टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
माध्यमवेध
बिडी काडी व्यसनमुक्ती
प्रेषक विकास ( गुरू, ०७/२४/२००८ - २०:३६) .मुलींच्या सिगरेटी ओढण्यावरून / दारू पिण्यावरून चर्चा चालू आहे.
पण आत्ताच वाचल्याप्रमाणे बिल गेट्स आणि न्यू यॉर्क शहराचा महापौर मायकेल ब्लूमबर्ग या दोघांनी मिळून $५०० मिलियन्स हे विकसनशील राष्ट्रातील लोकांमधून सिगरेटचे व्यसन जाण्यासाठी गुंतवायचे ठरवले आहे. बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशन त्यासाठी $१२५ मिलियन्स देत आहेत तर ब्लुमबर्ग (स्वतः माजी स्मोकर)ने $२५० मिलीयन्स आता आणि आधीत $१२५ मिलियन्स देण्याचे जाहीर केले आहे.
त्यांना हे काम विशेष करून भारत आणि चीन मधे करायचे आहे. त्यात त्यांना भारताकडून जास्त अपेक्षा आहेत कारण चीन मधे सरकारच सिगरेटी तयार करते
त्यामुळे किती शिकवता येईल यावर मर्यादा आहेत.
तर माझा प्रश्न असा:
ते पैसे देऊन प्रचार करायला मदत आहेत पण तुम्ही त्यात काय मदत करू शकाल?
- स्वतः ओढत असलात तर थांबवून
- स्वतः ओढत असलात/नसलात तरी स्वतः (जर ओढत असाल तर) आणि आपल्या आप्तेष्टांना / आजूबाजूच्यांना त्याच्या गैरपरीणामांबद्दल सांगून ओढायचे थांबवून
- पुढच्या पिढीस आत्तापासून त्यातील धोक्याचे शिक्षण देउन
- का हू केअर्स!?
समाजशिक्षण महत्वाचे असते पण ते करण्याची जबाबदारी केवळ सेवाभावी संस्था आणि सरकारचीच नसते तर ती "वर्ड ऑफ माउथ"ने पण जास्त होऊ शकते.
( अटी मान्य केला सर्व ह्या, )
प्रेषक अमोल केळकर ( मंगळ, ०७/२२/२००८ - ०९:२७) . ( अटी मान्य केला सर्व ह्या, )
आज काँग्रेस प्रणीत आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावास सामोरे जात आहे.
बहुमतांसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवताना मनमोहन / सोनियाजी यांच्या मनातील ही भावना.
चाल : सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?
( विशेष मदत : केसु गुरुजी )
-------------------------------------------------------
अटी मान्य केला सर्व ह्या, पाठी उभा राहशील का? ॥धृ. ॥
सरकार पडले संकटी आली जुलै बावीस ही!
हा दिवस अंतीम राहिला, चल साथ तू देशील का?
राज्यात आहे प्रीत पण दिल्लीत आहे सुख ही
तू लालगाडी ठेवणारा, मंतऽऽऽरी होशिल का?
जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाटले
तरी ही मला पैसे हवे, तू पुर्तता करशील का?
तव स्वाक्षरी घेण्यास ही आला शिपाई जर इथे
तू सांग तेव्हा सत्त्वरी , हा अंगठा देशील का?
-----------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ॥धृ.॥
मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ? ॥१॥
हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ? ॥२॥
जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ? ॥३॥
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ? ॥४॥
गीतकार : सुरेश भट
संगीतकार : राम फाटक
गायक : सुधीर फडके
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
सट्टाशाही
प्रेषक विकास ( सोम, ०७/२१/२००८ - १६:५०) .सध्या भारतात विश्वासदर्शक ठरावाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते पहाता आपली सर्वात मोठी "सट्टाशाही" आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. खालील बातम्या वाचताना अथवा जे काही चालले आहे ते पहाताना आपल्याला काय वाटते? परिस्थिती बदलता येईल का हे असेच चालणार म्हणत गप्प बसण्याला पर्याय नाही? सामान्य माणसाला यात काय करता येईल - एकट्याने अथवा एकत्रीत?
संदर्भः महाराष्ट्र टाइम्स
सरकार जिंकलं तर या एक रुपयाला वर दिलेल्या किंमतीनुसार भाव मिळेल. पण सरकार पडलं तर बुकींना प्रत्येक रुपयावर दोन रुपये मोजावे लागतील. दिवसेंवदिवस सट्टा बाजार गरम होत चालला आहे. आत्तापर्यंत सट्टाबाजारात ८५० कोटी लावण्यात आले आहेत. बुकिंच्या म्हणण्यानुसार २२ जुलैपर्यंत हा आकडा ३ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.
- रेंगे-पाटीलांना उचललं कुणी?
- स्पीकरपद न सोडल्याने सोमनाथदांवर लाल खफा
इत्यादी...
मराठी नाटक बंगालीत ..
प्रेषक अभिरत भिरभि-या ( शुक्र, ०७/०४/२००८ - १९:४९) .मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा
मुळ लेखक: सुब्रतो घोष .
मानुषेर समान मानुष
बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत. गांधार असेच एक दल.गेल्या शेहचाळिस वर्षात त्यंनी तेवीस एक नाटके मंचस्थ केलीत.अर्थात ते केवळ नाटकांच्या संख्येलाच नव्हे तर दर्जालाही महत्व देतात हे जाणवते.यंदाचे नाटक आहे शिरिष आठवल्यांच्ये मराठी नाटक 'मित्र'; ज्याचा विजयालक्ष्मी बर्मन यांच्या सहयोगाने काछेर मानुष' ( जवळचा माणूस) या नावाने बंगाली अनुवाद केलाय कमल सान्याल यांनी.
वर्ण वा जातीच्या आधारावरची विभागणी माणसाला माणसापासुन तोडू शकत नाही हि गोष्ट हे नाटक पुन्हा सांगु पाहते. ज्या बाबी समाजाला मागे रेटु बघतात त्यात मुख्य असते ही जातीपातीची मानसिकता.याचा उत्तर व पश्चिम भारतातला चेहरा इतका भेसुर की सहज ओळखला जावा. पण या तथाकथित पुरोगामी राज्यात - प. बंगाल मधे - हा चेहरा इतका भिन्न की ओळखु येण्यास उशिर व्हावा.नाटकात शिरिष आठवल्यांचे मराठी वातावरण जरी कायम असले तरी नाटकच्या शेवटी वाटते की नाटककाराला जे सांगायचेय ते ह्या राज्याच्या राजकीय/सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीसही पुरेपुर लागु आहे.
दादासाहेब पुरोहित संस्कारांमुळे कट्टर दलितविरोधी परंतु घटनाचक्रामुळे या विधुर गृहस्थाच्या
शारिरीक पंगु अवस्थेतून सोडवणुक करण्यासाठी येते सावित्रीबाई रुपवते नावाची दलित वर्गातील बाई.ददासाहेबांची मुलेबाळे आपापल्या नोकरीधंद्याच्या जागी असतात आणि तेथुनच पित्याची विचारपुस करत असतात. प्रारम्भी जात्याभिमानी दादासाहेब सावित्रीबाईंस काही एक दाद देत नाहीत. दुसरीकडे कामावर निष्ठा असलेली ही स्वाभिमानी बाई - जी स्वत:ला मिसेस रुपवते म्हणूनच ओळखु इच्छिते - कर्तव्यात काडीमात्र कसुर न करता रोग्यास बरे करण्याच्या मागे लागते. दादासाहेब जसजसे ठीक होऊ लागतात मि. रुपवतेंवरचे त्यांचे अवलम्बन वाढत जाते.मुलगी मैत्रेयी जेव्हा दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध स्वत:जवळ परदेशी नेऊ बघते तेव्हा दादासाहेब तिला स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मि. रुपवतेंच्या सुश्रुषेच्या बळावर खडखडीत बरे होऊन सिद्ध करतात की मुलीपाशी जायचे आता कोणतेही कारण नाही. दादासाहेबांना केवळ शारिरिक जोखडातुनच नव्हे तर जातीच्या खोट्या अभिमानातुनही मुक्ती मिळते
ही कहाणी सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहे. नाटककार कोणताही आडपडदा न ठेवता मुळ विषय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. सारे नाटक घडते ते दादासाहेबांच्या दिवाणखान्यात व स्वयंपाकघरात. दादासाहेबांचे एकाकीपण यामुळे प्रेक्षकांपर्यन्त पोहचते.
लेखाच्या उर्वरित भागात नेपथ्य / अभिनय वगैरे अंगांवर टीकाटिप्पणी आहे. भाषांतर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अनुवाद कृत्रिम वाटल्यास जरुर सांगावे.
मायमराठी!
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, ०७/०१/२००८ - २३:१२) .मिसळपाव अथवा मराठी संकेतस्थळावर मराठीतून लेखन करताना तिथल्या अंगभूत सोयीमुळे कोणतीच अडचण येत नाही. मात्र ऑर्कुट अथवा कोणत्याही संवादकात(मेसेंजर) लिहिताना बहुसंख्य लोक रोमन लिपीचा वापर करून मराठी लिहितात;थोडक्यात मिंग्लीशमध्ये संभाषण होत असते.
माझी अशी धारणा आहे की निदान दोन मराठी भाषकांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे मराठीत आणि लेखी संभाषणात देवनागरीतून संवाद साधावा. त्यासाठी मेतकूटवर आम्ही काही जणांनी मायमराठी हा समूह स्थापन केलेला आहे. आपण तिथे जरूर भेट द्या आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्या सूचना,शंका-कुशंका जर काही असतील तर जरूर विचारा. त्यावर विचार केला जाईल. शक्य त्या सर्व शंकांची उत्तरे दिली जातील .
या.मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवू या!
फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ
प्रेषक II राजे II ( शुक्र, ०६/२७/२००८ - १०:०४) .
यांना विनम्र श्रध्दांजली !!
फिरती इमारत - स्पीनिंग टॉवर
प्रेषक सहज ( बुध, ०६/२५/२००८ - १५:२९) .इस्त्रायली-इटालियन वास्तु विशारद डेव्हीड फिशर यांनी एका नव्या फिरत्या इमारतीचे डिझाईन केले आहे.

चित्र स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम
वैशिष्ट्ये
ही संभाव्य ६८ मजली स्कायस्क्रॅपर मजलेवार गोलाकार फिरणारी असणार आहे.
एका मजल्याचे एक आवर्तन पुर्ण होण्यास ९० मिनटे लागतील [एका मिनीटाला ६ मिटर या गतीने] व आतल्या लोकांना मळमळणार नाही
असे फिशर म्हणाले.
प्रत्येक मजला हा "डोनटच्या" आकाराचा असणार आहे.
विंड टर्बाईनच्या तंत्रज्ञानाने ही इमारत गोलाकार फिरताना स्व:ताची उर्जानिर्मीती देखील करु शकणार आहे.
लोक स्वताची कार अगदी आपल्या मजल्यावर घराच्या दरवाज्यापाशी नेउ शकतील अशी व्यवस्था केली जाणार आहे.
३६० अंशात फिरल्याने खिडकीतुन शहरातील बर्याच भागचे दर्शन होणार.
प्रत्येक मजल्याची प्रदक्षीणा इतर मजल्यांपेक्षा वेगळी असणार त्यामुळे बाहेरुन इमारतीचा आकार म्हणजे एक वेगळेच लाटेसारखे बदलते स्वरुप असणार.
अर्थात अश्या फिरत्या इमारतीचे डिझाईन करणारे फिशर हे पहीले वास्तुविशारद नव्हेत. मागील वर्षी दुबई प्रॉपर्टी रिंग ह्या कंपनीने २०० गाळे असलेली फिरती इमारतीच्या आराखडा प्रसिद्ध केला होता. सोलार पॉवर ने नियंत्रीत तंत्रज्ञानावर आधारीत इमारतीत एक मजला गोलाकार फिरायला एक दिवस लागणार आहे.
फिशर म्हणाले की ही बिल्डिंग संपुर्णता पार्ट बाय पार्ट कारखान्यात बनेल व प्रत्यक्ष जागेवर फक्त जुळवली जाईल. बांधायला २२ महीने लागतील. साधारण ३३० मिलीयन यु एस डॉलर्स ही तितकी महाग किंमत नाही. आपल्या घरातुन ३६० अंशात शहराचे दर्शन घडवणारी एकमेव इमारत ह्या वैशिष्ट्यामुळे सर्व युनिट्स हातोहात खपतील असा फिशर यांचा दावा.
सध्या मास्को व दुबई यांनी अश्या इमारती मधे रस दाखवला आहे. अर्थात सध्याचे तेलाचे भाव बघता "दुबई" असे चमत्कार खरच प्रत्यक्षात आणु शकते. 
ह्या इमारतीचे कल्पना दाखवणारी चित्रफीत येथे!!
स्त्रोत - डायनॅमीक आर्कीटेक्चर डॉट कॉम
ऑनलाईन मराठी -> इंग्रजी डिक्शनरी
प्रेषक अभिरत भिरभि-या ( बुध, ०६/२५/२००८ - १४:४०) .जालावर फिरत असताना हि डिक्शनरीची लिंक सापडली....
१
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/
२
http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/
खालील दोन ग्रंथांचे इ-रुपांतरण केलेले दिसते ....
Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857.
Vaze, Shridhar Ganesh. The Aryabhusan school dictionary, Marathi-English. Poona: Arya-Bhushan Press, 1911.
गमतीचा भाग म्हणजे या प्रकल्पा साठी आर्थिक मदत अमेरिकेच्या शिक्षण खात्याने केली आहे ..
बघा ... अमेरिका मराठीसाठी आर्थिक मदत करते; संमेलने भरवु इछ्छिते आणि आपण नुसता विरोध करतो ( ह्.घ्या.)
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
प्रेषक नरेंद्र गोळे ( रवी, ०६/२२/२००८ - ०८:४५) .पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस
नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत. नव्या मुंबईच्या क्षितिजरेषेवरच त्यांनी 'हावरे' नाव कोरले आहे. बांधकामक्षेत्रात सर्वात गतिमान आणि विश्वासार्ह व्यवसाय समर्थपणे प्रस्थापित करून ग्राहकांच्या पसंतीस पोहोचवणाऱ्या मराठी मातीतल्या उद्योजकाची ही यशोगाथा आहे. उद्योजकतेची आस मनात धरून समोर येणाऱ्या होतकरू मराठी तरुणांना, आयुष्य घडवावे कसे ह्याचा वस्तुपाठ म्हणून ते उपयोगी ठरू शकेल याचा विश्वास वाटतो.
दुवा क्र. १: हावरे डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळावर आता या पुस्तकाचे 'वि-पुस्तक (e-book)' आविष्करण निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. वाचकांनी ते अवश्य वाचावे आणि उद्योजकतेचा मार्ग गवसतो का ह्याची चाचपणी करावी. मार्ग नाही तरी दिशा अवश्य मिळू शकेल. किमान प्रेरणा तर खासच.
दुवा क्र. २: 'सूर्य पेरणारा माणूस' http://www.haware.com/Surya-Peranara-Manus-Pravin-Davane.pdf
दवणे म्हणतात, "जिद्दीच्या बिया घेऊन सतीश हावरे नावाचा 'सूर्य पेरणारा माणूस' आकाशावर आपली नाममुद्रा कोरून गेला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक धडपडणाऱ्या युवकाला जिद्दीच्या बिया देण्याचे मोलाचे काम सतीश हावरे यांच्या आयुष्याने केलेले आहे. इमारती उभ्या करतांना, हजारो उपेक्षितांची, आयुष्ये उभी करणाऱ्या सतीश हावरे यांचे अजिंक्य जीवन नियतीलाही पुसता आले नाही. विदर्भातील पथ्रोट या छोट्या गावातून नव्या मुंबईतील 'हावरे बिल्डर्स'पर्यंतचा हा गगनचुंबी प्रवास. प्रत्येक पालकासाठी! प्रत्येक शिक्षकासाठी! जिंकू इच्छिणाऱ्या प्रत्येक कोवळ्या मनासाठी! "
रात्री सवास - थायलंड सफर (अंतिम)
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/२१/२००८ - १५:१४) .सायं सवास पासून पुढे...
थायलंडमध्ये खाओ याई नॅशनल पार्कला गेलो होतो. पावसाळ्यात खरं तर इथे भेट द्यायला हवी पण इतर वेळेसही भेट द्यायला हरकत नाही. इथे रहायचीही व्यवस्था आहे. तंबूंपासून अगदी हवेशीर बंगल्यांची सोय आहे, पण महिन-दोन महिने आधीच नोंदणी करावी लागते. बुकींग फुल्ल असल्याने माझा कार्यक्रम एका दिवसात आटोपता घ्यायला लागला. त्यामुळे नाईट सफारीचा आनंद घेता आला नाही. धबधबे, जंगलवाटा, अगदी रस्त्यांवर फिरणारी हरणंही हमखास भेटतात इथे.
काही चित्रे:
या राष्ट्रीय उद्यानानजीकच जमिनीखाली तयार झालेले एक निसर्गनिर्मित बुद्धाचे देऊळ आहे. चुनखडकावर काही प्रक्रिया होऊन निसर्गतःच तयार झालेली अमूर्त शिल्पकृती इथे पहायला मिळतात-
काहीठिकाणी तर ह्या भिंती अर्धपारदर्शी आहेतः
याचसोबत खरेदीसाठी जतुजा ( थाई उच्चार : जाः तुक् जा:) मार्केटला चक्कर टाकावी. बँकॉकमधला जणू आठवडाबाजार! तब्बल २० हजारच्या आसपास दुकाने असणार्या या बाजारात बर्याच गोष्टी मिळतात. भाव करायला तुम्हाला थाई अंक, संख्या यांची थोडीफार ओळख असायला हवी. किंवा मग एखादा थाई मित्र अथवा मैत्रिण सोबत असेल तर चांगले.
समिंदरावर जायचे असेल तर चा-आम, फुकेत ला जावे. सोबत नाईट लाईफ अनुभवायची असल्यास पट्टाया! पर्यटकांच्या रेट्यामुळे हल्ली पट्टाया गजबजलेले असते तरी त्याचे आकर्षण परदेशातील लोकांनाच, थाई लोक मात्र त्यापेक्षा निवांत आणि चांगल्या समुद्रकिनारी जाणं पसंत करतात.
थायलंडमधील आणखी काही प्रकाशचित्रे त्यात सहभागी असणार्या थाई व्यक्तींची अनुमती नसल्याने देऊ शकलो नसलो तरी या सुस्वभावी लोकांनी केलेलं आदरातिथ्य मात्र कायम लक्षात राहील. भारताबाहेर आपली जमीन, आपलं आकाश आणि आपली माणसं वाटावीत अस थायलंडचं आश्वासक चित्र मनात आहे. जमल्यास थायलंडची सफर नक्की करून या.
या लेखांचा शेवट काही चित्रफितींनी करतो.
रटरटते चिकनः
लोटी तयार करणार्या थाई महिलेची हातोटी:
फ्लोटिंग मार्केटमध्ये मिळणारा गोड पदार्थ नावेत बसून बनवताना:
बँकॉकच्या रस्त्यावर नाचणारी पोरं टोरं:
निद्रिस्थ बुद्धराजः
रात्री सवास !(good night!)
