टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
संदर्भ
मोरारजी आणि जेठमलानी
प्रेषक अजय ( सोम, ०७/२१/२००८ - १७:३६) .राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार....
त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर...
ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं.
त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते समजण्यासाठी पत्रकारितेपेक्षा उत्तम माध्यम नक्कीच नाही. या माध्यमातूनच एक किस्सा या अस्सल राजकारणी शहरात कळाला. तोही नेहमीच वादग्रस्त राहिलेले हुशार वकील, विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या तोंडून.
जेठमलानी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मुद्दाम प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करून चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची धडपड करणारा हा बेधडक माणूस. प्रत्यक्ष गप्पांमध्ये ते अमळ अघळपघळ जाणवले. (कदाचित पत्रकारांशी बोलायचे म्हणूनही असेल.)
दुपारी तीनची वेळ होती. अकबर रोडवरील बंगल्यावर बोलावून त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. नेहमीप्रमाणे काही खायला देण्याचा जगन्मान्य असलेला शिरस्ता त्यांनीही पाळला. समोसे आणि कोल्ड्रिंक्स होते. बोलणे आटोपल्यानंतर त्यांनी खाण्याचा आग्रह धरला.
कोल्ड्रिंक वर त्यांची कोटी भन्नाटच होती.
जेठमलानी म्हणाले, ""अहो, दुपारीच वेळ आहे म्हणून हे कोल्ड्रिंक. नाही तर "वेगळ्याच ड्रिंक'ची व्यवस्था केली असती.''
हा ओला विषया निघाल्यामुळे ते एकदमच मोरारजी देसाईंच्या काळात गेले.
जेठमलानींच्या मते मोरारजीभाई म्हणजे स्वतःच एक संस्था होते. मद्यपानाला नव्हे तर मद्यनिर्मितीलाही त्यांचा कट्टर विरोध सर्वश्रृत होता. 1978 की 79 (वर्ष नक्की आठवत नाही.) त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार अंतिम घटका मोजत होते. मोरारजीभाईंसोबत असलेली सर्व मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती. लोकसभेतही त्यांनी मोराराजींच्या विरोधातच मतदान केले. जेठमलानी मात्र त्यांच्या बाजूने होते.
पराभवामुळे प्रचंड चिडलेल्या मोरारजीभाईंना जेठमलानी भेटले. म्हणाले, ""बघा, तुम्ही दारूचे कट्टर विरोधक. पण, तुमच्या सारखेच दारूचे कट्टर विरोधक तुमच्याही विरोधात गेले. माझ्यासारखा मदिराभक्त मात्र तुमच्या बाजुला आहे.'' त्यावर मोरारजी देसाई हसले.
त्यांचा राग जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर होता. त्यामुळे ते म्हणाले, "" अहो, त्या बदमाश माणसाने (जॉर्ज) साथ देण्याचे सांगत अगदी शेवटच्या क्षणी दगा दिला.'' त्यावर जेठमलानींच्या उत्तराला मात्र त्यांनी खळाळून दाद दिली.
जेठमलानींचे उत्तर होते, ""अहो, तुम्ही जे रोज घेतात (शिवाम्बू) तेच जॉर्जसुद्धा घेतात.''
----------------------------------------------------
दुसराही एक किस्सा त्यांनी ऐकवला.
मोरारजीभाईंनी दारूबंदी सर्वत्र लागू करावी, यावर विचारविनीमय करत होते. त्यावर जेठमलानी त्यांना म्हणाले, की मला माफक मद्यपान आवडते. मात्र तुम्ही त्यावर बंदी आणणार असाल, तर मला माझे व्यक्तिस्वातंत्र्य (पिण्याचे) टिकविण्यासाठी तरी त्याचे प्रमाण वाढवावे लागेल.
--------------------------------------------
हे किस्से कदाचित कुठे लिहिलेही गेले असतील किंवा कोणी वाचलेही असतील. कदाचित नसेलही. मला तो प्रत्यक्ष ऐकल्यामुळे सर्वांसोबत शेअर करावासा वाटत असल्याने खास आपल्यासाठी..........
मायमराठी!
प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, ०७/०१/२००८ - २३:१२) .मिसळपाव अथवा मराठी संकेतस्थळावर मराठीतून लेखन करताना तिथल्या अंगभूत सोयीमुळे कोणतीच अडचण येत नाही. मात्र ऑर्कुट अथवा कोणत्याही संवादकात(मेसेंजर) लिहिताना बहुसंख्य लोक रोमन लिपीचा वापर करून मराठी लिहितात;थोडक्यात मिंग्लीशमध्ये संभाषण होत असते.
माझी अशी धारणा आहे की निदान दोन मराठी भाषकांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे मराठीत आणि लेखी संभाषणात देवनागरीतून संवाद साधावा. त्यासाठी मेतकूटवर आम्ही काही जणांनी मायमराठी हा समूह स्थापन केलेला आहे. आपण तिथे जरूर भेट द्या आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्या सूचना,शंका-कुशंका जर काही असतील तर जरूर विचारा. त्यावर विचार केला जाईल. शक्य त्या सर्व शंकांची उत्तरे दिली जातील .
या.मराठीचा झेंडा त्रिखंडात फडकवू या!
ऑनलाईन मराठी -> इंग्रजी डिक्शनरी
प्रेषक अभिरत भिरभि-या ( बुध, ०६/२५/२००८ - १४:४०) .जालावर फिरत असताना हि डिक्शनरीची लिंक सापडली....
१
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/
२
http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/
खालील दोन ग्रंथांचे इ-रुपांतरण केलेले दिसते ....
Molesworth, J. T. (James Thomas). A dictionary, Marathi and English. 2d ed., rev. and enl. Bombay: Printed for government at the Bombay Education Society's press, 1857.
Vaze, Shridhar Ganesh. The Aryabhusan school dictionary, Marathi-English. Poona: Arya-Bhushan Press, 1911.
गमतीचा भाग म्हणजे या प्रकल्पा साठी आर्थिक मदत अमेरिकेच्या शिक्षण खात्याने केली आहे ..
बघा ... अमेरिका मराठीसाठी आर्थिक मदत करते; संमेलने भरवु इछ्छिते आणि आपण नुसता विरोध करतो ( ह्.घ्या.)
सुहास शिरवळकर
प्रेषक नन्या ( शनी, ०६/१४/२००८ - १६:५५) .प्रख्यात लेखक दिवगन्त सुहास शिरवळकर याचे मानसपुत्र मन्दार पत्वर्धन आनी फीरोज ईरानी या विषयी माहीती आहे का?
मी.पा. करानो अशुधलेखना बद्दल माफी असावी.
पुलंदर्शन!
प्रेषक प्रमोद देव ( गुरू, ०६/१२/२००८ - ०७:४८) .आज १२ जून. आज पुलंचा स्मृतीदिन. पुलंच्या काही भावमुद्रा इथे देण्याचा मोह होत आहे.

साहित्य साधनेत मग्न!

पहिल्या चित्रात पंडित भीमसेनांबरोबर आणि दुसर्या छायाचित्रात पंडितजींना पेटीवर साथ करताना.
पु.ल.देशपांडे! महाराष्ट्राला पडलेलं एक हसरं स्वप्न! ह्या माणसाने निर्विष विनोदाने कोट्यावधी मराठी लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवलेले आहे. पुलं ची रुपेही अनेक. साहित्यिक पुलं,संगीतकार-गायक पुलं,नाटककार,नट,पटकथाकार,दिग्दर्शक अशा कितीतरी वेगवेगळ्या भूमिका जगून ह्या माणसाने मराठी माणसाचे सांस्कृतिक आयुष्य समृद्ध करून टाकलंय.
पुलंचे लेखन इतके सर्वव्यापी आहे की व्यवहारात त्या त्या प्रसंगाला अनुरुप अशी त्यांच्या लेखनातील वाक्ये आपल्याला आठवत असतात आणि त्या प्रसंगातही आपण रमतो असा माझा अनुभव आहे.
पुलंच्या पुण्यस्मृतीला माझी विनम्र आदरांजली.
पुलंची सर्व छायाचित्रे पुलंदेशपांडे.नेट वरून साभार
तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?
प्रेषक अरुण मनोहर ( बुध, ०६/११/२००८ - ०७:३५) .मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का?
मी माझ्यापासून सुरवात करतो.
मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद.
याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत.
एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत.
दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD. हे फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. ह्या लीन्कवर त्यांची सुंदर प्रकाशचित्रे आहेत. http://www.flickr.com/photos/arunmanohar/
आणखी कोणी?
बघुया कदाचित इतर मिपाकरांकडून आणखी काही इन्टरेस्टींग माहिती मिळेल.
अरून सवास, सायं सवास! भाग - २
प्रेषक ॐकार ( शनी, ०६/०७/२००८ - ००:१५) .अरून सवास वरून पुढे चालू...
सायं सवास - संध्याकाळचे अभिवादन करण्याची थायलंडमध्ये इतकीशी काही पद्धत नाही पण तुम्ही थायलंडमधले नसाल तर हे अभिवादन कानी पडतं. थायलंडमधलं विदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'फ्लोटिंग मार्केट'. नदीच्यालगत काढलेल्या कालव्यांतून इथे लहान मोठे बाजार भरतात. फळं, फुलं , भाज्या, कपडे, टोप्या, छत्र्या, थाई रेशीम, शोभेच्या वस्तू इतकंच काय अगदी नूडल्स पासून केळ्याचं साटंही इथे चाखता येतं! सफर कबाजाराची एक चक्कर मारायला नावेतून जायला माणशी १०० बाह्थ लागतात. (१ बाह्थ - थाई चलन = १.२५ रू).
काही प्रकाशचित्रे -
निघालो बाजारा...
भाऊगर्दी!
आधी पोटोबा
गाँन् - सिप् गाँन् (१० - १२) प्रकार!
खाऊन तर पहा!
जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमको गुजरना नहीं!
मा फलेषु... ?
सावर रे- ऊंच झुला

कालव्याच्या काठावरच्या घरासमोरचे तुळशी वृंदावन.. आपले बुद्ध - वृंदावन.

नो ट्रॅफिक!

मला बघून विचार करत असावी - नुस्ता फोटूच काढणार की काही विकत पण घेणार

एक धागा सुखाचा ....


साखरेचे खाणार !
फ्लोटिंग मार्केट मधेच एका नावेत हा मस्त गोड पदार्थ विकत घेतला. तांदळाच्या डोश्यासारख्या छोट्या द्रोणांत पपईचा कीस, खवलेल्या नारळाची गोड पेस्ट आणि साखर. जीभेवर ठेवताच विरघळायला लागतो असा हा खाद्यप्रकार!
याचसोबत थायलंडमध्ये अगदी हमखास मिळणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखला - लोती (रोटी) . पण ह्याचा पोळी अथवा रोटीशी फारसा संबंध नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास साध्या डोश्यात "बुढ्ढीके बाल" भरा आणि त्याची गुंडाळी करून खा! खायला मजा येते.
मी हाय कोली
समुद्रमंथनातून काहीका निघालं असेल, मात्र ओहोटीच्यावेळी समुद्रकिनारी मिळणारे जीव आणि सी-वीडस् यांचा हा रूचकर पदार्थ मस्त होता.

आणि मासा! (ह्यापेक्षा त्याचं अधिक वर्नन करणं म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखं आहे! )

अरेच्चा, आत्ता होता! गेला कुठे?
वरच्या फोटूंतील पदार्थ आणि नदीतला मोठा खेकडा असा बेत तीन माणसांत होता. सगळं फस्त! आणि मस्त!
जपानचे खानपान
थायलंडमध्ये जपानी खाण्यावर प्रेम करणारे बरेच खवय्ये आहेत. मला व्यक्तीशः जपानी खाणं खास वाटलं नाही. पण खाता न येण्याइतकं वाईट तर नक्कीच नाही. ह्या खाण्यातही एक थाटामाटाचा प्रकार आहे. ह्यात हिरव्या कच्च्या भाज्या, मांस, नूडल्स, चटणी , रॉ सी-फुड, तोफू यांची चळत आणून देतात.
टेबलाच्या मध्ये विजेवर चालणारी अगदी निटस हॉटप्लेट असते. यात पाणी गरम करून वरचे पदार्थ घालून खात रहायचे.
सोबत नूडल्स आणि सुशी.सोबत आम्ही खाल्ला तो खाना म्हणजे रोस्टेड डक! दील खुश हो जाता है!
१)
२)
३)
४)
५)
अप्रस्तुत तरी अपरिहार्य
मांसाहार खाणं म्हटलं आणि त्यात बीफ म्हणताच त्रागा करणारे लोक आहेत. त्यामुळे एखादवेळेस बीफ अप्रस्तुत वाटेल पण खाण्याचे लाड असल्याने त्याची आठवण अपरिहार्य आहे.
तसं म्हणावं तर हा प्रकार वातड. त्यातही टी-बोन, न्यूयॉर्क असे प्रकार आहेत. थायलंडमध्ये गाय आणि डुक्कर तेतक्याच चवीने खातात. त्यापेकी जे बीफ खाल्ले ते वर चित्रात आहे. पोर्क त्यामानने बरं लागतं.
अदरक मारके!
आल्याचा गरम तिखट रस त्यात लिंबू आणि साखर आणि त्यात अगदी मुलायम तोफू!

ह्याने घसा सुटला नाही तर नवल. अशी हुकमी खादाडी करायला तुम्हाला थाई मित्र-मैत्रिणींसोबतच फिरावं लागेल.
कावासान - बँकॉकमधली खाऊगल्ली
रस्त्यावरचं चमचमीत खायचं असेल तर कावासानला जावं.

नूडल्स, सूप, भात इथपासून चिकन, पोर्क, मासे ते अक्षरशः तळलेले, भाजलेले चतूर, बीटल्स, साप ह्यातलं काहीही खायला मिळेल इथे! ( हो हो खायला, तुम्ही बरोबर वाचत आहत
)
तरंगते रेस्तराँ
बँकॉक मधल्या नदीच्या काठांवर मोजकी तरंगती रेस्तराँ आहेत. लाकडी पायांवर बांधलेली ही रेस्तराँ नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. त्यापैकी एकात मासे खायचा योग होता-

चित्रातल्या मध्यभागी चिकन रस्सा. तो सतत गरम रहावा म्हणून ज्योतीने गरम करायला खास पात्र! हा पदार्थ थायलंडमध्ये अगदी आवर्जून मागवतात. डावीकदच्या पुढच्या ताटलीत मासा. मागच्या ताटलीत अननस -भात - बिर्याणी. उजवीकडच्या ताटलीत नारळाच्या पानांमध्ये बांधून शिजवलेली कोलंबी.
थायलंडमध्ये स्टिक्स-कांड्या घेऊन खायला शिकायला मला ३-४ दिवस लागले. पण चमच्याने खाण्यापेक्षा याची सवय करणंच चांगलं. थायलंडपध्ये प्रत्येक ठिकाणी काटा चमचा मिळेलचं असं नाही. थायलंडमध्ये थाई थंड कॉफी प्यावी. मधुमेही व्यक्तींनी मात्र याच्या वाट्याल जाऊ नये. मातीच्या भांड्यात जर केली असेल तर चव न्यारीच. पण भरपूर गोड.
पुढच्या भागात खाओ हाई नॅशनल पार्क आणि काही इतर स्थळांबद्दल लिहीन...
अरून सवास! भाग १
प्रेषक ॐकार ( शुक्र, ०५/३०/२००८ - १२:१२) ."अरून सवास!" - थाई भाषेतलं सकाळचं अभिवादन कानी पडलं आणि कुठेतरी शब्दांची जत्रा लागल्याची चाहूल लागली. थायलंडच्या एका महिन्याच्या वास्तव्यात थाई लोक, काही ठिकाणे, थाई खाणे-पिणे, थाई संस्कृती आणि थाई भाषा यांची थोडीशी ओळख झाली आणि भारताबाहेर पहिल्यांदा घरोब्याचा अनुभव आला. थायलंडला जायच्य आधीच काही नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग शिकलो होतो आणि भाषासाधर्म्याचे कुतूहल जागे झाले. थायलंडच्या विमानतळाचे नाव - सुवर्णभूमी ! पहिले पाऊल जिथे टाकणार त्या अनोळखी प्रदेशाचे नाव इतके ओळखीचे असेल असा अंदाजच नव्हता. थायलंडला उतरल्यावर मात्र कुतूहल आणि अंदाजाची जागा उत्साह आणि आनंदाने घेतली. थायलंड बद्दल माझे काही अनुभव इथे मांडावेत असे कधीपासून मनात होते , आज योग आला.
ग्रँड पॅलेस

थायलंडमधले पर्यटनासाठी विषेश प्रसिद्ध असलेले हे ठिकाण. बँकॉक - राजधानीपासून जवळ आहे. डोळ्यांसाठी वैभवाची मेजवानीच!

सुवर्णकळस

सोनेरी खांब

गरूड

शेषनाग

भिंतीवर चितारलेला रामायणातील एक प्रसंग

भालदार चोपदार (?)
अयुथया - अयुत्थ्या (अयोद्ध्या)
बँकॉकपासून गाडीने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ऐतिहासिक स्थळ. हे शहर ख्मेर राजवटीत वसवले होते आणि ते आधी राजधानीचे शहर होते. इथे ठिकाणी बुद्धाचे अनेक सोनेरी कळसाचे स्तूप, प्रार्थना/निवास स्थळे होती. बर्मातील टोळ्यांनी जेव्हा थायलंडवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी इथले सगळे सोने लुटून नेले.




आज केवळ अवषेश उरले आहेत. तरी त्यांच्यावरून गतकाळातील वैभवाची कल्पना करता येते. त्यानंतर चक्री राजघराण्यातील राजा राम (प्रथम) याने राजधानी बँकॉकला हलवली.
जुने थाई लाकडी घर.


हे घर जमिनीपासून थोडे उंचावर बांधले जाते. यामुळे घरात हवा खेळती राहते. घराची रचना सर्वसाधारणपणे अशी - मध्ये मोकळी जागा, चार बाजूंनी स्वयंपाकघर, पाहुण्यांकरता खोल्या, अभ्यासिका, शयनकक्ष. प्रत्येक बाजूंना उतरती छपरे. मध्ये मोठे छप्पर.
थायलंडमध्ये जिथे जिथे फिरलो तिथे आदरातिथ्याने भारावून गेलो. प्रगतीशील अशा या देशात आधुनिकतेबरोबरच लोकांची आपुलकीही तग धरून आहे. सवात्दी खा /क्रब (खा - स्त्री म्हणते तेव्हा, क्रब - पुरूष म्हणतो तेव्हा) असे म्हणत थाई व्यक्ती तुमचं स्वागत करेल. कॉब खुन् खा/क्रब म्हणून तुम्ही धन्यवाद द्याल आणि ह्यापुढे तुम्हाला थाई येत नसेल तर मात्र पंचाईत! थाई भाषेतील पाली-संस्कृत मधून आलेले शब्द जरी ओळखीचे वाटले तरी आज वापरात असलेले थाई शब्द मात्र तितकेसे पटकन कळतीलच असे नाही. त्यासोबतच ख्मेर मधूनही थाई भाषेत शब्द आले आहेत. थायलंडमध्ये सगळ्यांना इंग्रजी येतेच असं नाही आणि येत असली तरी आपली इंग्रजी आणि थाई इंग्रजी यांतून कोण काय बोलतो ते समजणे आपल्याला आणि थाई माणसालाही कठीणच! थाई टोनल भाषा आहे त्यामुळे शब्दांच्या उच्चारांतील बारकावे शिकायला, समजून घ्यायला मेहनत घ्यावी लागते. पण बरेचदा थाई व्यक्ती स्मितहास्यानेच तुम्हाला अर्धेअधिक जिंकून घेतात.
काही ठिकाणांची नावे पहा -
समुत् संख्रोम (समुद्र संग्राम)
रचतापिसेक (रजताभिषेक)
कांचनबुरी (कांचनपूरी)
राचाबुरी (राजापूरी)
सुवर्नापिसेक (सुवर्णाभिषेक)
अयुत्थया (अयोद्ध्या)
काही साधारण नावे -
तलेय (तळे ) थाई भाषेतला सद्ध्याचा अर्थ डबके , गरूड, शेषनाग
असेच काही संदर्भ सण, कालगणना याबाबतही मिळतात -
मकबुचा - (मकपूर्निमाबुचा) - माघी पौर्णिमा (बुचा - पूजा )
विसाखाबुचा - वैशाखपूजा - वैशाख पौर्णिमा - बुद्धपौर्णिमा
भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे काही धागेदोरे जुळतात. पण ह्या फंदात जास्त न पडता तुम्ही जर थायलंडमध्ये लोकांत मिसळलात तर तो आनंद काही निराळाच.
पुढच्या भागांत फ्लोटींग मार्केट आणि थाई खादाडीबद्दल लिहीन. तूर्तास इतकेच...
भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ
प्रेषक आजानुकर्ण ( बुध, ०५/२८/२००८ - २२:१८) .भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे.
मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले
म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.
या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्यांना, लिहिणार्यांना, वापरणार्यांना संशयदेखील येऊ नये.
पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!
पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा
विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."
अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती.
भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.
भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने
. मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.
डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.
भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "
याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.
पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"
मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला मधुचोष्यक हा शब्द सुचवला
मराठी भाषेचे मूळः
राजाध्यक्षांच्या मतांनंतर 'मराठी भाषेचे मूळ' आणि 'अडगुलं मडगुलं' या थोर पुस्तकांचे लेखक, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांचा मनोगतावर वाचलेला एक प्रतिसाद येथे देतो.
... मराठी व तमिळ या भाषांचा आणि संस्कृतींचा गाढ, प्राचीन संबंध दाखवणं हे या सर्व
लेखनाचं उद्दिष्ट आहे.प्रतीकार्थानं हा संबंध मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत
आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं/ सोन्याचं कडगुलं/रुप्याचा वाळा/ तान्ह्या बाळा/
तीट लावू//
तमिळमध्ये अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. मट्कलम् म्हणजे मडकं. मण् म्हणजे माती आणि कलम म्हणजे भांडं यावरून तो शब्द आला आहे. 'मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं' असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. सोन्नम् म्हणजे सोनं आणि कडगम् म्हणजे कडं. ' मडकं देऊन सोन्याचं कडं घेतलं.' वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ. इरिप्पु म्हणजे रुपं, 'रुप्याचा वाळा घेतला.' हे दागिने तान्ह्या बाळाला घातले. 'ती' म्हणजे आग, जाळ. तीत्तल म्हणजे करपवणं, काजळणं. तीट्टुतल् म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा. 'दृष्ट' लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत. तमिळ आणि मराठी समानार्थी शब्द किती सारखे आहेत पाहा.
खैरे विचारतात, "नवतरण्या महाराष्ट्री माउलीने तान्ह्या मराठी बाळाला जी शब्दाभूषणे घातली ती तमिळाईकडून तर घेतली नव्हती?" "होय" असं आत्मविश्वासपूर्ण उत्तर देण्यापर्यंत खैर्यांचा प्रवास नजीकच्या काळातच झाला. आणि केवळ शब्दभूषणं नव्हे तर सांकृतिक आभरणंही तामिळाईकडून मिळाली असे पुरावे ते सादर करीत राहिले.ओवी, अंगाई, पोवाडा हे सर्व तमिळमधून आले. ओवीचा चौथा चरण तुटका असतो एवढ्यावरून त्या अर्थाचे संस्कृत शब्द बनवायचे आणि त्याचा अपभ्रंश म्हणून ओवी शब्द सिद्ध झाला हे दाखवायचं असा
खटाटोप प्रस्थापित भाषाशास्त्राला धरून पूर्वीच करण्यात आला होता. प्रा. वेलणकरांनी ती संज्ञा अशी व्युत्पादिली आहे:
'अर्धचतुष्पदी-अठ्ठोठवइ-अड्ढुड्ढवयी-अड्ढूहवई-ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी. डॉ. कत्रे यांनी अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी अशी परंपरा सांगितली."संस्कृतवरून व्युत्पत्ती काढायची म्हटल्यावर असा द्राविडी प्राणायाम करावाच लागतो" अशी यावर खैरे यांची टिप्पणी आहे. सरळ द्रविड भाषेकडे गेलं तर काय दिसतं? ओवीचा चौथा चरण तुटका ना? तमिळ ओऽवाय म्हणजे दात नसलेलं तोंड, तुटक्या काठाचं भांड. शिवाय 'ओवि' म्हणजे ध्वनी, आवाज. बाळ झोपताना ओऽ ओऽ करतं. त्याच तालावर आई त्याला ओऽ ओऽ करीत पटते. आवाहन करणारा हा आईचा मराठी ओऽ आहे. आजही मराठी गुराखी ओढाळ गुरू लांब गेलं तर ओऽ ओऽ करून त्याला ओवई किंवा ववई घालतो. (हे ग्रामीण बोलीचे महत्व. अशी अनेक उदाहरणे पुढे येतात.)छे, इश्श, अय्या हे उद्गार तमिळ.खंडोबा, त्याचा येळकोट, विठ्ठल, गोंधळ, तुळजाई, बोल्हाई, काळूबाई, फिरंगाई हे सर्व तमिळ.शेंडी पासून क्रमाने डोई, डोळा, पापणी, मिशी, ओठ, मोहरा, हात, पोट, स्त्रीयोनीचा मराठी शब्द, गुडघा, नडघी, घोटा, बोट हे सर्व तमिळ. 'तात्पर्य, शरीरवर्णनात आपण मराठी भाषिक नखशिखांत तमिळ आहोत.' शरीरवर्णनाचे शब्द हे भाषेतील प्राथमिक शब्द असतात हे या संदर्भात लक्षात ठेवणं योग्य होईल.चूलमूल, नातीगोती, भाजीपाला, स्वैपाकाचे पदार्थ, शेतीची अवजारे यांच्याशी संबंधित असलेले मराठीतील शब्दही तमिळ.
महाराष्ट्रातील स्थळनामांच्या अर्थाचा उलगडा तमिळवरून होतो हे द्रविड महाराष्ट्र या पुस्तकात दाखवले आहे. मुंबई, परळ, चेंबूर, वसई, वाशी, पुणे, वानवडी, येरवडा, थेऊर, जेजुरी, खंडाळा, जुन्नर, इत्यादी. मुठा, मुळा, उल्हास या नद्याही. उल्हास नदीच्या नावात उल्ह म्हणजे 'पल्ला मासा', जो केवळ याच नदीत सापडायचा. (आता प्रदूषणमुळं सापडत नाही.)मराठी वाचकांसमोर हे पुरावे मांडत असताना, दक्षिणी भाषाभ्यसकांपुढेही त्यांना भावतील असे तमिळ-मराठी संबंधांचे पुरावे इंग्रजी निबंधांतून खैरे सादर करीत आले आहेत. निर्णायक वाटावा असा पुरावा 'टोवर्डस इंडियन फोनॉलजी अँड लिंग्विस्टिक्स' या त्यांच्या निबंधात पहायला मिळतो. दक्षिणी भाषांच्या व्युत्पत्तिकोशाच्या दोघांपैकी एक संपादक एमेनो यांनी १९७० साली द्रविडियन कंपॅरेटिव्ह फोनॉलजी-ए स्केच या नावाच्या प्रबंधात सुमारे २७५ दक्षिणी शब्दावलीच्या वर्णांची तुलना केली आहे. त्यातल्या जवळ जवळ २६० गटांमधे मराठीतल्या एक ना एक शब्दाची ओळख पटते. त्यातल्या अनेकांच्या ज्या संस्कृत व्युत्पत्ती दिलेल्या आहेत त्या नमूद करून त्यांची कृत्रिमताही उघड केली आहे. अस्सल दक्षिणी म्हणवतात त्यांचे समशब्द मराठमोळे म्हणून वावरताहेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.पण अगदी बिनतोड पुरावा हवा असेल तर तो पुढचा आहे. जे आपल्याला 'अस्सल मराठी' वाटतं त्याला आपण 'मराठमोळं' म्हणतो. अस्सल मराठी भाषेला आपण 'मराठमोळी' म्हणतो. तमिळ मर्रा (जो मराठीत मर्हा होतो) म्हणजे न झाकलेलं, उघडं किंवा स्पष्ट. 'मर्हाटाचि बोलु'! ज्ञानेश्वरीमधे बावीस वेळा हा शब्द आला आहे. आणि त्याचा हाच अर्थ असल्याचे खैर्यानी एका निबंधात दाखवून दिलं आहे. मोळि म्हणजे बोली, भाषा...
भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
प्रेषक ॐकार ( बुध, ०५/२८/२००८ - १४:३७) .शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'
उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.
