टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
गुंतवणूक
शेअर बाजारात फेरफटका.
प्रेषक विसोबा खेचर ( बुध, ०४/०२/२००८ - १०:३३) .राम राम मंडळी,
नाना चेंगट, शरूबाबा यांच्याप्रमाणे आज जरा आम्हालाही शेअर बाजारात फेरफटका मारायचा मूड आला म्हणून हे चार शब्द!
तांत्रिक विश्लेषण -
कालचा बंद १५६००.
वरची पातळी साधारण १८२०० च्या आसपास आणि खाली साधारण पहिली पातळी १५३०० (कालच्या बंदच्या जवळ) व दुसरी १४७०० च्या आसपास निर्देशांक फिरतो आहे असे दिसते. ही रेंज गेल्या महिन्या सव्वा महिन्यांच्या कालावधीतील आहे. म्हणजे साधारण ३२०० ची उलथापालथ! बाजाराच्या दृष्टीने महिन्याभराच्या कालावधीत ३२०० अंकांची उलथापालथ ठीक नव्हे!
मंडळी, आजचा १५६०० निर्देशांक पाहता, इथून फक्त १८०० अंक दूर असलेली दिनांक १७ ऑगस्ट २००७ रोजीची १३७८० ही पातळी तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टीने मला महत्वाची वाटते. १३७८० या पातळीवरून बाजाराने खूप मोठी झेप घेतली आणि या दिवसापासून बाजाराने पुन्हा कधीही मागे वळून हा आकडा बघितला नाही आणि दिनांक १० जानेवारी २००८ रोजी थेट २१२०० ची पातळी गाठली! म्हणजे साधारणत: ५ महिन्यांच्या कालावधीत ७२०० अंकांची भयानक तेजी!
या कालावधीतील माझ्या सर्व प्रतिसादांत, 'हे जे काही चाललं आहे ते मला कळत नाही, मी बाजारापासून सध्या दूर कोपर्यात हातात पैशे घेऊन चुपचाप बसलो आहे' असंच म्हटलं आहे. तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या. शेवटी व्हायचं तेच झालं आणि ५ महिन्यात ७२०० अंक चढलेला निर्देशांक पुढे अवघ्या सव्वा दोन महिन्यांत (१० जानेवारी ते १८ मार्च) २१२०० च्या उच्चांकावरून सणसणीत ६५०० अंकांनी आपटला व दिनांक १८ मार्च रोजी १४७०० ला बंद झाला! आणि आज तो १५६०० इतका आहे.
म्हणजे आता बघा हां मंडळी गंमत कशी आहे ती!
दिनांक - १७ ऑगस्ट २००७ - १३७८०.
दिनांक - ०१ एप्रिल २००८ १५६००.
म्हणजे वरील साडे सात महिन्यांच्या कालावधीतील खरी तेजी ही फक्त १५६०० वजा १३७८० = १८२० अंकांची आहे आणि ह्या तेजीला अधिक रिऍलिस्टिक म्हणता येईल! आणि म्हणूनच मी ५ महिन्यांतील ७२०० अंकांच्या तेजीला "भयानक तेजी" असे शब्द वापरले आहेत!
काय मंडळी, मी म्हणतोय ते पटतंय का? पटलं तर घ्या, नायतर द्या सोडून!
सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत! माझ्या निरिक्षणानुसार २१२०० च्या पातळीवर बाजारातील जवळ जवळ ९० टक्के समभाग हे यापैकी 'किंमत/मिळकत गुणोत्तर' या निकषात बसत नव्हते आणि त्याच वेळेस नेमके सगळेजण आता बाजार २४००० जाणार, २५००० जाणार असे मांडे खात बाजारात पैसे गुंतवत होते. शेवटी व्हायचं तेच झालं!
असो..
तांत्रिक दृष्ट्या बोलायचं झालं तर वर म्हटल्याप्रमाणे १७ ऑगस्ट २००७ ची १३७८० ही पातळी आणि अलिकडच्या काळातील २७ फेब्रुवारीची १८१०० ही पातळी, या दोन्ही पातळ्यांचं आता निरिक्षण करावं लागेल. त्यानंतर भले तेजी आली तरी १८१०० हा पहिला महत्वाचा टप्पा मानावा लागेल, त्यानंतर पूर्वीचा १० जानेवारीचा २१२०० चा दुसरा टप्पा,
आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)**
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी सध्या माझ्याकरता आणि माझ्या अशिलांकरता हळूहळू खरेदी करत आहे. कारण आत्ता नेमक्या बर्याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून येत्या एक ते तीन वर्षांचा कालावधी गृहीत धरल्यास ह्या कंपन्या अतिशय चांगला परतावा देतील असं माझा अनुभव सांगतो..! आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल! शिवाय डोकं बाहेर असल्यामुळे बाहेरच्या खांबाला डोकं आपटून धावत्या गाडीतून खाली पडण्याची भिती! 
काय मंडळी, पटतंय का माझं म्हणणं?!
नजिकच्या काळातले काही मुद्दे -
१) आता येत्या महिन्याभरात सर्व कंपन्यांचे वार्षिक निकाल जाहीर होतील. ते आकडे काय आहेत, कसे आहेत ते पाहिले पाहिजे. कुठल्या कंपनीनी कशी प्रगती केली आहे हे पाहून मी खास मिपाच्या सदस्यांकरता खरेदीयोग्य कंपन्यांची काही नांवे सुचवीन. बाजाराच्या भाषेत सांगायचं तर "माल लेके बैठ जाओ!"
मला पोष्टकार्ड पाठवून, विचारणा करून माझी सशुल्क सेवा घ्यायलाही हरकत नाही. अहो एका मराठी माणसाला तरी चार पैशे मिळतील! 
२) मान्सून.
३) सरकार - बाजाराच्या दृष्टीने मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांचा उपयोग आता संपलेला आहे. कारण त्यांच्या सरकारने शेवटचे पाचवे बजेट जाहीर केले आहे. तेव्हा आता येणारे सरकार कसे आहे, यावर पुढची लॉग टर्म तेजी बरीचशी अवलंबून आहे असं मला वाटतं! येणारं सरकार कसं आहे? स्पष्ट बहुमतातलं आहे की मिलिजुली सरकार आहे? की निवडणुकांचा निकाल त्रिशंकू लागतो, इत्यादी अनेक गोष्टींचा विचार बाजार करेल!
असो, मी काही कुणी ज्ञानी/तज्ञ नाही, तेव्हा आता निर्देशांक २४ हजार जाईल, २५ हजार जाईल असं अंतर्ज्ञानही मला नाही! अर्थात तो जाऊही शकतो आणि गेला तर माझ्याकरता आणि माझ्या अशिलांकरता ते चांगलंच आहे! कारण मी तरी येत्या ३ वर्षांचा कालावधी गृहीत धरून खरेदी सुरू केली आहे!
आपला,
(मुंबईतले बरेचसे बाजार हिंडून अखेर शेअर बाजारात स्थिरावलेला!)
-- तात्या अभ्यंकर.
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
१६००० ......?
प्रेषक नाना चेंगट ( गुरू, ०२/२१/२००८ - १३:२४) .आज २०० अंकानी वरती उघडलेला बाजार आत्ता -१० आहे. वरती जायला लागला की त्ञाचे पाय परत जमीनीवर दाणकन येत आहेत.
बाजार १६००० स्पर्श करुन १५५०० ते १६५०० च्या दरम्यान कन्सोलिडेट ( याला मराठी शब्द काय?) होईल. बजेट रैली फार काही चांगली निष्पन्न होइल असे वाटत नाही
बाजारात फार मरगळ आहे. तेजीचा फायदा घेवुन जुने जाणते बाजारातुन बाहेर पडत आहेत. बाजार पुन्हा एकदा विक्रीच्या मा-यात गोता खाणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उत्पादकांशी येत असलेल्या नेहमीच्या संबंधातुन एक गोष्ट जाणवत आहे ती म्हणजे बाजारात मागणी घटत चालली आहे व पैशाचे रोलिंग नीट होत नाहीये.
दोलर चढल्यामुळे आय टी आज जोरात आहे पण आयटीला सध्या फारसे चांगले भवितव्य नाही. कालपर्यत आय टी शेअर वर उड्या मारणारा गुजराती समाज आज आयटी चे नाव काढताच तोंडातला गुटखा पचकन थुंकुन दुर रहाण्याचा सल्ला देतो. मराठी माणुस त्याचा कुणी आयटीतला नातेवाइक सांगतो म्हणुन आयटी शेअर घेतो व फसतो. २२००-२३०० वर इन्फोसिस घेवुन उर बडवणारे मराठी व २३०० चा २१५० झाल्याबरोबर विकणारे गुजराथी मला माहित आहेत. अहो माझे एक परिचीत त्यांचा मुलगा याच कंपनीत... पोरानेच सांगितले म्हणुन २०००-२१०० चे १५० शेअर्स घेवुन कुरवाळत बसले. आता बोलाः)
मिसळपावकरांना सावध करावे म्हणुन लेखन.
नाना
सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?
प्रेषक सागर ( गुरू, ०२/०७/२००८ - २०:००) .सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?
सेझ बद्दल अलिकडेच काहिसे वाचले होते. पण कळाले नव्हते...म्हणून उत्सुकता चाळवली गेली आणि वाटले की सेझ म्हणजे काय हे माहित करुन घ्यावे.....
माझ्या माहितीप्रमाणे अनेकांनी एकत्र येऊन टाऊनशिप बांधली की त्याला सेझ असे म्हणतात का?
सेझ म्हणजे नक्की काय?
त्याचा नक्की फायदा कोणाला होतो?
याची आवश्यकता किती आणि का?
इ. अनेक प्रश्न उभे रहात होते...
मनात विचार आला.... मिसळपावव्यतिरिक्त चांगले ठिकाण दुसरे नाही.... तेव्हा येथील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की सेझबद्दल माहीती द्यावी....
धन्यवाद
सागर
In god we trust
प्रेषक नाना चेंगट ( मंगळ, ०२/०५/२००८ - १३:१५) .In God We Trust, In Gold We Invest
सरसर वर चढणारा सोन्याचा भाव या मे महिन्यापर्यंत १४-१५००० होणार
तुम्हाला काय वाटते?
(मला वरच्या आंग्ल ओळीचे तितकेसे चांगले मराठीत भाषांतर करता आले नाही, म्हणून ती ओळ तशीच ठेवली. क्षमस्व )
नाना
रिलायन्स ग्रुप सावधपणे गुंतवा
प्रेषक नाना चेंगट ( शुक्र, ०२/०१/२००८ - १४:१८) .राम राम मंडळी
दर ८ वर्षांनी येणारा शेअर बाजारातील मंदीचा नुकताच एक तडाखा आपण अनुभवला असेल
१९९२ मधे सेन्सेकला उचलुन धरणारे एसीसी वगैरे शेअर्स नतर चांगलेच लुडकले तर २००० मधे सेन्सेकला उचलणारे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे २००३ पर्यंत काय झाले हे तुम्हाला माहित आहे
२००७ मधे सेन्सेकला उचलणारा रिलायन्स (इंडस्ट्री, एनर्जी. पेट्रो, कम्यु व केपिटल) आता उतरणार हि आमची अटकळ आहे
तरी या सर्व कंपन्यात डोळसपणे पैसे गुंतवा
नाना
किरीट सोमय्या यांचा आरोप , म.टा.तील लेख.
प्रेषक शरुबाबा ( शुक्र, ०१/२५/२००८ - १६:२५) .किरीट सोमय्या यांचा आरोप
सोमवार व मंगळवारी झालेली शेअर बाजाराची घसरण काही बड्या दलालांना फायद्याची आणि लाखो किरकोळ गुंतवणूकदारांना मात्र तोट्यात ढकलणारी होती. या माकेर्ट क्रॅशची चौकशी करावी, कुणाला फायदा झाला याचा शोध घ्यावा आणि सदोष यंत्रणा बदलावी अशी मागणी इन्व्हेस्टर ग्रिव्हन्सेस फोरमचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे. या क्रॅशचा फायदा विदेशी वित्त संस्था, मोजके बडे दलाल आणि काही प्रमोटर्सना झाल्याची आपली माहिती असल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सोमवार व मंगळवारचा क्रॅश हा माकेर्ट स्कॅमच असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेअर बाजार कोसळला त्यावेळी फ्युचर अँड ऑप्शनमध्ये गुंतवणूकदारांना पूर्वसूचना न मिळता त्यांच्या शेअरची विक्री झाली. माजिर्न मनी भरण्याचीही उसंत न मिळाल्याने ज्यावेळी गुंतवणूकदारांना शेअरचा ताबा न मिळता त्यांची परस्पर विक्री झाली, त्याचवेळी पैसे असलेल्या गुंतवणूकदारांनाही शेअर ताब्यात घेता आले नाही. परंतु विदेशी वित्त संस्थांसह काही बड्या दलालांना मात्र खालच्या किमतीला शेअर विकत घेता आले. या सर्व प्रकारामध्ये लाखो किरकोळ गुंतवणूकदारांचे अतोनात नुकसान झाल्याचा आणि मोजक्या बड्यांना फायदा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशीची आणि नुकसानभरपाईची मागणी 'सेबी'कडे व केंदीय अर्थ खात्याकडे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सोमवार व मंगळवारच्या क्रॅशमध्ये नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांनी 'सेबी'कडे तक्रारी कराव्यात असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे.
शेअर गुरूंच्या बुवाबाजीला फसू नका.
प्रेषक प्रमोदकाका ( शनी, ०१/१९/२००८ - १०:४७) .मंडळी शेयर बाजारात सद्या घडत असलेल्या चढ-उतारावर बरेच जण आपले मत व्यक्त करत असतात. ह्यात काही अभ्यासू तर काही नवशिके, काही ज्योतिषशास्त्राचा हवाला देणारे तर काही तांत्रिक विश्लेषक वगैरे वगैरे पद्धतीने बोलणारेही असतात, त्यातच झटपट फायदा करून देतो असे सांगणारे काही तथाकथित "सबसे तेज" तज्ञही असतात. अशा वेळी सामान्य गुंतवणुकदार पार गोंधळून जातो आणि नेमके करू नये ते करून आपले भांडवल घालवून बसतो. अशा लोकांनी हा लेख जरूर वाचावा.
स्वत: अभ्यास करावा आणि स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला प्रवृत्त व्हावे. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवावी. कुणी सल्ला दिला तरी त्याची स्वत: शहानिशा करून मग अंतिम निर्णय मात्र स्वत:चाच असावा.
ह्या बाबतीत इथल्या लोकांची मते जाणून घ्यायला आवडतील.
२१...२०...१९.......???
प्रेषक नाना चेंगट ( शुक्र, ०१/१८/२००८ - १६:०५) .२१००० ला स्पर्श करुन कोसळण्यास सुरवात झालेला सेन्सेक्स १९००० च्या खाली जावुन पोहोचला.
अमेरीकी डावु जोन्स सुद्धा त्याच मार्गाने जात आहे.
अमेरीकन अर्थव्यवस्था रुळावर यावी म्हणुन बुश महाशय वैयक्तिक करात सुट वगैरे गोष्टी करत आहेत वाचा इथे
पेट्रोल, डिझेल, केरोसिन, एलपीजी च्या भाववाढीचे संकेत मिळत आहेत
सर्व्हिस टैक्स मधे होवु घातलेली वाढ... वाचा
का हो मंडळी, ती कोण काय तिचे नाव ... हां.. मंदी ..बरोब्बर मंदी.
मंदी येतीय की काय मार्केटात..?
(मंदीला जाम घाबरणारा) नाना
रिलायन्स पॉवर चा आय. पी. ओ.
प्रेषक व्यंकट ( गुरू, ०१/०३/२००८ - ०९:०७) .अनील धीरूभाई अंबानी ग्रुप च्या रिलायन्स पॉवर चा आय. पी. ओ. १५ जानेवारीस येत आहे. जाणकारांकडे काय महिती आहे? आणि सल्ला काय आहे?
समभागांची चर्चा..
प्रेषक संजय अभ्यंकर ( सोम, १२/१७/२००७ - २०:०९) .नमस्कार संजय अभ्यंकर साहेब,
तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला?
तो कितीने स्प्लीट होतोय?
संजय अभ्यंकर
आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल.
असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो..
आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे. पूर्वी याचे दर्शनी मूल्य हे दहा रुपये प्रति समभाग होते ते आता २ रुपये प्रति समभाग इतके झाले आहे..
आपला,
(आडनांव बंधू) तात्या.
अवांतर - आपल्या परवानगी शिवाय आपल्या ह्या चर्चाविषयात बदल केले आहेत त्याबद्दल क्षमस्व! परंतु आणिबाणीत आम्हाला इतपत तरी सूट असावी असे वाटते! 
