चित्रपट
पारध
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले. मला एकदम पुलंच्या 'नाथा कामत' मधला क्रूड ऑईल पिणारा शित्या सरमळकर आठवला. "दीड दमडीच्या पिना घेता आणि धाच्या नोटा काय नाचवता?" असे काहीसे तो मनातल्या मनात (आता जमाना बदललाय म्हणून) म्हटला असेल असे वाटून गेले.
बाकी "भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या पाटीने आमची खूप करमणूक केली. यांच्या तर्कानुसार भिंतीवर थुंकणारा जर माणसाची औलाद नसेल तर त्याला ही पाटी कशी काय वाचता येईल असा फालतू प्रश्न मनात डोकावून गेला. जाऊ द्या...
आत आलो आणि विको वज्रदंतीच्या आणि विको टरमरीकच्या तरुणपणीच्या मॄणाल कुळकर्णीच्या हास्याने फुललेल्या प्राचीन जाहिराती बघून बरे वाटले. "कील मुहासों को जड से मिटायें, हल्दी चंदन के गुण इसमें समायें..." अशी परिचित ओळ ऐकल्यावर एकदम ऐंशी-नव्वदीतल्या काळात मन जाऊन पोहोचले. यथावकाश 'पारध' सुरु झाला.
सुरुवातच पवनचक्यांनी सजलेल्या डोंगराखालच्या रस्त्याने जाणार्या अलिशान गाड्यांमधून ऐकू येणार्या संवादांनी होते. एक शासकीय समिती पवनचक्क्यांमुळे पर्जन्यमानावर होणार्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एका गावात येत असते आणि येता-येता कोंबडीच्या पार्टीचे बेत आखत असते. खेड्यातली माणसे, शेतकर्यांच्या आत्महत्या, खेड्यातल्या लोकांच्या समस्या याविषयी त्यांची 'अभ्यासपूर्ण' मते ऐकून वैतागलेला एक तरूण त्याच्या विचारांमधून त्याचे खेड्यातले आयुष्य आणि त्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत याविषयी प्रेक्षकांना सांगतो आणि फ्लॅशबॅक पद्धतीने चित्रपट उलगडतो.
तीन भाऊ, एक विवाहित, तिघांचे वृद्ध वडिल, एक बहीण असे मोठे कुटुंब. मोठा भाऊ काबाडकष्ट करून शेती पिकवतो. कुटुंब वारकरी संप्रदायातले. सगळ्यात धाकटा शिकतोय आणि मधला एका स्थानिक पुढार्याच्या नादी लागून स्वतःला वाघ-बिघ समजतोय. बहीण लग्नाशिवाय घरात बसून आहे. मोठ्या भावाच्या मनावर वाढत्या वयाच्या बहीणीच्या लग्नाचं, धाकट्या भावाच्या शिक्षणाचं , आपल्या पिल्लांच्या शिक्षणाचं आणि मधल्या भावाच्या भविष्याचं असं सारं एकत्रित ओझं आहे. वहिनी नेटाने घर चालवते आहे. चित्रपट इथून पुढे सरकत जातो. अमरभाऊ नावाचा एक कुटील राजकारणी मधल्या भावाला (यशवंत) हाताशी धरून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करतो. यशवंतचं महत्व वाढत जातं. घरात पैसा येतो पण मोठा भाऊ (विठू) या अचानक आलेल्या पैशाने सैरभैर होतो. असा आलेला पैसा, बहीणीला सुटलेली पैशाची हाव, त्या मार्गाने घरात शिरलेलं व्यसन आणि यशवंताची अरेरावी यामुळे विठू हतबुद्ध होतो. नंतर बहीणीने अमरभाऊच्या खास माणसासोबत वाढवलेली 'मैत्री ' कुटुंबाच्या संस्कारांवर एक मोठा आघात करते. विठू हताशपणे हे सगळं बघत असतांना राजकारण टिपेला पोहोचतं आणि मग पुढे काय होतं याचं प्रभावी चित्रण म्हणजे 'पारध'.
'पारध'ची पहिली दमदार बाजू म्हणजे प्रभावी आणि पुरेशी वेगवान पटकथा. कथा तशी ढोबळ आहे आणि आधी बर्याचदा पडद्यावर येऊन गेलेली आहे. 'अर्जून', 'भ्रष्टाचार' अशा हिंदी आणि 'सरकारनामा' सारख्या मराठी चित्रपटांमधून अशा पद्धतीची कथा येऊन गेलेली आहे. पण 'पारध'चं वैशिष्ट्य म्हणजे त्याची सशक्त पटकथा आणि दिग्दर्शकाने सादरीकरणाला दिलेला वेगळा चेहरा. गजेन्द्र अहिरेंनी चित्रपट कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. पुरेसा वेग ठेवून त्यांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. मुख्य भूमिकांचे कंगोरे अधोरेखित करण्यात ते बर्यापैकी यशस्वी होतात. मारुतीबाबा (विनय आपटे) हे पात्र मात्र अतिशय प्रभावहीन आणि अनावश्यक वाटतं. एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे वावरणारे हे पात्र प्रत्यक्षात कुठलीच राजकीय खेळी खेळत नाही. कुठल्याच पकड घेणार्या प्रसंगात या पात्राचं अस्तित्व नसतं. यशवंताची तरुणपणातली 'वाघ' होण्याची खुमखुमी, त्याची अरेरावी, अमरभाऊसमोर गळणारी त्याची लाचारी हे सगळे पैलू अतिशय प्रभावीपणे बाहेर येतात. अमरभाऊचा उजवा हात बाबा देखील अगदी चपखल बसलेला आहे. त्याच्यातला बेरकीपणा आणि परिस्थितीनुरुप रंग बदलण्याची वृत्ती खुबीने दाखवली आहे. इंदू (बहीण) गरीब शेतकरी घरातल्या असहाय आणि वाढलेल्या वयाच्या विवाहोत्सुक आणि सुखलोलूप तरुणीचं परिणामकारक प्रतिनिधित्व करते. या भावंडांचे वृद्ध वडिल मात्र तितकेसे रंगलेले नाहीत. धक्कादायक प्रसंगातही ते गप्प-गप्प राहतात आणि अगदी परक्या व्यक्तीसारखे फक्त मान हलवतात. कुठलाच बाप आपल्या घरात घडणार्या अनपेक्षित घटनांना इतका थंड प्रतिसाद देईल असे वाटत नाही. दिग्दर्शन मनाची पकड घेते. पटकथेला न्याय देणारे दिग्दर्शन आहे असे वाटते.
तांत्रिक पातळीवर 'पारध' ठीक-ठाक आहे. चित्रीकरण तितकंसं खास नाही (की प्रभातचा पडदा काळपट होता कुणास ठाऊक). अंधारलेलं चित्रीकरण चित्रपट बघतांना त्रासदायक वाटतं आणि त्यामुळे रसभंग होतो तो वेगळाच. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' किंवा 'लालबाग परळ' या चित्रपटांच चित्रीकरण अगदी स्वच्छ आणि चकचकीत वाटतं. 'पारध' त्या बाबतीत थोडा कमी पडतो. पार्श्वसंगीत पुरेसं परिणामकारक आहे. चित्रपटात दुसर्या भागात जाणवणारी उत्सुकता, गडदपणा पार्श्वसंगीताने व्यवस्थित पकडला आहे.
थोडा ताण हलका करण्यासाठी इंदूचं पात्र थोडं भोळसट दाखवलेलं आहे. अमरभाऊच्या खास माणसाच्या (बाबाच्या) मदतीने ती कर्ज घेऊन गायी घेते. त्यांची नावे काय ठेवायची या विचारात असतांना यशवंता 'ऐश्वर्या' आणि 'कतरिना' अशी नावे सुचवतो. त्याला थोडा चावट प्रतिसाद म्हणून इंदू यशवंताला 'चावट' ठरवते आणि 'ही नावं ठेवली तर ऐश्वर्याचं दूध काढलं का? कतरिनाचं दूध काढलं का? असं विचारावं लागेल" असं म्हणून प्रेक्षकांचा ताण हलका करते. 'पारध्'चे संवाद देखील परिणामकारक वाटले. एका प्रसंगात बाबा विनाकारण एका स्त्रीला त्रास देतो म्हणून यशवंता त्याला झापतो. "आपण अमरभाऊचे कार्यकर्ते आहोत; पारावरचे गुंड नाहीत" असे म्हणून तो त्या बाईची मनापासून माफी मागतो.
अभिनयाच्या बाबतीत मला व्यक्तीशः आवडला सिद्धार्थ जाधव! यशवंताची भूमिका अक्षरशः जगलाय हा माणूस! चेहर्यावरचे हावभाव, देहबोलीतून अभिनय, डोळ्यांमधून भावनाविष्कार... सगळंच अप्रतिम. अमरभाऊने टाकलेला विश्वास, अमरभाऊचं घरी येणं, अमरभाऊने आपल्याला आपण 'वाघ' आहोत असं सांगण्यातली नशा हे सगळे कंगोरे सिद्धार्थने अतिशय समर्थपणे रंगवले आहेत. एका प्रसंगात यशवंता अमरभाऊची एक कामगिरी फत्ते केल्यावर आधाश्यासारखा चिकनची तंगडी हादडत असतो. मागून अमरभाऊ येतात आणि यशवंता अगदी लाचारीने त्याच्याकडे बघून हसतो. अमरभाऊ त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला नीट जेवायला सांगतो. या प्रसंगात सिद्धार्थने लाचारी, भूक, अमरभाऊचे खास माणूस असल्याचा उन्माद, तोच आपला अन्नदाता असल्याची भावना या सगळ्या छटा इतक्या छान दाखवल्या आहेत की खरचं जवाब नाही. नंतर 'वाघ' असल्याची गुर्मी, अमरभाऊ मागे असल्यावर आपलं कोण काय बिघडवेल हा माज, कुटुंबाविषयीची काळजी, बहिणीचा वापर झाल्याचा राग, जीवाच्या आकांताने पळणारा यशवंता, हे सगळं सिद्धार्थ ताकदीने उभे करतो.
मिलिंद शिंदे मूर्तिमंत हरामखोरपणा जिवंतपणे उभा करतात. यशवंताच्या बहीणीला गेस्टहाऊसवर बोलावून तिला साळसूदपणे 'आपल्याला बलात्कार नाही करायचा' असे सांगणारा आणि नंतर निर्लज्जपणे तिला 'ऑफर' देणारा, शेवटी यशवंताच्या जीवावर उठलेला, अमरभाऊला देखील अप्रत्यक्षरीत्या आपली नखे दाखवणारा बाबा मिलिंद शिंदेंनी अतिशय छान साकारलाय. अभिनयातला आक्रस्ताळेपणा जर त्यांनी कमी केला तर त्यांचा अभिनय अधिक जमून येईल.
यशवंताची बहीण (अभिनेत्रीचं नाव माहित नाही) मस्त झालीय. टीव्हीवर बघून छानछोकीचे आयुष्य जगायला मिळावे म्हणून धडपडणारी, भावाच्या रक्षणासाठी झटणारी, क्षणिक सुखासाठी बाबाच्या आहारी जाणारी आणि उघडपणे तिच्या या कृत्याचं समर्थन करणारी इंदू अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवते.
विठूच्या भूमिकेत रवी काळे छाप पाडतो. असहाय गरीब शेतकरी त्याने चांगला उभा केला आहे. अमरभाऊच्या भूमिकेत मकरंद अनासपुरेने गहिरे रंग भरले आहेत. खलनायकाची भूमिका असणारा त्यांचा हा कदाचित पहिलाच चित्रपट असावा. नाकपुड्या फुगवून, डोळे विस्फारून बेरकीपणा दाखवण्याची त्यांची लकब वाखाणण्याजोगी आहे. त्यांना नेहमीच्या साचेबद्ध विनोदी भूमिकांमधून बाहेर पडून वेगळं काही करण्याची संधी मिळाली आहे त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा. त्यांच्या संवादातलं वाक्याच्या शेवटी त्यांनी बोललेलं 'हाव्व...' मात्र तितकसं नैसर्गिक वाटत नाही.
वडिलांच्या भूमिकेत शाहीर विठ्ठल उमप, मारुतीबाबाच्या भूमिकेत विनय आपटे ठीक आहेत. धाकट्या भावाची भूमिका करणारा अभिनेता देखील यथायोग्य.
असा हा 'पारध' मनाला भिडतो हे खरं. आवर्जून पहावा असा चित्रपट!
चित्रपट संपल्यावर बाहेर आलो. पाटीचा फोटो काढायचा होता. मोबाईलमध्ये काढला. इथे डकविण्याची इच्छा होती पण तो मोबाईलवरून काँप्युटरवर कसा घ्यावा ही समस्या असल्याने तूर्तास ती योजना विचाराधीन आहे. शिवाय तुम्ही मंडळी प्रभातला जालचं की 'पारध' बघायला. तेव्हा बघून घ्या ती पाटी! काय?
त्सोत्सी
एक जेमतेम तीन महिन्यांचे मूल - तेही दुसर्याचे - एखाद्याच्या जीवनात किती बदल घडवू शकते? एखादा क्रूर, पाषाण्हृदयी गुन्हेगार एका चिमुरड्याच्या सानिध्यात, अवघ्या तीन-चार दिवसात किती आरपार बदलतो, याचे फार सुरेख चित्रण आहे, गेविन हूड दिग्दर्शित "त्सोत्सी" ह्या इंग्रजीमिश्रित झुलू भाषिक चित्रपटात.
झुलू भाषेत "त्सोत्सी" म्हणजे ठग.
लहानगा डेविड. रागीट बाप मृत्युशय्येवर पडलेल्या आईलादेखिल भेटू देत नाही. शेवटी तो घर सोडून पळून जातो. जोहान्सबर्गमधील एका झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतो. चार जणांचे टोळके जमवून चोर्या-मार्या करायला लागतो.
असेच एकदा गाडीबाहेर पडलेल्या एका बाईच्या गाडीत शिरून गाडी पळवायचा प्रयत्न करतो. पकडायला आलेल्या त्या बाईला चालत्या गाडीतून लोटतो आणि गाडी घेऊन पसार होतो. काही अंतर गेल्यावर त्याला मागच्या सीटवरून रडण्याचा आवाज ऐकू येतो. मागे बेबी सीटवर असते एक लहान मूल!
मग सुरू होतो एक वेगळाच प्रवास!
सार्वजनिक नळावर पाणी भरायला आलेल्या, एक लहान मूल पाठुंगळीला बांधलेल्या विधवा तरुणीचा पाठलाग करून तिच्या घरात घुसणे. बंदुकीच्या जोरावर तिला धमकावून तिला त्या लहानग्याला पाजायला लावणे, मग त्या मुलाचे नैसर्गिक विधीने बरबटलेले कपडे बदलणे आणि ह्या सर्व प्रसंगातून स्वतःचे हरवलेले बालपण आठवणे.
शेवटी, तिच्याच आग्रहावरून ते मूल पुन्हा त्या दांपत्याला देण्यासाठी तो त्यांच्या घरी जातो तो प्रसंग तर खूपच छान आहे. घराच्या दरवाजाशी उभा असलेला त्या मुलाचा बाप आणि व्हीलचेअरमधील आई (जीला त्याने कारमधून ढकलून दिलेले असते) आपल्या हरवलेले मूल परत घेण्यासाठी आसूसलेले असतात. अवघ्या तीन-चार दिवसात लळा लावलेल्या लहानग्याची ताटातूट होणार म्हणून हा कासावीस झालेला असतो. सर्व बाजूंनी संगिनी रोखलेल्या पोलीसांचा गराडा पडलेला असतो. आणि तो ते मूल त्याच्या मूळ बापाला परत देतो आणि स्वतःला पोलीसांच्या हवाली करतो. ह्या संपूर्ण दहा-पंधरा मिनिटांच्या प्रसंगात डेविड उर्फ त्सोत्सी याची भूमिका वठवलेल्या प्रेस्ली च्वेनेयागी (Presley Chweneyagae) ह्याच्या तोंडी एकही संवाद नाही. आहे केवळ अप्रतिम अभिनय. केवळ ह्या प्रसंगासाठी चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असा!
अर्थात, चित्रपटात "मसाला" नाहीच असे नाही! धमकावले गेल्यामुळे एका अनोळखी लहानग्याला पाजायला लागले असले तरी, प्रत्यक्ष पाजताना कॅमेर्याकडे पाठ करून पाजणे अशक्य नसावे! पण असे प्रसंग अगदीच अपवादात्मक!
२००५ चे उत्कृष्ठ परदेशी चित्रपटासाठी अकादमी अवार्ड मिळालेला हा चित्रपट, संधी आल्यास जरूर पहावा.
सौदागर
ये बहुत लंबी कहानी है! सनातनपुर आणि पालीनगर अशा भरदार नावाच्या गावातील तेवढ्याच भरदार नावांचे राजेश्वर (राजकुमार) आणि दादावीर (दिलीप कुमार) यांची. त्या डोंगरदर्यांत इकडे तिकडे फिरणारा एक माणूस यांच्या कहाण्या सांगेल...
कारण तेथे बहुधा तोच एक शिल्लक राहिला असावा, बाकी गावकर्यांपैकी अर्धे यांची दुश्मनी झाली तेव्हा तर उरलेले अर्धे पुन्हा दोस्ती झाली आहे हे माहीत नसल्यामुळे एकमेकांना मारून मेले असावेत. एक मात्र जाणवते: तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते. आताचे गावकरी, "तुमचे दोस्ती का दुश्मनी काय ते एकदा नक्की ठरवा, आम्हाला आमची कामं आहेत" म्हणून मोकळे झाले असते.
तर ह्या दोघांची फारच मैत्री, "इमली का बूटा बेरी का पेड" टाइपची (म्हणजे काय कोणास ठाऊक). एवढी लंबी कहाणी आहे की यांचे डबल लहानपण दाखवले आहे. म्हणजे खरे लहानपण व तरूणपण सुद्धा. कोण राजकुमार व कोण दिलीपकुमार कळावे म्हणून ते तरूणपण वाले अभिनेते मिमिक्री केल्यासारखे यांची स्टाईल मारत संवाद म्हणतात. लहानपणी एकाच्या पायाला लागते म्हणून दुसरा काही दिवस आपलाही एक पाय गुढघ्यात दुमडून बांधून फिरतो (बाकी ती दोरी सारखी निसटत कशी नाही हे एक आश्चर्यच आहे). गुलशन ग्रोवर राजकुमारच्या बहिणीची छेड काढतो तेव्हा दिलीपकुमार आणि त्याच्यात मारामारी होते, जेव्हा राजकुमार ते पाहतो तेव्हा त्याला पहिला राग त्याने आपल्या मित्राला मारल्याचा येतो. बहीण वगैरे सगळे नंतर.
असेच ते वयाने आणखी मोठे होऊन नकली च्या ऐवजी खरे राजकुमार व दिलीपकुमार होतात. साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे. तेव्हा दोघांचे लग्न ठरते. पण तेवढ्यात दिलीप कुमार तिकडे एका गावी लग्नाला जातो, तेथे हुंड्यासाठी नवरा मुलगा अडून बसतो. लग्न मोडायची वेळ येते तेव्हा दिलीपकुमार स्वत:च त्या मुलीच्या गळ्यात हार घालतो. वास्तविक तेव्हा दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो". कारण त्या मुलीच्या डोळ्यात मुर्तीमंत भीती उभी दिसते ती लग्न मोडण्याची नव्हे तर अवघे पाउणशे वयमान असलेल्या या दादावीरची.
पण राजकुमारच्या बहिणीचे काय? होणार्या नवर्याने कोणालातरी वाचविण्यासाठी तिच्याशी लग्न केले हा हिच्यावर फार मोठा कलंक असल्याने आता ती Poison असे लिहिलेल्या बाटलीतून विष घेते, त्यात तिला वाचवायचे प्रयत्न करण्याचे सोडून सगळे राजकुमार ला तुझ्या मित्राने हिला कसे फसवले वगैरे डॉयलॉग मारत बसतात. पुन्हा एवढ्या वर्षांच्या दोस्तीत तू एखादी गोष्ट का केलीस विचारायची पद्धत नसल्याने डायरेक्ट जानी दुश्मनी चालू होते.
मग सगळे आणखी मोठे होतात (वयाने). यांचे लग्न वगैरे व्हायच्या आधीच हे म्हातार्या रूपात दिसतात आणि मग यांची मुलेच काय नातवंडे सुद्धा मोठी होऊन इलु इलु म्हणायला लागेपर्यंत आणि त्यानंतरही तसेच राहतात.
पहिली काही वर्षे ही दुश्मनी राज कुमारच्या साईडने असते (पुन्हा खुलासे वगैरे भानगड नाही. "मगर मेरी बात तो सुनो", "मुझे कुछ नही सुनना" च्या ऐवजी थेट कारण लोकांनी सांगितले असते तर अनेक चित्रपट १५-२० मिनिटातच संपले असते
). पण दिलीपकुमार चा मुलगा राजकुमारच्या लोकांकडून मारला जातो (असे दिलीपकुमारला वाटते) त्यामुळे आता दोन्ही कडून चालू होते. मग नंतर एकदा राजकुमारलाही अडकवण्यात येते. चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही. त्यामुळे लगेच राजकुमार रंगे हाथ पकडला जातो.
त्यात बाकी दुनियेला यांच्या दुश्मनीत भलताच इंटरेस्ट! त्यामुळे एकवेळ भारत पाक सीमेवर नसेल एवढी यांची स्वत:ची फौज अगदी गणवेष वगैरे घालून बियास नदीच्या दोन्ही तीरावर कायम उभी असते. दोन कुटुंबातील वैर कंट्रोल करणे का कोणास ठाऊक पोलिसांना अशक्य असल्याने मग सरकार थेट मिलिटरीलाच बोलावते त्यामुळे ते ही येतात. मग यांचे कोण, त्यांचे कोण आणि मिलिटरीवाले कोण हे आपल्याला कधीच नीट कळत नाही.
एकदा फारच होते तेव्हा तो मिलिटरी ऑफिसर त्यांना काय जबरदस्त धमकी देतो "तुम्ही गोळीबार थांबवला नाहीत तर मी सरकारकडे तुमचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यासाठी अपील करीन". That should do it! . इकडे हे दोन्ही तीरांवर बंदुका घेऊन एखादी मुलगी जरी एका बाजूने पाण्यात शिरली तरी गोळीबार करतायत आणि तिकडे तो मिलिटरी ऑफिसर विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे करत सर्कारी कार्यालयात खेटे घालतोय असे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले 
विवेक मुश्रन आणि तेव्हाची मनिषा कोइराला यांत कोण जास्त गोंडस दिसतो ते सांगणे अवघड आहे. एवढ्या टाईट बंदोबस्तात हे दोघे मात्र पाहिजे तेव्हा एकमेकांना भेटत असतात. त्या आधी याला लहान असतानाच दुश्मनीतून वाचविण्यासाठी एका गुहेत राहणार्या बाबाकडे "शस्त्रविद्या" शिकायला पाठवलेला असतो. हा तोपर्यंत गुहेत राहिलेला आणि मनिषा शहरातून आलेली. पण हा तिला इंग्रजीतील शॉर्टफॉर्म चा कन्सेप्ट समजावतो... म्हणजे " T " म्हणजे " tea ", " C " म्हणजे " See " (आधी मला वाटले कॉफी) इत्यादी. मग तो I L U म्हणतो. आता मुळात प्रेमात पडण्याच्या वयात असलेल्या शहरी मुलीला एवढी क्लियर हिंट दिल्यावरही I L U म्हणजे काय हे कळायला ते पन्नास वेळा म्हणावे लागते, ते ही लहान मुलांना गाणे शिकवतात तशा हालचाली करत, तेव्हा कळते.
पण दुश्मनी वाढतच असते. "मै ज़मीन पे रहके भी आसमान मे उडता हू" वगैरे संवाद इकडून तिकडून एकमेकांवर सोडले जातात. आणखी एक कारण होते म्हणजे राजकुमारचा नातू दिलीपकुमारच्या गावातील मुलीला फसवतो. पण त्यांना ते एकदम तिला बाळ झाल्यावरच कळते. मधे ८-९ महिने पत्ताच नाही.
अशा बर्याच गोंधळानंतर अचानक परत दोस्ती का व कशी झाली ते कळतच नाही. विवेक मुश्रन व मनिषा कोइराला यांचे प्रेम जाहीर होते व ते होळी भोवती फेरे वगैरे मारतात (त्या वेळी असे आई वडलांकडे रागाने बघत दिसेल त्या आगी भोवती फेरे मारायचे बरेच फॅड आले होते. पाहा: दिल वगैरे). पण एवढ्या वर्षांतील गोष्टींचे खुलासे फारसे कोणी करताना दिसत नाही. एकदम राजकुमारला दिलीपकुमार काहीतरी गुन्हा करण्यापसून वाचवतो, सांगतो की यांनी (व्हिलन्स) हे सर्व केले आहे, तो होळीला याच्यावर रंग फेकतो की दुश्मनी खलास! मग एवढे प्रेम उतू जाते की एकमेकांच्या गालांवर चापट्या मारणे, सॉफ्ट टॉईज घेऊन गाणे म्हणणे, पलंगावर उशा एकमेकांना मारणे ( pillow fight ) वगैरे "मर्दाना हरकती" करतात.
पण नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार्या व्हाव्यात तसे यांचे लोक मारत आणि मरत राहतात. उरलेल्यांना अमरीश पुरी आणि इतर व्हिलन्स तसेच देशी कमी पडले म्हणून कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव user friendly कशाला पाहिजे?) वगैरे मारतात. त्यात मुकेश खन्ना दलीप ताहिल बरोबर कड्याजवळ मारामारी करत असताना राजकुमार मधेच ओरडतो की आता हे आपले दोस्त आहेत. लगेच कड्याला लटकणार्या एकाला दुसर्याचे "आजा मेरे भाई" वगैरे चालू. तेवढ्यात अमरीश पुरीने गोळी घातल्याने दोघेही खाली पडतात व आपण त्या सिमेंटच्या जाहिरातीसारख्या संवादांतून वाचतो ("ये दीवार टूटती क्यूं नही?").
यात सौदागर नावाचा काय संबंध आला? मला कळाले नाही, तुम्हाला कळाले तर सांगा
सिनेमा आस्वाद - पॅटन
सहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्याला "आवाज कमी कर" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं.
पण आमच्या घरात सध्या झालीये एक फितुरी. मी ज्या पिल्लाला माझं समजत होते इतकी वर्षं , अगदी टेकन फॉर ग्रांटेड ते निघालय पप्पाचं. तिनी फादर्स डे ला माझ्या नवर्याला एक वॉर मूव्ही - "पॅटन" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला. पण इतकच नाही तर नवर्यानीही मला पटवून दिलं की हा सिनेमा अन्य युद्धाच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. आता कसा? तर युद्ध होतं पार्श्वभूमीवर पण मुख्य या सिनेमात कॅरेक्टरायझेशन अर्थात व्यक्तीचित्रण अतिशय बांधेसूद आणि प्रभावी आहे. आता एवढं ऐकल्यावर मी देखील हा सिनेमा पहायला बसले आणि खरोखर इतकी रंगून गेले या सिनेमात की ज्याचं नाव ते.
From Lotus
पॅटन हा अमेरीकन जनरल. आणि सिनेमा आहे संपूर्ण दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर. सिनेमाची सुरुवातच इतकी प्रभावी आहे. सुरुवात होते तीच जनरल पॅटनच्या तडफदार आणि अतिशय उत्तम लष्करी नेतृत्व दाखविणार्या भाषणाने.
या भाषणातील एक वाक्य -
"Now I want you to remember that no bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country"
या भाषणात पॅटनचा भारदस्त आवाज, त्याची उत्तम संवादफेक आणि त्याचं टॉवरींग व्यक्तीमत्व अमेरीकेच्या विशाल झेंड्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सामोरं येतं. पण मित्रहो ही तर आहे बस्स छोटीशी झलक. नंतर संपूर्ण सिनेमाभर "जनरल पॅटन" आपल्यावर अशी काही जादू घालतो की ज्याचं नाव ते. पॅटनच्या प्रत्येक सुखाशी, दु:खाशी, चूकेशी, त्याच्या गुणांशी आपण अगदी समरस होऊन जातो.
पॅटन जेव्हा नवीन हुद्दयावर छावणीत येतो ते गाव छोटसं असतं पण येताना तो सायरन वाजवत येतो. त्याचं संपूर्ण व्यक्तीचित्रण्च असं काही फ्लेम्बॉयंट केलेलं आहे की शेवटी अशा फ्लेम्बॉयंट आणि तडफदार जनरलला एकदा जेव्हा माफी मागावी लागते तेव्हा आपल्याला खरच खूप वाईट वाटतं. ते पुढे येईलच. आल्या आल्या या कुचकामी आणि बदनाम अशा छावणीला रंगरूप आणण्यासाठी, सर्वांना शिस्त लावण्याचं पहीलं काम तो हाती घेतो. लेगींग्ज नसलेल्या स्वयंपाक्याला $२० फाईन होतो. एका सैनिकाच्या गादीशेजारच्या भींतीवर उत्तान स्त्रीचं चित्रं लावलेलं असतं ते फाडलं जातं. एकंदर जुना ढिसाळपणा, ढिलाई चालणार नाही हा संदेश व्यवस्थित पोचवला जातो.
पॅटन स्वतः सळसळणार्या गरम रक्ताचा आहे. तोंडात सतत शिव्या, गरम डोक्याचा, परखड, स्पष्टवक्ता असा हा सिनेमात रंगवलेला आहे. हाडीमाशी सैनिक आहे. त्याने मातृभूमीला वाहून घेतलं आहे. तो स्वतः रणभूमीला अजीबात घाबरत तर नाहीच पण जे घाबरतात अशांनी सैन्यात भरती होऊ नये अशा मताचा तो आहे. अशांना तो "यलो कॉवर्ड", "यलो बास्टर्ड" म्हणतो. एकदा जखमी सैनिकांना भेट देते वेळी एक धट्टाकट्टा सैनिक भेदरून तिथे रडत असतो त्या वेळी पॅटन त्याला "टेक अवे धिस यलो बास्टर्ड" म्हणून त्याच्या थोबाडीत लगावतो. ही चूक (?) त्याला पुढे खूप भारी पडते, छावणीत एक एक करून सर्वांची माफी मागावी लागते, त्याची बदली होते, त्याच्या खालचा अधिकारी त्याच्या वर येऊन बसतो वगैरे वगैरे.
पण या प्रसंगातही पॅटन जे करतो ते नेतृत्वाच्या दृष्टीकोनातून चूक आहे असं मला वाटलं नाही.
हां आता त्याचा एक दोष सिनेमात ढळढळीत दाखवलेला आहे तो म्हणजे - माँटी हा ब्रिटीश सैन्याचा प्रमुख असतो. त्याच्याबरोबर पॅटन सतत स्पर्धा करत असतो. जर्मनीचा एखादा तळ माँटी सर करतोय का पॅटन असा प्रकार आणि जेव्हा वरीष्ठांकडून व्यवस्थित सूचना असते की पॅटनने हा तळ सर करावयास जाऊ नये तेव्हादेखील ती सूचना धुडकावून, स्वतःच्या लोकांचे जीव धोक्यात घालून घाईघाईने पॅटन तळ सर करून बसत असे. म्हणजे कधीकधी वाटतं पॅटननी अंतर्गत स्पर्धेमधे जास्त शक्ती वाया घालवली.
आता व्यक्तीगत पॅटन कसा होता तेदेखील या सिनेमात छान पेरलं आहे. पॅटन स्वघोषीत कवी दाखवला आहे.तसेच ख्रिश्चन असूनही त्याचा पुनर्जन्मावर गाढा विश्वास दाखविला आहे. कधी कधी फार पूर्वीच्या युद्धभूमीवरच्या कबरस्तानावर तो वेळ घालवतो. जेथे त्याचं शांत, अनोखं रूप आपल्याला पहावयास मिळतं. एक वेगळाच पॅटन साकार होतो, जो म्हणतो " अनंत वर्षांपूर्वी मी इथे आलो असेन, लढलो असेन." पॅटन उशाशी बायबल ठेवतो आणि कोणी त्याला विचारलं की तू हे वाचतोस का तर उत्तरतो "गॉडॅम एव्हरी नाईट!" . कुठे पुस्तक वाचून आपल्या शत्रूचा अभ्यास करणारा पॅटन आणि कुठे रात्री झोपण्यापूर्वी बायबल वाचणारा पॅटन.
संपूर्ण सिनेमा पाहील्यानंतर मला एक अतोनात देखणं लढाऊ, लष्करी व्यक्तीमत्व पहायला मिळाल्याचं समाधान मिळालं. पॅटनचे अफाट नेतृत्व गुण, स्पष्टवक्तेपणा तसच त्याच्या दोषांचही कौतुक वाटल्याशिवाय राहीलं नाही इतकी मोहीनी या सिनेमानी घातली.
Departed एक छान movie
Departed हा मला खुप आवडलेला चित्रपट आहे. कितीजनांनी तो पाहिला आहे ते माहित नाही, पण नसेल पाहिला तर एकदा आवर्जुन पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांना ही तो नक्कीच आवडला असेल.
चित्रपटात खलनायक बाजु भक्कम आहे.आणि या चित्रपटाचा शेवट पाहून मी पण गुंग झालो होतो. पोलिस डिपार्टमेंट वर याची पुर्ण कथा आहे.खलनायक हा स्मार्ट , हुशार असुन त्याची भरती पोलिसात सहज होते. नायकाला मात्र घेताना टाळाटाळ केली जाते कारण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड. तरी पण त्याला घेण्यात येते, पण underground agent म्हणून.
त्याला गुंडाच्या टोळीत सामिल होउन त्यांच्या बातम्या पुरवणे हे त्याची जबाबदारी. पुढे थोडा bollywood style ने जातो. म्हणजे ज्या पोलिस अधिकार्याने याला गुप्त पोलिस बनवले असते त्याचा म्रुत्यू वगैरे.
त्यातच नायक जिच्या प्रेमात पडतो ती आधीच खलनायकाची प्रेमिका असते.(हा थोडा वेगळा भाग वाटतो नेहमीच्या bollywood styleपेक्षा..) तसेच नायक ज्या टोळीसाठी काम करत असतो त्याचा म्होरक्या हा नायकाला आपल्या मुलासमान मानत असतो. थोडक्यात नायक गुंड असुन पोलिसांसाठी काम करतो, तर खलनायक हा पोलिस असुन गुंडांसाठी काम करतो.
पुढे काय होणार याची पुर्ण चित्रपटात उत्सुकता लागुन राहते.आणि चित्रपट पण आपल्याला देखिल अनपेक्षित धक्के देत राहतो.
शेवट सांगण्यासारखा नाहिये, कारण तो फारच अनपेक्षित आहे.चित्रपट नक्की पहा. ज्यांनी पाहिला असेल त्यांनी आपली मते जरूर द्यावित.
सविस्तर लिहीण्याची अजुन सवय नाहिये म्हणुन लवकर आवरते घेतोय. प्रयत्न करेन थोडे मोठे लेख लिहायचा......
मैसूर
२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले
वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.
वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:
वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.
वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे 
लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच
हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर
मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम
बाकी उटी भाग -२ मध्ये.
ढिसाळ, ढोबळ 'पीपली लाईव्ह'
'पीपली लाईव्ह'बद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. चित्रपट खूप आवडल्याचं सांगणारे अनेक भेटले म्हणून अखेर तो पाहिला.
चित्रपटाचं थोडक्यात सूत्र असं सांगता येईलः शेतकर्यांच्या आत्महत्या हा गंभीर आणि करुण प्रश्न आहे, पण आपली माध्यमं, राज्यकर्ते वगैरे तो प्रश्न अतिशय उथळपणे आणि क्रूरपणे हाताळतात; आपल्या स्वार्थापुरता त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे प्रश्न अधिकच चिघळतो आणि अधिकच गंभीर आणि करुण बनतो. एक विचार म्हणून हा पटण्यासारखाच आहे. त्यामुळे चित्रपटाद्वारे मांडलेल्या विचारसरणीशी माझे मतभेद नाहीत.
चित्रपटाची मांडणी उपहासात्मक आहे. यातले शेतकरी-गावकरी सालस, निरागस वगैरे नाहीत. द.मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांच्या कथांमधून दिसणार्या गावकर्यांसारखे इरसाल आहेत. ते खोटं बोलतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, मर्त्य, स्खलनशील, विकारी अशा सर्वसामान्य माणसांची सर्व लक्षणं त्यांच्यात दिसतात. अशा माणसांचं चित्रणही त्यांच्याविषयी जिव्हाळा/कणव उत्पन्न होईल अशा प्रकारे करता येतं. त्यामुळे असं दाखवण्यात काही गैर आहे असं वाटत नाही.
चित्रपटात अनेक गुणी अभिनेते आहेत. रघुवीर यादवसारख्या ओळखीच्या चेहेर्यांपासून ते हबीब तन्वीर यांच्या 'नया थिएटर'मधे घडलेल्या पण आपल्याला परिचित नसलेल्या कलाकारांपर्यंत अनेक कसलेले नट, उत्तर भारतीय गावात शोभतील असे रोचक चेहेरे चित्रपटात दिसतात. ते आपापल्या जागी शोभतात आणि अभिनयही चित्रपटाच्या शैलीला अनुसरून करतात.
तरीही चित्रपट पाहून फारच अपेक्षाभंग झाला. त्यामागची कारणं अशी सांगता येतील:
तपशिलांमध्ये रंग भरण्यात चित्रपट कमी पडतो असं वाटतं. उदा: 'लगान'मध्ये ज्याप्रमाणे विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गाव उभा राहतो, तसं इथे होत नाही. आत्महत्या करु इच्छिणारा नत्था, त्याचा भाऊ, पत्नी, आई यांच्या व्यक्तिरेखा सुरुवातीला थोड्या दिसू लागतात तोच माध्यमं, राजकारणी यांच्या गदारोळात पटकथेला त्यांचा विसर पडतो. या गदारोळात ही माणसं हरवून जातात किंवा त्यांचं माणूसपण बेदखल होतं असं खरं तर दाखवायचं आहे. पण ते प्रेक्षकाला जाणवण्यासाठी मुळात त्यांचा या गदारोळातला वावर हवा तेवढा ठळक, करुण होत नाही. हीच बाब पत्रकार, राजकारणी वगैरेंच्या बाबतीत घडते. या व्यक्तिरेखा केवळ एकरंगी, ढोबळ अशा उभ्या राहतात.
थोड्या काळात पुष्कळ गोष्टी दाखवण्याचा हव्यास चित्रपटाच्या आशयाला मारक ठरतो. प्रसंग रंगण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो, तेवढा दिलाच जात नाही. हे कसं करावं याचं अशाच उपहासात्मक शैलीतलं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलाल शुक्ल यांच्या 'राग दरबारी' या कादंबरीकडे निर्देश करावासा वाटतो. विविध प्रसंगांद्वारे लेखकानं यातल्या व्यक्तिरेखांना विलक्षण परिणामकारक पध्दतीनं जिवंत केलेलं आहे. तसं 'पीपली'मध्ये होत नाही.
माध्यमं टी.आर.पी. साठी वाटेल त्या थराला जातात, राजकारणी स्वार्थापोटी सर्वसामान्यांना कस्पटाप्रमाणे वागवतात, या गोष्टी तर आता शेंबडं पोरही सांगू शकतं. त्याहून वेगळं किंवा जास्त गुंतागुंतीचं यात काहीही दाखवलं जात नाही. जे दिसतं तेही अगदीच वरवरचं आणि शाळकरी आहे. त्यासाठी वापरलेले विनोदी प्रसंगही पटापट उरकून घेतलेले आहेत.
'लालबहादूर', 'इंदिरा', नेहरू' वगैरे नावांचा वापर करून केलेले विनोद चांगले आहेत. त्यात राजकारण्यांचा बेगडीपणा आणि सरकारी योजनांचा फोलपणा दिसतो. हे चित्रपटाच्या आशयाला पूरक असलेले घटक आहेत म्हणून ते विनोद अस्थानी होत नाहीत, तर परिणामकारक होतात.
अशी कल्पकता इतरत्र मात्र फारशी दिसत नाही. नत्था गावच्या पुढार्याकडे मदत मागायला जातो या प्रसंगात पुढार्यांच्या समोर ठेवलेल्या अंड्यांवर कॅमेरा ज्या प्रकारे भिरभिरतो त्यावरून आता पुढच्या प्रसंगात नत्थाचा डांबिसपणा दाखवण्यासाठी अंड्यांचा वापर केला जाणार हे उघड होतं. नंतर पुन्हा त्याच प्रसंगाचा आधार घेऊन एक गावकरी आपली आणि नत्थाची कशी जवळीक होती ते सांगतो तेव्हा तर अगदी शिळ्या कढीला उत आणल्यासारखं वाटतं.
शिवाय, जर नत्था इतपत डांबिस असेल तर तो भावाच्या 'मी आत्महत्या करतो; नको? मग तू कर'च्या जाळ्यात सहजासहजी फसतो ते तेवढंसं पटत नाही. इतका गांजलेला असतानाही ज्याची जीवनेच्छा इतकी जिवंत असते तो आत्महत्येसारख्या गोष्टीला मूक संमती देईल असं वाटत नाही.
'गां* फ* रही है', 'मा****'' वगैरे शब्द/वाक्यं वापरली की प्रेक्षक हसणार म्हणून त्यांचा फैलाव आहे. मलमूत्रासारख्या क्रियांशी संबंधित प्रसंग दाखवले की त्याला प्रेक्षकांची प्रतिक्रिया येणार म्हणून तेही आहे. शौचाचा प्रसंग येतो तोवर माध्यमांच्या नावानं पुष्कळ टी.आर.पी. खेचून झालेला असतो. त्यामुळे त्या प्रसंगात चकटफू हशे कमावण्याची शाळकरी हौसच दिसते. चित्रपटाच्या गाभ्याशी असल्या विनोदांचा संबंध लागत नाही ('लालबहादूर'चा तसा लागतो). त्यातून परिणामकारक अर्कचित्र उभं राहात नाही.
अर्कचित्र परिणामकारक वठण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. चॅप्लिन जेव्हा 'ग्रेट डिक्टेटर'मध्ये हिटलरचा बुटबैंगणपणा, वचावचा भाषण करण्याची त्याची शैली यांचा वापर करतो तेव्हा तो हिटलरचं अर्कचित्रच उभं करत असतो. पण त्यामागचे कष्ट (आणि बुध्दीही) जाणवतात. जर्मन भाषेतले ध्वनी, हिटलरची वक्तृत्वशैली यांचा अभ्यास करून त्यांतलं विनोदमूल्य चॅप्लिन हेरतो. पृथ्वीगोलाबरोबरच्या नृत्याच्या प्रसंगात हिटलरच्या आवडत्या वॅग्नरच्या संगीताचा चॅप्लिन वापर करतो. कलेविषयीच्या नाझींच्या मूर्खासारख्या मतांचा चॅप्लिन विनोदनिर्मितीसाठी वापर करतो. ज्याचं अर्कचित्र काढायचं त्याच्यातल्या 'अर्क' घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी बुध्दी लागते; त्यांचा वापर करून प्रसंग घडवण्यासाठी कल्पकता लागते. 'पीपली'मध्ये दोन्हींचा अभाव जाणवतो.
सर्व हास्यास्पद गोष्टी संपवून चित्रपट जेव्हा शेवटाकडे जातो तेव्हा फारच उरकून टाकल्यासारखा वाटतो. प्रेक्षक अंतर्मुख होण्यासाठी करुण प्रसंगांतलं कारुण्य अधिक उठावदार व्हायला हवं होतं. त्यासाठी करुण प्रसंगांची लय धीमी हवी होती. पण तसं होत नाही. दोन एस्.एम्.एस्.च्या दरम्यान जमलं तर चित्रपटाचा आस्वाद घेणार्या तरुण प्रेक्षकांना कंटाळा येईल अशी भीती त्यामागे असावी की काय अशी शंका मनाला चाटून जाते.
एकंदरीत, मूळ विचार पटण्याजोगा असूनही, शैली रोचक असूनही, दमदार अभिनय असूनही ढोबळ पटकथा आणि तिचं ढिसाळ चित्रण यांमुळे चित्रपट योग्य उंची गाठू शकत नाही. चांगल्या विषयाला हात घालण्याचा एक वाया गेलेला प्रयत्न एवढंच अखेर हाती उरतं.
परदेस
भारतातील व अमेरिकेतील भारतीय यांच्या दोन्ही संस्कृतींबद्दलच्या समजांची ही कहाणी आहे. अमरिश पुरी ३५ वर्षे अमेरिकेत राहून भारतात येतो व आपल्या अमेरिकन मुलासाठी भारतीय सून पसंत करतो. मग त्यातून होणार्या संघर्षाची, किंवा खरे म्हणजे घातलेल्या अनावश्यक घोळाची ही कथा आहे. ३५ वर्षे अमेरिकेत राहून अमरिश पुरीला दोन्ही संस्कृतींची किती चांगली समज आहे हे स्टार्टलाच कळते. आपल्या बरोबर आलेल्या इतर अमेरिकन टुरिस्टांना "In America, love is give-and-take. But in India loving is only giving, giving, giving" असे तो सांगतो. ते टुरिस्टही हे म्हणजे याचा नक्की अर्थ काय असेल ते जणू एका मिनीटात कळाल्यासारखे "Unbelievable, unbelievable" म्हणत राहतात. नंतर अमरीश पुरी आलोक नाथ च्या फार्म हाउस वर येतो. जुना मित्र वगैरे. महिमा त्याची मुलगी.
तेथे अमरिश पुरी आलोक नाथ ला सांगतो की आम्ही आमच्या मुलांना वेस्टर्न कल्चरमधे वाढवलेले असल्याने ते आपली संस्कृती विसरले आहेत. त्यामुळे आम्हाला महिमा सारख्या सुनांची गरज आहे. महिमा ही आदर्श भारतीय नारी असल्याने तिचे नाव गंगा असते. (नशीब हेच प्रतीक पुढे वाढवून शाहरूख चे नाव बंगालचा उपसागर नाही ठेवले). त्यामुळे हे आंतराष्ट्रीय सामाजिक कर्तव्य करणे ही गंगाची जबाबदारी होते.
तिला पसंत करण्यासाठी शाहरूख आणि अपूर्व अग्निहोत्री ही तेथे येतात. आणि मग नुसते दीड दोन तास दोन्हीकडच्या स्टीरीओटाईप्स चे बुडबुडे हवेत उडत असतात. हर वाक्यागणिक "हम (भारतीय) लोग...", "हिन्दुस्थानी सभ्यता मे...", "हमारी संस्कृतीमे..." ने चालू होणारे संवाद इकडून तिकडे जातात. शेवटी तर आता अपूर्व डोक्यावर दोन्ही पंजे उलटे धरून खाली वाकून "प्लीज, प्लीज! I got it! I GOT IT!!" म्हणेल असे वाटले. येथे भारत व अमेरिकेतील लोकांचे एकमेकांबद्दलचे प्राचीन समज वापरले आहेत त्यावरून सुरूवातीला आर्किऑलॉजिकल सोसायटी ऑफ इन्डिया चे आभार का मानले आहेत ते कळते. पण वरचे ते आं.सा.का. निभावण्याची संधी होणारा नवरा केवळ एक कबड्डीची मॅच हरल्याने हुकेल अशी परिस्थिती निर्माण होते. कारण तेथे एक स्वयंवर सारखी सिच्युएशन निर्माण करून जो जिंकेल त्याचे गंगा शी लग्न होईल असे ठरते. मग गंगाला मॅच कोण जिंकणार याची काळजी दिसते, पण दुसरेच लोक आपले लग्न एका कबड्डी मॅचवर ठरवत आहेत याचे तिला काहीच वाटत नाही.
मधेच तो एक पारंपारिक रात्री ग्लासमधे दूध घेउन जाण्याचा शॉट होतो. (कोण तरूण लोक कधी असे ग्लासभर दूध पितात)? येथे महिमा ते दूध घेउन निघते. तेवढ्यात असे दिसते की अपूर्व त्याच्या खोलीत व्हिडीओ कॅमेरा घेउन काहीतरी रेकॉर्ड करत असतो. त्यात त्याला स्वतःच्या बेडवर फणा काढून बसलेला नाग दिसतो. तो अमेरिकन असल्याने लगेच त्याला दरदरून घाम फुटतो. मग महिमा तेथे येते. तेथे नाग बघून ती खाली बसून दोन्ही हात त्याच्याकडे बघून जोडते. भावी नवर्याला भेटायच्या रोमँटिक क्षणी सुद्धा तिला साप या गोष्टीची भारताच्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून मीमांसा करायाच्या आपल्या नैतिक जबाबदारीचे विस्मरण होत नाही. पुन्हा एक "हम लोग साँप को जानवर नही, भगवान मानते है" वाक्य येते. तो साप इच्छाधारी असतो का नाही माहीत नाही. पण आपल्यातून एक सुंदर तरूणी प्रकट करून चार पाच वाईट लोकांचे खून तिच्याकडून पाडण्याएवढा महिमाच्या प्रार्थनेत दम नाही हे लक्षात आल्यावर तो निराश होउन जवळच्या एका कपाटाखाली जातो. आता साप बेडवर न राहता बाजूच्या कपाटाखाली गेला म्हणजे आता त्या खोलीत झोपायला सेफ झाले असे अपूर्व ला ही वाटते.
आता गंगाला अमेरिकेची ओळख होण्यासाठी ती तिकडे येते. येथे अमेरिकन संस्कृतीची सर्व वैगुण्ये आपल्याला दिसतात. अपूर्व सिगरेट व दारू पितो, बार मधे दारू पिउन दंगा करतो. त्याच्या आधीच्या गर्लफ्रेन्ड बरोबर नुसते अफाट फोटो काढतो एवढेच नाही तर ते सहज दिसतील असे त्याच्या बेडरूम मधे लावूनही ठेवतो. त्याच्या या कृत्यांमुळे तो गंगाला आवडेनासा होतो. त्याच वेळेस शाहरूख आवडू लागतो.
अपूर्व कोणीतरी मोठा माणूस असतो. इतका की त्याचे घर हॉलीवूड मधे असूनही त्याला 'ओशन व्ह्यू' असतो. त्यांचे लग्न नुसते ठरल्याची न्यूज "लॉस एंजेलिस" शहर के सबसे बडे पेपर न्यू यॉर्क टाईम्स च्या मुखपृष्ठावर येते, पण त्याची एकच कॉपी त्यांना मिळते ("कृपया एकपेक्षा जास्त प्रत मागू नये" अशी पाटी लिहीलेले न्यू.टाईम्सचे कार्यालय नजरेसमोर आले). त्या पेपरच्या त्याच पानात महिमा शाहरूख ला पराठे बांधून देते. नंतर जेव्हा अपूर्व ते पान परत मागतो तेव्हा ते हरवल्याने तो चिडतो, तर बरोब्बर त्याच वेळेला शाहरूख तेथे येतो व सांगतो की हिने मला फ्रेम करायला ते दिले होते. या प्रकाराची तर्कसंगती लावायची म्हणजे - आपल्याला पराठे ज्या कागदात बांधून दिले आहेत त्या कागदाकडे आधी लक्ष गेले पाहिजे. ह्या फोटोची एकच कॉपी उपलब्ध आहे हे ही त्याला माहीत पाहिजे. हॉलीवूड मधे जवळपास कोठेतरी "पेपरवरचे पराठ्यांचे डाग काढून देनार" चे दुकान पाहिजे. मग हा फोटो सापडत नाही म्हणून अपूर्व आणि महिमा यांत भांडणे होणार हे ही त्याला माहीत पाहिजे व अशा प्रसंगात एकदम एन्ट्री घेता यावी म्हणून त्याला कायम दाराआड उभे राहून त्याची वाट बघावी लागणार. एवढे सगळे न करता तो त्या प्रसंगात एकदम एन्ट्री कशी मारू शकतो हे घईसाहेबांनाच माहीत. एकूणच शाहरूख त्यांच्या बेडरूम मधे, किंवा कोणाच्याही खोलीत कोणीही कधीही दार सुद्धा न ठोठावता घुसत असतो.
अपूर्व ची एन्ट्री त्यामानाने साधी. तो ९० च्या दशकात अमेरिकेत काळी हॅट घालून गाडी चालवतो, तीही ओपन कन्व्हर्टिबल. एकूण हे कथानक कोणत्या दशकात घडले याची घईची काहीतरी गडबड दिसते किंवा कॉस्च्युम डिझाईनरने "द अनटचेबल्स" किंवा "मॅड मेन" समोर ठेउन ते डिझाईन केलेले असावेत. अपूर्व भारतात कधीच आलेला नसतो. आणि तरीही अस्खलित हिन्दी बोलत असतो. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील सर्व लोक, अगदी चायनीज बार ओनर्स सुद्धा हिन्दीच बोलतात. शाहरूख भर तरूणपणी सस्पेंडर्स असलेले फॉर्मल कपडे घालून भारतात आलेला असतो. त्याचे सूट वगैरे सुद्धा कायम वाढत्या अंगाचे असल्यासारखे ढगळ दिसतात. कदाचित अपूर्व आणि शाहरूख दोघांनाही बसतील अशा मधल्या मापाचे बनवले असावेत. गंगाही दिल्ली ते हॉलीवूड विमान प्रवासात सगाईचे सर्व दागिने, भरजरी ड्रेस घालून बसलेली असते. अपूर्व श्रीमंत असल्याने थीम पार्क मधे सुद्धा सूट, टाय घालून फिरतो. शाहरूख एन्ट्रीलाच चित्रकला, कार रिपेअर, संगीत व नृत्यकला आणि पियानो वाजवणे या सर्वात तरबेज आहे हे कळते. पियानो वाजवताना त्याला चित्रपटभर एरव्ही कधीच न लागणारा चष्मा समोर काढून ठेवून वाजवावा लागतो. तो कॉलेज मधे जात नाही, नाहीतर तेथील बॅडमिंटन स्पर्धा जिंकून त्याच दिवशी वादविवाद स्पर्धेत स्त्री श्रेष्ठ की पुरूष हा वाद घालताना हिरॉइनशी ओळख व पहिल्या नजरेत प्रेम झाले असते. त्यात एकदा एका क्लब मधे 'मेड इन हेवन' जोडी निवडण्यासाठी डान्स करताना नेमके तेच दोघे निवडले जातात हा शॉट आहेच.
लग्नाला काही दिवस अजून बाकी असताना मग अपूर्व आणि गंगा लास वेगास ला जायचे ठरवतात. मग तेथे लग्नाआधीच "जिन्दगी का मजा" घेण्याची मागणी अपूर्व करतो ("बाकी लोग अपनी अपनी रूम मे जिन्दगी का मजा ले रहे है" असा संवाद आहे. हे संवाद बहुधा त्या जीवनाचा आनंद घेण्यासंबंधीच्या एका उत्पादनाची जाहिरात लिहीणार्याने लिहीले असावेत). ती ते साफ नाकारते आणि तेथून पळून जाते. आता एथनिक भारतीय वेषात लास वेगास किंवा एलए मधे पळालेली मुलगी पोलिसांना दिसायच्या आत शाहरूखला भेटते. एकतर ती पळाली हे कळल्यावर "पोलिस कमिशनर को फोन लगाओ" असे अमरिश पुरी फर्मावतो. पण अमेरिकेत हे पदच आस्तित्त्वात नसल्याने नक्की कोणाला फोन करायचा हे कोणालाच कळाले नसावे. त्यात शाहरूख चे जासूस चारो तरफ फैले हुवे असल्याने ती एलए च्या कोणत्यातरी स्टेशन वर दिसली हे त्याला कळते. मग तो "वेस्ट कोस्ट एक्स्प्रेस" ने तेथे येतो. तो जेथे उतरतो तेथेच समोर ती उभी असते.
मग ते भारतात पळून जातात. फैले हुवे जासूस इंडस्ट्रीमुळे हे ही कोणीतरी प्रत्यक्ष बघते व अपूर्व ला सांगते. आंतरराष्ट्रीय प्रवासास शाहरूख व गंगा ला पासपोर्ट वगैरेंची गरज पडत नाही. कदाचित "हमारे संस्कृती मे पासपोर्ट नही पूछा करते..." वगैरे वाक्ये सुरू झाल्यावर इमिग्रेशन ऑफिसरने "नको नको, त्यापेक्षा तू जा" म्हणून स्वतःची सुटका करून घेतली असेल.
ते भारतात आल्यावर तिच्या घरचे तिलाच दोष देतात. आपल्या वागण्याचे कारण चित्रपट संपेपर्यंत सांगायचे नाही या हट्टामुळे तिचाच दोष आहे असा समज निर्माण होतो. मग शाहरूख ला हाकलून दिले जाते. नंतर गंगा घरातून पळून जाते. काही वेळ आधी निघून गेलेला शाहरूख, नंतर बर्याच वेळाने घरातून पुन्हा पळालेली गंगा, नंतर अमेरिकेतून आलेला अपूर्व आणि इतर रिकामटेकडी मंडळी हे सर्व कोणत्यातरी पुरातन इमारतीत एकाच वेळेला आपोआप येतात. काळ व दिशा यांची कोणतीही बंधने त्यांच्या आड येत नाहीत.
शेवटी सर्व उघडकीला येते. सर्व म्हणजे ते जिंदगी का मजा प्रकरण. पण यामुळे गंगाने अमेरिकेतून थेट भारतात पळून येणे हे योग्य ठरते. मग शेवटी तिचे शाहरूखशीच लग्न ठरून हा चित्रपट संपतो आणि दोन्ही संस्कृती सुटकेचा निश्वास टाकतात.
एक ब्लूपरः आता या वेगळ्या ब्लूपर ची काय गरज आहे असे आपल्याला वाटेल. पण ते ही आहे. अमरिश पुरी शाह रूख ला दुसरीकडे जायला सांगत असल्याच्या शॉट मधे मागे एक फ्रेम आहे. क्लिंटन व अमरिश पुरी हात मिळवताना. ते नीट बघितले तर लक्षात येते की भलत्याच दोन माणसांच्या फोटोवर क्लिंटन व पुरीसाहेबांचे चेहरे चिकटवले आहेत. आणि ब्लूपर ऑन ब्लूपर हा की हा फोटो फक्त समोरच्या शॉट मधे दिसतो, त्याच चर्चेच्या बाजूने घेतलेल्या शॉट मधे तो कोठेच दिसत नाही.
पीपली लाइव
पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्या एका गरीब शेतकर्याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट.
चित्रपटाला निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. मुख्यप्रदेशात निवडणूका येउ घातल्या आहेत आणि पीपली गाव मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे. एकीकडे मुख्यमंत्री, ठाकूर, पप्पूलाल (ठाकूरचा प्रतिस्पर्धी), कृषीमंत्री किडवई ह्यांच्यातली रस्सीखेच तर दुसरीकडे हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलवाल्यांची रस्सीखेच अप्रतीम सादर केली आहे.
सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत, विशेषतः नथा, त्याची बायको, अम्माजी, राकेश (लोकल रिपोर्टर).. होरी महातो आणि 'लालबहादूर' सुद्धा एकदम परिणामकारक. मला स्वतःला नथाची बायको आणि होरी महातो ह्यांची मरण्यापेक्षा जगण्याची जिद्द खूप खूप भावली. संगीत सुद्धा छान आहे. 'महंगाइ डायन' गाणे मस्तच आहे. अनुशा रिजवी ह्यांचे दिग्दर्शन केवळ अप्रतीम.
फेमला रात्री १० चा शो होता. शो सुरू होण्याआधी राष्ट्र्गीत एकवले गेले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र्गीत एकल्यावर छान वाटले. चित्रपट संपल्यावर जी जाणिव झाली ती मात्र खूप वेदना देणारी होती...
कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - ४था व अंतिम भाग
या आधीच्या तीन भागांत मी कव्वाली या गायनप्रक्राराची ओळख, सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वाल्या आणि १९५५ ते १९७५ या कालावधीतील हिंदी चित्रपटांमधील कव्वाल्या यांची माहिती दिली होती. या चवथ्या आणि शेवटच्या भागात वळूया (प्रामुख्याने *) १९७६ ते २००५ या कालावधीतील चित्रपटांतील काही गाजलेल्या कव्वाल्यांकडे.
या आधी लिहिल्याप्रमाणे मी ही लेखमाला लिहिण्याचा घाट घातला तो केवळ मला आवडलेल्या आणि आता लक्षात असलेल्या कव्वाल्यांची यादी तुमच्या बरोबर share करण्याच्या स्वान्त-सुखासाठी, पण माझ्या सुदैवाने तुम्ही वाचक लोकही मी नमूद करायला विसरलेल्या आणि आपापल्या आवडत्या अशा अनेक कव्वाल्या इथे पुरवून एक ऑनलाईन मेहेफिल-ए-समाच निर्माण करत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद!
या भागात तसंच आधीच्या भागांत यापुढेही आठवेल तशी भर घालत चला, आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मन:पूर्वक आभार!
* या आधीच्या भागात एक १९७३ ची गाजलेली कव्वाली टाकायची राहून गेली, ती इथे सुरुवातीला देतो आणि मग सुरु करुयात १९७६ पासून पुढे:
"मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती"
१९७३ चा हा चित्रपट होता 'गर्म हवा'. बलराज सहानी यांची बहुधा सर्वोत्तम भूमिका असणारा, फाळणीनंतर भारतात राहणे पसंत करणार्या मुसलमान कुटुंबाची ही सुंदर कथा. कव्वाली गायन आणि संगीत होतं अझीझ अहम्मद खान वारसी यांचं, तर शायर आहेत कैफ़ी आज़मी:
जितनी बलाएं आई, सबको गले लगाया
खूं हो गया कलेजा शिकवा ना लब पे आया
हर दर्द हमने अपना अपने से भी छुपाया
तुमसे नहीं है कोई पर्दा सलीम चिश्ती
मौला सलीम चिश्ती, आका सलीम चिश्ती
अझीझ अहम्मद खान वारसी यांचे दोन नातू 'वारसी ब्रदर्स' यांनी गायलेली हीच कव्वाली इथे ऐकायला मिळेल.
पुढे सरकूया १९७६ च्या दो खिलाडी या चित्रपटातील कव्वाल जानी बाबू यांनी गायलेल्या, गौहर कानपूरी यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार उषा खन्ना यांनी संगीतसाजाने सजवलेल्या 'रात अभी बाकी है, बात अभी बाकी है' या कव्वालीने.
चित्रपटातील या कव्वालीचा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल.
यानंतरची कव्वाली आहे १९७७ साली आलेल्या आणि तुफान गाजलेल्या हम किसीसे कम नही या चित्रपटातली. है अगर दुष्मन जमाना गम नही. (ही कव्वाली तिसर्या भागाच्या प्रतिसादात 'प्रभो' यांनी दिली होती, पण ती या कालखंडातली आहे म्हणून इथे परत देतो आहे.) ऋषीकपूर आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेली ही कव्वाली लिहिली होती मजरूह सुलतानपुरी यांनी, गायलीय महंमद रफी आणि आशा भोसले यांनी संगीत होतं आर डी बर्मन यांचं.
याच वर्षी (१९७७) आला आणखी एक मल्टी-स्टार चित्रपट, 'अमर, अकबर, अँथनी'. पुन्हा एकदा ऋषी कपूर (या वेळी नीतू सिंग बरोबर), गायक कलाकार पुन्हा रफी आणि आशा, गीतकार होते आनंद बक्षी, आणि संगीत होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं.
याच चित्रपटातील ''शिर्डी वाले साई बाबा' ही कव्वाली देखील खुप गाजली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रफी
१९७७ सालीच वरील दोन प्रसिद्ध चित्रपटांच्या महापुरात वाहून गेलेला एक चित्रपट होता 'चरणदास'. पाहुणे कलाकार अमिताभ आणि धर्मेन्द्र यांनी सादर केलेली 'देख लो इष्क़ का मर्तबा देख़ लो' ही कव्वाली मात्र खूप गाजली. अमिताभ साठी आवाज दिला होता येसूदास यांनी तर धर्मेन्द्रासाठी पार्श्वगायन होतं अझीझ नाझायांचं. गीतकार राजेन्द्र कृष्ण आणि संगीतकार राजेश रोशन
मग १९७८ साली आला श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला शशी कपूर चा 'जूनून' हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो तोच मुळी या कव्वाली पासून.
तन मेरा मन पियु का, दोनों हो गए इक रंग
लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल
लाली देखन मै चली तो मै भी हो गयी लाल..........
मूळ अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या या कव्वालीचे इथे गायक आहेत जमील अहम्मद, आणि संगीत आहे वनराज भाटिया यांचं.
आज रंग है, मेरे मेहेबुब के घर रंग है
सुरुवातीचं निवेदन करणारा आवाज कुणाचा आहे ते तुम्ही ओळखालच!
१९८० साली आला 'द बर्निंग ट्रेन'. जीतेन्द्र, नीतू सिंग, आशा सचदेव आणि राजेन्द्र नाथ यांच्या वर चित्रीत असलेली 'पल दो पल का साथ हमारा' ही कव्वाली भरपूर गाजली. गायली होती रफी आणि आशा भोसले यांनी. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार राहुल देव बर्मन.
नंतर १९८२ मध्ये आला दीदार-ए-यार, या चित्रपटात ऋषी कपूर आणि जीतेंद्र बरोबर होत्या टिना मुनीम आणि रीना रॉय.
'गुरूर-ए-हुस्न के सदके मुहब्बत यूं नही करते'
आशा भोसले आणि महंमद रफी यांनी गायलेल्या या कव्वालीचे संगीतकार होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल.
१९९७ साली आला 'और प्यार हो गया' हा चित्रपट. नुसरत फतेह अली खान यांनी स्वतः संगीत दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट (आणि त्यांच्या हयातीतला शेवटचा! याच वर्षी त्यांचं निधन झालं.) 'कोई जाने, कोई ना जाने' ही कव्वाली चित्रपटात त्यांच्यावरच चित्रीत आहे. सोबतीला आवाज होते आशा भोसले आणि उदित नारायण यांचे. या चित्रपटातील कलाकार होते ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल.
१९९९ साली 'कच्चे धागे' या सैफ अली खान, अजय देवगण, नम्रता शिरोडकर आणि मनीषा कोईराला यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटातील 'इस शाने करम का क्या कहेना' कव्वालीला पार्श्वगायन आणि संगीत दिग्दर्शन होतं नुसरत फतेह अलींचं, या दोन्ही कामगिर्या असलेला हा त्यांच्या निधनानंतर आलेला पहिला चित्रपट.
नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला तिसरा चित्रपट याच वर्षी आला, १९९९ चा सनी देओल, बॉबी देओल, सुष्मिता मुखर्जी आणि उर्मिला मातोंडकर यांनी अभिनीत केलेला 'दिल्लगी'. कव्वाली होती 'साया भी साथ जब छोड जाये, ऐसी है तनहाई', संगीत शंकर-एहसान-लॉय किंवा जतीन ललित यांचं असावं (या चित्रपटाला चक्क ५ संगीतकार होते!)
शतक संपता संपता २००० साली आला 'धडकन'. नुसरत यांचं पार्श्वगायन असलेला हा अखेरचा चित्रपट. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है' ही बर्यापैकी गाजलेली कव्वाली संगीतबद्द केली होती जतीन-ललित यांनी तर लिहिली होती 'समीर' यांनी.
२००० सालीच आला हृतिक रोशन, करिश्मा कपूर आणि जया भादुरी यांचा ''फिजा'.
कादर ग़ुलाम मुश्ताफा, मुर्तजा ग़ुलाम मुश्ताफा, श्रीनिवास यांनी गायलेली 'पिया हाजी अली' ही कव्वाली संगीतबद्द केली होती ए आर रहेमान यांनी, तर शब्द होते शौकत अली यांचे.
२००२ साली आला चित्रपट 'ये दिल है आशिकाना'. अरुण बक्षी आणि जीविधा या नवोदित कलाकारांना घेउन काढलेला, चित्रपट चालल्याचं आठवत नाही, त्यामुळे एक चांगली कव्वालीही दुर्लक्षित राहिली. यातील 'अल्ला अल्ला तारीफ तेरी अल्ला अल्ला' या साब्री ब्रदर्स नी गायलेल्या कव्वालीचे शब्द होते तौसिफ अख्तर यांचे अणि संगीत होतं नदीम-श्रवण यांचं.
२००३ साली आलेल्या 'हजारों ख्वाइशे ऐसी' या चित्रपटात होती 'मन ये बावरा, तुझ बिन माने ना' ही लयबद्द कव्वाली. अतिशय 'intense' अशा या चित्रपटातील कलाकार होते के. के. मेनन आणि चित्रांगदा सिंग, कव्वाली गायक होते स्वानंद किरकिरे आणि अजय धिंग्रन, गीतकार पुष्पा पटेल आणि संगीतकार शंतनु मोइत्र.
हा २००४ पर्यंतच्या भारतात गाजलेल्या कव्वालींचा उण्या-पुऱ्या पन्नास वर्षांचा प्रवास इथे संपवतोय तो 'मै हुं ना' या शाहरुख खान-सुष्मिता सेन, ज़ायेद खान- अमृता राव अभिनीत चित्रपटातील 'तुम से मिल के दिल का है जो हाल क्या कहें' या कव्वालीने, गायक कलाकार होते सोनू निगम बरोबर आफताब आणि हाशिम हें साब्री बंधू, गीतकार जावेद अख्तर आणि संगीत होतं अन्नू मलिक यांचं.
तर या पन्नास वर्षांमधल्या प्रवासात कव्वालीत काय स्थित्यंतरं घडली?
निदान भारतात तरी, 'मेहेफिल-ए-समा' या कव्वाल आणि श्रोते यांच्यामधील थेट आदान-प्रदान होण्याच्या प्रकारापासून दूर सरकून कव्वाली चित्रपटांमध्ये जाऊन 'प्रेक्षणीय' आधिक झाली. याचा परिणाम थोडासा असा झाला की आधी कव्वालांना श्रोत्यांची दाद मिळण्याचं जे instant gratification होतं, त्याची जागा घेतली कव्वालीमुळे आधिक प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या यशाने.
दुसरा परिणाम असा झाला की चित्रपट हे माध्यम हिंदी समजणार्या प्रेक्षकांचं आधिक असल्याने उर्दू शब्दांची पखरण कमी होऊन कव्वालीचं 'हिंदी-करण' झालं (उदाहरणः शिर्डी वाले साई बाबा). यात बिघडलं काही नाही, पण नजाकत नक्कीच कमी झाली.
तिसरी गोष्ट, चित्रपटांत येऊन कव्वाल्या 'सुंदर आणि दिलखेचक' दिसणं आणि 'धुंद' करणारा ठेका असणं यांकडे आधिक भर असल्याने, कव्वाल्यांमधील शब्दांना दुय्यम महत्व आलं
१९८० च्या दशकानंतर एक आणखी सहज जाणवणारं स्थित्यंतर म्हणजे कव्वाली धर्माविषयी कमी आणि प्रियकर-प्रेयसी यांच्या भावनांविषयी आधिक बोलू लागली.
आणि शेवटचा मला तरी जाणवणारा (आता यात माझं सध्याच्या चित्रपटांविषयीचं अज्ञान असण्याचा ऩक्कीच संभव आहे) मुद्दा असा, की २००५ पासून आजतागायत मला चित्रपटांमध्ये (दमदार, लक्षणीय सोडाच) एकही कव्वाली आढळलेली नाही. (I sincerely hope I am wrong here, and if you know of them, do please update and add links to good qawwalis since 2005.)
हे सर्व जरी असलं, तरीही एक सत्य शिल्लक राहतंच: सुफी परंपरेतून कव्वाली जन्माला आली, आणि सहिष्णुता (इथे मला 'inclusive non-discrimination' हा अर्थ अभिप्रेत आहे, त्यावरून वाद नकोत) हा जिचा पाया आहे अशा सुफी परंपरेने कव्वालीच्या माध्यमातून हिंदू कीर्तन, अरेबियन आणि पर्शियन उक्ते या सर्वांना सामावून घेत वाटचाल केली, संगीत हे अखेर एकतेची आणि दिव्यत्वाची जाणीव करून देण्यासाठी असतं हा या प्रवासाचा पाया होता. कव्वालीने काळाबरोबर बदलावं, आणि कपडे, रंग, भाषा, नव-नवीन वाद्यं यांना अंगीकारून पुढे सरकावं, असा लवचिकपणा (flexibility) ठेवला. प्रत्येक बदलाबरोबर नव्या पीढीला सामावून घेत पुढे सरकत राहण्याची जिद्द ठेवली. असा हा सुंदर, उत्कट गायनप्रकार बदलत्या जगरहाटीत मागे पडून विस्मृतीत जाऊ नये. सर्वांनी गुण्या-गोविंदाने एकत्र, एकमेकांना सांभाळून रहावं अशी आजची आत्यंतिक गरज आहे, कव्वाली त्यात महत्वाचा सहभाग घेऊ शकेल, म्हणून पूर्वी-इतक्याच दमदार कव्वाल्या जन्माला येत रहाव्यात असं मनापासून वाटतं.
पुन्हा एकदा, सर्व वाचकांच्या सहभागाबद्दल, प्रतिसादांबद्दल आणि व्यक्तिगत निरोपांमधून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

