गंमत घ्यावी..
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते,
चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके.
करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी.
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल.
हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल.
फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल ..
त्या पानाचा भार केवढा?? इवली होडी कशास साहिल?
डुबकी मारील एखादी वा लटपट लटपट पुढेहि जाइल..
नवीन पाणी नवा किनारा, दूरदूर वा-याने न्यावी ..
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..