तृषा
चमचमणारी चांदणी
मला व्हायचीच नाही,
काळ्याकुट्ट रात्री
ती चंद्राशिवाय
एकटीच झुरत राहते...
पहाटेची उषा
मला व्हायचीच नाही
विखुरलेल्या किरणांनी
सूर्य हट्टाने
तिला होरपळतो...
रंगीत फुलपाखरू
मला व्हायचेच नाही
कोमल फुलाला
नकळतही टोचून
बढेजाव मिरवायचा नाही...
मला व्हायचंय नदी...सरिता...
खळखळ मधूर नादात
अस्तित्व माझं जपतं
तुझ्या कुशीत शिरणार आहे
नदी-समुद्राच्या मिलनात
तू माझा समुद्र होशील ना..
तिथे तृषा विरेल
बहरेल अंतरंग गहिरे
-भक्ती