लाड
गुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस
वाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच
चिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती
देतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी
पुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण
मागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन
बागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम
खुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम
धोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण
कमीच पडतंय की लावायला चांगले वळण
केलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली
शोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली