समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर?
आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं.
असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’. या दोन्ही ठिकाणी गेल्यावर आपल्याला काय लाभणार आहे याची कल्पना प्रत्येकाला असते... निदान तसा त्या व्यक्तीचा समज असतो – जागा बघितल्या नसल्या तरी. पण प्रथम माणसाची रवानगी होते ती तिसऱ्या दारामागे.
तिथे आहे एक अवाढव्य प्रतीक्षालय. इतकं मोठं की त्याचा शेवटच दिसत नाही दार उघडलं की. दिसतात फक्त माणसं. यालाच ‘यमलोक’ म्हणतात. आपण कुठल्या अंतिम स्थळी जाऊन पोहोचणार आहोत याचा निवाडा होण्यापूर्वी सगळे या दालनात येतात. आपण किती चांगली आणि वाईट कामं केली आहेत हा हिशोब झाला की मग पुढचा निर्णय घेतला जातो. साधी माणसं लवकर सुटतात, कारण त्यांचे जमा-खर्च जुळलेले असतात. पण महाउद्योगी लोकांना – मग ते चांगले असोत किंवा वाईट –इथे थांबावं लागतं.
मला वाटतं माणूस हा एकमेव प्राणी आहे, की जो खाऊन पिऊन झालं की गप्पा मारत बसतो. मग त्यातून नको ते विषय तयार करतो. पैसा, देश, धर्म असे अनेक शोध लावतो. त्यावरून भांडायला लागतो. मारामाऱ्या करतो. जिंकतो. हरतो. मारतो. मरतो. शेवटी इथे येतो आणि ताटकळत राहतो.
बरं, जीव असेपर्यंत भूक, झोप वगैरे गोष्टी माणसांना थोड्या वेळासाठी गप्प करू शकतात. इथे दुसरं काहीच काम नाहीये. त्यामुळे उभ्या उभ्या ते अखंड बडबड करण्यात गुंतलेले असतात. सगळीकडे चर्चा, वाद, विवाद चाललेले असतात. म्हणून मी या जागेला ‘यमलोक’ न म्हणता ‘यमसभा’ म्हणतो. मला जेव्हा काम नसतं तेव्हा, त्यांचीच मजा बघत असतो. आता ती गंमतच वाटते. कारण त्यांच्या बोलण्यामुळे काही दुसरं होण्याची शक्यता नसते. पुन: एकमेकांना मारू शकत नाहीत की मरू शकत नाहीत! कुठलीही बाधा करू शकत नाहीत.
शिवाय, इथे स्थळ-काळ संपलेले असतात. जिवंत असेपर्यंत आपण जन्म-मृत्यूच्या तारखांच्या मर्यादेत बंदिस्त असतो. विशिष्ट भूभागांशी संलग्न असतो. आता ही सारी बंधनं गळून पडलेली असतात. त्यामुळे मंडळींच्या चर्चा अतिशय प्रगल्भ आणि प्रभावी होतात. आपल्यानंतर जगात कालपरत्वे झालेल्या बदलांची जाणीव नसल्यामुळे– आणि प्रसारमाध्यमांतून ती आता झाली तरी अंगवळणी न पडल्यामुळे - विलक्षण आश्चर्य, अचंबा, कुतूहल यांच्या भूलभुलैयातून यमसभेचं नातं ‘समयसभे’शी न उरता ‘मयसभे’शी जोडलं गेलेलं असतं.
एकदा अल्लाउद्दीन खिलजी [अ], चेंगिज खान आणि हिटलर यांच्यामध्ये ‘जिनोसाइडचे खात्रीशीर मार्ग’ या विषयावर परिसंवाद रंगला होता. खिलजी आणि खान जुन्या जमान्याचे. सत्ता मिळवणं आणि टिकवणं यासाठी शत्रूला अक्षरक्ष: नष्ट करायचा ही त्यांची पद्धत. हिटलरलाही ती मान्य होती; पण त्याच्या मते या सगळ्यांचं पद्धतशीर नियोजन हवं – कसं, कुठे, किती जणांना मारायचं याचं गणित हवं. थोड्या वेळानं अकबरही त्यात सामील झाला – राजपुतांचा नाश कसा करावा [आ] हे सांगत. काही परिचित शब्द कानी पडल्यावर रघूजी भोसले [इ] आणि चर्चिलही [ई] त्या घोळक्यात घुसले. बंगालच्या मनुष्यहानीचं गौडबंगाल त्यांनी उघड केलं. हिटलरला या बाबतीतही ‘हम भी कुछ कम नहीं’ दाखवता आलं म्हणून चर्चिल खुशीत होता तर, ‘ते आम्हांला काय सांगता? आम्ही ते दोनशे वर्षं आधीच करून दाखवलं होतं!’असं म्हणून रघूजीही.
असंच एका दिवशी अफझलखान, गझनीचा महमूद आणि ओसामा बिन लादेन देवळं आणि शिल्पं कशी फोडावीत याबाबतचे आपले अनुभव एकमेकांना सांगत होते. गझनीच्या महमुदाला विमान माहिती नव्हतं. अफझलखानानं तुकारामासाठी विमान आल्याचं आपल्या कानी पडलं होतं, असं सांगितलं. पण ते कुणीतरी चालवायला (उडवायला) लागतं, हे त्यालाही माहिती नव्हतं. मग लादेननं त्यांना ‘पायलट’, ‘कॉकपिट’ वगैरे संकल्पना समजावून सांगितल्या. नवीन उंच इमारती पाडण्यासाठी विमानं उत्तम, पण जुन्या दगडी इमारतींसाठी ती कुचकामी असतात, असा तिघांनी निष्कर्ष काढला! अफझलखानाच्या काळाआधीच हेमाडपंतानं उंच शिखरं असलेली मंदिरं बांधायला सुरुवात करून काम अवघड केलं होतं, त्यामुळे खानानं अख्खी देवळं फोडण्यापेक्षा फक्त आतल्या मूर्ती फोडलेल्या स्वस्तात पडतात [उ], असं मत मांडलं. गझनीच्या महमुदाच्या दृष्टीनं आपण फोडण्याबरोबरच जर लुटायची कामगिरी पार पाडली [ऊ] तर खर्चाचा प्रश्न उद्भवत नाही, उलट फायदाच होतो! रॉबर्ट क्लाइव्हच्या मते लुटणे हाच तर खरा उद्देश असायला हवा. बाकी मूर्तीपूजन किंवा मूर्तीभंजन यांत कसलं आलंय मनोरंजन?
अर्थात, सगळ्या गप्पा विघातक विषयांवर असतात असं मुळीच नाही हं. शिवाजी महाराज एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘अटकेत असताना माफीनामे लिहिणं अजिबात चूक नाही, तो एक युद्धाचा डावपेच असतो; आपण सुटकेनंतर काय केलं हे महत्त्वाचं असतं’ [ए] हे समजावून सांगत होते, तर दुसऱ्या वेळी ते पहिल्या बाजीरावाचं छत्रसालाला त्यांनी दिलेल्या वचनाला तो जागल्याबद्दल मनापासून अभिनंदन करत होते. तानाजी मालुसरे हिरकणीला, ‘अहो ताई, कडा चढणं एक वेळ सोपं! उतरणं जाम कठीण!’ असं म्हणून तिचं कौतुक करत होता! त्यात सूर्याजीही ‘बरं झालं ताई, तुम्ही हे आमच्या सिंहगड चढाईनंतर केलंत. ही गोष्ट आमच्या मावळ्यांच्या टाळक्यात आली असती तर त्या रात्री कोंढाण्याचे दोर कापून काही फायदा झाला नसता!’ अशी भर घालत होता!
एकीकडे इब्राहीम लोधी, राजा हेमू आणि सदाशिवराव भाऊ यांचं ‘लढाईला आम्ही घाबरत नाही, पण ती करण्यासाठी पानिपत हे स्थळ उपयोगाचं नाही’ यावर एकमत झालं होतं. त्यांच्यात मतभेद इतकाच होता की ‘पानिपत होणे’ हा वाक्प्रचार नक्की कधी रूढ झाला - पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या पानिपत युद्धानंतर?
अशा संवाद-वितंडवादांना एका धाग्यात गुंफणं अशक्य आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता म्हणून आनंद देतो, तसाच इथला प्रत्येक वाद असतो. पण आपल्याला एक दीर्घकाव्य ऐकायचं असलं तर? अशा विचारातून आमच्या साहेबांना – म्हणजे यमदेवांना – एक शक्कल सुचली. आपण कार्यक्रम घडवला या मंडळींचा तर?
यातून आजचा ‘स्वातंत्र्यदिन सोहळा’ जन्माला आला...
(क्रमशः)
- कुमार जावडेकर
संदर्भ:
[अ] https://en.wikipedia.org/wiki/List_of_massacres_in_India, First Slaughter of Chittorgarh by Allauddin Khilji in 1303 (myindiamyglory.com)
[आ] Siege of Chittorgarh (1567–1568) - Wikipedia
[इ] Advanced Study in the History of Modern India 1707-1813 - Jaswant Lal Mehta - Google Books (पृष्ठ क्रमांक २००)
[ई] https://www.theguardian.com/world/2019/mar/29/winston-churchill-policies...
[उ] Afzal Khan (general) - Wikipedia
[ऊ] How Sultan Mahmud, Allauddin Khilji, Aurangzeb Looted and Destroyed Somnath (myindiamyglory.com)
[ए] ‘राजा शिवछत्रपती’ (वॉल्यूम २ - इंग्रजी) – ब. मो. पुरंदरे (पुरंदरे प्रकाशन, २०१४ - पृष्ठ १४८, १५६-१५८)
प्रतिक्रिया
4 Aug 2025 - 11:45 pm | कुमार जावडेकर
या काल्पनिक कथा आहेत. काही ऐतिहासिक संदर्भ, प्रसंग आणि व्यक्ती जरी यांत असल्या तरी त्यांचा उपमर्द करणे किंवा कुणाच्या भावना दुखावणे हा उद्देश नाही. पण सतत भारावून न जाता आणि त्या भारानं न झुकता फक्त हलका-फुलका विनोद करणं हा एकमेव हेतू या लेखनामागे आहे. यातल्या व्यक्तींचा यथायोग्य आदर मलाही वाटतोच. त्यामुळे केवळ मनोरंजन या व्यतिरिक्त काहीही वेगळा अर्थ यातून लावू नये ही वाचकांना नम्र विनंती.
अशीच भूमिका ‘अंताजीची बखर’ मध्ये मराठीत नंदा खरे यांनी मांडली आहे. इंग्लंडमधल्या ‘हॉरिबल हिस्टरीज’ या टी. व्ही. कार्यक्रमातूनही असा खेळकर पद्धतीनं असा इतिहास बघायला / शिकायला मिळतो. इरावती कर्व्यांनी महाभारतानं कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये असं म्हटलं होतं असं आठवतंय. तसाच इतिहासानंही कुणाचीच प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाहीये असं मला वाटतं. किंबहुना इतिहास प्रतिमा रंगवतच नाही - तो फक्त घडतो. त्यातले काही प्रसंग घेऊन आपण त्यांना किंवा त्यांतल्या व्यक्तींना पूज्य अथवा त्याज्य मानू लागतो. कधी कधी हे काही प्रभावांमुळेही होतं. हे सगळं बाजूला ठेवून निव्वळ हसण्यासाठी फक्त काही व्यक्ती / प्रसंगांना विनोदाचीच जोड दिली तर होतील त्या इतिहास्यकथा वा इतिहास्यटिका! थोडक्यात, त्या ‘हास्यास्पद इति’ राहाव्यात म्हणून त्यांचं नाव ‘इति-हास्यास्पद’!
त्यातूनही काही चूक झाल्यास वा उणीव राहिल्यास कृपया क्षमस्व.
- कुमार जावडेकर
5 Aug 2025 - 1:05 am | अमरेंद्र बाहुबली
आवडले. छान लिहिले आहे. फार दिवसानी असा मजेशीर लेख वाचला.
5 Aug 2025 - 5:55 am | कर्नलतपस्वी
महाभारतावर धर्मक्षेत्र नावाची हिन्दी टि व्ही सिरीज आहे. हे इतिहास्यापद नसून विचार करायला लावणारे आहे.
लेख आवडला.
5 Aug 2025 - 10:36 pm | कुमार जावडेकर
अमरेन्द्र आणि कर्नलतपस्वी,
धन्यवाद! ही सिरियल मला माहिती नव्हती. बघायचा प्रयत्न करेन.
- कुमार