क्रिकेटचा इसाप हरपला
लेखनविषय (Tags)
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!"
आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे. शेवटी आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींनीचतर आपण बनतो.
ताहिर शाह म्हणतो "“Stories are a communal currency of humanity.” खरोखरंच गोष्टी म्हणजे मानवतेचं चलन आहे. आणि हे जर खरं असेल तर आज खर्या अर्थाने क्रिकेटने आपला इसाप गमावला.
"आमचा सुनील", "आपला सचिन", "आणि सेहवाग म्हणजे तर काय...", "स्मिथसारखा चिवट बॅट्समन".. "अरे ते हॉल-ग्रिफिथ म्हणजे राक्षस होते रे" वगैरे वाचताना संझगिरींचे कौतुकाने लुकलुकणारे डोळे त्यांच्या शब्दांत दिसायचे. किती पॅशनेट असावं एखाद्याने? किती जीव लावावा एखाद्या खेळाला? आणि खेळाडूंना सुद्धा! एखाद्यावर टीका करतानासुद्धा त्यांचा सूर म्हणजे "असं का करतोस राजा.. किती अपेक्षा आहेत आमच्या तुझ्याकडून" असाच असायचा. किती वर्षं झाली संझगिरी वाचतोय... पण त्यांचं लिखाण कधीच एकसुरी वाटलं नाही कारण त्या लिखाणामागचं त्यांचं निर्भेळ, निर्मळ प्रेम! त्यांची क्रिकेट आणि सिनेमाविषयक कित्येक पुस्तकं आपण वाचली असतील. पण त्यांच्यातला सेलेब्रिटींपलिकडे सामान्यातल्या सामान्य माणसातलं सौंदर्य, मोठेपणा आणि प्रेरणा बघणारा, स्वच्छ, संवेदनशील माणूस दिसतो तो "वेदनेचं गाणं" मध्ये. अहो लताबाई, आशाताई, गावसकर, सचिन यांच्यात देवत्व सगळेच पाहतात. पण द्वारकानाथ संझगिरींनी आम्हाला पोस्टमॉर्टेम करणार्याचं, गटारं साफ करणार्याचंं, कोव्हिडच्या वेळी पायी आपल्या गावी निघालेल्या परप्रांतीयांचं देवत्व दाखवलं!
त्यांच्यातल्या साध्या, निरागस, कलासक्त रसिकाने आम्हाला जास्त संवेदनशील बनवलं. आमच्या जाणीवा समृद्ध केल्या. लहानपणी इसापनीतीच्या गोष्टींनी जे संस्कार केले ते मोठेपणी द्वारकानाथ संझगिरींच्या लेखनाने केले. डब्ल्यू जी ग्रेसपासून ते यशस्वी जयस्वाल पर्यंत, संगीतकार जयदेवपासून ते इरफान खान पर्यंत, मुकुंद आचार्यांपासून ते बाळासाहेब ठाकर्यांपर्यंत, आमच्या मनातलं असं एकही व्यक्तिचित्र नाही ज्यात द्वारकानाथ संझगिरींनी रंग भरले नसतील.
आज लताबाईंना जाऊन तीन वर्षं झाली आणि आजच संझगिरी गेले! त्या माउलीने स्वरांमधून गोष्टी ऐकवल्या आणि ह्यांनी शब्दांमधून. "लुत्फ" कसा घ्यावा हे सांगणाराच गेला! क्रिकेटचाच नाही, तर सिनेमा, संगीत आणि आयुष्याच्याच सुरस आणि बोधपर गोष्टी सांगणारा इसाप हरपला! पण जाताना आयुष्यभर पुरून उरेल इतकं देऊन गेला.
जोपर्यंत आमचे श्वास चालू आहेत तोपर्यंत संझगिरी असतीलच. कारण ते आमच्या जगण्याचा भाग आहेत आणि राहतील.
जे.पी.मॉर्गन
६ फेब्रुवारी २०२५
प्रतिक्रिया
क्रिकेट...
द्वारकानाथ संझगिरीना भावपूर्ण श्रध्दांजली_/\_
_/\_
संझगिरी माझे आवडते लेखक,
ओम शांती
क्रिकेट सारख्या वाह्याद
टंकला नसता तरी चालला' असता
खांब किंवा पत्रपेटी दिसली की
का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट
मनोरंजक प्रतिसाद....
षटकार