प्रेषित
भौतिकशास्त्रातील जटिल भानगडींनी भंजाळून जायचो
तेव्हा आइन्स्टाईन एक अप्राप्य आदर्श
-नव्हे प्रेषितच- वाटायचा
मग एकदा
लोबाचेव्स्किच्या भन्नाट भूमितीने
युक्लीडच्या भारदस्त भूमितीला
जिथे फाट्यावर मारले
तिथे
अगदी तिथेच
पिंजारल्या पिकल्या केसांचा
मिश्किल म्हातारा उपटला.
म्हणाला," अरे ठोंब्या,
भौतिकीतील न्यूनत्व सावरणाऱ्या
सापेक्षतावादाची पुरेशी पुंजी
माझ्या गाठीशी असूनही
पुंजवाद पचनी पडलाच नाही माझ्या
अन् शिवाय
UFT(#)च्या गाठोड्याची गहन गाठ सोडवूच शकलो नाही शेवटपर्यंत"