इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 9:54 am

(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

(प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. )

जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले. एप्रिल २०२०च्या मध्यानंतर हा आजार भारतात सर्वत्र पसरला होता.

या आजारात कोविड विषाणू हवेतून तसेच स्पर्शामधून पसरत असत. त्या काळात या आजारावर कोणतेच औषध तसेच लस उपलब्ध नव्हती. लाखो लोक या आजारामुळे जगात दगावले. अनेक देशांनी आपल्या देशांतील सार्वजनिक व्यवहार अनेक महिने बंद ठेवले होते. जगभरातील विमानसेवा ठप्प होती. इतकेच नव्हे, तर अनेक गावेच्या गावे एकमेकांपासून विलग केलेली होती. प्रशासनाच्या परवानगीविना कोणीही व्यक्ती दुसर्‍या गावात प्रवेश करू शकत नव्हती. भारतातदेखील प्रशासनाने जिल्हाबंदी, गावबंदी असे उपाय अंमलात आणले होते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर रुमाल किंवा मास्क लावणे सक्तीचे होते. दोन व्यक्तीत कमीत कमी तीन-चार फुटांचे अंतर राखावे, अशी अपेक्षा होती. कोरोना विषाणू स्पर्शाद्वारे पसरत असल्याने हात सॅनिटायझरने किंवा साबणाने वरचेवर धुवावे, असे वारंवार सांगितले जात होते.

त्या कालावधीत होणार्‍या परीक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग घेणे चालू केले होते. त्या वर्गात दहावी-बारावीसारखे मोठे वर्ग तर होतेच, तसेच अगदी बालवाडी, पहिली-दुसरीचेही वर्ग होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींना नवे तंत्र शिकणे, इंटरनेटचा अभाव, मोबाइइल, लॅपटॉप आदींची अनुपलब्धता अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर मात करत अनेक ठिकाणी शिक्षण चालू झाले होते.

त्या काळात कामगारवर्गाचे फार हाल झाले. लॉकडाउनमुळे कित्येक कारखाने चार महिने बंद होते. अनेक व्यापारी दुकाने बंद पडली. कित्येकांनी आपले व्यवसाय बदलले. कारखान्यातले कामगार, मजूर आदी आपापल्या गावी परतू लागले. रेल्वे, बस सेवा बंद असल्याने कित्येक कामगार आपल्या कुटुंबाबरोबर पायी आपल्या गावी जात असणारे चित्र रस्त्यावर दिसत होते. अनेक जणांनी रस्त्यातच प्राण गमावले. कित्येकांचे पगार होत नव्हते किंवा त्यात कपात केली जात होती. आर्थिक कुचंबणा होत होती. बाजारपेठेत पैशाचे चलनवलन थांबलेले होते. भारतातच नव्हे, तर अनेक विकसित देशांतही परिस्थिती काही निराळी नव्हती.

ऑगस्ट २०२० महिन्यात सार्वजनिक व्यवहार साधारणपणे चालू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. त्यामध्ये सुरुवातीला काही बाजारपेठा सम आणि विषम पद्धतीने चालू करणे, मोठे मॉल्स बंद ठेवणे, चित्रपटगृहे बंद ठेवणे, हॉटेल व्यवसाय बंद, बस सेवा चालू जरी असली तरी त्यात ई-पास आणि दोन प्रवाशांमध्ये अंतर राखणे आदी पद्धती अवलंबल्या गेल्या.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यू.एच.ओ.ने या आजाराविषयी विश्वासार्ह माहिती देण्याचे काम केले नव्हते. त्यांच्या वेळोवेळी प्रसारित होणार्‍या बातम्यांबद्दल दुमत व्यक्त केले जात होते. जगात चीन देशानेच हा आजार मुद्दाम तयार केला आणि पसरवला, याविषयी मत बनत चालले होते. अमेरीकेसहित अनेक देशांनी याबाबत चीनविरुद्ध उघड भुमिका घेतल्याने जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंभरठ्याच्या दिशेने जात आहे की काय, अशी शंका वेळोवेळी येत होती. संपूर्ण जगाचे राजकारण कोरोना या आजाराभोवतीच फिरत होते.

अनेक देशांतील औषधे निर्माण करणार्‍या किंवा संशोधन करणार्‍या संस्थांनी या आजारावर प्रतिबंधक लस निर्माण करण्याचे संशोधन सुरू केले होते. त्यात यश मिळण्याचे प्रमाण मात्र अगदी नगण्य होते. ऑगस्ट २०२० महिन्याच्या मध्यावर रशिया देशाने सर्वप्रथम कोरोना आजारवरची लस बनवल्याचे आणि ती लस बाजारात आणल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु या लसीच्या यशाबाबत बरेच देश आणि जागतिक आरोग्य संघटनाच साशंक होत्या.

कोरोना या आजारानंतर सर्वसामान्य मानव समाजाची जीवन जगण्याची शैली बदलली होती. सार्वजनिक उत्सव, सण, समारंभ, एवढेच नाही तर दु:खद प्रसंगी जमावाने एकत्र येणे टाळले जात होते. एकमेकांच्या घरी सहज जाणे, गप्पा मारणे आदी लक्षणीयरित्या कमी झालेले होते. बाजारात जातांना किंवा घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच पडावे लागत होते. हात साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे आदी सवयी लोकांच्या अंगवळणी पडल्या होत्या.

कोरोनासारखा आजार, निसर्ग वादळ या नावाचे महाराष्ट्रावर आलेले संकट, बेरोजगारी, व्यापार-व्यवसाय कमी होणे, नोकर्‍या जाणे, बंद शाळा, आर्थिक चणचण, बदललेली जीवनशैली अशा अनेक अर्थांनी साल २०२० हे एक वेगळेच वर्ष आहे हे जाणवत होते. जागतिक स्तरावरील ही स्थिती कशा प्रकारे बदलेल आणि पूर्वीचे जीवन कसे सुरळीत होईल, याविषयी सर्वांच्याच मनात शंका होती.

समाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारमाध्यमवेधलेखअनुभवमाहितीआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

24 Aug 2020 - 11:04 am | कुमार१

समर्पक.

वामन देशमुख's picture

24 Aug 2020 - 3:34 pm | वामन देशमुख

धडा छान आहे, आवडला.

टर्मीनेटर's picture

24 Aug 2020 - 3:45 pm | टर्मीनेटर

धडा आवडला.

पाषाणभेद's picture

24 Aug 2020 - 5:22 pm | पाषाणभेद

ताक.

पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त's picture

24 Aug 2020 - 6:23 pm | चित्रगुप्त

धडा मस्त लिवलाय पाभौ.
हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव -
देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते.
अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता.

म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल.

बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?

अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात.
तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

@पाषाणभेदः

परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?

सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे.
http://www.misalpav.com/node/47307

लिहा की एखादा चित्रलेख!!

आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.