साहित्यिक
जालावरील माझी सर्वात आवडती कवयित्री - "मिरयाना बॅडगेरो".
प्रेषक शुचि ( शुक्र, 03/12/2010 - 23:52) .जालावरील माझी सर्वात आवडती कवयित्री - "मिरयाना बॅडगेरो".
एखाद/दोन वर्षापूर्वी हिच्या काही कविता वाचनात आल्या आणि मला त्यांनी खूप हळवं केलं. मनात तरल भावना जागृत केल्या.
तहान-भूक हरवून मी तिच्या कवितांत हरवून जाऊ लागले.
ही स्वतः एक अंध कवयित्री असून अतिशय प्रतिभावान , तरल आणि संवेदनाक्षम आहे.
तिची "झेफायर" ही माझी अशीच एक लाडकी कविता. या कवितेचा दुवा खाली देत आहे.-
http://www.authorsden.com/visit/viewpoetry.asp?AuthorID=37189&id=256898
अन्य कविता पुढील दुव्यावर सापडतील - http://www.authorsden.com/visit/viewpoetry_all.asp?Authorid=37189
शेर कुणाला माहीत आहे का?
प्रेषक शुचि ( बुध, 03/10/2010 - 00:37) .महाविद्यलयात असताना एक अतिशय सुरेख शेर ऐकला होता. तेव्हा प्रेमात पडले होते नंतर आता काही पावसाळे पाहील्यानंतर प्रेम द्विगुणीत झाले आहे. शेर मला गूगलून सापडत नाहीये. अर्थ असा आहे -
मी माझ्या इच्छा-आकांक्षांच्या कबरीवर तलवार घेऊन सजग पहारा करत बसलो आहे की कधी एखादी चुकार इच्छा डोकं वर काढते आणि मी तिचा शिरच्छेद करतो.
कुणाला मिळाल्यास कृपया येथे द्यावा.
साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!
प्रेषक प्रसाद ( मंगळ, 03/09/2010 - 23:36) .८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत.
तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती!
[तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे... मिपाकरांच्या संमेलनातल्या ई-सहभागासाठी या बातमीला योग्य ती जागा द्यावी ही विनंती!]
प्रसाद
इमर्जन्सी - २
प्रेषक प्राजु ( मंगळ, 03/09/2010 - 09:44) .तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.
-------------------------
आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला. त्याला फक्त बाराबंदीसारखे बंद होते बांधायला, ते ही फक्त दोनच.. दोनबंदीच होती ती. झालं.. !! मी जमेल तिकडून झाकत झाकत ती दोन बंदी घातली. ती घातल्यानंतर, शक्य तितकं 'मी कम्फर्टेबल आहे..' असं दाखवत मी त्या व्हील वाल्या बेड वर जाऊन बसले. नवरा शेजारच्या खुर्चित अर्धवट झोपलेल्या लेकाला सावरत्-सांभाळत बसायचा प्रयत्न करत होता. मी एकदा कसंनुसं त्याच्याकडे बघून हसून घेतलं. इतक्यात आणखी एक नर्स आली मात्र यावेळी तिचा झगा निळा होता. तिने पुन्हा एकदा बीपी बघितलं. (दोन्-अडीच तास वेटिंगमध्ये बसून बसून वाढलं असेल की काय अशी शंका आली असावी) हातातल्या पॅडला लावलेल्या पेपरवर जास्तीतजास्त गचाळ अक्षरात काहीतरी लिहून , पुन्हा एकदा माझं नाव, माझ्या नवर्याचं नाव, विचारलं. माझ्या नावाचं पार कडबोळं करून तो निळा झगा निघून गेला. मग आणखी पाच मिनिटं गेली.. आणि मग पुन्हा एक निळा झगा घातलेला नर्स आला. त्याने सोबत आणलेल्या ट्रे मधून बरंच काय काय काढलं, आणि मग माझ्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर स्टीलची प्रेस बटणं असलेली स्टिकर्स चिकटवली आणि त्या प्रत्येक बटणावर एकेक वायर लावून माझ्या मागे असलेल्या मॉनिटरला त्या सगळ्या वायरी जोडल्या. उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर एक स्टीकर लावून त्यातून एक वायर कुठेतरी जोडली. आणि जोरात बीऽऽऽऽप असा आवाज करून तो मॉनिटर चालू झाल्यावर माझ्याकडे एकदा निर्विकारपणे हसून तो निघून गेला. नवरा वरती चालू झालेल्या मॉनिटरकडे बघत होता. पण त्याच्या चेहर्यावर काही भितीदायक भाव दिसले नाहीत्..(त्याला बहुतेक काही कळत नव्हतं त्या ढीगभर वेड्यावाकड्या हलणार्या रेषांमध्ये.). इतक्यात डॉक्टर आले. त्यांचा झगा मात्र शुभ्र पांढरा होता. त्यांनी, त्या मशिनमधून इ सी जी ची प्रिंट काढली आणि.. "योर हार्ट इज गुड, आय डोन्ट सी एनी प्रोब्लेम हीअर.." असं म्हणत ती प्रिंट माझ्या नवर्याच्या हातात दिली. काय??? हार्ट इज गुड??? असं कसं होइल? मला तर अजूनही दुखत होतं. डॉक्टरना तरी काही कळतंय की नाही याची शंका यायला लागली. मग डॉक्टर म्हणाले,"आपण ब्लड टेस्ट आणि एक्स्-रे काढून बघू. " डॉक्टर निघून गेले. एकूण हा प्रकार आणखी किमान २-३ तासांचा होणार असं दिसत होतं. मी नवर्याला , लेकाला माझ्या मैत्रीणीच्या घरी घेऊन जायला सांगितलं. तिथे त्या अडगळीतल्या खुर्चित कितीवेळ तो बसून राहणार त्याला घेऊन!! नवरा लेकाला घेऊन गेला. आता त्या पडद्या-पडद्याच्या खोलीत मी, तो मध्येच बिपबिपणारा मॉनिटर आणि अंगावर लावलेल्या छपन्न वायरी इतकेच उरलो.
इतक्यात पडदा हलल्यासारखा झाला आणि पुन्हा एक निळा झगा आत आला. यावेळी झग्याचा घेर बराच मोठा होता. तिने ब्लड सँपल घ्यायला आले असल्याचं सांगून ट्रे मधल्या ४-५ टेस्ट ट्यूब्स दाखवल्या. एका पॅकेटमधून सुई काढली . माझ्या दंडाला घट्ट एक रबर बांधून माझी शीर शोधायचा प्रयत्न करू लागली. अंगावर एकूनच टोचाटोची करायला मला आवडत नाही . लहानपणी कधीतरी कान टोचले असतील तेव्हढेच, त्यापुढे मी कधीही काहीही टोचून घ्यायच्या भानगडीत पडले नाही. त्यामुळे मी तिच्या भल्या मोठ्या पण गोर्या मुखड्याकडे आणि तिच्या हातातल्या त्या सुईकडे पद्धतशीर पणे न पाहण्याचे ठरवले आणि दुसरीकडेच पाहू लागले. तिला माझी शीर लवकर सापडली असावी कारण तीने हात हातात घेतल्यानंतरच्या पाचव्या सेकंदाला "आईऽऽऽगं!" अशी जोरदार किंचाळी माझ्या तोंडून बाहेर पडली, डोळ्यांत पाणी आलं, आणि मनामध्ये त्या झग्याच्या पुढच्या आणि मागच्या बर्याच पिढ्यांचा उद्धार करून झाला. ती अजून काहीतरी खेळ करत असतानाच एक अतिशय गंभिर चेहर्याचा, गडद निळ्या रंगाचा झगा आत आला. या बाईसाहेब बर्याच अनुभवी असाव्यात. कारण या आत आल्यावर माझ्या शेजारी बसलेला आधीचा निळा झगा एकदम आदबशीरपणे या गडद निळ्या झग्याशी बोलू लागला. गडदनिळ्या चष्मेवाल्या झग्याने एका प्लास्टिकच्या कप मधे स्ट्रॉ घालून काहितरी प्यायला दिले. देण्या आधी ,"इट टेस्ट्स विअर्ड, बट यू हॅव टू ड्रिंक इट , हनी!!" असा मधाळ इशारा देऊन तीने ती स्ट्रॉ माझ्या तोंडात कोंबली. एकीकडे तो घेराचा झगा माझं रक्त शोषतच होता. ते कसलंस औषध प्याल्यावर .. माझ्या घशापासून आंतड्यापर्यंत सगळा भाग बधिर झाल्यासारखे वाटू लागले. आणि एकदम उलटीची भावना झाली.. त्या नादात मी त्या निळ्या झग्याच्या हातात असलेला हात हलवला आणि तो झगा एकदम चिडला. "आय नीड टू ड्रॉ फ्रॉम द अदर हँड, आय कॅनॉट टेक दिस सँपल.." शक्य तितका चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करत ती म्हणाली. इतक्यात चष्मेवाल्या झग्याने "आय वील डू दॅट.. डोन्ट वरी." असं सांगितलं. तो निळा झगा दात्-ओठ खात निघून गेला. मग पुन्हा एकदा दुसर्या हाताची शीर शोधून पुन्हा एकदा "आईऽऽऽऽगं!", पुन्हा एकदा डोळ्यांत पाणी आणि पुन्हा एकदा पुढच्या आणि मागच्या बर्याच पिढ्यांचा उद्धार असं होत पुन्हा एकदा माझं रक्त त्या ४-५ टेस्ट ट्यूब्स मध्ये घेतलं. मग त्याच सुईमध्ये सलाईन लावून, त्या सलाईन मधून कसलंस इंजेक्शन देऊन तो चष्मेवाला झगा निघून गेला. एका ट्रॉलीवर संगणक घेऊन येऊन पुन्हा एकदा माझं नाव, पुन्हा एकदा नवर्याचं नाव, पुन्हा एकदा इन्शुरन्स कार्ड, पुन्हा एकदा माझ्या नावाचं कडबोळं करून तो झगा निघून गेला. सलाईन संपलं तसं, सुई तशीच ठेऊन फक्त सलाईनचा स्टॅण्ड काढून टाकण्यात आला.
यानंतर मी जरा निवांत होत होते इतक्यात, एक चिमणीसारखा इवलुस्सा चष्मेवाला चेहरा, पडदा बाजूला सारून आत बघू लागला. माझं लक्ष जाताच, तोंड भरून हसून्.."हाऽऽऽय! यू आर प्रजॅक्टा??" असं विचारण्यात आलं मला. (प्रजॅक्टा..!! कप्पाळ माझं!!) झोपाळलेल्या मी, मानेनेच 'हो' म्हंटले.. तसा पडदा बाजूला सारून चिमणी आत आली. आणखी एक झगा ..पांढराच, फक्त फुलाफुलाचा!!! "आय एम हिअर टू टेक यू टू द एक्स्-रे रूम. " असं म्हणत म्हणत बेड्चा माझ्या मागचा भाग थोडासा वरती घेत बेडच्या दोन्ही बाजूंचं रेलिंग वरती सरकवत , मला दोन्ही हात आतमध्येच ठेवण्याची सूचना देत चिमणीने तो बेड ढकलायला सुरूवात केली. चिमणी बरीच स्ट्राँग होती, माझ्यासकट बेड ढकलू शकत होती.
एक्स्-रे रूम मध्ये गेल्यावर माझ्या पायावर चिमणीने मोजे चढवले. मोजे चढवता चढवता.."ओऽऽह गॉड! यू हॅव अ व्हेरी टायनी फीट.. वॉट्स योर साईज?" अशी हलकट कॉमेंटही पास केली. जरा रागच आला मला. मग अशी उभी रहा, तशी उभी रहा.. असं करत चिमणीने एक्स्-रे चं काम पूर्ण केलं आणि पुन्हा तो बेड, ते साईड रेलिंग, पुन्हा माझ्यासकट ढकलगाडी...! माझ्या त्या पडद्या पडद्याच्या रूम मध्ये मला आणून ठेवलं. चिमणीने मगाशी काढलेल्या त्या सगळ्या वायरी पुन्हा सगळीकडे जोडल्या, मॉनिटर चालू झाला आणि चिमणी गोऽऽड हसून निघून गेली.
आता मात्र मला सॉल्लिड झोप यायला लागली. एव्हाना २ वाजत आले होते. नवरा आला होता लेकाला माझ्या मैत्रीणीकडे ठेवून. त्या सांद्रीतल्या खुर्चित बसल्या बसल्या डुलक्या काढू लागला. आता हे ब्लड रिपोर्ट येणार, एक्स्-रे रिपोर्ट येणार आणि मग मला माइल्ड हार्ट अॅटॅक येणार होता असं निदान होणार.. अशी स्वप्नं रंगवत मी अर्धवट झोपी गेले. मध्येच कधीतरी हॉस्पिट्ल मधून कसले कसले आवाज होत होते. शेवटी ३ वाजले आणि माझे पेशन्स संपले. नवरा जाऊन त्या चष्मेवाल्या झग्याला भेटून आला. झग्याने रिपोर्ट तयार होतो आहे असे सांगितले. आणि मग बरोबर २० मिनिटांनी येऊन, माझ्या हातावरची ती सलाइन ची सुई काढून तिथे कापूस आणि पट्टी लावून, तिने रिपोर्ट्स नवर्याकडे दिले आणि "यू आर ऑल सेट.." असं सांगितलं. रिपोर्टमध्ये नक्की कशामुळे दुखलं छातीत याचं निदान न झाल्याचं लिहिलं होतं. मात्र पुन्हा दुखायला लागल्यावर ताबडतोब येण्याची सूचना होती. म्हणतात ना, न्हाव्याच्या हातात एकदा डोकं दिलं की, तो पूर्ण भादरूनच सोडतो.. त्यातला प्रकार. घरी आलो आणि झोपी गेलो.
मार्च २, २०१०. सकाळपासून बरी होते. दुखत होतंच छातीत. पण पुन्हा इमर्जन्सी ला जायचं धाडस नाही झालं. तो दिवस आणि पुढ्चा ३ तारखेचा दिवस तसाच काढला. मात्र ४ तारखेला खूप दुखायला लागलं. वाटलं, आता मात्र नक्कीच हार्ट अॅटॅक येणार. नवरा ऑफिसमध्ये होता. पुन्हा एकदा हार्ट्फर्ड मेडिकल सेंटर ला फोन लावून , हार्ट स्पेशालिस्टची अपॉइंट्मेंट घेतली. डॉ. आयज्ली नाव होतं त्यांचं. हे मात्र वयस्कर होते. कुठेही काहीही टोचाटोची न करता, केवळ हाताने तपासून त्यांनी निदान केलं, "दोन्ही बरगड्या जिथे जुळतात त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन सूज आली आहे.." उपाय?? साधाच, थोडी हाय पॉवरची पेन किलर!
सगळे सोपस्कार पूर्ण करून ती पेन किलर विकत घेऊन घरी आले. डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. इमानदारीत त्या गोळ्या घ्यायला सुरूवात केली. मात्र..!!! त्या इतक्या हेवी डोस गोळ्यांनी पोटात ढचमळायला सुरूवात झालीये. आता याचं काय करू??
- प्राजु
(पुन्हा एकदा.. वरील छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे या घटना सत्य आहेत, मात्र विनोद निर्मितीसाठी थोडाफार कल्पना विस्तार केला आहे.)
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
प्रेषक हैयो हैयैयो ( शनी, 03/06/2010 - 16:23) .असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग २
वाचकमित्रहो,
नमस्कार! वणक्कम! वन्दनम! "असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १" ह्या स्फुटास मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे दुसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे.
तमिळ - जागतिक पातळीवर ’अभिजातभाषा’ म्हणून गौरविली गेलेली ही भाषा. मराठीभाषिकांच्या दृष्टीतून पाहावयाचे झाल्यास; मराठीभाषकांच्या समोर तमिऴभाषा ही संपूर्णत: अनाकलनीय आणि काहीशी चमत्कारिक अशी अवतीर्ण होते. तौलनिक भाषाभ्यास हा दोन्हीही भाषकांसाठी साहित्याचा परमानंद लुटता येण्याचे एक साधन होय. मराठीभाषकास ह्या भाषेच्या व्याकरणनियमांची / काव्यशास्त्रीय नियमांची थोडी तोंडओळख करून दिल्यास, ह्यातील चमत्कृती संपुष्टात येवून ती शिकण्यात गोडी वाटू लागू शकेल असे वाटते.
---
’उपक्रम दिवाळी अंक २००९ मध्ये लेख लिहाल काय’ अशी विचारणा करणारा व्यनि जेंव्हा आला, साधारण त्याचवेळी येथे मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर दिल हैं छोटासा ह्या गीताबद्दल लिहिले होते. ते असे -
अर्थपूर्ण आशय असलेलं एका वेगळ्याच परंतु तेवढ्याच फ्रेश ढंगातलं गाणं. एखाद्या फुलपाखरासारखं सुंदर आणि तेवढंच हलकंफुलकं! गाण्याचे शब्द, चाल आणि गायकी तर उत्तमच परंतु या गाण्याला १०० पैकी १०० मार्क जर कुठे द्यायचे झाले तर ते चित्रीकरणाला आणि वाद्यवृंद संयोजनाला. वाद्यवृंद संयोजन आणि त्यातले फिलर्स तर केवळ अफलातून! एरवी गाणं शुद्ध गंधाराधिष्ठित, कानांना शुद्ध गंधाराचं अगदी भरपूर सुख देणारं परंतु 'चांद-तारोको छुनेकी आशा' नंतरच्या 'आसमानोमे उडनेकी आशा..' या ओळीतला शुद्ध मध्यम केवळ आश्चर्यकारक, अद्भूत परंतु तेवढाच आनंददायी! गायलंयही अगदी अल्लडपणे. म्हटलं तर स्वच्छंदपणे स्वत:शीच संवाद साधणारं आणि म्हटलं तर एखाद्याला एखादी गोष्ट अगदी छान समजून सांगावी तसं!
बादलोकी मै ओढू चुनरिया, अपनी चोटी मे बांध लूं दुनीया!
क्या केहेने! सुंदरच लिहिलं आहे गाणं. आणि बांधलंयही तेवढंच छान. चांदतार्यांना छुणार्या आणि आसमानात स्वच्छंद उडणार्या या गाण्याबद्दल रेहमानला सलाम..!
कदाचित वाचकांस ही माहिती नसेल; की हे गीत हे मूळ काव्यरूपांत असून ते ७० च्या दशकात लिहिले गेले होते. श्री. एम एस विश्वनाथन ह्यांनी ते तमिळ दूरदर्शनसाठी संगीतबद्धही केले होते. श्री. मणिरत्नम ह्यांस त्यांच्या नायिकेच्या भावनांचे प्रकटीकरण करण्यास ही कविता उत्कृष्ट वाटली आणि ह्या कारणाने ह्या कवितेचे चित्रपटगीतांत रूपांतर झाले. असो! एका बाजूस ’उपक्रम दिवाळी अंक २००९ चा व्यनि वाचतांना दुसर्या बाजूस मिसळपावावर श्री. तात्यांनी मुखपृष्ठावर सुंदरच लिहिलं आहे गाणं असे लिहिल्याचे पाहिले, आणि हिंदीत डब्ब केलेल्या रोजा चित्रपटातील चिन्न चिन्न आसै ह्या तमिळ गीताचा मराठी अर्थ आणि त्याचे काव्यात्मक रसग्रहण ह्या सार्यासंबंधी एकत्रितरीत्या लिहावे असा काहीसा विचार करून ह्याविषयी आतां लिहितो आहे...!
---
| मूळ तमिऴ लिपीमध्ये | देवनागरीमध्ये लिप्यंतरीत | मराठीभाषेमध्ये भावार्थ |
|---|---|---|
| சின்ன சின்ன ஆசை | चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै | छोटी छोटी इच्छा |
| சிறகடிக்கும் ஆசை | सिऱगडिक्कुम् आसै | पंख फडफडविण्याची इच्छा |
| முத்து முத்து ஆசை | मुत्तु मुत्तु आसै | (मोत्यासारखी) छोटी छोटी इच्छा |
| முடிந்துவைத்த ஆசை | मुडिन्दुवैत्त आसै | (शिंपल्यात बंद मोत्यासारखी - आजवर) बंद करून ठेवलेली इच्छा |
| வெண்ணிலவு தொட்டு முத்தமிட ஆசை | वॆण्णिलवु तॊट्टु मुत्तमिड आसै | शुभ्र चंद्रम्यास स्पर्शून त्याचा मुका घेण्याची इच्छा |
| என்னையிந்த பூமி சுற்றிவர ஆசை | ऎऩ्ऩै इन्द बूमि चुऱ्ऱिवर आसै | सारे हे विश्व फिरून पाहाण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]]... | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
| மல்லிகைப்பூவாய் மாறிவிட ஆசை | मल्लिगैप्पूवाय् माऱिविड आसै | मोगर्याच्या फुलामध्ये परावर्तित होण्याची इच्छा |
| தென்றலைக் கண்டு மாலையிட ஆசை | तॆऩ्ऱलैक् कण्डु मालैयिड आसै | हवेच्या झुळुकीस पाहून, (तिच्या गळ्यात) माळा घालण्याची इच्छा |
| மேகங்களை எல்லாம் தொட்டு விட ஆசை | मेहङ्गळै ऎल्लाम् तॊट्टु विड आसै | सार्या ढगांना स्पर्शून सोडण्याची इच्छा |
| சோகங்களை எல்லாம் விட்டு விட ஆசை | सोहङ्गळै ऎल्लाम् विट्टु विड आसै | सार्या दु:खांना सोडून टाकण्याची इच्छा |
| கார்குழலில் உலகைக் கட்டி விட ஆசை | कार्गुऴलिल् उलहैक् कट्टि विड आसै | केशरचनेमध्ये सार्या जगतास बांधून घेण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]] | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
| சேற்று வயலாடி நாற்று நட ஆசை | सेऱ्ऱु वयलाडि नाऱ्ऱु नड आसै | चिखलामध्ये पायांचे ठसे उमटवित सोडत चालण्याची इच्छा |
| மீன் பிடித்து மீன்டும் ஆற்றில் விட ஆசை | मीऩ् पिडित्तु मीण्डुम् आऱ्ऱिल् विड आसै | मासोळीस पकडून पुन्हा पाण्यात सोडून देण्याची इच्छा |
| வானவில்லைக் கொஞ்சம் உடுத்திக்கொள்ள ஆசை | वाऩविल्लैक् कॊञ्चम् उडुत्तिक्कॊळ्ळ आसै | इंद्रधनु परिधान करण्याची इच्छा |
| பனித்துளிக்குள் நானும் படுத்துக்கொள்ள ஆசை | पनित्तुळिक्कुळ् नाऩुम् पडुत्तुक्कॊळ्ळ आसै | दवबिंदुंच्या आतमध्ये निजण्याची इच्छा |
| சித்திரத்தின் மேலே சேலை கட்ட ஆசை | सित्तिरत्तिऩ् मेले सेलै कट्ट आसै | भित्तिचित्रास साडी नेसविण्याची इच्छा |
| [[சின்ன சின்ன ஆசை]]... | [[चिऩ्ऩ चिऩ्ऩ आसै]]... | [[छोटी छोटी इच्छा]]... |
---
तमिळभाषेमध्ये एक नियम. जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते.
उदा.
१. एन पेयर हैयो. - माझे नांव हैयो.
२. इदु तमिळमोळियिन नियमम. - हा तमिळभाषेचा नियम.
३. चिन्न चिन्न आसै. - छोटी छोटी इच्छा.
वरिल नियमानुसार प्रथम उदाहरणांत, जोपर्यंत एन पेयर हैयो ’इल्लै’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत माझे नांव हैयो ’आहे’ असेच समजले जाते. दुसया उदाहरणांत जोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’नाही’ असे म्हटले जाणार नाही तोपर्यंत हा तमिळभाषेचा नियम ’आहे’ असेच समजले जाते.
थोडक्यात कसे, की ’आहे’ असे निराळे सांगण्याची आवश्यकता शिल्लक नाही. हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. काही पाश्चिमात्य भाषाभ्यासकांनी ह्या वैशिष्ट्यास तमिळ समाजाच्या ’दुर्दम्य आशावादाचे मूळ’ असे म्हटले आहे. हे गीत चित्रपटाची नायिका रोजा हिच्या दुर्दम्य आशावादाचे एक काव्यात्मक चित्रण ह्या रूपांत येते. तिला हव्या असलेल्या जवळजवळ सार्याच गोष्टी तिला मिळणे केवळ अशक्यप्राय असूनही ती इच्छा करते. काहीशी स्वप्नाळू मागणी असली तरीही एका विलक्षण आत्मविश्वासाने ती त्या गोष्टी मागते. इच्छा म्हटले की मार्ग येणारच!
---
कुठल्याही काव्यांतील यमकपूर्ति ही एक आवर्तन पूर्ण होण्याचा आनंद देवून जाते. सहसा इतरभाषी काव्यांमध्ये यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येते. तमिळभाषेतही यमकपूर्ति ही चरणपूर्ति म्हणून येतेच, परंतु त्याशिवाय तमिळभाषेत आणखीही एक वैशिष्ट्य आहे. वाचकांनी वरील कवितेचे निरिक्षण केल्यास असे लक्षात येईल, की प्रत्येक ओळीची दुसर्या ओळीशी यमकपूर्ति होते आहे. काव्यातील झाडून प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द तो एकच आहे, तो म्हणजे ’आसै’. ह्या शब्दयोजनेमागे एक मुद्दा असा, की वाक्याच्या शेवटल्या शब्दावर एक साहजिक जोर येवून त्याचे महत्त्व अधोरेखित करणे; त्यातील अर्थपूर्ण आशयाकडे लक्ष वेधणे. तमिळ ईळम ची अनेक वीररसपूर्ण काव्ये आहेत, ज्यामध्ये आपणांस ही शब्दयोजना आढळून येईल. खरे पाहता ही शब्दयोजना ही वीररसपूर्ण काव्यांत वापरावयाची, परंतु येथे ती भावनाप्रधान गीतामध्ये वापरली गेली आहे - म्हणूनही श्री. तात्या म्हणतांत तसा एक ’फ्रेश ढंग’ येथे अनुभवण्यास मिळतो. एका अर्थाने ही काव्ये प्रासादिक होवून जातात. चित्रपटांतील नायिकाही केवळ एका विलक्षण आत्मविश्वासाच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या जोरावर शेवटी तिच्या नवर्यास परत मिळवितेच नां? असो.
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
प्रथम तुला वंदितो
प्रेषक अर्धवटराव ( गुरू, 03/04/2010 - 07:19) .राम राम मंडळी.
आम्हि अर्धवटराव. नावाप्रमाणेच आचार, विचार, उच्चार, आणि इतर बर्याच बाबतीत आम्हि अर्धा पेला भरलेला (कि रिकामा... काय ते असेल) आहोत.
काहि बाबतीत मात्र आम्हि परिपूर्ण आहोत... पण त्यांचि आम्हाला अर्धवट माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा कि अश्या आमच्या सारख्या मडक्यांचि ठण्ठण्
कोणिही ऐकुन घेत नाहि. अश्या उदास अवस्थेत व्रुथा भुमीवर भटकत असता आम्हाला या मिसळेच्या हाटेलाचा पत्ता सापडला. बरेच दिवस हाटेलाबाहेर उभं
राहुन आम्हि आत यावं का हा विचार केला. इथे कसली तालेवार मंडळी आहेत. कोणि संगीत कोळुन प्यालय तर कोणि सहित्य. कोणाला राजकारण आवडतय
तर कोणाला समाजकारण. कोणि कविता करतय तर कोणि जिभेचे चोचले पुरवायचे धडे देतय. क्रिकेट आणि सह्याद्रिचि दर्याखोर्यातलि यथेच्च भ्रमंति इथे
आपल्या पूर्ण वैभवासकट नांदतेय. जीवन उलगडुन दाखवणारे पैलु इथे वाचायला मिळताहेत आणि "असेहि अनुभव येउ शकतात ??" असा विचार करायला
लावणारे लेख सुद्धा इथे आहेत. आणि टिका टिप्पणे तर काय म्हणावि... गदेच्या प्रहारासारखि ठिकर्या उडवणारि म्हणा, सुई सारखि टोकदार म्हणा, किंवा
अलगद लेंग्याचि नाडि सोडणारि इरसाल म्हणा ... एक से एक मिरच्या आहेत चविला. तर अश्या हाटेलात आपला फुटका माठ कसा घेउन जावा याचा अर्धवट
विचार आम्हि भरपूर केला..... आणि शेवटि एक आशा आम्हाला हिम्मत देउन गेलि. ति म्हणजे इथे सर्वच आमच्या लाडक्या विठुरायचे-आमच्या सारख्या अर्धवटांना
साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवुन देणार्या साहित्य सम्राटाचे- आमच्या पु.ल.देशपांड्यांचे भक्त आहेत. अहो एरवि आम्हा गजा खोत, नारायण, सख्या गटणे...
आणि अश्या इतर अनेक चोखा महारांना या शहारुख आणि अमिताभच्या जगात कोण विचारतो. तेव्हा मंडळि, या डोंग्या चोख्याचे अर्धवट भाव गोड करुन घ्या आणि
चार समजुतदारिच्या गोष्टी, जमेल तश्या, पण नक्कि सांगा... आम्हि आमचा अर्धवटपणा-कितिही प्रिय असला तरी- कमि करायचा अवश्य प्रयत्न करु...
*********************************************************************************
प्रथम तुला वंदितो-
ओठांवर सहज सुंदर हास्य अनुभवलय पण पु. ल. कोण हे माहीत नाहि, असा मनुष्य कमितकमि महराष्ट्रात तरि सापडणे कठिण (असतिल म्हणा अशे महाभाग...
जगात दुर्दैवी लोकांचि कमि नाहि). भाईंचा साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, समाजकारण, राजकारण, पर्यटन... अशा अनेक परिचीत-अपरिचित क्षेत्रातला
अफाट वावर नेहमीच चर्चेचा विषय राहिला. त्यावर भरपूर बोलण्यात आलं, लिहीण्यात आलं. स्वभावाला पैलुंचि गणती नसलेला हा अवलीया 'देता पुरुषोत्तम...'
या उक्ति प्रमाणे उदंड देत रहीला आणि अनेक पिढ्या त्याच्या आनंद-दानावर जगल्या-पोसल्या गेल्या, अजुनहि जगताहेत. लो़कं भाईंना आपापल्या फुटपट्टीने
मोजत रहिले. पण मला आश्चर्य या गोष्टिचे वाटते कि भाईंच्या अत्त्युच्च आध्यात्मिक पातळिबद्दल कोणिच कसं बोलले नाहि. अर्थात, हे मुल्यमापन करायचि आमचि
पात्रता खचितच नाहि. आम्हाला भाईंनि इतकं काहि दिलय कि त्याचिच मोजदाद करायला उभा जन्म पुरायचा... पण आम्हि आहोतच अर्धवटराव... नसत्या खोड्या
काढायचि या माठाला सवयच. त्यातुन भाईंबद्दल तर आमचं मन जास्तच चौकस. तेव्हा सहज विचार आला कि तुकोबा-रामदासांचा महीमा अखंड गाणारा मराठि
माणुस भाईंबद्दल चिडिचुप्प का राहिला ??
आध्यात्मिक साधनेबद्दल आमचि समजुत अशि कि ज्या योगे माणसाचि चेतना उन्नत होउन विश्वचैतन्याशि एकरूप होते. ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे.
आणि प्रक्रुति रुपानि तो प्रकट होतो. हे जर खरं तर मुळ्माया सरस्वती, जी संगीत-कला-साहित्य रूपाने प्रकट झालि, भाई तिच्या या रूपाशि एकरूप झाले नव्हते
काय ?? या एकरूपतेतुनच भाईंनि परमेश्वराचे सत्-चित्-आनंद स्वरूप अनेकदा अनुभवले नसेल काय ?? अहो, तात्यांच्या भिमण्णांचे सुर जर आमच्या सारख्या
फुटक्या माठाला देखिल ओलावा देउन जातात, तर अश्या अगणीत मैफिलींचि तल्लफ भोगलेले पु. ल. कित्येकदा 'ब्रम्हानंदी टाळि'त रममाण झाले नसतील काय ??
आई अन्नपूर्णेचि ममता त्यांना आशिर्वाद देति झालि नाहि काय ?? मग "माझे खाद्यजीवन" हे अन्नपुराण असेच अवतरले काय ??
भाईंचि कुठल्याहि देवावर श्रद्धा नव्हति म्हणतात. त्यांनि कधि उपास केले नाहीत कि पोथ्या वाचल्या नाहीत. पण व्यक्ति तितक्या प्रक्रुति-तितके साधनामार्ग
हे जर खरं तर पु. लं.च्याच भाषेत सांगायच, तर त्यांचि कुळं वेगळि-कुळाचार वेगळे. मिपावरच मी वाचलं होतं बहुतेक... कि भाई कोणाला तरि म्हणाले होते-
"तुझ्यापाशि जे काहि चांगले, सुंदर आहे ते इतरांना मुक्त हस्ते वाटत राहा" मला वाटते भाईंच्या पंथाचा हाच कुळाचार, हाच कुळ्धर्म. हीच त्यांच्या पंथाचि
शिकवण आणि हाच गुरुमंत्र. किती म्हणजे किती उदात्त. कशाने, कुठल्या मापाने मोजायचे ??
अशिच एक गोष्ट आठवते... एक सैनीक सीमेवर तैनात होता. बरेच दिवस तो एकटा त्या दुर्गम भागात कसातरि दिवस ढकलत होता. शेवटि तो इतका वैतागला
कि आत्महत्येचा विचार करु लागला. पण कुठुन कोण जाणे, त्याच्या हाती पु. लं.चे "माझे खाद्यजीवन" लागले आणि हे सर्व चाखायला तरि मला जगलच पाहिजे असा
उत्साह त्याच्या मनात उपजला. मग सांगा, भाईंचि हि दानत 'भक्त संकटी पडता झेलुन घेशि वरचेवरि हो' या कोटीतलि नाहि काय ??
भाई निर्भय होते. आणिबाणिविरुद्ध ते बिन्दिक्कत उभे राहिले. महाराष्ट्रभूषण स्विकारताना तत्कालीन सरकारला 'ठोकशाहि' बद्दल रोकठोक बोलले. आणि भाईंचि
दानशुरता काय वर्णावि... त्यांच्या दात्रुत्वाच्या हीमनगाचं टोक सुद्धा त्यांनि समोर येउ दिलं नाहि. वैराग्य म्हणजे मनाचि अत्यंत परिपक्व अवस्था. ज्या प्रमाणे फळ
पिकल्यावर स्वताहुन झाडापासुन अलग होतं तसाच वैराग्य भाव माणसाला संसारापासुन अलगद तोडतो. वैरागि स्वानंदातच इतका मग्न असतो कि तो आपोआप
कमलपत्राप्रमाणे संसारपासुन विलग होतो.वैराग्य म्हणजे भगवि कफनि नव्हे... त्रागा तर अजीबात नव्हे. असा हा वैरागि काकाजि 'तुझे आहे...' मधे आचार्यांना
कसला मौलिक सन्देश देउन जातो. इतरांना सुद्धा किती व्यवस्थीत 'ज़ींदगी कि लाइन पे लाके' सोडतो. भाईंनि हे पात्र लिहीताना त्याचा अनुभव घेतला नसेल
काय ?? चेतनेचि फार ऊच्च कोटिचि अवस्था असल्या शिवाय हे होणे शक्य नाहि हो !! असा हा पु. ल. नामक वैरागि आपल्या शेवटच्या आजारपणात डॉ. ना म्हाणाला
कि मला उगाच क्रुत्रीम श्वसनावर वगेरे ठेउ नका... काय म्हाणावं याला!!! "जर दूसरा जन्म असेल तर त्यात मला पुन्हा मराठि भाषेचि सेवा करायचि आहे" हे भाईंच
वाक्य "तुका म्हणे गर्भवासि सुखे घालावे आम्हासि" याच पठडितलं नाहि काय ??
पु. लं. ज्या भक्तिपंथावर आजन्म चालले त्या मार्गाने गेले असता परलोकि मुक्ति मिळेल कि नाहि माहित नाहि, पण प्रुथ्विवरच परमेश्वर नक्कि मिळेल... कारण तो
पंढरीचा राणा स्वतः या पु.ल.कित मांदियाळित अबीर गुलाल उधळत जीवा-शीवाचे प्रेम उपभोगत नाचत असेल !!
भुर्जपत्र ते वेबपेज
प्रेषक प्रकाश घाटपांडे ( बुध, 03/03/2010 - 10:41) .भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला. ब्लॊगिंग च्या माध्यमातुन अनेक तरुण लोकांच्या पर्यंत पोहोचता आले. त्यांच्या पुस्तकाचे उत्तम परिचय ऒर्कुट कम्युनिटीवर झाले. ही नव्या युगाची देणगी असल्याचे त्यांनी नमुद केले. महेश घाटपांडे यांनी आम्ही म्रराठी हा अंक वेबसाईट स्वरुपात प्रथम आणल्यावर सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यानंतर जसा या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे संकेतस्थळाला भेट देणार्या लोकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले. मिलिंद जोशींनी देहबोली ते भुर्जापत्राचा प्रवास कथन केला. पारंपारिक साहित्यातील जड शब्दांना कंटाळलेल्या लोकांना हा नवीन पर्याय मिळाल्याने साहित्यातील मक्तेदारी कमी होण्यात उपयोग झाल्याचे सांगितले. संध्या टांकसाळे यांनी या माध्यमामुळे वाचकांना आपले प्रतिसाद लगेच देता आले. यामुळे एखाद्या लेखावर प्रतिक्रिया एकदम शंभरात पोहोचल्याने हा लक्षणीय फरक दिसल्याचे सांगितले. उज्वला बर्वे यांनी आत्ताच्या पत्रकारितेतल्या माध्यमाला एक साचा असतो तो अभ्यासक्रमात शिकवला जातो. तशा प्रकारचे बंधन या इंटरनेटवरील माध्यमाला नसल्याने वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटत नसल्याचे सांगितले.
कार्यक्रम रंगत दार झाला. इंटरनेटवरच्या मराठी जगतात मराठीची मोडतोड होते असे म्हटले तर ती आताच्या माध्यमात देखील होते वाहिन्यांच्या माध्यमातुन पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो हा किस्सा मिलिंद जोशींनी सांगितला. वर्तमान पत्रातील बातमीत 'भांगेत शेंदुर' भरला जातो. याचा किस्सा उज्वला बर्वे यांनी सांगितला. या नवीन माध्यमाच्या स्पर्धेत आशय व गुणवत्त्ता बाबत मापदंड लावायचे झाल्यास ते नवीनच ठरवावे लागतील. नेट वरील संगणकीय मराठीच्या प्रगतीसाठी लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ब्लॊगर नी बहुमोल कामगिरी केली आहे याची नोंद चर्चेत घेण्यात आली. उपक्रम सारख्या मराठी संकेतस्थळावर चांगले उपक्रम चालतात तसेच मायबोली या जुन्या मराठी संकेतस्थळाची दखल घेतली गेली. नवीन येणार्या तंत्रज्ञानासोबत लेखन कसे बदलत जाते याचाही परामर्श घेतला. ब्लॊगिंग कसे असावे याबाबत महेश घाट्पांडे म्हणाले कि अमुक शैली असावी अमुक असु नये असे म्हणता येणार नाही वाचकांनी आवडले नाही तर वाचु नये.
कार्यक्रमात माध्यमाईटस या पत्रकारांनी एकत्र येउन केलेल्या गटातर्फे श्री गणेश पुराणिक हे रानडे इनिस्टीट्युट चे माजी पत्रकार विद्यार्थी व सध्या मुंबई महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करणारे ब्लॉगर यांनी ब्लॉगिंग मराठीसंकेतस्थळ यावर सदीप व सविस्तर माहिती दिली. अनिल अवचटांच्या हस्ते औरंगाबादचे दांपत्य अंजली कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांच्या साहित्य संपदा डॊट कॊम दुवा या संकेत स्थळाचे उदघाटन झाले.लेखक, प्रकाशक यांनी या नवीन माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले मराठी मंडळी डॊट कॊम या मराठी ब्लॊगर्स कम्युनिटीच्या रात्री १० वाजुन ३ मिनिटांनी प्रस्थापित होणार्या संकेत स्थळाचे उदघाट्न पण याच कार्यक्रमात अनिल अवचटांच्या मुखी करण्यात आले. विक्रांत देशमुख यांनी पुण्यात झालेल्या ब्लॊगर्स मेळाव्याबद्दल माहिती दिली. नेहमी प्रमाणे जालमित्रांसाठी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण आम्ही केले आहे. ऐका हो ऐका!
ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली
प्रेषक नितीनमहाजन ( गुरू, 02/25/2010 - 18:56) .स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.
सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:
तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची? मी मुक्ततेचे प्रतिक आहे.
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी||
माझ्यावर गरूडासारखे आकाशाचे राजे राज्य करतात आणि तू तर एक कैदी आहेस, तू माझ्यापर्यंत कविता लिहिण्यासाठी कसा पोहोचणार?
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||
आभाळाने सावरकरांना हिणवले, "तुझ्या पायात तर जड साखळदंड आहेत. मला विचारण्यापेक्षा तुझ्याजवळ असलेल्या जमिनीलाच का नाही विचारत? ती कदाचित तयार होईल तुझ्यासाठी कागद होण्यास."
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||
पण ती अंदमानातील कालकोठडीची जमीनही कदाचित इंग्रजांची बटिक झाली होती. तिनेही या स्वातंत्र्यसूर्याच्या विनंतीस मान दिला नाही.
यानंतर सावरकरांनी त्यांच्या बाण्यानुसार त्यांच्याकडे मदतीची याचना केली नाही.
अश्या वेळी या प्रतिभावान स्वातंत्र्यसूर्याची अवस्था कशी झाली असेल? सर्व जगावर संताप झाला. आकाश व जमीन यांचा प्रचंड राग आला. यामुळे डोळ्यात अश्रू आले, पण संतापामुळे त्यांच्या ठिणग्या झाल्या. हनुमानाने लंका जाळली तद्वत सर्व जग जळेल इतका संताप त्या डोळ्यातून व्यक्त झाला.
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||
मनात विचारांचे काहूर उठले. माझ्या कवितेचा हा प्रपात झेलालयला कोण तयार आहे? स्वर्गातून पृथ्वीवर गंगौघ येत आहे. कोण तयार आहे हा भार झेलायला? जर हिमालयासारखा कणखर व बलदंड आधार तयार नसेल तर ही गंगा या पृथ्वीवर येईल का?
तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रक्तन जसे इंद्रायणीच्या डोहात बुडणे होते, तसे तर माझ्या काव्याचे नाही ना?
पण अश्या वेळी अचानक एक चमत्कार झाला. त्या कालकोठडीच्या दगडाच्या भिंती पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या:
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||
यापुढील इतिहास आपणास ठावूक आहेच.
--------------------------------------------------------------------------------
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील ही अप्रतिम कविता लोककवी मनमोहन नातू यांची आहे.
कवी मनमोहन नातू यांनी ही कविता "सुनित" (SONET) या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अत्यंत आवडत्या काव्यप्रकारात बांधली आहे. सुनित हे १४ ओळींचे काव्य असते. कवितेच्या पहिल्या भागात एक कल्पना विस्तार असतो व पुढच्या भागात त्या कल्पनेला एकदम कलाटणी देवून शेवट केलेला असतो. याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात ही मांडणी ८ + ६ अशी असते तर दुसर्या प्रकारात १२ + २. सदर काव्य १२ + २ या प्रकारातील आहे.
वाचकांच्या सोईसाठी संपूर्ण कविता सलग परत देत आहे.
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||
माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||
जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||
पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||
की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परंतू अभंग नदीच्या बाही ||६||
दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७||
-- लोककवी मनमोहन नातू.
--------------------------------------------------------------------------------
टीपः ही कविता आम्हाला इयत्ता ९वी च्या बालभारतीमध्ये अभ्यासाला होती. कविता मला खूपच आवडली म्हणून मी ती लिहून ठेवली. पण त्यात कडवे क्रमांक ६ नव्हते. अनेक वर्षांनंतर एका वर्तमानपत्रात ठाणे येथील श्री. भागवत यांच्यावर एक लेख आला होता (त्या लेखात त्यांचा दूरध्वनी क्रमांकही होता. पण आज माझ्याकडे नाही. मला मिळाला की लगेच मि. पा. वर देईन.). त्यांनी अंदमानातील सावरकरांच्या कोठडीत ही कविता कायमस्वरूपी लिहिण्याबाबत केंद्रसरकारशी बराच पत्रव्यवहार केला होता व त्याचे फलित म्हणजे आज ही कविता त्या कोठडीत लिहिली आहे. सदर लेखात ही सर्व कविता दिलेली होती. मी माझ्याकडील कवितेत नसलेले कडवे लिहून घेतले. कदाचित या ओळी वेगळ्या असू शकतील. जाणकारांनी सुधारणा करावी. या कवितेचे मूळ शीर्षक "ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली" असे आहे.
मनमोहन नातू यांची इतर काव्यसंपदा येथे वाचायला मिळेल. पण यात वरील कविता नाही. मनमोहन नातू हे त्यांच्या 'ती पहा बापूजींची प्राणज्योत', 'हळू हळू बोल कृष्णा' व 'राधे तुझा सैल अंबाडा' या कवितांच्यामुळे प्रसिध्द आहेत. ही कविता काहिशी अप्रसिध्द आहे.
प्रायोपवेशनाद्वारे अवतारकार्य संपविणार्या मृत्युंजय सावरकरांना मनोभावे साष्टांग प्रणिपात.
नितीन
नव्वदोत्तरीतले संग्राह्य, वाचनीय साहित्य
प्रेषक राजेश घासकडवी ( गुरू, 02/25/2010 - 15:51) .भारतातून काही पुस्तकं घ्यायची आहेत. त्यासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तकांबाबत मिपाकरांकडून सूचना हव्या आहेत. विशेषत: नव्वद सालनंतरची, कारण तशी माझ्याकडे खूप थोडी आहेत. पण ती अगदी काटेकोर अट नाही. तेव्हा कृपया आपल्याला आवडलेल्या, गेल्या काही वर्षात वाचलेल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक याविषयी कळवा.
जर अशी चर्चा आधीच झालेली असेल तर दुवा द्या.
बिल्डर कसे व्हावे ......
प्रेषक मंगेशपावसकर ( शनी, 02/20/2010 - 20:02) .बिल्डर कसे व्हावे............. (व्यंग)
नमस्कार !!........
आज आपणास मार्गदर्शन करणार आहे बिल्डर कसे व्हावे.
काही जणांच्या मते बिल्डर बनणे हि फारच किचकट गोष्ट आहे . आम्ही म्हणतो कठीण आहे पण जर आपण इतर यशस्वी बिल्डर पाहिलेत व त्यांचा पायावर पाय ठेवून जर बांधकाम व्यवसायाची माहिती घेतलीत, तर नक्कीच हा व्यवसाय फलदायी व क्लेश रहित आहे. इथे आपणास मुद्देसूद व सकल मार्गदर्शन केले आहे, पण अर्थात हे आजकालच्या जगतातले शिक्षण आहे, व ते आजकालच्या प्रमाणेच अवलंबिले पाहिजे. बाकी आपल्या तोंडी गरज आहे ती फक्त अरेरावीच्या भाषेची.....
PLOTTING पलोटिंग -
सर्वप्रथम एक शहरमध्य अडगळीतली एखादी झोपडपट्टी पहावी , व तेथे ती आपल्याच पितरांची आहे. तसा आपल्या बांधकाम कंपनीचा बेधडक बोर्ड लावावा. व सदरला कुंपण घालावे.जर कुणी कागदपत्रे पाहण्याचा हट्ट केल्यास त्याला सरळ बनावट कागदपत्रे सादर करावीत (अनेक ठिकाणी उपलब्ध किंवा आम्हाला संपर्क साधणे-व्यंग. ). त्या नन्तरच्या त्रासाला सामोरे जाण्याकरता इतर साधने असतील तर हा त्रास होत नाही हे देखील खरेच.
त्या नंतर कुठला महानगरपालिकेचा व पालिकेचा इसम आलाच तर त्याची योग्य ती उठबस करावी व त्यास सम्मान द्यावा.
नंतर त्याच्या खिशात त्याला संतोषजनक रक्कम कोंबून त्याला व त्याचा वरीष्ठासव्यक्तिगत भेटणे करावे व तिथेच त्यांचा आकडा विचारावा व त्यांना वाटा देण्याचे आश्वासन द्यावे. त्यांनतर तिघांनी एका छानश्या बार मध्ये (शक्यतो लेडीस बार) बसावे. हे केल्याने त्यांची व तुमची घनिष्ट अशी बांधिलकी तर निर्माण होतेच व ह्या पुढील कामात सरकारी अडचणी येत नाहीत.
SLUM RELOCATION (rehabilitation) झोपडपट्टी उठवणे-
झोपडपट्टी उठवणे हि अजिबात अवघड गोष्ट नाही . प्रथम १०-१५ अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीची(गुंड) माणसे जमवावीत, व झोपडपट्टीमध्ये राहण्यारा अनेक पुढे पुढे करणारया शहाण्यांना सामुदायिक चोप द्यावा, असे केल्याने झोपडपट्ट्या ,चाळी हवी त्या किमतीत रित्या करून घेता येतातच त्याचबरोबर इतर जणांवरहि धाक जमतो, व बिल्डर बद्दल दहशत वजा आदर निर्माण होतो. (मुंबई मध्ये अनेक उदाहरणे आहेतच.)
बिल्डर व गुंड ह्यांचे रेशीमबंध फारच जुळलेले असतात प्रत्येक कामी गुंडांची मदत प्रत्येक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाला हवीच असते आमचा तर आग्रह हा आहे की २०-२५ गुंड हे प्रत्येक बिल्डरने पदरी बाळगलेच पाहिजेत याने बिल्डरची प्रतिमा उंचावते.
BOOKING बुकिंग-
बुकिंग करण्या हेतू सर्वप्रथम एक छान प्रशस्त "शॉप" भाड्याने घ्यावे (दुकान संबोधल्याने त्याचा भपका कमी होतो). हे "शॉप" एखाद्या मध्यमवर्गीय पण गजबजलेल्या लोकवस्तीत असावे.बांधकामावर पैसा खर्च केला नाही तरी पण हे कार्यालय वजा "शॉप" भपकेबाज असलेच पाहिजे , ज्याने बिल्डरला आपले आकडे सांगण्यास संभाव्य ग्राहकाकडून मज्जाव होत नाही.
ऑफिसमध्ये आल्या आल्या ग्राहकाचे हसून स्वागत करावे व त्यासाठी शीतपेये वा कॉफी (चुकूनहि चहा मागवू नये. ) असे आदरतिथ्य झाल्यामुळे ग्राहक भुलतो व त्यास फशी पाडणे सोपे जाते. त्या नंतर आपला प्लॉट त्यावरील बांधकाम ह्या गोष्टींबद्दल त्याला वरचेवर माहिती द्यावी व त्याचा काही शंकांना धडधडीत खोटे उत्तर द्यावे. त्याच बरोबर सर्वात वरील व तळमजला वरील फलाट लवकर विकले जात नाहीत म्हणून संपूर्ण बिल्डिंग बुक आहे फक्त सर्वात वरील व तळमजल्यावरचे फलाट शिल्लक आहेत असे खोटेच सांगावे व फलाट गळ्यात बांधावा तसेच आगाऊ रक्कम हस्तगत करावी व त्याची पावती द्यावी.
CONSTRUCTION बांधकाम-
जास्त समाजसेवा वा बांधिलकी किंवा माणुसकी न दाखवता शक्य तितके हलक्या दर्जाची सामुग्री वापरून बांधकाम सुरु करावे, व जास्तीत जास्त माजले बांधण्याचा प्रयत्न करावा . एकदा का सर्व फलाट विकले गेले की तर बिल्डिंग मेंटेनन्स कडे ढुंकून हि पाहू नये. त्याच बरोबर घाई घाई ने बांधकाम उकरण्याचा प्रयत्न करावा, असे केल्याने धनरूपी द्रव्याची बचत तर होतेच व ग्राहकांवर चांगला प्रभाव पडतो, तसेच आगाऊ रक्कमहि वाढवून घेता येते.
POSSESSION पजेशन-
बिल्डिंग अर्ध्पूर्ण अवस्थेतच काही इच्छुक ग्राहकांना पजेशन देऊन टाकावे व संपूर्ण फुल-फायनल रक्कम गिळंकृत करावी. त्यानंतर बिल्डिंगला कुठलेतरी छान नाव देऊन ती अधिकृत सोसायटी आहे असे स्वयं घोषित करावे. (ती बिल्डिंग अनधिकृत असली तरी ). एकदा का बिल्डिंग तयार झाली तर नंतरचे फलाटचे पजेस देताना ग्राहकाला खोळंबवावे व त्याचा संयम (अंत ) पाहावा. असे केल्याने त्याची पुढील होणारी कुरबुर थांबते.
बिल्डर व्यवसायात लोकांचा तळतळाट,शिव्या शाप यांना अधिक महत्व द्यायचे नसते फक्त आपले उखळ पांढरे करून घेणे यास प्राधान्य देणे आवश्यक असते.
EMERGENCY आणीबाणी-
अर्थात कधी कधी बिल्डिंग हि अनधिकृत असल्यामुळे व ढिसाळ निकृष्ट प्रतिच्या बांधकामामुळे ती पडते किंवा ती अनधिकृत घोषित करण्यात येते तेव्हा बिल्डरच्या ऑफिसमध्ये फलातधारकांच्या चकरा वाढू लागतात , अशा वेळी जर कोणता फलातधारक तक्रार घेऊन आलाच तर त्यास आपल्या नवीन प्रोजेक्ट नवीन बांधकामा बद्दल माहिती द्यावी व तेथे बुकिंग करावयास सांगावे. व तेथे त्यास डिसकाउंट देण्याचे आश्वासन करावे, पण रक्कम मात्र तेवढीच जास्त वसूल करावी. या वेळी झालेल्या फलाट धारकाच्या आगमनास पूर्वी इतके महत्त्व देण्याची मुळीच गरज नाही. अशा वेळी त्याचा हातातील शीतपेयाची बाटली काढून घेऊन त्याचा देखत नवीन संभावित ग्राहकास दिली तरी चालेल.
कधी कधी फलात धारक विचलित होऊन जर तुमच्या ऑफिस मध्ये मोठ्याने आवाज चढवू लागला तर सरळ खुर्चीवरून उठावे व लगेचच त्याचा कानाखाली आवाज काढावा. असे केल्याने तो फलाट धारक तर गप्प बसतोच व इतर फलाट धारकांवरही जरब बसते.
जेव्हा गोष्ट फलाट धारकांचा युनियनची येते तेव्हा आपले पदरी बाळगलेले अंगरक्षक (गुंड) कामी येतात. व त्या युनियन ला देखील चौदावे रत्न दाखविल्याने परत युनियन करण्याचे फलाट धारकास स्वप्न ही पडत नाही.
जर फलाट धारक या मध्ये पोलिसांची मदत घेऊ लागला तर आलेल्या पोलिसांचा योग्य तो सत्कार करून त्यांना काही हवे नको ते विचारावे व संन्यासाचा आव आणावा.
या नंतर ही एक शेवटची वाट शिल्लक राहते ती म्हणजे "न्यायलय".
"शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये" असे कुणीतरी खरेच सांगितले आहे त्याचा प्रोसेस जर फसगत झालेल्या फलाट धारकाला कळला तर तो जीव देणेच पसंत करील. तर मग आमच्या भावी बांधकाम व्यावसायीकांनो आहे की नाही हा फायदेशीर उद्योग. पुढील वेळी पुन्हा भेटूच आणखी काही फायदेशीर व सोपे उद्योगांचा इत्यंभूत मार्गदर्शनासह तो पर्यंत नमस्कार ...........
मंगेश कु. पावसकर (मुंबई )



