इस्लामची हिजरी कालगणना.

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
5 Dec 2017 - 7:24 am

काल: क्रीडति (भाग ५) इस्लामची हिजरी कालगणना.

काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
काल: क्रीडति (भाग ३) - तिथिवृद्धि आणि तिथिक्षय.
काल: क्रीडति (भाग ४) - ग्रेगोरिअन कॅलेंडर आणि Leap Years.

ह्या भागामध्ये इस्लामची हिजरी कालगणना आणि तदनुषंगिक काही.

सध्याच्या इस्लामी महिन्यांची नावे - १ मुहर्रम २ सफर ३ रबिलावल ४ रबिलाखर ५ जमादिलावल ६ जमदिलाखर ७ रजत ८ साबान ९ रमझान १० सवाल ११ जिल्काद १२ जिल्हेज - ही जशी इस्लाम-पूर्व काळात चालत होती तशीच चालू आहेत. ही इस्लामपूर्व कालगणना चान्द्र पद्धतीची होती पण तिची सौर वर्षाशी आणि ऋतूंशी सांगड राहावी म्हणून काही अधिक दिवस अथवा मास मधूनमधून टाकण्याचीहि प्रथा तेव्हा होती. महिन्यांची ही नावे इस्लाम-पूर्व चालीरीती, उत्सव इत्यादींची दर्शक होती. इस्लाम मानणार्‍यांना त्या चालीरितींपासून दूर ठेवण्यासाठी पैगंबराने नव्याने घालून दिलेल्या इस्लामी कालगणनेमध्ये दिवस किंवा महिने वाढविण्याची जुनी रीत इस्लामबाह्य ठरविली. ह्या विषयी पवित्र कुराणातील सुरा ९.३६-३७ मध्ये असा आदेश आहे:

On the Day God created heaven and earth, He decreed that the number of months be twelve in number. Out of these four are sacred. That is the true religion. Do not wrong your souls in these months. Fight the polytheists all together, as they fight you all together, and know that the God is with the righteous.

The postponing (of sacred months) is but one more imstance of (their) refusal to acknowledge the truth - by which those who are bent on denying the truth are led astray. They declare this to be permissible in one year and forbidden in another year, so that they may adjust the months which God has sanctified, thus making lawful what God has forbidden. Their evil deed seems fair to them: God does not guide them who deny the truth. (मौलाना वहीदुद्दीन खान भाषान्तर.)

अल्बेरुनीने आपल्या "The Chronology of Ancient Nations" (tr. Dr. C. Edward Sachau) ह्या ग्रन्थामध्ये ह्याचा इतिहास पुढील शब्दांमध्ये दिला आहे.

Alberuni


पैगंबराने आपल्या अनुयायांसह मक्केहून मदिनेकडे प्रयाण केले आणि तेथे पहिल्या मुस्लिम समुदायाची (उम्मा) स्थापना केली ह्या घटनेस ’हिजरा’ असे म्हणतात आणि तिची स्मृति म्हणून हिजरी वर्षगणना इ.स. ६२२ पासून मोजली जाते.

१२ महिन्यांचे इस्लामचे हिजरी वर्ष ३५४ दिवसांचे असते. त्यामध्ये सर्व समसंख्यांक महिने २९ दिवसांचे आणि सर्व विषमसंख्यांक महिने ३० दिवसांचे असतात. ह्याची दरमहिना सरासरी २९.५ इतकी पडते. प्रत्यक्षामध्ये चंद्राचा महिना - पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्याचा काळ - २९.५३०५८९ इतके दिवस असतो. ही ०.०३०५८९ इतकी कसर भरून काढण्यासाठी दर ३० वर्षांमध्ये २,५,७,१०,१३,१६,१८,२१,२४, आणि २६ किंवा २९ ह्या ११ वर्षांमध्ये वर्षाचा शेवटचा महिना ३० दिवसांचा असतो. अशा रीतीने १९ वर्षे प्रत्येकी ३५४ दिवसांची आणि ११ वर्षे ३५५ दिवसांची होऊन ३० वर्षांमध्ये - ३६० महिन्यांमध्ये - १०,६३१ दिवस पडतात, ज्यांची दरमहाची सरासरी २९.५३०५५५ इतकी असते आणि ह्या मार्गाने दिनगणना आणि चन्द्राच्या प्रदक्षिणा ह्यांच्यामध्ये पुरेसा ताळमेळ राखला जातो. मात्र सौरवर्षाशी तालमेळ राखण्याची काहीच तरतूद नाही. ह्यामुळे इस्लाममधील सर्व पवित्र दिवस सौर वर्षामध्ये मागेमागे पडतांना दिसतात.

इस्लामी दिनगणना सांपातिक वर्षाशी आणि ऋतुचक्राशी ताळमेळ राखत नाही ही गोष्ट राज्यकर्त्यांना नेहमीच गैरसोयीची वाटत आली आहे इस्लामी कालगणनेवर आधारित करआकारणी ऋतूंशी ताळमेळ ठेवत नाही. ३० ऋतुचक्रांमध्ये १०,९५० दिवस पडतात. ३१ हिजरी वर्षांमध्ये १०,९८५ दिवस पडतात म्हणजे ३० वेळच्या पीकपाण्याच्या उत्पन्नामधून ३१ वर्षांचा शेतसारा रयतेला भरावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी अकबराने ’फसली’ नावाची एक नवीन सौर कालगणना सुरू केली होती. ’फस्ल’ म्हणजे पीकपाणी आणि शेतसारा फसली वर्षाप्रमाणे आकारला जाई. अकबराच्याच्या कारकीर्दीपासून शहाजहानाच्या कारकीर्दीपर्यंत ती पद्धति वापरात होती. औरंगजेबाच्या इस्लामनिष्ठेमुळे त्याच्या काळानंतर तिचा उपयोग कमी होत गेला. निजामाच्या ताब्यातील हैदराबाद राज्यात मात्र ती अखेरपर्यंत टिकून होती आणि तेथून ती आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांच्या महसूल पद्धतीमध्ये आजहि पाहण्यास मिळते असे वाचनात आले आहे.

फसली सनाप्रमाणे अन्यहि एक सौर सन - सुहूर सन - वापरामध्ये होता. ह्याच्या प्रारम्भाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही पण तो हिजरी सन ७४४ (इ.स. १३४३-४४) च्या बरोबर सुरू झाला अशी समजूत आहे. तेव्हा पहिला सुहूर सन ७४४ असाच मोजला गेला. सुहूर सनामध्ये ५९९ किंवा ६०० मिळविले की इसवी सन मिळतो. (मात्र हिजरी सन आणि इसवी सन ह्यांच्यामधील मूळचे ६२२ वर्षांचे अंतर दरवर्षी कमी होत आता ५८९ वर्षांवर आले आहे, इ.स. २०१७ - हिजरी सन १४३८-३९.) सुहूर सनाचा प्रारंभ सूर्याने मृगनक्षत्रात प्रवेश करण्याचा दिवसापासून मोजला जातो. ह्या सनाचे आपल्याला महत्त्व अशासाठी की शिवकालीन, पेशवेकालीन आणि जवळजवळ १८४० सालापर्यंत पत्रव्यवहारामध्ये पत्राची तारीख सुहूर सन आणि इस्लामी महिन्यांनी दाखवलेली असते आणि वर्षाचे अरबी आकडे शब्दांमध्ये लिहिलेले असतात, जसे की ’छ ४ साबान सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ’.

ह्याचे स्पष्टीकरण असे. अरबी आकडे इहिदे = १, इसने = २, सलास = ३, अर्बा = ४, खमस = ५, सीत = ६, सबा = ७, स्मान = ८, तिसा = ९, अशर = १०, अशरीन = २०, सलासीन = ३०, अरबैन = ४०, खमसैन = ५०, सितैन = ६०, सबैन = ७०, समानीन = ८०, तिसैन = ९०, मया = १००, मयातैन = २०० आणि अलफ = १०००. ’छ ४ साबान सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ’ म्हणजे ’चन्द्र ४ (चौथी तिथि), महिना साबान, सुहूर सन १+५०+१००+१००० = ११५१ (१७५०/१७५१ इसवी. ’मया व अलफ’ म्हणजे ’मया आणि अलफ’. मराठीतील ’व’ हे उभयान्वयी अव्यय मूळचे अरबी भाषेतून मराठीने घेतले आहे.)

(येथेहि मला ’अङ्कानां वामतो गति:’ हे तत्त्व दिसत आहे, जे संस्कृत लेखनामध्ये अनेकदा आढळते. त्यावरचा लेख ह्या मालिकेनंतर लिहीन असे म्हणतो.)

विचारसंस्कृती

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

5 Dec 2017 - 8:48 am | आनन्दा

अरबी तशीदेखील उजवीकडूनच लिहितात ना?

बाकी लेख छान आहे, मला हा नेहमी प्रश्न पडत असे की जगातली सगळी कॅलेंडर सौर वर्षाशी सांगड घालून चालत असताना हे एकच कॅलेंडर असे का? त्याचे बव्हंशी उत्तर आज मिळाले

अरविंद कोल्हटकर's picture

6 Dec 2017 - 12:04 am | अरविंद कोल्हटकर

अरबी लिपि उजवीकडून डावीकडे जाते पण त्या लिपीतहि संख्या, तारखा आणि वेळ दाखविणारे अंक रोमन,देवनागरी इ.प्रमाणे डावीकडून उजवीकडेच लिहिले जातात. https://translate.google.com ने दाखविलेली पुढील भाषान्तरे पहा.

१) ह्या शाळेत १२३४ विद्यार्थी आहेत.
هناك 1234 طالبا في هذه المدرسة.

२) आजची तारीख ५/१२/२०१७ आहे आणि आता दुपारचे १:१५ वाजलेले आहेत.
تاريخ اليوم هو 5/12/2017 والآن هو 1:15 بعد الظهر في فترة ما بعد الظهر.

babu b's picture

5 Dec 2017 - 9:16 am | babu b

छान

निजामाच्या राज्यातील 'फसली' बद्दल वाचले आहे.

रोचक मालिका आहे ही.

पु भा प्र

प्रकाश घाटपांडे's picture

5 Dec 2017 - 11:49 am | प्रकाश घाटपांडे

उत्तम मौल्यवान माहीती आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Dec 2017 - 11:56 am | प्रकाश घाटपांडे

त्र्य.गो ढवळे यांचे पंचागातील ज्योतिष शास्त्र हे पुस्तक वाचनात आले होते. त्यात काही माहिती आहे याबद्दल

वाळवंटी लोक रात्री प्रवास करायचे,समुद्र जवळ असलेले लोक गलबतांतून जायचे. अर्थात चंद्रच मित्र. शेती होती नाइलकडेला ती त्या पाण्यावर. सूर्याच्या भ्रमणाने होणाय्रा ऋतूंना महत्त्व नाही. म्हणून असेल.

एस's picture

5 Dec 2017 - 2:28 pm | एस

उत्तम लेख!

शलभ's picture

5 Dec 2017 - 2:31 pm | शलभ

खूप छान माहिती..

दुर्गविहारी's picture

6 Dec 2017 - 6:58 pm | दुर्गविहारी

खुपच छान माहिती. जुनी कागदपत्रे वाचताना हे संदर्भ नक्कीच उपयोगी पडतील. अजून येउ द्यात.

ss_sameer's picture

6 Dec 2017 - 8:10 pm | ss_sameer

उपयुक्त....!

ss_sameer's picture

6 Dec 2017 - 8:13 pm | ss_sameer

उपयुक्त....!