पेरू : भाग ११ : लोकजीवन

समर्पक's picture
समर्पक in जनातलं, मनातलं
8 Sep 2014 - 12:37 am

या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे. आता या चित्रांमध्ये कलात्मक दृष्ट्या फारसे काहीच विशेष नाही, परंतु पेरूच्या लोकजीवनाचे झरोके म्हणून या लेखात त्यांचे प्रयोजन. यात सामान्य ते सर्वोच्च विविध स्तरांतील लोक, वेशभूषा, केशभूषा, व्यवहार, व्यवसाय आदींविषयी...

गोष्टी सांगणारी आजी. अल्पाकाच्या लोकरीचे सूत काढत बसली होती. तिची भाषा काही केल्या कळेना, पण कधी भावना शब्दांचे माध्यम झुगारून संवाद साधते, तशातला एक क्षण.

वेशभूषा: एका चौकोनी कपड्याला मधे भोक पाडून त्यातून डोके घालायचे, हा पॉञ्चो. पुरुष व स्त्रिया दोघे हे वस्त्र वापरतात. डोंगराळ भागात स्त्रिया जाडसर कापडाचा घोळदार घागरा वापरतात.

वाट पाहणारी एक वृद्धा

केशभूषा: स्त्रियांमध्ये दोन लांब वेण्या तर पुरुषांमध्ये 'स्पाईक कट' राष्ट्रीय केशभूषा असल्यागत लोकप्रिय आहेत.

वेण्या

ठेवणवैशिष्ट्ये: मूळचे मंगोलवंशीय लोक अलास्कामार्गे येउन अमेरिकेत वसले असा सिद्धांत आहे, तशाचप्रकारची ठेवण या लोकांची आहे. बारीक डोळे, कमी उंची, दाढी मिशा जवळ-जवळ नाहीच.

शिक्षण: पेरूमध्ये शालेय शिक्षण सक्तीचे व फुकट आहे. दुर्गम भागातही शिक्षण व्यवस्था पोहोचलेली आहे. यात ख्रिस्ती धर्मालाही काही प्रमाणात श्रेय आहेच. लिमामध्ये सहलीसाठी निघालेला हा समूह, शालेय विद्यार्थी व शिक्षक:

तरुणाई: उत्साही व मुक्त विचारांची. आपल्या देशाच्या उत्तम पर्यटककेंद्र बनण्याच्या क्षमतेची चांगलीच ओळख पटलेली. मागे स्थानिकांच्या घरी राहण्याचा उल्लेख केला तेव्हा कोणीतरी अधिक माहिती विचारली होती, त्यामुळे त्याविषयी थोडे: पेरूविषयी माहिती मिळवत असताना एकल प्रवाशांच्या अनेक पब्लिक फोरम वर मी संवाद साधत असे. त्यातल्या एकावर लिओ नावाच्या तरुणीची ओळख झाली. (मूळ नाव कोराझों म्हणजे हृदय) त्यांच्यामुळे पेरूची पहिली छाप खूपच चांगली पडली. पुढे गप्पा वाढवल्या व वर नमुद केलेल्या विशेष गुणांना साजेशी सर्व मदत त्यांनी केली. पुढे एका संध्याकाळी कॅथेड्रलपासून पब पर्यंत, फक्त विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याचा उद्योग आम्ही केला. ऐकायला साधंच वाटेल पण ज्यांच्याविषयी आपण विचारही करत नाही असे अनेक समाजाचे घटक आहेत. असो, अधिक खोलात जात नाही.
तरुणाईचे काही अवगुण: ब-याच अंशी शिक्षणाबाबत अनास्था, काही प्रमाणात अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापाराच्या जाळ्यात अडकलेली, समाजवादी विचारसरणीचे आकर्षण.

राजकारण: पेरूच्या स्पेनपासून स्वातंत्र्यास काही वर्षात दोन शतके पूर्ण होतील, पण यातील बहुतांश काळ हा गोंधळ व अस्थैर्याचाच होता. सध्या पेरू एक प्रातिनिधिक गणतंत्र असून सर्वोच्च पद राष्ट्रपती, लोक निवडतात. १८-७० वयोगटास मतदान अनिवार्य आहे.

राष्ट्रपती भवनातील सैनिक

पेरूचे राष्ट्रपती ओयंता उमाला

अर्थकारण: कितीही छान छान गोष्टी देशाकडे असल्या तरी ४०% गरिबीचे भयाण वास्तव लपून रहात नाही. विशेषत: डोंगराळ भागात खूपच हालाखीची परिस्थिती आहे. शेती फार कमी होते व काही भागातच होते, त्यामुळे व्यापारी, प्राणिपालक व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

थंड प्रदेशातील कामगार

लोकरीच्या वस्त्रांचे विक्री केंद्र

समाजकारण: एकंदरच दक्षिण अमेरिकेत समाजवादी चळवळींच्या लाटा येत असतात, त्याला पेरूही अपवाद नाही. 'शायनिंग पाथ' आणि 'तुपाक अमारु' नावाने डावे पक्ष कार्यरत होते. विरळ दहशतवादी घटना व पेरू भांडवलशाहीतून मुक्त करण्यासाठी आंदोलनेही होतात. याव्यतिरिक्त हा समाज बराच सोशिक व लवचिक आहे. अक्षरश: अठरापगड लोक मिळून मिसळून राहतात. अाता काळाबरोबर जागतिकीकरण इथेही मुरतंय.

काळाबरोबर बदलणारी पिढी, पारंपारिक कपडे या जुन्या पिढीबरोबर बाद होणार..

कला: कलेचा अतिशय समृद्ध वारसा या देशाला लाभलेला आहे. लाकडी व दगडी कलाकुसर नाजूक नसली तरी सुबक असते. वस्त्रे अतिशय भडक रंग वापरून विणलेली, आकर्षक असतात. पाककलेविषयी सखोल विवेचन झालेलंच आहे...

साहित्य: फार उल्लेखनीय असे काहीच नाही, किंबहुना या गोष्टीची फार माहिती घेण्याइतका वेळही नव्हता आणि भाषेवर एवढी पकडही नाही. पण लिओच्या घरचे 'धन' पाहून लोकांना लिखित साहित्याची आवड असावी असे वाटते.

नीट रचलेली पुस्तके

संगीत: पॅनपाईप हे इथले खास वाद्य. वेगवेगळ्या स्वरांच्या एकस्वरी बास-यांचा संच म्हणजे हे वाद्य. अतिशय मधुर, शांत व गंभीर वाद्य. यासोबत तंतुवाद्यांच्या साथीने अतिशय सुंदर संगीत निर्माण होते. माझं तर प्रेमच जडलंय या संगीतप्रकारावर...

>

नृत्यप्रकारांमध्ये दोन भाग, एक स्पॅनिश प्रभावाचा वर्ग आणि दुसरा आदिवासी. दोन्ही अतिशय रंगित व मनोरंजक.
गायक, पॅनपाईप वादक व नृत्यांगना

चित्रपट: पेरूव्हियन चित्रपट फार कमी चर्चेत येतात. स्पॅनिश, मेक्सिकन व अर्हंटिनियन चित्रपट भाषेमुळे मोठ्या प्रमाणात चालतात. अभिमान व आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉलिवूड हे तेथील नवे आकर्षण आहे. गुजारिश , ३ इडियट्स इथे प्रचंड चालले. कुणी परदेशी भाषांमधील चित्रपट पाहणारे इथे असतील, तर त्यांच्यासाठी हे तीन मला उल्लेखनीय वाटणारे चित्रपट 'Madeinusa', 'La Teta Asustada' आणि 'Paloma de papel'. त्यांचे रसग्रहण वेगळ्या धाग्याचा विषय.

समारोप

गेल्या जवळपास महिनाभर अनियमितपणे चाललेली ही मालिका आता इथे संपवतो आहे. एका देशाच्या, समाजाच्या शक्य तितक्या विविध पैलूंचे अवलोकन व रसग्रहण करण्याचा व कथन करण्याचा माझ्या पद्धतीने केलेला हा प्रयत्न. केवळ अनुभवार्जित आनंद वाटणे हा हेतू. संपूर्ण मालिकेविषयी आपला सविस्तर अभिप्राय जरूर कळवा, पुढे सुधारणा नक्की करेन.

जाता जाता, माझ्या अजून दोन वेड्या छंदांची पुरवलेली हौस...

माचुपिचुच्या पुनर्शोधशतकानिमित्त खास तिकिट

जगातील नव्या सात आश्चर्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पेरू सरकारने छापलेली पोस्टाची तिकिटे:

पेरूचे चलन - सोलेस

इति लेखनमर्यादा। लेखमालिका संपूर्ण।

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मइतिहासभाषासमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरअर्थकारणराजकारणशिक्षणचित्रपटछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

माझ्याकडून स्टँडींग ओव्हेशन. जास्त बोलू शकत नाही.
*clapping* *clapping* *clapping*
खूप छान मांडणी.

(बाकी थोडं समांतर अवांतर : अशाच ओळखीवर ब्राझिल गाठणार्‍या विलासरावांची आठवण झाली.)

आनन्दिता's picture

8 Sep 2014 - 3:27 am | आनन्दिता

+१ स्टँडींग ओवेशन साठी!!

एस's picture

8 Sep 2014 - 9:03 am | एस

आमच्याकडूनही स्टॅण्डिंग ओवेशन. पहिल्या परिच्छेदानेच लक्ष वेधून घेतले. मिपावरील सर्वोत्तम लेखमालिकांपैकी एक...

बास, अजून काही लिहीत नाही.

अनन्त अवधुत's picture

8 Sep 2014 - 10:09 am | अनन्त अवधुत

स्टॅण्डिंग ओवेशन. कुठेही गेले तर नेमके काय पाहावे आणि कसे पाहावे याचा वस्तुपाठ. सुंदर लेखमालिका.

मधुरा देशपांडे's picture

8 Sep 2014 - 1:06 pm | मधुरा देशपांडे

स्टॅण्डिंग ओवेशन. असेच अजुन फिरत राहा आणि उत्तम लेखमालिका लिहा.

शिद's picture

8 Sep 2014 - 3:02 pm | शिद

+ ५

राघवेंद्र's picture

8 Sep 2014 - 7:49 pm | राघवेंद्र

एकदम सुरेख !!!
IT च्या भाषेत पर्यटनाची SDLC सुरेख मांडली.

राघवेंद्र

नंदन's picture

8 Sep 2014 - 9:46 am | नंदन

माझ्याकडून स्टँडींग ओव्हेशन. जास्त बोलू शकत नाही.

असेच म्हणतो.

विलासराव's picture

13 Sep 2014 - 4:09 pm | विलासराव

समर्पक खुपच मस्त झालीय ही लेखमाला. मलाही एकल प्रवास आवडतो. तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

(बाकी थोडं समांतर अवांतर : अशाच ओळखीवर ब्राझिल गाठणार्‍या विलासरावांची आठवण झाली.)

अलभ्य लाभ!!!!!!!
अजुन आठवतेय प्यारे?

जबरदस्त मालिका, एखादा चित्रपट संपावा तशी हि मालिका संपवलीत. खर म्हणजे हि मालिका संपूच नये असे वाटत होते.
प्रतिसाद लिहित असताना तुम्ही डकवलेल्या ध्वनिमुद्रणफिती एकतोय. खूप छान संगीत.
गर्दी, कोलाहल पेक्षा अशा शांत ठिकाणी भेट द्यायला खूप आवडेल.

तुमच्या पुढच्या प्रवासाची प्रतीक्षा असेल.

पोटे's picture

8 Sep 2014 - 8:44 am | पोटे

छान

बॅटमॅन's picture

8 Sep 2014 - 9:39 am | बॅटमॅन

प्यारेकाकांशी स्टँडिंग ओव्हेषनबद्दल प्रचंडच सहमत. मानलं राव तुम्हांला _/\_ मागे म्हटल्याप्रमाणेच पायांची झेरोस पाठवून देणे. अधिक बोलायची औकात नाय.

सविता००१'s picture

8 Sep 2014 - 10:40 am | सविता००१

अगदी संपूच नये असं वाटत होतं.

काळा पहाड's picture

8 Sep 2014 - 12:42 pm | काळा पहाड

ही सूरमालिका मी कोरिया मध्ये प्रथम ऐकली. अतिशय संमोहीत सूर. पण वरील सूरमालिकेपेक्षा थोडे जलद सूर. तिथल्या स्टेशन वर एक साऊथ अमेरिकन वादक त्याच्या नव्या मुझिक सीडीची जाहिरात करण्यासाठी वाजवत होता. मी ती तिथेच विकत घेतली.

कपिलमुनी's picture

8 Sep 2014 - 12:59 pm | कपिलमुनी

पेरु देशाची सफर घडवल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद !
तुमची लेखनशैली अतिशय ओघवती आहे. वाचताना खूप मजा आली.

प्रत्येक धाग्यावर आवर्जून प्रतिसाद देता आला नाही , पण प्रत्येक धागा पुनपुनः वाचला.

आता नवीन सफरीसाठी सज्ज :)

पेट थेरपी's picture

8 Sep 2014 - 1:00 pm | पेट थेरपी

उत्तम मालिका. अतिशय एंजॉय केली. ते एकल प्रवाशांसाठीचे फोरम कुठे असतात? माहिती द्याल का? तुमची अ‍ॅटिट्यूड फार आवडली.

समर्पक's picture

8 Sep 2014 - 7:13 pm | समर्पक

मला सर्वात उपयोगी पडलेली चांगली वेबसाइट्: http://www.tripadvisor.com/ShowForum-g1-i12357-Solo_Travel.html

याव्यतिरिक्तही अनेक वेबसाइट्स आहेत, http://www.lonelyplanet.com/http://www.travbuddy.com/forums चे काही फोरम उपयोगी आहेत.

अजुन एक गोष्ट नमूद करू इच्छितो, एकल प्रवासामध्ये कायम एकटे राहणे अभिप्रेत नसून बरोबर कोणी न घेता आपल्या आराखड्यानुसार वाटेत मिळतील त्या लोकांबरोबर प्रवास करणे आहे. वर दिलेल्यात्ली शेवटची साईट प्रवास मित्र शोधण्यासाठी चांगली आहे.

दिपक.कुवेत's picture

8 Sep 2014 - 2:47 pm | दिपक.कुवेत

सर्व फोटो अप्रतिम. मस्तच झाली सफर. पुसप्र.

वेल्लाभट's picture

8 Sep 2014 - 3:04 pm | वेल्लाभट

सुरेखच ! पेरूला पोचलो ! :) बाकीही लेख जबरदस्त..... मस्त मांडणी आणि मस्त फोटो.... क्या बात है !
टेक अ बो _/\_

विटेकर's picture

8 Sep 2014 - 3:06 pm | विटेकर

भारवलेली अवस्था उतरली की सविस्तर प्रतिसाद देईन .

टाळ्या !

mbhosle's picture

8 Sep 2014 - 3:14 pm | mbhosle

मस्तच. लेखमालिका फार आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2014 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेखमालिका. पेरुची सुरेख ओळख झाली. शिवाय प्रवासवर्णन लिहायला वापरलेली पद्धत (फॉर्मॅट) खासच होती.

लिहात रहा...

विवेकपटाईत's picture

8 Sep 2014 - 8:39 pm | विवेकपटाईत

अप्रतिम लेख.पेरूची ओळख निश्चितच सर्व वाचकांना झाली असेलच.

प्रसाद१९७१'s picture

9 Sep 2014 - 2:58 pm | प्रसाद१९७१

हा भाग सर्वोत्तम. अजुनही खुलासेवार एकएक मुद्दा विस्तारावा ( जसे अर्थकारण , समाज कारण ) ही विनंती.

कवितानागेश's picture

9 Sep 2014 - 3:29 pm | कवितानागेश

सगळे भाग आणि सगळे फोटो खूपच आवडलेत. परत परत वाचावी अशी मालिका. :)

माधुरी विनायक's picture

9 Sep 2014 - 5:29 pm | माधुरी विनायक

माहितीपूर्ण आणि नेत्रसुखद लेखमालिका. प्रवासवर्णनाचा वस्तुपाठ म्हणता येईल. अनुभव कथन मनापासून आवडले.

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 6:40 pm | काळा पहाड

तुमचा क्यामेरा कुठला?

समर्पक's picture

9 Sep 2014 - 8:22 pm | समर्पक

Canon t3i & Pentax WG-1

पहाटवारा's picture

10 Sep 2014 - 10:04 am | पहाटवारा

कुठल्याहि प्रवासवर्णनाचे हमखास यश म्हणजे ते वाचून तुम्हाला तिथली पुरेशी झलक तर मिळायला हवी पण जाण्याची ओढ जास्त वाटावी .. हे तुमच्या लेखनाने करून दाखवले .. मस्त !
याआधी कधी प्रतीक्रिया द्यायला जमले नाहि पण हि मालीका आवर्जून वाचली आहे. अजूनहि काहि वाचायला आवडेल तुमच्या कडून ..
-पहाटवारा

संजय क्षीरसागर's picture

10 Sep 2014 - 10:57 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

पैसा's picture

10 Sep 2014 - 12:24 pm | पैसा

मस्त जमलेली लेखमालिका!

तिमा's picture

10 Sep 2014 - 12:50 pm | तिमा

तुमची लेखमाला सर्वोत्तम आहे. प्रवासात काय बघावे याची शिकवण पण मिळाली.

धन्यवाद. लेखमालिकेची मांडणी फार आवडली. छंद आवडले.
एकल प्रवास आवडण्यात आणि करण्यात पहिली पायरी महणजे अमक्याबरोबर अथवा कोणाबरोबर गेलो तरच मजा येईल हा विचारच डोक्यातून काढून टाकणे. सर्वात पहिला एकल प्रवास केल्यानंतर कशाचाही आधार न घेता चालायची सवय लागते कासवाच्या पिलागत.

समर्पक's picture

10 Sep 2014 - 6:05 pm | समर्पक

आपल्या समाजाची रचना अशी आहे की 'एकट्याने'/'एकटीने' ही संकल्पना पचतेच असे नाही (अनेक अर्थाने). अगदी जवळच्या वर्तुळात सुद्धा 'एकटच काय जायचं' 'बोअर नाही का होत' अशा अनेक निराशाजनक प्रतिक्रिया ऐकव्या लागतात. त्यामुळे इथे जर कोणी असे उत्साही असतील की ज्यांनी कधी एकट्याने प्रवास केला नाहीये पण करायला आवडेल, तर त्यांच्यासाठी म्हणून, कोणत्या गोष्टींची सावधानता बाळगावी, काय माहित हव असे प्रश्न असतील तर यात थोडी माहिती समाविष्ट केली. मागे लिहील्याप्रमाणे त्यातून पाठच्यास हुरुप व झालंच तर मार्गदर्शन मिळावं हा हेतू.

ज्ञ's picture

18 Jul 2016 - 6:56 pm | ज्ञ

अप्रतिम लेखमालिका...

सुधीर कांदळकर's picture

8 Jun 2018 - 8:06 am | सुधीर कांदळकर

नेहमीप्रमाणेच प्रभावशाली. चित्रे, लेखनशैली आणि त्यातला जिवंत अनुभव. व्व्व्व्वा!

काल सारे अकरा भाग सलग एका बैठकीत वाचले.

धन्यवाद.