देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला
पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला
दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला
बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला
देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते
त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती
मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती
हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो
मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....
-शिवकन्या
प्रतिक्रिया
19 Aug 2019 - 10:33 pm | मायमराठी
19 Aug 2019 - 10:33 pm | मायमराठी
19 Aug 2019 - 10:37 pm | मायमराठी
समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती...
कोकणांत तिन्हीसांजा साजरा होणारा सामूहिक परवचा आठवला.
19 Aug 2019 - 10:39 pm | जॉनविक्क
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.
24 Aug 2019 - 9:07 am | माहितगार
सहज सुचलेला एक विचार
देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.
24 Aug 2019 - 12:52 pm | जॉनविक्क
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी
24 Aug 2019 - 2:45 pm | माहितगार
:)
24 Aug 2019 - 3:00 pm | सर टोबी
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत.
नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.
24 Aug 2019 - 3:23 pm | जॉनविक्क
उत्तरदायित्वास स्वीकार लागू
20 Aug 2019 - 3:21 pm | खिलजि
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ...
कधी पुन्हा उजळेल सारे ?
कधी उतरतील त्या अंगणात तारे ?
कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ?
कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ?
तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता
तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे
तूच दिलेस कैक आशीर्वाद
तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी
पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे
पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी
दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला
ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली
20 Aug 2019 - 8:47 pm | यशोधरा
सुरेख.
20 Aug 2019 - 8:54 pm | नाखु
निव्वळ अफलातून आहे.
समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे.
मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु
21 Aug 2019 - 8:12 am | चांदणे संदीप
++ अगदी तंतोतंत.
नाखुचांचाची वाचकांची पत्रे वाचणारा
Sandy
23 Aug 2019 - 12:10 pm | प्राची अश्विनी
देखणे गो बाय तुझा देवघर.
24 Aug 2019 - 8:25 am | माहितगार
कविता आवडली,
नीटशी समजण्यासाठी बर्याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)
24 Aug 2019 - 9:53 am | जालिम लोशन
बराच वेळ लागला समजायला.
24 Aug 2019 - 10:05 am | माहितगार
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा
दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की
24 Aug 2019 - 9:54 pm | शिव कन्या
साधी स्वच्छ कविता आहे. माझ्या तरी मनात कोणत्या रूपकाचा विचार नाही.
25 Aug 2019 - 7:44 am | माहितगार
कांत सतीचा > शिव मंदीर उल्लेख नाही का ?