user

माहिती

हॅकर्स अंडरग्राउंड - ४

हॅकर्स अंडरग्राउंड - १

हॅकर्स अंडरग्राउंड - २

हॅकर्स अंडरग्राउंड - ३

ऑफिसमधुन बाहेर पडत असतानाच समोरच्या व्हॅनमधुन सुटलेल्या गोळ्यांनी ग्रॅनी आणि बुलडॉगचा वेध घेतला तर माझ्या छातीत आणि हातात चार गोळ्या शिरल्या. स्कॉर्पिअन मागे राहिल्याने तर 'द विच' ऑफिसमध्ये असल्याने ह्यातुन बचावले होते. आता माझा जन्म आणि मृत्युच्या सि-सॉ वरचा खेळ सुरु झाला होता....

हे असले प्रकार मी चित्रपटात अनेकदा बघितले होते, कथा कादंबर्‍यात देखील वाचले होते. पण ते किती तकलादु होते हे जेंव्हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडला तेंव्हा माझ्या लक्षात आले. नक्की काय घडले आहे किंवा घडत आहे ह्याच अंदाज येईतो हल्लेखोर आपले काम करुन पसार देखील झाले होते.

जेंव्हा शुद्ध आली तेंव्हा मी हॉस्पीटलमध्ये होतो. चित्रपटात दाखवतात तसे आजुबाजुला नर्स वगैरे पण कोण न्हवती. मी तसाच पडून राहिलो, मात्र काही वेळातच एका नर्सचे दर्शन झाले. ति मला शुद्धीवर आलेले बघुन बाहेर धावली, काही वेळातच तिच्याबरोबर दोन डॉक्टरांचे आगमन झाले. माझ्या वेगवेगळ्या तपासण्या करत त्यांची पल्स रेट, वाउंडस अशी मला न कळणारी अगम्य चर्चा चालु होती. काही मिनिटांनी मला एक इंजेक्शन देण्यात आले आणि मला पुन्हा ग्लानी आली.

दुसर्‍यांदा जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा मात्र मला बरेच तरतरीत वाटत होते. मुख्य म्हणजे स्कॉर्पिअनचे प्रसन्न दर्शन घडले. मला शुद्धीवर आलेले बघुन त्यानी माझा हात हातात घेउन हलकेच थोपटले. पुढचे काही दिवस स्कॉर्पिअन रोजच हजेरी लावत होता. ह्या काळात पोलिस देखील दोन वेळा येउन माझी तपासणी करुन गेले, बरेचसे उलटे सुलटे प्रश्न विचारुन गेले. मात्र मला खरच ह्या संबंधात काही माहिते नसल्याची त्यांची एकुण खात्री पटल्याचे दिसले. मात्र हि खात्री 'पटवली' गेल्याचे मला मागाहुन कळले. दरोडा टाकायच्या हेतुने आलेल्या गुन्हेगारांकडुन चुकीने आमच्या व्हॅनवर व व्हॅनजवळ हजर असलेल्या लोकांवर गोळीबार झाल्याचा रिपोर्ट बनवला गेला.

माझ्या जखमा आता बर्‍याच भरत आलेल्या होत्या. काही दिवसातच मला सुट्टी मिळण्याची चिन्हे दिसायला लागले होती. चार-पाच दिवसात स्वतः 'द विच' येउन मला येउन मला भेटणार असल्याचे स्कॉर्पिअनने मला सांगीतले होतेच, त्यामुळे मी तसा निवांतच होतो. दिवसभर आराम करणे, डॉक्टरांच्या परवानगीने काही काळ लॅपटॉपवरुन आंतरजालावर भ्रमण करणे, टिव्हीची मजा लुटणे असा माझा दिनक्रम चालु होता. एक दिवशी असाच न्युज साईटसवर चक्कर मारत असताना एका बातमीने माझे खास लक्ष वेधुन घेतले. अमेरीकेचा एक उपग्रह निकामी झाला होता आणि कदाचीत हा भरकटलेला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ह्या विषयावर पत्रकारांशी बोलताना संरक्षण खात्याच्या सचिवांनी "वेळ पडल्यास अवकाशातच हा उपग्रह नष्ट करण्याची अमेरीकेने तयारी केलेली आहे" असे विधान केले होते. हे विधान वाचले आणि माझ्या मेंदुत क्षणार्धात अनेक दिवे पेटले. जर अमेरीका हा उपग्रह अवकाशात नष्ट करु शकत असेल तर ह्याचा अर्थ एकच होतो की अमेरीकेकडे निदान एका ठरावीक अंतरावर का होईना पण कार्य करणारे सॅटेलाईट डिस्ट्रॉयर उपलब्ध आहे. अर्रे मग आम्ही नक्की कुठल्या माहितीसाठी हेरगिरी करत आहोत ??

तसेही शस्त्र, मिसाईल वगैरे संबंधातले माझे ज्ञान फारच तोडके होते. पण जर सॅटेलाईट आकाशातच नष्ट करायचे असेल तर एकमेव उपाय हा सॅटेलाईट डिस्ट्रॉयर वापरणे हाच असणार ह्याबद्दल मला शंकाच न्हवती. पण माझी शंका बोलुन कुणाला दाखवणार ? त्या झालेल्या हल्ल्यानंतर 'द विच' अथवा 'स्कॉर्पिअन' वर किती विश्वास टाकावा ह्याबद्दल मला नक्की अंदाज येत न्हवता. आणि झालेल्या हल्ल्यानंतर हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही ह्याचा मला अंदाज आलेला होता. ज्याअर्थी आमच्यावर अगदी व्यवस्थीत प्लॅनींग करुन हल्ला झाला होता त्याचा अर्थ एकच होता की आमचे मुखवटे आता आमचे संरक्षण करण्यास अपुरे होते. आमची खरी ओळख शत्रुला नक्कीच होती. आणि ह्या सगळ्यातुन सुखरुप बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला दिसत होता आणि तो म्हणजे ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणे.

'द विच' ची भेट होईपर्यंत मी मला शक्य झाली तेवढी मला ह्यासंबंधात हवी असलेली माहिती नेटवरुन गोळा केली. विशेष असे काही हाताला लागले नाही, पण नक्की कुठल्या मार्गाने तपास करावा ह्याचा अंदाज मात्र बांधता आला. २/३ दिवसातच 'द विच' चे आगमन झाले. ह्या सर्वच विषया संबंधित कुठलीही चर्चा हॉस्पिटल मध्ये करणे तिने आणि त्या आधी स्कॉर्पिअनने देखील टाळलेच. मी देखील शहाण्या माणसासारखे इकडचे तिकडचे विषय बोलत राहिलो. दोनच दिवसात मल डिस्चार्ज मिळणार असल्याचे मला 'द विच' कडून कळले. त्यानंतर १५ दिवस मला दिल्लीला राहुन पुढील व्यवस्था होताच आधी अमेरीकेच्य मोंटाना प्रांतात हलवण्यात येणार होते आणि त्यानंतर फ्लोरीडाच्या सुसज्ज इंटरनेट लॅब मध्ये आमचे काम चालु होणार होते. ह्याचाच अर्थ माझ्याकडे फक्त १५/२० दिवसच उरले होते.

दोनच दिवसात हॉस्पीटलचे सर्व सोपस्कार पार पडले. पोलीसांच्या ताब्यात असलेले आमचे पासपोर्टस आठवड्या भरात परत मिळण्याची शक्यता होती. एकुणच दिल्लीला पोचेपर्यंतचे ते चार पाच दिवस फार धावपळीचे गेले. दिल्लीत बस्तान बसेतो अजुन दोन दिवस फुकट गेल्याने मी आजुनच वैतगलो. शेवटी 'ह्या हल्ल्यामागे माफिया होते' असा छानसा बाँब टाकुन माझा निरोप घेउन 'द विच' गेली आणि मी जोमाने माहिती मिळवण्याच्या मागे धावलो. सर्वात आधी चार विमान कंपन्यांच्या साईटस हॅक करुन त्यांची प्रवासी यादी तपासण्यात माझे दोन दिवस खर्ची पडले. पण 'द विच' आणि स्कॉर्पिअन त्यांच्या खर्‍या अथवा खोट्या कोणत्याच पासपोर्टनी कुठे जाउन आल्याची नोंद मला कुठे आढळली नाही. ह्या नंतरचा सर्वात महत्वाचे काम होते ते म्हणजे आम्ही नक्की कुठली माहिती मिळवण्याच्या मागे आहोत ह्याचा शोध घेणे. आणि त्यासाठी मला अमेरीकेच्या संरक्षण खात्याचा सुरक्षित डाटाबेस मध्ये शिरणे आवश्यक होते. कधीकाळी ग्रॅनीने FBI च्या सर्वर्समध्ये शिरताना वापरलेले ज्ञान आता मला कितपत उपयोगी पडेल ह्याचीच मला फिकीर होती.

कुठल्याही डाटाबेसमध्ये शिरण्याबरोबर त्याचा पासवर्ड तुमच्याकडे असणे हि सर्वात आवश्यक गोष्ट. आता हा पासवर्ड अनधिकृतपणे मिळवण्याचे मार्ग म्हणजे एकतर पासवर्ड हॅक करणे किंवा तो क्रॅक करणे. खरेतर हॅकींग असो वा क्रॅकींग दोन्हीचा उद्देश एकच आणि तो म्हणजे गुप्त माहिती मिळवणे. पासवर्ड हॅक अथवा क्रॅक करण्याचे काही महत्वाचे रस्ते आहेत :-

१) फोन करुन संबंधित व्यक्तीला ' मी अमुक तमुक बँकेतुन अथवा तुमच्याच कंपनीच्या आय टी डिपार्टमेंटमधुन बोलत आहे. सध्या आम्ही काही महत्वाचे अपडेटस तुमच्या सिस्टीमवर इंस्टॉल करत आहे पण त्यात थोडी अडचण येत आहे तेंव्हा तुमच्या मदतीची गरज आहे." असे सांगुन त्याच्या फुटकळ माहिती बरोबरच हळूच पासवर्ड काढुन घेणे.

२) फिशींग पेज, बग,कि-लॉगरच्या सह्हायाने पासवर्ड मिळवणे.

३) शोल्डर सर्फिंग :- संबंधीत व्यक्तीच्या खांद्यावरुन तो काय पासवर्ड टाईप करतोय हे पाहणे, अथवा जर तुम्ही किबोर्ड अथवा टायपींग एक्सपर्ट असाल तर कि-स्ट्रोक्स वरुन टाईप होत असलेला पासवर्ड ओळखणे.

४) गेसिंग :- ज्याचा पासवर्ड हॅक करायचा असेल त्याच्या संबंधीत वैयक्तीक माहिती मिळवुन त्याच्या पासवर्डचा अंदाज बांधणे. उदा:- आवडता चित्रपट, मोबाईल नंबर, जन्मतारीख, कुत्र्याचे नाव, मैत्रीणीचे/ मित्राचे नाव इ.

५) डीक्शनरी अ‍ॅटेक :- ह्यात FTP सर्व्हरच्या 'पासवर्ड डाटाबेस' अगेंस्ट डिक्शनरी मध्ये असणारे सर्व उपलब्ध शब्द वापरुन बघायचे. कधीकाळी हि प्रचंड वेळखाउ प्रक्रिया होती पण आता नाही. 'ब्रुटस रिमोट पासवर्ड' सारखी सॉफ्टवेअर्स आता तुमचे काम अधिक हलके बनवु लागली आहेत.

६) ब्रुट फोर्स अ‍ॅटेक :- ह्या मध्ये जगातील सर्व शक्य असलेल्या अक्षरांची आणि अंकाची उलटापालट होत राहते जोवर तुम्हाला योग्य पासवर्ड सापडत नाही तोवर. ह्याचा स्पिड मात्र तुम्ही जे सॉफ्टवेअर वापराल ते आणि संगणकाच्या स्पिडवर अवलंबुन असतो. त्यामुळे ह्याला प्रचंड वेळ द्यावा लागतो.

७) रेनबो टेबल :- ह्यामध्ये अक्षरांची जेव्हढी काँबीनेशन्स उपलब्ध आहेत त्या सगळ्यांच्या हॅश-व्हॅल्युजची एक मोठी लिस्टच तयार असते.

ह्या सगळ्याच्या जोडीला ग्रॅनीचा तिने माझ्याशी शेअर केलेला अनुभव माझ्या पाठिशी होताच. मनोमन ग्रॅनीचे आभार मानत मी माझ्या मोहिमेला सज्ज झालो.

(क्रमशः)

वाचा आणि शोधा

१. तुम्ही तुमचं शरीर सोडून कधीच कुठंही जाऊ शकत नाही.
२. तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात, नो!!!! सर्व माणसे मानसिकदृष्ट्या महामूर्ख असतात, येस!!! पण प्रत्येकाचे शरीर हुशार असते. ती एक वेगळी संस्था आहे (इथे वैद्यकिय दृष्टीकोणातून पाहू नये) पुढच्या वेळी नखे वाढतील तेव्हा नजर ठेवा. तुम्ही कधीच सरळ उठून नखे काढायला सुरूवात करीत नाही. आधी हात तुमच्या डोळ्यांसमोर येतो, तुम्हाला नखे वाढल्याचे दिसून येते (हा अक्षरश: शरीराच्या विशिष्ट भागाने दिलेला सिग्नल असतो) आणि मग नखे काढण्याचा विचार करता.
३. मोठ्ठा आवाज होतो तेव्हा, शरीर एकदम दचकते. हा शरीराने तुमच्या यंत्रणेला दूर होण्यासाठी दिलेला सिग्नल असतो.
४. मानसिक शांती, ध्यानातून येणारी शांती ही आजकालची लोकप्रिय टूम आहे. शरीराला असले काहीही नको असते कारण ते मुळातच अतिशांत असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या अशांत असाल, आणि ती अशांतता शरीरातून वाहू देत असाल. पण त्याच वेळी तुमचे शरीर नेहमी एवढेच शांत, स्थिर असते.
५. शरीराला फक्त दोनच गोष्टीत स्वारस्य असते: टिकून राहाणे आणि प्रजोत्पादन.
६. विचार करण्याची प्रक्रिया ही जात्यासारखी असते - कुठलाच विचार सर्वकाळ टिकत नाही, विचारांचे पीठ सतत मात्र पडत राहाते.
७. आजपर्यंत कुणीही मूलत: ओरिजीनल म्हणता येईल असा विचार केलेला नाही, नकला मात्र सर्व करीत असतात. विचार हा नेहमी विचाराबद्दलचा असतो.
८. विचारातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मग कुणी काहीही म्हटलेले असो.
९. बाल्यावस्थेचा काळ वगळता तुम्ही कधीच काहीही पाहात नाही; तुमच्याकडे असलेली कल्पनाच तुम्ही पाहात असता.
१०. लहान मुले ही अत्यंत जीवंत ऊर्जा असते. ती पृथ्वीवर जन्माला आलेला सर्वात नवीनतम माणसे असतात. ती जुन्या माणसांच्या संगतीत राहून त्यांचे वेगळे विशेष असे काहीही न करता जुन्या माणसांसारखीच होतात. कोणताही शिक्षक, गुरू शिकवू शकणार नाही एवढे त्यांच्याकडून शिकता येते. फक्त तुमचे कचराछाप (मग ते तुम्हाला कितीही महत्वाचे, अगत्याचे वाटोत ) विचार त्यांच्यात ओतण्याची घाई करू नये. त्यांना आजूबाजूची व्हॅल्यू सिस्टीम आणि स्पर्धा यात राहायचे असल्याने, त्यातच जगायचे असल्याने समाज, आई-वडील, शिक्षक या सर्वांनी टाकलेला कचरा वाहात राहावे लागते. लहान मुले जळता निखाराही सहज हातात घेतात - ते शिकत आहेत. लहान मुलांना साप कधीही चावत नाही, त्यांच्यात अजून वैरभावनाच तयार झालेली नसते. सापासारखे प्राणी तुमच्या मनातील वैरभावना झटक्यात ओळखतात आणि तुमच्यापासून दूर जाण्याचा उपाय नसेल तर आणि तरच चावा घेऊन दूर पळतात.
११. तुम्ही कधीही, कोणत्याही मार्गाने स्वत:चे शरीर परिपूर्णपणे अनुभवू शकत नाही - त्यासाठी दुसरे शरीर हवे असते.

पाश्वभूमी: यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याशी लोकांनी केलेली चर्चा.

हा कुणालाही, कसल्याही प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न नाही; त्यामुळे आक्रस्ताळे आक्षेप वाया जाऊ द्यायचे नसतील तर वेळीच आवरावेत. वाचा आणि शोधा.

'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा

भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्‍या आणि शिकवणार्‍यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्‍या परभाषिकांनाही ती मदत करतील. अगदी मराठी मातृभाषा असणार्‍या, पण चार वाक्यं लिहायला सायास पडणार्‍या कुणालाही ही पुस्तकं म्हणजे वरदानच वाटावीत.

मुलांसाठी स्वाध्याय-पाठ असं म्हटल्यावर जे नीरस, कंटाळवाणं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं असेल, तशी मात्र ही पुस्तकं अजिबात नाहीत. पुस्तक वापरताना मुलांना मजा यावी म्हणून सर्वत्र दृश्यघटकांचा सढळ वापर केलेला आहे. सरावासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या वाक्यांच्या आणि उतार्‍यांच्या अनुषंगानं चित्रं, छायाचित्रं यांची सर्वत्र रेलचेल आहे. उदा: लिहिताना होणार्‍या चुका दाखवताना 'मातृ-कृपा' शब्द चुकीच्या पध्दतीनं लिहिलेल्या खर्‍या पाटीचं छायाचित्र दिसतं. ज्यांनी यापूर्वी माधुरी पुरंदर्‍यांची 'वाचू आनंदे', 'आमची शाळा', 'राधाचं घर' वगैरे पुस्तकं पाहिली असतील त्यांना याचा अंदाज येऊ शकेल. संपूर्ण रंगीत असलेला 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंच सुरेख चित्रं आणि सजावट यांनी पानोपानी भरलेला आहे. चित्रं स्वतः माधुरी पुरंदरे यांनीच काढलेली आहेत. बरीचशी छायाचित्रं संदेश भंडारे या ('तमाशा', 'वारी' अशा कामांसाठी गाजलेल्या) गुणी छायाचित्रकाराची आहेत. भाषेच्या स्वाध्यायपाठांमध्ये छायाचित्रं? आणि संपूर्ण रंगीत, देखणी वगैरे पुस्तकं? हे (नसते थेर) कशासाठी? असा (खास मराठी) प्रश्न पडला असेल तर तो या पुस्तकांच्या जवळजवळ क्रांतिकारक म्हणता येईल अशा स्वरुपाशी संबंधित आहे.

पुस्तकांच्या मुखपॄष्ठापासूनच त्यांचं वेगळेपण जाणवू लागतं. निरनिराळ्या पध्दतीचं लिखाण दाखवणारी छायाचित्रं त्यावर दिसतात. त्यात मातीत अक्षरं गिरवणारी लहान मुलं दिसतात, वस्तूंचे भाव लिहिलेला फलक दिसतो, संगणकावर टंकलेली अक्षरं दिसतात आणि ब्रेलमध्ये टोचलेला मजकूरही दिसतो. मोबाईलवरचा एस्.एम्.एस., भांड्यांवर नावं लिहिणं, हातांवर गोंदवून घेणं अशा लिखाणाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं मुखपृष्ठावर दर्शन होतं. त्यावरून पुस्तकाच्या आवाक्याचा अंदाज येतो. पहिलं पान उलगडताच शब्दकोशातल्या 'भाषे'च्या व्याख्या दिसतात आणि विविध विशेषणं वापरून केलेलं भाषेचं (खरंतर भाषाविश्वाचंच) वर्णन दिसतं. मासल्यादाखल हे पाहा - लडिवाळ भाषा, चावट भाषा, क्लिष्ट भाषा, टपोरी भाषा, निर्वाणीची भाषा, गुद्द्यांची भाषा. भाषेच्या सर्वव्यापीपणाचं आणि विविधतेचं दर्शन यातून होतं.

भाषेच्या वेगवेगळ्या अंगांना अनुसरून पुस्तकातल्या धड्यांची रचना केलेली आहे. यामध्ये कालानुरुप भाषेच्या स्वरुपामध्ये झालेल्या बदलांची दखल घेतलेली दिसते. उदा: वर्णमालेच्या प्रकरणात जुन्या बाराखडीऐवजी 'अॅ', 'ऑ'सकटची 'चौदा'खडी वापरलेली आहे. निव्वळ घोकण्यापेक्षा समजून-उमजून शिकण्यावर सर्वत्र भर आहे. उदा: वर्णमाला लक्षात का ठेवायची? तर शब्दकोश, नावांची यादी, संदर्भसूची अशा अनेक ठिकाणी शब्द अकारविल्हे लावलेले असतात; वर्णमाला पाठ नसली तर त्यात हवी ती गोष्ट सापडणार नाही, हे इथं सांगितलं जातं.

मुलांच्या शब्दसंग्रहात आपोआप वाढ होईल अशीही योजना यात आहे. उदा. 'क्रियापदापासून बनलेली नामं' याविषयीच्या मजकुरात बोलणे, लिहिणे यांपासून बनलेल्या परिचित नामांशिवाय बोलवा, लिखाई, लिहिणावळ, लिखावट असे अनवट शब्दही आहेत. कांडप, गाळप, सांगावा अशा शब्दांचा इथे परिचय होतो आणि देयक, आवक-जावक अशा सरकारी शब्दांचाही परिचय होतो. मुलांच्या सहज आकलनासाठी कालानुरुप रुळलेले इंग्रजी शब्द स्वाध्यायांमध्ये वापरलेले आहेत. जसे - सॉस, मोबाईल, इंटरनेट. याबरोबरच नवीन घडलेल्या मराठी शब्दांची ओळख मुलांना होईल अशा पध्दतीनं तेही वापरलेले आहेत. उदा: ‘संकेतस्थळ’.

याशिवाय जाताजाता मुलांचा अनेक गोष्टींशी परिचय होईल अशी रीत पुस्तकाची व्याप्ती आणि उपयुक्तता अधिकच वाढवते. उदा: शब्द अकारविल्हे लावण्याच्या स्वाध्यायामध्ये पुस्तकं नेताना घसरून पडलेल्या मुलाचा प्रसंग आहे. घसरलेल्या मुलाच्या हातातली इतस्ततः विखुरलेली पुस्तकं एका चित्रात दाखवली आहेत. तर स्वाध्याय सोडवण्यासाठी उभी करून नीट ठेवलेल्या पुस्तकांचं चित्र आहे. त्यावरच दिलेल्या जागेत पुस्तकांची नावं लिहायची आहेत. विखुरलेल्या पुस्तकांत 'झेंडूची फुले', 'ऋतुचक्र', 'व्यक्ती आणि वल्ली', 'तराळ-अंतराळ' अशी सगळी खर्‍या पुस्तकांची नावं आहेत. स्वाध्याय सोडवताना या शब्दांशी आणि पुस्तकांशी मुलांची आपोआपच तोंडओळख होते.

‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेचा पुस्तकनिर्मितीत सहभाग आहे. पुस्तकांचा वापर ग्रामीण, शहरी आणि अगदी परदेशस्थ मराठी मंडळींनाही करता यावा याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्यात वाडा संस्कृती दिसते तसंच मॅक्डोनाल्ड, शॉपिंग मॉलही दिसतात. यात पैठणीचा पारंपरिक माग दिसतो तशा सरपण डोक्यावर वाहून नेणार्‍या कष्टकरी बायका, पाण्याचे हंडे डोक्यावर ठेवून पाणी भरायला चाललेल्या बायकाही भेटतात. आजच्या तरुणाईच्या सवयीचे 'सही', 'डेंजर' असे शब्द इथे येतात; तसेच चैत्रगौरीचं हळदीकुंकू, दिवेलागण, अंगण सारवणे, पु.लं., बिनाका गीतमाला अशा जुन्या गोष्टीही येतात. मुलं पुस्तकं वापरत असताना एक व्यापक मराठी संस्कृतीविश्व त्यांना त्यामुळे खुलं होईल. अपरिचित गोष्टींविषयी मुलांच्या शंकांना वाव देऊन आणि न्याय देऊन त्यांचं विश्व समृध्द करण्याची थोडी जबाबदारी मात्र शिक्षक-पालकांना त्यासाठी उचलावी लागेल.

पुस्तकांत निव्वळ व्याकरण नाही तर भाषेच्या स्वरुपांचं आणि वापरांचं वैविध्यही उलगडून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थः वृत्तपत्रात मथळे लिहायची भाषा वेगळी असते आणि वृत्तांकनाचा मजकूर लिहायची भाषा वेगळी असते. गोष्टीतल्या वर्णनाची भाषा त्याहून वेगळी असते आणि दोन व्यक्तींमधला संवाद लिहिताना वेगळी भाषा वापरावी लागते. लेखी-बोली अशा अनेक प्रकारच्या भाषांमधला फरक मुलांना जाणवून देणारे पाठ आणि सरावासाठीचे स्वाध्याय पुस्तकात आहेत. इतकंच काय, पोलिसांच्या नोंदीची भाषा आणि तरुणाईची ‘व्रात्य’भाषा असे भाषेचे अनेक नमुने यात पाहायला मिळतात.

भाषेच्या वापरात आजकाल अतिशय विसविशीतपणा आलेला आहे. त्यामुळे होणार्‍या अनेक गफलती आता आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत, की नक्की बरोबर काय आणि चूक काय हेच अनेकदा कळेनासं होतं. अशा गफलती आणि त्या होण्यामागची कारणं जाणून घेऊन त्या अनुषंगानंही पाठांची रचना केलेली आहे.

अशा सर्व मराठीविषयक मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जाणवणारा पुस्तकांचा एक विशेष गुणधर्म म्हणजे त्यांतून मुलांना खुलं केलेलं मराठीपलीकडचं समृध्द अनुभवविश्व. अमिताभ बच्चन, राज कपूरपासून एम. एस. सुब्बलक्ष्मी, अकिरा कुरोसावा अशा अनेकांचा जाताजाता परिचय होईल अशी सरावपाठांची आणि स्वाध्यायांची मांडणी आहे. एस्किमोचं इग्लू, आफ्रिकन पोषाख, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे मासे अशा जगभरातल्या अनेक गोष्टींचा खजिनाच इथे मांडलेला आहे. हे सर्व भाषेच्या अभ्यासात बेमालूम मिसळलेलं आहे. अपरिचित संस्कृती, निसर्गसृष्टी यांतलं वैविध्य हे अशा रीतीनं आपोआप मुलांच्या समोर येतं; त्यामुळे सरावपाठही सुरस आणि रोचक होतात.

भाषेच्या माध्यमातून नकळत संस्कारही होतील याची काळजी घेतलेली दिसते. उदा: भूकंपाबद्दलच्या उतार्‍यात बायकांची जिद्द दिसते आणि बरोबर कष्टकरी बायकांची छायाचित्रं दिसतात. भूतकाळाविषयी सांगताना ग्रीक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांपासून कोट-टोपी-धोतरातल्या पुण्यातल्या क्रिकेट संघाच्या फोटोपर्यंत अनेक गोष्टी दाखवत, त्यांच्याविषयी सांगत, जाताजाता हेही सांगितलेलं आहे की आज आपण आणि आपलं जग कशामुळे असं आहे हे कळण्यासाठी भूतकाळाकडे जावं लागतं.

पुस्तकाची मांडणीही मुलांना आवडेल आणि पटकन समजेल अशी आहे. उदा: एखादा स्वाध्याय जर थोडा कठीण असेल तर तिथे एक चिमणी दाखवलेली आहे, तर त्याहून अधिक कठीण स्वाध्यायापाशी एक बेडूक उभा असतो. पुष्कळसे स्वाध्यायसुध्दा कोडी, खेळ अशा प्रकारचे आहेत. उदा. प्रश्न-उत्तरं बनवण्याचा स्वाध्याय म्हणजे भोंडल्याची खिरापत ओळखण्याचा खेळ आहे. यामुळे अभ्यास करायला लागत असूनही तो अजिबातच कंटाळवाणा होत नाही.

पुस्तक रंजक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी दिसणारा मिश्किलपणा. उदा. आज्ञार्थी रचना सांगताना ‘हमखास यशस्वी’ कवितेची पाककृती दिली आहे. तिची मजा कळायला ती मुळातूनच वाचायला हवी. विशेषणांच्या प्रकरणात 'असडीक' तांदूळ यांसारख्या अनवट विशेषणांची ओळख होतेच, पण त्यासाठी वापरलेल्या उतार्‍यातल्या व्यक्तीला हा शब्द माहीत नसल्यामुळे तिनं त्याऐवजी वापरलेली 'कव्हर न काढलेला' तांदूळ ही रचना वाचून गंमतही वाटते.

स्वाध्याय सोडवण्यासाठी, इतर टिपणं वगैरे नोंदवण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. ‘नोंदी शक्यतो पेन्सिलनंच कर; म्हणजे नंतर त्या खोडून टाकता येतील आणि मित्रमैत्रिणींना किंवा भावंडांना देखील तुझं पुस्तक वापरता येईल’, अशी प्रेमळ सूचनासुध्दा आहे.

लहान मुलांच्या देखण्या पुस्तकांसाठी प्रसिध्द असलेल्या 'ज्योत्स्ना प्रकाशन' या संस्थेनं ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. प्रत्यक्ष सरावपाठांचे दोन भाग आणि एक उत्तरपुस्तिका असा हा संच आहे. पानांवर पुरेशी मोकळी जागा सोडण्यासाठी आणि मोठ्या अक्षरांचा मजकूर मावण्यासाठी पुस्तकांचा आकार नेहमीपेक्षा किंचित मोठा आहे. तरीही पुस्तकसंचाची ४०० रुपये ही किंमत अगदीच वाजवी वाटते. त्यासाठी 'सर रतन टाटा ट्रस्ट'चं आर्थिक पाठबळ प्रकल्पाला लाभलेलं आहे.

एकंदरीत, मराठीविषयी अभिमान आणि आस्था असणार्‍या कुणीही संग्रही ठेवावीत अशीच ही पुस्तकं आहेत. मराठीच्या नावानं गळे काढणार्‍या किंवा आपल्या राजकारणासाठी तिला वापरणार्‍या कुणाहीपेक्षा या पुस्तकांमुळे मराठीचा अधिक लाभ झाला आहे आणि मराठीची मान अधिक उंचावली गेली आहे.

पुस्तकांविषयी लेखिकेचं मनोगत इथे वाचता येईल.

शुभदा चौकर यांनी 'लोकसत्ता'त लिहिलेला पुस्तक-परिचय इथे वाचता येईल.

मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन...

सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायदा अंमलात आला. मातृभाषेतून शिक्षण हा जर मुलांचा मुलभूत हक्क मानला, तर सगळ्यांना सामावून घेण्यासाठी नवीन मराठी शाळा सुरू कराव्या लागतील. पण शासन मात्र स्वतःच्याच राज्यात इंग्रजीसमोर पायघड्या घालून मराठीला सापत्नभावाची वागणूक देत आहे. अनुदान द्यावे लागू नये म्हणून मराठी शाळांना परवानगीच न देण्याचा निर्णय ६ वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता. मराठी जनतेने हे स्वीकारल्याचं पाहून शासनाने मराठी राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, अधिक उत्साहाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. १९ जून रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकांत, परवानगीसाठी रितसर अर्ज करूनही, शासनाच्या मराठी विरोधी धोरणामुळे बेकायदेशीर ठरलेल्या, पण प्रत्यक्षांत आजही सुरु असलेल्या मराठी शाळा तात्काळ बंद करण्यांस फर्मावले आहे. असे न केल्यास प्रथम १ लाख व नंतर दिवसाला १० हजार रू. दंड ठोठावण्याची धमकी दिली आहे. शासनाच्या या धमकीच्या धोरणापायी पुण्याच्या ग. रा. पालकर प्रशाला या मराठी शाळेचा अपमृत्यू झाला. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडलेला टाहो १६ ऑगस्ट्च्या लोकसत्तेत छापून आला होता.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=937...

मराठी शाळांना परवानगी दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडेल असं कारण शासन वारंवार देत आहे. पण मग शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता चालवण्यात येणार्‍या नाशिकच्या आनंद निकेतनसारख्या प्रयोगशील शाळांना परवानगी मिळत नाही.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...

...पण या काळांत ११९० इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाने परवानगी दिलेली आहे.

या धोरणात्मक निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्र्यांचं जगभरातील मराठी जनांतर्फे हार्दिक अभिनंदन.

मध्यपूर्वेतून थेट मराठीत

मराठी आणि हिंदीत अनेक शब्द आहेत जे मूळचे फारसी वा अरबी आहेत. जसे गरीब, मेहनत, बिचारा, तारीख, हिशेब. असे शब्द बहुतेक वेळा हिंदी आणि मराठीत जवळपास सारखेच दिसतात आणि त्याच अर्थाने वापरले जातात. वरील उदाहरणे त्याच गटातील आहेत.
पण असेही काही शब्द आहेत जे फार्सी वा अरबीतून मराठीत आलेले आहेत जे हिंदीत नाहीत वा अगदी तुरळक वापरले जातात. काही उदाहरणे

जाहिरात (हिंदीत विज्ञापन वा इश्तेहार वापरतात)
जबाबदार(री) (हिंदीत जिम्मेदार(री) वापरतात)
राजीनामा (हिंदीत इस्तेफा, त्यागपत्र).
मोहीम (हिंदीत अभियान )
लष्कर (हिंदीत फौज)
रतीब (?)
अजून अशी काही उदाहरणे देऊ शकाल का?

मेंदूतला माणूस - पुस्तकपरिचय

नुकतेच 'मेंदूतला माणूस' हे पुस्तक वाचले. मला ते फारच आवडले.
लेखकांनी म्हटल्याप्रमाणे मेंदूचे कार्य कसे चालते हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले नाही. पण माणसाचा विचार करण्याची पध्दत, वर्तणुकीमागचा कार्यकारणभाव समजावून घेण्यासाठी ते लिहिले आहे. लेखन विज्ञानानिष्ठ असले तरी लेखकांनी रोजच्या व्यवहारातली हलकी फुलकी उदाहरणे देऊन विषय अतिशय सोपा व आकर्षक केला आहे. यांत उल्लेख केलेले काही संशोधन हे अगदी अलिकडचे असून ते मेडिकलच्या पाठ्यपुस्तकातही नाही असा लेखकद्वयींचा दावा आहे.
झोपेत पडणार्‍या स्वप्नांचे मेंदूतले केंद्र, भावनांचे उगमस्थान, तर्कबुध्दी व भावना यातील रस्सीखेच, निजदेहभान वगैरे मेंदूतल्या घडामोडींबद्दल आश्चर्यकारक माहिती यातील प्रकरणांमधे आहे.
नवीन व जुन्या भावना, आभासी अंग (फँटम लिंब्ज) अशा प्रकारची सामान्य माणसाला नवीन असलेली माहितीही त्यात आहे. मुख्य म्हणजे कुठलेही प्रकरण काढून वाचले तरी चालेल अशी पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक वाचून आपण समोरच्या व्यक्तिला जास्त समजावून घेऊ शकतो, मानवी मनोव्यापारांची जवळून माहिती झाल्यामुळे परस्परांमधले समज-गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल हे लेखकांचे म्हणणे मनापासून पटते.
पुस्तकातल्या माहितीबद्दल इथे विस्ताराने लिहिणे ही पुनरावृत्ती होईल, म्हणून ते टाळून, एक अवश्य वाचण्यासारखे विज्ञाननिष्ठ पुस्तक, अशी मिपावरील सर्व नव्या जुन्या मित्रमंडळींना ही पुस्तकाची तोंडओळख.

लेखक : डॉ. आनंद जोशी/सुबोध जावडेकर

राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती : मार्च २०१०

छापील किंमत : रु. २२५/

इतिहासाचे पुनर्लेखन

आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.

असो..

तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.

आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-

१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?

ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?

२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?

३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?

४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.

५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?

गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?

आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।

५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?

ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.

''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!

पुण्यात उद्या, म्हणजे ४ सप्टेंबर २०१० रोजी, शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने ''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!

सध्या महाराष्ट्र शासन मराठी शाळांना मान्यता देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे.

केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या कायद्यामुळे मराठी माध्यमाच्या व शासनाची मान्यता नसलेल्या सर्व शाळांपुढे अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे ह्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने १९ जून रोजी परिपत्रक काढले व त्या अन्वये सर्व मराठी मान्यताप्राप्त नसलेल्या शाळा बंद करण्याची सुरुवात झाली आहे.

मातृभाषेतून व राज्यभाषेतून शिक्षण घेता येणे हा आपला हक्कच आहे. तो नाकारणे घटनाबाह्य आहे. मराठी शाळांना मान्यता न देता त्या बंद पाडून ह्या मूलभूत हक्कावरच गदा येत आहे. केंद्र सरकारने नव्या कायद्यात ३ वर्षांचा कालावधी शाळांनी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची पूर्ती करण्यासाठी दिला असताना महाराष्ट्र शासनाला शाळा बंद करायची घाई का हेही विचारणे अनिवार्य झाले आहे.

एकीकडे प्रचंड मोठी फी आकारणार्‍या उच्चभ्रूंच्या, खाजगी कंपन्यांच्या शाळांना शासन पायघड्या घालत आहे व दुसरीकडे वंचित मुलांपर्यंत पोचणार्‍या, मातृभाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांना तेच शासन बंद पाडत आहे हे निषेधार्ह आहे.

परंतु शासन जर ह्या सर्व प्रश्नाची दखलच घ्यायला तयार नसेल तर मग शासनाने दखल घेण्यासाठी आंदोलन करण्यावाचून पर्याय नाही. मराठी शाळांच्या मान्यतेच्या मुद्याच्या निमित्ताने मातृभाषेतून शिक्षणाचा हक्क व एकूणच शिक्षणावर मूलभूत विचारमंथन होणे गरजेचे आहे.

शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या व रस असलेल्या प्रत्येकानेच ह्याची गंभीर दखल घेऊन त्यात आपले योगदान देणे आवश्यक आहे. ही लढाई रचनात्मक व संघर्षात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर लढावी लागेल.
ह्या लढ्यात खालील मुद्द्यांवर भर द्यावा लागेल :

१. मराठी शाळांना ताबडतोब मान्यता द्या व ती देताना नैसर्गिक वाढीच्या धोरणावर १०वी पर्यंत मान्यता देण्याचे धोरण राबवा.
२. मराठीतून शिक्षण देणार्‍या शाळांना अर्थसहाय्य द्या.
३. १९ जूनचा जी. आर. मागे घ्या.
४. राज्याची नियमावली बनवण्यासाठी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे समिती गठित करा व त्यात सुचवलेल्या प्रक्रियेनुसार धोरण व नियमावली करून मगच अंमलबजावणी करा.

४ सप्टेंबर (शिक्षक दिन पूर्वसंध्या) रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत मराठी शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, समाजातील मराठीप्रेमी व शिक्षणाविषयी विचार व कार्य करणार्‍या व्यक्ती एकत्र येऊन निदर्शनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतील.

मराठीविषयी आस्था व वरील मुद्द्यांवर सहमती असणार्‍या सर्वांनाच ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हे आंदोलन शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने होईल.

अलका टॉकीज चौक ते कर्वे रोड चौक पुणे ह्या दरम्यान लकडी पुलाच्या दुतर्फा हा कार्यक्रम होईल.
त्यात मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या असे आवाहन करणारी पोस्टर्स, बॅनर्स, पत्रकेही असतील.

सहभागी शाळांचे विद्यार्थी, पालक व शिक्षक घोषणांची बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी बनवून आणतील.

ह्या कार्यक्रमाचे कार्यालय ग. रा. पालकर शाळेतूनच चालेल. सर्व माहिती, पत्रके इ. तिथे उपलब्ध होईल.

आपल्या मागण्यांचे निवेदन करून त्यावर उपस्थित, रस्त्यातील नागरिक व कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांच्या सह्या घेतल्या जातील.

शिक्षणमंत्र्यांना व स्थानिक शिक्षणाधिकार्‍यांनाही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वरील मुद्द्यांना व प्रश्नांना उत्तरे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी फोन :

रमेश पानसे : ९८८१२३०८६९, सुधा भागवत : ९८२२७६९५३५.
सलील कुलकर्णी : ९८५०९८५९५७, सुहास कोल्हेकर : ९४२२९८६७७१, सुप्रिया पालकर : ९९२१७१०५८८.
ईमेलः andolan.napm@gmail.com

(आधार : शिक्षण हक्क समन्वय समितीने जारी केलेले पत्रक)

भंभागिरी

'सकाळी सहाऐवजी साडेसहाला हुतात्मा स्मारकाबाहेर जमायचे आहे' राहुलचा रात्री मेसेज मिळाल्यावर सुट्टीची साखरझोप अजून अर्ध्या तासाने वाढली. पहाटे खुडबुडत सॅक भरून अशोकस्तंभावर गाडी लावली. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, २६ जाने. यादिवशींच्या पहाटवेळांत खूप वेगळं चैतन्य असतं, त्यापैकीच एक १५ ऑगस्टचीही असते. एरवी दिसतात ते पोटार्थी (म्हणजे पोटासाठी कामाला लागलेले आणि पोट कमी करण्यासाठी नाईलाजाने चालणारे/ धावणारे). लहान मुलांची झेंडावंदनासाठी कडक कपड्यांत शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. आमचंही, नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण-गिरीभ्रमण संस्था आणि यंदाच्या गिरीमित्र संमेलनावेळी स्थापन झालेल्या दुर्गभरारी संस्थेतर्फे झेंडावंदन ठरलं होतं ते आडबाजुला असलेल्या धुळे जिल्ह्यातल्या भामेर दुर्गावर. ७ वा. ७ भिडू घेऊन आमची टवेरा एकदाची निघाली. वाटेत वडाळीभोईला जैन हॉटेलात मिसळ, भजी, पेढे आणि चहाचं पेट्रोल भरून निघालो तोवर साडेआठ वाजत आले होते.

आता कुठेही टीपी न करता थेट साक्रीला पोहोचणे होते. वाटेत चौल्हेर, डोलबारी रांग, पुढे मांगी- तुंगीची सेलबारी रांग, उजवीकडे पिसोळ- डेरमाळ दुर्गांची रांग डोंगरटोके उंचावत साद घालत होती.साक्री- नंदुरबार रस्त्यावर भामेर किल्ल्याकडे जायचा फाटा लागतो. नाशिक ते भामेर गांव १८० किमी. अंतर आहे. गांवात शिरल्याबरोबर प्रवेशद्वाराचं गतवैभव दाखवणार्‍या कमानीने लक्ष वेधून घेतलं. या कमानीच्या बाजूलाच बारव आहे. बाजूलाच भल्या थोरल्या डोणी आहेत आणि अजूनही वापरात आहेत.

भग्न प्रवेशद्वारामागील नक्षी कोरलेले ८-९ फूट उंच खांब देखणे आहेत. पैकी एका खांबाचं फिनिशिंग एक्दम ग्रॅनाईटप्रमाणे गुळगुळीत आहे. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात.
एका मुलाने गाडी किल्ल्याच्या पायथ्याकडे असलेल्या शिवमंदिरापर्यंत जाईल असं सांगितल्यामुळे गांवातले अवशेष नंतर बघायचं ठरवून गाडी अरूंद बोळांतून शेवटपर्यंत दामटवली. साडेअकरा वाजत आले होते. दोघेजण बरोबर घेतले आणि चढाईला निघालो. भामेर दुर्गाच्या डोंगराचे ३ भाग आहेत. गांवात घुसलेल्या डोंगरसोंडेवर पांढरा रंग दिलेली पिराची घुमटी आहे. या पीराला पांढर्‍या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. मधल्या टेकडीच्या पोटाच्या घेराशी खोदलेल्या गुहा-टाकींचा पट्टा आवळलेला आहे. तिसरा सगळ्यांत उंच असलेला तो बालेकिल्ल्याचा डोंगर आहे. पायथ्याशी असलेला खंदकाचा बुजत आलेला खड्डा ओलांडून १५ मिनिटांत पिराची टेकडी व मधल्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात.

डावीकडे वळून पायर्‍या चढून वर आल्यावर शिलालेख कोरलेल्या भग्न कमानीचा आडवा झालेला तुकडा दिसला. इथून उजवीकडे जाणारी वाट गुहा कोरलेल्या टेकडीकडे जाते. या टेकडीच्या पोटांत रांगेने ही पाण्याची गुहा टाकी मोठ्या संख्येने खोदलेली आहेत. अरूंद पायवाटेने जात ती सगळी टाकी बघता येतात.

टेकडीला प्रदक्षिणा घालत सगळी टाकी बघून वर आलो आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. इतक्या प्रचंड संख्येने गुहाटाकी दुसर्‍या कुठल्याही किल्ल्यावर नसतील. बालेकिल्ल्याकडे जातांना मध्येच कातळ कापून खाच पाडल्याने हा भाग थोडा विलग झाला आहे. या खिंडीत पायर्‍या आहेत. इथून पुढे पायर्‍यांच्या वाटेने चढतांना आणखी एक प्रवेशद्वार लागलं. इथे डावीकडे रचीव दगडांचा बुरूज आणि उजवीकडे रचीव तटबंदी दिसली. वर आल्यावर सतीमातेच्या छोट्याशा मंदिराच्या डावीकडे वळून टोकाकडे जाऊन पलिकडचा देऊरचा डोंगर पाहून परत फिरलो.
या डोंगरावरही काही लेणी आहेत. पूर्वेला जुळे सुळके दिसतात, ते रवळ्या- जवळ्या नांवाने ओळखले जातात. (रवळ्या-जवळ्या हे सातमाळा रांगेतले २ किल्ले वेगळे).मंदिराची जागा झेंडावंदनाला योग्य होती. मंदिराच्या शेजारी खोदीव टाके आहे. झेंडावंदन व राष्ट्रगीत झाल्यानंतर उतरतांना मधल्या डोंगराच्या पोटात असलेली लेणी वाटेतच दिसली.

तिनही द्वारांच्या चौकटींवर नक्षी आहे. पहिल्या द्वाराच्या उंबर्‍याकडे दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. शेजारीच भली मोठी कोठाराप्रमाणे वापरली जात असावी अशी गुहा खोदलेली आहे. सध्या त्यांत पाणीच साठलेलं आहे. इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. उतरायला लागून वीसेक मिनिटांत परत गाडीकडे पोहोचलोसुद्धा. गांवातच दक्षिण भारतीय घडण वाटावी अशा एका मोठ्या नंदीची भग्न मुर्ती दिसली. त्याला लागूनच नक्षी असलेला खांबही आडवा झालेला आहे.

पूर्वी इथे मंदिर असावं. गांवात ठिकठिकाणी तटबंदीचे, विविध नक्षीं कोरलेल्या भग्न दगडांचे अवशेष दिसतात.
महाभारत काळांत भामेरचं नांव भंभागिरी असावं. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने भामेरला अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला, अशी दंतकथा.गडावरील लेणी- गुहांवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. लेणी असल्यामुळे भामेरजवळून प्राचिन राजमार्ग जात असावा. १२ व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. देवगिरीच्या सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. इकडे यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनींच्या काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढार्‍यांच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले. गांवाबाहेर एका वडाच्या झाडाखाली पोटपुजा केली आणि जवळच असलेल्या आणि अचानकपणे गवसलेल्या, प्राचिन ठेवा असलेल्या गांवाकडे गाडी वळवली.... (क्रमशः)

बालकांचा चिम्मणचारा

बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा!
खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची' बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते. कारण त्यांच्या जठराचा आकार एकाच वेळी एक पोळी अन् वरणभात इतकं अन्न साठवून घुसळण करण्या इतका सक्षम नसतो. जसजशी वाढ होईल तशी पचन संस्थेची वृद्धी होत जाते. तरीही बालकांच्या अशा वाढीच्या वयात योग्य ते पोषकांश शरीराला प्राप्त करुन देणं हेच खरं पालकांचं काम.
काही बालकांना भूक लागल्याची जाणीव होते, कळते. मग ते खाऊ खाऊ करतात. तर काहींना भूक लागलीय याची नीटशी जाणीव न समजल्यामुळे ते रडतात, चिडचिड करतात. अशा वेळी पालकांचाच कस लागतो की बालकाला भूक लागलीय की झोप? भुकेच्यावेळी त्यांना आवडणारा, भावणारा पदार्थ लगेच असेल तर मुलं पोटभर जेवतात. ही त्यांची मानसिकता सवयीनं अन् अनुभवानं शिकण्याची गोष्ट आहे. फार थोडी मुलं 'मला खूप भूक लागलीय, जेवायला दे.' असं ओरडून सांगू शकतात. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. काही बालकांना मोठे झाले तरी 'हा घास चिऊचा, हा घास काऊचा' असं करीत भरवावं लागतं. तर काहींना काहीही चारण्यासाठी मारावं लागतं. जितक्या बाललीला तितक्या खाऊ घालण्याच्या कला अंगिकाराव्या लागतात.
या वयातील (२ ते ५) बालकांना अधिक कॅलरीजची आवश्यकता भासते. कारण ते खेळकर असतात. त्यांचे शरी जादा ऊर्जेची मागणी करीत असते. शारीर क्रियांतील चयापचयाचा वेगही इतरांपेक्षा अधिकच असतो. अशामुळे योग्य तितके पोषकांश शरीराला मिळाले नाहीत तर कुपोषण होते. साधारणतः बालकांना पुढीलप्रमाणे कॅलरीजची आवश्यकता असते-
1) वय- १ ते ३ वर्षे
वजन- १२ कि.ग्रँ. (आसपास)
उष्मांक- १२२० किलोकॅलरीज.
2) वय- ४ ते ६
वजन- १९ कि.ग्रँ. (आसपास)
उष्मांक- १७२० किलोकॅलरीज.

पुढील वेळापत्रकानुसार बालकांचा आहार तक्ता आखावा-

सकाळी ६.३० दूध
७.३० नाष्टा- रवा, उप्पीट, गोड चपाती.
९.०० प्रोटीनेटेड मिल्क
११.०० गोड बिस्किटे

दुपारी १२.३० जेवण- पोळीभाजी, वरणभात, कोशिंबीर किंवा लस्सी
३.०० फ्रुट ज्युस किंवा मिल्क शेक
४.०० हॉर्लिक्स, कॉम्प्लँन, बूस्ट इ. एनर्जायझर द्यावे.
७.०० जेवण- मऊ चपाती, हेल्दी वेफर्स, इडली, डोसा, उत्तप्पा इ.

रात्री ९.०० दूध.

ही सारणी आदर्श आहारपद्धत म्हणून सुचविली जाते. यामध्ये बालकांच्या सवयीनुसार वेळांमध्ये बदल केला जाऊ शकतो. तसेच चवीनुसार विविध पाकसिद्धी देखील बदलता येऊ शकतात.

पूर्वी आमची आजी वा पणजी आमच्या खिशात सुकामेवा (बदाम, काजू, बेदाणे, खारीक खोबरे इ.) किंवा रानमेवा (फळे, शेंगा) यांचा 'चिम्मणचारा' भरायची. येता जाता आम्ही तो हादडत असू. त्यामुळेच बहुदा आम्ही धट्टेकट्टे निपजलोत!
आजच्या इन्स्टंट जमान्यात हा चिम्मणचारा कालबाह्य झालाय. तरीही बदलत्या काळानुसार सवयी बदलाव्याच लागतात. म्हणून बालकांच्या पुढ्यात कुरकुरे, वडापाव, भेळ असला निकृष्ट चिम्मणचारा न ठेवता त्यांना आवडणारे ड्रायफ्रूट्स (अक्रोड, प्रेस्ड अंजीर, आंबावड्या, चारोळ्या, पिस्ते इ.) किंवा सिजनल फळे, कंदमुळे (गाजर, रताळे, बीट इ.) हे द्यावे. बालकांच्या कलाकलाने त्यांना व्यवस्थित खाऊ घातल्यास ते किलोकिलोने वाढतील यात शंका नाही...

Syndicate content
Scroll to Top