पल्स ऑक्सीमीटरचे गमभन
कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले.