर्देश करावासा वाटतो. विविध प्रसंगांद्वारे लेखकानं यातल्या व्यक्तिरेखांना विलक्षण परिणामकारक पध्दतीनं जिवंत केलेलं आहे. तसं 'पीपली'मध्ये होत नाही.
माध्यमं टी.आर.पी. साठी वाटेल त्या थराला जातात, राजकारणी स्वार्थापोटी सर्वसामान्यांना कस्पटाप्रमाणे वागवतात, या गोष्टी तर आता शेंबडं पोरही सांगू शकतं. त्याहून वेगळं किंवा जास्त गुंतागुंतीचं यात काहीही दाखवलं जात नाही. जे दिसतं तेही अगदीच वरवरचं आणि शाळकरी आहे. त्यासाठी वापरलेले विनोदी प्रसंगही पटापट उरकून घेतलेले आहेत.
'लालबहादूर', 'इंदिरा', नेहरू' वगैरे नावांचा वापर करून केलेले विनोद चांगले आहेत. त्यात राजकारण्यांचा बेगडीपणा आणि सरकारी योजनांचा फोलपणा दिसतो. हे चित्रपटाच्या आशयाला पूरक असलेले घटक आहेत म्हणून ते विनोद अस्थानी होत नाहीत, तर परिणामकारक होतात.
अशी कल्पकता इतरत्र मात्र फारशी दिसत नाही. नत्था गावच्या पुढार्याकडे मदत मागायला जातो या प्रसंगात पुढार्यांच्या समोर ठेवलेल्या अंड्यांवर कॅमेरा ज्या प्रकारे भिरभिरतो त्यावरून आता पुढच्या प्रसंगात नत्थाचा डांबिसपणा दाखवण्यासाठी अंड्यांचा वापर केला जाणार हे उघड होतं. नंतर पुन्हा त्याच प्रसंगाचा आधार घेऊन एक गावकरी आपली आणि नत्थाची कशी जवळीक होती ते सांगतो तेव्हा तर अगदी शिळ्या कढीला उत आणल्यासारखं वाटतं.
शिवाय, जर नत्था इतपत डांबिस असेल तर तो भावाच्या 'मी आत्महत्या करतो; नको? मग तू कर'च्या जाळ्यात सहजासहजी फसतो ते तेवढंसं पटत नाही. इतका गांजलेला असतानाही ज्याची जीवनेच्छा इतकी जिवंत असते तो आत्महत्येसारख्या गोष्टीला मूक संमती देईल असं वाटत नाही.
'गां* फ* रही है', 'मा****'' वगैरे शब्द/वाक्यं वापरली की प्रेक्षक हसणार म्हणून त्यांचा फैलाव आहे. मलमूत्रासारख्या क्रियांशी संबंधित प्रसंग दाखवले की त्याला प्रेक्षकांची प्रतिक्रिया येणार म्हणून तेही आहे. शौचाचा प्रसंग येतो तोवर माध्यमांच्या नावानं पुष्कळ टी.आर.पी. खेचून झालेला असतो. त्यामुळे त्या प्रसंगात चकटफू हशे कमावण्याची शाळकरी हौसच दिसते. चित्रपटाच्या गाभ्याशी असल्या विनोदांचा संबंध लागत नाही ('लालबहादूर'चा तसा लागतो). त्यातून परिणामकारक अर्कचित्र उभं राहात नाही.
अर्कचित्र परिणामकारक वठण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. चॅप्लिन जेव्हा 'ग्रेट डिक्टेटर'मध्ये हिटलरचा बुटबैंगणपणा, वचावचा भाषण करण्याची त्याची शैली यांचा वापर करतो तेव्हा तो हिटलरचं अर्कचित्रच उभं करत असतो. पण त्यामागचे कष्ट (आणि बुध्दीही) जाणवतात. जर्मन भाषेतले ध्वनी, हिटलरची वक्तृत्वशैली यांचा अभ्यास करून त्यांतलं विनोदमूल्य चॅप्लिन हेरतो. पृथ्वीगोलाबरोबरच्या नृत्याच्या प्रसंगात हिटलरच्या आवडत्या वॅग्नरच्या संगीताचा चॅप्लिन वापर करतो. कलेविषयीच्या नाझींच्या मूर्खासारख्या मतांचा चॅप्लिन विनोदनिर्मितीसाठी वापर करतो. ज्याचं अर्कचित्र काढायचं त्याच्यातल्या 'अर्क' घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी बुध्दी लागते; त्यांचा वापर करून प्रसंग घडवण्यासाठी कल्पकता लागते. 'पीपली'मध्ये दोन्हींचा अभाव जाणवतो.
सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते.
एकंदरीत, मूळ विचार पटण्याजोगा असूनही, शैली रोचक असूनही, दमदार अभिनय असूनही ढोबळ पटकथा आणि तिचं ढिसाळ चित्रण यांमुळे चित्रपट योग्य उंची गाठू शकत नाही. चांगल्या विषयाला हात घालण्याचा एक वाया गेलेला प्रयत्न एवढंच अखेर हाती उरतं.
परदेस
भारतातील व अमेरिकेतील भारतीय यांच्या दोन्ही संस्कृतींबद्दलच्या समजांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना "In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving" असे तो सांगतो. ते टुरिस्टही हे म्हणजे याचा नक्की अर्थ काय असेल ते जणू एका मिनीटात कळाल्यासारखे "Unbelievable, unbelievable" म्हणत राहतात. नंतर अमरीश पुरी आलोक नाथ च्या फार्म हाउस वर येतो. जुना मित्र वगैरे. महिमा त्याची मुलगी.
तेथे अमरिश पुरी आलोक नाथ ला सांगतो की आम्ही आमच्या मुलांना वेस्टर्न कल्चरमधे वाढवलेले असल्याने ते आपली संस्कृती विसरले आहेत. त्यामुळे आम्हाला महिमा सारख्या सुनांची गरज आहे. महिमा ही आदर्श भारतीय नारी असल्याने तिचे नाव गंगा असते. (नशीब हेच प्रतीक पुढे वाढवून शाहरूख चे नाव बंगालचा उपसागर नाही ठेवले). त्यामुळे हे आंतराष्ट्रीय सामाजिक कर्तव्य करणे ही गंगाची जबाबदारी होते.
तिला पसंत करण्यासाठी शाहरूख आणि अपूर्व अग्निहोत्री ही तेथे येतात. आणि मग नुसते दीड दोन तास दोन्हीकडच्या स्टीरीओटाईप्स चे बुडबुडे हवेत उडत असतात. हर वाक्यागणिक "हम (भारतीय) लोग...", "हिन्दुस्थानी सभ्यता मे...", "हमारी संस्कृतीमे..." ने चालू होणारे संवाद इकडून तिकडे जातात. शेवटी तर आता अपूर्व डोक्यावर दोन्ही पंजे उलटे धरून खाली वाकून "प्लीज, प्लीज! I got it! I GOT IT!!" म्हणेल असे वाटले. येथे भारत व अमेरिकेतील लोकांचे एकमेकांबद्दलचे प्राचीन समज वापरले आहेत त्यावरून सुरूवातीला आर्किऑलॉजिकल सोसायटी ऑफ इन्डिया चे आभार का मानले आहेत ते कळते. पण वरचे ते आं.सा.का. निभावण्याची संधी होणारा नवरा केवळ एक कबड्डीची मॅच हरल्याने हुकेल अशी परिस्थिती निर्माण होते. कारण तेथे एक स्वयंवर सारखी सिच्युएशन निर्माण करून जो जिंकेल त्याचे गंगा शी लग्न होईल असे ठरते. मग गंगाला मॅच कोण जिंकणार याची काळजी दिसते, पण दुसरेच लोक आपले लग्न एका कबड्डी मॅचवर ठरवत आहेत याचे तिला काहीच वाटत नाही.
मधेच तो एक पारंपारिक रात्री ग्लासमधे दूध घेउन जाण्याचा शॉट होतो. (कोण तरूण लोक कधी असे ग्लासभर दूध पितात)? येथे महिमा ते दूध घेउन निघते. तेवढ्यात असे दिसते की अपूर्व त्याच्या खोलीत व्हिडीओ कॅमेरा घेउन काहीतरी रेकॉर्ड करत असतो. त्यात त्याला स्वतःच्या बेडवर फणा काढून बसलेला नाग दिसतो. तो अमेरिकन असल्याने लगेच त्याला दरदरून घाम फुटतो. मग महिमा तेथे येते. तेथे नाग बघून ती खाली बसून दोन्ही हात त्याच्याकडे बघून जोडते. भावी नवर्याला भेटायच्या रोमँटिक क्षणी सुद्धा तिला साप या गोष्टीची भारताच्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून मीमांसा करायाच्या आपल्या नैतिक जबाबदारीचे विस्मरण होत नाही. पुन्हा एक "हम लोग साँप को जानवर नही, भगवान मानते है" वाक्य येते. तो साप इच्छाधारी असतो का नाही माहीत नाही. पण आपल्यातून एक सुंदर तरूणी प्रकट करून चार पाच वाईट लोकांचे खून तिच्याकडून पाडण्याएवढा महिमाच्या प्रार्थनेत दम नाही हे लक्षात आल्यावर तो निराश होउन जवळच्या एका कपाटाखाली जातो. आता साप बेडवर न राहता बाजूच्या कपाटाखाली गेला म्हणजे आता त्या खोलीत झोपायला सेफ झाले असे अपूर्व ला ही वाटते.
आता गंगाला अमेरिकेची ओळख होण्यासाठी ती तिकडे येते. येथे अमेरिकन संस्कृतीची सर्व वैगुण्ये आपल्याला दिसतात. अपूर्व सिगरेट व दारू पितो, बार मधे दारू पिउन दंगा करतो. त्याच्या आधीच्या गर्लफ्रेन्ड बरोबर नुसते अफाट फोटो काढतो एवढेच नाही तर ते सहज दिसतील असे त्याच्या बेडरूम मधे लावूनही ठेवतो. त्याच्या या कृत्यांमुळे तो गंगाला आवडेनासा होतो. त्याच वेळेस शाहरूख आवडू लागतो.
अपूर्व कोणीतरी मोठा माणूस असतो. इतका की त्याचे घर हॉलीवूड मधे असूनही त्याला 'ओशन व्ह्यू' असतो. त्यांचे लग्न नुसते ठरल्याची न्यूज "लॉस एंजेलिस" शहर के सबसे बडे पेपर न्यू यॉर्क टाईम्स च्या मुखपृष्ठावर येते, पण त्याची एकच कॉपी त्यांना मिळते ("कृपया एकपेक्षा जास्त प्रत मागू नये" अशी पाटी लिहीलेले न्यू.टाईम्सचे कार्यालय नजरेसमोर आले). त्या पेपरच्या त्याच पानात महिमा शाहरूख ला पराठे बांधून देते. नंतर जेव्हा अपूर्व ते पान परत मागतो तेव्हा ते हरवल्याने तो चिडतो, तर बरोब्बर त्याच वेळेला शाहरूख तेथे येतो व सांगतो की हिने मला फ्रेम करायला ते दिले होते. या प्रकाराची तर्कसंगती लावायची म्हणजे - आपल्याला पराठे ज्या कागदात बांधून दिले आहेत त्या कागदाकडे आधी लक्ष गेले पाहिजे. ह्या फोटोची एकच कॉपी उपलब्ध आहे हे ही त्याला माहीत पाहिजे. हॉलीवूड मधे जवळपास कोठेतरी "पेपरवरचे पराठ्यांचे डाग काढून देनार" चे दुकान पाहिजे. मग हा फोटो सापडत नाही म्हणून अपूर्व आणि महिमा यांत भांडणे होणार हे ही त्याला माहीत पाहिजे व अशा प्रसंगात एकदम एन्ट्री घेता यावी म्हणून त्याला कायम दाराआड उभे राहून त्याची वाट बघावी लागणार. एवढे सगळे न करता तो त्या प्रसंगात एकदम एन्ट्री कशी मारू शकतो हे घईसाहेबांनाच माहीत. एकूणच शाहरूख त्यांच्या बेडरूम मधे, किंवा कोणाच्याही खोलीत कोणीही कधीही दार सुद्धा न ठोठावता घुसत असतो.
अपूर्व ची एन्ट्री त्यामानाने साधी. तो ९० च्या दशकात अमेरिकेत काळी हॅट घालून गाडी चालवतो, तीही ओपन कन्व्हर्टिबल. एकूण हे कथानक कोणत्या दशकात घडले याची घईची काहीतरी गडबड दिसते किंवा कॉस्च्युम डिझाईनरने "द अनटचेबल्स" किंवा "मॅड मेन" समोर ठेउन ते डिझाईन केलेले असावेत. अपूर्व भारतात कधीच आलेला नसतो. आणि तरीही अस्खलित हिन्दी बोलत असतो. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील सर्व लोक, अगदी चायनीज बार ओनर्स सुद्धा हिन्दीच बोलतात. शाहरूख भर तरूणपणी सस्पेंडर्स असलेले फॉर्मल कपडे घालून भारतात आलेला असतो. त्याचे सूट वगैरे सुद्धा कायम वाढत्या अंगाचे असल्यासारखे ढगळ दिसतात. कदाचित अपूर्व आणि शाहरूख दोघांनाही बसतील अशा मधल्या मापाचे बनवले असावेत. गंगाही दिल्ली ते हॉलीवूड विमान प्रवासात सगाईचे सर्व दागिने, भरजरी ड्रेस घालून बसलेली असते. अपूर्व श्रीमंत असल्याने थीम पार्क मधे सुद्धा सूट, टाय घालून फिरतो. शाहरूख एन्ट्रीलाच चित्रकला, कार रिपेअर, संगीत व नृत्यकला आणि पियानो वाजवणे या सर्वात तरबेज आहे हे कळते. पियानो वाजवताना त्याला चित्रपटभर एरव्ही कधीच न लागणारा चष्मा समोर काढून ठेवून वाजवावा लागतो. तो कॉलेज मधे जात नाही, नाहीतर तेथील बॅडमिंटन स्पर्धा जिंकून त्याच दिवशी वादविवाद स्पर्धेत स्त्री श्रेष्ठ की पुरूष हा वाद घालताना हिरॉइनशी ओळख व पहिल्या नजरेत प्रेम झाले असते. त्यात एकदा एका क्लब मधे 'मेड इन हेवन' जोडी निवडण्यासाठी डान्स करताना नेमके तेच दोघे निवडले जातात हा शॉट आहेच.
लग्नाला काही दिवस अजून बाकी असताना मग अपूर्व आणि गंगा लास वेगास ला जायचे ठरवतात. मग तेथे लग्नाआधीच "जिन्दगी का मजा" घेण्याची मागणी अपूर्व करतो ("बाकी लोग अपनी अपनी रूम मे जिन्दगी का मजा ले रहे है" असा संवाद आहे. हे संवाद बहुधा त्या जीवनाचा आनंद घेण्यासंबंधीच्या एका उत्पादनाची जाहिरात लिहीणार्याने लिहीले असावेत). ती ते साफ नाकारते आणि तेथून पळून जाते. आता एथनिक भारतीय वेषात लास वेगास किंवा एलए मधे पळालेली मुलगी पोलिसांना दिसायच्या आत शाहरूखला भेटते. एकतर ती पळाली हे कळल्यावर "पोलिस कमिशनर को फोन लगाओ" असे अमरिश पुरी फर्मावतो. पण अमेरिकेत हे पदच आस्तित्त्वात नसल्याने नक्की कोणाला फोन करायचा हे कोणालाच कळाले नसावे. त्यात शाहरूख चे जासूस चारो तरफ फैले हुवे असल्याने ती एलए च्या कोणत्यातरी स्टेशन वर दिसली हे त्याला कळते. मग तो "वेस्ट कोस्ट एक्स्प्रेस" ने तेथे येतो. तो जेथे उतरतो तेथेच समोर ती उभी असते.
मग ते भारतात पळून जातात. फैले हुवे जासूस इंडस्ट्रीमुळे हे ही कोणीतरी प्रत्यक्ष बघते व अपूर्व ला सांगते. आंतरराष्ट्रीय प्रवासास शाहरूख व गंगा ला पासपोर्ट वगैरेंची गरज पडत नाही. कदाचित "हमारे संस्कृती मे पासपोर्ट नही पूछा करते..." वगैरे वाक्ये सुरू झाल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने "नको नको, त्यापेक्षा तू जा" म्हणून स्वतःची सुटका करून घेतली असेल.
ते भारतात आल्यावर तिच्या घरचे तिलाच दोष देतात. आपल्या वागण्याचे कारण चित्रपट संपेपर्यंत सांगायचे नाही या हट्टामुळे तिचाच दोष आहे असा समज निर्माण होतो. मग शाहरूख ला हाकलून दिले जाते. नंतर गंगा घरातून पळून जाते. काही वेळ आधी निघून गेलेला शाहरूख, नंतर बर्याच वेळाने घरातून पुन्हा पळालेली गंगा, नंतर अमेरिकेतून आलेला अपूर्व आणि इतर रिकामटेकडी मंडळी हे सर्व कोणत्यातरी पुरातन इमारतीत एकाच वेळेला आपोआप येतात. काळ व दिशा यांची कोणतीही बंधने त्यांच्या आड येत नाहीत.
शेवटी सर्व उघडकीला येते. सर्व म्हणजे ते जिंदगी का मजा प्रकरण. पण यामुळे गंगाने अमेरिकेतून थेट भारतात पळून येणे हे योग्य ठरते. मग शेवटी तिचे शाहरूखशीच लग्न ठरून हा चित्रपट संपतो आणि दोन्ही संस्कृती सुटकेचा निश्वास टाकतात.
एक ब्लूपरः आता या वेगळ्या ब्लूपर ची काय गरज आहे असे आपल्याला वाटेल. पण ते ही आहे. अमरिश पुरी शाह रूख ला दुसरीकडे जायला सांगत असल्याच्या शॉट मधे मागे एक फ्रेम आहे. क्लिंटन व अमरिश पुरी हात मिळवताना. ते नीट बघितले तर लक्षात येते की भलत्याच दोन माणसांच्या फोटोवर क्लिंटन व पुरीसाहेबांचे चेहरे चिकटवले आहेत. आणि ब्लूपर ऑन ब्लूपर हा की हा फोटो फक्त समोरच्या शॉट मधे दिसतो, त्याच चर्चेच्या बाजूने घेतलेल्या शॉट मधे तो कोठेच दिसत नाही.
भाषाभान : पुस्तक परिचय
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्या आहेत.
लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे. संपुर्ण पुस्तकात मराठी भाषा वैयक्तिक कारणासाठी म्हणा की इतर कारणाराठी वापरतांना घ्यावयाची काळजी लेखीकेने अत्यंत मार्मिकतेने सांगीतलेली आहे.
डॉ. नीलिमा गुंडी यांचे बरेचसे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यात काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन सहाय्यही केलेले आहे. अशा अधिकारी व्यक्तीकडून भाषेविषयीचे भान होणे हे मराठी वाचकांना एक पर्वणी आहे.
या पुस्तकात मुलांची, माणसांची ठेवलेली नावे, लहान मुलांची शब्दसंपत्ती वाढवण्याची शक्ती, शुद्धलेखनात होणार्या चुका, नवतरूणांची भाषा आदी लेख विभाग १ मध्ये आलेले आहेत.
विभाग २ हा मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यात मराठी भाषेचे अभिसरण- एक आव्हान व मराठीची आजची स्थिती ह्या दोन लेखात मराठी भाषेला वैश्विक स्तरावर कसे मोठे करता येईल याचे विवेचन आहे. लेखीकेच्या मते भाषा प्रवाही असणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर व व्यावहारीक स्तरावर साधे वाक् प्रचार कशा पद्धतीने शिकविले पाहिजे याचे विवेचन आहे. भाषा 'श्रवण करणे' अन त्याचा उपयोग लेखनात करणे याचे महत्व त्यांनी 'श्रॄतयोजन: भाषेचा वारसा' या लेखात सोदाहरण पटवून दिलेले आहे. 'वाचन: एक भाषिक कौशल्य' या लेखात वाचन करतांना काय काळजी घेतली पाहीजे हे सांगितले आहे. या लेखातील एक उदाहरण द्यावेसे वाटते: वाक् प्रचारात अर्थसौंदर्याचेही भान हवे. उदा. 'त्याची फे फे उडाली' हे वाक्य वाचतांना 'फे फे' चा 'नेने' सारखा आडनाव समजून उच्चार केला, तर वाचणार्याचीच फे फे उडत आहे, हे जाणवेल.
स्त्रियांची भाषा या विषयी दोन लेख आलेले आहेत. स्त्रियांच्या भाषेत युगजाणीव व्यक्त करण्याची, वास्तव बदलण्याची सुप्त क्षमता आहे असे लेखीका म्हणते. पु. ल. देशपांडे यांच्या 'व्यक्ति आणि वल्ली' व 'अपूर्वाई' या दोन पुस्तकांची रसग्रहणे भाषिक अंगाने आलेली आहेत. आपल्या बालसाहित्यात रुढ भाषेच्या अलिकडची पलिकडची भाषा समाविष्ट आहे का? असा प्रश्न त्या 'बालासाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा' या लेखात विचारतात. खरोखर आपले बालसाहित्य या गुणांनी युक्त आहे का? यशवंतांच्या 'आई' कवितेचे परिष्करण' या लेखात कवि यशवंतांनी 'आई' या कवितेत कसे व का बदल केलेत ते स्पष्ट केले आहे.
'भाषा: व्यवस्थेशी निगडीत प्रतिमा' या लेखात भाषाव्यवस्थेशी निगडीत प्रतिमासॄष्टी मराठी कवितेत कसकशा स्वरूपात आढळते, यांचा सोदाहरण शोध घेण्याचा प्रयत्न आहे. विरामचिन्हे, पुर्णविराम, नाम, सर्वनाम आदी मराठी व्याकरणातील संकल्पना हाती धरून मराठी कवितेचा प्रांत मराठी कवींनी कसा समृद्ध केला आहे हे त्यातील उदाहरणांवरून दिसून येते. अनेक कवींनी मराठीत अशा कविता आधीच लिहीलेल्या आहेत. तरीही अशा कवींची संख्या तुलनेने कमी असल्याचे त्या मान्य करतात.
"'म' मराठीचा" या लेखात त्यांनी मराठीचा शिक्षणक्रमात अभ्यास कसा असावा याबाबत मते नोंदवलेली आहेत. आपल्या राजकारण्यांनी अस समाजकारण्यांनी त्या मताचा अभ्यास केल्यास मराठी भाषेसाठी कोणतीही चळवळ उभी करावी लागणार नाही, 'भाष्यलक्षी अभ्यासक्रम' महाविद्यालयांत सर्व शाखांसाठी सुरू करावेत. पहिलीपासूनच मराठी अनिवार्य हवी, आदी त्यांची मते आहेत. "एकंदरीत 'म' मराठीचा' असे बिंबवायला हवे!" हे त्यांचे वाक्य बरेच काही सांगून जाते.
लेखीकेने दोन भाषाधुरीणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट आहेत.
भाषातज्ञ डॉ, अशोक केळकर यांची मुलाखत बर्याच अंगांनी त्यांच्या कार्याबद्दल झाली आहे.
कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत म्हणजे आजच्या मराठीची अवस्था, शिक्षणपद्धती, मराठीचे व्यावहारीक उपयोजन आदिंची सांप्रत अवस्थेवर ओढलेले आसूड आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
या पुस्तकपरीचयात मी त्या मुलाखतीतील काही भाग विस्तृत प्रमाणात देत आहे, जेणे करून काही लोकांपर्यंत तरी त्याचे शाब्दीक निखारे पोहोचतील व त्यातून अंगार पेटेल.
"नृत्य, नाट्य, शिल्प आदिं कलेच्या विषयांत विद्यार्थ्याला काहीतरी कला सादर करावी लागते. मराठीचा अभ्यास करणार्याला काय साहित्यविषयक कला सादर करावी लागते? त्याचा अभ्यास केवळ वाड:मयाचा अभ्यास, समिक्षा, काव्यशास्त्र, भाषाविज्ञान आदींपुरताच मर्यादित असतो. किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात? काही महाविद्यालयांमध्ये मराठीची केवळ १५० पुस्तके असतांनादेखील तेथे एम. ए. मराठी करण्याची 'सोय' आहे. केवळ विद्यार्थीसंख्या वाढली आहे. गुणात्मक वाढ कमी झाली आहे.मराठी संस्थाच इंग्रजी शाळा सुरू करतात हि उद्विगनतेची बाब आहे. मराठी समाज इंग्रजीला घाबरून गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाला कोठलेच शैक्षणीक धोरण नाही. पक्ष कोठलाही असो. वीसएक वर्षात कमालीची अनागोंदी शिक्षण खात्यात आहे. शाळा पाहिजे- घेवून जा. महाविद्यालय हवे- घेवून जा. व्यावसायीक शिक्षणसंस्था पाहिजे- उशीर कशाला करता असे महाराष्ट्रीय शासनाचे धोरण आहे. शासन या सर्वांतून पैसा कमावते आहे. मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे. शासनाकडे विचारशक्ती, कल्पनाशक्ती नाही. इतर प्रांतांमध्ये शिक्षणाचे माध्यम त्या त्या प्रादेशीक भाषा आहेत. आपल्याकडे इंग्रजी शाळांमधून लोअरलेव्हल चे मराठी शिकविले जाते. मराठीला प्राधान्य देण्याचे धोरण शासन जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत मराठी सर्वसामान्यांपर्यंत जाणार नाही.
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील संबंध प्रेममय असले पाहिजे. कालपरवा पर्यंत खेड्यातील मराठी (आणि लोकही) हिणकस असतात असे प्रमाण मराठी वापरणार्यांना वाटत होते. आता ते प्रमाण कमी झालेले आहे. भाषेच्या विकासात सर्वात महत्वाची गोष्ट असते ताठ कण्याचे सरकार. महाराष्ट्र शासनाचा कणा किती ताठ आहे हे आपण पदोपदी अनुभवतोच आहोत.महाराष्ट्रातील वैचारीक घुसळण याघडीला थांबलेलीच आहे. आपण मराठी आहोत आणि सगळे व्यवहार मराठीतूनच करू असा आग्रह सोडू नका".
या प्रदिर्घ मुलाखतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्यापैकी ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे त्याने त्याने ही मुलाखत वाचलीच पाहीजे. या मुलाखतीचे जळजळीत अंजन प्रत्येकाने आपल्या डोळ्यातून घातले पाहीजे.
खरे पाहता 'भाषाभान' या पुस्तकाचे नाव 'मराठीचे भाषाभान' असे ठेवायला काहीच हरकत नाही.
वाच्यार्थ पोहोचवणारी 'अभिधा' शक्ती, लक्षार्थ देणारी 'लक्षणा' शक्ती आणि व्यंगार्थ (सुचवलेला अर्थ) प्रकट करणारी 'व्यंजना' शक्ती या भाषेच्या तीन शक्ती कार्यरत असतात. लेखीकेने 'भाषाभान' हे पुस्तक या तीन शक्तींना अर्पण केलेले आहे. वाचकांचे मराठी भाषाविषयक भान तल्लख होण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल असा लेखीकेला विश्वास वाटतो.
लेखिकेचे मराठी भाषाविषयीचे कुतूहल आणि सामाजिक भान यांना समतोल विचारांचीही यात जोड मिळाली आहे. यातील लेख लालित्यपुर्ण शैलीमुळे वाचकांना आपलेसे करतील आणि चिंतनशीलतेमुळे त्यांना अंतर्मुखही करतील.
भाषाभान
डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
प्रकाशकः उन्मेश प्रकाशन, पुणे
प्रकाशनः २००८ किंमतः १५० रू. पाने: १७१
पीपली लाइव
पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्या एका गरीब शेतकर्याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट.
चित्रपटाला निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. मुख्यप्रदेशात निवडणूका येउ घातल्या आहेत आणि पीपली गाव मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे. एकीकडे मुख्यमंत्री, ठाकूर, पप्पूलाल (ठाकूरचा प्रतिस्पर्धी), कृषीमंत्री किडवई ह्यांच्यातली रस्सीखेच तर दुसरीकडे हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलवाल्यांची रस्सीखेच अप्रतीम सादर केली आहे.
सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत, विशेषतः नथा, त्याची बायको, अम्माजी, राकेश (लोकल रिपोर्टर).. होरी महातो आणि 'लालबहादूर' सुद्धा एकदम परिणामकारक. मला स्वतःला नथाची बायको आणि होरी महातो ह्यांची मरण्यापेक्षा जगण्याची जिद्द खूप खूप भावली. संगीत सुद्धा छान आहे. 'महंगाइ डायन' गाणे मस्तच आहे. अनुशा रिजवी ह्यांचे दिग्दर्शन केवळ अप्रतीम.
फेमला रात्री १० चा शो होता. शो सुरू होण्याआधी राष्ट्र्गीत एकवले गेले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र्गीत एकल्यावर छान वाटले. चित्रपट संपल्यावर जी जाणिव झाली ती मात्र खूप वेदना देणारी होती...
पुस्तकपरिचय-१९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल- भाग १
जॉर्ज ऑरवेलच्या ऍनिमल फ़ार्मवरील चर्चेच्या निमित्ताने त्याच्याच दुसया एका कादंबरीची आठवण अनेकांना झाली. ऍनिमल फ़ार्ममधील "ऑल ऍनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल" या प्रसिद्ध वाक्यासारखेच "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे १९८४ मधील प्रसिद्ध झालेले वाक्य बहुतेकांना माहिती असते. परंतु प्रत्यक्ष कादंबरी फ़ार जणांनी वाचलेली असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्या कादंबरीचा थोडक्यात परिचय. मला ही कादंबरी वाचून दहाएक वर्षे झाली आहेत पण त्यातली कथावस्तू आणि सोशल कॉमेंट मनावर कोरली गेलेली आहे.
पार्श्वभूमी :
ऑर्वेलने ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली आहे आणि १९८४ मधली परिस्थिती कल्पिली आहे. १९४८ हे साल म्हणजे दुसरे महायुद्ध संपून फ़ार काळ लोटला नव्हता. महायुद्धाचा परिणाम म्हणून पूर्व युरोप सोव्हिएट रशियाच्या अंमला खाली आला होता. त्याचप्रमाणे पाश्चात्यांच्या साम्राज्यातून अनेक देश हळूहळू मुक्त होत होते. त्यांतल्या बर्याच देशांच्या नव्या नेतृत्वावर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा पगडा होता. त्यामुळे सर्व जग साम्यवादाकडे वळण्याची शक्यता त्याकाळी वास्तव समजली जाई. त्यानुसार १९८४ पर्यंत सगळे जग साम्यवादी बनलेले असेल अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिली आहे.
संपूर्ण जग साम्यवादी बनले आहे आणि आता जगात वेगवेगळे देश राहिलेले नसून तीनच देश राहिले आहेत. एक ओशियानिया म्हणजे अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा प्रदेश आणि ब्रिटन, दुसरा युरेशिया, म्हणजे सगळा युरोप आणि रशिया, मध्यपूर्वेतला प्रदेश, आफ़्रिका, आणि तिसरा इस्टेशिया म्हणजे पूर्वेकडील आशियाई देश. (ही विभागणी साधारण अशी असल्याचे स्मरते. चूभूदेघे.)
अशा जगातल्या ओशियानिया देशात राहणाया एका सामान्य माणसाची ही कथा आहे. त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांची वर्तणूक. राज्य करण्याच्या आणि टिकवण्याच्या युक्त्या, सामान्यांचे राज्यकर्त्यांविषयीचे मत, परंतु सर्वंकष सत्तेमुळे ते व्यक्त न करण्याची घ्यावी लागणारी काळजी यांचे अतिशय सिकनिंग वर्णन कादंबरीत आहे.
बिग ब्रदर इज वॉचिंग
या मनुष्याच्या घरात एक टीव्हीचा पडदा आहे आणि त्या पडद्यावर पार्टीच्या सर्वोच्च नेत्याची - बिग ब्रदरची (पार्टीचे सर्व सदस्य म्हणजे ब्रदर आणि हा नेता बिग ब्रदर)- भाषणे सतत चालू असतात. तो टीव्ही बंद करण्याची कोणतीही सोय नाही. इतकेच नाही तर त्या टीव्हीतून या मनुष्यावर नजर ठेवली जाते. आणि तो काही चुकीचे वागताना दिसला तर त्या पडद्यातून त्याची कानउघाडणी केली जाते. ही परिस्थिती देशातील प्रत्येक माणसाच्या घराची आहे. त्यावरून "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे वाक्य जन्माला आले.
(मला नक्की आठवत नाही पण बहुधा लोकांना लग्न करण्याचीसुद्धा परवानगी नाही).
प्रचार
या मनुष्याच्या कामाचे स्वरूपही रोचक आहे. सरकारी रेकॉर्डस् सांभाळण्याचे काम त्याच्याकडे आहे. रेकॉर्डस् सांभाळणे म्हणजे सध्याच्या सरकारी धोरणाशी रेकॉर्डस् सुसंगत राखणे. उदा. मागच्या आठवड्यात रेशनचा कोटा क्ष आहे आणि या आठवड्यात तो कमी करून य इतका केला गेला आहे. असे असूनही सरकारी घोषणा "सरकारला हे कळवण्यात आनंद होत आहे की या आठवड्यापासून रेशनचा कोटा वाढवून य इतका करण्यात आला आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे" अशी होते. आता या घोषणेला अनुसरून मागच्या आठवड्यापर्यंतचे जुने रेकॉर्ड बदलून घेणे हे या माणसाचे काम आहे. मागच्या कुठच्याही रेकॉर्डमध्ये हा कोटा आधी य पेक्षा जास्त होता असे पुरावे राहता कामा नयेत. रेकॉर्ड बदलल्यावर जुने रेकॉर्डचे कागद तो एका नळकांड्यात टाकतो.
सरकारी प्रचाराचा दणका एवढा असतो की पूर्वी हा कोटा जास्त होता हे हा रेकॉर्डची अफरातफर करणार्या माणसालाही नीटसे आठवत नाही.
हे तीनही देश एकमेकांशी कायम युद्ध करीत असतात. देशातल्या बहुतेकांसाठी हे युद्ध कुठेतरी लांबवर सीमेवर चालू असते. पण त्या युद्धाशी संबंधित प्रचार मात्र प्रसारमाध्यमातून चालू असतो.
तीन देशातले कोणतेतरी दोन देश युतीत असतात. आणि ते तिसर्याविरुद्ध लढत असतात. पण या युत्या स्थिर नसतात आणि युती बदलेल त्यानुसार शत्रू आणि मित्रांची नावे प्रचारात बदलतात. आपल्या सैन्याने मोठा विजय मिळवला असल्याची बातमी अधूनमधून सांगितली जाते. प्रत्यक्ष वस्तुस्थितीत काहीही फरक पडत नाही.
क्रमश:
अॅनिमल फार्म (मला कळलेले)
पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.
काल लायब्ररी मधे एक पुस्तक शोधताना Relevant Search मधे अॅनिमल फार्म दिसले. लगेच बैठक मारली आणि ३-४ तासात इनमिन १५० पानांचे पुस्तक संपवून टाकले. पुस्तक संपवले खरे, पण ऑर्वेल ने मनात जी बैठक मारली ती मारलीच वर लिहायलाही उद्युक्त केलय. बर्याच जणानी हे पुस्तक वाचले असेल, तरीही माझे हे दिन पैसे या पुस्तकाबद्दल.
जॉर्ज ऑर्वेल ने १९३७ साली लिहायला घेतलेले, पण १९४३ पर्यंत प्रकाशित न झालेले १५० पानांचे हे "अॅनिमल फार्म - अ फेअरी स्टोरी " नावाचे पुस्तक. सरळपणे बघायला गेल्यास, एखादी इसापनीती, हितोपदेश सारखी गोष्ट. पण एका छोट्या शेतावर राहणार्या प्राण्यांच्या जीवनात घडणारी ही गोष्ट वाचून संपल्यावर इतिहास, समाजजीवन, संस्कृती, मानव स्वभाव या इतर अनेक पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला स्वतःबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडते.
मूळ कथा अगदी साधीसरळ. जोन्स नावाच्या एका शेतकर्याच्या शेतावर बैल, गायी, घोडे, डुकरे, कुत्रे, गाढव, कोंबड्या, मेंढ्या असे बरेच प्राणी राहत असतात. आपापले काम प्रामाणिक पणे करत असतात. पण मेजर म्हणून एक सर्वात वयस्कर डुक्कर ज्याला सर्व प्राणी फार मान देत असतात, त्याला सारखे वाटत असते की 'अरे, आपल्याला यातून काय मिळते? जेमतेम जगण्यापुरते खायला आणि राहायला. बाकी सर्व फायदा या मनुष्यांना. तर नाही, आपण यांची गुलामी आता नाही करायची.' तो सर्व प्राण्याना एकत्र करुन त्यांच्या मनात या पारतंत्र्या विरुद्ध लढायची प्रेरणा निर्माण करतो. तो मेल्यावर त्या कळपातील दोन हुशार डुकरे, नेपोलिअन आणि स्नोबॉल, त्याचा वारसा पुढे चालवताना जोडीने सर्व प्राण्याना लिहावाचायला शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन सुशिक्षित झालेले प्राणी नीट विचार करुन जागरुक होतील. काही प्राणी , जे चलाख असतात ते शिकतात , काहीजण नाहीत. पुढे एकदा जोन्स च्या चुकीने उपाशी राहायला लागते आणि तिथेच क्रांतीची ठिणगी पडते. सर्व प्राणी माणसांवर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात आणि शेताचा ताबा घेतात. सर्व जणाना गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून कामे वाटून घेतली जातात. स्नोबॉल आणि नेपोलिअन सर्वात जास्त ज्ञानी असल्याने सर्व मॅनेजमेंट चे काम बघतात. घोडे शेतीकाम आणि ओझी वाहणे तर बाकी सर्व प्राणी आपापल्यानुसार ताकदीची कामे वाटून धेतात. सर्वांचे चांगले व्हावे, शांततेत सर्व कामे पार पडावी म्हणून सात नियमांची घटना लिहीली जाते.ती अशी
१. जे कोणी दोन पायांवर चालतील ते शत्रू
२. जे कोणी चार पायांवर चालतील किंवा ज्याना पंख आहेत ते मित्र.
३. कोणताही प्राणी माणसासारखे कपडे घालणार नाही.
४. कोणताही प्राणी माणसासारखा बिछान्यात झोपणार नाही.
५. कोणताही प्राणी दारु पिणार नाही.
६. कोणताही प्राणी दुसर्या प्राण्याची हत्या करणार नाही.
७. सर्व प्राणी समान आहेत. (All animals are equal.)
अशाप्रकारे काही दिवस आनंदात जातात. पण जसा जसा काळ जायला लागतो तसतशी प्राण्यांमधे धुसफुशी सुरु होतात. आपणच शेताचे सर्वेसर्वा व्हावे असे काही प्राण्यांना वाटू लागते. राजकारण खेळले जाउ लागते. एकाएका जातीला हाताशी धरून दुसर्याचा काटा काढणे, इतर प्राण्यांची मने कलुषित करुन भांडणे लावून आपला स्वार्थ साधणे, सर्वांचे हित साधण्याचा देखावा करुन फक्त आपले आणि आपल्या बगल्बच्चांचे हित साधणे असे प्रकार होउ लागतात. आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्याचा काटा काढणे अशा सर्व थरांना गोष्टी नेल्या जातात. मात्र एवढे करुनही सामान्य प्राण्याना 'तुमच्या भल्यासाठीच आम्ही हे करतोय' अशी भ्रामक समजूत करुन दिली जाते. सर्व आपल्या मनासारखे करण्यासाठी हे मूठ्भर प्राणी सर्व नियमांवर बोळा फिरवून शेवटी एकच नियम बनवतात की "all animal ara equal but some are more qual than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.
दुसर्या महायुद्धाच्या कालखंडात बेतलेली आणि मुख्यत्वे साम्यवाद (मार्क्सवाद) आणि त्याच्या तत्वावर टीका करुन त्यातला फोलपणा दाखवणारी ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते. कारण ऑर्वेल ची माणसाचा स्वभाब अचूक टिपण्याची हातोटी. आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेले सर्वात प्रभावी असे हे व्यक्तिचित्रण. साम्यवाद, कॅपिटॅलिझम, क्रांतीवाद, गांधीवाद, कोणताही वाद घ्या, किंवा कोणतेही तत्वज्ञान्/संस्कृती घ्या, तिच्या उदयाची, भरभराटीची कारणे आणि त्याछ बरोबर अस्ताचीही कारणे या छोट्याश्या गोष्टीच्या आधारे स्पष्ट करता येतात कारण सर्वांच्या मागे असलेली एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो. एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी म्हणून घेणार्यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच.
आजचे जगातले कोणतेही प्रश्न उदाहरणार्थ जातीवाद, वंशवाद, भूभागावरील संघर्ष हे सर्व आपण या कथेशी सहज जोडू शकतो. ते आपल्यावर आहे की कोणता प्रश्न आपल्या जीवनाशी जास्त निगडीत आहे. मग तो भ्रष्टाचार असेल, दैनंदिन गरजांची उणीव असेल अथवा देशभक्ती असेल. पूर्ण कथा वाचताना क्षणभर असे जाणवेल की अरे याचे कारण हेच आहे आणि उत्तर हे असेल. पुढच्याच क्षणी असे वाटेल की ते निसटून गेले. पुस्तक संपले की ते अस्वस्थ करतेच पण आपल्याला कारणे कळून पण बर्याच वेळा आपण काही करू शकत नाही याची चुटपूट ही लावते.
हे माझे दोन पैसे. ही सर्व माझी मते कुणालाही मूर्खपणाची , विचारजंती वाटू शकतात पण त्याला इलाज नाही. तो कथेचा दोष. कारण शेवटी "All men are equal, but nobdy is same" हेच खरे.

