निसर्ग

पुनवेचं चांदणं

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
10 Feb 2021 - 7:17 pm

पुनवेचं चांदणं उतरलं अंगणी
अंधार गेला शुभ्र रंगात न्हाऊनी
हरवून गेलं झाडांचं हिरवं रूप
पाखरांच्या डोळ्यात भरली झोप
गगनाच्या भूमीत तारे पेरले
रातराणीचे हृदय हळूच फुलले
वाऱ्याचे पाऊल देई चाहूल
उजळले रानात काजव्याचे फूल
नभात साऱ्या मोहरला चंद्रप्रकाश
धरती सजली काळोखाचे तोडून पाश

कवितानिसर्ग

आमंत्रण

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Jun 2020 - 8:45 pm

ओथंबल्या आभाळाला
स्वप्न हिरवं पडलं
त्याच्या दिठीत मावेना
तेव्हा धरतीला दिलं

वीज झेलण्या झुरतो
माथा बेलाग कड्याचा
कुरणांच्या पटावर
आज डाव पावसाचा

रिमझिमत्या ढगाच्या
पैंजणांची रुणझुण
सृजनाच्या सोहळ्याचे
ओलेचिंब आमंत्रण

कवितानिसर्ग

चक्र

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 May 2020 - 12:08 pm

झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर

सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर

तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार

धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर

नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार

प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर

कवितानिसर्ग

हो मनुजा उदार तू ..

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
1 May 2020 - 10:50 am

निसर्गाने सूक्ष्म हे
दैत्य असे सोडले
अहंकारी माणसा
गर्व सारे तोडले

धूर हा हवेत रोज
नदीत जहर सांडले
प्रतिशोध हा असेल
तुला घरात कोंडले

उपसलेस बहुत तेल
गिरी अनेक फोडले
सजेल ही धरा पुन्हा
तव हस्तक्षेप खोडले

विकास नाव देऊनी
वृक्ष अमाप छाटले
दुःख ते अपार किती
वसुंधरेस वाटले ?

मोडलेस घर त्यांचे
नांगर थेट फिरवले
झुंजलेत पशु त्यांना
हिंसक तूच ठरविले

शिक आता दिला धडा
जरा तरी सुधार तू
देई स्वार्थ सोडुनी
हो मनुजा उदार तू

करोनानिसर्गकविता