बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी
चाळकऱ्यांनी एकजुटीने 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.