user

प्रतिभा

रत्ना

परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! ''
''नको नको, ताई! '' तिच्या स्वरात अजिजी होती, '' पुन्हा कधीतरी येईन ना मी! आज इथंच बोलू की! ''

रत्ना. आमच्याकडे ती पहिल्यांदा कामावर रुजू झाली तेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन आणि ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला! किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, लांबसडक केस आणि चेहर्‍यावर हसू असलेली तिची ती ठेंगणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी येते. कॉलेजची फी भरायला तिच्या आई आणि भावाने नकार दिला म्हणून ताठ मानेने, मिळालेल्या पगारातून पुढे शिकायचे ह्या जिद्दीने ती आमच्या घरी माझ्या नोकरी करणार्‍या आईला वरकामात मदत करायला आली आणि जणू आमच्या घरचीच होऊन गेली. भल्या पहाटे उठून घरात पडेल ते काम करायचे, भावाला व आईला व्यवसायात मदत करायची, कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, आमच्या घरचे काम आणि इतर दोन घरची कामे असे सर्व उरकून उरलेल्या वेळेत अभ्यास करणारी रत्ना. मला शाळेत सोडायला - आणायला येणारी, मी तिच्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त केल्यावरही राग न मानणारी हसतमुख रत्ना. कामाला वाघ असणारी, शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने उरी बाळगणारी अल्लड रत्ना. दिसायला काळीसावळी आणि तिच्या पायात जन्मजात व्यंग होते म्हणून तिच्या घरचे सुरुवातीपासून तिचा राग राग करायचे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या आणि व्यंगामुळे रत्नाला नीट स्थळेही चालून येईनात. रत्नाची त्यांच्या जातीबाहेर लग्न करायची तयारी होती, पण तिच्या भावाला व आईला ते मान्य नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे तिचे वडील अकाली निवर्तल्यानंतर ती घरात एकटीच पडत गेली. तरीही तिने घरच्यांच्या लग्न करण्याच्या आग्रहाला बळी न पडता नेटाने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आमच्या घरी सर्वांना तिच्या ह्या जिद्दीचे खूप कौतुक वाटे. त्यामुळे तिला अभ्यासात, पुस्तके मिळवण्यात किंवा फी भरायला काही अडचण आली तर ती हक्काने आमच्याकडे मदत मागायला येत असे.

कालांतराने, मजल दरमजल करीत रत्ना एकदाची बी. ए. झाली. तिच्या घरी कोणालाच त्याचे फारसे कौतुक नव्हते. ना त्यामुळे भावाला कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या त्याच्या व्यवसायात मदत होणार होती, ना आईच्या फुलांच्या व्यवसायात बरकत येणार होती! पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घरी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली! गेली अनेक वर्षे तिने एकच स्वप्न उराशी बाळगले होते. तिला शिक्षिका होऊन शाळेत नोकरी करायची होती. आणि त्यासाठी तिचे पुढचे ध्येय होते बी. एड. पूर्ण करणे!

पण पुन्हा समोर दोन समस्या उभ्या ठाकल्या. पहिली समस्या म्हणजे बी. एड. प्रवेशाच्या फीसाठी लागणारा पैसा आणि दुसरी म्हणजे फायनलला तिला मिळालेला काठावरचा सेकंड क्लास. शेवटी तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायचे ठरवले. मुलांमध्ये काम करायची तिला जबरदस्त हौस होती. त्यांना शिकवावे, घडवावे, त्यांच्यात रमून जावे असे तिला मनापासून वाटायचे. मग काय! बालवाडी प्रशिक्षणासाठी तिने तिचे सोन्याचे कानातले विकून पैसे उभे केले. पुढचे शिक्षण चालू ठेवायचे तर तिला अर्थार्जन करणे भागच होते. शहरातील सुप्रतिष्ठित समाजकारणी व राजकारणी अप्पाजी आमच्या परिचयातील होते. त्यांच्यापाशी रत्नाला चांगली नोकरी लावून देण्याविषयी शब्द टाकल्यावर त्यांनी तिला चिठ्ठी व तिची प्रमाणपत्रे घेऊन एक दिवस भेटायला बोलावले. तिथेच तिची ओळख सुभानरावाशी, अप्पाजींच्या धाकट्या लेकाशी झाली.

अप्पाजींच्या ओळखीने रत्नाला बर्‍यापैकी नोकरी तर मिळाली, पण सुभानरावाच्या आणि तिच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. एक दिवस अप्पाजी आमच्याकडे 'सहज'च भेटायला म्हणून आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्यांनी थेट रत्नाची चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी नापसंतीने सांगितले की सध्या रत्ना आणि सुभान्या एकत्र भटकत असतात म्हणून! अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच! रागावलेल्या अप्पाजींची कशीबशी समजूत घातल्यावर ते एकदाचे घरी गेले, पण ''त्या रत्नाला समजावा, ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, '' अशी धमकी देऊनच!

दोनच दिवसांनी रत्नाला सांगावा देऊन आमच्या घरी सुभानरावाविषयी विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले गेले. रत्ना आपल्या निवडीवर व निर्णयावर ठाम होती. ''सुभानराव आणि मी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनी तसं वचन दिलंय मला. मी अप्पाजींच्या धमक्यांना घाबरणार नाही! सांगा त्यांना तसं! '' खरं तर सुभानरावाची कथा वेगळीच होती. सुप्रतिष्ठित, सधन घरातील वाया जाऊ पाहत असलेला तो लाडावलेला मुलगा होता. घरच्या दुधाच्या धंद्याकडे, शेतीकडे बघायचा तसा थोडाफार! पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती! तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने! अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची! तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले! रस्त्यात दिसली तरी ओळख देईनाशी झाली.

आणि एक दिवस अचानक रत्ना अस्ताव्यस्त, विस्कटलेल्या अवतारात आमच्या दारात येऊन उभी राहिली. डोळे रडून रडून सुजलेले, चेहर्‍यावर वेडसरपणाची झाक.... तिची अशी अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला! सुभानरावाने तिला फसवून त्याच्या जातीतल्या, श्रीमंत घरातल्या दुसर्‍याच पोरीशी लग्न केले होते.
''मला पार लुटलं हो त्यानं! पार फशिवलंन! माझी इज्जत गेली, आब्रू गेली.... आता मी काय तोंड दाखवू? कशी घरी जाऊ? '' तिचा तो घायाळ टाहो काळीज चिरून जात होता. आईने तिला कसंबसं सावरलं. ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यावर मग ती जरा शांत झाली. उध्वस्त अवस्थेतच तिच्या घरी परतली. एकदा रॉकेल अंगावर ओतून घेतले असेच निराशेच्या भरात! पण तिची भाचरे येऊन बिलगली तिला तसा तिचा बांध फुटला. काही महिन्यांनी परिस्थितीतून जरा सावरल्यानंतर सुभानरावावर फसवणुकीचा दावा ठोकता येईल का, ह्यासाठी ती आमच्या ओळखीच्या एका वकिलांना भेटून आली. पण त्यांनी तिला स्पष्ट शब्दात अशा दाव्यांमध्ये खर्च होणारा पैसा, वेळ व मनस्ताप -बदनामीची कल्पना दिल्यावर तिने सुभानरावावर दावा करण्याचा विचार रहित केला. शिवाय अप्पाजींचा राजकीय प्रभाव बघता अशी केस कोर्टात उभी राहील की नाही ह्याबद्दलही शंका होती.

''आता काय करणार आहेस? '' माझ्या आईने तिला विचारले.
''काय करणार वैनी! अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करीन म्हणते. बघूयात देवाच्या मनात तरी माझ्यासाठी काय आहे ते! '' रत्नाच्या स्वरात कडवटपणा ठासून भरला होता.
एका अनामिक जिद्दीने भारलेल्या कडवटपणाने रत्नाने तो कोर्स पूर्ण केला खरा, पण मधल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःची पार वाताहत करून घेतली. रोज कसलेतरी उपास करायची. खाण्यापिण्याकडे लक्षच द्यायची नाही. आधीच तिची किरकोळ शरीरयष्टी! आता तर ती अजूनच कृश दिसू लागली. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. माझ्या आईला तिची जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांकडे जबरदस्तीने घेऊन गेल्यावर आणि त्यांनी तिला भले मोठे लेक्चर दिल्यावर मग कोठे ती जरा ताळ्यावर येऊन वागू लागली.

आताशा तिची आमच्याकडे पूर्वीसारखी ये-जा राहिली नव्हती. बघता बघता तिचा अल्लडपणा ओसरून चेहर्‍यावर, वागण्यात एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. जणू मोकळेपणाने हसायचे ती विसरूनच गेली होती. अशीच एके दिवशी ती अवचित संध्याकाळी भेटायला म्हणून घरी आली. बोलता बोलता दोन गोष्टी अगदी सहज बोलल्यासारख्या सांगितल्या तिने. पहिली गोष्ट म्हणजे सुभानराव तिला भेटायला आला होता. खास तिची माफी मागायला. त्याच्या लहान बाळाला कसलासा असाध्य आजार झाला होता म्हणे! आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे! त्यामुळे तो तिची माफी मागायला आला होता.
''मग? तू काय म्हणालीस? '' आईने तिला विचारले.
तशी खांदे उडवीत रत्ना उद्गारली, ''मी काय म्हणणार वैनी!! मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन! '' तिचे ते बोल ऐकल्यावर माझ्या आईच्या तोंडावर हसू फुटल्याविना राहवले नाही.
त्या दिवशी अगदी निघायची वेळ आली तशी रत्ना हळूच म्हणाली, '' मी माझं लगीन ठरीवलंय. ''

त्या खुळ्या पोरीने सुभानराव भेटून माफी मागून गेल्यावर तिरिमिरीत एका बिजवराशी लग्न करायचे ठरविले होते. एके काळी तिचे कोणाशीही लग्न लावायला तयार असणारे तिचे आई-भाऊ ह्या लग्नाविषयी जरा साशंक होते. पण रत्नाचा निर्णय एकदा झाला की तो झालाच! त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची! '' असा सुटकेचा नि:श्वासही टाकला.

पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. लग्नानंतर आठ-दहा महिन्यांतच रत्ना नवर्‍याच्या जाचाला, मारहाणीला आणि व्यसनाला कंटाळून पुन्हा माघारी आली. घरी समजूत काढायला ह्या खेपेला तिची आईही नव्हती. लेकीच्या लग्नानंतर दोनच महिन्यात ती परलोकवासी झालेली. भावाच्या घरात, त्याच्या संसारात आपला अडथळा होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करत, स्वतःला आक्रसून घेत पुन्हा एकदा रत्ना एका बालवाडीत ''ताई'' म्हणून रुजू झाली.

अवचितपणे तिला रस्त्यात भेटल्यावर ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मधल्या वर्षांमध्ये बरेच काही घडून गेले होते. त्या घटनांच्या अंगखुणा वागवत रत्ना माझ्यासमोर आज उभी होती.
''काय करतेस सध्या तू? '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई! तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे! ''
''आँ?!!! '' आता आश्चर्यचकित होण्याची माझी खेप होती.
'' तुम्हाला नवल वाटलं असेल ना ताई? आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून! पण मला सारखं वाटायचं, आपण बी. एड. करायचं स्वप्न अर्धवट सोडलं ते चांगलं नाही केलं. आता मी ते स्वप्न पूर्ण करत आहे. ''
''आणि घरी? भाऊ काय म्हणतो? '' मी हलकेच विचारले.
''भाऊ? तो काय म्हणणार? त्याची पोरं मोठी झाली आता. ती आपल्या आत्याची बाजू घेतात. त्याला म्हणतात, बाबा, तुम्ही न्हाई शिकलात तर न्हाय, पण आत्याला तर शिकू देत! ''
''वा! गुणी आहेत गं तुझी भाचरं! '' माझ्या तोंडून नकळत कौतुकाची दाद दिली गेली.
''ताई, आईगत माया केली आहे मी त्यांच्यावर! आता तीच माझी लेकरं! '' रत्नाचा स्वर पुरता कौतुकात भिजला होता.
''खरंच, चलतेस का गं घरी? '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून! ''
रत्नाचे डोळे क्षणभर पाणावले. पण मग लगेच तिने स्वतःला सावरले आणि उद्गारली, ''वैनींना माझे नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं आता ही रत्ना बी. एड. झाल्याचे पेढे घेऊनच तुम्हाला भेटायला येईल! ''

तिला आमचा नवा पत्ता, फोन नंबर देऊन झाल्यावर काही क्षण दोघी तशाच उभ्या होतो. शांत, निःशब्द! मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई! घरी उशीर होईल. '' त्या हास्यात मी उगाचच काहीतरी शोधत राहिले. माझा निरोप घेऊन ती पुन्हा पाय ओढत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे मी कितीतरी क्षण तशीच बघत उभी होते. मनात कोठेतरी तिच्यावरच्या अन्यायाविषयीची खंतही होती आणि त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत, सन्मानाने जगू पहाणार्‍या तिच्या संघर्षाविषयी, तिच्या जिद्दीविषयी कौतुकाची सायही होती. प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा चंद्रकिरण शोधणार्‍या, हार न मानणार्‍या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला आणि मार्गस्थ झाले.

-- अरुंधती

(सत्यकथेवर आधारित)

एक पाहुणी पोरगी ...

एक पाहुणी पोरगी
पाणी शेंदायला येते
आणि जराश्या उन्हानं
फूल पळसाचं होते

कसे खुणावती डोळे
कसे खुणावती हात
जणू अंधार राहतो
आजूबाजूच्या डोळ्यात

आडापुढची खिडकी
मुका हवेत सोडते
आणि पाहुण्या पोरीच्या
मनी मोहोळ फुटते

..सारा दीस आडावर तरी भरे ना घागर
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..

वैभव देशमुख

मोरपीस

दहावीचा पहिला दिवस. नवी वह्या पुस्तके घेऊन सायकल दामटत शाळेत पोचलो. आमच्या शाळेत प्रत्येक यत्तेचा आणि तुकडीचा वर्ग ठरलेला असायचा, त्यामुळे वर्ग शोधण्याचा प्रश्न नव्हताच. सायकल स्टँडला अडकवून वर्गात गेलो. रिवाजाप्रमाणे भिंतीकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर भिंतीच्या कोपर्‍यात देव्या बसलेला होता. त्याच्यापुढे रित्या आणि आडसुळ. मुलींकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर वैभ्या आणि विक्या बसलेले आणि त्यांच्या पुढच्या बेंचवर किशोर आणि अम्या. देव्याच्या शेजारची माझी जागा. नेहमीप्रमाणे चार बेंचचं कॅसलिंग जमलेलं पाहून समाधान वाटलं. जागेवर जाऊन बसलो तेव्हा आधीच चर्चा रंगात आलेली होती. नुकत्याच आलेल्या 'मैने प्यार किया' ची सगळ्याना चांगलीच किक बसलेली होती. पुन्हा एकदा तो पिक्चर पाह्यला पाहिजे यावर एकमत होत आलेलं असताना विक्याने ती बातमी हळूच सोडली.
"इ तुकडीतनं आपल्या वर्गात एक नवीन मुलगी येणारे. भाग्यश्री नावाची. ", विक्या म्हणाला.
"काय बोलतो, कशी आहे? आणि तुला काय माहिती?", कोणीतरी विचारलं.
"अरे लय भारी ए, तिनंच मला सांगितलं. आम्ही वैद्य सरांच्या क्लासला जातो ना, तिथं".
"तिनं तुला सांगितलं?", वैभ्याने विक्याच्या खांद्यावरचा हात त्याच्या डोक्यामागे नेऊन मांजा गुंडाळल्याची अ‍ॅक्शन करत विचारलं.
"मऽऽग, आम्ही दोघं अभ्यास पण करतो एकत्र तिच्या घरी." ज्या शाळेत मुलींशी साधं बोलणं सोडा नुसतं हसणंसुद्धा अशक्यप्राय वाटायचं तिथे विक्या स्फोटावर स्फोट करत होता. सगळ्यांचीच उत्कंठा अगदी शिगेला पोचली होती पण तेवढ्यात बाई वर्गात आल्या आणि बोलणं थांबवावं लागलं.
पहिला तास संपला तरी कोणीही नवीन आलं नाही. सगळे आतुरतेनं वाट पाहात होते, पण दुसर्‍या आणि तिसर्‍या तासालाही काहीच झालं नाही. विक्या नुसतं फेकत होता असं प्रत्येकाने मनोमन ठरवलं असावं कारण मधल्या सुटीत कोणीच विषय काढला नाही. नाही म्हणायला वैभ्या आणि अम्या विक्याला घेऊन इ तुकडीत चक्कर टाकून आले पण त्याना ती दिसली नाही. दिवस संपेपर्यंत तो विषय सगळेजण पूर्णपणे विसरले होते आणि नेहमीच्याच टिवल्याबावल्या करत घराकडे चालू पडले.
दुसर्‍या दिवशी शाळा सुरू व्हायच्या थोडं आधी नेहमीप्रमाणे आमचा गलका चालला होता. वर्ग जवळजवळ भरलेला होता आणि बाईच तेवढ्या यायच्या रहिलेल्या होत्या. गडबड आणि आरडओरडा टिपेला पोचलेला असताना दारातून ती आली. दारातून आत येऊन मुलींच्या दोन रांगांमध्ये ती पोचेपर्यंतच्या पाच सेकंदांत वर्गात एखादा कडक मास्तर आल्यासारखी सुन्न शांतता पसरली. दोन वेण्या, गोल चेहरा, धारदार जिवणी, अपरं नाक आणि टपोरे काळे डोळे... एवढी सुंदर मुलगी आमच्या 'अ' तुकडीने गेल्या दहाहजार वर्षात कधीच पाहिली नव्हती.
"आयला पिक्चरमधल्या भाग्यश्रीसारखीच आहे रे", कोणीतरी कुजबुजलं.
त्या दिवशी विक्याचा भाव एकदम वधारला आणि वैद्य सरांच्या क्लासचाही. विक्याबरोबर तिथे जाऊन एकदातरी तिच्याशी बोलायचं असं सगळ्यानी ठरवून टाकलं आणि दुसर्‍या दिवसापासून आम्ही वैद्य सरांच्या क्लासला हजर झालो. विक्यामात्र रोज काही ना काही कारण सांगून टाळायला लागला. चांगलं दोन तीन वेळा समोरासमोर आल्यावरही ती त्याच्याशी बोलणं, हसणं तर सोडाच पण ढुंकुनही पाहत नाही हे आमच्या लक्षात आलं आणि त्याने आधी सोडलेल्या सगळ्या पुड्याच होत्या या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. ती वर्गात येणार हे विक्याला कसं कळालं हा प्रश्न आम्ही ऑप्शनला टाकला आणि त्याला भरपेट शिव्या देऊन आपल्या नशीबात सुंदर मुलींशी बोलणं नाही अशी एकमेकांची समजूत घातली.
असेच दिवसा मागून दिवस गेले. वर्गात हळूच चोरून तिच्याकडे पाहणे आणि तिच्या नकळत शाळा सुटल्यावर तिचा पाठलाग करून तिचे घर कुठे आहे हे पाहून येणे असे आमचे टिनपाट उद्योग करून झाले पण तिच्याशी बोलण्याची अजून कोणाचीच हिंमत होत नव्हती.
साधारण महिन्याभराने कोणीतरी कान फुंकल्यामुळे माझ्या घरून मला 'नॅशनल टॅलेंट सर्च' नामक परीक्षेबद्दल शाळेत चौकशी करण्याचे फर्मान मिळाले. दुसर्‍या दिवशी पहिल्याच तासाला मी बाईंना भरवर्गात त्याबद्दल विचारले. त्यापुर्वी शाळा फक्त ठराविक अतिहुशार मुलानाच त्या परीक्षेला बसवत असे पण मी विचारल्यामुळे मग सगळ्यांसाठीच ऑफिसमधुन फॉर्म घेऊन येण्याचे काम मलाच मिळाले. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मधल्या सुटीत फॉर्म आणायला मी ऑफिसमध्ये गेलो. फॉर्म घेऊन येताना आता हे सगळ्याना वाटायचे असा विचार करताना माझ्या लक्षात आलं की यातले अर्धे मुलींमध्येही वाटावे लागतील. व्वा! मी एकदम रोमांचित वगैरेच झालो. हाती आलेली ही सुवर्णसंधी साधून आज तिच्याशी बोलायचंच असं मी मनोमन ठरवलं. वर्गाच्या दाराशी येइपर्यंत माझी छाती धपापू लागली होती आणि माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानात मला स्पष्ट ऐकू येत होते. मी वर्गात गेलो तेव्हा ती बेंचवर बसून तिच्या मैत्रीणीसोबत डबा खात होती. त्यानंतर मी ते फॉर्म्सचे दोन गठ्ठे कसे केले, एक गठ्ठा तिच्याकडे कसा दिला, कारकूनाने दिलेल्या सूचना तिला कशा सांगितल्या, काही म्हणजे काही मला आठवत नाही. मी भानावर आलो तेव्हा पाण्याच्या टाकीजवळ बसलेलो होतो आणि माझे कान भयंकर गरम आणि लाल झाल्यासारखे वाटत होते एवढंच मला आठवतंय. तो दिवस मी असाच सुन्नपणेच घालवला. दिवसभरात परत तिच्याकडे पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. घरी गेल्यावर मात्र मी सगळं विसरून गेलो.
दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. वर्गात गेल्यावर बेंचच्या दोन रांगांतून जाताना अभावितपणे तिच्याकडे नजर गेली. ती माझ्याकडेच पाहत होती आणि मी तिच्याकडे पाहिल्यावर तिने एक हलकंसं स्माइल दिलं. कोणीतरी मोरपीस फिरवावं तशी एक गोड शिरशिरी माझ्या सर्वांगातून लहरत गेली आणि मी तरंगू लागलो....
त्यानंतर मग तो खेळच ठरून गेला. ना तिने परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ना मी तिच्याशी. पण ते पूर्ण वर्षभर आम्ही एकमेकांशी डोळ्यांतूनच हसत, बोलत राहिलो. त्याला पहिलं प्रेम म्हणता येईल का वगैरे विचार मी कधी केला नाही पण दरवेळी तिच्या नजरेस नजर देताना ते मोरपीस तेवढंच आनंद देत राहिलं.
आजही माझ्या मनाच्या पुस्तकात ते मोरपीस मी जपून ठेवलं आहे. कधी कधी लहर आली की ते पान उघडतो आणि ते मोरपीस घेऊन मी गालावर फिरवत बसतो.

(टीपः हे वर्णन काल्पनिक असून जिवंत अथवा मृत व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

पं. प्रभाकर कारेकर यांच्या गाण्याचे शौकिन

माझ्या आजवरच्या संगीत श्रवण साधने मध्ये अनेक नामवन्त गायक / गायीका चे गाणे ऐकले. कुमारजी / वसंन्तराव / प्रभा ताई अत्रे / किशोरी ताई / पासून प्रथमेश लघाटे / आर्या आंबेकर पार्यन्त.
ह्या सग्ळ्या गायक / गायीकांचे चाहते/ पंखे खूप भेट्ले .
परन्तु पं. प्रभाकर कारेकर यांचे चाहते कधिच सापड्ले नाहीत. हा केवळ योगायोग किवा काय ? समजत नाही .
माला त्याचे शा.सन्गीत / नाट्य संगीत फार फार आवडते .............आपणापैकी कोणी पं. प्रभाकर कारेकर जीं चा चाहता / ती ?

आज गुरुपोर्णिमा....

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरा :
गुरु: साक्षात परब्रह्म
तस्मै श्रीगुरुवे नम: ॥

हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानकी ll छोटे न हो हम बुद्धी से , हे विश्वमय से ईशमय , हो राममय और कृष्णमय् , जगदेवमे जगदीशमे हर ईंद्रियोंपर ताप कर , हम वीर हो अतिधीर हो , उज्ज्वल रहे सरसे सदा , निजधर्मरत खंबीर हो ll अतिशुद्ध हो आचारसे , तन-मन हमारा सर्वदा ,अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नही करदे जुदा , इस अमर आत्मा का हमे हर श्वास भरमे गम रहे , अगर मौत भी आ गई , सुख दु:ख हमसे सम रहे l हे गुरुदेव हम सबको सदबुद्धी दे l सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे l सच बोलनेका अभ्यास दे l सत स्वरुप का ग्यान दे l

llशिष्यादिच्छत्पराजयम..ll
विवेकानंदांना घडवणारे...

जेव्हा नवीन कळी उमलते तेंव्हा त्याचा आनंद कोणत्या शब्दांत वर्णावा ! तीच कळी अस्तित्वात येउन तिच फलांत रुपांतर करण्यासाठी त्याला लागणारं पोषक वातावरण उपलब्ध करण्यास सहाय्य ठरणारे गुरु.. जन्माला आल्यापासुन त्यावर संस्कार करण्याचे कार्य पार पाडत असलेले माता-पिता हे प्रथम गुरु..
शिक्षण हा कधीही न संपणारा शोधच असतो. विद्यार्थ्याची रुची- कल जाणुन त्याना योग्य मार्गदर्शन देणारा हाच गुरु..खरे तर अशीही म्हण प्रचलीत आहे की 'अनुभवासारखा श्रेष्ठ दुसरा गुरु नाही' ,'ग्रंथ हेच गुरु', पण सर्जनशीलता, स्वयंविचार,स्वयंअनुभव, निरिक्षणशक्तीचे एकत्रिकरण कर्ण्यास गरज भासते ती मानवी गुरुची...

आपल्याला असलेले अनुभव वाचायला उत्सुक....

आईचा मुलगा हरवला.. (लोकल गोष्टी-५ )

आईचा मुलगा हरवला..
===========================================

ऑर्कुटवरील 'काव्यांजली' या कवितासंबंधित फोरमचा ठाण्यात दुपारी चार वाजता काव्यवाचनाचा कार्यक्रम होता.. नाव चेहरे नसलेले लोक साक्षात एकमेकांसमोर अवतरणार होते.. यातले काही आधीच्या कार्यक्रमांमुळे जमणाऱ्यांच्या माहितीतले.. मी मात्र पहिल्यांदाच जात होते.. किंबहुधा काव्यवाचन ऐकायला आणि करायलाही पहिल्यांदाच जात होते.. त्यातून कार्यक्रम ठाण्याला जिकडे माझे सहसा जाणे होत नाही. त्यामुळे एक वेगळीच अस्वस्थता, हुरहूर कम भीती मनाला घेरून होती. वेळेवर पोहचता यावं म्हणून घरातून मी दीड-पावणेदोन तास आधीच निघाले.. स्टॉपवर पोहचल्यापोहचल्या बस पुढ्यात आली त्यात चढून दहा-पंधरा मिनिटांतच कुर्ला स्टेशनला पोहोचले. कुर्ला स्टेशनवरच्या गर्दीतून वाट काढत काढत.. तिकीट काढण्यासाठी गेले तर तिथे ही भली मोठी रांग त्या रांगेतून मुंगीच्या गतीने पुढे सरकत सरकत तिकीट मिळायला अर्धा तास लागला.. तिथेच खिडकीतील माणसाला ठाण्याला जाण्यासाठी किती नंबरच्या प्लॅटफॉर्म वर ट्रेन मिळेल विचारून घेतलं. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेने चालू लागले, प्लॅटफॉर्म सापडला.. आता लेडीज डबा कुठे येतो याचा शोध घेत नजर आजूबाजूला फिरवली.. हिरव्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्या एका खांबावर मारलेल्या दिसल्या.. प्रवासाचा एक टप्पा पार पडला. आता ट्रेन आली की चढायचं.. आणि ठाणे आलं की उतरायचं आणि रिक्षा घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहचायचं एवढंच बाकी होतं.

दूर वरून ट्रेन येताना दिसली.. मी ती ठाण्यावरूनच जाणार असल्याची खात्री करून घेतली.. रविवारची दुपार असूनही प्लॅटफॉर्मवर माणसांचा अगदी बुजबुजाट झाला होता.. ट्रेन सोडण्याला, पुढच्या ट्रेनची वाट बघण्याला काहीच अर्थ नव्हता. लोकल ट्रेनचा सेकंड क्लासचा डबासमोर येऊन थांबला आणि चढणाऱ्या बायका मुलांची झुंबड उडली.. आज मी फर्स्ट क्लासकडेही जाऊ शकणार नव्हते.. त्यामुळे जराशी पुढे सरकले.. आणि गर्दीने मला डब्यात चढवलं.

गर्दीने माझा पुरता ताबा घेतला होता.. गर्दी नेईल तिकडे जायचं थांबवेल तिथे उभं राहायचं एवढंच माझ्या हातात होतं.. डोळ्यांसमोर कोणाकोणाचे हात, केस झुलत होते.. अशा अवस्थेत एक दोन स्टेशनं गेली आणि चढणाऱ्या उतरणाऱ्यांच्या रेटारेटीत मी पार्टिशनच्या बाजूला ढकलले गेले. इतकंच नाही तर धक्का-बुक्कीपासून बाजूला उभं राहण्याइतकी जागा ही मिळाली.

मी पहिल्यांदाच कविता वाचन करणार होते.. कधी नव्हे ते निवडलेल्या कवितांसाठी आदल्या दिवशी झोपता-झोपता प्रस्तावना लिहिल्या होत्या.. त्या किमान एकदा डोळ्याखालून घालाव्यात म्हणून मी बॅग मधली लहानशी फाइल बाहेर काढली.. आणि स्वतःच स्वतःला कविता व त्यांच्या प्रस्तावना ऐकवू लागले.. माझ्या कविता लहान असतात म्हणून एका कवितेसाठी एक मिनिट असा हिशोब करून मी साधारण पाच कविता वाचाव्यात असे मला सुचवण्यात आले होते.. तशा मी पाच कविता प्रस्तावनांसकट एकत्रित केल्या होत्या.. कोणती कविता आधी वाचायची कोणती नंतर कोणती शेवटी अशी क्रमवारीही केली होती.. व त्या पाच कवितांशिवाय आणखी चार-पाच माझ्या मलाच आवडणाऱ्या कविताही सोबत घेतल्या होत्या.. कुर्ला ते ठाणा या प्रवासात करण्यासाठी तेवढे पुरेसे होते.. आणि आवश्यकही.. त्यामुळे मी माझ्या हातातल्या कागदांमध्ये बुडून गेले. प्रस्तावना आणि कविता वाचता वाचता तो तो प्रसंग डोळ्यासमोर चित्रित होत होता..

खुणावते तुला दिशा
तेजस गोमटी,
नजरेत किरणे तुझ्या
राजस कोवळी.

घे निजून घे पाखरा,
अंधार हा गर्भरेशमी,
का टोचती तुला चांदण्या
कापूस पिंजल्या बिछानी..?

घे पांघरून रे दुलई
मऊ उबदार मायेची,
घे उशाला तुझ्या
अढळ चांदणी गगनीची.

उजळता दिशा दिशा
घेशील उंच भरारी,
क्षितिज पुढे पुढे तुझ्या
धाव दीर्घ रिंगणी.

साठवून घे पंखांत
जिद्द आकाश तोलण्याची,
घे निजून घे पाखरा,
अंधार हा गर्भरेशमी.

कवितेतले शब्द.. आणि त्यांतलं भावविश्व आज मला समोर बसलेल्या रसिक श्रोत्यांपर्यंत पोहचवायचं होतं.

तसं माझं सगळं लिखाण माझ्या आणि माझ्या छोट्याश्या जगाभोवतीच फिरतं.. त्यामुळे ते उलगडून सांगणं बिलकूल अवघड नव्हतं.. आणि तितकंच सोपंही नव्हतं..! खरं तर आपण इतरांबद्दल त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांबद्दल खूप सहजतेने बोलू शकतो.. तितक्या सहजतेने.. त्रयस्थपणे आपल्याला आपल्याबद्दल बोलता येत नाही.. त्यामुळे कविता खूप आपलीशी वाटते..! अगदी जवळच्या मैत्रिणी सारखी, ती अशा बऱ्याच गोष्टी नकळत बोलवून घेते, आणि बोलताना कसलाच संकोच जाणवत नाही. आपण आपल्याशीच बोलल्या इतक्या सहजतेने भाव शब्दात उतरत जातात.. आणि तसंही मी माझ्यासाठीच तर लिहिते. त्यामुळे असेल, अजून कवितेला वृत्त, मात्रांच्या चौकटीत बसवायला जात नाही.. त्यानं तिच्या माझ्यातला मोकळेपणा निघून जाईल अस वाटतं.

त्याच काय झालं, मध्यंतरी माझ्या मुलाला झोपेत खूप स्वप्न पडत होती त्यामुळे तो मध्येच घाबरून उठायचा, अंग आक्रसून घ्यायचा, रडायचा, आणि काय झालं विचारलं की डास चावला म्हणून सांगायचा.. त्याला नक्की कशाची भीती वाटत होती ते काही कळले नाही. तो डासांना घाबरत मात्र होता.. अशाच एका रात्री तो सारखा सारखा उठत होता आणि तीन-चारच्या सुमारास "सकाळ झाली, आपण उठूया" म्हणत उठूनच बसला.. तेव्हा त्याला समजावून झोपवता-झोपवता जुळलेली ही कविता. तो झोपेत घाबरत असल्यामुळे तेव्हा माझी झोप इतकी सावध झाली होती.. की त्याची हलकीशी हालचालही मला झोपेत जाणवायची. माझंच कशाला, प्रत्येक आईच आपल्या मुलाकडे तितकंच बारीक लक्ष असतं, नाही..?

आपलं मन कधी कुठून कुठे पोहचेल काही सांगता येत नाही.. त्याला ना ट्रेनची गरज ना बस रिक्षाची जरूर.. आता मात्र पुढची कविता वाचायची होती.. त्या आधी कोणतं स्टेशन आहे बघण्यासाठी फाइलमधून डोकं वर काढलं.. तोपर्यंत ट्रेनमधली गर्दी जरा कमी झाली होती. मला समोर बसलेल्या बायका दिसत होत्या. सगळं काही नेहमी सारखंच तेच ते बायकांचे घोळके, त्यांच्या गप्पा, मांड्यांवर किंवा चिकटून बसलेली मुलं.. एक मध्येच बसलेली तिशी-पस्तिशीची बाई तेवढी जरा अस्वस्थ दिसत होती.. तिच्या डाव्या-उजव्या बाजूला बसलेल्या प्रत्येक बाईकडे ती वाकून वाकून बघत होती आणि अधिक अधिकच अस्वस्थ होत होती. त्याच बरोबर कोपऱ्यात खिडकीजवळ बसलेल्या तीन-चार वर्षाच्या लहानग्याकडेही तिचे वारंवार लक्ष जात होते. इतके की माझे कविता वाचण्यात मन लागेना.. आणि मी फाइल ठेवून तिच्याकडे बघू लागले.

तिच्या नजरेचा मागोवा घेत माझे डोळे तिच्या नजरेच्या जोडीने फिरू लागले.. या खिडकीपासून त्या खिडकीपर्यंत.. जाऊन तिच्याचसारखे त्या छोट्याजवळ जाऊन स्थिरावले.. पोरगं भारी गोड होत. गव्हाळ उजळ कांती, गोबरे गाल, मोठं किंचित बाक असलेलं कपाळ, त्यावर भुरभुरणारे मऊ रेशमासारखे मुलायम केस, तांबूस ठसठशीत ओठ.. आणि बाहेर निरखून बघणारे टपोरे डोळे. अंगात लाल रंगाचा फुलशर्ट, गडद चॉकलेटी रंगाची जीन्स त्यावर त्याच रंगाच उठावदार जाकीट घातलेला हा मुलगा शांतपणे आपल्या जागेवर बसून होता.

इतका शांत की त्याचे अस्तित्वही जाणवू नये.. जाचण्याच तर प्रश्नच नव्हता.. एवढा लहान मुलगा.. त्यात शांत आणि नीटनेटका. त्याच्याकडे बघून बघून कोणी इतका अस्वस्थ का व्हावं..? त्याच्या शेजारी बसलेल्या बायका तर निवांत दिसत होत्या.. मग या बाईंना इतक्या दुरून अस काय दिसलं.. ज्यानं त्यांचा जीव खालीवर होऊन जावा..? काही कळेना..

थोड्याच वेळात त्या बाईची अस्वस्थता शिगेला पोहचली.. आणि न राहून तिने शेजारी डुलक्या घेणाऱ्या बाईंना ढोसून जाग केलं.. आणि काही तरी विचारलं.. असं काही की त्या बाईची झोप जादूमंतर केल्यासारखी छू झाली.. आणि त्याच बरोबर या बाईंनाही अस्वस्थतेची लागण झाली.. मग तिने तिच्या बडबड्या शेजारणीच्या गप्पांमध्ये व्यत्यय आणून तिला काही तरी प्रश्न केला.. असा की क्षणभर तिची बोलतीच बंद झाली.. तिने समोरच्या दोघी तिघींकडे संशयानं बघून घेतलं.. एक तर तिच्या ओळखीचीच होती.. काय झालं कोण जाणे, पण चारी जणींच्या माना एकसाथ डावी-उजवीकडे वळू लागल्या.. आणि मला पहिल्यांदाच एक शब्द ऐकू आला.. नाही नाही.. बस इतकंच.. आणि त्या चौघीही अस्वस्थ झाल्या.. इकडे त्या मध्ये बसलेल्या बाईंनी तिच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या बायकांना अस्वस्थ कारण सुरूच ठेवलं होतं.. मग तो खेळच सुरू झाला.. प्रत्येकीने तिच्या शेजारी बसलेल्या बाईला काहीतरी विचारायचं, दुसरीने-पहिलीला 'नाही' म्हणून सांगायचं नंतर दोघींनी आश्चर्य चकित होऊन खेळ पुढे चालू ठेवायचा.. असे एक दोन राउंड झाले असतील.. दारा जवळच्या दोन सिटमधल्या खबदाडात बसलेली, उभी असलेली प्रत्येक बाई आता वळून वळून त्या लहानग्या कडे बघत होती. आणि तो त्याच्या जगात निवांत होता.. त्याला न त्याच्या कडे बघणाऱ्या बायकांची खबर होती न त्यांना अस्वस्थ करून सोडणाऱ्या प्रश्नाची जाणीव. तो त्याच्या आधीच्याच एकाग्रतेने बाहेर दिसणारे दृश्य बघण्यात गुंग होता.

आतापर्यंत हलक्या आवाजात चाललेल्या या खुसफुशीचा स्वर हळूहळू उंचावत गेला.. आणि "हा तुमचा मुलगा आहे का..? " या प्रश्नाची जागा "कुणाचा मुलगा हरवला आहे का? " या आरोळी ने घेतली.. आणि सगळ्यांच्या अस्वस्थतेचं कारण माझ्यापर्यंत पोहोचलं. तो तीन-चार वर्षांचा लहान मुलगा तिथे एकटाच बसला होता.. त्याच्या सोबत कोणीही नव्हतं.

डब्यात सर्वत्र अस्वस्थतेची साथ पसरत होती.. आरोळ्या वाढत होत्या. प्रत्येकीने तिच्या आजूबाजूला बसलेल्यांना हा प्रश्न विचारावा मग त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या बायकांना तोच प्रश्न विचारावा.. व आधीच्या बाईकडून संपूर्ण किस्सा ऐकून घ्यावा व त्यावर आपली मत.. शंका.. सूचना मांडाव्यात असा खेळ रंगत होता.. श्वास घेण्याइतकी जागा असली तरी ट्रेन खचाखच भरलेलीच होती.. गर्दीच्या अडथळ्यांतून इकडच्या बायकांना तिकडचं आणि तिकडच्या बायकांना इकडंच दिसण्याचा काहीच मार्ग नव्हता. जी ती 'पासिंग द पार्सलं प्रमाणे' 'पासिंग द क्वश्न' मध्ये ओढली जात होती.. एकत्रित गर्दीचा आरोळ्यांचा वेगळाच सूर ऐकू येत होता.. त्या वरून मला "आईच पत्र हरवलं ते मला सापडलं" या खेळाची आठवण झाली.. त्या खेळात कसं एक जण आईच पत्र हरवलं करून बसलेल्या सर्वांना विचारत असते.. आणि ते नक्की कुणाकडे आहे हे कुणालाच माहीत नसतं.. प्रत्येकाला ते आपल्या किंवा आपल्या जवळ बसलेल्या कोणा जवळ तर नाही ना? आशी शंका येत असते तसं शेजारी बसलेली कोणतीही अनोळखी बाई त्या मुलाची आई तर नसेल अशी शंका प्रत्येकीच्या मनात येत होती. आणि त्यांच्या प्रश्नोत्तरांचा गडबड गोंधळाचा वेगळाच एकत्रित आवाज ऐकू येत होता. जणू त्या आईच पत्र हरवलं प्रमाणे "आईचा मुलगा हरवला.. तो मला सापडला... " नावाचा खेळच खेळत होत्या.

"आईचा मुलगा हरवला.. तो मला सापडला..! " डब्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आवाज फिरत होता.. आता पर्यंत जवळ जवळ प्रत्येक बाईकडे प्रश्न पास झाला असावा.. इतक्या झपाट्यानं बायका खेळात भाग घेत होत्या.. आरोळ्या देत होत्या.. की एखादीपर्यंत प्रश्न पास नाही झाला तरी आवाज नक्की पोहचेल. आता सगळा डब्बा एक्का सुरात एकच वाक्य बोलत होता.. आईचा मुलगा हरवला तो मला सापडला..! तरी त्या मुलाची आई मात्र सापडली नाही.

सगळ्यांना तीच एक गोष्ट सतावत होती.. कोण ही आई.. मुलाला असं एकट्याला सोडून कुठे गेली.. चढलीच नाही.. उतरून गेली.. चुकामूक झाली.. विसरली.. की सोडून गेली..?

उत्तराच्या प्रतिक्षेत पुन्हा पुन्हा आवाज फिरत होता..
आईचा मुलगा हरवला.. तो मला सापडला..
आणि त्याची आईच तेवढी या आवाजा कडे पाठ करून बसली होती.
मुलाच्या काळजीने अस्वस्थ बायकांचा धीर सुटत चालला होता.. कोणाला त्याच्या आईच्या निष्काळजीपणाचा राग येत होता.. काळच सोकावलाय अस कोणाच मत होतं.. ते काही असलं तरी "तो मला सापडला..! " म्हणणाऱ्या बायकांच्यावर त्याची जवाबदारी येऊन पडली होती. ती आता पार पाडणं भाग होतं.

शेवटचा उपाय म्हणून त्यांनी त्या मुलाला तो कोण, कुठे चालला आहे.. त्याच्या बरोबर कोण आहे विचारायला सुरुवात केली.. त्या मुलानं त्याच नाव 'मोहित' असल्याच सांगितलं, तो त्याच्या घरी चालला होता.. त्याच्यासोबत त्याची मम्मी होती.. तो त्याच्या मम्मी बरोबर प्रवास करत असल्याच कळल्यावर सगळ्या जणींनी त्याला त्याची मम्मी कुठे आहे..? म्हणून विचारून विचारून भांडवून सोडलं, तसं त्याला तो एकटा असल्याची जाणीव झाली. आणि त्याने मम्मी.. मम्मी करून हाका मारत रडायला सुरुवात केली..! आधी गोंधळ होताच, त्यात त्याच्या रडण्याने आणखीनच भर पडली.

मोहीतच्या रडण्या ओरडण्याने त्याची आई हरवली असल्याच्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले. मोहीत ज्या बाईंना सापडला.. म्हणजे तो एकटा, एकाकी प्रवास करत आहे हे ज्या बाईंच्या प्रथम लक्षात आलं त्यांना आता या जवाबदारीच ओझं जाणवू लागलं.. त्या बाईंना पुढच्याच दुसऱ्या का तिसऱ्या स्थानकावर उतरायचं होतं. पण आता या एकट्या मोहितला सोडून त्या उतरूही शकत नव्हत्या.. आता या मुलाच काय करायचं..? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला.. आणि तितक्याच त्वरित त्या प्रश्नाच उत्तरही प्रत्येकीने शोधलं होतं.. आणि ते म्हणजे मोहितला पोलिसांच्या ताब्यात देणं कारण त्याला तो त्याच्या मम्माच्या घरी चालला आहे या व्यतिरिक्त काहीच सांगता येत नव्हतं. आणि आता तर तो असा काही रडत होता की कोणालाच त्याला काही विचारताही येत नव्हतं..! त्यामुळे त्याच्या आजूबाजूला बसलेल्या सगळ्या जणी हतबल होऊन गेल्या.. याच बायकांनी काही क्षणापूर्वी शांतपणे बसलेल्या मोहीतला प्रश्न विचारून विचारून भांडवून सोडलं होतं.. आणि आता त्याच्या रडण्या ओरडण्याने त्यांना सळो की पळो करून सोडलं. मोहीतला पोलिसांच्या ताब्यात द्यावं हे तर सर्वांमते ठरलंच पण कोणी..? या प्रश्नावर गाडी अडली. प्रत्येकीला तिचं घरदार होतं, मुलं बाळ होती.. आपापल्या जवाबदाऱ्या आणि वेळांशी प्रत्येक बाई बांधलेली होती.. तू-मी.. तू-मी करत करत शेवटी दोघी तिघी तयार झाल्या.. त्यातल्याच एकीने सुचवलं, की आपण शेवटच्या स्थानकापर्यंत मोहीतसोबत जाऊया, कदाचित त्याची मम्मा जिथे कुठे असेल तिथून ती येईल आणि त्याला घेऊन जाईल. पण त्या बाईंना तर आता याच्या नंतरच्याचं स्टेशनवर उतरायचं होतं.. आणि त्या एकीने सुचवलेला पर्यायही विचार करण्यासारखाच होता.. त्यावर आतापर्यंत पुढाकार घेणाऱ्या दोघीचं एकमत झालंच आणि तिसरीला मुद्दा पटवून घ्यावा लागला.. की देव न करो पण त्या मोहीतला उतरवून पोलिसांत जायच्या आणि त्यांच्या अतिउत्साहामुळे मोहीत आणि त्याच्या न सापडणाऱ्या मम्माची ताटातूट व्हायची.

इकडे डब्याच्या एका कोपऱ्यात शोध.. तपास.. प्रश्नोत्तरे.. शंका.. सुचनांचे टप्पे पार पडून मोहीतला शेवटच्या स्थानकावरील पोलिस स्थानकात पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रस्ताव पास झाला तरी उरलेल्या डब्यात.. आईचा मुलगा हरवला तो मला सापडला.. ची हाकाळी फिरतच होती. जिच्या तिच्या तोंडी एकच विषय आईविना सापडलेला मुलगा..! आणि जिचे तिचे तर्क वितर्क रंगत होते. असाच एक बायकांचा घोळका तो मुलगा बघायला म्हणून गर्दीतून वाट काढत काढत उतरण्याआधी मोहित असलेल्या दारापाशी पोहचला.. मोहितला बघून कळवळलेल्या मानांनी जोरजोरात त्या निष्काळजी आईला नावं ठेवत उतरण्यासाठी दाराशी पोहचला.. त्या तिथेच एक गलेलठ्ठ मावशी दाराशी फतकल मारून बसलेली होती. अख्ख्या डब्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला प्रश्न, गोंगाट जणू दुसऱ्याच जगात असलेल्या तिने ऐकलाच नव्हता.. आणि काही नाही निदान मुलाचा आरडा ओरडा.. रडणं तरी पोहचावं. तर तेही नाही.. मोहीत ज्या शांत, निवांतपणे डब्याबाहेर बघत होता त्या आणि तितक्याच शांत पणे त्या मावशीही वारा खात होत्या. या उतरणाऱ्या बायकांच्या घोळक्याने उतरायला जागा मिळावी म्हणून या मावशीबाईंना हालवलं, जाता जाता त्या हरवलेल्या मुलाची कहाणी तिला ऐकवली.. तशी बसल्या जागे वरून डब्यात झुकून मावशीबाई "माझं पोरगं हाय बयांनो" करून कातावली.

मावशीबाई दिसण्यावरून तरी मोहीतची आई वाटत नव्हती. नाक, डोळे, मोहीतचा गोडवा.. नीटनेटकेपणा काही काही म्हणून मावशीबाईंमध्ये नव्हते. पिकलेले केस, सुटलेलं अंग, पानानं रंगलेलं तोंड.. ती मोहीतची मम्मा अजिबात वाटत नव्हती. तीन-चार वर्षाच्या मुलाची मम्मा ही अशी..? यावर माझाच काय कोणाचाच विश्वास बसू शकत नव्हता. ( मम्मा या संबोधनामुळे असेल पण एखादी मॉडर्न तरुणी समोर येईल अशी सगळ्यांचीच कल्पना झाली असावी. ) आता मम्मा सापडली म्हणून निःश्वास टाकावा की कोणीतरीच पोरावर हक्क सांगतंय म्हणून संशय घ्यावा..? कोणालाच कळेना..!

मावशीबाईंना पोराचा, साऱ्या गर्दीचा आवाज ऐकू आला नसला तरी त्यांच्या मुलाला मात्र " माझं पोरगं हाय बयांनो" लगेच ऐकू आलं, त्या सरशी बटण दाबून टेप बंद करावा तसं मोहीतच रडणं-ओरडणं थांबलं.. आणि त्याने दाराच्या दिशेने धाव घेतली. ती प्रौढ बाई मोहितची कोणी आहे की नाही याच उत्तर त्याच्या त्वरित झालेल्या कृतीतून मिळालं, तरी ती त्याची आई होती की नाही हा प्रश्न तसाच राहिला.. कोणती आई ही अशी मुलाला गर्दीत सोडून निवांतपणे कशी काय बसू शकते..? कोणती आई अशी असू शकते, जिच्या कानांना मुलाच्या रडण्याच्या आवाजाची ओळख लागत नाही..? आतापर्यंत समोर सगळं काही घडत असताना माझा "आईचा मुलगा हरवला".. या विधानावर विश्वास बसत नव्हता..त्यामुळे मी जागच्याजागीच बघत उभी राहिले.
आणि आता मुलाला अशी कुठेतरी सोडून देणारी बाई त्याची आई असू शकते हे मनाला पटत नव्हतं. ती त्याची आई असेल नसेल.. ( कदाचित दाई वगैरे असावी ) पण तरी तिला मोहीतने ओळखलं होतं. एवढ्या एका कारणाखातर सगळ्यांनी आपला संशय आवरता घेतला.

मोहीत आता एकटा नव्हता. तो त्याच्या मम्माच्या घरी पोहचणार होता.. पण या बायकांनी मघाशी घाई गडबडीत मोहितला जर खरंच गाडीतून उतरवलं असतं तर..? त्या बाईचा न हरवलेला मुलगा खरोखर हरवला असता..! एवढं तरी तिच्या लक्षात आलं असेल का..?

आपल्याला आपलं बालपण सगळ्यात जास्त जर कशामुळे आवडत असेल तर ते तेव्हाच्या निश्चिंततेसाठी..! आई-वडिलांच्या सोबतीचा मोठा आधार आपल्या मुठीत पकडून निर्धास्त चालल्या क्षणांमधल्या सुखाची सर इतर कशासही यायची नाही. पुढे कितीही बाल्य, बालपणीच्या आठवणी जपू म्हटलं तरी बालपण काही जपता येत नाही.. ते आपल्याला मोठं करून संपून जात.. नाही..? आज ज्या शांतपणे तो बाहेर बघत बसला होता तितक्याच शांतपणे पुढचा प्रवास त्याला करता येईल का? मोहितच्या मनातून ते काही क्षणांच एकटेपण पुसलं जाईल का? हे आणि असे कित्येक उगाचचे प्रश्न घेऊ मी ठाण्याच्या स्टेशनवर उतरले, ट्रेन तिच्या मार्गाने निघून गेली.

येता जाता काही घटना.. अशा उगाचच स्पर्शून जातात, त्यांचे ओरखडे मात्र कितीतरी काळ तसेच राहतात.

===========================================
स्वाती फडणीस

हातातला खजिना (लोकल गोष्टी-३)

हातातला खजिना
============================================

रोज सकाळी राजसला शाळेत सोडल्यावर मी ऑफिससाठी स्टेशन गाठायचे.. राजसची शाळा पावणेनऊला सुरू व्हायची त्यानंतर अगदी चालत निघाले तरी नऊ सव्वा नऊ पर्यंत मी पार्ले स्टेशनवर पोहचायचेच. माझ्या कडे तसा बराच वेळ असायचा.. दोन नंबर प्लॅटफॉर्म वर चेंगरा-चेंगरीत घुसून लोकल पकडावी लागायची नाही. सहा नंबर प्लॅटफॉर्म वर नऊ अठरा चर्चगेट लोकल लागलेली असायची. त्या लोकलने मी आरामात जाऊ शकायचे.. आणि जरी काही कारणांनी ही लोकल चुकली तरी पुढच्या लोकलनी मी वेळेत ऑफिसला पोहचायचे. त्यामुळे तसा बराच निवांतपणा होता. आणि मन निवांत असलं की त्याला आजूबाजूच दिसतं.. किंवा दिसलेलं आपल्या पर्यंत पोहचत अस म्हणायला हरकत नाही.

मी स्टेशनवर पोहचायचे तेव्हा लोकल ट्रेनमध्ये.. पिना, टिकल्या, कानातले.. अशा बारीक-सारीक वस्तू विकणाऱ्या बायका त्यांची हातातला खजिना व्यवस्थित लावण्यात मग्न असायच्या.. एकात एक दाबून बसवलेले शर्टाचे बॉक्स त्यातल्या तऱ्हे-तऱ्हेच्या वस्तू पूर्णंपणे उसकटून पसरून ठेवलेल्या असायच्या.. आणि या बायका एकमेकींशी बोलत त्या सगळ्या वस्तू नीटनेटक्या आहेत की नाहीत हे तपासून पुन्हा त्याच शर्टच्या बॉक्स मध्ये मनाप्रमाणे व्यवस्थित लावण्यात गुंग झालेल्या असायच्या. त्याच वेळी त्यांच्या मांड्यांवर त्यांची तान्हुलीही निवांत पहुडलेली असायची.. मग कोणीतरी चहावाला येऊन या बायकांना चहा आणि पाण्याचे ग्लास देऊन जायचा.. ट्रेन येईपर्यंत मी रोज या बायका, त्यांची आवर-सावर, त्यांच्या हालचाली, त्यांची मुलं, अगदी उत्सुकतेने बघायचे.

या पूर्वी साधारण कॉलेजच्या चौथ्या वर्षाला असताना. ताईला मुलगी झाल्या नंतर. तेव्हा त्या गडबड गोंगाटातही गुडुप झोपलेल्या मुलांचं.. त्यांच्या निवांत झोपण्याच खूप आश्चर्य वाटायचं. आणि मग मी या अशाच उत्सुकतेनं ती पाठीवर बांधलेल्या झोळीतली शांत झोपलेली मुलं पाहायचे.झोळीतून जाणवणार त्यांचं लहानग्या चेंडू सारखं वाटणारं डोकं, कधी मधी क्वचितच हालणारे त्यांचे ते इवलेलेसे पाय.. कधी रडणं नाही की उसळणं, चळवळ करणं नाही. या बायकांची मुलं ह्या एवढ्याश्या वयापासूनच समंजस असतात की काय..? मग पुढे कधीतरी त्यांच्या त्या तशा निपचीत पडून राहण्यामागचं कारण कळलं, इतक्या छोट्याशा मुलांना अफू घातली जाते आणि ती ही त्यांच्याच जन्मदात्या आई कडून. हे कळल्या पासून ती क्लांत गाठोडी बघणं सुटूनच गेलं.. ते हे आतापर्यंत.

विक्रीला सुरुवात करण्या आधी या बायकां मात्र निवांतपणे बसलेल्या असताना मांडीवरच्या मुलांचे लाड करायच्या, त्यांच्याशी बोबड्या आवाजात काहीबाही बोलायच्या, त्यांना खेळवायच्या, खाऊ पिऊ घालायच्या.. म्हणजे निदान सगळ्याच्या सगळ्या झोळीवाल्या बायका मुलांना अफूची गोळी चाटवत नसाव्यात.

त्या बायकांच आवरणं.. सावरणं.. बघता बघता मला त्या आवडायला लागल्या.. विशेषतः त्यांच्यातल्या पंधरा सोळा वर्षांच्या कोवळ्या लग्न झालेल्या मुली काही वेगळ्याच दिसायच्या.. त्यांचे ते चापून-चोपून बसवलेले केस, भांगात भरलेला भरगच्च सिंदूर, कपाळावरची उठून दिसणारी ठसठशीत टिकली त्या खाली लावलेली गंधाची हलकीशी रेघ. केसांमध्ये माळलेला गजरा.. अगदी साधी पण नीटनेटकी नेसलेली साडी त्यावर कॉंट्रास मॅचिंग साधणारा ब्लाऊज, त्यांची रेखीव अंगकाठी, आणि मला सगळ्यात जास्त आवडणारे त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस कोवळे भाव.

त्यांच्यातलीच एक मुलगी/बाई मी ज्या ट्रेन मध्ये चढायचे त्या ट्रेनमध्ये चढायची.. तिच्या हातात एक टिकल्यांचा बॉक्स, एक लहान मुलींसाठी केसांना लावायच्या रंगीबेरंगी फुला मण्यांनी सजवलेल्या पिनांचा बॉक्स, एक प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या केसांना लावायच्या चिमट्यांचा बॉक्स त्यात बनाना क्लिप्स, बटरफ्लाय क्लिप्स, बिडस असे काय काय असायचे, आणखीन एक वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेस्लेट आणि गळ्यातल्यांचा स्वतंत्र गुच्छ तिच्या हातात असायचा.. ट्रेनला फारशी गर्दीही नसायची त्यामुळे काही जणी तिच्या हातावरल्या दुकानातल्या वस्तू बघण्यात रस घेत. मलाही ब्रेस्लेट, टिकल्या, पिना असे काहीबाही घ्यायला आवडायचे.. तरी रोज रोज काय घेणार..? एखादं वेळा टिकल्याची तीन-चार पाकीट घेतली की ती एक-दोन महिने सहज पुरतात. कधीतरी दोन-तीन पिना घेतल्या.. एकदा वापरली जाणार नाहीत माहीत असून दोन ब्रेस्लेटस घेतली. ही मुलगी ही अतिशय निरागस अन कोवळी होती.. सकाळी सकाळी तर ती खूपच ताजीतवानी प्रफुल्लित वाटायची.. आता रोज रोच चेहरे बघून माहीत झाल्यामुळे ही मुलगीही मी काही घेतलं नाही तरी तिच्या बॉक्स मध्ये मला उचकपचक करू द्यायची.. आणि कधी मधी काही वस्तू घेतल्या असल्यामुळे मलाही तिचे बॉक्स मागून घ्यायला भीड वाटायची नाही.

ट्रेन मध्ये विशेष गर्दी नसताना या अशा फेरी वाल्यांचे डब्यात येणे चूक की बरोबर असा विचारही कधी मनाला शिवायचा नाही. पण तेच गर्दी मधून प्रवास करताना किरकोळ सामान विकणाऱ्या या बायका, लहान मुलं, विक्रेते बनून किंवा भीक मागायला म्हणून डब्यात चढणारी आंधळी अपंग माणसं.. नकोशी वाटतं. कधी मधी कोणी त्यांना डब्याच्या दाराशी अडवायचं.. कोणी त्यांच्या विक्रीसाठी चालवलेल्या उंच स्वरातल्या हाकाळ्यांनी वैतागायचं.. तर कोणी त्यांना डब्यात चढल्याबद्दल बोलत असायचं कधी कोणी हाकलून द्यायचं.. तरी पण तेच काम करून पोट भरणारीही माणसं दुसऱ्या दिवशी परत डब्यात दिसायची.

मला रोज सकाळी दिसणाऱ्या त्या बायकांनाही यातून जावं लागत असेल..! असं कधीतरी मनात येऊन जायचं. आणि तेवढ्यात डब्यात चढलेली माझी ती सुमुखी दिसायची.. ती दिवसेंदिवस आणखीन आणखीनच सुंदर दिसू लागली होती. तिच्या गळ्यातली काळी पोत. नाकात चमकणारी चमकी.. आणि त्या चमकीहून जास्त लखाकणार तिच्या ओठांच्या महिरपीतलं हसू.. या सगळ्या विचारांना कुठच्याकुठ दूर सारून टाकायचं.

या सुमुखीकडे पाहिलं की नेहमी वाटायचं लोक सौंदर्याची फक्त व्याख्या गोऱ्या रंगाशी कशी काय बांधून ठेवतात बरे..! त्यांना काळ्या सावळ्या रंगातले हे रेखीव नाक डोळे, पांढरं शुभ्र निर्मळ हास्य, काटक प्रमाण बद्ध अंगकाठी दिसतच नाही की काय..?
खरं तर सौंदर्य स्पर्धांच्या मंचावर या मुलींना उभं करायला हवं. एका हातात तीन-चार वजनदार खोकी आणि दुसऱ्या हातात लटकती झुंबर घेऊन डौलात चालण्याच त्यांचं कर्तब कॅटची (वॉक करणाऱ्या) भाची ( वाघीण )म्हणवण्याच्या तोडीच.

आता तर माझी सुमुखी दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदरच दिसत होती.. तिच्या काटक शरीरावरची गोलाई उठून दिसू लागलेली.. तिचा हसरा मुखडा वेगळ्याच तेजानं उजळला होता. काही दिवसातच ती थोडी पाठीमागे झुकल्या सारखी वाटायला लागली.. तिचं पोटही कळून येण्या इतकं पुढे आलं होत.. तरी ती तशीच अंगावरचा आणि खांद्यावरचा भार पेलत सराईतपणे तिच्याकडच्या वस्तूंची विक्री करत दिवसभर या डब्यातून त्या डब्यात फिरतच होती.

कसलं कौतुक नाही.. की कोणती तक्रार नाही. चेहऱ्यावर तेच स्वर्गीय नित्यानंदी भाव..! आणि मग मध्येच एक आठवडा-पंधरा दिवसांपुरती ती कुठेशी गायब झाली.. आणि परतली ते पोटावरची गोलाई पाठीवरती तोलतंच. पण आता मात्र ती पूर्वीसारखी दिसत नव्हती. या आठवड्या-पंधरा दिवसात तिची पूर्ण रयाच गेली होती. नाकात चमकी होती, गळ्यात काळी पोत होती, कपाळावर मोठी टिकली होती.. चापून-चोपून बसवलेले केस तेवढे अस्ताव्यस्त विस्कटले होते.. नीट-नेटकी साडी अंगाला गुंडाळल्या सारखी दिसत होती.. आणि डोळ्यातल्या तेजाची जागा थकव्यानं घेतली होती. आताही ती चालत होती.. अंगाखांद्यावर ते जुनंच ओझं तोलत होती.. गिऱ्हाईकांशी बोलत होती.. तिच्या जवळच्या वस्तू विकत होती.. पण सगळं कसं यंत्रवत. तिचा आत्माच जणू तिला सोडून गेला होता. तिच ते स्वर्गीय हास्य विलग होणाऱ्या ओठांमधून तेव्हासारखं ओसंडत नव्हतं.

आता ती इतर विक्रेत्यांसारखीच दिसायला लागली होती. बऱ्याचदा ती जवळून गेली की घामट पारोसा की कसला कोणजाणे वास यायचा.. त्या नंतर ती नेहमीच पुढे किंवा मागे वाकलेल्या अवस्थेत दिसू लागली.. आणि तसं तशीच जुनाट, निब्बर.. कर्कश वाटू लागली.. आता मी तिच्या कडून पूर्वी पेक्षा जास्त वस्तू खरेदी करू लागले.. कधी कधी अगदी जरूर नसतानाही टिकलीच एखादं पाकीट, एखादी पिन मी घेऊन टाकायचे.. तेवढाच तिला हातभार..! पण त्या नंतर तिच ते स्वर्गीय हसू परत कधी दिसलं नाही ते नाहीच. हे काही तिच्या एकटीचं नाही तिच्या सारख्या सगळ्याच कोवळ्या विक्रेत्याच बऱ्याचदा हे असच होत जात.. नाही..?

इतक्या हसऱ्या इतक्या नीटनेटक्या मुलीच हे असं कसं होऊन जातं..?
हातावरच पोट, वारंवार येणारं बाळंतपण, दारिद्र्य ही कारणं माहीत असल्या मुळे.. मग उगाच.. मनात येतं की ती एक दोन वर्ष त्या इतक्या सुरेख कशा काय दिसतात..? ही नक्की स्वप्नील दिवसांची मोहिनी की.. तारुण्याची जादू..?
त्यांचं ते हास्य ती निरागसता टिकवण्यासाठी काहीच का करता येणार नाही..?

त्या दिवशी मी काही तरी कारणाने लवकर घरी चालले होते.. तेव्हा अशीच एक अर्ध्या-मुर्ध्या वयाची मुलगेली विक्रेती लोकलच्या दाराशी उदासपणे उभी असलेली दिसली.. थोड्याच वेळात तिच्या दोन्ही डोळ्यातून निःशब्दपणे गंगा-जमुना झरू लागल्या.. आणि समोरच उभ्या असलेल्या मला फक्त बघ्याच्या भूमिकेत राहवेना..!

मी काही करु शकत होते किंवा नाही.. ही पुढची गोष्ट पण त्या क्षणी मी निदान तिच्याशी बोलू शकत होते.. तिला तिच्या उदासीच, रडण्याच कारण विचारू शकत होते.. नाही ते तसं मी विचारावंच असं खूप तीव्रतेने वाटून गेलं.. आणि मी तिच्याशी बोलू लागले.

तर तेव्हा तिच्या अनिश्चित जगण्याचा आणखीन एक भाग कळून आला. त्या दिवशी तिला टीसीनी पकडून तिचं हातावरचं पोट सांभाळणारं.. चार खोक्याचं दुकान जप्त केलं गेलं होत. तशी तर तिला या प्रकाराचीही सवय होती.. हप्ता देऊनही.. ही अशी वेळ यावी यातही काहीच नवीन नव्हतं.. तिला दुःख झालं होत ते वेगळ्याच गोष्टीचं.. तिनं विक्रीसाठी आणलेलं सामान तर गेलंच होतं... पण जोडीस जोड त्याच बरोबर दिवसभर राबून मिळवलेले याच बॉक्सच्या मध्ये ठेवलेले पैसेही गेले होते.. ते तेवढेच पैसे गेले असते तरी ती अशी गळून गेली नसती.. आपण विना परवाना लोकलच्या डब्यामध्ये फिरतो हे तिला माहीत होतं, त्यामुळे हे असं कधीमधी होणारच हे तिनं मान्यही केलं होतं. पण त्या खोक्यात तिचे आदल्या दिवशी कमावलेले पैसेही तसेच होते.. त्याच्या जोरावर तिने आज नवीन माल ही उचलला होता.. आणि आता हात पूर्णपणे रिकामे झाले होते.. ती रडत होती ते आदल्या दिवशीच्या कमाईसाठी. तिला ती जायला नको होती.

बोलता बोलता ती हिशोब मांडत गेली. खोक्यातील सामान साधारण पाचशे रुपयांच.. आणि दोन्ही दिवसाची कमाई मिळून दोनशे रुपये.. असा सातशे एक रुपयांचा फटका तिला बसला होता. तिचे अश्रू मला बघवत नव्हते.. आणि तिच दुःख मी दूरही करू शकत नव्हते.. ( मलाही माझे खर्च आणि हिशोब होतेच की. ) सहज वाटलं म्हणून सातशे रुपये काढून तिच्या हातावर ठेवावेत.. एवढी मी दानशूरही नाही. हो, पण मी माझ्या कडून तिला पन्नास एक रुपयांची मदत नक्की करू शकत होते.. मी तसे ते पर्स मधून काढलेही.. तो पर्यंत तिच्या डोळ्यातले अश्रू ओसरले होते.. त्या जागी तेच प्रसन्न हास्य फुलवत तिनं मी देऊ केलेली नोट नाकारली.. पूर्ण आयुष्यासाठी नाही, पण एका उदास क्षणी मला भावणाऱ्या सुमुखीं पैकी एकीला मी काही काळ शब्दांची साथ देऊ केली. याच समाधान माझ्या आणि तिच्या चेहऱ्यावरच, त्या क्षणा पुरतं का होईना..! निरामय आनंदाची आभा पसरून गेलं.

आणि मला त्या सुमुखीच्या हास्याच गुपित ही कळलं..!
============================================

गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या.

मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले.

ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.

मी पुर्वी काम करीत असलेल्या भारतातल्या (सरकारी) कंपनितील लोकांकडून जो उपदेश ऐकायला मिळायचा, त्यावरून ह्या कथेतला बोध लिहीला आहे. त्या बोधावर ही कथा नंतर रचली.

डिसक्लेमर- ह्या पंचतंत्र कथा वाचतांना संस्थळाच्या स्थानिक घडामोडींशी संबंध लावल्यामुळे जर कोणाला त्रास झाला, तर त्यासाठी लेखक जबाबदार नाही.

गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्‍या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्रित काम करून भरपूर शिकार मिळवून देतील.
गाढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत काही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण थाट एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्‍या जंगलात निघून गेला.
बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर
.

आग्रहाचे निमंत्रण..

नमस्कार !
मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप.
मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते..

nimantraN

आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी..

- प्राजु

अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.

फिताधारी कुत्री

फिताधारी कुत्री

एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची. काम संपल्यावर देखील ती फ़िता सगळ्यांना गर्वाने दाखवित मिरवायची. ज्यांना रंगीत फ़िता मिळाल्या नाही, ती कुत्री ईतरांचा हेवा करायची आणि आपल्यालाही फ़ीत मिळावी म्हणून जोमाने काम करीत. गळ्यात फ़ीत असणे ही जणू सामाजीक प्रतिष्ठेची गोष्ट झाली.
शेतकऱ्याला फ़ितांमधील घंटांच्या आवाजाने, कुत्र्यांवर चोवीस तास नजर ठेवणे शक्य झाले. त्यामुळे फ़ार थोड्या खर्चात त्याला चोवीस तासांचे गुलाम मिळाले. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.

एकदा विश्रांतीच्या वेळात माळरानावर जमून कुत्री मौजमजा करीत होती. त्यात एकच फ़िताधारी होता. तो अर्थातच आपल्या फ़ितेचे प्रदर्शन करीत इतरांना जळवीत होता. आपल्या फ़ितेमधून कसे वेगवेगळे मधूर आवाज निघतात, ती फ़ीत वजनाला किती हलकी आहे इत्यादी अप्रुप ऐकून कुत्री मनामधे त्याचा हेवा करीत, वरवर "कित्ती छान, कित्ती आधुनिक" वगैरे म्हणत जिभल्या चाटीत होती. सर्वांची गाणी, गप्पा, खेळणे रंगात आले होते. इतक्यात शेतकऱ्याचा नोकर घंटेच्या आवाजाने माग काढीत तिथे आला. काहितरी महत्वाचे काम ह्या फ़िताधारी कडून करवून घ्यायचे होते, कारण तो एक उत्तम कामगार म्हणून माहिती होता. नोकर फ़िताधारीला साखळीला पकडून आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला.

खरं तर इतकी मौज मजा सोडून कामासाठी जाणे फ़िताधारीच्या अगदी जिवावर आले होते. पण तसे न दाखवता, शेतकऱ्याच्या साम्राज्यात आपण किती महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकिच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणून ऐटीत तो तिथून जाऊ लागला. तेव्हा त्यातली काही बिनफ़िताधारी कुत्री त्याच्याकडे मत्सराने पाहू लागली. त्यानंतर आजुबाजुला चाललेल्या दंगामस्तीचा आस्वाद घेणे देखील त्यांना जमले नाही.

बोध-
१) चैनीचा आभास आणि आभासाची तृष्णा निर्माण करून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
२) निर्भेळ सुख व्यावहारीक जीवनात क्वचितच लाभते. प्रत्येक सुखासोबत काही दु:खे देखील स्विकारावी लागतात.

Syndicate content
Scroll to Top