काहूर (संपुर्ण)

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
24 Oct 2015 - 10:56 pm

" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. आय कायच बुलली नाय.
मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब थेंब पाणी म्या हातात धरलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, माज्या पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु.

छपरातनं पाणी गळायला लागलं. वाकळंवरच. म्या वाकळं एका बाजुला वढुन घीतली.
ऊठुन दिवळीतलं भगुणं घेतलं, आन टपकणाऱ्या पाण्याखाली आदानाला ठिवलं. मग ऊखळापाशी बी टपकाय लागलं, तिथं फुलपात्र ठिवलं, शिक्क्याच्या खाली पाटी ठिवली, चुलीम्होरं तांब्या ठिवला. सगळं घरबार फिरुन म्या भांडीच भांडी केली. पर आयशी कायच बुलली न्हाय, नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली.
कोपऱ्यात बसून म्या ठिबकणाऱ्या पाण्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ.

माझा बा तालुक्याला गेलता. कोर्ट कचेरीच्या कामात त्येला यायला उशीर व्हायचा. कदीकदी तिकडचं मुक्काम टाकायचा. तवा मला त्येजा राग यायचा.
"आयं, आण्णा कदी येत्यालं गं?" म्या पाय हालवत रडकुंडीला यीवुन ईचारलं. पर आय कायच बुलली नाय. नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली,

भगुणं जसं भरलं तसं म्या पाणी भाईर टाकुन दिलं. कावदान जोरात सुटलं व्हतं. कवाडाच्या आत बी पाणी याय लागलं. म्या कडी घालुन पुना भगुणं जाग्यावर ठिवलं.चुलीम्होरं जाऊन आयशीपशी बसलु. कितीतरी येळ. आयशी कायच बुलली नाय. मग म्या तिथचं मटकुळं करुन झोपुन गीलू. भाकऱ्याचा आवाज माज्या कानात घुमत राहीला. रातभर.

सकाळी जवा मी जागा झालू तवा आयशी घरी नव्हती. घराबारात पसरलेली भांडीकुंडी तुडुंब भरून वाहिली व्हती. जिकडं तिकडं सारवानाचे पोपाडं ऊपडलं हुतं. ऊनाचं कवुडसं छपराच्या आत झिरपलं व्हतं. सकाळच्या पारी आमचं घर मला उदास वाटलं. वट्यावर जाऊन म्या आयशीला हाका मारल्या. कितीतरी येळ. आयशीनं कुठुनं बी वव दिली न्हाय. शेजारची जिजाकाकू मला म्हणली "कशाला हाका मारतुय रं पोरा, बाप न्हाय का आजुन तुजा आला?".

आज मला आंघुळ घालाय बी कुणी न्हवतं. हापश्यावरनं दोन कळश्या आणुन म्या आंघुळ किली. मग डोक्यावर तेल थापुन म्या कापडं घातली. वायरीची पिशवी घीऊन मी उपाशीच शाळेत गीलू.
संध्याकाळी जवा म्या घरी आलू तवा आण्णा जरशीची धार काढत हुता.
"राती जेवला का न्हाय रं?, टोपल्यात काय आसलं तर खाऊन घी" धार काढत आण्णा बोलला.
आल्या आल्या म्या दुरडी ऊघडली. त्यात दोन भाकरी व्हत्या. कालवण नव्हतचं. घरातली भांडीकुंडी आवरुन ठिवलेली. आर्धी भाकर म्या कुरडीच खाल्ली. पाणी पिऊन म्या खेळाय गीलू. लौपाट खीळुन घामाघुम हुन म्या परत घरी आलू.
आण्णा सायकलवर किटली ठिवुन दुध घालाय चाल्लं हुतं.
"सोन्या, आरं आयशीला जाऊन आता वरीस व्हत आलं, सकाळपारी तिला कशाला हाका मारत हुता, म्या गावातनं भाकऱ्या करुन आणल्यात. दुधाबर खाऊन आभ्यास करत बस. आलुच मी डिरीवरनं." आण्णा माज्या खांद्यावर हात ठिवुन काळजीनं बोललं.

मी गप घरात जाऊन गुरजीनं दिल्याली गणितं पाटीवर सोडवत बसलु. पण भाईर आजपण कावदान सुटलं. छपरातनं पाणी आजपण टिपकाय लागलं. येवढ्या कावदानात आण्णा आज ऊशीराच येणार. मग घराबारात भांडीकुडी पसरवून चुलीम्होरं मी उपाशीच झुपी गीलू. भाकऱ्यांचे आवाज माज्या कानात घुमत ऱ्हायले. रातभर.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंद कांबीकर's picture

25 Oct 2015 - 12:36 am | आनंद कांबीकर

... दोन येळा वाचली.

बाबा योगिराज's picture

25 Oct 2015 - 1:23 am | बाबा योगिराज

_____/\_____

आदूबाळ's picture

25 Oct 2015 - 1:56 am | आदूबाळ

छान लिहिलंय, जव्हेरभाऊ.

एक एकटा एकटाच's picture

25 Oct 2015 - 7:25 am | एक एकटा एकटाच

मी पहीली कथा ही वाचली होती.
ती थोडी गडबडलेली.

पण तुम्ही आता बदललेली कथा म्हणजे अप्रतिम.

ह्याला म्हणतात क्लास.......

जियो "जव्हेरगंज"

पुढिल लिखाणास मनपुर्वक शुभेच्छा

दमामि's picture

25 Oct 2015 - 10:37 am | दमामि

वा!दंडवत स्विकारा!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Oct 2015 - 12:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

नाव आडनाव's picture

25 Oct 2015 - 12:45 pm | नाव आडनाव

जबरदस्त लिहिता भाऊ!

तुषार काळभोर's picture

25 Oct 2015 - 12:47 pm | तुषार काळभोर

मला पहिली वरिजिनलच जास्त आवडली होती.

बांधावरच्या भांडणातून सदाकडे गेलेला आणि रात्रभर परत न आलेला बाप.

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2015 - 3:09 pm | टवाळ कार्टा

भारी

नितिन५८८'s picture

25 Oct 2015 - 3:16 pm | नितिन५८८

छान लिहिलंय, जव्हेरभाऊ

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2015 - 8:17 am | बोका-ए-आझम

क्या बात है जव्हेरगंज! शिंदळ पेक्षाही भारी!

प्रदीप's picture

26 Oct 2015 - 8:52 am | प्रदीप

कथा आवडली.

उगा काहितरीच's picture

26 Oct 2015 - 9:37 am | उगा काहितरीच

.

प्रभाकर पेठकर's picture

26 Oct 2015 - 9:45 am | प्रभाकर पेठकर

लहान मुलाचं भावविश्व आणि कठोर वास्तव ह्यांची हृदयस्पर्शी सांगड कथेत यशस्वीरित्या घातली आहे.
कथेला दु:खाची किनार असली तरी आवडली कथा.

शित्रेउमेश's picture

26 Oct 2015 - 11:08 am | शित्रेउमेश

दोन्ही ही कथा मस्त जमल्यात...

माधुरी विनायक's picture

26 Oct 2015 - 12:13 pm | माधुरी विनायक

तुमचे लेखन आवडते. कथा आवडली, असे म्हणवत नाही. दुखावून गेली.

चाणक्य's picture

26 Oct 2015 - 1:00 pm | चाणक्य

असेच म्हणतो. जोरदार लिहीलंय

मास्टरमाईन्ड's picture

26 Oct 2015 - 1:53 pm | मास्टरमाईन्ड

अप्रतिम लिहिलंय पण..

सोन्या, आरं आयशीला जाऊन आता वरीस व्हत आलं

दुखावलं आत कुठेतरी

सुखी's picture

26 Oct 2015 - 8:42 pm | सुखी

जबर्दस्त.......

धोणी's picture

27 Oct 2015 - 8:02 pm | धोणी

क्लास