कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही. आपल्या संस्कृतीच्या अनेक रुढी परंपरांचे सौंदर्यपूर्ण सादरीकरण त्यांच्या लिखाणाच्या यशाचे गमक वाटते.
'कल्पद्रुमाचिये तळी' या पुस्तकात १९६० नंतरच्या काळात ढेरे यांनी ज्ञानदेव ज्ञानेश्वरी संदर्भात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लिहिलेले अनेक लेख संग्रहित केले आहेत.चार भागात- श्रीज्ञानदेन, श्रीज्ञानदेवी, परीक्षण निरीक्षण,सौंदर्यवेध यात हे लेख विभागले आहेत.
पहिल्या भागातील लेखात ज्ञानदेवांची बोधभूमी म्हणजेच नाथ संप्रदाय व तत्कालिन इतर संप्रदायाचा ज्ञानदेवांशी असलेला संबंध अभ्यासला गेला आहे.ज्ञानदेवांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी असावी की 'म्हाळसा असावी याचा उहापोह आहे. तसेच या भागात त्र्यंबकेश्वर या स्थलाचे पुरातन महत्व शैव,शाक्त,नाथ परंपरेशी जोडले गेले आहे हे वाचून आश्चर्यचकित झाले.
दुसऱ्या ज्ञानदेवी' भागात ज्ञानेश्वरीत आलेल्या अनेक शब्दांग सुरसपणे धांडोळा वाचायला मिळतो. कीर्ती प्रासाद, कीर्तन या सर्वांचा उल्लेख 'मंदिर' म्हणूनच आहे. मग धर्मकीर्तन म्हणजे 'धर्मार्थ बांधलेले मंदिर या अर्थाने ही संज्ञा हे उमगली.
ज्ञानदेवांचा "गीतारलप्रासाद हे रूपक साक्षात कैलास लेणं या प्रासादावर आधारित आहे .
तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो ।
तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।
सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।
आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥
तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें ।
आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥
मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।
उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥
नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।
तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥
व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं ।
उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।
तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥
माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट ।
घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥
भूतपिशाच गटातले गोंदली कसे 'गोंधळी' होत अनेक देवगण परंपरेत समाविष्ट झाले.
का साधुने गोंदळी। संचरोनि सूये मेळि ।
नाना सुदिनांचा आभाळि। दुर्दिनु कीजे ॥
लीळा ग्रंथातील कटक शब्द देवगिरी किल्ल्यासाठी आहे यासाठी"अनेक संशोधकांनी असंख्य ग्रंथ चाळले आहेत.ज्ञानेश्वरीतही देवगिरीसाठी हाच कटक शब्द योजिला आहे.
महानुभाव व लिंगायत या समाजाचाही ज्ञानेश्वरीवर बराचसा प्रभाव अनेक ओव्यांत आहे . ज्ञानेश्वरीतील षट्स्थल,षट्चक्रे याच प्रमाणे लिंगांगसामरस्य या संज्ञेसाठी उल्लेख केला आहे.
तिसऱ्या भागात ज्ञानेश्वरांचे चरित्र कोणी कोणी, कोणत्या वेगवेगळ्या काळात लिहिण्याचा प्रयत्न केले हे सांगितले आहे.नामदेव व इतरांचे संशोधन आहे.
यातील पसायदानाची संहिता या छोट्याशा लेखात पसायदानात अनेक शब्दांची शुद्वता मांडली आहे.
एणे वाग्यज्ञे तोषखवे । तौखौनि माज द्यावे" एकाच ओवीत दोन भिन्न रूपे का?
भजिजो आदिपुरुषी ऐवजी आदिपुरूखी हेच असावे. 'तापहीन हा शब्द 'तप' तपश्चर्येशी निगडीनत असताना ताप -उष्णता अर्थाने 'तप' आला नाही.
ग्रंथोपजीविय हे अनेक वचन हवे, ग्रंथोपजीव नाही.
शेवटच्या सौंदर्यवेध हा भाग खरोखर बौद शब्दसौंदर्याची रत्नखाणच आहे.ज्ञानेश्वरांच्या अनेक विरहणींचा रसास्वाद आहे. तसेच सगुण ज्ञानदेवांचा सहवास अमृतासम कसा असेल यावर अलौकिक शब्दमाला गुंफल्या आहेत.
लेखकाप्रमाणे मलाही वाटले माऊली आताच्या लेकरांनाही तुझे सबाह्य नाही तर तुझी असण्याची प्रचिती अंतरात्म्याला लाभू दे!!"आमच्यासाठीही...
'ताटी उघडा ज्ञानेश्वरा'
-भक्ती
भाद्रपद एकादशी १९४७