कवि बिल्हणाची 'चौरपंचाशिका' - एक शृंगाररसपूर्ण काव्य.
११व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या 'बिल्हण' ह्या काश्मीरी कवीच्या नावाने ओळखल्या जाणार्या 'चौरपंचाशिका' ह्या कमीअधिक ५० श्लोकांच्या काव्यामागची कथा अशी आहे. काव्याचा कर्ता एका राजकन्येचा शिक्षक म्हणून कार्यरत असतांना तरुण शिक्षक आणि त्याची शिष्या हे परस्परांवर अनुरक्त झाले आणि कवि गुप्ततेने रात्री आपल्या प्रियशिष्येच्या सहवासामध्ये प्रणयक्रीडा करण्यात घालवू लागला. अनेक रात्री ही गोष्ट गुप्त राहिली पण अखेरीस राजाच्या कानावर ही गोष्ट पडली. संतप्त राजाने अपराधी कवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.