प्रतिभा
गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या.
मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले.
ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.
मी पुर्वी काम करीत असलेल्या भारतातल्या (सरकारी) कंपनितील लोकांकडून जो उपदेश ऐकायला मिळायचा, त्यावरून ह्या कथेतला बोध लिहीला आहे. त्या बोधावर ही कथा नंतर रचली.
डिसक्लेमर- ह्या पंचतंत्र कथा वाचतांना संस्थळाच्या स्थानिक घडामोडींशी संबंध लावल्यामुळे जर कोणाला त्रास झाला, तर त्यासाठी लेखक जबाबदार नाही.
गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह
एका जंगलात एक सिंह आपल्या कळपाबरोबर रहात होता. कळपातील सिंहीणी रोज त्याच्यासाठी शिकार करून आणत. एक दिवस दुसर्या एका सिंहाने त्याला कळपातून हुसकावून लावले. तेव्हा तो सिंह रानामधे एकटाच राहू लागला. शिकार आणण्यासाठी त्याने एक गाढव, एक रानडूक्कर, एक घुबड आणि एक कोल्हा असे चार मदतनीस कामास लावले. तेही राजाकडे काम मिळते आहे म्हणून तयार झाले. सिंहाला वाटले की या प्रत्येकाची वैशिष्टे एकत्रित काम करून भरपूर शिकार मिळवून देतील.
गाढव दिवसभर रानात चरत फिरायचे. चरायचा कंटाळा आला की लोळत पडायचे. खुशीत आले की दोनचार तानाबिना मारून सर्वांची करमणूक करायचे. सिंह त्याच्याकडे एक आळशी पण गमतीदार प्राणी म्हणून बघायचा. चमूला मनोरंजन येवढाच त्याचा उपयोग होता.
रानडुक्कर शिकार दिसली रे दिसली की तिच्यामागे सुसाट धावत सुटे. त्याला फक्त सरळ रेषेत धावणे जमायचे. गरज पडलीच तर अचानक पावित्रा बदलून शिकार पकडण्याची कला त्याला माहीत नव्हती. जर शिकार यदाकदाचित तावडीत आलीच, तर धडाधड धडका देउन तिला पाडणे येवधेच त्याला माहीत होते. ह्या धकाधकीत रनडुक्कर खूप काम करून थकून जायचे. हा मूर्ख प्राणी सतत काही उपयोगी, काही निरूपयोगी उद्योगात असतो येवढीच माफक माहिती सिंहाला त्याच्याविषयी होती.
घुबड आपले सतत चिंतामग्न बसून असायचे. त्याला उडतांना किंवा काम करतांना कोणीच पाहिले नसावे. चुपचाप एका जागी बसून, डोळे शुन्यात लावून विचार करीत असायचे. कामाच्या चिंतेने रात्रभर झोपायचे नाही. सिंहाला त्याचा एकूण थाट एखाद्या अभ्यासू विचारवंताचा वाटायचा.
सिंहाचा सर्वात विश्वासू मात्र कोल्हाच होता. त्याच्या समयोचित सल्ल्यावर सिंह अवलंबून रहायचा. कोल्हा नेहमीच सिंहाच्या कानाशी लागलेला असायचा. आपल्याला सिंहाची कसी काळजी वाटते, त्याचा पुर्वीचा कळप परत कसा मिळवता येईल वगैरे गुजगोष्टी सिंहाशी बोलत रहायचा. हा काय सारखी कानाफुसी करत असतो हे कोणालाच कळायचे नाही. पण सिंहाचा विश्वासू म्हणून दबदबा असल्याने बाकी चमू त्याला घाबरून होती.
एकदा जंगलामधे वणवा पेटला. जंगल सोडून जायची वेळ आली. त्यावेळी आळशी गाढव व मूर्ख रानडूक्कराला पेटलेल्या जंगलात सोडून, विचारी घुबड आणि विश्वासू कोल्हा या दोघांना घेऊन सिंह दुसर्या जंगलात निघून गेला.
बोध-
आराम नव्हे, काम कर.
काम नव्हे, कामाची फिक्र कर.
फिक्र देखील नव्हे, फिक्रची जिक्र कर.
आग्रहाचे निमंत्रण..
नमस्कार !
मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.
एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग.. आणि एक खूप मोठं पाऊल क्षितिजाच्या दिशेने! याचे साक्षीदार तुम्ही रसिक माय्-बाप.
मोठ्या मनाने, माझ्या बाळबोध कवितांना प्रगल्भ केलंत, अखंड मायेचा हात पाठीवर ठेवलात, नेहमीच उत्तमोत्तम लेखन माझ्याकडून व्हावं म्हणून प्रोत्साहन दिलंत.. तुमची नेहमीच ऋणी राहिन मी.
या माझ्या आनंदाच्या क्षणी, तुमची उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे.. तुमच्या शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शक्णार नाही. अपूर्णच राहील ही घडी !
नेहमीच माझ्या सोबत आलात.. माझ्या या क्षणांतही माझी साथ द्याल असा विश्वास आहे.
आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण.. माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनापासून विनंती करते..

आपल्या सर्वांची वाट पाहीन कार्यक्रमाच्या ठिकाणी..
- प्राजु
अल्बम मधील काही गाण्यांची झलक आपल्याला येथे ऐकायला मिळेल.
कार्यक्रमाच्याठिकाणी अल्बम १०% सवलतीच्या दरात उपलब्ध राहील.
फिताधारी कुत्री
फिताधारी कुत्री
एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची. काम संपल्यावर देखील ती फ़िता सगळ्यांना गर्वाने दाखवित मिरवायची. ज्यांना रंगीत फ़िता मिळाल्या नाही, ती कुत्री ईतरांचा हेवा करायची आणि आपल्यालाही फ़ीत मिळावी म्हणून जोमाने काम करीत. गळ्यात फ़ीत असणे ही जणू सामाजीक प्रतिष्ठेची गोष्ट झाली.
शेतकऱ्याला फ़ितांमधील घंटांच्या आवाजाने, कुत्र्यांवर चोवीस तास नजर ठेवणे शक्य झाले. त्यामुळे फ़ार थोड्या खर्चात त्याला चोवीस तासांचे गुलाम मिळाले. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.
एकदा विश्रांतीच्या वेळात माळरानावर जमून कुत्री मौजमजा करीत होती. त्यात एकच फ़िताधारी होता. तो अर्थातच आपल्या फ़ितेचे प्रदर्शन करीत इतरांना जळवीत होता. आपल्या फ़ितेमधून कसे वेगवेगळे मधूर आवाज निघतात, ती फ़ीत वजनाला किती हलकी आहे इत्यादी अप्रुप ऐकून कुत्री मनामधे त्याचा हेवा करीत, वरवर "कित्ती छान, कित्ती आधुनिक" वगैरे म्हणत जिभल्या चाटीत होती. सर्वांची गाणी, गप्पा, खेळणे रंगात आले होते. इतक्यात शेतकऱ्याचा नोकर घंटेच्या आवाजाने माग काढीत तिथे आला. काहितरी महत्वाचे काम ह्या फ़िताधारी कडून करवून घ्यायचे होते, कारण तो एक उत्तम कामगार म्हणून माहिती होता. नोकर फ़िताधारीला साखळीला पकडून आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला.
खरं तर इतकी मौज मजा सोडून कामासाठी जाणे फ़िताधारीच्या अगदी जिवावर आले होते. पण तसे न दाखवता, शेतकऱ्याच्या साम्राज्यात आपण किती महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकिच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणून ऐटीत तो तिथून जाऊ लागला. तेव्हा त्यातली काही बिनफ़िताधारी कुत्री त्याच्याकडे मत्सराने पाहू लागली. त्यानंतर आजुबाजुला चाललेल्या दंगामस्तीचा आस्वाद घेणे देखील त्यांना जमले नाही.
बोध-
१) चैनीचा आभास आणि आभासाची तृष्णा निर्माण करून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
२) निर्भेळ सुख व्यावहारीक जीवनात क्वचितच लाभते. प्रत्येक सुखासोबत काही दु:खे देखील स्विकारावी लागतात.
द गेम ऑफ द सेंचुरी!
१७ ऑक्टोबर १९५६. न्यूयॉर्कमधे रोझेनवॉल्ड चेस टूर्नामेंट सुरु होती. १३ वर्षाचा एक बालक त्याच्या दुप्पट वयाच्या इंटरनॅशनल मास्टर आणि अमेरिकन चेस चँपिअन असलेल्या डोनाल्ड बायरनसमोर बसला होता.
लोक कुतुहलानं हा सामना बघायला जमले होते. त्यातही हा मुलगा काळी मोहोरी घेऊन खेळत होता त्यामुळे किती चालीत तो मात खातो आहे ह्याचेच आडाखे बहुदा बांधत असावेत पण त्यांना कल्पना नव्हती की त्यादिवशी ते एक इतिहास घडताना बघणार होते!
तो मुलगा होता बॉबी फिशर - होय तोच फिशर ज्यानं पुढल्या काळात बुद्धीबळ खेळाच्या सगळ्या व्याख्याच बदलून टाकल्या!!
ह्या डावाचं आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे आपण जो विंडमिल प्रकार मागल्या लेखात बघितला त्याचाही वापर ह्या डावात झालाय. चला तर मग बघूयात डाव.
डावाची सुरुवात पुस्तकी चालींपेक्षा थोडी वेगळी झाली तरी काही चालींची उलटापालट होऊन पाचव्या खेळीअखेरग्रुनफेल्ड डिफेन्स ह्या प्रकारात डाव स्थिर झाला.
1. Nf3 Nf6 2. c4 g6 3. Nc3 Bg7 4. d4 O-O 5. Bf4 d5
6. Qb3 बायरनने वजीराची बढत केली dxc4 बायरनचे प्यादे मारुन फिशर पटाच्या मध्याचा ताबा काही प्रमाणात सोडतोय आणि त्याचवेळी पांढर्याच्या वजिराला प्यादे मारण्याच्या मिषाने डावाच्या आणखीन मध्यात आणतो.
7. Qxc4 c6
8. e4 Nbd7 घोडा वजिरावरच्या हल्ल्याची तयारी करतो!
9. Rd1 बायरनचं सगळं लक्ष पटाच्या मध्यावर मोक्याच्या जागा धरुन बसलेल्या मोहर्यांना पुढे कसं रेटता येईल ह्याकडे आहे. Nb6 वजिरावर हल्ला झाला.
10. Qc5 वजीर मागे नेण्यापेक्षा पाचव्या पट्टीत बसवायची संधी कोण सोडेल? पण हे करताना वजीर अशा घरात गेलाय की Na4/Ne4 ह्या दोनपैकी एका खेळीने वजिरावर हल्ला होऊ शकतो. परंतु बायरनचा c3 वरचा घोडा ही दोन्ही ठाणी सांभाळायला समर्थ आहे असं त्याला वाटतंय!
Bg4 - फिशर त्याचा उंट पुढे आणतो. त्याचा राजा आधीच किल्लेकोटात आहे आणि बायरनचा नाहीये. (डावाचे काही मूलभूत नियम असतात त्यानुसार तुमच्याकडे सक्षम खेळ्या असतील तर राजा किल्लेकोटात लगेच नाही नेला तरी चालतो अन्यथा किल्लेकोट टाळू नये - लवकरात लवकर करावा.)
11. Bg5? बायरनची ही खेळी चुकली, सपशेल चुकली!! (ह्या ऐवजी 11. Be2 आणि त्यानंतर 12 O-O राजाला किल्लेकोटात नेणे आवश्यक होते). मोहोर्यांच्या प्रगतीत फिशरने घेतलेली आघाडी ही तात्पुरती आहे असा सोयिस्कर समज बायरनने करुन घेतला असावा.
11... Na4!! अफलातून खेळी! वजिरावर हल्ला आणि घोड्याचे बलिदान द्यायची तयारी.

(बायरनने जर 12. Nxa4 करुन घोडा मारला तर फिशर ...Nxe4 खेळून त्याला अडचणीत आणतो. कसा ते पहा. पुढच्या चार शक्यतांचे विश्लेषण स्वतः फिशरनेच दिले होते! -
13. Qxe7 Qa5+ 14. b4 Qxa4 15. Qxe4 Rfe8 16. Be7 Bxf3 17. gxf3 Bf8 .
13. Bxe7 Nxc5 14. Bxd8 Nxa4 15. Bg5 Bxf3 16. gxf3 Nxb2 ह्याने फिशरला एक प्यादे जास्त मिळतेच आणि बायरनची प्याद्यांची मांडणी विस्कळित होते ती वेगळीच
13. Qc1 Qa5+ 14. Nc3 Bxf3 15.gxf3 Nxg5 इथे बलिदान केलेले मोहरे परत मिळते आणि शिवाय पोझीशनल अॅडवांटेजही.
13. Qb4 Nxg5 14.Nxg5 Bxd1 15.Kxd1 Bxd4 16.Qd2 Bxf2 इथे मोहर्यांचे नुकसान पदरी येते.)
लक्षात घ्या हे सर्व विश्लेषण करणारा फिशर १३ वर्षाचा होता!!
12. Qa3 . 12... Nxc3 सकृतदर्शनी ही खेळी पांढर्याला पटाच्या मध्यावर मजबूत पकड घ्यायला मदत करते आहे की काय असे वाटते परंतु फिशरचा प्लॅन ह्याच्या बरोबर उलटा आहे. c3 घरातला घोडा खाऊन Nxe4 करुन आपल्या घोड्याचे बलिदान द्यायचे आणि पांढर्याचे मध्यावरचे नियंत्रण घालवायचे, मध्यात अडकलेला पांढरा राजा ही मोठी अडचण ठरणार आहे बायरनला.
14. Bxe7 वजीर आणि हत्तीपैकी एक मिळेल ह्या आशेने बायरन वजिराच्या जोरात उंटाने प्यादे मारतो Qb6 वजीर शांतपणे बाजूला घेतो फिशर.
15. Bc4 बायरन शहाणा आहे. हत्ती घेणे परवडणारे नाही हे त्याच्या लक्षात आले कारण 15. Bxf8, Bxf8 16.Qb3 Nxc3! 17.Qxb6 (इथे जर चुकून हे खेळला 17.Qxc3?? Bb4!! पांढरा वजीर पडतो! ) axb6 18.Ra1 Re8+ 19.Kd2 Ne4+ 20.Kc2 Nxf2 21.Rg1 Bf5+ हे काळ्यासाठी वरचढ ठरते!
Nxc3! फिशर त्याची पाठ सोडत नाही. धोड्याने प्यादे खातोच. आता जर वजिराने घोडा खाल्ला Qxc3 तर काळा हत्ती उंटाला राजाबरोबर पिन करतो Rfe8. (गेलेले मोहरे प्याद्याच्या आघाडीसह परत मिळते सव्याज!)
16. Bc5 बायरनचा उंट फिशरच्या वजिरावर आला, आतातरी मागे जातोस की नाही?
छे छे, फिशर काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता! त्याने शह दिला Rfe8 +.
17. Kf1 राजा बाजूला घेऊन आता बायरन वाट बघतोय की आता तरी वजीर मागे जाईल.
Be6 !! फिशरची आश्चर्यकारक खेळी. वजिराचे बलिदान करायची तयारी!!
काय समज आहे डावाची, काय अंदाज आहे मोहर्यांच्या शक्तीचा आणि त्यांच्या स्थानमहात्म्याचा, काय आत्मविश्वास आहे स्वतःच्या डावपेचांवर!! वा!!! हे काव्य आहे खेळ नव्हे, हा गाण्यातला अंतरा आहे खेळी नव्हे!!
इतक्या लहान वयात एवढी खेळाची समज बघून थक्क होतो आपण. (वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर उभा राहणारा तेंडल्याच आठवतो अशा वेळी!!)
स्वतःच्या सामान्य मोहर्यांच्या मदतीने फिशर अतिशय घणाघाती हल्ला चढवायची धमकी देतोय. वजिराची ही ऑफर नाकारणे फारच कठिण आहे.
शिवाय तो बी६ वरचा उंट खाताही येत नाही कारण मग घुसमटून मात आहे (ज्याला स्मॉदर्ड मेट असं म्हटलं जातं: 18. Bxe6 Qb5+ 19. Kg1 Ne2+ 20. Kf1 Ng3+ 21. Kg1 Qf1+ 22. Rxf1 Ne2#)
(बाकी दुसर्या मार्गांनीही अडचणीच आहेत जसे 18. Qxc3 Qxc5 आता प्याद्याने काळा वजीर खाल्ला तर उंटाने पांढरा वजीर पडतो.)
18. Bxb6?? बायरन वजीर घेतो. अजूनही आपण ह्या नवख्या पोरावर मात देऊ असे त्याला वाटत होते बहुदा. त्यातल्यात्यात बरी खेळी होती Bd3.
आता सुरु झाली आपली प्रसिद्ध विंडमिल! (मागल्या लेखात कार्लोने ती लास्करविरुद्ध वापरली होती इथे फिशर बायरनला पिसणार आहे!)
Bxc4+ शह 19. Kg1 राजा जी १ मधे हालला
Ne2 शह 20. Kf1 राजा पुन्हा एफ १ मधे
Nxd4 घोड्याने प्यादे खाउन उंटाचा काटशह
21. Kg1 पुन्हा राजा जैसे थे Ne2 घोड्याने शह
22. Kf1 अरेरे पुन्हा हेलपाटा Nc3 काटशह
23. Kg1 पुन्हा एकदा जी१ (बायरनचे काय हाल होत असतील, एक तेरा वर्षाचा पोरगा आपल्याला खेळवतो आहे आणि जनता बघते आहे! छे छे! अवघड आहे.)
axb6 उंट मारुन हत्तीने वजिरावर चढाई 24. Qb4 चला राजाची जरा तरी सुटका झाली आणि बायरनने वजीर उंटावर घातला.
Ra4 फिशर आता आपली पकड आवळायला सुरुवात करतो. घोड्याच्या जोरात हत्ती वजिरावर आला आणि त्याने उंटाला अप्रत्यक्ष मदतही केली.
25. Qxb6 वजिराने प्यादे मारुन आपली सुटका करुन घेतली Nxd1 हत्ती मारला अखेर फिशरने. आता राजा पूर्णपणे उघडा पडलाय आणि वजीर एका बाजूला गेलाय. दुसरा हत्ती कोपर्यात आहे.
26. h3 राजाला सुटकेचा एक मार्ग मोकळा करुन ठेवलान बायरनने. Rxa2 हत्तीने प्यादे मारले. एकेक करुन विरोध जिरवणे सुरु आहे वाटेतला पण बायरन समोर आता फक्त बघत बसण्याशिवाय फारसे काही शिल्लक नाही.
27. Kh2 राजा दुसर्या पट्टीत नेला Nxf2 अजून एक प्यादे पडले.
28. Re1 हत्तीची मारामारी करायची आहे बायरनला Rxe1 हत्ती मारला.
29. Qd8+ शह Bf8उंटाने शह काढला
30. Nxe1 आता हत्ती मारला बायरनने Bd5
31. Nf3 Ne4 फिशरने घोडा मधे आणला कारण आता राजाला मैदानात खेचायची वेळ झाली आहे.
32. Qb8 शेवटचा एक दुबळा प्रयत्न प्यादं मारण्याचा. b5 काळ्याचे प्रत्येक प्यादे आणि सर्व मोहोरी जोरात आहेत. दुबळे कोणी नाही. पांढर्याच्या वजिराला फारसे काम नाहीये आता!
33. h4 h5 एच प्याद्याची आगेकूच थांबवली फिशरने.
34. Ne5 Kg7 पिन झालेला उंट मोकळा करुन घेतला.
35. Kg1 राजाच्या मृत्युघंटा वाजायला लागलेल्या आहेत. Bc5+ शह.
आता फिशर डाव कसा संपवत नेतो बघा. एक कलाकारी आहे त्यात. उगीच कुठेतरी मोहोर्यांच्या अतिरिक्त हालचाली करुन डावाचा विचका केलेला नाही. शांतपणे एकेक खेळी करुन राजाभोवती तो फास आवळत नेतो.
36. Kf1 Ng3 + शह. राजाचे मागे जायचे घर बंद झाले आता फक्त पुढेच जायचे!
37. Ke1 Bb4 + शह. हत्तीने दुसरी पट्टी धरली आहे आणि दोन उंट राजाला आळीपाळीने रेटत नेताहेत क्या बात है!!
38. Kd1 Bb3 + शह.
39. Kc1 Ne2 + शह. उंटांची कामगिरी संपल्यावर घोडा मैदानात उतरला. काय कॅलक्यूलेटेड हालचाली आहेत बघा. एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्याने फिशर सुरी फिरवतोय, बिनतोड, लाजवाब!
40. Kb1 Nc3 + शह
41. Kc1 Rc2# मात! खेळ खलास!!
काय डाव आहे!! बायरननेसुद्धा मनात म्हटलं असेल क्या बात है!! अरे, अशाप्रकारे हरायला सुद्धा भाग्य लागतं!!
--------------------------------------------------
हा संपूर्ण डाव इथे खेळून बघता येईल.
फिशरचा हा डाव माझा फार आवडता डाव आहे. वयाच्या मानाने त्याने ज्या कौशल्याचा खेळ दाखवलाय त्यात मिखाईल तालची झाक दिसते. भलेभले खेळाडू वजीर वाचवत डावभर फिरतात तिथे हा पोरगा बेधडक वजीर उंटासमोर टाकतो. असामान्य बुद्धीबळ प्रतिभा लाभलेला हा एक कलावंत होता पण पुन्हा शापितच..असो. फिशरबद्दल पुन्हा कधीतरी.
चतुरंग
-----------------------------------------------
ता.क.
बुद्धीबळप्रेमी आणि जावा, ड्रुपल, एच्टीएमेल च्याजाणकारांना एक विनंती आहे की मिसळपावावर बुद्धीबळाच्या पटाचे चित्र कसे टाकता येईल ह्यासंबंधी काही मार्गदर्शन हवे आहे. तशी सोय खेळ विभागात एखाद्या मेन्यूत करुन देता आली तर फारच उत्तम. कारण डाव समजावून सांगताना त्या त्या वेळची स्थिती जर दाखवता आली तर डाव 'विज्युअलाईज' करण्याचे कष्ट वाचतात आणि डावाचा आनंद जास्त लोकांना घेता येईल.मी ऑनलाईन काही प्रोग्रॅम्स उतरवून त्यातून बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही.
धन्यवाद!
-रंगा
अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)
परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला!
विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते. बुद्धीबळात जेव्हा दोन किंवा क्वचित तीन मोहर्यांच्या समन्वयातून प्रतिस्पर्ध्याचा राजा त्याच्याच प्यादी आणि इतर मोहर्यात असा सापडतो की आलटून पालटून एकदा शह आणि लगेच काटशह देऊन अनेक मोहर्यांची, प्याद्यांची त्या 'पाट्या-वरवंट्यात' चटणी होते आणि डाव हातचा जातो.
कार्लोने त्याच्या चक्कीत कोणा ऐरागैर्याला पिसला असता तर ह्या डावाला कितपत महत्त्व आले असते माहीत नाही पण त्याने ज्याला पिसले तो होता जगज्जेता महारथी ग्रँडमास्टर इमॅन्यूएल लास्कर!
कार्लोच्या नावाने टोर्रे अॅटॅक असे एक ओपनिंगसुद्धा आहे ह्यावरुन ह्याची बुद्धीबळाच्या क्षेत्रातली कामगिरी लक्षात यावी.
लास्करविरुद्धचा हा डाव १९२५ साली मॉस्को इंटरनॅशनल टूर्नामेंट मध्ये खेळला गेला. पांढर्या मोहर्यांनी खेळणार्या कार्लोने डावची सुरुवात टोर्रे अॅटॅकनेच केली -
1. d4 Nf6 2. Nf3 e6 3. Bg5 c5
पाचव्या खेळीपर्यंत ओपनिंग नक्की झाले.
4. e3 cxd4 5. exd4 Be7 6. Nbd2 d6 7. c3 Nbd7 8. Bd3 b6 9. Nc4 Bb7 10. Qe2 Qc7 11. O-O O-O
अकराव्या खेळीपर्यंत डावाच्या मध्यावर ताबा मिळवण्याची धडपड दोघांनी केली आणि राजांचा किल्लेकोट करुन सुरक्षितता आणली. दोन्ही बाजूंच्या हत्तींचा समन्वय झालेला आहे. एकेक प्यादे सोडले तर बाकी सर्व सेना व्यवस्थित आहे. कार्लोकडे जागेचा वरचष्मा आहे परंतु अजूनतरी निर्णायक फायदा दिसत नाही.
12. Rfe1 Rfe8 13. Rad1 Nf8 14. Bc1 Nd5 15. Ng5 b5 16. Na3 b4 17. cxb4 Nxb4 18. Qh5 Bxg5 19. Bxg5 Nxd3 20. Rxd3 Qa5
विसाव्या खेळी अखेर स्थिती अशी आहे - सी स्तंभ मोकळा झालेला असला तरी त्याचा ताबा कोणी घेतलेला नाही. कार्लोचे दोन्ही हत्ती अनुक्रमे डी व ई स्तंभात आहेत्.त्याचे डी प्यादे आयसोलेटेड आहे. त्याच्याकडे एक प्यादे कमी आहे.त्याचा घोडा डावाच्या डावीकडे जाऊन बसलाय. परंतु त्याच्या वजीर आणि उंटाने काळ्या राजाच्या बाजूला पाचव्या पट्टीपर्यंत मुसंडी मारली आहे.
लास्करकडे एक प्याद्याची बढत आहे. त्याचे ए स्तंभातले प्यादे आयसोलेटेड आहे. उंटाने ए८-एच१ हा मोठा कर्ण धरलेला आहे. वजीर चौथ्या पट्टीत बसलाय. एकूण स्थिती बरोबरीची दिसत असली तरी पांढर्याकडे पोझीशनल अॅडवांटेज आहे.
21. b4 काळ्या वजिराला चौथ्या पट्टीतून हुसकवायला कार्लो त्याचे प्यादे पुढे टाकतो
Qf5 - काळा वजीर एफ ५ घरात हलला
आता हत्ती जी३ मधे आणूण कार्लो राजावर दबाव वाढवायला सुरुवात करतो. लास्करने एच ६ प्यादे पुढे टाकून पांढर्या उंटाला हुसकवायचे ठरवले आहे. आता गंमत अशी आहे की पांढरा उंट काढला तर वजीर पडणार कारण वजिराला आधारच नाही!
22. Rg3 h6
डी ६ चे प्यादे दुबळे आहे असे हेरुन कार्लोने घोडा सी४ मधे आणला. आता पांढरा उंट खाता येत नाही कारण मग डी६ चे प्यादे खाऊन घोडा वजीर -आणि ई८ मधला हत्ती अशी कात्री लावून बसतो आणि हत्ती पडतो.
23. Nc4 Qd5
इथे लास्करने वजीर डी ५ मधे नेला.
24. Ne3 - पुन्हा एकदा वजिरावर घोडा आणला Qb5 वजीर बी ५ मधे सरकतो. लास्करला काही केल्या पाचवी पट्टी सोडायची नाहिये कारण पांढर्या उंटाचा त्याचा मोह सुटत नाहीये!
आता कार्लो काय खेळणार? ए४ असे प्यादे वजिरावर टाकून प्याद्याचा बळी देऊन उंटाची सुटका करुन घेणार. दोन प्याद्यांची आघाडी म्हणजे भरपूर झाली असा लास्करचा कयास!
काय होते पहा -
25. Bf6!!! उंट एफ ६ - हीच ती खेळी ज्याने हा डाव जगप्रसिद्ध झाला! वजिराचा बळी देऊ केलान कार्लोसने!!
आता हा वजीर खावाच लागतो लास्करला कारण नाही खाल्ला तर R x g7+, Kh8, Qxh6# अशी दोन खेळ्यात मात आहे.
Qxh5 - वजीर खाल्लान लास्करने आणि चक्की चालू झाली!!
कोपर्यात अडकलेल्या राजाला शह मिळाल्यावर हलण्यासारख्या केवळ दोनच जागा असल्याने तो चक्कीत पिसला जाणे अपरिहार्य आहे -
26. Rxg7 शह Kh8 राजा एच ८ मधे
27. Rxf7 हत्तीने प्यादे मारुन उंटाचा काटशह Kg8 - राजा पुन्हा जी ८
28. Rg7 शह Kh8 राजा पुन्हा एच ८ मधे
29. Rxb7 हत्तीने उंट मारुन काटशह Kg8 - राजा पुन्हा जी ८
30. Rg7 शह Kh8 - बिचारा राजा पुन्हा एच ८
31. Rg5 हत्तीचा वजिरावर हल्ला आणि काटशह Kh7 - हुश्श आत्ता कुठे चक्कीतून सुटून सातव्या पट्टीत राजा आला!
32. Rxh5 - काळा वजीर पडला! Kg6 - पांढरा उंट खायला मिळणार पण काय व्हायचं होतं ते नुकसान झालं आहे.
33. Rh3 Kxf6 34. Rxh6 Kg5 35. Rh3 Reb8
पस्तिसाव्या खेळीअखेर पांढर्याची तीन प्यादी जास्त आहेत आणि काळ्या राजाला भर मैदानात आणून त्याची ससेहोलपट झाली आहे!
36. Rg3+ शह Kf6
37. Rf3+ शह Kg6
38. a3 a5 39. bxa5 Rxa5 - ए पट्टीतल्या प्याद्यांची मारामारी करुन काळा हत्ती मैदानात आणण्याचा प्रयत्न.
40. Nc4 - दुबळे डी प्यादे Rd5 - हत्तीचा प्याद्याला जोर आणि पांढर्या डी ४ प्याद्यावर हल्ला
41. Rf4 Nd7 - घोडा डावात आणण्याचा लास्करचा प्रयत्न
42. Rxe6 - ई ६ चे प्यादे पडले आणि शह. Kg5 - राजा हत्तीवर न्यायचा दुबळा प्रयत्न
43. g3 प्याद्याने हत्तीला जोर आणि पुढल्या काही खेळ्यात मात अटळ. लास्करने डाव सोडला!!
काय भन्नाट डाव आहे! वा!!
भर डावात वजिराचा बळी देऊन चक्की चालवण्यामागची कल्पनाशक्ती ही थक्क करणारी आहे. इतक्या मातबर मोहर्याचा बळी देणे हे प्रतिस्पर्ध्याच्या विचारात येणेही अवघड असते कारण डावाच्या तार्किक संगतीत अशा खेळ्या बसत नाहीत त्यामुळे बलिदाना विरुद्ध कोणताही बचाव नसतो!! ती एक उत्स्फूर्त कला असते. कल्पनाशक्तीचा आविष्कार असतो. भले त्या खेळाडूंनी वर्षानुवर्षे बुद्धिबळाचं विश्व गाजवलं नसेलही पण अशा एकदोन चमकदार डावांनी त्यांनी बुद्धीबळाला अनमोल रत्नं प्रदान केलेली असतात!!
कार्लोसला माझा सलाम!!
टीप - हा संपूर्ण डाव इथे खेळून बघता येईल.
चतुरंग
अवलिया को गुस्सा क्यो आता है ?
काल संध्याकाळी दुकान बंद करायला घेतले आणि तेव्हड्यात फोन वाजला. बघतो तर चौपाटीवरच्या बारच्या म्यानेजरचा फोन.
"हॅलो परा साब जल्दी आओ यार, इधर तुम्हारा दोस्त नाना राडा कर रहा है, वेटर को गालीया दे रहा है "
मी डोक्याला हात लावला आणि चौपाटीकडे धावलो. साला चौपाटीचे रंग रुपच बदलून गेले आहे आजकाल हे जाणवुन गेले. चौपाटी अजुनच झगमगायला लागली होती. ह्यावेळी चौपाटीवर तरुणाईचा उत्साह जाणवण्यागत वाढला होता, एका कडेला मोठा स्क्रीन लावुन त्यावर फुटबॉलच्या मॅचेस दाखवल्या जात होत्या. साला क्राउड एकदम खेचला गेला होता तिकडे. काही जुने चेहरे गायब होते तर काही गायब झालेले जुने चेहरे पुन्हा दिसायला लागले होते. इकडे तिकडे बघता बघता एकदाचा बार मध्ये जाउन पोचलो.
अंधारात नजर सरावली आणि एका कोपर्यात विषण्णपणे बसलेला अवलिया दिसला, बाजुलाच आमचा बारचा म्यानेजर देखील बसला होता.
"आओ सेठ, देखो ये क्या लफडा किया. वेटरने सामनेका प्लेट उठाया तो वेटर को गालिया देना लगा. बोलता है "मेरा लेख कायको उडाया?" अब गलतीसे प्लेट उठा लिया वेटरने, इतना गुस्सा कायको करनेका ? सब राडा कर दिया.
"नान्या लेका किती पेग ढोसले ? काय झालय काय तुला?" मी नाना शेजारी बसत म्हणालो. नजर खिडकी बाहेरच्या चौपाटीकडे भिरभिरतच होती.
"आपण चौपाटी सोडुन चाललो आता. आता इकडे मन नाही लागत." नाना शून्यात नजर लावुन बोलला.
"काय नाटके करतो रे नान्या ? असे झाले काय तुला ? साला इतकी वर्षे ह्या चौपाटीवर एकत्र राहिलो, दंगा केला, मजा लुटली आणि तु असा एकदम सोडून जाणार ?"
"आपली गरज नाही राहिली आता चौपाटीला परा. जरा कुठे दुकान उघडले की अतिक्रमणवाले येतात आणि सगळा माल जप्त करुन नेतात. परत का जप्त केला ते पण सांगत नाहीत. दुकान उघडायचीच चोरे झालीये आता मला."
"काय बोलतो नाना ? अरे पण इन्स्पेक्टर पाध्येंशी सेटलमेंट झाली होती ना तुझी ?"
"सोड रे ! साप म्हणावा आपला पण 'अतिक्रमणवाला' म्हणू नये आपला" नाना एका दमात पेग संपवुन मोकळा झाला.
माझी नजर अध्ये मध्ये बाहेरच भिरभिरत होती.
"पर्या भाड्या, इकडे लक्ष दे तु ! बाहेर काय फुफाटा शोधतो का आता ?" नाना वैतागला.
"नान्या यार आपला चौपाटीवरचा फुगेवाला दिसत नाही रे आजकाल ? आणि तो धनुष्यबाण विकणारा कुठे गेला?"
"खी खी खी फुगेवाला आजकाल परिस्थीतीने नाडला गेलाय. आता तो गोग्गोड म्हातारीचा कापूस विकतो." नाना डोळे मिचकावत म्हणाला.
"नान्या लेका तुझे येवढे जुने दुकान असुन माल जप्त कसे काय करतात बॉ ? मानसीक रीत्या अल्पवयीन असणार्यांची दुकाने धो धो चालतात, मग तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे ?"
"काय कळत नाही रे परा. मला म्हणतात की नाना तु चौपाटीचे वातावरण गढुळ करतोस म्हणुन" नाना अंमळ हळवा झाला असावा.
"खी खी खी मग साल्या तु तुरटी का विकायला सुरुवात करत नाही ? ते जाउदे.. तु आता सरळ जप्त न होणारा माल विकायला सुरुवात कर बरं !"
"तो काय असतो ? डिटेलमध्ये बोल."
"चल नान्या तु भी क्या याद करेगा, कागद पेन घे तुला लिस्ट देतो बनवुन !" ह्या माझ्या उच्चाराबरोबर वातावरण निवळल्याचे ओळखुन बारचा म्यानेजर टेबलावरुन ऊठला. "अबे ए, परा साब को एक कागज देनेको बोल ना जल्दी.. और साथ मै पेनभी भेज फटाफट..!" जाता जाता त्याने हुकुम सोडला.
"हा नान्या घे लिहायला..."
मालाचे नाव - मालाचा प्रकार
१) मकर राशीत शिरलेल्या शनीचा आणि कर्केत आलेल्या बुधाचा इतर राशींवर होणारा परिणाम = माहितीपुर्ण लेख.
२) अंतर्वस्त्रांचे बाह्यसौंदर्य = महितीवजा अनुभवकथन.
३) सुई-दोर्याशीवाय शर्टाला बटने कशी लावावीत = अनुभव कथन + सल्ला.
४) लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे काही काळातच बायको जेंव्हा गरोदर होईल तेंव्हा तिला सरकारी दवाखान्यात अॅडमीट करावे का खाजगी ? आजकाल घरी सुईणी वगैरे येतात का ? ते कितपत सुरक्षीत असते ? = काथ्याकूट + मदत हवी आहे.
५) माझा अमेरीकेतला मित्र आणि त्याच्या बायकोचे पगारावरुन होणारे वाद = अनुभव कथन
६) माझ्या भाच्याने मला मी त्याला एक कागदी नाव करुन दाखवल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ५० कागदी पक्षी, १०० नक्षीकामे कशी करुन दाखवली, आजकालची स्मार्ट पिढी इ. इ. - अनुभवकथन + आस्वाद
७) माझ्या खोलीच्या खिडकीतुन दिसणर्या भाजीच्या स्टॉलवरील विविध रंगी आकर्षक भाज्या = कलादालन.
८) माझ्या बाथरुम मध्ये पोपडे उडालेल्या भिंतीवर पाणी पडुन निर्माण झालेले विविध मनमोहक आकार = कलादालन.
९) 'आज सकाळ मध्ये आलेली फलाना-फलाना बातमी' हि कोणी वाचली का ? अजुन किती अधोगती होणार आहे भारताची ??? = काथ्याकूट.
१०) मी संगणकाचा माऊस साफ करायला कसा शिकलो = प्रकटन + अनुभवकथन.
११) "पिपात मेले ओल्या उंदिर " ह्या कडव्यात नक्की कोणते छंद आहेत ? हि गझल आहे का कविता ? = छंदशास्त्र + काथ्याकुट.
१२) शरिराला नक्की अपायकार काय असते ? आत्ममैथुन का हस्तमैथुन ? = मदत हवी आहे.
१३) कुठल्याही चित्रपटाबद्दल १५/२० वाक्ये आणि त्याच्या अध्ये मध्ये ५/१० फोटु = चित्रपट परिक्षण.
"म्हणजे तु करतो तसे ??" नान्याचा हलकटपणा जागृत झाला...
मी काहीएक सडेतोड उत्तर देणारा येवढ्यात माझा फोन वाजला. फोनवरील संभाषण संपताच मी ताडकन उभा राहिलो.
"नान्या चल मी पळतो रे आता.."
"अरे पर्या पण लिस्ट अर्धवट राहिली ना. कुठे चालला येवढ्या घाईत ? "
"डोन्रावांचा फोन होता.. दुकानच उडवले म्हणतायत माझे....."
पाणी साठवा.
हे कोवळे कोंबही कसे पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही त्यांच्याकडून धडा घेतला पाहीजे.

कृष्णा नी बेगने..
कृष्णा नी बेगने..(येथे ऐका)
(हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी. त्याचं स्वागतच आहे..)
कानडी भाषेतलं कृष्णावरचं फार सुंदर गाणं.. व्यासतीर्थांची रचना.. यमुना कल्याणी रागातलं.. कर्नाटक-संगीतातला यमुना कल्याणी, आपल्या हिंदुस्थानी संगीतातला यमन कल्याण! दाक्षिणात्य गायिका चित्राने गायलं आहे हे गाणं..
साजूक तुपातली मिठाई तीच.. यमनची! फक्त बॉक्सेस वेगवेगळे! 
'कृष्णा नी बेगने बारो' - रे कृष्णा इकडे (माझ्याकडे ) ये रे लवकर..!
'ष्णा' अक्षरावरच्या शुद्ध गंधारात अक्षरशः देवत्व आहे.. साक्षात श्रीकृष्णच वस्ती करून राहिला आहे त्या स्वरात.. किती कौतुक आहे त्या 'कृष्णा' शब्दात.. किती गोडवा आहे! एखादी आई आपल्या लाडक्या लेकाला ज्या ममत्वाने हाक मारते तेच ममत्व या 'कृष्णा' च्या स्वरात आहे.. फक्त दोनच स्वर - सा आणि ग!
'बेगने बारो..' तल्या 'बारो' शब्दावरची 'प रे' संगती म्हणजे अगदी ऑथेन्टिक यमन! 
'बेगने बारो मुखवन्ने तोरो' - रे कृष्णा लौकर इकडे ये रे आणि मला तुझं मुखावलोकन करू दे..
खूप छान गायली आहे ही ओळ.. ह्यातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? यमनकल्याणातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? इतकंच सांगेन की तो शुद्ध मध्यम म्हणजे यमनाच्या गालावरचा सुरेखसा तीळ! हवं तर आपण त्याला बाळकृष्णाच्या गालावरील तीट म्हणू.. जी असते दृष्ट लागू नये म्हणून, कुठलंही अमंगल टाळण्याकरता असते ती.. परंतु ती तिट स्वत: मात्र अतिशय पवित्र.. सुमंगल आणि देखणी! तसा आहे यमनकल्याणातला शुद्ध मध्यम! 
'बेगने बारो' गाताना चित्राने 'ध़नी़रेग..' ची एक सुरावट अशी घेतली आहे की नारायणरावांच्या 'नयने लाजवीत..' पदातल्या 'जणु धैर्यधर धरित धनदासम धन' मधल्या 'धनदासम' ची आठवण व्हावी! 
काशी पितांबर कैयल्ली कोळलू
मीयोळू पुसिद श्रीगंध घमघम..

रे कृष्णा, तू सुरेखसं काशीचं केशरी पितांबर नेसला आहेस आणि तुझ्या हातात बासरी आहे..चंदनलेपाने अभ्यंगित अशी तुझी कांती आहे!..
मंडळी, हे अभ्यंग चंदनलेपाचं नव्हे, ते आहे यमनकल्याणच्या स्वरांचं.. काशीच्या भरजरी केशरी कदाचं जे सौंदर्य, तेच सौंदर्य यमनकल्याणचं..! 
तायिगे बायल्ली मुज्जगवन्ने तोरिद
जगदोद्धारक नम्म उडुपीय श्रीकृष्ण..
कृष्ण, ज्याने बालपणी आपल्या मातेला आपल्या मुखात सार्या विश्वाचं दर्शन घडवलं होतं, असा सार्या जगाचा उद्धार करणारा असा उडुपीचा श्रीकृष्ण!
कृष्णाने सार्या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!
असो,
कन्नड भाषेतलं हे फार सुंदर गाणं.. याचं हरिहरनने फ्यूजन केलं आहे तेही खूपच सुंदर आहे.. येशूदासही सुंदर गातो हे गाणं..
सदरच्या ध्वनिफितीत चित्रानेही हे गाणं अगदी मन लावून गायलं आहे.. सोबतची बासरी आणि सतारदेखील खूप छान! बरं वाटतं हे गाणं ऐकून, समाधान वाटतं, पवित्र वाटतं, मंगल वाटतं..! हे देणं देवाघरचं, हे स्वरसामर्थ्य यमनकल्याणाचं..!
अण्णांशी जेव्हा या गाण्याबद्दल बोललो तेव्हा अर्थ सांगताना अण्णांनीही सहजच गुणगुणलं होतं हे गाणं. पण अक्षरश: शब्दातीत गुणगुणलं होतं..! फक्त माझ्यासाठी.. मी एकटा श्रोता, त्या अलौकिक स्वरांचा साक्षीदार! 
अहो, सबंध गाणं तर सोडाच.. अण्णांनी सुरवातीचे नुसते 'कृष्णा नी ' हे शब्द गायले आणि मी जागीच संपलो.. कल्पना करा - अण्णांचा आवाज आणि कृष्णा नी मधले षड्ज, गंधार! अक्षरश: शंखध्वनी, नादब्रह्म!
असो..
हा लेख मी त्या जादुगार कृष्णाच्या, कानडाऊ विठ्ठलू असणार्या आमच्या पांडुरंगाच्या आणि कानडाऊ भीमसेनूंच्या चरणी अर्पण करत आहे..
-- तात्या अभ्यंकर.
ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे..
हा लेख इतरत्र पूर्वप्रकाशित. काल हा लेख मिपावर लिहावयास गेलो परंतु कामकाजानिमित्त मिपा बंद होते, त्यामुळे अन्य संस्थळावर लिहिला होता. आज मिपा सुरू झालेले पाहिले म्हणून इथेही डकवत आहे..
--तात्या.
माझे किती क्षण राहिले.. (येथे ऐका, येथे अनुभवा!)
दूर कुठेतरी आमिरखासाहेब मारवा आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश भट मारवा उलगडून सांगताहेत..!
'माझे किती क्षण राहिले.. ' हा सुरेश भटांचा मारवा केवळ शब्दातीत आहे, अप्रतिम आहे!
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.!
स्वरांचं बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग जबरदस्त! अचूक स्वर लागले आहेत, नेमके लागले आहेत..! भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना त्यांनी गाण्याची कुठे रीतसर तालीम घेतली आहे की काय, असं वाटतं अशी विलक्षण एकतानता, एकाग्रता..! सारं राज्य शब्दांचं, सारा अंमल सुरालयीचा!
भटसाहेबांचा कोमल रिषभ अंगावर येतो!
होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले..
मारव्याच्या सुरावटीकरताच केवळ हे शब्द जन्माला आले.. आणि म्हणूनच भटसाहेबांनी हे शब्द मारव्यात गुंफले.. हे विलक्षण अद्वैत आहे.. शब्दांचं आणि मारव्याच्या सुरांचं!
गझल-गायकी म्हणजे काय ते इथे कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ गझल वाचन नव्हे.. आज मराठी गझलांच्या वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम होतात.. या सगळ्या नवख्यांनी शिकावं की गझल कशी वाचावी, कशी मांडावी.! पण त्या करता जाण असावी लागते स्वरांची. स्वर जगावे लागतात, अनुभवावे लागतात! त्याशिवाय मुशायरा-गायकीची पेशकारी येत नाही!

ह्या गझल गायकीला ताल नाही की ठेका नाही, परंतु लय कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक अदृश्य लय!
लय- शब्दसुरांचा श्वासोश्वास!
उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले!
'उभे' शब्दानंतरचा लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण' वरचा धम'गरेसा चा मारव्यातला भन्नाट अवरोह..! याला म्हणतात गाणं, याला म्हणतात लय, याला म्हणतात गायकी!
हे केवळ गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर मारव्याचा भन्नाट जमलेला विलंबित ख्याल! भटांचा हा मारवा अन् त्याची गायकी भिनते सिस्टिममध्ये!
काळवंडलेलं आकाश.. तीन सांजा झालेल्या.. भयाण तीन सांजा आणि अंगावर सरसरून येणारी कातरवेळ..!
हा मारवा नाही, हे स्वगत आहे.. भटसाहेबांचं स्वगत!
'मागे कितीजण राहिले हा हिशेब मागतो आहे हा मारवा! पण हिशेब द्या किंवा नका देऊ.. दुनियेला फाट्यावर मारतो हा मारवा आणि म्हणतो..
ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..!
गेंद्याच्या फुलांचं तोरण काय, कुणीही बांधतो हो.. पण आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच बांधू शकतात, त्यांच्या मारव्याचे सूर हीच त्या तोरणाची पानं-फुलं!
आकाशातले सारे ग्रह उच्चीचे होतात आणि सुरेश भटांसारखा एक अवलिया गझल लिहून जातो, मारवा गाऊन जातो..!
-- तात्या अभ्यंकर.
ट्वायलाईट २ - 'न्यू मून'

स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची ट्वायलाईटची ओळख आपण मागच्या भागात करुन घेतली. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ह्याच्या पुढच्या भागाची 'न्यू मून'ची.
खरेतर पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख झाली असल्यास बर्याचदा दुसरा भाग थोडा संथ अथवा कंटाळवाणा वाटतो, पण 'न्यू मून' ह्याला निश्चीतच अपवाद ठरतो. आपण जणु काही पुढल्या भागापासुनच आत्ता बघायला सुरुवात करत आहोत असे वाटत राहते.
मानवी रक्तावर जगणार्या तिन व्हँपायर्सच्या टोळीतील (लॉरेंट-व्हिक्टोरीय-जेम्स) जेम्सच्या प्राणघातक हल्ल्यातुन वाचलेली बेला आता खुपच सावरलेली असते. ह्या सगळ्या ताणातुन थोडी मुक्ती मिळवायच्या दृष्टीने एडवर्डची बहिण आणी थोडक्या काळात बेलाची प्रेमळ मैत्रीण बनुन गेलेली अॅलीस, बेलाच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करते.

पार्टी रंगत असतानाच अचानक एका छोट्याश्या अपघाताने बेला आपला हात कापुन घेते. भळाभळ वाहणारे मानवी रक्त आणि त्या रक्ताचा आकृष्ट करणारा वास शाकाहारी कलिन्स फॅमीली मध्ये नविनच सामील झालेल्या जेस्परला बेला वर हल्ला करण्यास उद्युक्त करतो. एडवर्ड आणि इतर कलिन्स मोठ्या मुश्कीलीने बेलाला त्यातुन वाचवता आणि जेस्परला शांत करतात. ह्या बसलेल्या धक्क्यातुन शहाणपण आलेली कलिन्स फेमीली बेलाच्या जिवीताच्या सुरक्षीततेसाठी आणी एडवर्डच्या भल्यासाठी देखील फोर्क्स शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतात.


एडवर्डच्या सोडुन जाण्याने बेला कोलमडून पडते. आधीच एकेकटी राहणारी बेला आता सर्वच गोष्टीपासून, मित्रांपासून अलिप्त होते. एडवर्डची बहिण अॅलीस हिच्याशी इ-मेल द्वारे चालु असलेला संवाद हाच काय तो आधार उरलेला असतो. अशाच निराश एकाकी अवस्थेत बेलाचा लहानपणापासूनचा मित्र जेकब बेलाला पुन्हा एकदा सावरतो आणि दोघे पहिल्यापेक्षा अधिक जवळ येतात.

बेला आपल्या एकाकी आणि दु:खी आयुष्यातुन स्वतःला जेकबच्या मदतीने सावरत असतानाच भुतकाळातील संकट लॉरेंटच्या रुपाने पुन्हा तिच्या आयुष्यात उभे ठाकते. ह्याचवेळी बेलाला जेकब हा एक वेअरवुल्फ असल्याचे कळुन येते आणि बेला चक्रावुन जाते. इकडे व्हिजन्सची देणगी लाभलेल्या आपल्या बहिणीकडून बेला आत्महत्या करणार असल्याची पुर्वसूचना मिळाल्याने खचलेला एडवर्ड आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी तो इटलीतील व्हँपायर प्रमुख वोल्टुरीची मनधरणी करतो.
बेलाला वाचवण्यासाठी फोर्क्समध्ये परत आलेल्या अॅलिसला बेलाला जिवंत पाहुन खुप आनंद होतो. आपण आत्महत्येचा प्रयत्न केला नसुन आपण क्लिफ जंपीग करत होतो असा खुलासा बेला करते. अॅलिसकडुन एडवर्डने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाची बातमी कळल्यावर बेला जेकबचा विरोध धुडकावुन अॅलीस बरोबर इटलील प्रयाण करते.

पुढे काय घडते हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहण्यातच मजा असल्याने इथेच थांबतो. ट्वायलाईट सागा मधिल हा दुसरा भाग पहिल्या भागा येवढाच खिळवुन ठेवणारा आणी थरारक आहे. २००९ सालातील प्रेक्षकांना सर्वात अधिक पसंतीस उतरलेला चित्रपट म्हणून ह्याची निवड करण्यात आली. एम टि. व्ही. च्या पुरस्कार सोहळ्यात ह्या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली.

