पश्चिमाई
पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई
शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई
विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या
भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई
चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही
खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई
बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही
सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई
कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन्
भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई
- कुमार जावडेकर
(अलीकडेच 'पश्चिमाई' हा ब्लॉग (त्रैमासिक स्वरूपात) आम्ही यु.के.त सुरू केला. त्याच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली ही गझल.)