राहणी

ईट्स् अफ्रिका ब्वना !

डिस्क्लेमर : ह्या लेखात वैयक्तिक अनुभव लिहावां की अफ्रिकन सभ्यते विषयी लिहावं हेच समजलं नाही .. शेवटी भेळ करायच ठरवली ..

आज दुपारी विजाभौंनी खरड करून अफ्रिकेविषयी काही तरी लिही म्हणून सांगितलं, पण अजुन ईथल्या वातावरणात ईन-मीन अर्ध वर्षच झालंय म्हणून फार डिटेल लिहू शकेल असं वाटल नाही, म्हणून स्वतःला पण ऍड करून थोडा प्रसिद्ध करू म्हटलं .. चुकलं माकलं तर संभाळून घ्या.

घरी :
"ए आई बॅग भरलीस का गं ? " मी थोड्या वैतागलेल्या स्वरात तोड धुता धुता मोरीतून मातोश्रींना आदेश सोडला !
"अरे हा काळा टी-शर्ट पण ठेऊ का ? आणि तुच एकदा चेक करून बघ ! " - ईति मातोश्री.

छोट्याश्या हॉल मधे मला लागणार्‍या न लागणार्‍या गोष्टींनी पसारा घालून ठेवला होता. आई बहीन एक एक गोष्ट आठवून काय काय लागेल याचा विचार करत होते. वडील गुपचूप माझ्या बुटांना बाहेरून पॉलिश करून आले होते. कारण त्यानी माझ्या बुटाला हात लावलेला मला मुळीच आवडत नाही हे त्यांना माहीत आहे.पासपोर्ट,स्नॅक्स,क्लोज अप ,टुथ ब्रश, कंगवा , हातरूमाल , नेक टाय ,सॉक्स, किरकोळ आजारांवरची औषधे,कॉस्मेटिक्स (हे आमच्या भगिनींचं प्रेम) , वॅसलिन , फॉर्मल शर्ट-पँटस् , कॅजूअल्स पासून ते नेलकटरच काय पण काही प्लास्टिकच्या पिशव्या (मला अफ्रिकेत गरज भासेल म्हणून) एवढ्या सार्‍या बारिक-सारिक गोष्टींची तयारी आईने केली होती, तिच्या मनात अजून काहीतरी राहीलय हेच विचार आणि त्यामुळे तिला कोणी आपल्याला काय बोलतंय हे प्रथम हाकेला ऊमगत नव्हतं. त्यात आई-बाबांचं भारत-पाकिस्तान युद्ध झालेलं असल्यामुळे काही चुक झाली की एकमेकांना टोमणे मारणे चालू होतं.पहील्यांदाच पोरगं घरं सोडून देश सोडून एवढ्या लांब चाललं होत.गेल्या २३ वर्षात कधी आईला सोडून एक आठवड्यापेक्षा जास्त राहिलो नव्हतो. आमच्या खानदानात कधी कोणी ग्रॅज्यूएशन ची पायरी चढलं नव्हतं आणि साधारण मध्यमवर्गिय खाऊन-पिऊन सुखी मराठी कुटूंबात जन्मल्या मुळे कोणी फिरण्याचे शौक पुरे करण्यासाठी परदेशवारी करण्याचा संबंध नव्हता. आप्पा-काकू आल्या होत्या आईच्या खास मैत्रिणी पण आल्या होत्या.चुलत भाऊ आलेला.जिगरी मित्र आले होते.सगळे अगदी ऊत्साहात होते. बाबांच्या डोळ्यात एक गर्व एक अभिमान होता. त्यांचे डोळे नक्कीच पाणवलेले होते.ते बोलणे पण टाळत होते कारण बोललो तर तोल सुटेल अशी त्यांना भिती असावी. त्याना काही विचारले की ते हातवार्‍यांनीच ऊत्तर देत होते. त्यांनी मी जाणार असं कळल्यावर सर्व नातेवाईकांना फोन करून करून बातमी पसरवून मोकळे झाले होते, तर आईने "कशाला सांगायचं?कळतं आपोआप !" म्हणून नेहमी प्रमाणे विरोधप्रदर्शन केलं. बाबांना मला कष्टाने शिकवल्याचा अभिमान होताच. पण आता मी ईतक्या लगेच परदेशात जाणार म्हणून एक सार्थक झाल्याचा आनंदही झाला होताच. आईने लगेच आपल्या स्त्रीसुलभतेची ऊदाहरणे द्यायला सुरूवात केली. "शेजारच्या आवटे बाईंना मी बोलले की आमचा गणेश अफ्रिकेला चाललाय , तर ते ऐकून न घेता तिने माझा धाकटा भाऊ कॅनडाला जाणार , त्याला किती डॉलर पगार मिळणार ई. चालू केलं , तो कॅनडाला जाणार हे मी गेली १० वर्षे ऐकते आहे (अतिशयोक्ती आहे, समजून घ्या) , बिड्या फुकत गावगुंडांबरोबर तर फिरतो गांजा न ताडी पण पितो असं ऐकलय(आमच्या आईला एवढ्या बातम्या कुठून मिळतात मला अजून कळालेलं नाही) , मरू देना आपल्याला काय करायचय ?(स्वत:च विषय काढून स्वतःलाच त्यात इंटरेश्ट नाही असं दाखवते) ". बहिण कोणतं क्रिम कशासाठी, काय कशात मिक्स करून तोंड रंगवायचं हे एकदम ऊत्साहाने सांगत होती. मी अफ्रिकेला जाऊन निग्रो होईल असं तिला वाटत असावं

ऑफिसात :
(शुक्रवार) आज रात्री मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघायचं होतं. कंपनी मध्ये इंश्योरंस , डॉलर्स ,इंव्हीटेशन लेटर आणि बाकी फॉर्मालिटी मध्ये अर्धा दिवस गेला होता.कॅब कनफर्म करून घेतली. ई-टिकीट च्या प्रिंटस मारल्या.पिएम या जायच्या वेळी पण नेहमी प्रमाणे चरख्यात ऊस ७-८ वेळा पिळतात तसा पिळत होता. तो जगातला एक नंबरचा रिकामटेकडा माणूस आहे आणि त्याच्या कडे मला पकवण्याशिवाय एकही काम नाही असं मला वाटत होतं. या गोष्टींची कुनकुन असल्याने आज धाकट्या भावाची सिबीझी मागून घेतली होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत काम ऊरकंलं. गाडीला किक मारली न सुसाट घराकडे निघालो. कॅब वाल्याला घर सापडेल का ? तो वेळेवर येईल का ? आला तर निट विमानतळावर पोचवेल का ? आपला पासपोर्ट गायब होऊन घरी गेला तर ? ई-टिकीट हारवलं तर ? हे ईमिग्रेशन काय ? अरायव्हल विसा नाकारला तर ? एक ना अनेक प्रश्न डोक्यातून बाहेर पडायला तडफडत होते. सिग्नल सुटायच्या आधीच पळायचा पुणेरीपणा अंगात असल्याने सराईत पणे सिग्नल तोडत मनातल्या प्रश्नांना ऊत्तरे देत देत २० मिनीटात घर गाठले.गाडीपार्क करून जिना चढून वर गेलो. छोट्याश्या घरातला पसारा न गर्दी पाहून वैतागलो. बॅग टाकली अन फ्रेश होण्यासाठी बाथरूम कडे वळालो.
"ए आई बॅग भरलीस का गं ? " मी थोड्या वैतागलेल्या स्वरात तोड धुता धुता मोरीतून मातोश्रींना आदेश सोडला !

कॅब वाल्याला दर १० मिनीटांनी फोन करून करून वैतागावला. शेवटी ८:१० ला कॅब आली. घराखाली कॅब लागताच घरचे आणि शेजारचे "मला घ्यायला विष्णू ने गरूड पाठवलाय" या अविर्भावात कॅब कडे पाहात होते. शेजारचे मास्तरचे कुटूंब हळूच दरवाज्याच्या फटीतून काय चाललय हे बघत होतं ( हे मास्तरच कुटूंब एक नंबर भेदरट पण निर्लज्ज पणे लांबून गंमत बघणार्‍यातलं ,एकदा कॉलनीत भांडण-मारामार्‍या झाल्या, हे पब्लिक दरवाज्याच्या फटीतुन नेहमी प्रमाणे एकावर एक डोकी बाहेर काठून ऊंदरासारखी गंमत बघत होतं,कार्टून मधल्या अंलक स्कृज च्या पुतण्यांसारखं). भावाने गाडीच्या डिकीत बॅग्ज भरल्या. आईच्या पाया पडायला वाकणार ईतक्यात आईने कवटाळून ऊराशी लावलं. बाबा कुठे गायब झाले ते कळल नाही,ते टेरेस वर गेल्याचं नंतर कळालं.सर्व वडीलधार्‍यांच्या पाया पडणे ,आशिर्वाद+एक सल्ला घेऊन झालं. आईचं दर मिनीटाला "स्वतःची काळजी घे","नीट रहा","फोन कर","व्यवस्थित जेवण कर" ही वाक्य लूप मध्ये चालूच होती.गाडीत बसताना वडीलांनी मीच त्यांना काल दिलेले १००० रुपये माझ्या खिशात कोंबत म्हणाले "राहूदे, तिकडे कामात येतील" म्हणू माझ्या संयमाचा बांध फोडला.आईने वडिलांना सावरत मला गाडीत बसायला सांगितलं.
शेवटी सर्व मित्रांच हाय-बाय झालं. अतिशय जड अंत:करणाने मी निघालो. कार हायवे ला लागली आणि मी मोबाईल काढून म्युझिक सूरू केलं (विचारांच थैमान चालूच होतं).. किशोरदांचा जादूई सूर कानी पडू लागला ...
जिंदगी के सफर मे , गुजर जाते है जो मकाम.... वो फिर नहीं आते...वो फिर नाहीं आते(२)
फुल खिलते है .. लोग मिलते है.. फुल खिलते है .. लोग मिलते है मगर,,
पतझड मे जो फुल मुर्झा जाते है वो बहारो के आने से खिलते नही...
कुछ लोग एक रोज जो बिछड जाते है .. वो हजारों के आए से मिलते है ..
उमर भर चाहे कोइ पुकारा करे उनका नाम ... वो फिर नही आते (२)

मुंबई इंटरनॅशनल एयरपोर्ट (भारत) :
रात्री १२:१५ ला मुंबई अंतरराष्ट्रीय एअरपोर्टला पोचलो.
माझ्याबरोबर कॅब मध्ये एक अमेरिकेला जाणारा मराठी माणूस आणि एक व्हिएअतनामी होता. मराठी माणूस म्हणूल लगेच पटकन (स्वार्थी हेतूने)ओळख करून घेतली. पहीलीच परदेश वारी असल्याने व्हिसा-ईमिग्रेशन वगैरे भानगडी माहीत नव्हत्या. म्हटलं याच्या बरोबर राहून कळेल तरी.पण बॅडलकने नेहमीप्रमाणे साथ दिली. अमेरिकेला जाणार्‍या एअरलाईन्सच टर्मिनल आणि अफ्रिकन कंट्रीज मध्ये जाणार्‍या एअरलाईन्सच टर्मिनल वेगळं आहे हा खुलासा झाला. अमेरिका, युरोपात जाणार्‍या टर्मिनल वर सगळे गोरे भारी पॉश लोक होते. पाहून हादरून घेलो होतो . तशाच बॅग्ज घेऊन विचारपूस करत ईथोपियन एअरलाईन्स वाले आपले बस्तान कुठे लावतात शोधत आलो. अफ्रिका, आणि आखाती देशांत जाणार्‍या फ्लाईटचं टर्मीनल सापडलं. ईकडे थोडी कमी वर्दळ, सलवार-बुर्खा धारी पब्लिक होती. ते युएस ला जाणारी वर्दळ ईकडे का नाही? मी का ईकडे ? थोडं वाईट वाटलं. पुर्वीही डोमॅस्टिक विमान प्रवास केला असल्याने टिकीट न बोर्डींगची प्रोसेस माहीत होती. फ्लाईट ५:२५ ला होती. आता ५ तास एकटा काय करायच हा विचार डोक्यात गोंधळ घालत होता. व्हिसा हा ईथोपियाच्या कार्यालयात मिळेल या वेडपट कल्पनेने मी ईथोपियन्सच ऑफिस कुठे आहे हे विचारु लागलो. त्यांनी अजून त्यांच दुकान मांडलं नव्हत. कोणाला तरी पत्ता विचारला त्याने एका बोळकांडातून एका अंधार्‍या रस्त्याने सरळ जायला सांगितले.[डोक्यातले विचार जात नव्हते. कन्या राशीचे गुण जन्मजात असल्याने काही तरी विसरलोय म्हणून अस्वस्थ होत होतो. दर ५ मिनीटाला पासपोर्ट आणि ई-टिकीट ची प्रिंट चेक करत होतो.] मग त्या बोळकांडातुन निघालो. तो भाग रामसेच्या पिक्चर मधल्या भूताटकीवाड्या सारखा
वाटत होता. जवळपास २००-३०० मीटरचा ती अरुंद वाट पाहून मी विचारात पडलो हेच का ते झगमगणारे युएस टर्मिनल
वालं एअरपोर्ट. शेवटी ईथोपियन्स च्या कार्यालयात पोचलो. विचारपूस केल्यावर थोडीफार प्रोसिजर कळाली. विसा ऑन अरायव्हल यूगांडा मधे मिळेल असं कळलं. पुन्हा कन्या राशीने प्रश्न विचारला, तिकडे विसा नाकारला तर ? ते म्हणाले ,तुमचं तिकीट परतीचं आहे. आम्ही तुम्हाला नेऊ शकतो. विसा नाही मिळाला तर तुम्ही पुन्हा भारतात येवू शकतात. थोडा आश्वस्त झालो. पुन्हा माणसात येवून बसलो. शेजारचा ईसम पण माझ्या सारखाच पहील्या परदेशवारीचा असावा. मलाच तो नाना प्रश्न विचारू लागला. शेवटी मी जागा बदलून बसलो. ३:०० ला ईथोपियन्स ने दुकान लावलं. पटकन् बोर्डिंग पास घेतला. चेक इन केलं. इमेग्रेशन वाला मी कोणी आतंकवादी आसावा असा संशय असल्यासारखा प्रश्न विचारत होता. सगळं दिव्य पार केल्यावर शेवटी एकदा योग्य गेट पाशी येवून बसलो. फ्रांसला जाणारी फ्लाईट ही सेम गेटला लागणार असल्याने काही फ्रेंच कपल्स त्यांच फ्रेंच कल्चर विनासंकोच दाखवत होते. आणि काही भारतीय कल्चर वाले ते जिभल्या चाटून चोरून चोरून बघुन आपले कल्चर दाखवत होते. कोपर्‍यात येवून बसलो. झोप लागत होती.एक्दा तर डुलकी पण लागली (तेवढ्यात स्वप्न पडलं की मला अशीच झोप लागली आणि मी रवीवारच्या शेड्युल प्रमाणे म्हणजे दु १२ ला ऊठलो आणि माझी फ्लाईट मिस झाली...) खाडकन् जागा झालो.झोप पुर्ण ऊडाली. फ्रेंच संस्कृती आपला प्रचार अजुनही करत होती. चकाचक फ्रेशरूममध्ये जाऊन चकाचक फ्रेश होऊन आलो.काही तरी खाऊ म्हाटलं आणि एक कुरकुरेचा पुडा घेतला, सुट्टे नव्हते ५० दिले आणि ४० मिळतीय या आशेने त्याच्या कडे पाहीले."अरे ४०रुपिया दो ना भाई! ५० दिया मैने"- मी. "वो ५० काही है" - तो. "च्यायला १०रुपयाचं भुसकाट ५० ला देतो काय साल्या.. तुला पचणार नाही.. जुलाबावर बसशील ४० दिवस" -स्वगत.
पहाटे ५:४५
शेवटी फ्लाईट मध्ये बसलो. आणि अंग टाकून निश्चिंत झालो. पण थोड्याच वेळात लांबसडक पाय आपली जागा करू न शकल्या ने अवघडून आले. कसे बसे वाकडे तिकडे करून बसलो. सिट मागे घेतली. लगेच चिपड्या थोबाडाची एअर होस्टेस पचकली "स', विल यु प्लिस रीसेट द सिट ? यु कॅन रिलॅक्स व्हेन वी'र ईन द एअ' " ..."तुझ्या *******" एअरहोस्टेसला २-३ स्तुतीसुमनं झाडून त्या छोट्याश्या जागेत मन मारून बसलो." धड झोपही येत नव्हती. आजूबाजूला काही भारतिय (मोस्ट्ली केम छो भाई) भयानक अफ्रिकन्स आणि काही गोरे होते. एअर होस्टेस बळेच मधल्या लेन मधून येजा करून करवली सारखी मिरवत होती. "एका जागी गूमान बस की बाई ! का मुळव्याध झाला तुला ? " -माझे स्वगत. शेवटी फ्लाईट थोडी हलली,पुर्वी विमानप्रवास केल्यामुळे मी फारसा ऊत्तेजित नव्हतो, पण बाकी कोण पहीला प्रवास करतय हे त्यांच्या अतिऊत्साहाने चटकन लक्षात येत होते. तरी बरे बाहेर अजून अंधार होता. विमान धावपट्टीवर आले,आणि काही सेकंदात झटका देऊन वेग घेतला.. अलगद जमिनीपासून वर जाताना किंवा खाली येताना, पोटात गुददुल्या होतात, लै भारी वाट्ट.. विमान प्रवासात मला एकमेव आवडणारी गोष्ट.
थोड्या वेळात ती मघाशीचीच चिचकुळी एअरहोस्टेस डिंक्स ची ट्रॉली घेऊन आली. आमच्या शेजारच्या काळ्या महिलांनी द्राक्षासव घेतलं आणि मी लहान मुलाने मागावे तसे "वन, डाएट कोल प्लिज" म्हणताच त्यादोघी माझ्यावर तुच्छतेने हसत असल्याचा भास मला झाला. मग मी त्यांना "बेवड्या कुठल्या" म्हणून एक असूरी बदला घेतला. काल जेवण झालं नव्हतं, निघताना घाई झाली होती. विमानात फुकट आहे .. जाम चेपू म्हटलं तर साला ,"चिकन पफ" आणि केक न फ्रुट सॅलड, ति प्लेट त्या चिचकुळ्या तोंडाच्या होस्टेसच्या मुखकमलावर लेपावी असं मनोमन वाटलं. मग ४-५ वेळा एवढंस "चिकन पफ" मागितल्या वर तिने त्रासून म्हटल " सॉरी स',वी आर फिनिश्ड नाऊ, वुड यु लाईक इन वेज ?". "च्यायला आम्ही काय वाघ-सिंह वाटलो का गवताला तोंड न लावायला ?" . "या! प्लिज गेट ईट!! " -मी. आता कुठे दाढीतल्या फटी भरल्या होत्या पण तरी अजुन मागायला तिचं तोंड बघूनच नको वाटल". मग मस्त सिट लांबवलं तंगड्या पुढच्याच्या पायांपर्यंत गेला. मागून कोणी तरी सिट ऍडजस्टक करा असं केकळलं पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून तानून दिली. मध्येच कसली तरी अनाऊंसमेट सूरू झाली म्हणून जाग आली, तर पुन्हा त्याच चिचकुळ्या होस्टेसचं दर्शन झालं.पुन्हा डोळे बळच मिटून घेतले. आताशा थोडं ऊजाडलं होतं. सुर्योदय सुर्यास्त काय असेल माहीत नही पण सुर्य फार लोभस वाटत होता. एक सोनेरी कडा फारच मनमोहक वाटत होता. फटकन मोबाईल स्टार्ट करून २०-३० सेम दिसणारे फोटो क्लिकवले. आता थकवा थोडा दूर झाला होता.शेजारची ध्यानं , गणेशोत्सवाच्या धुमधडाक्यांनतर स्थानिक पूणेकर जशी शांत झोप घेतो, तशा पहूडल्या होत्या. तेवढ्याश्याच जागेत कसं बसं अंग टाईट करून आळस दिला.आताशा पुर्ण ऊजाडलं होतं. खाली निळा प्लेन रंगाचा समुद्र, ढगांच्या छटा लोभस दिसत होत्या, विमानाचं पातं थरथरत होतं,"हे जर आत्ता तुटलं तर ?" -कन्यारास. ईथोपियाला विमान अलगद लँड झालं.

अदीस अबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट (ईथोपिया) :
सकाळचे १०:३०
पहिल्यांदा अफ्रिकन धरतीवर पाय ठेवताना,कोण्या एका पिक्चर मधे अमिताभ ट्रेन मधून जसा मुंबईच्या प्लॅटफॉर्म वर पाय ठवतो तसं वाटून गेलं. (हे फिलींग म्हणजे माझ्या बालपणी जुन्या ब्लॅक&व्हाइट टीवीला केबल पहिल्यांदाच जोडताना आलेल्या फिलींग सारखं वाटलं) ईथोपिया ते युगांडा कनेक्टींग फ्लाईट होती. माझ्यासाठी एक अजुन दिव्य. पुन्हा विचारपूस करत नेक्ट टर्मिनल आणि गेट शोधलं. एव्हाना धीट झालो होतो. २ तास वेटींग होतं. ईकडे तिकडे टाईमपास केला. सगळ्याबरोबर कोणी ना कोणी होतं, मला सगळ्या जगात मीच एकटा आहे असं वाटू लागंल. गर्दीत पण मग एकाकी पणा वाटू लागलं. मग मोबाईल काढला,हेडफोन कानात घुसवला .. आणि एव्हरग्रीन ओल्ड सॉंग लिस्ट प्ले केली...गाणं सुरू झालं
"मेरी भिगी भिगी सी ... पलकों पे रेह गये..जैसे मेरे सपने बिखर के ..
जले मन तेरा भी किसीके मिलनको ...अनामिका तु भी तरसे.........
तुझे बिन जाने ; बिन पेहेचाने.. मैने हृदयसे लगाय......
पर मेरे प्यार के बद्लेमे तूने मुझको ये दिन दिखलाया ............... "
दुपारचे १२:३०
अनाऊंसर : " ऑल पॅसेंजर्स टू एंटीबे आर रिक्वेस्टेड टू प्रोसिड टोवर्डस् गेट नंबर ११ "
तडक ऊठलो, बोर्डींग करताना, पुन्हा कन्यारास कुजबुजली "तुझं लगेज लोड नसलं झालं तर ? " दुर्लक्ष करून मस्त विंडो सिट घेतली, यावेळी शेजारी कोणीच नव्हत.. मग ही फ्लाईट आपल्या तिर्थरुपांचीच आहे अशा अविर्भावात मोकळा बसलो, यावेळी एअर होस्टेस पण जबरा होती नव्हे होत्या , सगळा आनंदी आनंद च होता, यथेछ पफड् एग आणि कोंबडीचा (मराठीत) ऊच्चारता न येणारा पदार्थ ४ वेळा मागून घेतला, आणि तिनेही अगदी गोड चेहर्‍याने दिला,
आणि ईतकी मादक(!) हसली की , एक क्षण "माझ्याशी लग्न करशील का गं, आज आत्ता, ताबडतोब , या ईथे ?" असं विचारावंस वाटलं ...
ऊरलेल्या दाढांच्या खाचा भरल्यावर तरतरी आली.चहा आणि मिल्क केक चापून एक (अत्तृप्तीचा) ढेकर दिला आणि झोपलो आणि ऊठलो ते थेट यूगांडा आल्यावरंच !

एंटीबे इंटरनॅशनल एअरपोर्ट(युगांडा) :
दुपारचे ३:३०
शेवटी ऊतरलो एकदाचा. सुदैवाने बँकेचा (क्लायंट) माणूस "मायकेल" माझ्या नावाची पाटी घेऊन ऊभा होता. व्हिसाला प्रॉब्लेम आला नाही. सगळे त्यानेच केले. चला सुटलो बुआ. आता लगेज साठी कन्व्हेयर बेल्ट पाशी जाऊन ऊभा राहीलो. १० बॅग्स गेल्या ..२० गेल्या ..३० गेल्या ---२० मिनीटे झाली.. कन्यारास-"तुझी बॅग मुंबईतच तर नाही ना राहीली चढवायची ? " टाळक सटकायला लागलं .. नंतर नंतर येणारी प्रत्येक दुसरी बॅग माझीच आहे असं वाटू लागलं, पण ती आधीच कोणी तरी ऊचलून घेत असेल... आआआआआणि शेवटी माझी बॅग सुखरूप हातात आली आणि माझं काळीज पुन्हा छातीत फिट झालं . "मायकेल" माझ्यासाठी चकाचक टोयोटा करोला घेऊन आला होता.
स्वगत ; "मायला! पुण्यात एवढी वर्षे पीएमटी ने कसा प्रवास केला रे आपण? ऑटो करताना ३ जण असून पण किती विचार करायचो ! आणि चक्क करोल्ला ! अर्रे वा !! चला बसा , फुकट आहे !!! फुकट ते (अति) पौष्टीक नाही का ? "
आणि मायकेल ने काही सेकंदात गाडीचा काटा १२० किमी/ताशी वर नेला.

(विमानातुन लँड व्हायच्या आधी जे विलोभनीय (युगांडन) दृश्य मी पाहीले त्याने माझ्या सर्व (दुषित) पुर्वग्रहांना ऊपग्रहा सॉरी धक्का दिला ! ते पुढे ....)

क्रमशः
----------------------------------------------------------------------------कुबड्या खविस (२५-०७-२००८ ००:४५)

टिप : ब्वना : मित्र /दोस्त या अर्थी स्वाहीली मधे

भूजलपातळी आणि त्याचे परिणाम

भूजलपातळीवर आज लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून मला पडलेले प्रश्न परत डोके वर काढू लागले. त्यात लिहिलेल्या काही मुद्द्यांवर मला जास्त माहिती नसल्याने मला तो पूर्णपणे समजून घेता आला नाही. तसा तो समजून घेता यावा आणि त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी यासाठी हा चर्चाप्रस्ताव.

१. शिवकालीन पाणी योजना म्हणजे नक्की काय? आणि ती कशी अंमलात आणतात?
२. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का? अगोदरच जिथे भूजलपातळी खालावलेली आहे तिथे आणिक उपसा झाला तर परिणाम महाभयंकर नाही का व्हायचे?
३. दुष्काळी परिस्थिती कधी जाहिर केली जाते? आणि तशी ती जाहिर झाल्यास पीडीतांना काय 'राहत' देण्याचे प्रयत्न होतात? दुबार पेरणी करणे हे हात झटकावे तितके सोपे काम नाही.. शेतकरी आता यामुळे आत्महत्या करताहेत. माझ्या ओळखीच्यात तसे झाल्याने मला प्रचंड धक्का बसला आहे.
४. नद्या जोडण्याच्या कामाचा मुद्दा मागे पडण्याचे कारण काय?
५. रोगट वातावरण येऊ घातलेय/आलेय असे म्हटले तर अतिशयोक्ती होईल का?
६. आता उभ्या ठाकत असलेल्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल उपायात्मक दृष्टीने आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो?

कौटुंबिक पातळीवर पाण्याचा प्रश्न अत्यंत दारूण झालेला मी स्वतः अनुभवते आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात असल्याने अजून तितकीशी झळ प्रत्यक्ष मला सोसावी लागत नसल्याचे पाहून मला आणखीनच वाईट वाटते आहे. खेडोपाडी राहणारे माझे नातलग/जीवलग ही काय माणसं नाहीत का की त्यांच्या मूलभूत गरजांना शहरी माणसांच्या गरजांपेक्षा दुय्यम स्थान दिले जावे? अर्थात.. हा मुद्दा नंतर पण आधी जर मूळ प्रश्नाला काही पर्याय निघाले तर बरे असे वाटते.

बालपणीचा काळ सुखाचा! १४

माझ्या मोठ्या भावाला मी आणि माझा धाकटा भाऊ दादा म्हणायचो.त्यामुळे हळूहळू वाडीतले इतरही बरेचसे लोक त्याला दादा च म्हणायला लागले. ह्या दादा शब्दामुळे घडलेला हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. कारण आज भाई हा शब्द ज्या कारणाने प्रसिद्ध आहे(गुंड ह्या अर्थी) तसाच माझ्या लहानपणी दादा हा शब्द प्रचलीत होता. म्हणजे घरात दादाचा अर्थ मोठा भाऊ असा होता तरी सार्वजनिक जीवनात दादा म्हणजे नामचीन गुंड समजला जायचा.

हा प्रसंग घडला तेव्हा मी सहावीत होतो आणि दादा आठवीत होता. धाकटा भाऊ तिसरीत होता. गंमत म्हणजे मी आणि दादा जवळपास एकाच उंचीचे म्हणजे साधाराणत: साडेचार फूट उंच होतो. अंगापिंडानेही तसे अशक्तच होतो. मात्र दादा काटक होता आणि लहान चणीचा असूनही त्याच्यापेक्षा थोराड एकदोघांना सहजपणे भारी पडायचा.त्यामुळे वाडीत त्याच्या वाटेला क्वचितच कुणी जात असे. तरीही तो गुंड वगैरे प्रवृत्तीचा नव्हता आणि स्वतःहून कधीही कुणाची खोडी काढणार्‍यापैकी नव्हता. मी मात्र अगदीच लेचापेचा होतो आणि दुसर्‍याला मार देण्यापेक्षा मार खाण्यात जास्त पटाईत होतो. आम्ही तिघे भाऊ आणि आमच्या बरोबरीचे आणखी तीन सवंगडी असे सहाजण मिळून बागेत खेळायला गेलो. बागेत आम्ही सोनसाखळीचा खेळ खेळत होतो.खेळ मस्त रंगात आलेला आणि त्याच वेळी माझ्या वर्गातला पुराणिक नावाचा एक मुलगा त्याच्या दोन मित्रांबरोबर बागेत आला. त्याने आम्हाला खेळताना पाहिले आणि स्वत:ही खेळायची इच्छा व्यक्त केली पण आमचा डाव अर्ध्यावर असल्याने आम्ही त्याला दूसरा डाव सुरु झाल्यावर खेळवू असे सांगितले. थोडा वेळ तो गप्प बसला पण आमचा डाव काही संपेचना तेव्हा त्याचा धीर खचला आणि तो आमच्या मध्ये मध्ये तडमडायला लागला. असे करताना त्याने दोनवेळा मला तोंडघशी पाडले. हे पाहून मी त्याची तक्रार दादाकडे केली. दादा लांब उभा होता त्याला मी हाक मारून म्हटले, "दादा! इकडे ये. हा बघ मला त्रास देतोय."
दादा जवळ आला आणि त्याने पुराणिकला समजावून सांगितले की असे करू नकोस म्हणून तरी पुराणिक काही ऐकेना. तो दादाला उलटून बोलला. अरे-जारेची भाषा बोलायला लागला. पुराणिक माझ्या आणि दादापेक्षा अंगापिंडाने मजबूत होता त्यामुळे तो आम्हाला मुद्दाम त्रास देत होता हे दादाच्या लक्षात आलं. समजूत घालून देखिल पुराणिक ऐकत नाही म्हटल्यावर दादा त्याला म्हणाला,"हे बघ पुराणिक! तू बर्‍या बोलाने ऐकणार नसशील तर मग मला तुला वेगळ्या पद्धतीने समजवावे लागेल."
त्याबरोबर पुराणिक म्हणाला,"काय करणार आहेस तू? स्वत:ला दादा समजतोस काय?"
त्यावर दादा म्हणाला, "त्यात समजायचे काय आहे? आहेच मी ह्याचा दादा!"
त्यावर पुराणिकने त्याला आव्हान दिले आणि म्हटले, "हिंमत असेल तर मला हात लावून दाखव.उगीच टूरटूर नको करूस."
तरीही दादाने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा उलटा परिणाम झाला आणि पुराणिकनेच दादाला ढकलून दिले.
इतका वेळ शांत असलेला दादा भडकला आणि त्याने पुराणिकची कॉलर पकडली आणि एका झटक्यात त्याला खाली लोळवले.पुराणिकला हे नवीनच होते. आपल्यापेक्षा लुकड्या मुलाने आपल्याला इतक्या सहजपणे खाली लोळवलेले पाहून तो चटकन उठला आणि त्वेषाने दादावर चाल करून गेला. दादा सावध होताच. दादा त्याच्या पटात घुसला आणि पुराणिकला त्याने आपल्या डोक्यावर उचलून धरले आणि क्षणार्धात जमिनीवर आपटले. पुराणिकला जागोजागी खरचटले आणि तो अक्षरश: रडकुंडीला आला. त्याने कसेबसे आपल्याला सावरले आणि लांब पळून जाता जाता तो जोरात ओरडला," दादा! आता बघतोच तुला. थांब, मी आता माझ्या दादाला घेऊन येतो आणि तुझा समाचार घेतो." असे म्हणून बघता बघता तो दिसेनासा झाला.
आम्ही सगळ्यांनी जल्लोष केला आणि मग पुन्हा खेळायला सुरुवात केली.

एक दहापंधरा मिनिटांनी पाहतो तो सात-आठ जणांची टोळी घेऊन पुराणिक खरंच हजर झालेला होता. आता मार खावा लागणार हे लक्षात घेऊन आम्ही सगळे घाबरट लोक दादाच्या मागे लपायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हढ्यात त्यांच्यातल्या एक्या टग्याने मला धरले आणि खाली वाकवून माझ्या मानेवर एक जोरदार फटका(चॉप) मारला. (हा चॉप नावाचा फटका त्या वेळी दारासिंगबरोबर फ्रीस्टाईल खेळणार्‍या मायटी चॅंग नावाच्या एका चिनी मल्लाच्या नावाने प्रसिद्ध होता.) त्याबरोबर मी मान धरून खालीच बसलो. असेच एकेकाचे बकोट पकडून त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. दादा मधे पडत होता आणि आम्हाला सोडवायचा प्रयत्न करत होता पण त्यात त्यालाही यश येत नव्हते. शेवटी दादा सोडला तर बाकी आम्ही सगळे धारातिर्थी पडलो हे पाहून त्यातल्या म्होरक्याने दादाला आव्हान दिले आणि म्हणाला ,"अच्छा! तूच काय तो दादा. इतका चिंट्या दिसतोस तरी ही हिंमत? माझ्या ह्या (पुराणिककडे बोट दाखवून)मित्राला तुच मारलेस ना? मग चल आता तुझी दादागिरी माझ्यासमोर दाखव."

हा जो पुराणिक टोळीचा दादा होता त्याचे नाव होते विनायक...पण सगळे त्याला विन्यादादा म्हणूनच ओळखत आणि तो खरोखरीचा दादा(गुंड) होता. मात्र माझा भाऊ ज्याचे नाव विनय...(ह्यालाही वाडीतली त्याच्यापेक्षा मोठी मुले विन्या च म्हणायची) तो केवळ मोठा भाऊ म्हणून दादा होता. तेव्हा आता सामना गुंडदादा विरुद्ध नुसताच दादा यांच्यात होता.विन्यादादा हा टक्कर मारण्यात पटाईत असा त्याचा सगळीकडे बोलबाला होता. खरं तर त्याचे नाव ऐकूनच भलेभले टरकायचे पण माझा दादा कुणाला घाबरणार्‍यातला नव्हता. रेडे कसे टकरा देत लढतात तशा पद्धतीच्या टकरा मारण्यात विन्या प्रसिद्ध होता. तो स्वतःच्या डोक्याने प्रतिस्पर्ध्याच्या नाकावर टक्कर मारून त्याला नामोहरम करायचा. अशा नामचीन गुंडाबरोबर दादाचा सामना होता म्हणजे खरे पाहता सामना एकतर्फी होता. पण माझा दादा अतिशय शांत होता आणि विन्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून होता. बघता बघता विन्या चार पावले मागे गेला आणि क्षणार्धात त्याने पुढे येऊन दादाला टक्कर मारली. दादा सावध होता आणि त्याने टक्कर चुकवली तरीही त्याच्या नाकाला विन्याच्या डोक्याचा निसटता स्पर्श झाला आणि नाकातून रक्त वाहायला लागले. पण त्याच वेळी विन्या समोर जाऊन जमिनीवर कोसळलेला पाहून दादाने त्याला उठायला फुरसत न देता त्याच्यावर तुफान हल्ला केला. त्याला अक्षरश: लाथाबुक्यांनी तुडवले. दादा विन्याला उठायची संधीच देत नव्हता आणि विन्याचे ते इतर साथीदार हतबुद्ध होऊन हा विपरीत प्रकार पाहात होते.आजपर्यंत त्यांच्या दादाने कधी असा मार खाल्लेला नसावा बहुतेक त्यामुळे कुणीच त्याच्या मदतीला येण्याची हिंमत करत नव्हते हे पाहून मलाही जोर आला. मान दुखत होती तरी मी उठून पाठमोर्‍या पुराणिकच्या पेकाटात जोरात लाथ हाणली. माझे बघून आता आमचे इतर सवंगडीही उठले आणि त्यांनी त्या इतर साथीदारांवर जोरदार हल्ला केला. आमच्या ह्या अनपेक्षित प्रतिकाराने ते साथीदार वाट मिळेल तिथे पळत सुटले आणि आता आम्ही सगळ्यांनी मोर्चा विन्याकडे वळवला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग विन्याला अक्षरश: बुकल बुकल बुकलले. शेवटी विन्या निपचित पडला तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. मग विन्याला तिथेच सोडून आम्ही सगळे जखमी वीर आपापल्या दुखापती कुरवाळत,कधी कण्हत तर कधी आपल्याच पराक्रमावर खुश होऊन हसत वाडीत परतलो.

मार खाल्यामुळे,मारामारी केल्यामुळे एकेकाचे अवतार पाहण्यासारखे होते. अशा अवस्थेत घरी जाणे म्हणजे आईचा मार ओढवून घेणे हे आम्हाला पक्के माहीत होते म्हणून आधी आम्ही विहीरीवर गेलो. तिथे स्वच्छ हातपाय,तोंड धुतले, कपडे ठीकठाक केले आणि मगच घरी गेलो. माझी मान तर कमालीची दुखत होती पण सांगणार कुणाला आणि काय? मी आपला तसाच जेवलो आणि गुपचुप झोपलो पण झोप कसली येतेय. मग आपोआप कण्हणं सुरु झालं आणि आईच्या लक्षात आलंच. मग काय झालं म्हणून विचारलं तिने, त्यावर खेळताना पडलो मानेवर असे खोटेच सांगितले.आईने तिच्या हळुवार हाताने तेल लावून मालीश करायला सुरुवात केली आणि मी बघता बघता झोपी गेलो.

बदल तर घडतोय...

टीक-टॉक
टीक-टॉक
टीक-टॉक
ठांग!

लोलक,
जागच्या जागी फिरतोय!

लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
ठक्काक!

मानव,
जागच्या जागीच चालतोय!

ठांग!.
ठांग!!..
ठांग!!!...
तरी ..बदल तर घडतोय...

मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं!
अखंड,
अविरत...
अथक!!
बदल तर घडतोच आहे...

क्षणा क्षणाला..कणा कणाने,
वाढणार्‍या एव्हरेस्ट प्रमाणे!
क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने,
वितळणार्‍या हिमाद्री प्रमाणे!

एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे,
दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे!
एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे...

पुढे..
मागे..
जिथल्या तिथे!
जिथल्या तिथे..
मागे..
पुढे!!!
काळ कधीचा चालतोय!

पुढे.
पुढे..
पुढे...
इथे असा, तिथे तसा!!
बदल तर घडतोय..

एकाच वेळी..
मागे-पुढे..करत-सरत,
कधी थांबल्या सारखा वाटतोय!
तरी..बदल तर घडतोय...

उच्चतम उधाण बिंदूला स्पर्शून,
समुद्र पुन्हा पुन्हा आहोटतोय!
तरी रेषे रेषेने जलधी वाढतोय!!
बदल तर घडतोय...

डंपर डंपर गारबेज खाली,
सागर तळ झाकला जातोय!
पर्यावरण वादाचा आवाजही गुंजतोय!!
बदल तर घडतोय...

कधी मखरात,
कधी मक्त्यात!
आई
बाई
ताई
सई
म्हणत
रुपा रूपाला बघतोय...

दोन हात
दोन पाय
एक डोकं असलेला..
माणसा सारखा प्राणी,
कधी माणूसही वाटतोय!

बदल तर घडतोय...
बदल तर घडतोय...

======================
स्वाती फडणीस .............. १६-०६-२००८

अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन. तसेच या योजनेत सहभागी होण्याबद्दल स्वारस्य दाखवल्याबद्दल आणि सतत पाठपुरावा करून हा मुद्दा आज येथे टंकित स्वरूपात आणल्याबद्दल इनोबा व ऋषिकेश यांचे अनेक आभार.

अपत्य दत्तक योजना


योजनेचे उद्दिष्ट -

  1. सध्या अनाथालयांमध्ये वाढत असलेल्या अधिकधिक मुलांना पालक मिळवून देणे,त्यायोगे त्यांची सामाजिक व शैक्षणिक वाढ,भावनिक स्थिरता आणि कौटुंबिक अनुभव,त्यांचे न्यूनगंडनिवारण
  2. येनकेनप्रकारेण स्वापत्यसुखापासून वंचित राहिलेल्या,कुटुंब नियोजनासाठी तयारी करीत असलेल्या किंवा उत्सुक असलेल्या दांपत्यांस अपत्यसुखाचा आजीवन अनुभव मिळवून देणे

मिपाकरांचे जे कट्टे वेळोवेळी भरतात,तेथे होणार्‍या मौजमजेबरोबरच त्या वेळेचा आणि सदस्यांच्या उपस्थितीचा विधायक,समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग झाल्यास उत्तम या मूळ कल्पनेतून मी ही योजना जन्माला घातली.असे कार्य करण्यासाठीची ही एकमेव योजना नसून एक पर्याय व एक सुरुवात आहे,असे समजूया.

योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे -

  1. यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे.
  2. अशा व्याख्यानात दत्तक दिलेघेतले जाण्यामागची सामाजिक गरज,दत्तक प्रक्रिया,आर्थिक बाजू,कायदेशीर बाबी यांबाबत समुपदेशन व्हावे.
  3. ही माहिती संग्रहित स्वरूपात रचून मिपावर संदर्भासाठी प्रसिद्ध केली जावी. मिपाच्या सदस्यांनी या माहितीचा मौखिक प्रसार करावा.
  4. विवाहोत्सुक उपवर तरुण-तरुणी तसेच नवविवाहित जोडपी आणि मूल दत्तक घेण्यास उत्सुक असणार्‍या जोडप्यांस या योजनेबद्दल माहिती द्यावी.संग्रहित माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल,हे पहावे.
  5. स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव,मुलाचे पालनपोषण - खाणेपिणे,दैनंदिन व्यवहार,शिक्षण,मौजमजा इ. - करतानाचे अनुभव म्हणजे आलेल्या अडचणी,त्यांच्या निवारणासाठी त्यांनी अनुसरलेले मार्ग इ. बाबत मुलाखतवजा कार्यक्रम कट्ट्याच्या वेळी करता येईल.त्यातून मिळालेल्या माहितीचा प्रसार वर सांगितल्याप्रमाणे करता येईल.

मी स्वतः सद्यस्थितीत या योजनेसाठी काय करू शकतो -

  1. जमेल तितक्या माहितीचा संग्रह आणि पुरवठा
  2. संबंधित संस्था व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे संपर्क पत्ते पुरविणे;गरज पडल्यास त्यांच्याशी स्वतः थेट संपर्क साधणे
  3. जी दांपत्ये दत्तकप्रक्रियेतून गेली आहेत,त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी आमंत्रित करणे - त्यांचे संपर्क पत्ते पुरविणे
  4. शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत
  5. या (अति)कच्च्या मसुद्यात वेळोवेळी,गरज पडेल तशी सुधारणा आणि तो राबवण्याबद्दलच्या अधिकाधिक उपयुक्त कल्पना व त्यांची अंमलबजावणी

या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून मुंबईतील एका संस्थेचा व तिच्या संबंधित कार्यकर्त्याचा/पदाधिकार्‍याचा पत्ता येथे देत आहे -
वात्सल्य ट्रस्ट,मुंबई
प्लॉट क्र. १२८५,कांजुरमार्ग पोलीस स्थानकाजवळ
कांजुरमार्ग(पूर्व),मुंबई ४०००४२
फोन.: +९१ २२ २५७८ २९५८
+९१ २२ २५७९ ४७९८
संपर्कः श्री. ए. जी. दामले

श्री.दामलेंचा खाजगी संपर्क पत्ता - जसे त्यांचा भ्रमणध्वनी क्र.,विरोप पत्ता मिळवून येथे द्यायचा प्रयत्न यथावकाश करेनच.

या संस्थेतून दत्तक घेतले गेलेल्या एका मुलीला मी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.त्यामुळे दत्तक घेतले गेल्यानंतर अशी मुले,पालक,त्यांच्यातले रुजू लागलेले नाते,येणार्‍या समस्या इ. बद्दल स्वानुभव आहे.त्यावरून हा प्रकल्प अधिक यशस्वी करण्यासाठी काय काय करावे लागेल,याचा अंदाज येतो आहे आणि त्यासंबंधी प्रकल्पाच्या माध्यमातून काय करता येईल,याचाही विचार चालू आहे. माझी स्वतःची मावसमावसबहीण या क्षेत्रात स्वयंसेवा करते व ती या संस्थेशी संबंधित आहे.तिचा संपर्क पत्ता दुर्दैवाने सध्या माझ्याकडे नसला तरी यथावकाश तोही मिळवायचा प्रयत्न करीन,जेणेकरून जमेल तसे तिच्याशी एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतरही वेळी शक्य असेल तेव्हा बोलता येईल.

ऋषिकेश यांनी पुण्यातील 'अपना घर' या अशाच एका संस्थेबद्दल माझ्याशी बोलणी केली होती.तसेच लहान मुलांची दत्तकप्रक्रिया तुलनेने सुलभ असते;पण कळू लागलेल्या वयातील मुले दत्तक दिलीघेतली जाण्यात प्रामुख्याने काठिण्य असते,असे सांगितले होते.ऋषिकेश,तुम्ही व इनोबांनी मिळून अपना घर बद्दल अधिक माहिती,संपर्क मिळवल्यास व तिच्याशी संबंधित पदधिकारी व कार्यकर्त्यांचे वर नमूद केल्याप्रमाणे आटोपशीर व्याख्यान एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतर वेळी अनौपचारीकपणे आयोजित केल्यास मदत होऊ शकेल.

हा मसुदा परिपूर्ण तसेच अंतिम नाही,याची नम्र जाणीव आहे.तेव्हा त्यात मोलाची भर घालण्यासाठी व सूचना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्याही मदतीतून मिपाच्या सौजन्यातून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी,प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी सर्व मिपाकरांचे स्वागतच आहे.

धन्यवाद.

(उपक्रमी)बेसनलाडू

शर्यत

डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ...
कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो
कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो
कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार
कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार
काही चिकटवत, काही झटकत,
अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत.

धावणारे, धापा टाकणारे,
पाय ओढीत चालणारे,
विजयोन्माद करीत सुसाटणारे,
धक्काबुक्की करीत माजणारे,
स्वत: पडून रस्ता अडवणारे,
दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे,
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत
कोणाकडेच वेळ नाही
ना पडलेल्याला सावरायला
ना कोणाकडे बघायला
समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही
वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही
सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर

थांबला, संपला
पडला, तुडवला
धीमा, मागे टाकला
सुसाटला, चमकला
धक्का मारला, पुढे गेला
धक्का खाल्ला, चरफडला

आंधळ्या शर्यतीतले मुसाफीर
जाडे रोडे मोठाड लहानगे ऊंच ठेंगणे उंदीर
काळे गोरे भुरे लाल पिवळे हिरवे उंदीर
हिंस्त्र हळवे भुरटे फसवे दयाळू लाजाळू घाबरट बावळट शहाणे वेडे उंदीर
लंगडे आंधळे बिनपायांचे दहा पायांचे कुबडीवाले सायकलवाले मोटरवाले पॅरॅशूटवाले
सूट्वाले धोतरवाले लुंगीवाले साडीवाले नागडे उघडे
पुष्ट तुष्ट रोगी योगी धोंगी भोगी
इतःस्ततः आणि पुढेपुढे धावणारे उंदीर
सगळ्यांचे एकच कर्म.
डोंगराला वळसे घेत चढ उतार करणारा रस्ता कापीत पळायचे
समोरच्याच्या आणखी समोर जायचे
मागच्याला आणखी मागे टाकायचे

ह्या भाउगर्दीत कधी चुकूनमाकून
एखादा उंदीर थबकतो.
दरीच्या पायथ्याशी झुळझुळ वहाणारा निर्झर,
डोळे भरून बघतो.
पाण्यात पोहणारे बदकांचे कुटूंब त्याला बोलावते.
आणि अचानक.............

उंदीर एकला वेडा, तोडूनी बेडी,
मारली उडी अशी वेडी.....

पोफळीत रंगलेल्या गप्पा

पोफळीत रंगलेल्या गप्पा
कोकणातल्या सफरीतील मला सदैव स्मरणात रहातील असे जे काहि लोकं भेटले त्या मधे नानू सुर्वे हा वल्ली. त्याची आणि माझी भेट अगदी आकस्मिक झाली.. मी पंताच्या ओसरीवरच्या झोपाळ्या वर आरामात बसलो होतो.. आणि ह्या इसमाच्या एका विशिष्ट बोलण्याच्या पध्दति मुळे माझं लक्ष ह्याच्या कडे गेलं..
मी पंताना विचारलं का हो पंत हा कोण इसम आहे इतक्या शिव्या देत बोलणारा ? अस्सल कोकणी शिवी देत पंत म्हणाले शिंचा एक नंबर चा डांबीस आहे.... आपल्या समोर हा गडी लोकांना शिव्या देइल आणि नंतर त्यांच्या कडुन फळं नीट उतरवली नाहित, आज पैसे नाहित नंतर बघु, असली कारणं देत त्यांना लुबाडेल.
आता पंतां सारख्या एक नंबरच्या डांबीस माणसाने ज्याला "डांबीस" म्हणले आहे.. म्हणजे ह्या माणसात नक्की काहि तरी असणार हे मी जाणलं आणि ठरवलं वेळ काढुन ह्याला गाठायचंच.
आता हे पंत आणि ह्यांचा इतिहास असा कि हा पंचक्रोशीत सर्वात लबाड आणि डांबिस माणुस म्हणुन प्रसिध्द. अगदि स्वतः च्या भावांना हि ह्याने प्रॉपर्टि च्या मोहा पाइ देशो धडि ला लावलं असा हा महाभाग. लखपति, हजार एक कलमं , नारळ पोफळी , जमीन वैगेरे सगळं मुबलक. ह्यांचे मुख्य काम म्हणजे दिवस भर आराम, लोकांना शिव्या देणे आणि लुबाडणे. ह्यांच्या आसपास च्या सर्व लोकांना ह्यानी एकदा तरी "इंगा" दाखवला आहे. पंत हे कोणाचे हि कौतुक करत नाहित.. स्वतः बद्दल ह्यांना एक वेगळाच अभिमान आहे. आता ह्या उतरत्या वयात जेव्हा लोकं देवा-धर्मा चे करतात, आपला गर्व बाजुला ठेवुन जुळवुन घेतात , तिथे पंत अजुन हि "मोडेन पण वाकणार नाहि" हा तोरा कायम ठेवुन आहेत. त्यामुळे ह्यांच मुलगा व बायको शी पटत नाहि हे दिसुन येते. मुलगा हि "रत्नाग्रीस" काहि नवा धंदा टाकुन वेगळे बिर्‍हाड करण्याच्या विचारात आहे. असो.
तर अशा ह्या पंतानी ज्याला डांबीस असे संबोधले अशा नानू ला गाठायचे असे ठरवुन मी पहाटे पोफळीतुन समुद्रा कडे गेलो. मला कल्पना होती कि नानू मला सकाळचा नक्की भेटेल.. खेकडे, मासे आणि कोळीणी असतील तीथे नानू भेटण्याची शक्यता मला जास्त वाटली. आणि तशी भेट झाली हि !
आता हा नानू म्हणजे काहि साधा प्राणि नाहि हे मला त्याच्या गॉगल वरुन समजलं.
काय कसं काय ? बरय वैगेरे औपचारीकता झाली आणि नानू नी मला सरळ प्रश्न केला.. काय मासे बीसे खाता कि नाहि ? अहो आमच्या समोर लाजु नका. आम्हाला त्या तिकडचे माहित आहे हो.. आम्हि हि इन्ग्रजी सिनेमे बघतो म्हणलं.. कसे ?
पंताच्या कडे येणारे तुमचे सगळे लोक माझ्या कडेच येतात हो जर "काहि" हवं असेल तर. आहो कसले जानवे आणि कसले काय.. हे कलियुग आहे महाराज. नानू नी त्याच्या मैत्री पुर्ण हास्या चा फायदा काहि "गिर्हाइक" सापडतय का हे चाचपण्यात केला !
मी उगाचच ओशाळल्या सारखा.. नाहि नाहि तसलं काहि मी खात नाहि हो नानूराव.. मी आपला सहज फिरतो आहे समुद्रा वर. मी काहि तसलं खात पीत नाहि !
बहुतेक नानू ला माझ्यातला प्रामाणिक पणा पटला असेल.
"अहो तसे नाहि.. तुम्हि बारा देश फिरलेली माणसं.. तुम्हाला काय हवं नको हे विचारायचे आमचे कर्तव्य नाहि का ? तसं मला वाटलं होतंच तुमच्या कडे बघुन कि तुम्हि काहि खात पीत नसणार म्हणुन." नानू नी सारवा सारव करुन टाकली.
"चहातरी पीता ना ? " हो तर
मग चला कि घोट भर घेवु आमच्या पोफळीत.. अहो आमची फोफळी म्हणजे अगदि "एअर कंडिशन" आहे.. खुर्ची टाकुन बसलात कि हि खाडि आणि समुद्र दर्शन तुम्हाला तुमच्या त्या " रेझॉर्ट " सरख वाटेल.. पण हो ते तसले काहि "बिच व्यु का बे वॉच का काय म्हणतात ते..." तसलं काहि नाहि हो आमच्या पोफळीत , एक डोळा मीचकावीत नानू म्हणाला !

नानू ची नारळ-पोफळी ची बाग अगदी समुद्रा ला खेटुन आहे. त्याचं ह्या पोफळीवर एक प्रकारचे प्रेम आहे हे त्याच्या वागण्या बोलण्या वरुन समजलं. माझ्या साठी एक आणि स्वतः ला एक अशी आराम खुर्ची घेवुन नानू आला आणि माझ्या साठी सुंठेचा चहा स्वयपाकघरात सांगितला गेला. खुर्ची वर बसुन मी ती समुद्राची शांत आणि गंभिर आभा अनुभवत होतो. पोफळीतील झाडांमधुन वहाणारा वारा एक मंद संगित- नाद करत होता.... खरच अशी पोफळी कोकणात कुठे नाहि .. मी नकळत म्हणुन गेलो...
नानू लहान मुला सारखा लाजला.. अगदी मनापासुन त्याला माझी दाद आवडली हे त्याच्या हालचालीं वरुन समजलं.
तुम्हि साखर घेता ना चहात ? मला जरा जास्त साखर लागते चहात. त्याचे काय आहे दिवसभर गडि माणसांना शिव्या देयच्या असतात.. म्हणुन सकाळी एकदा भरपुर साखरेचा चहा लागतो मला.. .. नानू मला काहि बोलु देत नव्हता हे मला लक्षात आलं .. बहुतेक त्याला काहितरी सांगायच होतं .. माझ्याशी खुप बोलायचं होतं हे मला जाणवलं. एका विषया वरुन दुसर्या विषया वर तो जात होता पण मला बोलु देत नव्हता.
मी हि ठरवलं.. आपण नुसतं ऐकत रहायचं .. मधे मधे नानूराव तुमचं बरोबर आहे.. आजकाल तुमच्या सारखी विचार करणारी लोकं नाहित हो .. वैगरे वैगरे चाव्या मारण्या पलीकडे नानू माझं काहि ऐकण्या साठी थांबत नव्हता !
खरं तर मला अशी लोकं आवडतात... त्यांना खुप काहि बोलायचं असतं .. प्रत्येक विषया वर त्यांचं काहि तरी मत असतं.. मी अशा लोकांना नेहमी "चावी मारतो". हि माझी सवय आहे. ह्यातुनच मला अनेक मित्र सापडले आहेत. भटकंती मधील खरी माणसं आणि आनंद मला अशा गप्पांमधेच जाणवला आहे !
नानू माझ्याशी येवढ्या मोकळेपणाने का बोलतो आहे हे मला कळत नव्हते. तशी आमची ओळख काहि तासांची सुध्दा नव्हती. आमच्या गप्पा अनेक विषयांवर झाल्या.. जमीनीचे भाव, कोकणातील पिकं, रस्ते, जाती-जातियवाद, राजनीती, दाभोळ पॉवर प्लान्ट, स्मगलींग, स्मगलर्स, दाउद व त्याचे नातेवाइक, आजकालच्या बायका... बायका... नानू च ज्ञान आणि चातुर्य ह्या सर्व विषयांवरील त्याच्या स्वतंत्र मतांतुन जाणवलं.
त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा ओलावा आहे हे समजलं. कुठेतरी दु:ख लपलेलं आहे हे हि जाणवलं. म्हणुन मी सहज म्हणालो. .. नानूराव तुम्हि खुप छान बोलता .. अगदी ऐकत रहावसं वाटत... बोलता बोलता तास कधी गेला ते कळाले नाहि..
ह्यावर नानू एकदम म्हणाला.. तुम्हि ते नानूराव सोडा आणि नानू वर या.. आता आपण परके का आहोत ? आणि तुम्ही म्हणता मी छान बोलतो.. पण आमचं ऐकतो कोण इथे ? अहो ऐकायला माणसं आहेत कुठे इथे ?
तेव्हा, जर कोणी तुमच्या सारखा शहरातला आलाच इकडे तर त्याच्या कडे मन मोकळं करतो. कालच तुम्हाला बोलवणार होतो पण म्हणलं तुम्हि पंतां कडे आला आहात म्हणजे शिष्ट असणार.. उगाच कशाला कपभर चहा वाया घालवा? मिस्किल हास्य करत नानू म्हणाला.
नानू ला एक मुलगा आहे आणि तो शहरात रहातो हे बोलण्यातुन समजले. त्याने एका क्रिश्वन मुली बरोबर लग्न केले आहे हे सुध्दा नानू बोलुन गेला. दोघांना पुढे बाहेर देशात "कॉम्पुटर कंपनी" पाठवणार आहे ,ह्यात नानू ला आनंद असला तरी ... इतकी शेती, कलमं,नारळ, पोफळी पुढे बघायला कोणी हि नसल्याची खंत नानू च्या बोलण्यात जाणवली.
चला निघायला हवं.. नानू राव पुढच्या वेळेला आलो की वेळ काढुन येइन तुमच्या कडे.
नानू राव नाहि आधी नानू म्हणा.. आणि हो "आलो कि" नाहि नक्कि या नाहि तर तुम्हि भ*****, त्या राणिच्या देशात भो****... ###### आणि जाल ह्या नानू ला विसरुन . . जोरात हसत मिठिमारत नानू म्हणाला.
नानू नी दिलेल्या शिव्यां वरुन माझी खात्री पटली कि मी आता नानू च्या आतल्या गोटात सामील झालो आहे..
पंतांच्या गावाला आलेला मी.. नानू च्या गावाला निरोप देउन निघालो...
नानू सारखी माणसं काहि क्षणात मला आपलेसे करुन घेतात. बहुतेक अशा माणसांना शोधायला आणि भेटायलाच मी भटकंती करतो. काटेरी फणसाला चीर जावी आणि त्यातुन बाहेर पडणारा गोड रस आणि गर चाखायला मिळावा तसा अनुभव मला नानूच्या पोफळीत ल्या गप्पां मधे आला !

पानी तेरा रंग कैसा?

"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा
पण त्यातलाच प्रकार असावा."

मी आणि प्रो.देसाई तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो.समोरून दोन उमदे तरूण येताना पाहिले.त्यात प्रो.देसायांचा नातू होता हे नक्की समजलं.पण दुसरी व्यक्ति कोण हे ते दोघे जवळ यई पर्यंत कळलं नाही.नंतर समजलं तो त्याचा मित्र होता.
ह्या पुर्वी भाऊसाहेबांच्या नातवाने देवाचं अस्तित्व तो कसा मानतो,त्यावर एकदा तळ्यावर ह्याच जागी सुंदर लेक्चर दिलं होत.हा त्याचा मित्र मात्र अगदी विरोधी मताचा आहे तो देवाचं अस्थित्व मानत नाही आणि त्याचे त्याबद्दल काय मुद्दे आहेत ते समजावून सांगण्यासाठी त्याला आमच्याकडे घेवून आला होता.
प्रो.देसाई मला म्हणाले,
"माणसाच्या डोक्यात विचार येतात ती एक ईश्वराची- किंवा वाटलं तर निसर्गाची म्हणा- निर्मिती आहे.ह्या तरूण मुलात अनेक प्रकारची निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते.कुठलेही मुलभूत शोध अशाच वयावर लागले आहेत.ही एक प्रकारची देणगी आहे.
बघुयातर खरं काय ह्याचे मुद्दे आहेत ते"
मी म्हणालो,
" आपण अवश्य ऐकू या"

"देवाचं अस्थित्वच नाही असं मला वाटतं.मी नास्तिकाच्या पुढे गेलो आहे.देवावर ज्याचा विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणतात.देवावर विश्वास न ठेवणं हे सोपं आहे.जे नसतंच ते आहे म्हणून कसं शाबित करावं. म्हणजे निगेटिव्ह कसं पृव्ह करायचं?माझ्या खोलीत हत्ती नाही हे आपण कसं शाबित करणार?
हत्ती हे एक उदाहरण म्हणून मी घेतलं. हत्ती ऐवजी चमत्कार हे उदाहरण घ्या,किंवा वरून आलेला आवाज हे एक हवं तर उदाहरण घ्या,त्याचं अस्थित्व कसं सिद्ध करायचं.?
ह्याचा अर्थ असा की ज्याला सत्यावर प्रेम आहे,त्याला प्रथम देवच नाही अशी समजूत करून घेवून मगच देव आहे का ह्या साठी शोधण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे.त्या अगाध शक्तिचा साक्षातकार होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्यामुळे देवाचं अस्थित्वच नाही असं समजणं फार सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
"माझा देवावर विश्वास आहे" असं एखाद्याचं म्हणणं असल्यावर त्याच्या ह्या वयक्तिक विचारसरणीचा उहापोह जास्त केला जाण्याची अपेक्षा असते.त्याच्या श्रद्धेची झेप पाहून त्याच्या आयुष्याचं चित्र जास्त स्पष्ट करून घेण्याची अपेक्षा असते.कारण ही श्रद्धा त्याच्या जीवनाला मार्ग दाखवत असते.
म्हणून मी म्हणतो की "मला वाटतं देव नाही" अशा विचाराचं पाऊल घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात मला क्षणो क्षणी स्मरण करून दिलं जातं की मी आप्प्लपोटा नाही,माझं मन प्रेमाने भरलेलं आहे,मी संतुष्ट आहे.जीवनात माझ्या उपलब्धेतही मी संतुष्ट आहे.जे अदृष्य आहे त्याची हाव असणं बरोबर नाही. केवळ प्रेमापोटी मला माझ्या कुटुंबाने वर काढलं आणि तशाच प्रेमापोटी मी जे कुटुंब वर काढतोय ह्यात मी तृप्त आहे.मला त्यासाठी स्वर्गाच्या उपलब्धीची जरूरी भासत नाही. आहे त्यातच मी पुर्ण सुखी आहे.

देवाचं अस्थित्व नाकारल्याने मी थोडासा लोकांच्या मनातून खपा होईन.कदाचीत मला त्यांच्याकडून दयेची प्राप्ती होईल.तर मग हे चांगलंच होईल.इतरांच्या विचारसरणी बद्दल मी जागृत राहिन.जणू पहिल्यांदाच भेटत आहे अशा अविर्भावात इतरांशी संबध ठेवीन.
देवाच्या अस्थित्वार विश्वास न ठवल्याने माझंच फक्त एकट्याचं अस्थित्व जगात असावं असा विचार करण्यापासून मी परावृत्त होईन.निरनीराळ्या लोकांकडून निरनीराळ्या संस्कृतीबद्दल मला नव्याने शिकता येईल.
देवाशिवाय,विचारकरून समोर दिसणाऱ्या सत्य परिस्थिती बद्दल एकमत होईल.आणि माझं कुठं चुकतं ह्याचं मला परिक्षण करता येईल.एकमेकाला समजावून घेण्य़ाच्या वृत्तीने एकमेकाशी संवाद ठेवता येईल.

"माझी श्रद्धा आहे,आणि मी ती माझ्या अंतरात ठेवली आहे,आणि कुणी काही सांगितलं किंवा कुणी काही केलं तरी माझा ह्या श्रद्धेवरचा विश्वास हलणार नाही."
असं म्हणणं म्हणजे थोडक्यात माझ्या सारख्याला, "गप्प बस मला तुझं काहीही ऐकायचं नाही."
असंच सांगितल्या सारखं आहे. पण असं म्हणणाऱ्याच्या भोवऱ्यात मी सापडणार नाही.हे असलं बोलणं हे वळणं वळणं घेवून धार्मिक संस्कारातून बोलल्या सारखं होतं.

देवाचं अस्थित्व नाकारण्याने मला माझा विचार जर चुकिचा आहे हे सिद्ध करून दाखवायचं झाल्यास त्या माझ्या प्रयत्नात मी बरंच काही शिकून जाण्यात आनंद मानतो.
कुटुंबात निर्माण होणारी अगणित दुःख,नव्हे तर जगातच होणारी ही दुःख ही त्या अंतरज्ञानी,सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्तिमुळे होत आहेत आणि अशी ती शक्ति आम्हा पामराना मदत करण्याचा साधा विचार करण्याचं सोडून उलट ही शक्ति आपली परिक्षाच घेत आहे अशी समजूत करून घेवून जगत राहिल्यास कदाचीत एकमेकाला मदतीची जरूरी असली तरी ती करण्या पासून एकमेक वंचित होतो.
अशा ह्या देवाच्या अस्थित्वाचा विचार आणून जास्त दुःखी होण्या ऐवजी त्याचं अस्थित्व न मानण्याने जास्त त्रास करून घेण्यापासून सुटकाच होते असं मानावं लागतं.
देवाचं अप्रत्यक्ष अस्थित्व न मानल्याने माझं कुटुंब,माझे इतार सहप्रवासी,प्रेम,सत्य,सुंदरता आणि अशा अनेक सभोवताली असलेल्या गोष्टीचं प्रत्यक्ष अस्थित्व-रियालिटी- असल्याचं पाहून हेच जीवन जास्त सुखकर आहे असं वाटून माझ्या मनाला बरं वाटतं."
हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात विचार आला,
" हे काय तो म्हणतो त्याला पण काही तरी अर्थ आहे.इट हॅझ सम सेन्स."
मी त्याला म्हणालो,
"ज्ञान निर्मितीच्या क्रियेमधे जसं तू पहाशिल तसं तुला दिसत जातं.शास्त्रिय जगात एका पद्धतीत विचार करून मुलभूत शोध लागून ते शोध जवळ जवळ स्थापित झालेच आहेत असं समजून जाता जाता परत तेच शोध दुसऱ्या पद्धतीने विचार करून तेव्हड्याच हिरिरीने स्थापित करून दाखवले गेले आहेत.निसर्गाकडे ज्या दृष्टीने तू पाहशिल तसाच तो तुला दिसत राहतो.हिच तर त्याची खूबी आहे.
देवाचं अस्थित्व आहे आणि देवाचं अस्थित्व नाही हा
पण त्यातलाच प्रकार असावा."
एव्हडं बोलून झाल्यावर आम्ही सर्व घरी जायला निघालो.

श्रीकृष्ण सामंत