हा उन्हाचा गाव आहे.
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे
का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे?
पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा
चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.
शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो?
का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे?
जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली
पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.
लाच घेऊनी अता विकती इमान आपुले
जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे.
हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा
का मनाने येथली ही गोठलेली माणसे?