काही दिवसांपूर्वीची गोष्ट. असाच एक घनचक्कर कामाचा दिवस.
दुपारी तीनचा सुमार. कागदांच्या ढिगाऱ्यात मी हरवून गेलेली. अचानक केबिनचे दार उघडले आणि बॉस नं. १ हे बॉस नं. २ आणि इतर प्रभावळीसह दत्त म्हणून समोर उभे. सॉरी, दत्त नाही, गणपती म्हणून असावेत कारण बॉस नं. १ हे थोर गणेशभक्त.
कामाच्या अवधानात मी इतकी गुंगले होते की गडबडले नाही, पण थोडीशी हडबडले. एक मिनिट मला खुर्चीतून उठायला सुचलं नाही. हातातले कागद सावरत शुंभासारखे एकदा कागदांकडे, एकदा बॉसकडे बघितले. बॉसचा चेहेरा लोण्याचा गोळा गमावलेल्या बोक्याप्रमाणे दिसत होता. प्रभावळीपैकी एकाने चेहेरा वेडावाकडा करून डोळे फिरवून खूण केली.