समरस व्हावे ऐसे
थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा
दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा
शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता
मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे
परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी