अर्धा कप दुध...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
12 May 2024 - 8:17 am

ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला,

"अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की.

आई,लवकर उठलीस, चहा घेणार?

नको ,तुला उशीर होतोय.
बरं निघतो मी".

क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली.

" आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय.

काय झालं.

काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या. चहा पिऊन झोपल्या त्या आजून उठल्या नाहीत.

जेवायची वेळ झाली आहे ,म्हणून उठवतेय.

थोडावेळ थांब उठेल".

मी पुन्हा कामात गुंतून गेलो व गोष्ट आली गेली झाली.क्लिनीकची वेळ संपली.अचानक आठवले. खालच्या लोकांना सुचना दिल्या आणी पटकन घरी निघालो.

जिवात जीव आला. दोघीजणी चहा पीत बसल्या होत्या. मी सुद्धा घेतला आणी संध्याकाळच्या वाॅकिंगला निघालो.

" काय खाणार आई?",सौं नी विचारले

एक मऊ गरम पोळी कर आणी तुप साखर दे. खावीशी वाटतीयं.

मी-का गं काही विशेष".

ती काहीच बोलली नाही.

"लवकर झोपा,उद्या डाॅक्टर कडे जायचे आहे".

मी झोपायला निघून गेलो.दमलो होतो गाढ झोप लागली.

"बाबा उठा, आजी बोलवतीय".

लहान मुलगी मला हालवत होती. रात्रीचे तीन वाजत आले होते. डोळे चोळत मी उठलो बरोबर सारे घर पण.....

" अरे, मला भुक लागलीयं. जरा दुध देतोस का?
मुलगी,बायको किचन मधे निघाल्या.

" गरम नको,थंडच दे".

बरं म्हणालो. एक कप दुध घेऊन आलो. उठवून बसवताना तीच्या थकलेल्या शरीराची प्रकर्षाने जाणीव झाली.

अर्धा कप दुध पाजले.

" बस्स झाले.
खुप गरम होतेय, जरा पंखा वाढवतोयस का?
काय होतयं आई?", मी विचारलं.
"काही नाही रे".जा झोपा ,मी पण पडते. जरा खिडकी उघडं".

खिडकी उघडली,दुधाचा कप उचलला आणी किचनकडे निघालो.

"दुध इथेच ठेव,लागले तर पुन्हा तुंम्हाला उठवायला नको".

"आपण थांबू जरा या का", सौ पुटपुटल्या.

"नको नको, मी ठिक आहे".

चार वाजत आले होते. तासभर झोपावे म्हणून बेडरूम कडे निघालो.

सकाळी थोडा उशीरच झाला.
चहा घेतला.

"मी तयार होतोय. तू आईला तयार कर".

मी आंघोळीला निघून गेलो.

"आहो, बघा ना,सासूबाई उठत नाहीत".

यावेळेस मात्र सौं चा आवाजातला कंप जाणवला.पटकन टाॅवेल गुंडाळला, बाहेर पडलो.

बघतो तर काय?

अर्धा कप दुध तसेच होते. शांत दुधावर छता वरच्या लाईटचे प्रतिबिंब साफ दिसत होते.

आत आठवत नाही त्या क्षणाला माझी मनस्थिती काय होती.

माझ्या आईचा प्रवास म्हणजे बहिणाबाईंच्या कवीता....

देव गेले देवाघरी
आठी ठेयीसनी ठेवा
डोयापुढे दोन लाल
रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा
तुला रडयाची रे सव
रडू हासव रे जरा
त्यात संसाराची चव

कुंकू पुसलं पुसलं
आता उरलं गोन्धन
तेच देईन देईन
नाशिबाले आवतन

जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतुत
तुटे मंगय्सुतर
उरे गयाची शपथ

नका नका आयाबाया
नका करू माझी कीव
झालं माझं समाधान
आता माझा माले जीव
--------------------------
लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेलं कुंकू
रेखा उघडी पडली

देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धन रेखाच्या च-यानं
तयहात रे फाटला

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मागनं
त्यात आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिशा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ.
-------------------------

माझं दुखं, माझं दुखं,
तयघरात कोंडले
माझं सुख, माझं सुख
हंड्या झुंबर टांगले

-----------------
जीव देवाने धाडला जल्म म्हणे आला आला
जेवा आलं बोलावनं मौत म्हणे गेला गेला

दिस आला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जल्माची जाग आली

नही सरलं सरलं जीवा तुझ येनं जानं
जसा घडला मुकाम त्याले म्हणती रे जीनं

आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर
अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर

येरे यरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीचं रूप

झाली अक्षरे धुसरं
डोळा आले पाणी
किती सांगू आठवणी
थकते ग ,वाणी......
-३० ऑक्टोबर २०१४

Was it mother's day or Son's day????????

प्रवासप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 May 2024 - 9:04 am | मुक्त विहारि

डोळे पाणावले...

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2024 - 10:08 am | अमरेंद्र बाहुबली

दुःखद.

कर्नलतपस्वी's picture

12 May 2024 - 10:36 am | कर्नलतपस्वी

दू:खातही समाधान आहे.

याच साठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिसं गोड व्हावा.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

12 May 2024 - 10:22 am | योगेश लक्ष्मण बोरोले

मस्त लिहिलय सर!

भागो's picture

12 May 2024 - 10:29 am | भागो

काय लिहू?
निःशब्द!
जमलं तर पुन्हा वाचून प्रतिसाद देईन.

अहिरावण's picture

12 May 2024 - 11:01 am | अहिरावण

!

अमर विश्वास's picture

12 May 2024 - 12:23 pm | अमर विश्वास

निशब्द .......

विवेकपटाईत's picture

12 May 2024 - 12:40 pm | विवेकपटाईत

निःशब्द

काही बोलण्यापलीकडे ...

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2024 - 4:59 pm | अमरेंद्र बाहुबली

ते श्रीकृष्ण सामंत कुठेत?? ह्याला म्हणतात लेखन..

आंबट गोड's picture

13 May 2024 - 12:00 pm | आंबट गोड

खरे आहे!!

चित्रगुप्त's picture

12 May 2024 - 5:22 pm | चित्रगुप्त

अप्रतिम लिहीले आहे साहेबा.. पुन्हा पुन्हा वाचावे, असे .

कंजूस's picture

12 May 2024 - 5:49 pm | कंजूस

पटलं.

सस्नेह's picture

12 May 2024 - 7:02 pm | सस्नेह

आर्त व्याकुळ कथन.. !
किती वय होतं आईचं ?

कर्नलतपस्वी's picture

12 May 2024 - 8:04 pm | कर्नलतपस्वी

ब्याऐंशी वर्षाची होती. एक वर्षापुर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला होता.

सैन्यात नोकरीमुळे कधीच बरोबर रहायला मिळाले नाही. शेवट मात्र बरोबर होती. बायको मुले एकमताची असल्याने मला तारेवरची कसरत कधीच करावी लागली नाही.

शेवट पर्यंत मधुमेह, हृदयविकार असे दुर्धर आजार नव्हते. चुल ,बंब, शेगडी,स्टोव्ह यांनी मात्र आपल्या आठवणी मागे सोडून गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. शेवटपर्यंत दवाखाना नाममात्र.

जसे घडले तसेच लिहीले आहे.
एक मुलगा म्हणून मातृ पितृ ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पण व्याजच इतके भरपूर आहे त्यामुळे या जन्मातले ऋण पुढच्या जन्मात कॅरी फाॅरवर्ड करण्याची देवाजवळ प्रार्थना.

सर्व प्रतिसादकांचे आभार.

सस्नेह's picture

15 May 2024 - 9:48 pm | सस्नेह

__/\__.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 May 2024 - 12:17 am | ज्ञानोबाचे पैजार

.

रामचंद्र's picture

13 May 2024 - 3:01 am | रामचंद्र

आई असेपर्यंत असते एक आनंदाचं निधान,
आई गेल्यावर उरते एक ठसठसणारी जखम