मामाचे गाव - तात्या

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
10 Sep 2014 - 12:25 am

लाल ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, आणि समोर निखारा फुललेली चूल. मावशीने चूलीवरून गरम गरम भाकरी काढली आणि माझ्या ताटात ठेवत म्हणाली "राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि!" मी गरम भाकरीचा तुकडा मोडला व तोच समोरून काम आले हे पाहून तिच्याकडे पाहू लागलो तर मला तात्यांचे जेवण शेतात द्यायचे काम करावे लागणार होते. मावशीने शिदोरी बांधली व माझ्या हातात दिली. माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी ही मावशी व तिचा मी शब्द टाळेन हे शक्यच नव्हते. तीन तीन मुलींची ती आई, पण लहानग्या बहिणीच्या या पोरावर तिचा फार जीव. जसा ती माझा शब्द खाली पडू देत नसे तसाच मी तिचा शब्द खाली पडू देत नसे. सकाळची न्याहारी मी सोबत घेतली व शेताकडे निघालो.

आमच्या कोल्हापुर व हे गाव यात जमी-आस्मानचे अंतर होते, इकडे सर्वत्र, अगदी नजर जाईल तेथे पर्यंत शेती पसरली होती. वीतभर रुंद व शेताच्या शेवटपर्यत असलेला बांध म्हणजे शेताच्या या व त्या तुकड्याचा मालक कोण? याची साक्ष देण्यास सक्षम होता. पावलोपावली वडाची, अंब्याची, जांभळ्याची, आवळ्याची झाडे पसरलेली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला साथ देणारी बोरी-बाभळीची रांग! कुणाच्या शेतात सहस्त्र हस्त पसरून आकाशाकडे वरदान मागत असलेला वड व त्याच्या बुंध्याजवळ वाटसरूसाठी ठेवलेली पाण्याची मडकी. खावीशी वाटली म्हणून कोणाच्यातरी शेतातून एकादं वाळूक तोडलं तर समोरचा आवाज द्यायचा "ए, हुडगा, इकडे बा. इकडू त्वगा. आऊ स्वल्प संन ईदे." अशी आवभगत असे. पहिली पन्नास शेती ओळखीची होती.. आपलीच होती. त्यामूळे भय नव्हते, पण तसेही भिण्याचे कारण देखील नव्हते. गावातल्या इतर लोकांच्या शेतात जरी पाय ठेवला तरी कोणी नाही म्हणणार नक्की नव्हते. पण मावशी नेहमी सांगे, आपल्याच हद्दीत फिरत रहा, दुसऱ्यांच्या जमिनीला, पिकाला त्रास न होईल याची काळजी घे.

दूरवर ७-८ अंब्याच्या झाडांचा हिरवागार परिसर दिसला एखाद्या शेतात तर ते आपले शेत! माझ्या मावशीचे शेत. त्या झाडांच्या सावलीमध्ये एक लहानशी झोपडी आहे, अगदी मला हवी तशी. त्यात सिझन असेलतर भरपूर कच्चे आंबे रचून ठेवलेले असायचे की, त्याचा वास फर्लांगभर आधीच नाकात घमघमत असे. झोपडीवर भोपळ्याची हिरवीगार वेल पसरलेली आणि बाजूला उजवीकडे मावशीच्या आवडत्या म्हशी बांधलेल्या असत. मावशीच्या आवडत्या, कारण त्यांना फक्त मावशीने दुध काढलेले चालत असे, अगदी तात्याजरी गेला, तरी त्या उच्छाद मांडत. डावीकडे सरपण गोळाकरून रचून ठेवलेले. तेथेच तात्यांचा दुपारी झोप घेण्यासाठी ठेवलेला जुना लोखंडी कॉट, तो मस्त पैकी कर कर आवाज करायचा, त्याचा आवाज आला की म्हशी फेंद्ररायच्या!

तात्याला मी सकाळी घरी कधी पाहिलाच नाही, तो भल्यापहाटे उठून शेतात जात असे. आणि शेतात गेला नसेल तर गावात कोणाच्यातरी मदतीला गेला असे. तो घरात का नसतो या पेक्षा तो घरात कधी असतो हा प्रश्न मला पडत असे. आख्या गावात तात्या, मजलेअण्णा म्हणून प्रसिद्ध होता. आजोबांच्या सारखाच पांढरा सदरा, पांढरे धोतर, हातात त्या धोतराचे टोक. फरक होता तो मिश्यामध्ये. तात्यांच्या मिश्या भारदस्त! अगदी ते सतत दोन्ही टोकांना पीळ देत असत, अगदी काम करत असले तरी!

पण, शेतात काम करत असले की त्यांचा अवतार बघण्यासारखा असे. अंगावर बंडी, डोक्याला मुंडासे, धोतर गुडघ्यापर्यतवर घेऊन मागे खोचलेले. आपले पिळदार दंड दाखवत ते शेताला पाणी पाजत आणि मध्येच जोरजोरात ओरडत असत "हो....हो... हुर्ये.....हो... हुर्ये...हो" ते असे ओरडले की मला जाम मज्जा येत असे, कारण एक साथ कितीतरी पक्षी एकदम जमिनीवरून आकाशात झेप घेत. मी झोपडीजवळ पोचलो की, शिदोरी आत ठेवून देत असे, व ते जेथे काम करत असतील तिकडे जाण्यास निघत असे. ते तिकडूनच आवाज देत व मला म्हणत "राज्या, मग्ना! निंगू दौड बराक यान आते? यावंद हादी नोडते इदेऊन ना. बा मरी" मी आपला पाटातून वाहत असलेल्या पाण्यावर छप-छप आवाज येण्यासाठी उड्या मारत त्यांच्या जवळ पोचलो की, कुठून तरी आणलेला एखादा लाल पेरू, कधी चिंचा, इलायती चिंचा हातात देत व म्हणत "आईतू, नडी इष्ट नीर बिडत्यानू."

तात्यांचे शेताला पाणी पाजणे हे न संपणारे काम असे, तरी देखील कुठेतरी एक मोठा पाट सोडून ते त्याच वाहत्या पाण्यात आपले हात, पाय, तोंड धूत व कधी मस्तीत असले की झप करून पाटातील पाणी माझ्यावर उडवत. मी इकडे तिकडे पळू लागलो तर मात्र एकदम मला थांबवायचे, कारण आताच कुठे बियाणे शेतात पेरलेली असतं. मग माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्यासोबत झोपडीकडे चालू लागत. मग जाताना त्यांचा संवाद फक्त शेताबरोबर चालू असे. किती बियाणे घातले, किती पाट भिजले, किती राहिले, येणार कधी, देणार कधी. काही ना काही त्यांचे हिशोब चालू असतं. पण मी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता, पाटातील पाण्यातून चालण्याचा, पाणी उडवण्याचा आनंद घेत रमत-गमत चालत असे. झोपडीजवळ आल्यावर तात्या निवांतपणे आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसत व नेहमी बसताना दक्षता घेत असावेत की आपली पाठ शेताकडे नको, कारण मी जेव्हा पण पाहिले तेव्हा त्यांचे तोंड नेहमी शेताकडे व समोर मला बसवत.

न्याहारीमध्ये भाकरी, भाजी, तोंडी लावायला ठेचा आणि दही. हे हवेच हवे. यातील काही विसरले तर ते मला 100% परत पायपीट करायला लावतील एवढी खात्री होती. पण एकदा मन लावून न्याहारी चालू झाली की मग मात्र तात्या जग विसरत. पूर्ण लक्ष अन्नावर. खूपच इच्छा झाली तर मला झोपडीतून एखादा कच्चा अंबा घेऊन ये म्हणून सांगायचे पण न्याहारी मनासारखी जमलेली असेल तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर घासागणिक आनंद दिसत असे, आणि हा आनंद मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला होता, अगदी कारल्याची भाजी असताना देखील.

न्याहारी झाली की, तात्या आपल्या कॉटवर बसायचे व बंडीच्या भल्या मोठ्या खिश्यातून एक अडकित्ता बाहेर काढायचे, एक सुपारीचे खांड आणि करकर त्याचे बारीक तुकडे करून तोंडात टाकायचे, मग परत खिश्यात हात घालून एक पान बाहेर काढायचे, नंतर स्टीलची चुन्याची डब्बी.. अंगठ्याच्या नखाने थोडा चुना काढून त्या पानाला लावायचे व ते पान दुमडून खाऊन टाकायचे. मग परत खिश्यातून एक लहानशी पितळी डब्बी काढायचे त्यातील तंबाखू काढून आपल्या डाव्या हातात घेऊन, चांगले मळून आपल्या तोंडात टाकायचे. हा सगळा कार्यक्रम चांगला ५-१० मिनिटे चालायचा. पण ते असे पान फक्त येथे शेतावर खात असावेत, कारण आजोबांच्या समोर आजोबा हातात देतील तसे पान घेऊन गुपचूप तोंडात टाकत. आजोबांचे नाव जरी कोणी घेतले की ते उजव्या हाताने एकदा छातीवर हात ठेवत व डोळे मोठे करून म्हणत "देव रे!" यावरून मला हे समजले होते की ते आजोबांना जाम घाबरत. पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत.

क्रमश:

*राज्या, उटा माडू, मते वन क्लसा माड अप्पि! - राज्या, जेवण कर, आणि एक काम कर बाळा!
*ए, हुडगा, इकडे बा. इकडू त्वगा. आऊ स्वल्प संन ईदे. - ए, मुला, इकडे ये, इकडून घे. ते अजून लहान/कच्चे आहेत.
*राज्या, मग्ना! निंगू दौड बराक यान आते? यावंद हादी नोडते इदेऊन ना. बा मरी - राज्या, लेका! तुला लवकर यायला काय झाले? केव्हा पासून वाट पाहतो आहे ना मी. ये मुला.
*आईतू, नडी इष्ट नीर बिडत्यानू - झाले, चाल, एवढे पाणी सोडतो.

संस्कृतीसमाजजीवनमानराहणीप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

10 Sep 2014 - 12:32 am | भिंगरी

न्याहारीमध्ये भाकरी, भाजी, तोंडी लावायला ठेचा आणि दही. हे हवेच हवे
नुसतेच तोपासु नाही ,पाट वहायला लागले(तोंडातुन)

आज ही माझी आवडती न्याहरी आहे ही :)

मुक्त विहारि's picture

10 Sep 2014 - 1:08 am | मुक्त विहारि

आवडला...

व्य.नि. केला आहे...

प्रभाकर पेठकर's picture

10 Sep 2014 - 1:27 am | प्रभाकर पेठकर

मस्तं लेख. जुन्या आठवणी, प्रेमाची राकट, कष्टकरी माणसं आणि गावचं आरोग्यदायी वातावरण. बालपणचं हे वैभवच म्हणावे लागेल.
कानडी वाक्यांचे, शब्दांचे अर्थ तिथेच, वाक्य संपल्यावर लगेच, दिल्यास समजायला बरे होईल.

नक्कीच, पुढील लेखनात हा बद्दल करेन.

धन्यवाद!

स्पंदना's picture

10 Sep 2014 - 4:28 am | स्पंदना

या असल्या श्रीमंतीपुढे साम्राज्य फिकं वाटतं ना?
मस्त वर्णन,

बहुगुणी's picture

10 Sep 2014 - 8:35 am | बहुगुणी

शेतावर नेऊन आणलंत.

यसवायजी's picture

10 Sep 2014 - 1:06 pm | यसवायजी

होगली औनाऊन.
तुंबा भारी लिह्यलय.

स्पा's picture

10 Sep 2014 - 1:11 pm | स्पा

मस्तच

एस's picture

10 Sep 2014 - 1:16 pm | एस

पावसाळ्यातही तापलेल्या मिपावर थंडगार शिडकावा...

लेख प्रचंड आवडला आणि भावला. पुभाप्र.

सूड's picture

10 Sep 2014 - 2:26 pm | सूड

मस्त !

शिद's picture

10 Sep 2014 - 3:07 pm | शिद

लेख आवडला. मस्त.

सुनील's picture

10 Sep 2014 - 3:45 pm | सुनील

छान लेख.

'इकडे बा' म्हणजे अगदी मराठमोळं कन्नड दिसतय!

जण्रली 'इले बा' म्हणजे 'इकडे ये', असे ऐकले होते.

दशानन's picture

10 Sep 2014 - 8:59 pm | दशानन

बेळगावी कन्नड ;)

यसवायजी's picture

11 Sep 2014 - 11:26 am | यसवायजी

इकडे-आकडे म्हणजे मराठीतले इकडे-तिकडे. तसेच अच्चीकडे इच्चीकडे (या/त्या बाजूला) सारखे मजेशीर शब्द आहेत.

सुनील's picture

11 Sep 2014 - 11:33 am | सुनील

मजेशीर.

तसा 'इकडे' हा शब्द तेलुगुतदेखिल आहे. अगदी त्याच अर्थाने!

यसवायजी's picture

11 Sep 2014 - 12:18 pm | यसवायजी

हो. बहुतेक तेलुगुमधे त्याचे रुपांतर आक्कड्डा, इक्कडा, एक्कडा असे होते.

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2014 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

इक्कड रा (म्हणजे बहुतेक 'इकडे ये') हा शब्द तेलगुत ऐकला आहे.

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:05 pm | बॅटमॅन

आउनु रा..

अर्थ जर तिथल्या तिथे वाचायला मिळाले तर अजुन छान झाले असते.. असो लेख उत्तम

सूड's picture

10 Sep 2014 - 5:08 pm | सूड

अरे वा !! आसुड पण आयडी कुणीतरी घेतला हे फार्फार बरं झालं. ;)

उगा काहितरीच's picture

10 Sep 2014 - 5:02 pm | उगा काहितरीच

छान लेख . पण ते भाषांतर तिथेच कंसात हवे होते. बाकी १ नंबर .

नाखु's picture

10 Sep 2014 - 5:19 pm | नाखु

ललीत.
पु.ले.प्र.

मार्मिक गोडसे's picture

11 Sep 2014 - 12:51 pm | मार्मिक गोडसे

थारोळ्यातून सोडलेले पाणी पाटातून खळखळ वाहत आपला थंडगार स्पर्श करत शेतातील प्रत्येक रोपाची तृष्णा भागवतो तशीच जाणीव आपला लेख वाचताना झाली.

पैसा's picture

11 Sep 2014 - 12:52 pm | पैसा

तुंबा चन्नागिदे!

मदनबाण's picture

11 Sep 2014 - 1:32 pm | मदनबाण

वाचतोय...

अवांतर :- काय राजे. सध्या कोणीकडं ? हवा-पाणी कसं काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारण

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर शब्दचित्र !

झोपडीवर भोपळ्याची हिरवीगार वेल पसरलेली @ डावीकडे सरपण गोळा करून रचून ठेवलेले @ म्हशी फेंद्ररायच्या @ अंगावर बंडी @
हे अस्सल ग्रामीण शब्द खूप दिवसांनी वाचावयास मिळाले. अगदी लहानपणचे शेतीतील आयुष्य जगतोय असे वाटले.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत ...........

दशानन's picture

11 Sep 2014 - 9:27 pm | दशानन

धन्यवाद वाचको हो!