प्लॅनेटरी अलाईनमेंट: सोशल मीडियाची कमाल!
नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून सतत एक मॅसेज व्हायरल होतोय की, २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेमध्ये येणार आहेत, खूप अभूतपूर्व दृश्य असेल वगैरे. काही वेळेस तर त्याचे फोटोज- व्हिडिओजही व्हायरल होत आहेत. अनेक जणांना त्यावर उत्तर दिल्यानंतर शेवटी हे लिहावसं वाटलं. वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी तो कंटेंट बनवणार्यांचं खरंच कौतुक! अगदी सगळीकडे तो मॅसेज गेलेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपर्यंतही! भले तो मॅसेज चुकीचा असला तरी त्या निमित्ताने लोक आकाश बघणार आहेत, ग्रह शोधणार आहेत, हेही नसे थोडके! असो!
तर आज २५ जानेवारीला सगळे ग्रह एका रेषेत अजिबात नाही आहेत. आणि जर मुळात सगळे ग्रह एका रेषेत आले असते तर पृथ्वीवरून बघताना बुध व शुक्र तर सूर्याच्या अलाईनमेंटमध्ये असल्याने दिसणारच नाहीत. पण शुक्र तर सुंदर दिसतोय आणि दुर्बिणीतून त्याची कोरही खूप छान दिसते आहे. आणि सगळे ग्रह एका रेषेत आले असते तर मंगळ- गुरू- शनि- युरेनस- नेपच्यून ह्यांची प्रतियुती (ओपोझिशन) असायला हवी होती. शनि व नेपच्यून तर आकाशात बघताना सूर्याच्या दिशेला (पलीकडच्या बाजूला) आहेत, गुरूची प्रतियुती डिसेंबरमध्ये झाली, तो आता संध्याकाळी आकाशमध्याजवळ दिसतो व मंगळाची प्रतियुती नुकतीच झाली. युरेनसही दुर्बिणीतून संध्याकाळी आकाशमध्याजवळ दिसतो. बूध तर सूर्याच्या पूर्वेला आहे, आत्ता विजिबल नाहीय. थोडक्यात सगळे ग्रह असे वेगवेगळ्या बाजूला आहेत. (२० डिसेंबर २०२० रोजी गुरू व शनि एकमेकांच्या जवळ आले होते, त्या अनुभवाबद्दल माझा ब्लॉग)
मग हा मॅसेज इतका कसा पसरला? तर त्याचं कारण इतकंच आहे की, बूध वगळता सगळे ग्रह आज रोजी संध्याकाळच्या आकाशात विजिबल आहेत. अंधार पडल्यानंतर बूध वगळता सगळे ग्रह तांत्रिकदृष्टीने विजिबल आहेत. पण ते खूप लांब आहेत. त्यात शनि थोडा अवघड आहे. युरेनस व नेपच्यून टेलिस्कोपने प्रयत्नपूर्वक दिसतील. शुक्र, गुरू व मंगळ मात्र अगदी सहजपणे न चुकता दिसतील. अंधार पडल्यावर पश्चिमेला शुक्र, पूर्वेला लालसर मंगळ व आकाशमध्याजवळ गुरू हे दिसतील. शुक्राच्या खाली किंचित दक्षिणेला अंधुक शनि दिसेल.
आणि आकाशामध्ये धुमकेतू, ग्रहण, युती, उल्कावर्षाव अशा घटना अधून मधून घडतात. पण जेव्हा त्या घडत नसतात, तेव्हाही आकाश नितांत सुंदर आणि आश्चर्यकारक असतंच! तेव्हाही अनेक गोष्टी बघण्यासारख्या असतातच. तेव्हा भले चुकीचा मॅसेज लोकांपर्यंत आला असला तरी त्या निमित्ताने मुलं आकाश बघत आहेत हे चांगलंच आहे. माहितीच्या युगामध्ये फक्त माहितीवर अवलंबून न राहता स्वत:च्या अनुभवाचा आधार मात्र घेतला पाहिजे. अजून तीन- चार महिने आकाश दर्शन चांगलं करता येईल. आकाशातल्या गमती बघता येतील. त्या आकाशातच बघण्यासाठी व मुलांनाही आकाशातच दाखवण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत लेख शेअर करू शकता. माझ्या ब्लॉगवर माझे आकाश दर्शनाचे अनुभव वाचता येतील. त्यासह तिथे ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान इ. बद्दलचे माझे लेख वाचता येतील. निरंजन वेलणकर ०९४२२१०८३७६. लेख लिहील्याचा दिनांक २५ जानेवारी २०२५.)
प्रतिक्रिया
उत्तम माहिती.
माहिती बद्दल धन्यवाद
मी आपणास व्य नि करणार होतो.
पंचवीस जानेवारी...
पण आकाश दर्शन app वर तर बरोबर दाखवायला हवे ना?
गफलत गजहब
धन्यवाद!
तुमचं बरोबरच आहे, पण बातमी