मामाचे गाव - तात्या
लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे.