प्रतिभा
रंगित खेकडे
हे आहेत रंगित खेकडे खा़डित सापडलेले.

पल पल है भारी..
पल पल है भारी.. (येथे ऐका)
स्वदेस चित्रपटातल्या रामलिलेतलं एक अतिशय सुंदर गाणं..
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई..
स्वराच्या तबल्याचा छान भजनी ठेका. जौनपुरी रागातला सुंदर मुखडा. राग जौनपुरी. आपल्या रागसंगीतातला एक अतिशय गोड, कारुण्याने भरलेला राग!
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
या पुढल्याच ओळीत जौनपुरी बदलला आहे.. जौनपुरीत वर्ज्य असलेले शुद्ध गंधार, शुद्ध निषाद अचानक ताबा घेतात आणि जौनपुरीच्या सुरावटीत हा अचानक झालेला बदल कानाला सुखावून जातो.
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम जी
पुन्हा एकदा कोमल गंधाराचं राज्य!
बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ,
सुन भी लो अब मेरी दुहाई
गाडीनं पुन्हा रुळ बदलले..'सुन भी लो अब मेरी दुहाई' हे शब्द खूप छान पडले आहेत, लयीत पडले आहेत..
राम को भूलो, ये देखो रावन आया है
फैली सारी सृषटी पर जिसकी छाया है
क्यों जपती हो राम\-राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम\-राम का रटन जो ये तुमने है लगाया
सीता, सीता तुमने राम में ऐसा क्या गुन पाया?
ही रावणाची कोरस एन्ट्री ठीक आहे! 
गिन पायेगा उनके गुण कोई क्या,
इतने शब्द ही कहाँ हैं
पहुंचेगा उस शिखर पे कौन भला,
मेरे राम जी जहाँ हैं
क्या बात है.. गाण्याच्या सुरावटीत आता जयजयवंतीचा सुंदर प्रवेश..राग जयजयवंती.. आपल्या रागसंगीताच्या खजिन्यातला अजून एक सुरेख, शांत राग.. जयजयवंतीने रावणाच्या तणतणाटाला अगदी शांतपणे दिलेलं उत्तर! 
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम हैं
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
क्या बात है..! 'सबसे उत्तम हैं' आणि 'मर्यादा पुरुषोत्तम हैं' तलं बॅलन्सिंग खूप छान आहे, प्रसन्न आहे..
राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आए अभी तक वो तुम्हारी रक्षा को
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
ये बताओ वो तुम्हारे राम है इस पल कहाँ
पुन्हा एकदा अहंकारी रावण..
यानंतर मल्हाराशी मिळताजुळते संगीताचे सुंदर तुकडे टाकले आहेत..सारा आसमंत भारून टाकणारा मल्हार..! काय सांगावी आपल्या रागसंगीताची थोरवी? किती वर्णावी आपल्या रागसंगीताची श्रीमंती?
आणि त्यानंतर...?
राम हृदय में है मेरे, राम ही धडकन में है
राम मेरे आत्मा में, राम ही जीवन में है
राम हर पल में है मेरे, राम है हर स्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में
इथे विषय संपतो, या गाण्याचं रसग्रहण संपतं.. कारण? कारण..
'राम हृदय में है मेरे, राम ही धडकन में है' या ओ़ळीमध्ये साक्षात यमन प्रवेशतो आणि सारं गाणं एका क्षणात अत्त्युत्तम उच्चीला पोहोचतं...! यमनबद्दल माझं अनेकदा बोलून झालंय त्यामुळे अधिक काही बोलत नाही..
पल पल है भारी..
मधुश्रीने गायलेलं एक छान गाणं, सुंदर चित्रिकरण. गायत्री जोशी नावाची नटी सीतेच्या भूमिकेत छान दिसली आहे..
अलिकडच्या काळातलं आपल्या रागसंगीतानं समृद्ध असं गाणं.. कालचा, आजचा, उद्याचा - काळ कोणताही असो, आपलं रागसंगीत चिरतरूण आहे.. अजरामर आहे, अमर आहे..नेहमी आपल्या रागसंगीताची भक्ति करावी, पूजा करावी.. त्यातच समाधान आहे, सुख आहे!
या गाण्याकरता रेहमानचं मात्र कौतुक वाटतं! हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं असं खास स्थान निर्माण करणार्या मराठमोळ्या आशुतोष गोवारीकराचंही कौतुक वाटतं!
-- तात्या अभ्यंकर.
मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्भूत स्वप्न !

मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२)
२८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७.
अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया.
हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”. देवाने याच्या जन्मासाठी गाव सुध्दा कसे निवडले ते बघा. हे गाव सम्राट अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांपैकी एक, ज्याचे नाव अब्दूल रहीम खान-ई-खान, त्याने वसवले होते. हा स्वत: मुसलमान असून कृष्णभक्त होता आणि त्याने कृष्णावर बरीच पद्ये रचली होती. या माणसावर परत केव्हातरी मी लिहीनच. याची एक हकीकत सांगतात. हा दानधर्मासाठी बराच प्रसिध्द होता. पण त्याची दानधर्म करायची पध्दत विचित्र/वेगळी होती. तो दानधर्म करताना याचकाच्या नजरेस कधी नजर द्यायचा नाही. याची त्या वेळी नजर नेहमीच खाली झुकलेली असे. हे कळल्यावर कबीराने एक दोहा त्याच्यावरही लिहीला तो असा –
देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन.
सदासर्वकाळ देणारा खरा दुसराच कोणीतरी ( दिन रैन)
मी देतो असे वाटू नये म्हणून माझी नजर ही नेहमी झुकलेली असते. ( तासो निचे नैन).
असो. हे विषय निघाला म्हणून सांगितले.
ब्रिटीश राजवाटीत हे गाव लाकडावरील हस्तिदंताच्या कोरीव कामासाठी प्रसिध्द होते. याच गावात मदनचे आजोबा रामसींग यांनी आसरा घेतला. १९२८ साली त्या गावात त्यांनी एक छोटेसे घर बांधले त्याचे नाव त्यांनी ठेवले “मोहन निवास”. त्या गावातले बुजुर्गांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात त्या गावाच्या पंचक्रोशीतले अनेक कलाकार हजेरी लावत आणी मग मैफिली रंगत. हे काही दिवसाने बंद पडले कारण मदनच्या वडिलांनी म्हणजे सरदार अमरसिंग यांनी ते गाव सोडले आणि ते सिमल्याला स्थायीक झाले. त्यांना सिमल्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली आणि त्या कुटूंबाचा आपल्या गावाशी संपर्क तुटल्यातच जमा झाला. अमरसिंग हे स्वत: संगीताचे उत्तम जाणकार होते आणि पेटी आणि तबला उत्कृष्ट वाजवायचे. त्यांची पत्नी म्हणजे मदनची आई श्रीमती पुरणदेवी, या एक अत्यंत धार्मिक बाई होत्या आणि मदनवर झालेल्या धार्मिक संस्काराचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मदनला एक मोठा भाऊही होता त्याचे नाव मोहनसिंग. या दोघात जवळ जवळ १३ वर्षाचे अंतर होते. हाही स्वत: व्हायोलीन उत्तम वाजवायचा आणि उत्तम गायचा देखील. मदनला एक मोठी बहीण होती तिचे नाव होते शांतीदेवी. ही एक उत्तम गायिका होती आणि तिनेच मदनला त्याच्या दुसर्या वर्षापासून गाणे शिकवायला सुरवात केली. मदनला गळ्याची आणि गाणे समजण्याची दैवी देणगी असल्यामुळे त्याने गाण्यातील बारकावे लवकरच आत्मसात केले. त्यानंतर त्याची गाणे शिकण्यासाठी पंडीत अमरनाथ यांच्याकडे रवानगी करण्यात आली. भावाबरोबर गाण्याचा रियाज़ आणि शाळेतले शिक्षण चालूच होते. जरी शाळेत तो एक हुषार मुलगा म्हणून ओळखला जायचा तरी मदन हा काहीसा अबोल, कोणात न मिसळणारा मुलगा होता. त्याचा वेष चांगला असायचा आणि अंगावर क्वचित त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दागदागीने आणि डोक्यावर चमकणारी पगडीही असायची.
याच काळात प्रसिध्द गायक सैगल हे ही सिमल्यात रेमींग्ट्न टाईपराईटर कंपनीमधे नोकरीला होते आणि ते आपली पेटी घेऊन मोहनच्या घरी बर्याच वेळा भेट द्यायचे आणि मदनबरोबर ते दोघे मस्त मैफिल जमवायचे. अर्थात मदन त्यावेळी फक्त ऐकायचेच काम करायचा कारण त्याचे त्या वेळेस वय होते फक्त दोन. सैगलचे या घराशी स्नेहबंध चांगलेच जुळले होते. शांतीदेवींनी त्याच्या एका काल्का ते कलकत्ता या प्रवासाची आठवण सांगितली आहे, या प्रवासभर ते गातच होते आणि सहप्रवासी त्याचा आनंद लुटत होते. सैगल यांना लहानग्या मदनबद्दल ममत्व होते आणि त्यांना त्याच्या या गाण्याच्या दैवी देणगीचे फार कौतूक होते. सैगल यांनी न्यू-थिएटर्समधे कलकत्याला नोकरी पकडली तरी पण जेव्हा जेव्हा मास्टर मदन किंवा त्यांचे कुटुंबीय कलकत्याला येत, तेव्हा त्यांची काळजी सैगलच घेत.
रेडिओ आणि चित्रपटगृहांचा नुकताच जन्म झाला होता. जाहीर कार्यक्रम हाच जनसामान्यांसाठी संगीत ऐकण्याचा मार्ग होता. त्यामुळे अशा संभांना अलोट गर्दी होत असे. खाजगी मैफिलीही होत असत पण त्या संस्थानिकांकडे. त्यातल्या त्यात उत्तरेला पतियाळा संस्थान तर दक्षिणेला म्हैसूर संस्थान हे कलाकारांचे उदार आश्रयदाते होते.
मास्टर मदनचा पहिला जाहीर कार्यक्रम १९३० सालच्या जून महिन्यात धरमपूर सॅनेटोरियम मधे झाला. त्यावेळी त्याचे वय होते अवघे साडेतीन वर्षे. जे हजर होते ते त्याच्या गायनाने अवाक् झाले. त्या वेळी त्याने ध्रूपदमधे “हे शारदा नमन करू.....” हे म्हटले होते. टाळ्यांच्या कडकडाटात हजर असलेल्या इतर कलाकारांनी या आवाजाचा आणि या जगाचा काही संबंध नाही असे जाहीर केले आणि असे काही आत्तापर्यंत ऐकले नव्हते असे नमूदही केले. या कार्यक्रमाची बातमी एखाद्या वणव्यासारखी भारतात पसरली आणि या कार्यक्रमाला त्या वेळेच्या सर्व वर्तमानपत्रातही जोरदार प्रसिध्दी मिळाली. दुरवरच्या मद्रासच्या हिंदूमधे देखील त्याचे छायाचित्र छापून आले. एका रात्रीत मास्टर मदन किर्तीच्या शिखरावर पोहोचला आणि त्याला सगळीकडून कार्यक्रमासाठी बोलावणे येऊ लागले. सिमला तर त्याचे गावच होते आणि तिथल्या संस्थानिकाचा तो लाडका गायक झाला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो एका महिन्यात सरासरी वीस कार्यक्रम करु लागला. त्या काळात त्याच्या भावाला व्हायोलीनच्या साथीसाठी ऐंशी रुपये तर त्याला २५० रुपये मिळायचे. पण मास्टर मदन हा पैशासाठी गात होता असे ना त्याचे टिकाकार म्हणत ना त्याचे मित्र म्हणत. तो गात असे कारण गाणे ही त्याची आता मानसीक गरज बनली होती. त्यातच त्याला खरा आनंद मिळायचा.
भारतातल्या घरादारात मास्टर मदनचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. जगातले आश्चर्य म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मैथिली शरण गुप्तांनी त्यांच्या भारत भारती मधेही त्याचा उल्लेखही केलेला आपल्याला आढळेल. मास्टर मदनची त्याच्या गुरूंवर (संत नंदसिंगजी महाराज) आतोनात श्रध्दा होती. या गुरूंनी म्हणे त्याच्या अकाली मृत्यूचे भाकित करुन ठेवले होते. खर खोटे माहीत नाही, एकदा या गुरुंच्या उपस्थितीत त्याने जोनपूरी राग इतका भक्तिभावाने आळवला होता की श्रोत्यांना त्या सभेत परमेश्वर हजर असल्याचा भास होऊ लागला. तो भास किंवा आभास म्हणा मास्टर मदनने भैरवी आळवल्यावरच दूर झाला. या लहान वयात त्याची धार्मिक वृत्ती इतकी वाढली की तो आता सतत गुरु नानक यांची प्रतीमा जवळ बाळगायला लागला. एवढेच नाही तर कधी कधी झोपायच्या ऐवजी तो समाधीत जायला लागला.
रेडिओवर आता त्याचे नियमित कार्यक्रम होऊ लागले. त्याची किर्ती ऐकून मुंबईहून त्याला सिनेमाता काम करण्याची विनंती करण्यासाठी माणसे येऊ लागली. पण त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यावेळेस सिनेमात काम करणे सभ्यपणाचे समजत नसत. याचा त्यांना पुढे फारच पश्चत्ताप झाला. कारण जर त्यांनी यासाठी परवानगी दिली असती तर त्याची चित्रफित असती आणि त्यात त्याची प्रतिमा अजरामर झाली असती.
१९४० साली महात्मा गांधी सिमल्याला गेले होते सभेसाठी. ती सभा ओस पडली कारण आख्खे सिमला मास्टर मदनच्या गाण्याला गेले होते.
मास्टर मदनचे शेवटचे गाणे कलकत्यात झाले. त्या कार्यक्रमात त्याने जवळ जवळ दीड तास राग बागेश्वरी आळवला. एका श्रोत्याने बक्षीस म्हणून लगेचच ५०० रुपये दिले- त्या काळात ही रक्कम फारच मोठी होती. परत येताना मदन दिल्लीला त्याच्या बहिणीकडे उतरला. तेथेदेखील दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवर त्याला जावे लागायचेच. या छोट्याला त्याचा मेहूणा सायकलवर घेऊन अलिपोर रोडवर जायचा.
याच मुक्कामात मदनला ताप चढला. पण त्याने रेडिओ स्टेशनवर जायचे चालूच ठेवले होते. वैद्यकीय उपचारांनी ताप काही उतरायची लक्षणे दिसेनात तेव्हा त्याने सिमल्याला प्रस्थान ठेवले. या हवा बदलाचाही काही फायदा झाला नाही. काही दिवसांनी एक चमत्कारिक घटना घडली. त्याचे कपाळ आणि सांधे चमकायला लागले. तेव्हा त्याच्यावर पार्याचा विषप्रयोग झाल्याची शंका बर्याच जणांनी प्रदर्शित केली. किंवा त्याच्या नातेवाईकांच्या अती हव्यासाचाही हा परिणाम असावा. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच गेली.
या जगाचा जुन ६ रोजी त्याने निरोप घेतला. त्यावेळी साल होते १९४२.
आपल्या चुकीची दुरुस्ती “त्याने” बरोबर १४ वर्षाने केली आणी या गंधर्वाला परत बोलावून घेतले.
मास्टर मदन गेल्याला आता ७० वर्षे होऊन गेली पण त्याच्या ताकदीचा आणि संगीताची जाण असलेला गायक अजून या क्षेत्रात जन्मायाचा आहे. सागर निझामीच्या दोन गज़ला आणि काही गाणी एवढीच त्याची संपत्ती आपल्याकडे आहे. एवढी रेडिओ रेकॉर्डींग असताना त्यातले काहीही आपले सरकार मिळवू शकले नाही ही अत्यंत बेजबाबदारपणाची आणि दुर्दैवाची बाब आहे.या थोर स्वर्गिय बालगंधर्वाच्या दोन गज़ला आपण ऐकणार आहोत आणि त्याचा अर्थही समजून घेणार आहोत. सागर निझामीची ही गज़ल -
यूँ न रह रह कर हमें तरसाईये
आइये आ जाईये आ जाईये...
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर मेरी आग़ोश में गिर जाईये
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
जी में आता है यहीं मर जाये
-सागर निझामी.
दोन प्रेमी जिवांच्या मनात काय काय काय चाललेले असते हे त्यांना जन्म देणार्या परमेश्वरालासुध्दा कळणे मुष्कील.
कधी त्याची ओढ तर कधी त्याचा तिरस्कार. कधी अबोला तर कधी प्रेम. कधी क्षमा तर कधी नाही.
सागर काय म्हणतोय ते बघूया.
मला का सारखा तडपवतो आहेस?
ये ना ! एकदाचा ये !
मला सोडतोस, परत परत बाहेर ठोकरा खातोस, काही हरकत नाही,
माझ्या बाहूत तुझा हक्काचा आसरा आहे.
माझ्या जगात तुझी केव्हा पासून प्रतिक्षा आहे.
तुझे जग सोडून ये, माझ्या जगात ये.
नाहीतर ---
ही मदमस्त हवा, हे चांदणे,
तू नाहीस तर मला वाटते की
इथेच मरून जावे.
ही गज़ल इथे ऐका.
आता दुसरी ऐकवतो.
हैरत से तक रहा जहान\-ए\-वफ़ा मुझे
तुम ने बना दिया है मुहब्बत में क्या मुझे
हर मंज़िल\-ए\-हयात से गुम कर गया मुझे
मुड़ मुड़ के राह में वो तेरा देखना मुझे
कैफ़ ख़ुदी ने मौज को कश्ती बना दिया
होश\-ए\-ख़ुदा है अब न ग़म\-ए\-नख़ुदा मुझे
साक़ी बने हुए हैं वो `साग़र’ शब\-ए\-विसाल
इस वक़्त कोई मेरी क़सम देखता मुझे
-सागर निझामी.
माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने हे जग अवाक झाले आहे,
बघ माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने माझे काय काय झाले आहे.
माझ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या मंज़ील मधेच मी हरवलो,
या प्रवासात तुझे माझ्याकडे वळून वळून बघणे.....
किंवा - माझ्या या तुझ्यावरच्या प्रेमाने मला माझ्या अंतीम ध्येयापासून वंचित ठेवले आहे
बघ माझ्या अहंकाराने, बुध्दीने मी या लाटांचीच नाव केली होती...
पण मला आता शुध्द आली आहे आणि हे नाखव्या मला आता कसलेही दु:ख नाही.
किंवा मला आता नावाड्याला जो असतो तसला कसलाही ताण तणाव नाहीत.
सागर म्हणतो, या मिलनाच्या रात्री, ती “ते” आता साकी झाले आहेत,
यावेळी शपत, या अवस्थेत, मला कोणीतरी बघायला पाहिजे....
ही गज़ल इथे ऐका.
मास्टर मदन... एक आपल्या जगाला पडलेले स्वप्न...
मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?
डीसक्लेमर :-
खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही.
"पर्या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.
"वेडाच आहेस, मिपावर प्रसिद्ध होण्यासाठी फार काही कष्ट लागत नाहीत लेका, चल मी समजावतो तुला." मी त्याला आश्वासन दिले.
मिपावर आजकाल दोन प्रकारचे सदस्य पटकन प्रसिद्ध होतात,
१) विचारजंत
२) टुकार
१) विचारजंत :-
ह्या लोकांना स्वत:विषयी फार म्हणजे फारच कौतुक असते. आपण जे काहि लिहितो ते अतिशय ज्ञानसंपन्न, लोकांना शहाणे करुन सोडणारे म्हणजेच 'लै भारी' असते असा ह्यांचा गोड गैरसमज असतो (माझ्यासारखा). आपले लेखन म्हणजे मिसळपाव इतिहासातील सोनेरी अक्षरे आहेत असेच हे लिहित असतात. खरे तर अक्कल असते शुन्य पण आपण फार मोठे ज्ञानी, सगळ्या विषयातली सगळी अक्कल असल्यासारखे वागणे हे ह्यांचे गुण. आपण फार मोठे विचारवंत आहोत असे ह्यांना वाटु लागते आणी मग जंत झालेल्या माणसला जसे सारखी साखर खावेसे वाटु लागते तसे ह्यांना विचार लिहावेसे वाटु लागते. मग एक दिवस ह्यांचे विचारजंतात रुपांतर होते.
विचारजंत होण्यासाठी करावयाचे उपाय :-
१) सहसा इतरांच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नाही, दिला तरी तो प्रतिसाद धाग्यापेक्षा मोठा असला पाहिजे ह्याची काळजी घ्या. धागा १० ओळींचा असेल तर तुमचा प्रतिसाद कमीत कमी २० ओळींचा असला पाहिजे.
२) २/३ दिवसातुन अतिशय रटाळ विषयावर धागे काढुन त्यावर त्याहुनही रटाळ चर्चा करीत रहा.
उदा :-
१) राजीव गांधीचा प्रेम विवाह.
२) समाजातील महिलेचे स्थान व अबलांच्या रक्षणासाठी सरकारी कायद्यातील तरतुदींचा अभाव.
३) सिमेंटच्या आधारभुत किंमतीचे फायदे.
४) भजनलाल ह्यांची पुढील कारकीर्द काय असावी ?
ह्या धाग्यात कोणीही प्रतिसाद दिला नाही तरीही आपण लिहितच रहावे, कुण्या नेत्यांची वाक्ये, पुस्तकातील संदर्भ गुगलुन गुगलुन लिहित रहावे. एखादे फेक प्रोफाईल असल्यास स्वत:च्याच धाग्यावर येउन "अतिशय अभ्यासु लेख." "नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन." अशा प्रतिक्रीया द्याव्यात.
३) एका वाक्याची चार वाक्ये बनवता आलीच पाहिजेत. दुसर्या सदस्यानी दिलेली माहिती आपण दिल्यासारखा आव आणता आला पाहिजे.
उदा :-
'क्ष' ने एखाद्या विषयावर " १९८७ साली पवारांनी हा नियम आंमलात आणला, त्याला महाजन ह्यांनी अनुमोदन दिले." अशी प्रतिक्रीया दिली असेल, तर आपण लगेच "खरे तर हि कल्पना महाजनांची पण 'वाईज थिंक्स अलाईक' असे काहिसे घडुन ती कल्पना आधी मांडण्याचा मान पवारांनी घेतला, १९८७ साल होते ते (मग त्या वर्षात घडलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख करावा. उदा :- १९८७ साल लक्षात रहायचे कारण म्हणजे ह्याच साली अमेरीकन मोटर्स कंपनी ख्राईसलर्स मध्ये विलीन झाली) असे ठोकुन द्यावे. म्हणजे विचार लोकाचे पण ते आपले म्हणुन मांडता आले पाहिजेत.
४) विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. ह्यांनी लिहिलेल्या लेखनावर हे लांबच्या लांब 'अभ्यासु प्रतिसाद' द्यावेत. हे लगेच तुमचे फॅन होउन जातात. संपुर्ण कम्युनिटी ज्या सदस्याच्या लेखनाला 'भिकार' म्हणत असेल त्या सदस्याच्या धाग्यावर जाउन हमखास "मस्त लिहिलय, असे वेगवेगळे विषय कसे काय सुचतात तुम्हाला?" अशी प्रतिक्रीया देउन यावी.
आता बघुयात 'टुकार' कसे बनावे. टुकार बनण्यासाठी धागे व तुमचे प्रतिसाद हे दोन्ही जमेल तेव्हडे टुकार असले पाहिजेत. तुमचे लेखन वाचुन लोकांनी डोकीच आपटुन घेतली पाहिजेत. सध्या अशा सदस्यांची फुल्ल चलती आहे .
टुकार होण्यासाठी काय करावे :-
१) प्रथमत: जमेल तेव्हड्या टुकार प्रतिक्रीया द्याव्यात.
उदा :-
१) 'हिटलर एक क्रुरकर्मा' अशा धाग्यावर जाउन "क्रुरकर्मा ? तुम्हाला काय त्रास दिला त्यानी??" अशी एक टुकार आणी हिणकस प्रतिक्रीया द्यावी.
२) कोणी 'शाळेतील गमती जमती' असा धाग काढला तर तिथे जाउन "तुम्ही मोठे कधी होणार?" किंवा "पाळण्यातल्या गंमती जंमतींचा धागा कधी?" अशी प्रतिक्रीया देउन यावी.
अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्या स्मायली काढतात.
३) जमेल तेव्हडा धागा काढणार्याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्यांचा अपमान करावा.
उदा :-
'बालविवाह आणी कायदा' असा धागा कोणी काढला की लगेच तिथे जाऊन धागा काढणार्याला 'लग्न करा आता म्हणजे असे प्रश्न पडत नाहीत" अथवा " तुमचा बालविवाह मोडला होता का हो?" असे कुच्छीत प्रश्न विचारावेत. एखाद्या प्रतिसादकर्त्याला "काय हो तुम्हाला मुले किती?" असा हलकट प्रश्न विचारावा.
'मिपासाठी आपले योगदान' अशा प्रकारे कोणी धागा काढल्यास "तुमचे सदस्यत्व रद्द करुन घ्या, उपकार होतील' असा एक उगाच हिणकस टोमणा मारुन यावे.
एखाद्या सुंदर कथेवर "लाजवाब, अप्रतिम !" असे लिहुन एकदम खाली, "कुठुन ढापलीत?" असे विचारुन यावे. त्या धाग्यावर 'अगले जनम मोहे बिटिया हि कीजो" वगैरे मालीकांना शिव्या देउन याव्यात. उगाचच कुठल्याही धाग्यावर जाउन "रावण कोणी बघितला का?" अशा चर्चा करुन याव्यात.
एकुण काय तर जेव्हडे टुकार वागता येईल तेव्हडे वागावे. लवकरच आपली (अप)किर्ती मिपावर पसरुन आपण प्रसिद्धी पावाल.
"बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ !!"
-----------------------------------------------------------------------
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३
असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३
वाचकमित्रहो,
वणक्कम!! असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १ आणि भाग २ ह्या स्फुटांस मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ आग्रहवजा विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे तिसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे!
ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री. वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे. सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो :- श्री. वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ’कविराज’ नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत. अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत. तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे. मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, श्री. वैरमुत्तु हे "तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व" होत. असो.
வைரமுத்து

ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...
---
| தமிழெழுத்தில் | देवनागरीमध्ये लिप्यंतरीत | मराठीभाषेमध्ये शब्दार्थ |
|---|---|---|
| யாக்கை திரி காதல் சுடர் |
याक्कै तिरि कादल् सुडर् |
देह वात प्रेम ज्योत |
| ஜீவன் நதி காதல் கடல் |
जीवऩ् नदि कादल् कडल् |
जीवन नदी प्रेम समुद्र |
| பிறவி பிழை காதல் திருத்தம் |
पिऱवि पिऴै कादल् तिरुत्तम् |
जन्म चूक प्रेम शुद्धीपत्र |
| இருதயம் கல் காதல் சிற்பம் |
इरुदयम् कल् कादल् सिऱ्पम् |
हृदय दगड प्रेम शिल्प |
| சென்மம் விதை காதல் பழம் |
सॆऩ्मम् विदै कादल् पऴम् |
जन्म बीज प्रेम फळ |
| உலகம் துவைதம் காதல் அத்வைதம் |
उलहम् तुवैदम् कादल् अत्वैदम् |
विश्व द्वैत प्रेम अद्वैत |
| சருவம் சூன்யம் காதல் பிண்டம் |
सरुवम् सूऩ्यम् कादल् पिण्डम् |
सर्व शून्य प्रेम पिण्ड |
| மானுட மாயம் காதல் அமரம் |
माऩुड मायम् कादल् अमरम् |
मनुष्यजात माया प्रेम अमर |
---
व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या ह्या कवितेत एकही वाक्य नाही. केवळ एकासमोर एक मांडलेले शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा त्याच्या पुढल्यामागल्या शब्दांत असा काही गुंफला गेला आहे की तो संपल्यानंतरदेखील कवितेमध्ये त्याचा अर्थ संपत नाही; उर्वरीतच राहतो. ह्याकारणे, रसग्रहणात नुसता एकच शब्दार्थ लक्षात घेवून चालत नाही, तर त्या शब्दाचे मागीलपुढील शब्दांच्या अर्थाशी नाते जुळवावे लागते. हे झाले ढोबळ अर्थासाठी - तमिळभाषेत एका शब्दाचे अनेक सूक्ष्मार्थ असतात. ते सारे लक्षात घेवून जुळवाजुळवी करून कविता समजावून घेणे म्हणजे एक आनंददायी कसरतच असते. असो! वाचकांस लक्षात येईल, वरील कवितेत कमीत कमी शब्दांत ’प्रेम’ ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त महती वर्णन करण्याची किमया श्री. वैरमुत्तु ह्यांनी साधली आहे. असे करतांना केवळ एकासमोर एक नामे उपयोजिली आहेत. [नाम:- प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना ’नाम’ असे म्हणतात.]
अशा प्रकारच्या कवितांचा सरळसरळ अनुवाद न करता त्यांचा अर्थ (interpretation) करावा लागतो. हे विधान तमिळमधून मराठीमध्ये सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर तमिळमध्येदेखील अशी कविता समजावून घेण्याकरिता तिचा अर्थ करावा लागतो. हा अर्थ बहुतांशी अर्थकर्त्यावर अवलंबून असल्याने तो नानाविध प्रकारे होऊ शकतो. जितके अर्थकर्ते, तितके वेगळे अर्थ. आणि तरीही सारे अर्थ बरोबरच!
उदा:- एखादा तत्त्वचिंतक वरील कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ ’देह म्हणजे जगतात प्रकाश पसरविणाया दिव्याची वात होय.. प्रेम म्हणजे त्या दिव्याची ज्योत होय’ असा करू शकेल, तर त्याच ओळीचा अर्थ एखादा निराशाग्रस्त मनुष्य ’देह हा दिव्याच्या वातीप्रमाणे असतो.. प्रेम हे त्यास ज्योतीप्रमाणे जाळत संपविते..’ असाही करू शकेल.. असे नानाविध प्रकारे अर्थ केले जावू शकतात. त्यातील अमुक अर्थच बरोबर - तमुक चूक असे छातीठोकपणे म्हणतां येणार नाही; कारण कोणास कोणता अर्थ लागू करवून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. गूढकाव्य जे म्हणतांत ते हेच काय?!
व्याकरणदृष्ट्या ही चमत्कृती भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनामुळे झालेली आहे. एकासमोर एक मांडलेली शुद्ध नामे सोडता ह्या कवितेत व्याकरणदृष्ट्या इतर काहीही नाही, आणि तरीही केवढा अफाट अर्थ ही कविता सामावून जाते!
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
अल्लाजान..
त्याला सारे अल्लाजान असं म्हणायचे. कोण होता तो? एका घरवालीचा हरकाम्या. कुणाचा? रौशनी नावाच्या एका घरवालीचा हरकाम्या.. रौशनीआपा आणि तिच्या साऱ्या वेश्या मुली यांचा हरकाम्या. अजून एक हरकाम्या होता मन्सूर. आणि हा अल्लाजान. रौशनीआपाचा वेश्याव्यवसाय चालायचा फोरासरोडला.
तिथे हरकाम्या होता अल्लाजान..
आणि काय ओळख होती या अल्लाजानची? स्त्री? नाही. पुरुष? नाही! अल्लाजान तृतीयपंथी होता.
उभट, किंचित दाढीचे खुंट वाढलेला काळसर बायकी चेहरा.. हावभावही बायकी.. अंगात सदैव कुठलातरी मळका पंजाबी ड्रेस घालायचा.. डोक्याचं साफ टकलं त्यामुळे एक कुठली तरी मळकट ओढणी नेहमी डोक्यावर ओढलेली असायची! चेहऱ्यावर तसं निरागसच परंतु सततचं एक लाचार हास्य! खूप दयनीय दिसायचा अल्लाजान.. माझ्या पोटात नेहमी खूप तुटायचं त्याच्याकडे पाहून!
त्याचं अल्लाजान हे नाव खरं की पडलेलं? तो त्या वस्तीत केव्हापासून आला, कसा हरकाम्या झाला? मला माहीत नाही! या जगात एका दमडीचीही किंमत नसलेल्या अल्लाजानची माहिती कोण ठेवतो? आणि कशाकरता??
रौशनीच्या चाळीशेजारीच झमझम हा देशी दारूचा बार. मी तिथे कॅशियर कम मॅनेजर. एके दिवशी हा अल्लाजान डायरेक्ट बारमध्येच घुसला आणि एकदम माझ्या काउंटरपाशीच भिडला!.. अंगाला जाम वास मारत होता त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा! मला किळसच आली त्याची..
"दो बोईल अंडा पार्सल! "
लाचारीने हसत अल्लाजानने बोईल अंड्यांची पार्सल ऑर्डर दिली..
"आप तात्यासाब है ना? मन्सूरने बताया! " पुन्हा एकदा लाचारी.. बोलताना स्वत:ची लाळ गळते आहे याचीदेखील त्याला लाज नव्हती, शुद्ध नव्हती..!
"शी! कुठल्या घाणेरड्या वस्तीत आपण काम करतो आहोत? ते देखील पोटाकरता? " माझं सुसंस्कृत पांढरपेशी स्वगत!
हरकाम्या म्हणजे कामं तरी को़णकोणती करायचा हा अल्लाजान? पडतील ती कामं करायचा. वेश्यांना लागणाऱ्या पिना-पावडरी-कंगव्यांपासूनच्या साऱ्या वस्तू बाजारातून आणणे, चहापाणी, भुर्जी-आम्लेट पार्सल आणून देणे.. झाडूपोता करणे..
वेश्यांचे कपडे धुणे.. त्यात घाणेरडी, पिवळसर डाग पडलेली त्यांची अंतर्वस्त्रं देखील जमा! साऱ्या जगाची वासना जिथे सांडायची त्या वासनेचे वेश्यांच्या अंतर्वस्त्रांना पडलेले डाग अल्लाजान धुवायचा..!
अगदी पडेल ती कामं करायचा अल्लाजान!
त्या बदल्यात वेश्या त्याला ५-१० रुपयांची रोजी द्यायच्या.. त्या रोजीत अल्लाजान खूश असायचा. आता खूश असायचा असंच म्हटलं पाहिजे..
दुपारच्या फावल्या वेळात, म्हणजे जेव्हा वेश्यांना वासनेचे दणकट घाले सहन करण्यापासून थोडा निवांतपणा मिळायचा त्या वेळेस कधी व्हरांड्यात सगळ्या वेश्या एकत्र जमून अल्लाजानशी हसीमजाक करायच्या.. अल्लाजानही तेव्हा जमेल तसा नाचेपणा करून हसायचा, हसवायचा, खिदळायचा. त्या दुनियेतले हेच काय ते जरा करमणुकीचे, सांस्कृतिक कार्यक्रम!
अल्लाजानशी थट्टामस्करी हीच त्या वेश्यांची करमणूक आणि त्या वेश्या, त्यांची कामं, आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या चार दमड्या हीच अल्लाजानची दुनिया!
"तात्यासाब... पहला पानी पिओ... घबराव मत. पोलिस अब उस मादरचोदकी चमडी उधेडेगा! " असं म्हणून अल्लाजानने पाण्याचा ग्लास माझ्या पुढ्यात धरला होता..
दारू पिऊन, विना पैसे देता बारमधून निघून जाणाऱ्या फोरासरोडवरील एका गुंडाशी माझी हातापायी झाली होती.. मी त्याला जाम मारला होता, त्यानेही मला धुतला होता.. लगेचच तिथे पोलिस आले.. आमचा हप्ता बांधलेला असल्यामुळे त्या गुंडाचा जबरदस्त बंदोबस्त होणार होता..
मी रस्त्यात धुळीत किंचित कोलमडलो होतो. थोडं खरचटलंही होतं. बावरलो होतो, घाबरलो होतो.. अश्या परिस्थितीत भर रस्त्यात माझ्या पुढ्यात पाण्याचा गिल्लास धरला होता तो अल्लाजानने!
तेव्हा कुठे गेली होती माझी किळस? लाज वाटली होती तिला.. तेव्हा मला त्याच्या अंगाचा दर्प आला नाही.. त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा दर्प नाही जाणवला मला! दिसली ती फक्त निरागसता, आणि माणूसकी!. कुठल्याही मिनरल, बिसलेरीच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा अल्लाजानने पुढे केलेल्या त्या ग्लासातलं पाणी अधिक स्वच्छ होतं, शीतल होतं, निर्मल होतं!
अजून काय लिहू? अल्लाजानबद्दल अधिक भरभरून लिहावं असं काही नाही माझ्याकडे.. आणि ज्याच्यावर पानंच्या पानं संपवावीत असं अल्लाजानचं व्यक्तिमत्त्वही नव्हतं..
"तात्यासाब, चिकनका प्लेट और दो रोटी कितनेको? "
मी रक्कम सांगितली.. हातातल्या पैशांची जुळवाजुळव करत अल्लाजान पुन्हा एकदा लाचार हसला होता आणि थोडा वेळ रेंगाळून निघून गेला होता. त्याला चिकन खायचं होतं पण त्याच्यापाशी पैसे होते ते पुरेसे नव्हते, जुळत नव्हते..
असेच काही दिवस गेले. चार दमड्या माझ्या खिशात होत्या. मला अचानक आठवण झाली ती अल्लाजानची.. तो रौशनीआपाच्या चाळीच्या बाहेरच रेंगाळत बसला होता..
"ए अल्लाजान... " मी हाक मारली..
"बोलो तात्यासाब" तो धावतच माझ्यापाशी आला..
"चल मेरे साथ.. "
टॅक्सी केली आणि जवळच असलेलं दिल्ली दरबार गाठलं..
मी आणि एक मळकट, गलिच्छ तृतीयपंथी असे दोघे दिल्ली दरबार मध्ये जेवत होतो..
चिकन मसाला, बिर्याणी, गरमागरम रोट्या, सोबत दहीकांद्याची कोशिंबीर..
हाटेलातले सारे लोक अत्यंत चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहात होते..
सुरवातीला लाजलेला, मुरकलेला अल्लाजान नंतर अगदी मनसोक्त जेवत होता..
धुळीत पडलेल्या तात्याला पाणी आणून देणारा अल्लाजान मनसोक्त जेवत होता..!
-- तात्या अभ्यंकर.
लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार

या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात. भारतात लुईजच्या मृत्यूची दखल इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांनी घेतलेली दिसली नाही. म्हणून या खट्याळ, 'दुर्गुणी' कलाकाराचा परिचय करून देण्याचे मनात आले.
लुईजचा जन्म १९११ मध्ये पॅरिसच्या एका उपनगरामध्ये झाला. पॅरिसमध्ये कलाशिक्षण घेतल्यानंतर १९३८ मध्ये आपल्या अमेरिकन नवर्यासह ती न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाली. आपल्या अभिव्यक्तीसाठी तिने प्रामुख्याने शिल्पकला हे माध्यम निवडले. त्यात ती सातत्याने काम करत राहिली. आज ती विसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाच्या कलाकारांमध्ये गणली जाते, पण तिचे पहिले मोठे प्रदर्शन १९८१ मध्ये, म्हणजे वयाची सत्तरी गाठल्यावर, न्यू यॉर्कच्या म्यूझिअम ऑफ मॉडर्न आर्ट (MoMA) मध्ये भरवले गेले. यावरून एका स्त्रीला कलाजगतात प्रस्थापित होण्यासाठी किती झगडावे लागते, हे लक्षात यावे. MoMA मध्ये एकल प्रदर्शन झालेली ती पहिली स्त्री होती. त्यासाठी निव्वळ विसावे शतक नाही, तर १९८१ साल उजाडावे लागले, हे ही लक्षात घ्यायला हवे.
पुरुषांविषयीची तिची मते घडवण्यात लहानपणीच्या एका अनुभवाचा मोठा हात होता. आपल्या वडिलांचे आपल्याच दाईशी शरीरसंबंध असल्याचे तिच्या लक्षात आले, तेव्हा ती ११ वर्षांची होती. ही गोष्ट आईला ठाऊक असूनही ती सोईस्करपणे वा नाईलाजाने तिच्याकडे दुर्लक्ष करते, हेही लुईजच्या लक्षात आले.
पुरुषप्रधान जगातल्या या पुरुषी कटात सामील होण्याच्या स्त्री-पुरुषांच्या सनातन प्रवृत्तीला लुईजने आपल्या कलाकृतींत अनेक पध्दतींनी हाताळले. उदा. क्युम्युल १ (१९६९) हे शिल्प पाहा.

त्याचे नाव क्युम्युलस या ढगांच्या प्रकारावरून घेतले होते. पण आकार बदलणार्या ढगांच्या रुपात एकाच वेळी स्त्रियांचे स्तन, पुरुषांची लिंगे वा डोक्या़खेरीज संपूर्ण शरीर झाकणारे ख्रिस्ती जोगिणींचे बुरखे-झगे यांचा आभास होतो. लुईज मात्र म्हणते, 'यात मला तर काही लैंगिक आकार दिसत नाहीत!' म्हणजे, दोष असलाच, तर तो पाहाणार्याच्या दृष्टीतच आहे.
'यानुसचा मोहोर' (१९६८) या शिल्पातही अशी गंमत आहे.

यानुस हा दोन तोंडे असलेला एक ग्रीक देव होता. त्याला भूत व भविष्य दोन्ही कळायचे, असे मानतात. त्याच्या पारंपरिक, दुतोंडी चित्रणपध्दतीचा वापर करून लुईज आणखी एक खेळ करते. कापसाचे बोंड उलावे, असे दिसणार्या या मोहोरात दोन टोकांची तोंडे ही पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा आभास निर्माण करतात, तर मधील उलून येणारा भाग हा स्त्रीच्या लैंगिक अवयवाचा आभास व्यक्त करतो. जणू परंपरेने पुरुषी मानलेल्या दुतोंडी देवाच्या चित्रणात दोन मेंदूंच्या जागी स्त्री आहे!
पुरुषप्रधान व्यवस्थेत कुटुंब हा एक मोठा घटक असतो. 'सेल' नावाच्या मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) गटामध्ये (१९९०-९३) कुटुंबव्यवस्थेवरील टीका दिसते. उदा. खालच्या चित्रात दिसणारे घर हे लुईजचे बालपण जिथे गेले त्या घराची प्रतिकृती आहे. ते एका पिंजर्यात आहे, व त्यावर एक गिलोटिन लटकते आहे. स्त्री जोवर घराची जो़खडे झुगारून बाहेर येत नाही, तोवर ती अडकून राहणार व शेवटी क्रूर पध्द्तीने तिचा शिरच्छेद होणार, असा काहीसा भाव यात जाणवतो.

'मामेल' (१९९१) नावाचे तिचे हे रबर शिल्प पाहा.

अभिजात भित्तीशिल्पासारखी रचना असलेले हे शिल्प म्हणजे लोंबकळणार्या स्तनांची एक रांग आहे. स्त्री पुरुषांचे पोषण करते, पण अनेक पुरुषांना ती निव्वळ वासनेची एक वस्तू वाटते. स्त्रीलंपट पण मूलतः स्त्रीद्वेष्ट्या अशा या 'डॉन युआन' प्रवृत्तीचे लुईजला यातून चित्रण करायचे होते. 'एका स्त्रीकडून दुसर्या स्त्रीकडे फिरत राहणार्या, त्यांचा भोग घेणार्या, पण त्यांना काही न देणार्या अशा स्वार्थी पौरुषाचं हे चित्र आहे.' असे स्वतः लुईजने या शिल्पाविषयी म्हटले आहे.
लुईजचे खेळ नेहमी टीका करणारेच होते, असे नाही. उदा. 'नजरेला नजर' (१९७०) या गुळगुळीत, संगमरवरी शिल्पामध्ये एक हळुवारपणा जाणवतो. त्यात उभी लुईज ही जणू लुचू पाहाणार्या मुलांच्या मध्ये उभी असणारी आई वाटते.

पण गुळगुळीतपणा हा फसवासुध्दा असू शकतो. उदा: 'स्त्री सुरी' (१९८२) या अत्यंत आकर्षक दिसणार्या शिल्पात सुरीवजा धमकीही आहे.

स्त्री असण्यामागचा ताणही तिच्या 'आर्च ऑफ हिस्टेरिआ'सारख्या (१९९३) शिल्पांत दिसतो.

गृहिणी-सखी-सचिव असल्या पारंपरिक स्त्री-प्रतिमेला छेद देणारी आणि स्त्रीत्वातल्या मऊ-खडबडीत, आकर्षक-धोकादायक, खेळकर-जीवघेण्या अशा द्वैताला सामोरे जाण्यास भाग पाडणार्या लुईज बूर्ज्वाची ही काही उद् धृते:
मी नरकापर्यंत जाऊन परत आलेली आहे, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते सर्व अद् भुत होतं.
जे म्हणायला लोकांना भीती वाटते, ते कलाकार व्यक्त करू शकतात.
स्वतःला व्यक्त करणं हे एकाच वेळी पवित्र आणि जीवघेणं असतं.
अधिक माहितीसाठी पहा.
आनंदी 'आनंद' गडे!
७ मे ला टोपालोवने १० वा डाव बरोबरीत सोडवला आणि ५-५ अशी गुणांची बरोबरी झाली. पुढचे दोन डाव बघायला मिळणार नव्हते कारण मी प्रवासात असणार होतो. चुटपुट लागून राहिली की काय होणार ते लगोलग समजू शकणार नव्हते.
अकरावा डाव जिंकण्याची निकराची धडपड आनंद करणार असा कयास होता कारण आनंदसाठी पांढरी मोहोरी असणारा तो शेवटचा डाव होता. झालेही तसेच आनंदने कराराने खेळ केला परंतु एकदोन छोट्या चुकांमुळे टोपालोवने डावाचा समतोल साधला आणि आनंदला पुन्हा बरोबरीच पत्करावी लागली, आता गुणसंख्या होती ५.५ प्रत्येकी! शेवटच्या डावात आनंदकडे काळी मोहोरी होती आता तो धोका पत्करणे शक्य नाही असाच सार्यांचा कयास होता, सामना ब्लिट्झ स्पर्धेकडे हमखास जाण्याची लक्षणे दिसत होती. पण तसे झाले नाही आनंदने काळ्या मोहोर्यांनी खेळूनही डाव जिंकला आणि चौथ्यांदा विश्वविजेतेपदाचा मुकुट धारण करण्याची असामान्य कामगिरी केली!
----------------------------------------------------------
बारावा डाव इथे प्रत्येक खेळी करुन खेळून बघता येईल.
----------------------------------------------------------
आता शेवटच्या सामन्याआधीच्या दोघांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊयात. शेवटचा डाव बरोबरीत सोडवायला आनंदची तशी हरकत असायचे कारण नव्हते कारण जलदगती बुद्धीबळात त्याचे वर्चस्व हे वादातीत आहे. त्यामुळे पुढे जलदगती स्पर्धेत सामन्याने प्रवेश करणे त्याच्या एकप्रकारे पथ्यावरच पडले असते. उलट हा डाव जिंकून जगज्जेतेपदाचा मुकुट डोक्यावर चढवायला टोपालोव आतुर झाला होता. सहाजिकच त्याच्यावर दबाव जास्त होता.
शेवटल्या काट्यावरल्या डावात तरी टोपालोव कुठले निराळे ओपनिंग करेल असे वाटत होते पण पुन्हा एकदा सुरुवात वजिराचे प्यादे दोन घरे टाकूनच झाली. (एकप्रकारे हा मानसिक युद्ध जिंकण्याचा प्रयत्न मलातरी वाटला नाही. 'एलेमेंट ऑफ सरप्राईज' मुळे प्रतिस्पर्ध्याच्या मनात तुम्ही काही क्षण जरी खळबळ माजवलीत तरी तुम्हाला मानसिक स्तरावर त्याचा फायदा मिळू शकतो ती संधी टोपाने गमावली असे मला वाटते.)
१ - डी४ - डी५ आनंदनेही वजिराचे प्यादे सरकवले
२ -सी४ - ई६ पांढर्याने वजिराच्या बाजूचे देऊ केलेले प्यादे नाकारुन खेळणे म्हणून 'क्वीन्स गँबिट डिक्लाईन्ड' असे ह्या ओपनिंगला म्हणतात.
३ - एन एफ ३ - एन एफ ६
४ - एनसी३ - बीई७ अशाप्रकारे मोहोर्यांची प्रगती साधणे सुरु होते
५ - बीजी५ पांढरा उंट घोड्यावर चाल करुन गेला. इथे सर्वसामान्यपणे काळा आधी कॅसलिंग करुन घेतो आणि मग उंटाकडे बघतो
एच ६ - आनंदने हत्तीचे प्यादे उंटावर घातले. आक्रमक खेळी करुन आनंदने आपले इरादे दाखवून दिले. टोपालोव तसा आक्रमक स्वभावाचा आहे त्याच्या मानसिकतेला हे आव्हानच होते!
६ - बीएच ४- टोपाने उंट मागे घेतला
सातव्या खेळीला आनंद खेळला एन ई ४- ह्याला लास्कर डिफेन्स असं म्हणतात (इमॅन्युएल लास्कर ह्या जगप्रसिद्ध जर्मन गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि बुद्धीबळ जगज्जेत्याने हा प्रसिद्ध केलेला आहे.)
आता पांढर्या उंटावर काळा उंट आणि वजीर असा दुहेरी जोर आहे. उंटाला हुसकावून लावल्याने माघार घेऊन फायदा नाही टोपालोव उंटांची मारामारी करतो. आणि पुढच्या खेळीला आरसी१ असा हत्ती सी स्तंभात आणून तिथे दबाव वाढवायला सुरुवात करतो.
सी६ आनंद मध्यवर्ती प्याद्याला जोर लावतो. पुढे १३ व्या खेळीपर्यंत माफक मारामारी वगैरे होऊन स्थिती अशी आहे -
पटाच्या मध्याचा ताबा टोपालोवकडे जाऊ शकेल अशी स्थिती आहे. त्याची दोन प्यादी मध्यभागी, एक उंट आणि घोडा चांगल्या जागांवर स्थानापन्न आहेत. हत्ती सी स्तंभात येऊन तिसर्या पट्टीत सरकलाय, राजा कॅसल होऊन सुरक्षित आहे.
उलट आनंदचा पांढरा उंट अविकसित आहे. हत्तींचा समन्वय अजून झालेला नाही, पटाच्या मध्यावरचे नियंत्रण बर्यापैकी आहे पण ते जाऊ नये ह्याची काळजी घ्यायला हवी अशी स्थिती.
पुढल्या दोन खेळ्यात टोपाने उंट ई४ आणि -वजीर सी २ मध्ये आणून ती अशी जोडी बी१-एच७ अशा कर्णात बसवली. पटाच्या मध्यावरचा मुख्य कर्णातला उंट त्रासदायक ठरणार ह्याचा वास लागताच एनएफ६ असे खेळून आनंदने दोन गोष्टी साधल्या एकतर त्या मध्यावरच्या उंटावर हल्ला आणि एच७ वरती येऊन राजाला शह देण्याची धमकी फेटाळली.
पुढच्या खेळीला टोपा सी५ चे प्यादे मटकावतो. इथे आनंदने संधी साधली. मध्यावरचा त्रासदायक उंट त्याने घोड्याने मारलान आणि नंतर सी ५ मधले पांढरे प्यादे घेतले. ह्याने काय काय झाले?
आनंदची ए आणि सी पट्टीतली प्यादी 'आयसोलेटेड पॉन्स' झाली. ह्यांचा तोटा असा की ह्यांना सतत कोणीतरी जोर देत बसावे लागते. पण दोन महत्त्वाचे फायदेसुद्धा झालेत - सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदकडे अजून पांढरा उंट आहे जो पटाच्या मुख्य कर्णावर बसून प्रभावी ठरु शकतो. आणि त्याला विरोध करणारा टोपाचा उंट आता नाहीये. दुसरे असे की बी स्तंभ मोकळा होऊन तिथे हत्ती बसला आहे.
पुढल्या खेळीत आनंदने उंट मुख्य कर्णात आणला पांढरा घोडा डी२ मधे मागे जाताच डी स्तंभात आनंदने दुसरा हत्ती आणून बसवला. एफ३ प्यादे पुढे टाकून टोपाने कर्णातल्या उंटाची चाल सीमित केली.
(इथे सी५ वरचे प्यादे टोपाला खाता येत नाही कारण जर
आर x सी५?? आर x डी२!!
क्यू x डी २ क्यू x सी५ - काळ्या प्याद्याच्या बदल्यात पांढर्याचा घोडा मरतो! अर्थात असल्या लुटूपुटू चुका विश्वविजेतेपदाच्या सामन्यात संभवत नाहीत म्हणा पण प्रत्येक खेळी कशी डावाचा नूर पालटू शकते ह्याची एक चुणूक!!)
बी ए ६ - एफ१ मधल्या हत्तीवर आनंदने उंट घातला
आर एफ २ - हत्ती दुसर्या पट्टीत सरकवून टोपाने त्याच्या घोड्याला जोर लावला.
आर डी ७ - डी स्तंभात हत्ती दुहेरी करायचे आहेत
जी ३ - प्यादे पुढे सरकवून टोपाने राजाला एक घर सुटकेसाठी करुन ठेवले, जर मारामारी होऊन शेवटच्या पट्टीत हत्ती आलाच तर असावे!
आर डी ८ - आनंदचे हत्ती दुहेरी झाले
के जी २ - हलवूनच टाकला राजा दुसर्या पट्टीत भानगडच नको!
बी डी ३ - हत्तीच्या जोरात वजिराला धमकावले उंटाने
क्यू सी १ - जातो बाबा जातो मागे वजीर सी१ मधे गेला
बी ए ६ - पुन्हा उंट आपल्या स्थानी परत आला. (इथे टोपाने बरोबरीसाठी प्रस्ताव ठेवला होता. पण आनंदने तो फेटाळला. वरकरणी पाहता ह्या खेळ्यात तसे फार काही दिसत नाही पण ह्या खेळ्या सायकोलॉजिकल असतात - उंट त्या कर्णात त्रास देऊ शकतो एवढे समजले आणि पुढे पांढर्याचा आक्रमकपणा चालू राहणार असेल तर तशाच खेळ्या येणार. अन्यथा बरोबरी कडे सामन्या नेण्याची इच्छा असली तर तशा खेळ्या येणार. ह्याचे आडाखे अशा खेळ्यांमधून बांधले जातात. बरोबरी नाकारुन आनंदने एकप्रकारे टोपाला डिवचलेच की तुला दिसत नसले तरी मला पुढे आक्रमक खेळण्याच्या जागा दिसत आहेत!)
आर ए ३ - च्यायला काय कटकट आहे शिंची, हाकल पाहू त्या उंटाला म्हणून टोपाने हत्ती त्याच्या आंगावर घातलान!
बी बी ७ - पुन्हा मोठा कर्ण धरला उंटाने
एन बी ३ - सी ५ प्याद्यावर घोडा आला
आर सी ७ - हत्तीने त्या प्याद्याचे बळ वाढवले (ए ७ वरचे प्यादे टोपाला खाता येत नाही कारण मग बी xएफ ६+ शह देऊन हत्ती पडतो!)
एन ए ५ - आनंदच्या उंटाचा काही सोक्षमोक्ष लागाव ह्या हेतून टोपाने घोडा त्याच्यावर नेलान.
बी ए ८ - मला उंट ठेवायचा आहे आणि तो मुख्य कर्णातच - आनंदने जणू सांगितले ह्या खेळीने - थेट राजाकडे डोळे लावून बसलेला कर्णातला उंट ही एकप्रकारे मानसिक दडपण आणणारी गोष्ट सतत घडते आहे.
एन सी ४ - हुश्श! काळ्या सी ५ प्याद्याची वाट अडवून टोपाच्या घोड्याच्या उड्या अखेर थांबल्या.
ई ५ - आनंदच्या खेळाचे वैशिष्ठ्य असे की साधारणपणे ९०% खेळाडू जी खेळी मोक्याच्या वेळी करतील ती तो नेमकी करत नाही तितकीच ताकदवान पण दुसरी अनपेक्षित खेळी करतो आणि प्रतिस्पर्ध्याला विचारात पाडतो. आतासुद्धा ही खेळी अनपेक्षित होती.
ई४ - आनंदचे प्यादे तिथे येण्याआधीच आपण ती जागा बळकावायची म्हणून टोपाने त्याचे प्यादे रेटले (बघा सायकॉलॉजी बघा मानसिक स्तरावरचा लढा हा निकराचा होत जातो.)
एफ५! - आनंदने प्यादे देऊ केले. त्यातसुद्धा गोम अशी आहे की तू मारले नाही तर मी मारणारच आहे!
ई x एफ ५? टोपाने प्यादे खाल्ले - ही एक मोठी चूक त्याने केली आता ई प्यादाचा मार्ग मोकळा झाला. (ही चूक त्याने का केली असावी? कारण इथे एन डी २ अशी साधी खेळी प्याद्याला जोर देणारी दिसत होती. माझ्या मते मानसशास्त्रीय दबावाचा कसा सुरेख वापर आनंदने करुन घेतलाय बघा. सी ४ ह्या घरात येण्याआधीच्या तीन खेळ्यांपूर्वी घोडा डी२ मधूनच निघाला होता, आता पुन्हा तिथेच परत आणायचा म्हणजे काय? पहिल्या खेळ्या वायाच की !- आक्रमक खेळाडूच्या स्वभावतल्या किंचित उतावळेपणाचा हा तोटा झाला.)
ई ४! आनंदने प्यादे पुढे ढकलले.
एफ x ई४ ?? - दुसरी आणि शेवटची चूक!! (इथे पुन्हा एनडी २ खेळण्याची संधी होती तीही गमावली)
क्यू x ई४ + (शह) - के एच३ (पांढरा राजा शेवटच्या पट्टीत जाऊ शकत नाही कारण पांढर्या उंटाच्या जोरात वजीर आत घुसून मात देतो किंवा पांढरा वजीर पडतो! बघताबघता दोन खेळ्यात चित्रच पालटले!)
आर डी ४ - आनंदने हत्ती चौथ्या पट्टीत घेतला - आता क्यू जी ४ शह आणि मात अशी धमकी आहे! (ही धमकी टोपाने प्यादे खायच्या वेळी बघितली नव्हती का? नक्कीच बघितली होती पण पुढे बघा तो काय बघायचं राहिला.)
एन ई ३ - झाले घोडा ई३ मधे आणला की जी ४ घर धरले जाते आणि काळा वजीर काही करु शकत नाही ही टोपाची अटकळ!!
क्यू ई ८!! वजीर परत मागे जातो. मास्टर ब्लो असं ज्याला म्हणता येईल अशी ही मर्माघाती खेळी होती आणि नेमकी तीच टोपाच्या नजरेतू निसटली होती!! (आता क्यू एच ५ # मात अशी धमकी आहे!)
(इथे टोपाच्या चेहेर्यावरचे भाव गंभीर झाले. आपली चूक त्याला उमगली होती पण आता हातात फारसे काही नव्हते. अशा स्थितीत आता आनंदने काही चूक केली तरच आशा होत्या म्हणून टोपा लढत राहिला. कोण म्हणतं बुद्धीबळ हा मानसशात्रीय डावपेचांचा खेळ नाही?!)
जी ४ प्याद्याने प्रतिकाराचा दुबळा प्रयत्न
एच ५ सेकंदाचाही वेळ न लावता आनंदने प्यादे आंगावर घातले
के एच ४ - राजा पुढे नेला
जी ५ + शह (इथे आता हे प्यादे खाण्याशिवाय पांढर्याला पर्याय नाही कारण राजा एच किंवा जी ३ मधे मागे गेल्याबरोबर दोन खेळ्यात मात आहे.)
एफ x जी ६ (एनपासंट नियमाने प्यादे खाल्ले.)
क्यू x जी ६
क्यू एफ १ - अजूनही काळ्या राजावर चालून जाता येईल अशा दिवास्वप्नात आहे की काय टोपा?
आर x जी ४ + (शह)
के एच ३ (घोड्याने हत्ती मारुन शह काढता येत नाही कारण वजिराने घोडा मारुन मात!)
आर ई ७! अप्रतिम खेळी. (आता धमकी कशी आहे बघा आर x ई३, आर x ई३ मग आर एच ४ शह , राजाने हत्ती मारावाच लागतो आणि क्यू जी ४# मात!! क्या बात है!! ऐन डावाच्या धुमश्चक्रीत आनंदला अशा खेळ्या सुचू शकताहेत!)
आर एफ ८ + (शह) हरण्यापूर्वी आनंदच्या राजाला एकदाही चेक दिला नाही असे व्हायला नको म्हणून टोपाने चेक दिला!!
केजी ७
एनएफ ५ शह
के एच ७ (आनंद टोपाला खेळवतोय.)
आर जी ३
आर x जी ३ + शह
एच x जी ३
क्यू जी ४ (शह) राजाला मागे रेटत नेलाय!
आर ई २ + (शह)
के जी १
आर जी २ + (शह) काय केविलवाणी अवस्था झाली आहे पांढर्या राजाची? कर्णातला उंट किती छळू शकतो बघा! आता वजिराने हत्ती मारण्याखेरीज कोणताही पर्याय नाही. ये वजीर मुझे दे दे ठाकूर!!
क्यू x जी २, बी x जी२, के x जी २ - राजाने उंट घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आता एक वजीर विरुद्ध एक हत्ती आणि घोडा असे विषम गणित आहे.
क्यू ई२ + शह , के एच ३, सी४, ए४, ए५, आर एफ ६, केजी८ आनंदने राजा आठव्या पट्टीत नेला.
वजिराकडची आधी आयसोलेटेड ठरलेली प्यादी राखून आनंद खेळतोय.
एनएच ६ + (शह) काळ्या राजाला शह. के जी ७
आर बी ६, क्यू ई ४ (इथे क्यू एफ ३ ही अधिक ताकदवान खेळी होती पण आनंद बहुदा खेळ लांबवतोय आणि टोपाला मानसिक त्रास देतोय!)
के एच २. के एच ७
आर डी ६ क्यू ई ५ - काळ्या वजिराने हत्ती, बी २ प्यादे आणि जी ४ प्यादे एकाचवेळी लक्ष्य केलेत!
एन एफ ७ हत्तीला जोर आणि वजिरावर हल्ला केला टोपाने
क्यू x बी २ + (शह) अखेरीस बी २ चे प्यादे मारुन आनंदने शह दिला
के एच ३
क्यू जी ७ - आनंदने घोड्यावर हल्ला केला.
सी स्तंभातले प्यादे आता रोखले जाणे अवघड आहे. पांढर्याकडे कोणताही बचाव किंवा हल्ला दोन्ही नाहीयेत. टोपालोवने डाव सोडला. आनंद चौथ्यांदा विश्वविजेता झाला!!
-------------------------------------------------------------------------------------------------
टोपाने मान हलवली आणि खुर्चीतून उठून हात मिळवला. एकमेकांच्या डावांवर सह्या होऊन कागद दिले घेतले गेले. टोपालोव झटकन तिथून निघून गेला. आनंदच्या चेहेर्यावर दिलखुलास हास्य मावत नव्हते. त्याच्या आजूबाजूला कॅमेर्यांचा लखलखाट सुरु होता. स्टेजवरुन आतल्या बाजूला जातानाच कॅमेरे त्याचा पाठलाग करत होते. आतल्या बाजूला आनंदची पत्नी आणि स्वीय सहायक अरुणा ही अतिशय आनंदून गेलेली दिसत होती. लगोलग मोबाईल फोन्स काढले गेले. आनंद बहुदा चेन्नैला असलेल्या त्याच्या मातापित्यांशी बोलला असावा.
तीन आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या एका तणावपूर्ण स्पर्धेचा असा आनंददायक निकाल लागल्याने आनंदच्या गोटात अपार खुषीचे वातावरण होते.
------------------------------------------------------------------------------------------------
ऑलिवच्या पानांची यशोमाला गळ्यात घालून फिडे प्रेसिडेंट किर्सान इल्युमझानोव ह्यांच्यासोबत हस्तांदोलन करताना आनंद

आपापल्या चषकांसमवेत उपविजेता टोपालोव आणि जगज्जेता आनंद!

आनंदसमवेत गृहिणी, सखी, सचिवः अरुणा

---------------------------------------------------------------------------------------------------
(श्रेयअव्हेर - सर्व प्रकाशचित्रे www.anand-topalov.com ह्या संस्थळावरुन साभार)
बारा लाख यूरोचे (सुमारे पावणेसात कोटी रुपयांचे) घसघशीत बक्षीस पदरात पाडून आनंद अव्वल ठरला. जगात अभिमानाने भारताची मान पुन्हा एकदा उंच झाली.
ह्या अंतिम सामन्यापूर्वी कास्पारोव आणि व्लादिमीर क्रामनिक ह्यांनी आनंदची सदिच्छा भेट घेतली होती आणि त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे टोपालोवने असा आरोप केला की "आनंदने त्याच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांकडून आयत्यावेळी मदत घेतली आणि त्यात आनंदला काही कमीपणा वाटला नाही हे आनंदला शोभत नाही .."वगैरे वगैरे. ह्यावर अरुणाची प्रतिक्रिया होती की "त्याने सामना सुरु होण्याआधीपासून आमच्यावर आरोप सुरु केले होते त्याही वेळी आम्ही काही उत्तर दिले नव्हते आणि आताही त्याचे आरोप सुरु आहेत त्यामुळे ह्याही वेळी आम्हाला काही उत्तर देण्याइतके ते महत्त्वाचे वाटत नाही. आनंदला काय म्हणायचे आहे ते तो सामन्यात म्हणाला आहेच!"
आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने विमान न मिळाल्यामुळे ४० तासांचा २००० किमी चा प्रवास करुन आणि तीन दिवस सामना पुढे ढकलावा अशी विनंती मान्य न होऊन केवळ एक दिवस सामना पुढे ढकलू शकलेल्या आनंदच्या साहसी जगज्जेतेपदाच्या स्पर्धेची अखेर अशी अमाप खुषीची झाली होती. जगज्जेता असूनही आपल्या विनम्र आणि लाघवी स्वभावाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणार्या ह्या ६४ घरांच्या अभिषिक्त सम्राटाला माझे अभिवादन!!
चतुरंग
ललीमावशी...
काल माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची, काल गेली!
ललीमावशी!
ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!
ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..
शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे..
सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..
मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.
बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!
श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..
कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची! 
उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..
आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!
ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण! 

असो..
'कशी झोक्कात चालली कोळ्याची पोर..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..
चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...
पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!
-- तात्या अभ्यंकर.
कवी ग्रेस यांना प्रतिष्ठेचा नागभूषण पुरस्कार
सविस्तर वृत्त येथे वाचता येईल.
कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो. सरधोपटपणे "ग्रेसची कविता कळतच नाही" असे म्हणणारे रसिकही आहेत. अनेक प्रयत्नांती ते या निष्कर्षाप्रत येऊन पोचतात किंवा ग्रेसच्या कविता अनाकलनीय असल्याचा पूर्वसमज पूर्वग्रहात रुपांतरीत करून ग्रेसच्या कवितांच्या वाटेला जाण्याचे टाळतात.
अनाकलनीय लेखनाच्या बाबतीत बरेचदा ग्रेसची गुलजारशीही तुलना केली जाते. परंतु एक सामान्य रसिक म्हणून मला गुलजारच्या कवितांमध्ये जी टोकाची प्रतिभा आणि आविष्कार दिसतात, तशी टोके गाठलेली ग्रेसच्या कवितेत पहायला मिळत नाहीत. म्हणजे "इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते" लिहिणाराही गुलजार आणि "आँखे भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती हैं" किंवा "आजा आजा दिल निचोडे" लिहिणाराही गुलजारच. आणि त्यातही "पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकों के नशेमन तक इस मोड से जाते हैं" हे वाचून "म्हणजे काय?!" अशी तात्कालिक प्रतिक्रिया हे नवल नाहीच. ग्रेसच्या बाबतीतही असे "म्हणजे काय" स्वरूपाचे प्रश्न बरेचदा पडत असतातच. जसे - "झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया" यातून काय सांगायचे असेल बरे?
इतके असूनही व्यक्तिशः मला ग्रेसच्या कविता वाचणे, अर्थ लावण्याचा नि समजावून घेण्याचा प्रयत्न करणे (पक्षी झगडणे) आवडते. तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे?
ग्रेसच्या कवितांशी रसिकांचे असे झगडणे, कविता कळण्यातील आव्हान, यांतील खुमारी तुम्ही अनुभवली आहे का? असल्यास या काथ्याकुटाच्या निमित्ताने तुम्हांला आवडलेली ग्रेसची कविता, तिचा थोडक्यात अर्थ किंवा तुम्हांला सर्वाधिक आवडलेल्या तिच्यातील एखाद्या कडव्याचा भावार्थ येथे सांगावा. तुम्हांला त्यांच्या कविता वाचण्याची संधी मिळाली आहे का? नसल्यास सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून तुम्ही ग्रेसच्या कविता वाचाल का?

