काहूर (संपुर्ण)
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. आय कायच बुलली नाय.
मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब थेंब पाणी म्या हातात धरलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, माज्या पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु.